'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी'
***************************************
खरेतर नागपुरात दोनच प्रकारचे ऋतू आहेत, एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे कडक उन्हाळा. मात्र यावर्षी बदबद पडलेल्या पावसामुळे म्हणा की आणखी कोणत्या कारणाने म्हणा पाऊस आणि थंडी यात कमालीची स्पर्धा लागली असल्याने दोघेही हार मानायला तयार नाही. मात्र या दोघांंच्या जिवघेण्या स्पर्धेने वातावरणात गुलाबी थंडीची लाट उसळली असून भटकंती करण्यासाठी आणखी सुवर्णयोग तो कोणता असणार. नुकतेच उत्तरायणाला जरी सुरवात झाली असली तरी आम्हा मित्रांचे भटकायन वर्षभर सुरू असल्याने आयत्या मिळालेल्या संधीचे सोने करायचे ठरवत यावेळी आमचा मोर्चा वळला पचमढीच्या कुशीत वसलेल्या तामीया या निसर्गरम्य स्थळी. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली ही धरती कुठे घनदाट अरण्य तर कुठे आकाशी नजर भिडवणाऱ्या पर्वतश्रृंखला तर कुठे काळजाचा ठाव चुकवणाऱ्या अथांग दऱ्याखोऱ्यांनी नटलेली आहे. सोबतच ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक पार्श्र्वभूमी लाभलेली ही जागा आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने अचंबित आणि रोमांचकारी आहे.
अर्थातच इथली 'वनसंपदा' कितीही दाट असली तर आमची 'मित्रसंपदा' त्यापेक्षा कैकपट घनदाट असल्याने अशा रम्य वातावरणात भटकने म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावे लागेल. यावेळी सहलीकरीता ३४ मित्रमंडळी साथीला असल्याने जंगलमे मंगल म्हणत दोन दिवस धमाल मस्ती करत गाजवले. मात्र यासाठी सर्वात महत्त्वाचे होते एवढ्या मित्रमंडळीची एकत्र मोट बांधणे. कारण एकतर सर्व आपापल्या व्यवसाय, संसारप्रपंचात आकंठ बुडालेले, शिवाय बुधवार गुरूवार सारख्या नियमित दिवशी दांडी मारून फिरायला नेणे म्हणजे रेड्याच्या तोंडी वेद पठवण्यासारखे महाकठीण कार्य होत. परंतु जादुची कांडी फिरवावी तशी किमया झाली आणि सहलीचा फतवा निघताच मित्रमंडळींची कळी खुलली.
व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. यावेळी मित्रसमूह बराच मोठा असल्याने आणि नैसर्गिकरीत्या मतमतांतरे असल्याने यावेळी मैत्रीच्या सप्तरंगी, इंद्रधन्युषी छटा चांगल्या अनुभवायला मिळाल्या.
१) फिरनेवालेको फिरनेका बहाना चाहिए,,,
या प्रकारात मोडणारे मित्र नेहमीच फ्लाईट मोडमध्ये असतात. फक्त त्यांना एकदा कल्पना दिली की आपले काम झालेच म्हणून समजा. कुठे जायचे आहे, किती दिवसांसाठी जायचे आहे याची यत्किंचितही पर्वा न करता भटकायला सदासर्वदा एका पायावर तयार असतात. पंछी बनू उडती फिरू मस्त गगणमे या तालात ते प्रत्येक सहल, प्रवासाचा आनंद लुटतात.
२) अगं अगं म्हशी,मला कुठं नेशी
या प्रकारातले मित्र थोडे हट्टी, थोडे भावखाऊ, मनातून तयार परंतु व्यवसायात अत्यंत व्यस्त असल्याचा आव आणणारे असतात. यांना सहलीचे विचारले तर उगाचच भाव खाणार, नाही विचारले तर आमच्या नावाने गावभर खडे फोडणार.
३) चले यार धक्का मार,,,
अर्थातच ही मित्रमंडळी म्हणजे डिझलचे इंजीन असतात. जोपर्यंत यांचे कान पकडून रेडीएटर गरम करणार नाही तोपर्यंत यांच्या तोंडून कबुल है, कबुल है हे ऐकायला मिळत नाही. मात्र एकदा हे नगिने तयार झाले की मग यांच्या उत्साहाला उधाण येते आणि यांना सांभाळताना नाकी नऊ येते.
४) ओल्ड इज गोल्ड,,
निश्र्चितच अशा मित्रांचे जितके कौतुक करावे तितके कमीच असते. वयाला, आजारांना आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लिलया ओव्हरटेक करणारी ही मित्रमंडळी खरेतर कोणत्याही प्रवासासाठी प्रेरणादायी असतात. सोबतच बिग बझार किंवा कोणत्याही फाईव्ह स्टार मॉलमध्ये विकत न मिळणारा अनुभव यांच्या गाठीशी असल्याने मार्गदर्शन आणि जबाबदारी यांचे अतुल्य योगदान ही मित्रमंडळी देत असतात.
५) अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाऐ,,
सळसळते तारूण्य, कमालीचा आवेश, बेफिकिरी वृत्ती, होश पेक्षा जोशवर जास्त भरवसा असणारी ही "गॅंग्ज ऑफ नागपूर" म्हणजे कुठल्याही सहल, प्रवासातली लाईव्ह वायर असते. मात्र यांच्यावर कायमच एक डोळा ठेवावा लागतो.
६) तू इस तरह से मेरी जिंदगीमे शामील है,,
गमतीने असे म्हटले जाते की,, ज्यांचे चेहरे जुळतात ते भाऊ बहिण असतात, ज्यांचे विचार अजिबात पटत नाही ते पतिपत्नी असतात तर चेहरामोहरा, साधनसंपत्ती किंबहुना कशाचाच कशाला पत्ता नसून ज्यांचे सर्वच बाबींवर एकमत असतात,,,ते जिवलग मित्र असतात. खरोखरच अशा मित्रांशिवाय कोणत्याही सहल, प्रवासाची कल्पनाही करवत नाही. अशा मित्रांचा सहवास म्हणजेच,,,
"जहां भी जाओ, लगता है तेरी महफिल है,,,,"
७) होऊ आम्ही नितीमंत कलागुणी बुद्धिवंत
वास्तविकत: प्रत्येक प्रवासात आपल्याला अनेक बाबी शिकायला मिळतात, बाह्यजगाची तोंडओळख होते आणि अशावेळी ज्ञानवंत, बुद्धिवंत मित्र हमखास भाव खाऊन जातात. मग ते कोणत्याही विषयातले तज्ज्ञ असो एखादी घटना, एखादा विषय अथवा एखाद्या पैलूवर यांनी प्रकाश टाकला की संबंधित विषयाचा गुंता सोडवायला, समजायला खुप मदत होते. खरेतर प्रवासातली ही सर्वात सज्जन, गुणवंत मंडळी असते आणि हेच मित्र सर्वात शांत, संयमी,नम्र सुद्धा असतात. याला कारणही तसेच असते,,,, ज्ञानाच्या फळांनी लदलेली ही मानवी वृक्ष सदैव झुकलेलीच असतात.
क्रमश:,,,,,,
***************************************
दि. २४ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment