जस"लीन"मध्ये भजनसम्राट "लिन"
**************************************
भय, भुक आणि लैंगिकता ही सजीवांची प्रमुख लक्षणे आहेत आणि सजीवांत मानवप्राणी हा सर्वात जास्त उत्क्रांत, प्रगत आणि सुसंस्कृत मानल्या जातो. अर्थातच लैंगिकता ही नैसर्गिक भावना असली तरी कुठेतरी त्याला आवर, मुरड, नियम आणि नियमितता राखण्यासाठी आपल्याकडे विवाहसंस्था प्रचलित आहेत. मात्र बदलत्या काळानुसार आणि पाश्चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणात ही विवाहसंस्था मोडकळीस यायला लागली असून *शलिव्ह इन रिलेशनशिप पासून सुरु झालेली ही लैंगिक विकासयात्रा व्हाया कलम ३७७ कोणत्या वळणावर जाईल हे सांगणे सध्यातरी कठीणच आहे.
झाले काय तर प्रसिद्ध भजनसम्राट श्री अनुप जलोटा यांनी नुकतीच "बिग बॉस सिझन १२" या तद्दन भिक्कार आणि वाह्यात कार्यक्रमात हजेरी लावली आणि त्यांनी जो गौप्यस्फोट केला तो निश्चितच डोके चक्रावणारा आहे. अवघे पाऊनशे वयमान अर्थातच वय वर्षे पासष्ट असलेले अनुप जलोटा यांनी त्यांच्यापेक्षा तब्बल ३७ वर्षे लहान असलेल्या आणि त्यांच्या गायनशिष्य असलेल्या जसलीन मथारू यांच्यासोबत साडेतीन वर्ष लिव्हइन रिलेशनशिपचा खुलासा केला आहे. निश्चितच ऐवढ्या उच्च कोटीच्या परफॉर्मन्स साठी त्यांनी रियाझही तेवढाच जबरदस्त केला असणार हे ओघाने आलेच आहे. कोणी कोणाशी रहावे किंवा कोणाशी संबंध जोडावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक मामला असला तरी गायक, सिनेकलाकार, क्रिकेटर यांना आपल्याकडे हिरो चा दर्जा प्राप्त आहे आणि समाज यांचा आदर्श नक्कीच बाळगून असतो. यामुळेच सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्ध व्यक्तींकडून चांगल्या आदर्श मुल्यांची अपेक्षा असते.
श्री अनुप जलोटा यांचे पहिले लग्न त्यांची शिष्या सोनाली सेठ यांच्याशी, दुसरे बिना भाटीयासोबत तर तिसरा घरठाव त्यांनी मेधा गुजराल यांच्याशी केला होता. 1st marriage is duty, 2nd is foolishness & 3rd is madness असे गंमतीने म्हणतात. मात्र अशा संकल्पना आता केंव्हाच्याच मोडीत निघाल्या असून अनुप जलोटा असो की पाक क्रिकेटपटू इम्रानखान,,,, यांनी दणक्यात लग्नाचा चौकार ठोकून Form is temporary but class is permanent हे जगाला दाखवून दिले.
खरेतर मानवप्राणी नर आणि मादी या दोन गटात विभागला आहे. मात्र समाज सुरळीतपणे चालावा, त्यात काही नितिनियम असावेत आणि मानवी जिवन सुसह्य व्हावे याकरिता आपण नातेसंबंधाची विण गुंफलेली आहे. "गुरु,शिष्य" हे अत्यंत पवित्र नाते असून गुरु्र ब्रह्मा,, आता कालबाह्य झालेले असून त्याची जागा टिचर्स डे ने घेतलेली आहे. अनुप जलोटा यांनी आपल्या शिष्येशी तर इम्रानखान यांनी आपल्या धार्मिक गुरूंशी संधान साधल्याने या नात्याला आता अर्थ उरलाच कुठे? अनुप जलोटा यांनी मात्र आपल्या संबंधांची सरेआम कबुली देत खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो असे सांगत दोघांत वयाच्या अंतरापेक्षा मॅच्युरीटी महत्त्वाची असते असा दावा केला आहे.
