Thursday, April 13, 2023

बाली टूर, भाग ०१


बाली टुर 'जो मित्रवान तो भाग्यवान' भाग ०१
*************************************
Blood is thicker than anything असा सर्वत्र समज आहे,,, मात्र मैत्रीसारखी काही नाती याला नक्कीच अपवाद असतात. रक्ताच्या नात्यापेक्षा कित्येकदा जिवाभावाचे मित्रच कामी पडतांना दिसतात. यामुळेच जो मित्रवान तो भाग्यवान असे म्हटले जाते. मैत्री हा माझा विक प्वाईंट असल्याने आम्ही मित्र वर्षभर फ्रेंडशिप डे साजरा करत असतो. विशेषतः विदेशवारी आणि तिसुद्धा मित्रांसोबत म्हटली की ग्रँडमस्ती आपसुकच येते. 

यावेळी आम्ही मित्रांनी इंडोनेशियातिल बाली या रम्य बेटाची निवड केली होती. अर्थातच इंडोनेशिया रिंग ऑफ फायर च्या भुकंपप्रवण क्षेत्रात येत असल्याने काळजी जरूर होती मात्र उडे दिल बेफिक्रे मित्र सोबतीला असतांना भिती बाळगणार तरी कोण? आमच्या कंपुत काही तिशीचे, काही चाळीशीचे तर काही वयाची हाफ सेंच्युरी गाठलेले मित्र होते. मात्र उत्साह, उमंग याबाबतीत सर्वच एकसे बढकर एक होते. शिवाय यावर्षी स्वातंत्र्य दिन आपण विदेशात साजरा करण्याचे सर्वांनी मनाशी ठरवल्याने एक आगळावेगळा जोश जाणवत होता. 

ठरल्याप्रमाणे आम्ही नागपूर विमानतळावर नियोजित वेळेवर पोहोचलो. चेकइन, सुरक्षा तपासणी करून आत पोहोचलो. मात्र लगेच एक सुरक्षा रक्षक आम्हाला शोधत आला...नक्की काय झाले समजत नव्हते मात्र लगेच कळले की एका मित्राने उत्साहाच्या भरात आपली एक बॅग सुरक्षा काऊंटरवर सोडली होती परंतु विशेष गोंधळ न होता लवकरच आम्ही यातून सुटलो आणि परत एकदा थायलँड टुरच्या बॅग प्रकरणाच्या स्मृतींना उजाळा मिळाला. बॅग टु बॅग नंतर लगेच आम्ही हैदराबादला संध्याकाळी रवाना झालो आणि प्रवासाच्या पहिल्या टप्प्याचा श्रीगणेशा केला.

दिड तासाच्या अंतराने हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल विमानतळावर आम्ही उतरलो आणि तिथल्या आल्हाददायक वातावरणाने मन प्रसन्न झाले. श्रावणाची सुरवात, हळुवार पाऊस आणि शांत वातावरणात सुखावून गेलो. बाली करीता रात्रीचे विमान होते तोपर्यंत आम्ही चेकइन, इमिग्रेशन सारखे रटाळ आणि कंटाळवाणे सोपस्कार पार पाडले. मात्र मदिराप्रेमींसाठी विमानतळ म्हणजे आनंदाची पर्वणी असते. कारण जवळपास अर्ध्या किमतीत विदेशी, ब्रांडेड मद्य आणि तेसुद्धा आकर्षक योजनेत  उपलब्ध असल्यावर पाऊले चालती ड्युटी फ्री ची वाट चा गजर होताना दिसतो. मात्र इतर वस्तू प्रचंड महागड्या असतात. तसेही कुठल्याही विमानतळावर अन्नपदार्थ एकतर केवळ पाहण्यासाठी असतात किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीला खिजवण्यासाठी असतात अशी माझी ठाम समजूत आहे. तेथील अन्नपदार्थांची किंमत पाहुणच मी कित्येकदा तृप्तीची ढेकर दिली आहे. 

खरेतर अशा प्रसंगाची आम्हाला चांगली ओळख असल्याने सर्वांनी घरूनच जेवनाचे डबे आणल्याने आम्ही तिथेच प्लेन भोजनाचा आनंद घेतला. आता विमानात जाऊन मस्तपैकी आराम करण्याचा आमचा बेत होता मात्र क्वालालंपुरचे विमान एक तास उशीरा असल्याने आमचा हिरमोड झाला आणि खुर्चीवर पेंगुळत राहण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 
अखेर मध्यरात्री नंतर एकदाचे एअर एशियाचे विमान क्लालालंपुरकडे झेपावले आणि प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली.

 अल्पावधीतच विमानसेवेत बाजी मारणाऱ्या एअर एशियाने तुलनेत कमी दराने विमानसेवा सुरू केली आणि ग्राहकांच्या एअर एशिया विमानसेवेवर उड्या पडल्या. मात्र "एअर" एशियाने नावाला जागत प्रवाशांना विमानसेवेत "एअर" (ऑक्सिजन) शिवाय काहीच मोफत न दिल्याने अगदी पाण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे लागतात. एवढेच काय तर एखाद्या प्रवाशाला थंडी वाजत असल्यास त्याला शॉल किंवा ब्लँकेट देण्याऐवजी सरळसरळ त्यांच्याकडून विकत घेण्याचा सल्ला देतात. यामुळे एअर एशियाने विमानप्रवास करणाऱ्यांनी सर्व तयारीनिशी जावे अथवा जागोजागी पैसे खर्च करण्याची तयारी ठेवावी.
क्रमशः,,,,,,,
**************************************
दि. २१ ऑगस्ट २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...