Thursday, April 13, 2023

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०१


                "व्हिएतनाम" 'प्रवासवर्णन'
            स्थलांतर आणि देशांतर, भाग ०१
***************************************
हिवाळ्याची चाहूल लागताच पक्षांच्या दुनियेत स्थलांतराची प्रक्रिया सुरू होते मग ती खाद्यासाठी असो, हवामान बदलामुळे असो की पिल्लांच्या प्रशिक्षणासाठी असो. शास्त्रज्ञांनी दिवस आणि रात्र लहान-मोठे झाल्याने पिट्युटरी व पिनिअल ग्रंथी हार्मोन्सच्या बदलाला जरी स्थलांतराला जबाबदार मानले असले तरी पक्षीजीवनात ही एक विलक्षण घटना आहे. अगदी याच धर्तीवर आम्ही मित्रमंडळी हिवाळा लागताच पर्यटनाचा मुहूर्त शोधून परदेशवारीला निघतो. थायलंड, बाली इंडोनेशिया पाठोपाठ आम्ही आमचा मोर्चा वळवला भारताच्या आग्नेय दिशेला असलेल्या आणि जुन्या इंडोचायनाचा भाग असलेल्या व्हिएतनामकडे. व्हिएतनाम म्हटले की चटकन डोळ्यासमोर उभे राहते अमेरिका आणि व्हिएतनामचे गाजलेले युद्ध. युद्धस्य कथा रम्य: असे कितीही म्हटले गेले असले तरी जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे हे विसरून कसे चालेल?

सध्या सर्वत्र पर्यटनाचा हंगाम सुरू असल्याने विमान कंपन्यांची चंगळ आहे आणि याचाच फायदा घेत त्यांची लबाडी सुद्धा शिगेला पोहोचली असते. विमानाला विलंब होणे, वारंवार विमानाची वेळ बदलने किंबहुना विमानाचे मार्ग बदलने यामुळे बरेचदा पर्यटनात रसभंग होतो मात्र आता हे सर्व अंगवळणी पडलेले आहे. आमचा प्रवास नागपुर ते "हो ची मीन" (व्हिएतनाम) मार्गे कोलकाता होता आणि परदेशी प्रवास असल्याने २२ डिसेंबरला तिन तास अगोदर म्हणजेच दुपारी ३.३० ला नागपुरच्या विमानतळावर हजर झालो.
इतिहासात डोकावले तर पहिल्या महायुद्धाच्या काळात १९१७/१८ला ब्रिटीशांनी रॉयल एअर फोर्स करिता नागपूर विमानतळ कार्यान्वित केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा यात आवश्यक सुविधा, सुधारणा करण्यात आल्या. मात्र स्वातंत्र्यानतर ब्रिटीशांनी १९५३ ला हे विमानतळ भारत सरकारला हस्तांतरित केले. १९४९ ते १९७३ पर्यंत नागपूर विमानतळ "नाईट एअर मेल सर्व्हिस" (दिल्ली, मुंबई, कलकत्ता आणि मद्रासकरिता) प्रसिद्ध होते. मात्र २००५ पासून मिहान अंतर्गत तब्बल ११ मिलीअन अमेरिकन डॉलर्स खर्च करून हे विमानतळ विकसित करण्यात आले. १७,५०० चौ.मिटरवर साकारलेल्या या नविन विमानतळाचे उद्घाटन १४ एप्रिल २००८ ला करण्यात आले तसेच सोनेगाव विमानतळ याऐवजी आता ते डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखले जाते. 

एरवी एका क्षणाचा विलंब झाला अथवा क्षुल्लक कारणावरून प्रवेश नाकारणाऱ्या विमान कंपन्याचा वक्तशिरपणाबाबत आनंदीआनंद आहे. नागपुरला उड्डाणाला जवळपास एक तासाचा विलंब होताच रात्री ९ वाजता कोलकाता ते हो ची मिन जाणारे विमान पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित झाले होते. अखेर रात्री ८.३० ला कोलकाताच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आम्ही उतरलो आणि सुदैवाने विमान कंपनीचा कर्मचारी आम्हाला घ्यायला दारातच दत्त म्हणून हजर होता. यामुळे एक बरे झाले की आमचे सेक्युरीटी चेकइन आणि इमिग्रेशन सारखे सोपस्कार अगदी व्हिआयपी थाटात पार पडले.

कोलकाता विमानतळ पहिले डमडम या नावाने ओळखले जायचे. ईशान्य भारतातील हे प्रमुख विमानतळ असुन भारतातील पाचवे सर्वात जास्त व्यस्त,वर्दळीचे विमानतळ आहे.युरोप, इंडोचायना आणि ऑस्ट्रेलियाला जाण्याकरीता हे एक प्रमुख स्थान आहे. १९२४ ला हे विमानतळ कार्यान्वित झालेले असुन दुसऱ्या महायुद्धात ब्रह्मदेशावर बॉंम्बहल्ले करण्यासाठी अमेरिकन हवाई दलाच्या बी २४ लिबरेटर या बॉंम्बवर्षक विमानाने इथुनच उड्डाण भरले होते. १९६९ ला इंडीयन एअरलाईन्सने कोलकाता ते दिल्ली अशी पहिली जेट सेवा सुरू केली होती. १९९५ ला डमडम विमानतळाचे नामांतर होऊन ते सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखले जाऊ लागले. 

रात्री ९ ला विमान हो ची मिनकडे झेपावताच आमच्या तिसऱ्या परदेशवारीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. व्हियतनाम आपल्यापेक्षा वेळेत दिड तास पुढे असल्याने स्थानिक वेळेनुसार रात्री ३ वाजता आम्ही हो ची मिनच्या टीएसएन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. मध्यरात्रीचा काळ असल्याने बहुतांश कर्मचारी पेंगुळलेल्या अवस्थेत होते. त्यातच प्रत्येकी २५ अमेरिकन डॉलर भरून व्हिसा काढणे, इमीग्रेशन यात एकदिड तासांचा वेळ सहज निघून गेला. हे विमानतळ १९३० ला फ्रेंच कॉलोनीयल सरकारने सुरू केले होते. इथल्या विमानतळाला व्हिएतनाम युद्धाची झळ लागली होती तसेच दोन मोठे विमान अपघात आणि एका आतंकी हल्ल्याचे हे विमानतळ मुक साक्षीदार आहे. 

अखेर पहाटे चार ला सर्व सोपस्कार आटोपत आम्ही आमचा पहिला पाडाव असलेल्या ए ॲंड ईएम सिग्नेचर हॉटेलला पोहोचलो.,,,,
क्रमश:
***************************************
दि. २९ नोव्हेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...