Thursday, April 13, 2023

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०५


          व्हिएतनाम प्रवासवर्णन, भाग ०५
  "वॉर रिमेनंट म्युझिअम", युद्धाचे विक्राळ रूप
***************************************
चु ची टनलच्या भेटीनंतर आमची गाडी वळली ती वॉर रिमेनंट म्युझियमकडे. १९७५ ला स्थापन झालेल्या या म्युझियममध्ये प्रांगण,तळमजला आणि वरच्या दोन मजल्यांवर विशेषतः अमेरिकन युद्धातील शस्त्रास्त्रे, दारूगोळा, रासायनिक अस्त्रांचा पर्यावरण आणि मानवी जीवनावर पडलेला दुष्प्रभाव, युद्धकालीन तुरूंग, शिक्षेच्या अघोरी पद्धती, युद्धाची मारकता, दाहकता वाढविणारे बॉंम्बवर्षक विमाने, हेलीकॉप्टर, पॅटन टॅंक आदिंचा समावेश आहे.

इथला परिसर अत्यंत निटनेटका असून प्रत्येकजागी व्हियतनामी आणि इंग्रजी भाषेत माहिती उपलब्ध असल्याने फिरणे सोपे होते. प्रांगणात युएच१ ह्यु हेलीकॉप्टर, एफ५ ए फायटर विमाने, एम४८ पॅटन टॅंक, ए१ स्कायरेडर बॉंम्बवर्षक विमाने, ए३७ ड्रॅगनफ्लाय अटॅक बॉंम्बर यासोबतच निकामी केलेला प्रचंड प्रमाणात दारूगोळा प्रदर्शित केलेला आहे. प्रांगणातच युद्धकैद्यांची दुरावस्था दाखविणारे छोटे तुरुंग साकारले आहे. बाजुलाच फ्रांसमध्ये पुर्वी प्रचलित असलेले शिरच्छेद करण्याचे यंत्रसुद्धा (गुलोटाईन) ठेवलेले आहे, या यंत्राच्या क्रुरतेची साधी कल्पनासुद्धा केली तरी अंगावर काटा येतो.

सर्वात वरच्या मजल्यावर फ्रांस आणि अमेरिकेने व्हियतनामच्या भुमीवर युद्धाच्या नावाखाली कसा उच्छाद मांडला होता याचे दर्शन घडते. १९४५ ते १९७५ पर्यंत या युद्धखोर देशांनी आपली सर्व ताकद,, दारुगोळा, विनाशकारी हत्यारे यांचे खुलेआम प्रदर्शन आणि दुरुपयोग व्हिएतनामच्या विनाशाकरीता केला. परकीय भुभागावर आर्थिक आणि शस्त्रास्त्रांच्या भरवश्यावर या दोन्ही देशांनी दाखवलेला नंगानाच पाहता हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारेच आहे यात शंका नाही.

पहिल्या मजल्यावर फिरताना बऱ्याचशा पर्यटकांचे डोळे आसवांनी डबडबले होते तर काहींना हुंदका आवरता येत नव्हता. कित्येक पर्यटक संपूर्ण गॅलरी न बघता अर्ध्यातुनच बाहेर पडत होते. याला कारणीभूत होते व्हियतनामवर झालेल्या रासायनिक हल्ल्यांचे प्रदर्शन. व्हिएतकॉंग लढवय्ये आधुनिक शस्त्रास्त्रांना जुमानत नसल्याने अखेर अमेरिकेने एजंट ऑरेंज आणि डिफोलीएंट या रासायनिक हल्ल्यांचा पर्याय निवडला. या रासायनिक हल्ल्यात जे बळी पडले किंवा संपर्कात आले त्यांना डिगॉक्झीनच्या ट्रेसेसमुळे मानसिक व्याधी पंगुता, क्लेफ्ट पॅलेट, हर्निया, हातापायांना अतिरिक्त बोटे येणे आणि इतरही गंभीर आजारांना सामोरे जावे लागले.  १९६१ ते १९७१ या काळात झालेल्या रासायनिक हल्ल्याने जवळपास ३१ लाख हेक्टर जंगल बेचिराख झाले तर एजंट ऑरेंज मुळे ३९,००० स्क्वेअर माईल्स शेतजमीन उध्वस्त झाली. एजंट ऑरेंजने तिस लाख लोकांना बाधीत केले ज्यात ल्युकेमीया, हॉजकिन्स डिसिज, इतर कॅन्सर आणि जेनेटीक व्याधींचा समावेश आहे.

या दोन घातक रासायनिक हल्ल्यांसोबतच अमेरिकेने १९६३ ते १९७३ दरम्यान नेपाम बॉंम्ब आणि फॉस्फरस बॉंम्बचा उपयोग करत क्रुरतेची सिमा गाठली. व्हियतनामवर जवळपास ३,८८,००० टन नेपाम बॉंम्ब टाकत अमेरिकेने निचपणाची पातळी गाठली. नेपाम बॉंम्बने शरीर जळणे, श्र्वास कोंडणे, मुर्च्छीत होणे, मृत्यू, आगीचे गोळे, वादळ निर्माण होणे यासोबतच व्हाईट फॉस्फरस बॉंम्बने त्वचा जळणे,कार्बन मोनोक्साईडची विषबाधा होणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, मृत्यू आदी दुष्परिणाम झालेले आढळतात. 

तळमजल्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने व्हिएतनामला विविध स्तरातून दिलेल्या पाठिंब्याचे प्रदर्शन केले आहे. रासायनिक हल्ल्यांची तिव्रता आणि त्यांचे पेंटींग्जद्वारे हुबेहूब प्रतिकृती मांडण्यात आली आहे. हे युद्ध आणि अमेरिकेविरूद्ध जगभरात उसळलेल्या जनक्षोभाचे चित्रण विविध वृत्तपत्रांद्वारे इथे ठेवण्यात आले आहे. खरोखरच जेव्हा आपण हा परिसर सोडतो तेव्हा मन विषण्ण झालेले असते. रासायनिक हल्ल्यांची दाहकता पाहून मनाचा थरकाप उडतो. नव्या पिढीत येणारे रासायनिक हल्ल्यांचे दुष्परिणाम पाहू मन हेलावून जाते. कोणताही संवेदनशील व्यक्ती अशा प्रकारे लादलेल्या युद्धाचे, अमानुष रासायनिक हल्ल्यांचे कदापी समर्थन करणे शक्यच नाही.
क्रमशः,,,,,
***************************************
दि. ०३ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...