Thursday, April 13, 2023

चिखलदरा प्रवास वर्णन, अंतिम भाग


  चिखलदरा, "अश्रुंची झाली फुले ", अंतिम भाग
***************************************
रविवार, अर्थातच सहलीचा दुसरा दिवस चिखलदरा करीता राखीव असल्याने सर्वांनी सकाळी लवकर तयारी करून निघायचा बेत होता. मात्र पहाटेला जाग आली आणि पाहतो तर काय,,,रात्रभर क्षणाचीही उसंत न घेता पाऊस आणखी दमदारपणे दारात दत्त म्हणून हजर होता. समोरच सिपना नदी विहीणबाई सारख्या आपल्याच तोऱ्यात चांगलीच फुगून वाहत होती. सतत कोसळणाऱ्या जलधारांनी वातावरणातला गारठा चांगलाच वाढवला होता. खरेतर इथल्या गैरसोयींमुळे अडखळल्यासारखे जरूर वाटत होते परंतु निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण आणि आल्हाददायक वातावरण पाहता बाकी सर्व गोष्टींचा विसर पडतो. कॉटेजेसच्या  बाहेर पडतो म्हटलो तर खबरदार जर टाच मारून जाल पुढे,,,, च्या आविर्भावात पावसाने नाकेबंदी केलेली होती. आंघोळ करतो म्हटले तर एक बादली गरम पाण्यासाठी मोजावे ५०/- रू. मोजावे लागणार होते आणि ते केंव्हा मिळेल याची शाश्वती नसल्याने बहुतेकांनी ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिए चा अनुभव घेतला.

सर्वांनी सकाळी ९ च्या सुमारास काळा चहा आणि नास्ता आटोपुन चिखलदऱ्याकडे प्रयान केले. सततच्या पावसाने वनराई ओलीचिंब झाल्याचे दृश्य दिसत होते तर घाट आणि कठीण चढाईमुळे प्रवास रोमांचक झाला होता. अर्थातच चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगात वसले असल्याने हिरवळीने नटलेल्या उंचच उंच पर्वत रांगा, धुक्यात हरवलेल्या वाटा, मधातच खोल दऱ्यांचे मोहक दर्शन,पावसाळी धबधबे मनाला हुरुप आणत होते. चिखलदरा अवघे सात कि‌मी अंतरावर असतांना काही कारणास्तव बस थांबली आणि आम्ही खाली उतरलो तर आनंदाला पारावर उरला नाही कारण सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मोबाईलने नेटवर्क दाखवल्याने सर्वांनी आप्तस्वकियांशी पटापट संपर्क साधला. सोबतच हिरव्याकंच बॅकग्राऊंडवर मनसोक्त फोटोसेशन करून घेतले.

चिखलदरा हे जगाच्या पटलावर आणण्याचे श्रेय जाते ते १८२३ ला हैद्राबाद रेजीमेंटचे कॅप्टन रॉबिन्सन यांना. जवळपास ३८९८ फुट उंचीवर असलेले हे स्थान इंग्रजांनी कॉफी लागवडीसाठी विकसित केले होते. बहुदा कॉफी लागवडीसाठी चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव स्थान असावे. वास्तविकत: संपूर्ण चिखलदरा आणि आजुबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. मात्र सतत कोसळणारा पाऊस, धुक्यांनी हरवलेले रस्ते आणि काही मित्रांना नागपुरला लवकर परतायचे असल्याने आम्ही मोजक्याच स्थळांची भेट घेतली.

पंचबोल प्वाईंट
कोणतेही हिल स्टेशन म्हटले की तिथे एखादा इको प्वाईंट जरूर असतो. पंचबोल प्वाईंटवर एका बाजुला कॉफीचे मळे तर दुसरीकडे  पाच महाकाय पर्वत एकमेकांना खेटून असल्याने नैसर्गिक इको प्वाईंट तयार झालेला आहे. यामुळे एकदा जोराने आवाज दिला की आपल्याला पाचदा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र आम्ही या प्वाईंटवर पोहोचताच तुफानी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने आमचे ओलेचिंब स्वागत केल्याने आम्ही बसच्या खाली न उतरणेच पसंत केले. 

