बाली टुर, भाग ५ निसर्गाचे ओलेचिंब दर्शन
**************************************
१७ ऑगस्ट हा आमच्या टुरचा शेवटचा दिवस असल्याने सहाजिकच जितके जास्त स्थळ बघता येईल तितके जास्त बघण्याचा आमचा मानस होता. मात्र वक्तसे पहले और किस्मतसे जादा किसको मिला है नुसार वरुणराजाने पहाटेपासून संततधार लावल्याने आमचा हिरमोड झाला. सुदैवाने सकाळी अकरा पर्यंत पावसाचा जोर कमी होताच आम्ही तानाह मंदिर या प्रेक्षणीय स्थळाकडे कुच केले. डेन्पासार शहरापासून २० किमी अंतरावरील हे स्थान समुद्रात वसले आहे. रिमझिम पाऊस, सुसह्य थंडावा आणि हिरव्यागर्द रस्त्यांच्या सोबतीचा हा सफर कधी संपुच नये असे वाटत होते. मात्र हा सफर संपताच जे ठिकाण आले,, ते अद्भुत, अवर्णनीय आणि मंतरलेले होते.
जवळपास तिन एकर परिसरात पसरलेले हे मंदिर खवळलेल्या समुद्राशी जिंकु किंवा लढु या बाण्याने ठामपणे उभे होते. तुफानी वेगाने धडकणाऱ्या सागराच्या प्रचंड लाटा, अधुनमधून उडणारे थंड पाण्याचे फटकारे सोबतच आमच्या कंपुची फोटोसेशनची लगीनघाई यामुळे खुप तारांबळ उडत होती. मात्र एका तासात दर्शन करुन बाहेर पडायचे असल्याने आम्ही आटोपता पाय घेतला. बालीच्या सात समुद्रमंदिरापैकी एक असलेले हे मंदिर पाहुन डोळ्याचे पारणे फिटते. समुद्रदेवता "देवा वरुणा" च्या उपासनेकरीता प्रख्यात असलेले हे मंदिर अंदाजे सोळाव्या शतकात उभारल्याचा अंदाज आहे. भरतीची वेळ असल्याने आम्हाला समुद्रातील मुख्य मंदीरात जाता आले नाही मात्र त्याची भव्यता, दिव्यता यासमोर आम्ही नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासाला निघालो.
दुपारचे जेवन टुरमध्येच समाविष्ट असल्याने प्रत्येक दिवशी निरनिराळ्या जागी त्याची सोय होती. यादिवशी मात्र जेवनाच्या बाबतीत चांगलाच भ्रमनिरास झाला. जिथे आमची जेवनाची सोय होती तिथे सर्व पदार्थ,, स्नॅक्स, भाजी, पुलाव एवढेच नव्हे तर नॉनव्हेज सुद्धा गोडसर होते. आपण चुकुन तर गोडजेवणाला आलो नाहीना असे क्षणभर वाटून गेले. मात्र पर्याय नसल्याने मिळेत ते पोटात ढकलत आम्ही बाहेर पडलो आणि उतारा म्हणून घरून सोबत आणलेल्या झणझणीत चिवड्यावर तुटून पडलो. लवकरच आम्ही मंकी फॉरेस्ट या टुरिस्ट स्थळावर पोहोचला. एव्हाना पावसाने आपला "रेन रेट" वाढवल्याने छत्री घेऊनच मंकी फॉरेस्ट फिरावे लागले.
खरेतर आपल्या पुर्वजांना भेटायचे आणि तेसुद्धा त्यांच्या हक्काच्या घरात यापेक्षा अजुन उत्सुकता ती आणखी कोणती असणार. जवळपास ७ लाख ते १० लाख वर्षापूर्वीचे "जावामॅन फॉसिल्स" इंडोनेशियाच्या भुमिवर १८९१ ला आढळले तेंव्हा मानववंश आणि उत्क्रांती क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. कारण हा जावामँन "ऐप्स" आणि "मनुष्य" यातील मिसिंग लिंक मानल्या जातो.
अपराईट पोश्चर असलेला हा होमो इरेक्टस इरेक्टस आधुनिक मानवाची सुरवात मानली जाते. अर्थातच इंडोनेशियातील बेटांवर आजही वानरवंशाचा मुक्त वावर बघायला मिळतो. इथल्या मंकी फॉरेस्टमध्ये जवळपास साडेसातशे वानरे आणि १८६ प्रकारच्या वनस्पती आढळतात. लांब शेपटाची विशेषता असलेली ही वानरे संध्याकाळी दाट जंगलात निघुन जातात तर दिवस होतात इथल्या रूद्र, गंगा आणि प्रजापती मंदिरात दाखल होतात. वानरांसोबतच इथे काही झाडांवर चार ते पाच फुट लांबीची वटवाघळे लटकलेली दिसतात. इथे त्यांच्या सोबत फोटो काढायची सोय आहे. मात्र केरळातील मे महिन्यात वटवाघळांद्वारे "निपाह व्हायरस" आणि त्यामुळे झालेले मृत्युतांडव आठवता आम्ही त्यांच्या दोनहात दुर राहणेच पसंत केले.
यानंतरचे आम्ही बाली बेडगुल टेंपल या निसर्गरम्य ठिकाणी वळलो. डेन्पासार आणि सिंगाराजा या दोन शहरांच्या मधात वसलेले हे पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासुन १५०० मिटर उंचीवर असुन लेक ब्राटनमुळे या स्थळाला चार चाँद लागलेले आहे. इथेच ३८९ एकरवर पसरलेले विस्तीर्ण बाली बोटानिकल गार्डन असून वनस्पतींच्या जवळपास २००० प्रजाती आढळतात. या रम्य ठिकाणी तिन क्रेटर लेक असुन यापैकी बाली वॉटर टेंपल हे प्रमुख आकर्षण आहे. सर्वत्र पसरलेले धुके, हिरवी शाल ओढलेला चोहोबाजूंचा परिसर, गुलाबी थंडी जणुकाही आपण स्वर्गात आल्याचा भास होतो. अशा वातावरणात कितीही फिरलो तरी थकवा अजिबात जाणवत नाही उलट इथुन पुढे जाऊच नये असे वाटते.परंतु शेवटी सुर्य अस्ताला जाऊ लागल्याने आम्हाला या रम्य वातावरणाचा निरोप घ्यावाच लागला....
क्रमशः ,,,,,,,,
**************************************
दि. २५ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment