Wednesday, April 12, 2023

बॉलिवूडची स्टार मदर, रिमा लागू


      बाॅलिवूडची स्टार मदर,, रिमा लागू
***********************************
खरेतर चित्रपट म्हटला की नायक, नायिका यांना नेहमीच प्रमुख आणि महत्त्वाच्या भुमिका हमखास दिल्या जातात. मात्र चित्रपटात काही सहायक भुमिका अशा असतात ज्या या दोन्ही भुमिकांना पुरक ठरत चित्रपटात जीव ओततात. अशा सहायक भुमिकांत नायकाला आईची तर नायिकेला वडिलांच्या भुमिकेची जोड लागताच चित्रपटात भावनिक वादळांना काही कमी नसते‌. अशाच काही आईच्या भुमिकेत कित्येक तारकांनी आपले वेगळेपण जपलेले आहे. मात्र आईच्या जुन्या प्रतिमेला अपडेट करण्याचे श्रेय जाते ते रिमा लागू या अभिनेत्रीला. चला तर मग आज आपण आढावा घेऊ रिमा लागू यांच्या "आई" या भुमिकेचा.

२१ जुन १९५८ ला जन्मलेल्या रिमा लागुंना अभिनयाचा वारसा आपल्या आईकडून मिळालेला होता आणि शालेय जीवनापासून त्यांनी अभिनयात रूची घेणे सुरू केलेले होते. १९७९ साली सिंहासन या मराठी चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलेले होते तर १९८० चा कलयुग हा त्यांचा प्रथम हिंदी चित्रपट होता. जवळपास १०० पेक्षा जास्त चित्रपटातून आणि १४ दुरदर्शन मालिकांमधून त्यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाचे विविध रंग उधळलेले होते. मराठीमध्ये "तुझे माझे जमेना" तर हिंदीमध्ये "श्रीमान श्रीमती", "तू तू मैं मैं" ह्या त्यांच्या विशेष गाजलेल्या मालिका होत्या‌. विविध भुमिका साकारूनही रिमा लागूंची खरी ओळख निर्माण झाली ती त्यांच्या आई या भुमिकेने. प्रसंग भावनिक असो की विनोदी,,,रिमा लागू आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने छोटा, मोठा असे दोन्ही पडदे व्यापून टाकलेले होते.
अभिनयाची ती चालती फिरती प्रयोगशाळा होती. 

घारे टपोरे डोळे, सुहास्यवदन, गौरकांतीची धनी असलेली ही अभिनेत्री चार दशकांहून अधिक काळ आपल्या अष्टपैलू अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध करत होती. उत्तम आवाज, स्पष्ट संवादफेक, मराठी, हिंदीवरील प्रभुत्वाने त्या रसिकांना खिळवून ठेवत असायच्या. बोलका चेहरा आणि संवेदनशील अभिनयाने त्यांनी कायमच चाहत्यांच्या ह्रदयात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले होते. बॉलिवूडच्या जवळपास सर्व नायक, नायिकांच्या आईची भूमिका बजावल्याने रिमा लागूंना स्टार मदर ऑफ बाॅलिवूड असे म्हटले जायचे. विशेषतः सलमान खानसोबत त्याच्या आईच्या भुमिकेत त्या इतक्या समरस व्हायच्या की रिल लाईफची आई ही  खरोखरच रिअल लाईफ आई असावी असेच वाटायचे.

 केवळ ३१ वर्षांच्या असतांना त्यांनी मैने प्यार किया पासून चित्रपटात आईच्या भुमिकेची कारकीर्द सुरू केली होती आणि सलमानसोबत साजन, जुडवा आणि हम साथ साथ है पर्यंत ही जोडी सुपरहिट ठरलेली होती. जयकिशन मध्ये अक्षय कुमारची आई तर यस बॉस आणि कल हो ना हो मध्ये शाहरुखच्या आईची भूमिका त्यांनी बजावली होती. वास्तव मध्ये संजय दत्त अर्थातच रघूची आई साकारताना त्यांच्या दमदार अभिनयाची प्रचिती आलेली होती. प्रेमग्रंथ मध्ये तर रिमा लागूंनी आपल्या पेक्षा पाच वर्षे मोठ्या रिषी कपूरच्या आईची भूमिका निभावत सर्वांना अचंबित केले होते. दिवाना मस्ताना, जिस देश में गंगा रहता है मध्ये गोविंदाची आई तर मैं प्रेम की दिवाणी हूं मध्ये अभिषेक बच्चनच्या आईची भुमिका त्यांनी साकारलेली होती.

केवळ नायकांचीच नव्हे तर रिमा लागूंनी नायिकांच्या आईची सुद्धा भुमिका केलेल्या होत्या. हम आपके है कौन मध्ये माधुरीच्या आईची तर कुछ कुछ होता है मध्ये त्या काजोलच्या आईच्या भूमिकेत होत्या‌. कधी रंगिला मध्ये उर्मिलाची आई तर कधी कयामतसे कयामत तक मध्ये जुहीची आई झालेली होती. असे असले तरीही मैने प्यार किया मधली त्यांची सलमानच्या आईची भुमिका त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देऊन गेली होती. निरुपा राय, दिना पाठक, नुतन आणि राखी यांनी साकारलेल्या आईच्या भुमिकांपेक्षा  रिमा लागूंनी साकारलेली "आई"ची भुमिका यात जमिनअस्मानचे अंतर आहे. 

खरेतर रिमा लागूंनी आई व्यक्तीरेखेच्या कक्षा रुंदावण्याचे काम केलेले आहे. बाॅलीवुडमधली टिपिकल पांढऱ्या केसांची, खंगलेली, सतत पदराला डोळे पुसणारी, चिंताग्रस्त आणि शिलाईमशीन चालवणारी आईची प्रतिमा रिमा लागूने मोडीत काढलेली होती. धुरकट, अंधाऱ्या स्वयंपाकखोलीतून निटनेटक्या मॉड्यूलर किचन, ड्राॅईंगरुममध्ये आईला आणण्याचे श्रेय रिमा लागूंनाच जाते. नायकाची तेरे लिए गाजरका हलवा बनाया पासून सुटका देखील रिमा लागूंनीच केली आहे. ज्याप्रमाणे अमिताभ आणि निरुपा राय असली माँ बेटे शोभत होते अगदी त्याचप्रमाणे सलमान आणि रिमा लागू अस्सल माँ बेटे वाटत होते. सलमान आणि रिमा लागूंच्या वयात फारतर आठ नऊ वर्षांचे अंतर...तरीपण आईचा रोल निभावण्यात रिमा लागूंचा हातखंडा होता.

 पारंपरिक आईप्रमाणे नायक मुलाला सतत उपदेशाचा डोज देण्यापेक्षा तरुण पिढीला समजून घेत मातृत्व आणि पत्नी धर्माचा समतोल त्यांनी आपल्या अभिनयात लिलया राखला होता.
अशा या ग्लॅमरस,स्मार्ट आईला, चतुरस्त्र अभिनेत्रीला मात्र दुर्दैवाने अकाली निधनाला सामोरे जावे लागले होते. दिनांक १८ मे २०१७ ला संध्याकाळी  ७ वाजता रिमा लागू दुरदर्शनचा कार्यक्रम "नामकरण" चे चित्रीकरण आटोपून घरी परतल्या होत्या. शिवाय त्यांना कुठलाही मोठा आजार नव्हता. मात्र रात्री अचानक त्यांना छातीत दुखायला लागल्याने इस्पितळात दाखल केले होते. तिथे अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली गेली आणि चित्रपटसृष्टी एका गुणी,हरहुन्नरी नटीला पारखी झालेली होती. १८ मे,,,आज रिमा लागू यांचा स्मृतीदिन आहे, चाहत्यांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
**********************************
दि. १९ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...