बाली टुर अंतिम भाग "जोर का झटका धिरेसे"
**************************************
१७ ऑगस्ट हा टुरचा शेवटचा दिवस असल्याने हिरव्याकंच, ओलसर निसर्गाची दिवसभराची भ्रमंती आटोपताच आम्ही संध्याकाळी शॉपिंगचा बेत आखला. अर्थातच इथे कोणतीही खरेदी ही लाखातच असल्याने बरेचदा आपल्या रुपयात नक्की किती किंमत होईल याचा विचार करून गोंधळ उडायचा. मल्टीनॅशनल कंपन्यांनी इथे आपले शोरुमचे जाळे पसरवल्याने बहुतेक सर्वच वस्तू उपलब्ध होत्या, मात्र किमतीत फारकाही फरक नसल्याने आम्ही लवकरच शॉपिंग आटोपते घेतले. "स्पाईस मंत्रा" या अस्सल भारतीय रेस्टॉरंटमध्ये डिनर आटोपून टुर शांततेत आटोपल्याबद्दल समाधानाने ग्रँड झुरी या मुक्कामी पोहोचलो.
एव्हाना रात्रीचे साडेदहा वाजले होते आणि "सी फुडचे" काही दर्दी मित्र स्ट्रिटफुडवर ताव मारत होते तर काही सहाव्या मजल्यावर सामानाची आवराआवर करत होते. आम्ही चार मित्र हॉटेलच्या कॉरीडोरमध्ये सोफ्यावर बसून गप्पा ठोकत होतो. अचानक मला सोफा कोणीतरी हलवल्याचा भास झाला आणि तत्क्षणी तोंडातून शब्द निघाले....स्वप्निल भुकंप झाला. परंतु कोणीही फारशी दखल न घेतल्याने मी सुद्धा निश्चिंत झाले. मात्र कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली आणि लिफ्टने आम्ही सहाव्या मजल्यावर पोहोचलो. रुमवर पोहोचताच मित्रांनी रुम आणि बेड जोराने हलल्याचे सांगितले. एव्हाना सहाव्या मजल्यावर पळापळ सुरू झाली होती. मामला लगेच लक्षात आल्यावर आम्ही पायऱ्यांनी खाली उतरणे पसंत केले.
मात्र भुकंप, आग, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कोणत्याही जोखमीच्या क्षणी लिफ्टचा वापर करणे टाळायचे असते. परंतु अनवधानाने लिफ्टने वर येऊन आपण किती मोठी घोडचूक केली हे लक्षात आले. बरे झाले काही बरेवाईट नाही झाले अन्यथा आसमान(भुकंप) से गिरे और खजुरपे(लिफ्टमे) लटके अशी स्थिती झाली असती. या गोंधळात काही स्त्रिया आपल्या कच्च्याबच्च्यांना सांभाळत, मदतीचा टाहो फोडत सोबत उतरत होत्या. मात्र सगळेच हेल्पलेस असल्याने सर्वांना कधी एकदा हॉटेलबाहेर पडतो असे झाले होते. सहा मजले उतरतांना एक एक क्षण मुंगीच्या पावलाने पुढे सरकत होता. जीव वाचवण्यासाठी विविध भाषेत प्रार्थना जरी केल्या जात होत्या तरी त्याचा सार देवा मला सुखरूप बाहेर पडू दे नक्की असाच असणार. कारण सुखरूप चे सुपुर्दे खाक व्हायला वेळतरी किती लागतो?
अखेर एकदाचे हॉटेल बाहेर पडलो आणि सगळ्यांच्या जिवात जिव आला. मात्र हॉटेलचे कर्मचारी काही झालेच नाही या थाटात वावरत होते. बाली "रिंग ऑफ फायर" अर्थातच भुकंपप्रवण क्षेत्रात असल्याने त्यांच्याकरिता अशा घटना म्हणजे रोज मरे त्याला कोण रडे सारख्या होत्या. लगेचच हॉटेल व्यवस्थापनाने हा भुकंप ईशान्य भागात साडेपाचशे कि.मी. अंतरावर समुद्रात झाल्याचे कळवले आणि मनावरचा तणाव थोडासा कमी झाला. मात्र दिडदोन तास आम्ही बाहेरच घुटमळत राहलो आणि नंतर एकमेकांना हिंमत देत आत गेलो.
