Wednesday, April 12, 2023

माझी पहिली परदेशवारी, भाग ०१


        माझी पहिली परदेशवारी, भाग ०१
**************************************
भटकंतीचे वेड हे रक्तातच असावे लागते,,, त्यातल्या त्यात जर अशी भटकंती आपल्या जीवलग मित्रांसोबत असेल आणि तीसुद्धा परदेशाची, तर मग दुग्धशर्करा योगच म्हणावे लागेल. खरेतर मित्रांसोबत भटकने हा माझा विक प्वाईंट असल्याने जेंव्हा परदेश वारीकरता थायलंडचा बेत ठरला तेंव्हा आनंदाला पारावर उरला नव्हता. मात्र थायलंडचे नाव काढताच समोरच्या व्यक्ती भुवया उंचावून संशयीत नजरेने पाहत असल्याने बरेचदा अडचण व्हायची परंतु यामुळेच मग उत्सुकता आणखी वाढत होती. ठरल्याप्रमाणे आम्ही आठ मित्र जेंव्हा नागपूर विमानतळावर संध्याकाळी एकत्र झालो तेंव्हा परत एकदा काॅलेजच्या रंगीबेरंगी दिवसाची हमखास आठवण झाली. गप्पागोष्टींच्या ओघात मुंबई कधी आले ते कळलेसुद्धा नाही. 

बँकाॅकचे फ्लाईट मध्यरात्री असल्याने मुंबईच्या भव्यदिव्य विमानतळावर ड्युटीफ्री शाॅपकडे  पाय आपोआप ओढले गेले. तेथील विदेशी ब्रान्डेड मद्यांच्या किंमती खरोखरच मद्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी होती. एकदाचा मुंबई ते बँकाॅक एअर इंडीयाने प्रवास सुरु झाला आणि प्रवाश्यांना डिनरसोबत फ्रुट ज्युस, बिअर आणि व्हिस्कीचे वाढण होताच प्रवासी आनंदाचे डोही आनंद तरंगात डुंबुन गेले. जवळपास चार तासाच्या पेंगुळल्या अवस्थेत पहाटे सातला बँकाॅकच्या प्रशस्त स्वर्णभूमी विमानतळावर उतरलो.

इमिग्रेशन आटोपताच आम्ही बाहेर आलो आणि ठरल्याप्रमाणे अगदी पाच मिनीटातच चकचकीत एसी व्हॅन आम्हाला पट्टाया शहराकडे नेण्यास हजर झाली. प्रशस्त महामार्ग, उड्डाणपूलांचे जाळे, मधातच मेट्रोची गुंफण पाहून मन हरखून गेले. शिस्तबद्ध वाहतूक, चकचकीत रस्ते, वाहतुक सिग्नलचे तंतोतंत पालन आणि विना गोंगाटाचा हा सफर खरोखरच आल्हाददायक होता. वाटेवर आम्ही टायगर झू, रचाझ रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट घेतला. ब्रेकफास्ट मध्ये ताज्या आणि रसदार, गोड फळांची चव चाखताच रात्रभरचा थकवा क्षणात दुर झाला. मात्र वेळेअभावी टायगर झू पहायचे राहून गेल्याची मनात खंत होती. एकदाचे पटाया शहरात पोहोचताच ट्रॅफिक जामचा सामना करावा लागला. मात्र या ट्रॅफिक जाम मुळे कुठेच कर्णकर्कश हाॅर्न, चिडचिड किंवा शिव्यांची बाराखडी आढळली नाही. अखेर एकदाचे हाॅटेल ग्रँड बेला इथे पोहोचताच सुटकेचा निःश्वास टाकला. 

स्विमिंग पुलमध्ये मनसोक्त डुंबल्यानंतर आम्ही शहरात फेरफटका मारला. आपल्याकडे गल्लोगल्ली आढळणाऱ्या पानठेल्यांपेक्षा जास्त संख्येने असलेले मसाज पार्लर पाहून थोडे आश्चर्य वाटले. गोड आवाजात आणि लांब सुर काढून येणाऱ्या जाणाऱ्यांना साद घालणाऱ्या ललना पाहून आश्चर्यमिश्रीत भिती वाटत होती. पण पटाया म्हटले की इथे हा सामान्य प्रकार आहे. थाई मसाज हा इथला मान्यताप्राप्त व्यवसाय असल्याने त्यात वावगे असे काहीच नाही.पटाया म्हटले की नाईटलाईफ आलेच,,,, किंबहुना हे दोन्ही शब्द एकमेकांचे पर्यायवाची शब्द आहेत.

