Wednesday, April 12, 2023

आठवणीतले राजीवजी.


         "आठवणीतले' "राजीवजी"
***********************************
साल १९९१, मी नुकताच बीएएमएस चा कोर्स पूर्ण केला होता आणि प्रॅक्टिससाठी वर्धा रोड, नागपूर इथल्या एका हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) म्हणून काम सुरू केले होते. नेहमीप्रमाणे रात्रीचा राऊंड घेऊन थोडेफार वाचन सुरू होते होते. अर्थातच हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करणे म्हणजे एक दिव्यच असते आणि त्यातच मध्यरात्री हॉस्पिटलचा लॅंडलाईन फोन खणखणनणे म्हणजे डॉक्टरांसाठी एक दु:स्वप्नच असते. अशातच २१ मे १९९१ ला मध्यरात्रीनंतर लॅंडलाईन फोनने झोपमोड करताच मी चरफडत उठलो आणि समोरून एका कॉंग्रेसी मित्राने जे सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. काय बोलावे आणि काय करावे सुचतच नव्हते, शिवाय त्याने सांगितलेल्या बातमीवर अजिबात विश्वास बसत नव्हता. किंबहुना आपण झोपेत एखादे स्वप्न तर पाहत नाही ना असा भास होत होता. मात्र सत्य कितीही कटू असले तरी ते स्विकारावेच लागते मग ते कितीही अप्रिय का असेना. ती काळीज पिळवटून टाकणारी बातमी होती भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येची.

खरेतर त्यावेळी मी नुकतीच विशी पार केली होती आणि राजकारणाचा फारसा गंध नव्हता. बालपणी राजकारण म्हटले की फक्त इंदीराजींचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. भलेही कॉलेजमध्ये मी प्रत्येक निवडणुकीत हमखास जिंकायचो परंतु बाकी राजकारण शुन्यच होते. मात्र १९८४ ला इंदीराजींची हत्या झाली होती आणि राजीवजींचा राजकीय पटलावर उदय झाला होता याबाबत माझ्या मनात प्रचंड कुतूहल होते. आयुष्यात एकदातरी राजीवजींची भेट घ्यावी असे मनापासून वाटत होते मात्र आपण कोण, आपली स्थिती काय, ना कुठे ओळख ना कुठे लग्गा, सर्वत्र ठणठण गोपाळा काम असल्याने मनाची समजूत काढत होतो‌. मात्र किसी चिज को अगर शिद्दतसे चाहों तो पुरी कायनात उसे मिलानेकी कोशिश करती है हे ऐकून होतो आणि यावर माझा ठाम विश्वास होता आणि झालेही तसेच.

तेव्हा माझे राहणे देवनगरला होते आणि एका रात्री हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर जात असताना विवेकानंद नगर चौकात प्रचंड गर्दी जमलेली होती आणि माहिती काढली असता राजीव गांधींची इथून रॅली जाणार आहे असे समजले. मग काय लगेच सायकल रोडच्या कडेला लावली आणि देहभान हरपून आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी गर्दीत सामील झालो होतो. अभी नहीं तो कभी नहीं म्हणून राजीव गांधी यांची काहीही करुन कसेही करून भेट घ्यायचीच म्हणून इरेला पेटलो होतो आणि डोळ्यात तेल घालून त्यांची वाट पाहत गर्दीत उभा होतो. एकदाचे राजीवजी विवेकानंद नगर चौकात पोहोचताच जमलेल्या गर्दीत प्रचंड चैतन्य पसरले आणि प्रत्येकजण त्यांना भेटायला धडपडू लागला होता.

अर्थातच त्याकाळी मी सिंगल हड्डी म्हणजेच लकडी पहेलवान असल्याने कुठल्याही गर्दीत वाट काढून जाणे माझ्या डाव्या हाताचा खेळ होता. मग ते एसटी बसमध्ये जागा पकडणे असो की लग्नसमारंभात पंगतीत जागा पकडणे असो अथवा बुफे मध्ये अन्न सावडणे असो. आपल्या या कलेचा वापर करत मी राजीवजींच्या जीपजवळ पोहोचलो परंतू प्रचंड गर्दीने राजीवजींपर्यंत पोहोचता येत नव्हते. अखेर जिपमागे धावत धावत एकदाचे अजनी चौक गाठले आणि माझी तपश्र्चर्या फळास आली. अचानक जिप थांबली आणि राजीवजी जीपखाली उतरून चाहत्यांना भेटू लागले होते. मौका मिळताच मी त्यांचा हात पकडला आणि काहीवेळ घट्ट धरून ठेवला. त्यांचे ते राजबिंडे रूप, निरागस चेहरा, तेजस्वी व्यक्तिमत्व आणि एवढ्या रेटारेटीतही त्यांचे स्मितहास्यासह जनसामान्यांत मिसळून जाणाच्या भावनेने मी हरखून गेलो होतो. मात्र लगेचच गर्दीच्या रेट्याने मी त्यांच्यापासून दूर फेकल्या गेलो परंतू राजीवजींना भेटण्याची स्वप्नपुर्ती झाल्याचे मनाला समाधान झाले होते.

