Thursday, April 13, 2023

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०७


                  "मिकाॅंग" "डेल्टा" टुर
             व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०७
***************************************
पहिल्या दोन दिवसांच्या रणधुमाळी नंतर तिसरा दिवस होता मिकॉंग डेल्टा प्रवासाचा. तिबेट पर्वतरांगांतून उगम पावलेली मिकॉंग ही नदी जवळपास ४३५० कि.मी. लांब असून जगातली १२ व्या क्रमांकाची तर आशियातील ७ व्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. आपल्या उगमापासून चीन, म्यानमार,लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम अशा सहा देशांचा प्रवास करत दक्षिण चीन समुद्राला मिळते. 

ही नदी पश्र्चिम चीन ते दक्षिणपूर्व आशियातील देशातील जलवाहतुकीचा उत्तम पर्याय आहे. आपल्या ९ शाखांसह मिकॉंग नदी ड्रॅगन, युनिकॉर्न, फिनिक्स आणि टॉरटाईज अशा चार सुंदर बेटांची रचना करते. या बेटांवर प्राण्यांच्या अंदाजे १००० प्रजाती आढळतात. सोबतच वनस्पती, मासे, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राण्यांच्या नवीन प्रजातीसुद्धा आढळतात. मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि नामशेष होत असलेला लाओटिन रॉक रॅट हा खारूताई, उंदीरासारखा प्राणी इथे आढळतो.

हो ची मिन्ह शहरापासून मिकॉंग डेल्टा जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे. डेल्टा सेंटर पासून बोटीने आपल्या प्रवासाची सुरुवात होते. मिकॉंग नदीचे पात्र एवढे विशाल आणि अथांग आहे की आपण एखाद्या समुद्रातच सफर करतोय असा भास होतो. जवळपास अर्धा तासानंतर आम्ही युनिकॉर्न या बेटावर उतरलो. बेटावर उतरताच पाहुण्यांचे इथे पारंपरिक गित संगीताने स्वागत केले जाते. सोबतच टरबुज, पपई, अॅपल, चिकू, ड्रॅगनफ्रुट, आंबा इ. फळे आणि ग्रिन टी दिली जाते. मात्र याबदल्यात तुम्हाला टीप द्यावी लागते.

याच बेटावर फळझाडांची लागवड केली असुन छोट्या कालव्यांद्वारे जलपुरवठा केला जातो. मुख्य म्हणजे इथे कुठेही सहजासहजी न आढळणारे वॉटर कोकोनट हे फळ पहायला मिळते. आणखी थोडे समोर गेल्यावर कोको पासुन चॉकलेट, बिस्कीट, पावडर, चिक्की करण्याचे स्थान आहे. बाजुलाच बी फार्मिंग म्हणजेच मधमाशी संगोपन केंद्र आहे. इथे मधमाशांपासून मध संकलन करून त्याची विक्री केली जाते. या दोन्ही जागी भेट दिल्यानंतर घोडागाडीने २ कि.मी‌ अंतरावर असलेल्या थोई सॉन या कालव्यापर्यंत सोडले जाते.

इथुन छोट्याशा होडीतून आपला १ कि.मी.अंतराचा प्रवास सुरू होतो. मुख्य म्हणजे सर्वच होड्या स्त्रीयांद्वारे वल्हवल्या जातात. आजुबाजुला असलेली नारळाची झाडे आणि अतिशय शांत वातावरणातला हा प्रवास मनस्वी आनंद देऊन जातो. तुम्ही सुद्धा या होड्या वल्हवू शकता मात्र आपल्याला सवय नसल्याने लवकरच थकवा येतो. हा प्रवास संपताच पुन्हा एकदा आपण बोटीवर येतो. अर्थातच इथेसुद्धा आपल्याला टीप द्यावी लागते.

बोटीवर येताच नारळपाणी देऊन स्वागत करण्यात येते. गोड, चवदार पाणी पितात फिरल्याने आलेला थकवा, आळस क्षणार्धात दूर होतो. आणखी अर्धा तासाच्या प्रवासानंतर मुख्य बेटाशी आपली बोट येऊन थांबते. इथे सुरवातीलाच कोकोनट कॅंडी वर्कशॉप आहे. इथे नारळाच्या झाडापासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे, कॅंडी, चॉकलेट, चिक्कीचे प्रदर्शन व विक्री केली जाते. सोबतच कॅंडी, चॉकलेट ची संपूर्ण निर्माण प्रक्रिया दाखविली जाते. इथचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्नेक वाईन, बनाना वाईन आणि कोकोनट वाईन होय. विशेषतः मद्यप्रेमींसाठी भल्यामोठ्या जारमध्ये कोब्रा वाईन, बनाना ठेवलेली असते. साक्षात कोब्रा डुंबलेल्या जारमधले मद्य पाहुण्यांना चाखण्यासाठी मोफत दिले जाते आणि विक्री साठी सुद्धा ते उपलब्ध असते.

एव्हाना दुपार झाली असते आणि पोटात कावळे ओरडत असतात. जवळच असलेल्या भलेमोठ्या  रेस्टाॅरंटमध्ये दुपारच्या जेवणाची सोय केलेली असते. इथले वैशिष्ट्य म्हणजे एलीफंट इअर फिश. अख्खी एलिफंट फिश समोर आणुन ठेवताच हिला खायचे की पाहत रहायचे हा प्रश्नच पडतो. सोबतच रंगबिरंगी झिंग्यांनी सजवलेली प्लेट पाहून मन भरून येते. यासोबतच चिकन, आमलेटची भरमार होताच न जेवतासुद्धा एवढे अन्नपदार्थ पाहून पोट भरून येते.दुपारचे जेवण आटोपताच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. एक तासांनी पुन्हा एकदा डेल्टा सेंटरला परत येताच या आनंददायी प्रवासाचा शेवट झाला.
क्रमशः,,,,,,,
***************************************
दि. ०४ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...