Wednesday, April 12, 2023

फिटे ना फिक्सिंग चे जाळे


              'फिटे' ना "फिक्सिंगचे" जाळे
***************************************
बांग्लादेशचा क्रिकेट संघ टि ट्वेंटी आणि कसोटी मालिकेसाठी भारतात दाखल झाला असून ही मालिका सुरू होण्यापूर्वीच त्यांना मोठा धक्का बसला आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल अष्टपैलू खेळाडू म्हणून नावाजलेला शाकिब अल हसन हा फिक्सिंगच्या जाळ्यात अडकला असून आयसीसीने त्याच्यावर दोन वर्षांकरीता बंदी घातलेली आहे. तिनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकंदरीत ३३८ सामने खेळलेला, फलंदाजीत अकरा हजारांवर धावा केलेला ज्यात १४ शतके, ८० अर्धशतकांचा समावेश तर गोलंदाजीत ५६२ बळी घेतलेल्या या दिग्गज अष्टपैलू खेळाडूला फिक्सिंगच्या फासात फसण्याची अवदसा का आठवली याचेच आश्चर्य वाटते. मुख्य म्हणजे २०१४ ला खुद्द बांग्लादेश क्रिकेट मंडळाने शाकिब अल हसनवर विदेशात खेळण्यासाठी परवानगी न घेणे, प्रशिक्षकाशी अयोग्य वर्तन करण्यासाठी सहा महिन्यांची बंदी घातली होती. मात्र झालेल्या चुकांतुन शाकिब हसनने हम नहीं सुधरेंगे म्हणत फिक्सिंगच्या गर्तेत अडकला असून यामुळे हसनचे हसू नक्कीच मावळले असणार.

खरेतर क्रिकेटला सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटल्या जातो मात्र या खेळाचे व्यवसायिक रुप, प्रचंड आर्थिक उलाढाल पाहता हा खेळ खरोखरच गुणी खेळाडूंच्या खेळ कौशल्यावर खेळल्या जातो की फिक्सिंगच्या सावटाखाली खेळल्या जातो हाच प्रश्न पडतो. ज्याप्रकारे अधुनमधून फिक्सिंगचे भुत डोकावते आहे आणि शाकिब हसनसारखा वरिष्ठ खेळाडू यात लिप्त आढळतो ते पाहता या भुताटकीची पाळेमुळे चांगलीच खोलवर रुजलेली असण्याची दाट शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार फिक्सिंगचे पहिले प्रकरण १९९२ ला लंकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उघडकीला आले. लंकेच्या रोशन महानामा, असांका गुरुसिंगे आणि सनत जयसुर्याला बुकींनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव दिला होता जो या खेळाडूंनी स्पष्टपणे नाकारला होता. १९९४ ऑस्ट्रेलियाच्या लंका दौऱ्यात खेळपट्टी आणि वातावरणाची माहिती बुकींना देण्यात मार्क वॉ आणि शेन वॉर्न दोषी आढळले मात्र या दोघांना केवळ दंड ठोकून मोकळे सोडण्यात आले.

२००० साल उजाडले आणि अवघ्या क्रिकेट विश्वावर फिक्सिंगचा बॉम्बगोळा पडला. दिल्ली पोलिसांनी ७ एप्रिल २००० ला गौप्यस्फोट करताच संपूर्ण क्रिकेटविश्व हादरून गेले. भारत आणि द.आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात द.आफ्रिकेच्या कर्णधाराने म्हणजेच हॅंसी क्रोनिऐने २० पेक्षा कमी धावा करण्यासाठी पंधरा हजार डॉलर्समध्ये सौदा केल्याचे मान्य केले. मात्र या बुकींसोबत भारताच्या मोहम्मद अझरूद्दीनने ओळख करून दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात हॅंसी क्रोनिऐसोबतच निकी बोऐ आणि हर्षल गिब्जसुद्धा लिप्त आढळले. तर भारताचे मो. अझरूद्दीन, नयन मोंगिया, अजय शर्मा, अजय जडेजा आणि मनोज प्रभाकर यांच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उभारण्यात आला. याच वर्षी पाकिस्तानचे सलीम मलिक आणि वेगवान गोलंदाज अता उर रहमान फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले.

फिक्सिंग प्रकरणात आयसीसी आणि क्रिकेट मंडळातर्फे कडक कारवाई होताच ही वाळवी समुळ नष्ट होईल असे वाटले होते मात्र काळवेळेनुसार अशा फिक्सिंगऐवजी स्पाॅट फिक्सिंगने जन्म घेतला. २०१० पाकिस्तानच्या इंग्लंड दौऱ्यात पाकचे वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांच्यासह त्यांचा कर्णधार सलमान बट्ट स्पॉट फिक्सिंग मध्ये पकडले गेले. मो. आमिरवर ५वर्षे, मो. आसिफवर ७ वर्षे तर सलमान बट्टवर आजिवन बंदी घालण्यात आली होती. इतके असुनही फिक्सिंगचे भुत काही केल्या क्रिकेटच्या मानगुटीवरून उतरायला तयार नव्हते. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाठोपाठ २०१२ ला आयपीएलच्या पाचव्या हंगामात फिक्सिंगच्या कारणास्तव तब्बल पाच खेळाडूंची हकालपट्टी करण्यात आली तर २०१३ ला आयपीएलच्या सहाव्या हंगामात भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटु शांताकुमार श्रीशांत स्पॉट फिक्सिंग मध्ये पकडला गेला. श्रीशांतला याकरिता २६ दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला. अखेर सहा वर्षांनी म्हणजेच २०१९ ला सर्वोच्च न्यायालयाने आणि बीसीसीआयने त्याच्यावरची बंदी उठवली.
खेळ क्रिकेटचा असो की आणखी कोणताही,, तो खेळ भावनेनेच व्हायला हवा. मात्र पैसा आणि इतर आमिष किंवा लोभापायी खेळभावना पायदळी तुडवणे अत्यंत चुकीचे आहे. 

मात्र झटपट श्रीमंत होण्याच्या नादात किंवा इतर बाबी़साठी खेळाडू अशा घृणास्पद प्रकारांना बळी पडतात आणि आपले करिअर, आपल्या देशाची क्रिकेट संस्था आणि पर्यायाने देशाचे नाव मातीमोल करतात. अर्थातच आयसीसी किंवा इतर प्रशासनाकडून तंबी देऊनही किंवा कडक शिक्षा ठोठावूनही क्रिकेटपटू अशा गैरप्रकारांना का बळी पडतात याचे चिंतन आयसीसीने, क्रिकेट मंडळांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ही फिक्सिंगची वाळवी क्रिकेटचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही.
***************************************
दि. ०१ नोव्हेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...