Wednesday, April 12, 2023

"हायप्रोफाइल" आत्महत्या


हायप्रोफाईल आत्महत्या,दि अनटोल्ड स्टोरी
*************************************
अगदी एक महिन्याच्या कालावधीत पोलीस अधिकारी श्री हिमांशू रॉय आणि आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या दुर्दैवी आत्महत्येने समाजमन स्तब्ध झालेले आहे. आपापल्या क्षेत्रातील हे दोन्ही दिग्गज, जे इतरांकरीता नक्कीच आदरणीय आणि आदर्श होते, अशी टोकाची भुमिका घेतील असे कुणाच्या ध्यानीमनीही नसेल. मात्र या दोघाच्याही आत्मघाताने समाजाला शेवटी आत्महत्या सारख्या गंभीर विषयावर आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे झालेले आहे.

 मुख्य म्हणजे शारीरिक आजारांना जे महत्व दिले जाते, ज्या प्रकारची काळजी घेतली जाते, तितके मानसिक आजारांना दिले जात नाही ही शोकांतिका आहे. हार्ट अटॅकच्या रुग्णाची जेवढ्या गंभीरतेने दखल घेतली जाते अगदी त्याच प्रकारची काळजी मानसिक आजारांची घ्यावी लागते मात्र इथेच फसगत होते आणि वरवर आनंदी, प्रसन्न, सफल असणारे चेहरे ऐनवेळी आत्मघात करून बसतात.

खरेतर आजकालच्या धावपळीच्या जगात आपसातला संवाद हरवलेला आहे. तणाव, नैराश्य, मानसिक दडपण, अनामिक भिती किंवा इतर अनेक मानसिक आजारांची रेलचेल वाढली आहे. मात्र बरेचदा आपण या दुष्टचक्रात गुरफटलेले आहो याची जाणीवच त्या व्यक्तीला नसते किंबहुना असली तरी आपण यातून बाहेर पडू शकू एवढा आत्मविश्वास तो गमावून बसला असतो. बरेचदा मॅनर्सच्या नावाखाली इच्छा, आकांक्षा, राग, अपमान गिळंकृत करावे लागते आणि इथेच मग प्रेशर कुकर सिच्युएशन तयार होत जाते. असे प्रेशर कुकर आपल्याला घरीदारी सर्वत्र आढळून येईल आणि कधी हे मानवी बॉम्ब बनून स्वतःला उडवून घेतील हे सांगता येत नाही.

सध्याच्या टू बाय टू कुटुंब पद्धतीत परिवार जरी "सुटसुटीत" झाला असला तरी कुटुंबाचे मानसिक आरोग्य "विस्कटीत" झालेले आहे. जिवाभावाची नाती तुटली असून जेष्ठांच्या अनुभव, धाक आणि मार्गदर्शनाला नवीन पिढी मुकली आहे. आपुलकीचे बारामाही वाहणारे झरे आटले असून डोक्याखांद्यावर प्रेमाचा हात ठेवणारे हरपले आहेत. कुणाजवळ रडून आपले "दुखदर्द" हलके करावे असे "हमदर्द" आता कुठे भेटतील हे सांगणे कठीण आहे. घरोघरी "आधारकार्ड" जरूर आहेत परंतू प्रसंगी "आधार" देणारे कुठे आहेत? आपले दुःख कुणाला सांगितले तर आपली टर तर उडवणार नाहीना या शंकेने मनातल्या भावना मनातच कुजवल्या जातात. 

शिवाय आजकाल सुखी, यशस्वी जिवनाचे मापदंड आर्थिक, भौतिक सुखात मोजल्या जात असल्याने नैतिकता, सदगुणांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. कसेही करून कोणत्याही मार्गाने यशस्वी व्हायची जी जिवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे त्यात आपण सर्वजण कळत नकळत होरपळले जात आहो. अगदी केजी टू पीजी पर्यंत ही अमानुष दौड सुरू असते. घरोघरच्या प्रेशर कुकरच्या या  शिट्ट्या आपण वेळेवर ओळखल्या नाही तर विनाश अटळ असतो.