हरिकेन प्वाईंट
पावसापुढे नमते घेत आम्ही पंचबोल प्वाईंटवरून हरिकेन प्वाईंटला आलो. चिखलदऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या या जागी पावसाने आपली तिव्रता कमी केल्याने आम्हाला थोडेसे हायसे वाटले. इथे पर्यटकांना सुरक्षेसाठी लोखंडी कठडे आणि गॅलरीत तयार केले असल्याने सभोवतालच्या उंच पर्वत आणि खोल दऱ्यांचे दर्शन घेता येते. या स्थळावर छोटी दुकाने आणि हातठेल्यांची रेलचेल असल्याने बरबटीचे गरमागरम भजे, स्विटकॉर्न, उकडलेली बोरे, चहा यावर पर्यटक तुटून पडत होते.

देवी प्वाईंट
हरिकेन प्वाईंटवरून निघताच आम्ही जवळच असलेल्या बगिच्याजवळ थांबलो. मात्र पुन्हा एकदा पावसाच्या जोरामुळे आम्हाला माघारी परतावे लागले. तरीपण हा बगिचा खुप पाहण्यासारखा आहे असे वाटत नाही परंतु इथली झुकझुक गाडी म्हणजेच मिनीट्रेन बच्चेकंपनीला जरूर आकृष्ट करते. इथून लवकरच आम्ही देवी प्वाईंटला पोहोचलो. इथे पायऱ्याने खाली उतरून देवी मंदीरात जाता येते. हे मंदिर प्रचंड मोठ्या आणि काळ्या दगडात कोरलेले आहे. मंदिराची उंची जास्त नसल्याने थोडे खाली वाकुनच प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या वरच्या भागात शक्कर तलाव आहे आणि हा तलाव ओव्हरफ्लो झाला की मंदिराच्या डाव्या बाजुला एका धबधबा पहायला मिळतो. मंदिरात मात्र छतातून नेहमीच पाण्याचा वर्षाव सुरू असतो. या स्थानावरूनच चंद्रभागा नदीचा उगम झालेला आहे. मंदिराच्या वरच्या भागात छोटी दुकाने, हॉटेल्स आहेत तिथे गरमागरम मिसळ, तळलेले वडे, चहा इ. खाद्यपदार्थ मिळतात.

एव्हाना दुपारचे दोन वाजत आले होते आणि पोटात कावळे ओरडत होते परंतु आम्ही दुपारच्या जेवणासाठी अगोदरच हॉटेल हर्षवर्धन इथे बुकिंग केले असल्याने तिथे जेवणाची चांगली सोय झाली. दालफ्राय, वांग्याचे भरीत, कढी, पोळी आणि जिलेबी समोर पाहून सगळे अधाशासारखे अन्नावर तुटून पडले. अखेर क्षुधाशांती होताच तृप्तीची ढेकर देत आम्ही चिखलदरा सोडण्याचा निर्णय घेतला.

संपुर्ण दोन दिवस जिवलग मित्रासारखी साथ देणाऱ्या वरूणराजाने अखेर निरोपाच्या वेळी विश्रांती घेतली आणि वातावरण प्रसन्न, आल्हाददायक झाले. परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा गप्पागोष्टी आणि  हास्यकल्लोळात सर्व सामील झाले. इतक्या वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा आपापल्या वाटेने निघून जाणार यामुळे काहींच्या भावना अनावर झाल्या, काहींनी मनमोकळेपणाने अश्रुंना वाट मोकळी करून दिली तर काहींनी कळत नकळत डोळ्यांच्या कडा पुसल्या. खरेतर हे आनंदाश्रू होते, काहींची मने गलबलून गेल्याने ते नि:शब्द झालेले होते. अखेर यातून सावरतो न सावरतो तोच अमरावती आले आणि दोन मित्रांचा निरोप घ्यायची वेळ आली. टाटा, गुडबाय करत उर्वरीत आम्ही नागपुरच्या दिशेने निघालो. 

जवळपास दहाच्या सुमारास आम्ही नागपूर गाठले आणि एकमेकांना निरोप देत सहलीचे वर्तुळ पूर्ण केले. जो मित्रवान तो भाग्यवान असे उगाचंच म्हटले जात नाही. दोन दिवस जगापासून अलिप्त राहुन मित्रमैत्रिणीच्या गराड्यात राहुन आयुष्य पुन्हा एकदा रिचार्ज झाल्यासारखे वाटले. वर्षानुवर्षांच्या ऋणानुबंधाला आणखी नवी पालवी फुटली, मन ताजेतवाने झाले. आयुष्यात मैत्रीचे किती महत्त्व आहे, काय आयाम आहे याची परत एकदा सर्वांना जाणीव झाली. पुन्हा एकदा भेटण्याची, एकत्र येण्याची मनिषा ठेवून जड अंत:करणाने एकमेकांना निरोप देण्यात आला.
***************************************
दि. ३१ जुलै २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...