खरेतर राजकारण हा राजीवजींचा पिंड नव्हताच. उंच उंच आकाशी भरारी घेणे त्यांच्या रक्तातच होते. राजकारणातले दुष्ट डावपेच, छक्के पंजे यापासून ते मैलभर दुरच होते. खानदानी श्रीमंती त्यांच्या सहजसुंदर वागण्यात नेहमीच झळकायची. इंग्लंडमधून उच्चशिक्षित होऊन ते भारतात १९६६ ला दाखल झाले त्यावेळी इंदिराजींनी पंतप्रधान पदावर आरुढ झालेल्या होत्या. मात्र राजीवजींनी राजकारणातील खुर्ची ऐवजी वैमानिकाच्या खुर्चीला पसंती देत फ्लाईंग क्लबचा मार्ग निवडला होता‌ १९७० पासून ते इंडीयन एअरलाईंसमध्ये वैमानिक म्हणून रूजू झालेले होते. मात्र नियतीला त्यांनी चोखळलेला हा मार्ग बहुदा आवडला नसावा आणि काही घटनाक्रम असा घडत गेला की त्यांना नाखुषीने का होईना राजकारणात प्रवेश करावा लागला होता.
राजीवजींचे धाकटे बंधू आणि आक्रमक राजकारणी संजय गांधी यांचे १९८० ला दुर्देवाने एका विमान अपघातात निधन झाले होते. यामुळे इंदिराजी राजकारणात एकाकी पडल्या होत्या आणि यातच मग राजीवजींवर राजकारणात येण्याचा दबाव वाढत गेला‌.

 अखेर चोहोबाजूंनी प्रेशर कुकर परिस्थिती निर्माण होताच राजीवजी हतबल झाले आणि अखेर त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. १९८१ ला त्यांनी अमेठीतून लोकसभेची पोटनिवडणूक लढवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी लोकदलचे उमेदवार शरद यादव यांचा २,३७,००० मतांनी दणदणीत पराभव केला होता. यानंतर लगेच त्यांना कॉंग्रेसचे महासचिव, युवा कॉंग्रेसचे अध्यक्षपद सारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. मुख्य म्हणजे १९८२ च्या दिल्ली आशियाई खेळाचे यशस्वी आयोजन करण्यात त्यांनी चोख भुमिका बजावली होती.
आतापर्यंत सर्वकाही सुरळीतपणे पार पडत होते परंतु १९८४ साल उजाडले आणि भारतीय राजकारण मुळापासून हादरून गेले. कठोर निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंदीराजींनी ब्ल्यू स्टार ऑपरेशनला परवानगी दिली आणि याचाच बदला म्हणून त्यांच्या अंगरक्षकांनी बंदुकीच्या गोळ्यांनी त्यांच्या शरीराची चाळण केली होती.

वास्तविकत: या दुर्देवी घटनेने केवळ गांधी कुटुंबीयच नव्हे तर संपूर्ण देश हादरला होता‌. मात्र यानंतर अपरिहार्यपणे राजीवजींनी पंतप्रधान पदाचा काटेरी मुकुट धारण करून पुढची वाटचाल सुरू केली‌ होती. अर्थातच डिसेंबर मध्ये लोकसभा निवडणुकीत इंदिराजींच्या सहानुभूती लाटेत कॉंग्रेसने विक्रमी जागा जिंकताच राजीवजी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. आपल्या दुरदृष्टीने त्यांनी संगणक आणि दुरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली होती. देशाचे भवितव्य युवकांच्या हातात आहे हे ओळखून त्यांनी युवकांचा लोकशाहीत पुढाकार वाढविण्यासाठी मतदानाची अट २१ वर्षांवरून १८ वर्षांपर्यंत खाली आणली होती. महिलांना सत्तेत चांगले प्रतिनिधित्व मिळाले यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ३३% आरक्षणाची सोय केली होती. पंचायत राज योजनेचे विस्तार कार्य राजीवजींच्या कारकिर्दीत पार पडले. शिक्षण आणि रोजगाराचे महत्व ओळखून जवाहर नवोदय विद्यालय आणि जवाहर रोजगार योजनांना मुर्तरुप राजीवजींच्याच काळात देण्यात आले होते. एमटीएनएल च्या उभारणीसोबतच पंजाब, आसाम आणि मिझोरामच्या धगधगत्या समस्या हाताळण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते.

मात्र एवढे सर्व असूनही राजीवजींच्या कारकिर्दीतील काही घटना, निर्णय आणि घडामोडी वादग्रस्त ठरलेल्या होत्या. सर्वात पहिले इंदीराजींच्या अमानुष हत्येनंतर दिल्ली आणि देशभरात ज्या दंगली उसळलेल्या होत्या त्याबाबत राजीवजींनी केलेल्या विधानाने बराच वादंग माजला गेला होता. तर डिसेंबर १८४ ला भोपाळ वायु दुर्घटनेला जबाबदार ॲंडरसनच्या अटकेबाबत त्यांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. सुरवातीला मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असलेल्या राजीवजींना सरकारमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलेच हैराण केले होते. शिवाय सरकारने एक रुपया खर्च केला तर जनतेपर्यंत फक्त १० पैसेच पोहोचतात अशी कबुली देत सरकारी यंत्रणेत भ्रष्टाचाराची त्यांनी एकप्रकारे कबुलीच दिली होती.
 यानंतर बोफोर्सच्या भुताटकीने राजीवजींसह कॉंग्रेसला चांगलेच जेरीस आणले होते आणि याचाच परिणाम म्हणून १९८९ लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. देशांतर्गत समस्या सोडवत असतांनाच राजीवजींना शेजारी राष्ट्रांच्या समस्याही हाताळाव्या लागल्या होत्या. 

१९८८ ला मालदिवमध्ये अब्दुल लुथूफी यांनी मालदिव बंडखोर आणि तामीळ बंडखोरांसह राष्ट्रपती गयूम यांचा सत्तापालट करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता परंतु भारताच्या विशेष फौजांनी हा प्रयत्न हाणून पाडला होता. याकरिता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन आणि ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी राजीवजींचे कौतुक केले होते. श्रीलंकेच्या दिमतीसाठी भारताने लंकेत पिस किपिंग फोर्स तैनात केले होते. १९८७ ला भारत आणि लंकेदरम्यान शांतता करारासाठी राजीवजी लंकेत गेले असतांना त्यांच्यावर एका नौसैनिकाने बंदुकीच्या बटने हल्ला करत जीव घेण्याचा प्रयत्न केला होता मात्र राजीवजींनी समोर झुकत तो हल्ला असफल केला होता. खरेतर याप्रकारानंतर राजीवजींच्या सुरक्षेची आणखी काळजी घ्यायला पाहिजे होती.

सह्रदयी असलेले राजीवजी राजकारणातल्या चक्रव्युहात फसले होते परंतु सहनशील आणि सरळ स्वभावाने ते यांत टिकून राहीले होते. पंतप्रधान असतांना त्यांनी पक्षीय भेदाभेद सारून अटलजींना त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पुरेसी मदत केली होती. कमीतकमी त्याकाळी सरकार आणि विरोधी पक्षात एक चांगले सामंजस्य, सद्भाव टिकून होता. म्हणूनच राजीवजींची हत्या होताच देशने प्रधानमंत्री खोया, लेकिन मैने अपने छोटे भाईको खोया असे उद्गार अटलजींनी काढले होते. राजीवजींना देशाला २१ व्या शतकासाठी तयार करायचे होते. याकरिता विज्ञान, शिक्षण, रोजगार  आणि युवावर्गाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले होते. दरम्यान देशात खिचडी सरकारने आपले उपद्रव दाखवणे सुरू केले होते आणि निवडणुक प्रचारासाठी राजीवजी आपल्या जीवाचे रान करत फिरत होते. इंदीराजी असो की राजीवजी यांना सुरक्षेच्या गराड्यात राहणे अजिबात आवडत नव्हते.

 मात्र शत्रू त्यांच्यावर बरोबर टपून बसलेले होते. इंदीराजींना गुप्त सुचना मिळूनही त्यांनी आपल्या अंगरक्षकांवर विश्र्वास दाखवला तर राजीवजींच्या सुरक्षा चक्राकडे साफ दुर्लक्ष झाले होते. या दोन्ही नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील दिरंगाई त्यांच्या जीवावर बेतली होती आणि यातच त्यांचे हकनाक बळी गेले होते. अखेर श्रीपेरंबदुर इथे जनतेत अभिवादन स्विकारत असतांनाच लिट्टे बंडखोरांनी बॉम्बस्फोट करून राजीवजींची हत्या केली होती.
राजीवजींच्या जाण्याने देश आणि जग एक उमद्या नेत्याला मुकला होता. 

इंदीराजी आणि राजीवजींच्या हत्येने देश चांगलाच हादरून गेला होता. राजीवजींच्या हत्येनंतर कॉंग्रेसला गळती लागली आणि कधीकाळी देशभरात राज्य करणारा देशव्यापी कॉंग्रेस पक्ष प्रादेशिक पक्षाच्या वळचणीला उभा असल्याचे दृश्य आज सर्वत्र दिसत आहे. २१ मे हा दिवस बलिदान दिवस, आतंकवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. देशाला विज्ञानाची, प्रगतीची कास धरत समर्थपणे २१ व्या शतकाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या नेत्याला आज आपला देश विनम्र अभिवादन आणि श्रद्धांजली अर्पण करत आहे. 
************************************
दि‌. २१ मे २०२० 
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...