'म्रुत्युचे' पंचतारांकित "सापळे"
**************************************
संपूर्ण देश लोकसभा निवडणूक निकालात गुंग असतांना शुक्रवार दिनांक २४ मे ला सुरत इथे भयानक अग्निकांड घडले. अहमदाबाद महामार्गावर असणाऱ्या सरथाना, सुरत इथे तक्षशिला या व्यवसायीक संकुलात भिषण अग्नितांडव माजले आणि दुर्दैवाने २१ जिवांची राखरांगोळी झाली. चार मजल्याच्या या इमारतीत जवळपास सत्तर दुकाने आणि कार्यालय असुन फॅशन, नृत्य इन्स्टिट्यूट सोबतच कोचिंग क्लासेस सुद्धा आहेत. एवढे भिषण अग्निकांड घडुनही ही दुर्घटना नक्की कशामुळे झालेली आहे हे स्पष्ट नसले तरी एसी डक्ट, कॉम्प्रेसर अथवा प्लॅस्टिक जळल्यामुळे झाल्याशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिक्षणासाठी घरुन निघालेले १४ ते १७ वयोगटातील हे २० कोवळे जिव, ज्यात १६ विद्यार्थीनींचा समावेश होता आता कायमचे काळाच्या उदरात गडप झाले असुन त्यांच्या कुटुंबियांना जन्मभर ही भळभळती जखम उराशी घेऊन जगावे लागणार आहे. सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे, आपात्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन नसणे, जमलेल्या जमावाची संवेदनहीन मनोवृत्ती आणि प्रशासकीय मुर्दाडपणाला हे हकनाक बळी पडले असुन दोषींवर फारतर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल आणि तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात अडकून ही घटना लवकरच विसरली जाईल. मात्र पिडीत कुटुंबियांचे दुःख, वेदना, आक्रोश, संताप आणि संवेदना याची सुनावणी कुठे आणि कोण करणार हा प्रश्न अनुत्तरीत राहण्याचीच शक्यता जास्त आहे.
खरेतर आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी अशा दुर्घटना घडल्या की थातुरमातुर चौकशीचे सोपस्कार आटोपले जातात आणि अशी प्रकरणे दाबली जातात. माध्यमांच्या दृष्टीने अशा घटना टिआरपीसाठी फारश्या उपयोगी नसल्याने लावून धरल्या जात नाही. तक्षशिला आर्केड किंवा यासारखी निव्वळ नफेखोरीसाठी थाटलेली अशी स्थळे साक्षात म्रुत्युला आमंत्रण देणारी असतात. जमिनीचे भाव गगणाला भिडल्याने कमी जागेत जास्तीत जास्त बांधकाम कसे करता येईल याचाच सर्वत्र विचार केला जातो. मग इथेच पार्किंग, जिना, लिफ्ट यांच्या रचनेत फेरफार करत सुरक्षेला तिलांजली दिली जाते. शिवाय दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या टोलेजंग इमारतींच्या दृष्टीने आपल्याकडची अग्निशमन यंत्रणा खरोखरच पुरेसी आणि अद्ययावत आहे काय हासुद्धा मुख्य प्रश्न आहे.
आपल्याकडे सुरक्षेबाबत अक्षम्य उदासीनता दिसून येते. जणुकाही मानवी जिवनाचे काहीच मोल नसल्यासारखे सुरक्षेचे नियम वाऱ्यावर सोडले जातात. अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपला समाज, प्रशासन आणि संबंधित विभाग यांनी योग्य तो बोध घेतल्यास भविष्यात याची पुनरावृत्ती टाळल्या जाऊ शकते. मात्र दुर्घटना घडेपर्यंत सगळे कुंभकर्णी झोपेत असतात. केवळ व्यापारी संकुलच नव्हे तर जागोजागी दाटीवाटीने उभी राहीलेली हॉटेल, रुग्णालये, जंगी मॉल, शाळा, कॉलेज ही सुद्धा एकप्रकारची म्रुत्युची सापळेच आहेत. बांधकाम आणि सुरक्षेला फाटा देत राजेरोसपणे थाटलेली ही स्थळे केंव्हाही एखाद्या अप्रिय घटनेची साक्षीदार ठरू शकतात.
कामाच्या जागी सुखसोयी, सुटसुटीतपणा आणि आरामदायी वातावरण सर्वांनाच हवे आहे मात्र नियम पाळायला, सुरक्षेची तरतुद करायला हयगय केली तर हिच कारणे आपल्या जिवावर उठतात मग दोष तरी कोणाला द्यायचा? केवळ पोलीस, प्रशासन आणि न्यायालयावर अवलंबून राहून कसे चालणार? शाळा, कॉलेज मध्ये सुद्धा अपघात किंवा इतर आणिबाणीच्या प्रसंगी जीव कसा वाचवायचा, सुरक्षितपणे बाहेर कसे पडायचे, इतरांची मदत कशी करायची याजे प्राथमिक शिक्षण आणि जनजागृती करणे अत्यंत गरजेचं आहे.
या दुर्घटनेनंतर बिल्डर हर्षल वकेरीया, जिग्नेश आणि कोचिंग क्लासेसचा मालक भार्गव बुटानी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असुन गुजरात सरकारने म्रुत्युमुखी पावलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाखाची आर्थिक मदत देऊ केलेली आहे. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांना किती कठोर शिक्षा होईल हे पाहणे आता जास्त महत्त्वाचे आहे. दोषींना जोपर्यंत जन्माची अद्दल घडत नाही, तोपर्यंत त्यांच्यावर कायद्याचा वचक राहणार नाही. काहीही झाले तरी चलता है ही समाजाची मानसिकता घातक आहे. एखादा अपघात अथवा दुर्घटना टाळणे १००% अशक्य असले तरी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना केल्या तर दुर्घटनेची तिव्रता आणि प्राणहानी नक्कीच टाळता येऊ शकते. अग्निशमन दलाचे आधुनिकीकरण आणि तत्परता, सोबतच जखमींना वेळेवर उपचार मिळाले असते तर काही जिव वाचवता आले असते.
मात्र याकरिता स्थानिक व्यवस्थापनासोबतच उपस्थित जमावाने संवेदनशीलता दाखवत फोटोग्राफी सोडून मदतीचा हात दिला असता तर एवढे बळी गेले नसते. जेवढे बळी पडले जवळपास तेवढेच गंभीर जखमी असून सुटकेचा मार्ग न दिसल्याने कच्याबच्च्यांनी तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरून उडी घेत जिव वाचविण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात आपला जिव गमावला. ज्यांना हे धाडस करता आले नाही किंवा इतर कारणास्तव आत अडकून पडले ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि घड्याळ, मोबाईलद्वारे त्यांची ओळख पटवल्या गेली. विद्यार्जनासाठी गेलेल्या या कोवळ्या जिवांसाठी कोचिंग क्लासेस दुर्दैवाने चोकिंग क्लासेस ठरले.
**************************************
दि. २६ मे २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment