Wednesday, April 12, 2023

पटाया, कोरल आयलॅंड, वॉकींग स्ट्रीट, भाग ०२


     कोरल आयलँड,वाॅकींग स्ट्रीट भाग, ०२
**************************************
प्रवासातील आमच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात ब्रेकफास्टने झाली. इंडीयन ब्रेकफास्ट ऐवजी अनवधानाने आम्ही काँटीनेंटल सेक्शनला गेल्याने काय घ्यावे नी काय खावे हे सुचत नव्हते. पोर्क, बिफ आणि सी फुडची रेलचेल असलेल्या काऊंटर मधून मोठ्या मुश्किलीने आमलेट शोधून काढले आणि कसेबसे पोटात  ढकलले. प्रत्येक जण इतरांना उपलब्ध नाॅनव्हेज डिशबद्दल  बद्दल सावधान करत होता. मात्र यासोबतच टरबुज, पेरू, पाईनॲपल आणि सलाद, फ्रूट ज्युसची सोय असल्याने थोडे हायसे वाटले. खरेतर झणझणीत तर्री पोहे, समोसा, सावजी  खाणाऱ्या नागपूरकरांना ते मिळमिळीत खाद्यपदार्थ भावणार तरी कसे? शेवटी आलीया भोगासी असावे सादर म्हणत आम्ही काढता पाय घेतला. हाॅटेलमध्ये ब्रेकफास्टची वेळ (सकाळी ७ ते १०) तंतोतंत पाळणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला उपवास घडलाच म्हणून समजा.

दुसऱ्या दिवशीचे मुख्य आकर्षण होते कोरल आयलँड. किनाऱ्यापासून स्पीड बोटने आमचा प्रवास सुरु झाला मात्र जसजसा स्पिड बोटने वेग पकडला तसतसा जीव खालीवर होऊ लागला होता. तुफानी स्पीडने जाणारी स्पीडबोट जेंव्हा समुद्राच्या लाटांशी टक्कर घेत होती तेंव्हा एवढे झटके लागत होते की आपण समुद्राऐवजी खड्डेयुक्त रस्त्यांवर तर चालत नाहीना असा भास होत होता. प्रचंड आदळआपट होत पाठ, कंबर शेकून झाल्यावर दहा मिनीटात आम्ही पहिला पाडाव असलेल्या पॅरासेलींग प्वाईंटला आलो.
इथे परमनंट डेक तयार केलेला असून स्पीड बोटद्वारे पॅरासेलींगचा थरार अनुभवता येतो. मात्र नवतरुणपणी असणारा उत्साह, सळसळते रक्त, कोणत्याही चॅलेंजला भिडण्याच्या खुमखुमीचे आपले दिवस नसल्याचे ध्यानात येताच किंवा पॅरासेलींग गोव्याला अनुभवले असल्याने बहुतेकांनी दुरूनच आनंद घेण्यात धन्यता मानली. कुठेतरी आपले डॅशिंग,दंगेबाज मित्र काळजी, सावधता आणि बचावात्मक पावित्र्यात उभे असलेले पाहून आश्चर्य वाटते. शेवटी कालाय तस्मै नमः,,आणखी काय.

यानंतर दुसरा प्वाईंट बराच दुर असल्याने स्पीडबोटने आपली कमाल मर्यादा गाठली. काटकोनात उभी होणारी बोट,भन्नाट स्पीडच्या हेलकाव्याने  होणारी शरीराची दमछाक, मधातच समुद्राच्या थंडगार पाण्याने ओलेचिंब होणारे शरीर बालपणी पावसात भिजण्याची आठवण करून देत होते. मात्र बालपणीच्या अल्हडपणाची जागा आता काळजीने घेतल्याचे जाणवले. थोड्याच वेळात आम्ही डायव्हिंग प्वाईंटला आलो. इथे अंडर सी वाॅकींगचे थ्रील अनुभवता येते. मात्र पाण्याची भिती असणाऱ्यांनी यापासून दोन हात दुर राहीलेलेच बरे. 

यानंतर पंधरा मिनीटाच्या आत कोरल आयलँडला पोहोचलो. इथले निळेशार पाणी, शुभ्र रेती (वाळू) मन मोहून घेते. स्वच्छ किनारे, गर्द हिरवाई, फेसाळणारा अथांग समुद्र, लाटांचे संगीत एका झटक्यात तुमचा थकवा दुर पळवतो. बच्चेकंपनीसाठी मनसोक्त डुंबण्याची हौस इथे पुर्ण केली जाते तर काही जण वाळूचे किल्ले आणि शिल्प तयार करण्यात व्यस्त असतात. कोरल आयलँडवर बनाना बोट, स्पिड बोट, आणि ग्लायडींगची सोय असल्याने आपला वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. ज्यांना या सर्व भानगडीत पडायचे नाही ते रिलॅक्स चेअरमध्ये निवांतपणे पहूडले असतात. इथेसुद्धा छोट्या हाॅटेल्सची भरमार असल्याने पोटपुजा करायला हरकत नाही. 

दोन तिन तास आरामात घालवल्यावर निघायची वेळ येते मात्र इतक्या सुंदर, निवांत जागेवरून हलायची मानसिक तयारी नसते तर शरीर शुभ्र वाळूत खोलवर रुतून बसलेले असते. स्पीड बोटपर्यंत जाण्यासाठी प्लॅस्टिक ड्रम्सचा रॅम तयार केलेला आहे. मात्र तो लाटांच्या तालावर नाचत असल्याने चालतांना आपण झिंगत असल्याची फिलींग येते. विशेषतः बालक, स्त्रिया आणि वृद्धांनी हात पकडून चाललेलेच बरे. परततांना पुन्हा एकदा पाठ, कंबर शेकत देवाचे नाव घेत तुफानी स्पिडने किनाऱ्याकडे वाटचाल सुरु होते. कित्येक सहप्रवासी तर कायम किंचाळत असतात मात्र ते शरीराचे डिफेन्स मेकॅनिझम असल्याने आपणही त्या आरडाओरडीत कळत नकळत सामील होतो. एकदाचे सुखरूप किनाऱ्यावर पोहोचलो आणि कोरल आयलँडच्या  थरारक सफरीची सांगता झाली. 

एवढी दमछाक झाल्यावर सपाटून भुक तर लागणारच. जवळच असलेल्या पंजाबी रेस्टॉरंटमध्ये सर्व अन्नावर तुटून पडले आणि आपली क्षुधा शमवली. भरपोट जेवल्यानंतर सर्वांनी हॉटेलवर जाऊन मस्तपैकी झोप घेतली.
पटायाची संध्याकाळ ही रंगीत असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शोज चे आयोजन नियमितपणे केले जाते. तरीपण पटायाची खरी ओळख ही वाॅकींग स्ट्रिट साठी आहे. बिच रोड ते बाली हाय प्लाझा पर्यंतचा जवळपास एक किलोमीटरचा परिसर हा नाईटलाईफ साठी जगप्रसिद्ध आहे. रस्त्यांच्या दुतर्फा दाटीवाटीने असणारे बार, पब, नाईट क्लब, डान्स फ्लोअर  दर्दी पर्यटकांसाठी आनंदाची पर्वणी आहे. कानठाळ्या बसवणारे म्युझिक, रंगबिरंगी लाईट्सचा झगमगाट, डान्स फ्लोअरवर थिरकणाऱ्या रशीयन सुंदरी, बियरचे टाॅवर रिचवणारा आणि धुम्रपानात स्वतःला झोकून देणारा युवावर्ग पाहता बाहेरच्या दुनियेपेक्षा ही दुनिया किती वेगळी आहे हे जाणवते. 

इथे देहव्यवसायाचे नियम शिथिल आहेत. जगात काय बरेवाईट आहे यापेक्षा तुमच्या दृष्टीने काय बरेवाईट आहे हे जास्त महत्वाचे आहे. नैतिक, अनैतिकतेच्या कितीही गप्पा हाकल्या तरी देहव्यवसाय हा या भुतलावरचा सर्वात जुना व्यवसाय आहे हे विसरून कसे चालणार. मात्र देशकाल आणि स्थानानुसार त्यात बदल होत गेला एवढाच काय तो फरक. किंबहुना पटायात या व्यवसायाचे आपल्याला अपडेटेड व्हर्जन बघायला मिळते एवढीच त्यात नवलाई. खरेतर भुक, भिती आणि लैंगिकता ही तिन प्रमुख लक्षणे कोणत्याही सजीव वस्तूत हमखास आढळणार. मात्र संस्कार, संस्कृती, सामाजिक भान,,, जाणीव, सहजीवन, नैतिकतेचे बंधन यात आपण हे तिनही विषय यथायोग्य प्रकारे हाताळले तरच सुसंस्कृत समाज निर्माण होतो अन्यथा सर्वत्र अनागोंदीचे राज्य आलेच म्हणून समजा. 

खरेतर पटाया परिसरात इतके चांगले नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळे आहेत की आपले तिनचार दिवस आरामात निघतात. मात्र वाॅकींग स्ट्रिट मुळे पटाया नाहक बदनाम झालेले आहे. संध्याकाळी गजबजणारा हा रोड पहाटे उशीरापर्यंत आपला झगमगाट कायम ठेवतो यातच सर्व गुपीत दडले आहे. शेवटी डिमांड अँड सप्लायच्या युगात व्यापारीकरणाने हा व्यवसाय हायजॅक करत याला इंडस्ट्रीचे स्वरूप दिल्याने चांगलाच भरभराटीला आलेला आढळतो.
क्रमशः....
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
वाचकांना नम्र सुचना
या लेखात वास्तविक परिस्थितीचे आकलन करून वर्णन केलेले आहे. कोणत्याही बाबींचे अजिबात समर्थन केलेले नाही.  कृपया आपल्या विवेकबुद्धीला स्मरून लेख वाचावा.
धन्यवाद. 🙏
**************************************
दि. ०२ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...