खरेतर यश मिळवणे जेवढे सोपे असते त्यापेक्षा ते टिकवून ठेवणे अत्यंत जिकरीचे काम असते. बरेचदा यशामुळे निर्माण झालेली प्रतिमाच आपली वैरी ठरते. मिळवलेले यश, कमावलेले नाव बरेचदा उरावर ओझे होऊन बसते. तोच परफॉर्मन्स, तिच लोकप्रियता तोच रूबाब जेव्हा स्वतःपासून दुर होत जातो तसातसा तो व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचत जातो. सोबतच बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट दिमतीला असले तर काही वेगळे सांगायची गरजच उरत नाही.  कित्येक घरांत कुटुंबकलहाने परिसीमा गाठली असून जर, जोरू आणि जमीन हे दुःखाचे मुळ आहे हे का म्हटले गेले आहे याची खात्री पटते. कुटुंबातील पुरुषांची अवस्था तर आणखी बिकट असते. 

स्त्रियांकरीता प्रचलित असलेले एकतर्फी कायदे आणि समाजाची स्त्रियांप्रती असलेली सहानुभूती त्यांच्या मुळावर येते. बाळंतपण हे स्त्रियांसाठी पुनर्जन्म आहे तर लग्न म्हणजे पुरुषांसाठी पुनर्जन्म  म्हणायला हरकत नाही.  बहुतेक लग्नानंतर होणारी कुटुंबाची धुळधाण पाहता लिव्ह इन रिलेशनचे पिल्लू जन्माला आले असावे असे वाटते. या जन्मावर , या जिवनावर शतदा प्रेम करावे हे ऐकायला कितीही कर्णप्रिय असले तरी घरातच जर प्रेम मिळाले नाही तर अशा व्यक्ती बाहेरच्या जगाशी काय लढणार, कशा तग धरणार? पाण्यातील माशांचे आणि पुरूषांचे अश्रू आजपर्यंत दिसले आहेत काय कुणाला? ह्रुदयातून निघणारी महाधमनी संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते मात्र ह्रुदयालासुद्धा कोरोनरी धमनीचा रक्तपुरवठा लागतोच. अगदी तसेच कुटुंबाचा, समाजाचा आधार असलेल्यांनाही कधीतरी आधाराची गरज असतेच. मात्र इतरांना आधार देता देता ते स्वतः कधी निराधार होतात हे कळत नाही आणि आत्महत्या सारख्या दुर्दैवी घटना घडतात.

कदाचित हिमांशू रॉय आणि भैय्युजी महाराजांनी याबाबतीत कुठे मन मोकळे केले असते किंवा  काही सुचवले असते तर भविष्यातील अनेक अप्रिय घटनांना आपण नक्कीच टाळू शकलो असतो. १००% अचूक व्यक्ती सापडणे केवळ अशक्य आहे. जिंकण्याचा आनंद आणि पराभवाचे दुःख पचवायला शिकणे आवश्यक आहे. जन्मभर लोक काय म्हणतील याचा बागुलबुवा करत राहीले तर कसे चालणार? संतांनी बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेटेड जरी केले असले तरी मानवी भावना, सुखदुःख यातून कोणाचीच सुटका झालेली नाही. शिवाय दिव्याखाली अंधार असतो हे विसरून कसे चालणार? जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असतातच. जेवढे मोठे व्यक्तीमत्व तेवढा सुखदुःखाचा परिघ मोठा असणार हे ओघाने आलेच आहे.

शारीरिक आजारांप्रमाणेच मानसिक व्याधीं, ताणतनाव यावर उपचार शक्य आहेत. सोबतच योग्य समुपदेशन, व्यायाम, योग, जिवनाकडे बघण्याचा द्रुष्टीकोण बदलला तरच काही हाती येईल अन्यथा वरवर शिस्त आणि आध्यात्माचे उडणारे कारंजे कधी ज्वालामुखी होतील हे सांगणे कठीण आहे.
************************************
दिनांक १८ जुन २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.Com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...