स्त्री आणि पुरुष नैसर्गिकरित्या एकमेकांकडे आकर्षित होत असतात. त्यातल्या त्यात शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध असे "पाच ब्रह्मास्त्र" असल्यावर भल्याभल्यांची दांडी गुल होणारच. शिवाय लैंगिकता हा अत्यंत जिव्हाळ्याचा, नाजूक विषय असुनही कायमच दुर्लक्षित किंवा कमी चर्चिला जात असल्याने समाजात अशा घटना घडताच "हायतौबा" माजणारच. मात्र काही दर्दी जग काय म्हणेल याची पर्वा न करता आपले घोडे पुढे दामटतात. फ्रान्सचे राष्ट्रपती यांनी तर चक्क त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या वर्गशिक्षिकेशी चतुर्भुज झाले तर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलॅनिया यांच्यातले अंतर लक्षणीय आहे. आपल्याकडे दिग्विजयसिंग यांनी तर माझ्या दिग्गींची कामगिरी कौतुके, परी "अमृताशी" पैजा जिंके चा राग आवळला तर "डिएनए" मध्ये फेल झालेले "एन डी तिवारी" यांना कसे विसरता येईल?
प्रेम हे आंधळे असतात असे म्हणतात आणि प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे हे कितीही खरे असले तरी आजकालचे खुले वातावरण पाहता "सदाचार" हा "स्वैराचारात" कधी रुपांतरीत झाला हे कळतच नाही. आता मात्र खुल्लमखुल्ला प्रेमाचा जो बाजार मांडला जातो ते नक्कीच चिंताजनक आहे आणि समाजाची नैतीक पातळी भुजलाच्या पातळीपेक्षा झपाट्याने खालावत असल्याचे द्योतक आहे. काहीही असो अनुप जलोटांच्या या नवीन इनिंगने तमाम पासष्टी गाठलेल्यांना पुन्हा एकदा अच्छे दिन आल्याची भावना निर्माण झाली असून सरकारने रिटायर्डमेंटची सिमा ५८ ऐवजी ६५ वर न्यायला हरकत नसावी.
फार पुर्वी सरकारतर्फे रात्रीला प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेतले जायचे. आता ज्याप्रमाणे म्हा'तारे' जमीपर करामती दाखवत आहे ते पाहता सरकारला लवकरच प्रौढ लैंगिक शिक्षणाचे वर्ग सुरू करावे लागतील. शिवाय प्रौढांना पेंशनसोबतच वेगळा लैंगिक भत्ता सुद्धा देण्याची मागणी जोर पकडू शकते. इकडे बिचारा तरुणवर्ग आधीच बेरोजगारीने त्रस्त असतांना प्रौढांच्या कामगिरी पाहून चरफडत मेरे बाप पहले आप नक्कीच म्हणत असणार.
मानवी भावविश्वात प्रेमाचे अमुल्य योगदान आहे. प्रेमाची अनुभूती येणे हा सुखद अनुभव आहे. जवळपास प्रत्येकजण यातून मार्गक्रमण करत असतो. खरेतर या नाजूक विषयावर संशोधकांना केमिकल लोच्या असल्याचा अंदाज आहे. तरीपण प्रेम ही नैसर्गिक भावना आहे आणि योग्यवेळी ती प्रकट होतेच. आता ही वेळ व्यक्तीसापेक्ष असल्याने त्याचे वेळापत्रक असणे शक्य नाही. कोणाच्या प्रेमाची दुसऱ्या कोणाच्याही प्रेमाशी तुलनासुद्धा करता येत नाही. कारण प्रेम हे प्रेम असत तुमच आमच सेम असत. योग्य वयात योग्य व्यक्तीशी प्रेम होणे म्हणजे दुग्धशर्करा योग. मात्र शेवटी Love is blind असल्याने भजनसम्राट "जसलीनमध्ये" 'लीन' झाले तर त्यात नवल ते काय? तुर्त जसलिनशी लागी लगन, जलोटा हो गया मगन एवढेच आपण म्हणू शकतो.
**************************************
दि. १८/०९/२०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.Com
No comments:
Post a Comment