 इथे रशियन शो सारखे कित्येक प्रौढ शो दररोज भरवले जातात आणि मुख्य म्हणजे प्रत्येक शो ला प्रेक्षकांची तुफान गर्दी असते. खरेतर नग्नता, अश्लीलता, बरेवाईट याची कल्पना व्यक्तीपरत्वे भिन्न असल्याने त्याची निश्चित व्याख्या करणे अवघड आहे. मात्र या विषयाचा जेवढा तुम्ही बाऊ कराल तेवढा तो तुमच्या डोक्यावर बसणार हे मात्र निश्चित.   शेवटी आपला मेंदु काय ग्रहण करतो हे महत्त्वाचे आहे. लैंगिकतेला जेंव्हा कलात्मकतेची जोड मिळते तेंव्हाकुठे खजुराहोचे जागतिक दर्जाचे शिल्प निर्माण होते हे विसरून कसे चालणार. एखादी वस्तू आपण जेवढी झाकून ठेवतो तेवढीच त्याबद्दल उत्सुकता आणखी वाढत जाते मात्र तिच वस्तु अनावृत्त झाल्यास तिचे आकर्षक नष्ट होते हा सरळसाधा नियम आहे. यामुळेच की काय प्रौढ रशियन शो ला होणाऱ्या गर्दीपेक्षा पारंपरिक अल्काझार शो प्रेक्षकांनी ओसंडून वाहतो.अखेर रात्री दहाला इंडीयन रेस्टॉरंटमध्ये डिनर घेऊन पहिल्या दिवसाची सांगता झाली.

 भारतीयांनी इथल्या बाजारपेठेत विशेषतः हाॅटेल व्यवसायात चांगलाच कब्जा केल्याने आपल्याला जेवनाची फारशी अडचण होत नाही. शाकाहारी, मांसाहारी आणि सी फुड सोबत गुजराती, पंजाबी आणि जैन फुड सहज उपलब्ध असल्याने खवैय्यांचे चोचले इथे चांगले पुरवले जातात. मुख्य म्हणजे चौका चौकात मिनरल वाॅटर मशीन्स लागल्या असल्याने केवळ एक बाथमध्ये (दोन रूपयात) एक लिटर मिनरल वाॅटर सहज मिळते. सेव्हन इलेव्हन दुकाने तर रात्री उशीरापर्यंत सुरु असतात आणि तिथे प्रत्येक वस्तू अगदी वाजवी भावात मिळतात. रस्त्यांवर  पादचाऱ्यांना इथे अग्रक्रम दिला जातो. तुम्ही रस्ता क्राॅस करतांना दिसताच इथे चारचाकी वाहने स्वतः वेग कमी करून तुम्हाला मार्ग देतात. मुख्य म्हणजे बरेचसे रस्ते हे वनवे असल्याने अपघाताचे किंवा ट्रॅफिक जामचे प्रमाण अत्यल्प आहे. 

अगदी रोडला लागून स्ट्रिट फुडचे दुकान जागोजागी आहे. मात्र स्वच्छता कटाक्षाने पाळली जाते. कुठेही पानठेले नसल्याने रंगीत पिचकाऱ्यांचे दर्शन दुर्लभ आहे. इथली स्थानिक मंडळी स्वतःच्या कामात खुपच जास्त मग्न असतात. स्थानिक भाषा जरी थाई असली तरी मोडक्या तोडक्या हिंदी, इंग्रजीने आपले काम भागू शकते. इथल्या रस्त्यांवर आणि इतरत्र  इतके जास्त भारतीय (विशेषतः मराठी) असतात की आपण भारतातल्याच एखाद्या शहरात फिरतो की काय असा वारंवार भास होतो. हाॅटेल, पब, टॅक्सी आणि सर्वत्र बाॅलीवुडची हिंदी गिते नेहमीच कानावर पडत असतात........
क्रमशः...........
वाचकांना नम्र सुचना.
हे लेखन वास्तविक अनुभवांवर आधारित आहे. यात कोणत्याही गोष्टींचे समर्थन केले गेलेले नाही. वाचकांनी कृपया आपल्या विवेकबुद्धीने या लेखाचे अवलोकन करावे.
धन्यवाद.
**************************************
दि. ०१ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...