१८ ऑगस्टला परतीचा प्रवास असल्याने सर्वजण लवकरच उठलो, सामानाची आवराआवर करून कधी एकदाचे इथुन निघतो असे वाटत होते. बाली ते क्वालालंपुरचे विमान दुपारी सव्वादोनला असल्याने आम्ही सकाळी दहालाच हॉटेल मधुन चेकआऊट केले. विमान एकतास लेट झाल्याने क्लालालंपुरला संध्याकाळी पोहोचलो. विमानतळावर पाचशे रुपये प्लेट समोसा पाहुन परत एकदा घरगुती फराळ मदतीस धाऊन आला. क्वालालंपुर ते हैदराबाद हा प्रवास सुरु होताच वैमानीकाने खराब हवामान, टरब्युलंसचा हवाला दिला. ओबडधोबड रस्त्यावर कार चालल्यासारखे विमान उडत होते. त्यातच वैमानिकाच्या दरडावण्या स्वरातल्या सुचना आणखी भयावह वाटत होत्या. विमानप्रवास कोणत्याही एअरलाईंसचा असो, प्रत्येक वैमानिक हे दरडावून आणि अस्पष्ट, तुटक का बोलतात हे मला आजपर्यंत कळले नाही. अखेर डोलत डुलत आमचे विमान एकदाचे हैद्राबादला पोहोचले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नागपुरकरता पहाटे साडे पाचचे विमान असल्याने आमच्याकडे रात्रीचा भरपूर वेळ उरला होता. हैद्राबाद म्हटले की बिर्याणी आलीच आणि इतके दिवस साध्यासुध्या जेवणावर दिवस काढल्याने सगळे खवळुन होते. मग काय,, केली टॅक्सी आणि शमशादबागच्या "ग्रँड हैद्राबाद" या हॉटेलमध्ये धडकलो. सर्वांनी बिर्याणीवर येथेच्छ ताव मारला आणि रात्री दिडच्या सुमारास विमानतळावर पोहोचलो.
बस आता चेकइन करायचे आणि सरळ जमिनीवर बेडशीट टाकून लोळायच्या तयारीत होतो. मात्र "कहानीमे ट्विस्ट" बाकीच होते. चेकइन काऊंटरवर तिकीट दाखवताच नागपुरचे पहाटेचे फ्लाईट संध्याकाळी रिशेड्युल्ड करण्यात आल्याचे सांगितले गेले. एकतर घरी जाण्याची घाई, त्यातच बाली ते हैद्राबाद कंटाळवाणा प्रवास आणि आता परत एक दिवस लागणार हे ऐकून आमची चांगलीच सटकली. काऊंटरवर चांगलीच शाब्दिक चकमक उडाली मात्र उपाय नव्हता कारण इंडीगोने बुकिंग एजंटला एक महिना पहिलेच मेल आणि एसएमएस द्वारे ही सुचना कळवली होती. परंतु बुकिंग एजंटने बेजबाबदारपणा दाखवत आम्हाला याची सुचना दिली नाही. मुख्य म्हणजे त्या दिवशी हैद्राबाद, बँगलोर, दिल्ली किंवा इतर कुठुनही नागपूर करीता दुसऱ्या फ्लाईटमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आमची चांगलीच गोची झाली. मात्र आमच्या दबावामुळे इंडीगोने तात्काळ रिफंडची तयारी दर्शवली. परंतु पैसे कुणाला हवे होते? अखेर यावरचा तोडगा म्हणून रिफंडची तयारी दर्शवत आम्ही दोन स्विफ्ट कारने नागपूरला परतायचा निर्णय घेतला. पहाटे चारला सुरू झालेली आमची ही जवळपास पाचशे किलोमीटरची कारयात्रा अखेर दुपारी नागपुरला एक वाजता पुर्ण झाली.
प्रवासवर्णन समाप्त....।
**************************************
दि. २७ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment