@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगबाई अरेच्च्या*
*सेमाडोह, रात बाकी, बात बाकी,,,,, भाग ४
***************************************
दिवसभर कोसळणाऱ्या पर्जन्यधारा संध्याकाळी विश्रांती घेतील अशी अपेक्षा होती मात्र झाले उलटेच. जसजसा अंधार वाढत गेला तसतसे सरींची तिव्रता वाढत गेली आणि विज नसल्याने आमची बेचैनी वाढत गेली. शिवाय कॉटेजेसला रूम सर्व्हिस नसल्याने गोंधळात आणखी भर पडली. मुख्य म्हणजे सेमाडोहला प्रवेश करतानाच कॉटेजेसच्या कार्यालयात जी उदासीनता बघायला मिळते ते पाहता पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येते.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निमित्ताने पर्यटक मोठ्या विश्र्वासाने निवासासाठी इथे येतात परंतु इथल्या प्रशासनाचा गलाथान कारभार पाहता पुन्हा इथे येण्याचे धाडस कोणी करतील असे वाटत नाही. खरेतर अगोदरच बुकिंग केले असल्याने इथे चांगली सुविधा मिळणे अपेक्षित आणि रास्तच होते. मात्र आपल्याला पर्यटकांच्या सुखसुविधेशी काहीही घेणेदेणे नसल्याचे इथली व्यवस्था पाहून वाटते. आम्ही दुपारनंतर कोलकासला फिरायला गेल्याने इथल्या गैरसोयीची फारशी कल्पना नव्हती तरीपण दुपारी विज नसल्याने विचारणा केली असता इथे पाच दिवसांपासून विज नसल्याचे सांगितले गेले. जनरेटरची विचारणा केली तर डिझेल नसल्याचे सांगितले. खरी समस्या तेव्हा निर्माण झाली जेंव्हा बाथरूम, टॉयलेटमध्ये पाणी संपले होते. अखेर नशिब समजा थोड्या वेळेकरीता विजपुरवठा सुरळीतपणे सुरू झाला आणि आमच्या *जिवात जिव आला*.
एवढे असले तरी बाकी सोयींबाबत सर्वत्र आनंदीआनंद होता. बऱ्याच कॉटेजेसमध्ये नॅपकीन, टॉवेल, आंघोळीची साबण, पिण्याचे पाणी यासारख्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. बाथरूममध्ये गिझर फक्त शोभेसाठी होते. इथे जवळपास कुठेही दुसरे हॉटेल किंवा इतरत्र जेवणाची सोय नसल्याने सर्वस्वी तुम्हाला इथल्या कॅंटीनवर अवलंबून रहावे लागते. इथले जेवन मग ते व्हेज असो की नॉनव्हेज दर्जेदार अजिबात नव्हते किंबहुना तुम्ही किचनमध्ये डोकावल्यास तुमची जेवणाची इच्छाच मरून जाईल. शिवाय कॅन्टीनच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा मनसोक्त आणि बिनधास्त वावर तुमच्या उरात धडकी भरायला पुरेसे आहेत. कुत्रेसुद्धा इतके निगरगट्ट की तुम्ही कितीही हाकला, जोपर्यंत त्यांची मर्जी होणार नाही तोपर्यंत ते जागा सोडायला तयार नसतात. काही कुत्रे तर चक्क खुर्चीवर बसून आराम करतात. खेदाची बाब म्हणजे उष्ट्या प्लेट्स कॅन्टीनमध्ये चाटुन चाटुन साफ करायला हेच कुत्रे कामी पडतात. इथले कॅन्टीन म्हटले की अंगावर काटाच येतो. साध्या चहाची जरी आॉर्डर दिली तर तुम्हाला बिनदुधाचा म्हणजेच काळा चहा मिळतो, कमितकमी दुध पावडर वापरण्याचे सौजन्य सुद्धा दाखवल्या जात नाही.
निश्र्चितच सेमाडोहचे नैसर्गिक सौंदर्य वादातीत आहे, इथली शांतता मनोरम्य आहे, इथला सभोवताल आणि परिसर अतुलनीय आहे मात्र या सर्वांना सर्व्हिसची जोड मिळत नाही तोपर्यंत काही खरे नाही. कमीतकमी इथे दर्जेदार कॅन्टीन, जनरेटर, लॅंडलाईन, एखादे डेली निड्स शॉप, रुम सर्व्हिस, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या जरूरी बाबींकडे संबंधित विभागाने लक्ष दिल्यास इथे येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होईल. अर्थातच इथे झालेल्या गैरसोयींबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार जरूर केली आहे मात्र त्याची योग्य ती दखल घेऊन कितपत सुधारणा होतील हे सांगणे सध्यातरी कठीणच आहे. विशेषत: एकटादुकटा परिवार किंवा महिलावर्ग सोबत असल्यास सेमाडोहपेक्षा चिखलदरा इथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी कोलकास, सेमाडोह पाहणे शहाणपणाचे ठरेल.
*आलीया भोगावी असावे सादर* प्रमाणे आम्ही या परिस्थितीत सुद्धा मनोरंजनात कमी पडलो नाही. रात्रीचे जेवण आटोपताच कॅंटीन समोरच्या हॉलमध्ये आम्ही सर्व एकत्र झालो आणि मग सुरू झाली ब्युटीफुल,गाणी, शेरोशायरी, किस्से यांची जुगलबंदी. मात्र आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुन्हा एकदा विजेने खेळखंडोबा करताच आमचा हिरमोड झाला आणि मग मोबाईलच्या उजेडातच नाचगाणे, गप्पागोष्टी सुरू झाल्या. या सर्व गोंधळात एक जमेची बाजू म्हणजे सर्वत्र काळाकुट्ट अंधार असल्याने दुर्लभ काजव्यांचे मनसोक्त दर्शन झाले. अखेर विज येण्याची सुतराम शक्यता नसल्याने आणि रात्र बरीच झाल्याने आम्ही आमचा कार्यक्रम आटोपता घेतला आणि आपापल्या कॉटेजेसकडे परतलो.
No comments:
Post a Comment