Thursday, April 13, 2023

पटाया सिटी पेरिफेरी टुर, भाग ०३


        पटाया सिटी,पेरिफेरी टुर, भाग ०३
*************************************
तिसऱ्या दिवसाची सुरवात फार सुंदर झाली. ब्रेकफास्टला इंडीयन रेस्टॉरंट असल्याने आम्ही सर्व मित्र अधाशासारखे नास्त्यावर तुटून पडलो. उपमा, सांभारवडा, रस्सम, चने आणि सोबतीला चमचमीत आमलेट, केक, पेस्ट्री असल्याने सर्वांनी ढेकर येईपर्यंत खाद्यपदार्थ दडपले. अतिशय तृप्त मनाने आणि अन्नदेवतेचे मनस्वी आभार मानत आम्ही आपले जाडजूड शरीर व्हॅनमध्ये कोंबत मजल दरमजल करत पुढच्या पाडावाकरीता निघालो. 

१) वर्ल्ड जेम गँलरी
पटाया शहरात फेमस वर्ल्ड जेम गॅलरी आहे. इथे स्वर्ण, चांदी आणि हिरेरत्नांचे दागिने, अलंकार आणि शोभेच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केल्या जाते. हिरे, रत्नांचे त्यांच्या खानिज उत्पत्तीपासून ते पैलू पाडण्याच्या सर्व बाबींचे अत्यंत कुशलतेने डेमाॅनस्ट्रेशन केले जाते. बेल्जियम, इजराईल, भारत, अमेरिका पाठोपाठ थायलँड हा पाचवा देश आहे जो हिरे, रत्नांची खान आणि पैलू पाडण्यासाठी प्रसिद्ध आहे. मात्र थायलँडला ज्याप्रकारे डायमंड कटींग आणि फिनीशींग केल्या जाते ते सर्वोत्तम प्रकारचे  मानल्या जाते. इथे रूबी, सफायर, इमेराल्ड आणि डायमंड सोबतच झिर्कोनियम, गार्नेट, अंबर, ऑनेक्स, मॅलाकाईट, नेफ्रिटीस सोबतच पर्ल पण विक्रिस उपलब्ध आहेत. 

थायलंडला चांदीच्या खानी आहेत मात्र सोने हे आयातीत असल्याने चांदीचे दागिने, अलंकार घेणे केंव्हाही फायदेशीर मात्र स्वर्णलंकार घेण्यात शहानपण मुळीच नाही. रत्नांची किंमत आणि दर्जा हा पारदर्शकता, रंग, चमक आणि ट्रान्सल्युसेन्सीवर अवलंबून असल्याने जाणकार व्यक्ती सोबत असल्याशिवाय ते खरेदी करणे जोखमीचे आहे. महत्त्वाचे म्हणजे इथे इतक्या प्रकारचे, विविधरंगी आणि आकर्षक दागिने, अलंकार विक्रिस आहे की जर तुमच्यासोबत महिलावर्ग असेल तर तुम्हाला काही कळायच्या आतच तुमचा खिसा खरेदीने कधीही  खाली होऊ शकतो. अभ्यासू विद्यार्थी आणि रत्नप्रेमींसाठी वर्ल्ड जेम गॅलरी हे कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. 

२) नुंग नुच व्हिलेज
शहरातील निटनेटकेपणा आणि जंगलातील हिरवेगार सौंदर्य जर तुम्हाला एकाचवेळी अनुभवायचे असेल तर नुंग नुच व्हिलेज हे सर्वोत्तम स्थान आहे. हे साऊथईस्ट एशियातील सर्वात मोठे (ट्राॅपीकल) बाॅटनिकल गार्डन आहे. रस्त्याच्या दुतर्फा निरनिराळ्या आकारात सुटसुटीत कटींग केलेली झुडपे आणि वृक्षलता मन मोहून घेते. गर्द हिरवळीतून प्रवास करतांना मन ताजेतवाने होऊन जाते. गार्डनच्या सुरवातीलाच भल्यामोठ्या वाघाचे दर्शन होते. अर्थातच त्याला साखळीने बांधून आणि ट्राँक्वीलायझरने गुंगीत ठेवल्याने पर्यटकांन त्याच्यासोबत फोटोसेशनची नामी संधी उपलब्ध होते.

 मला मात्र जवळपास दोन फुट लांबीचे आणि निळ्या, नारंगी, अस्मानी रंगांच्या छटा असलेले मकाऊ पोपट खुपच आवडले. त्यांना अंगाखांद्यावर खेळवत, फोटो काढत मी माझी हौस पुर्ण केली. यावेळी कळत नकळत पंछी बनू उडके फिरू मस्त गगणमे आज मै आझाद हूँ दुनियाके चमन मे या गिताची आवर्जून आठवण झाली. इथे कवेलूंच्या साहय्याने उत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत. थोड्याच वेळात आम्ही इंडीयन कुसीनमध्ये पोहोचलो मात्र सकाळच्या ब्रेकफास्टची शिग उतरली नसल्याने बहुतेकांनी  फ्रुट,सलाद वर हात फिरवत काढता पाय घेतला. 

३) थायलंड एलीफंट शो
नुंग नुच व्हिलेजमध्येच एक भव्य ऑडीटोरीयम आहे. थायलंडवर  हिंदु संस्कृतीचा पगडा आहे आणि हत्ती हा त्यांचा राष्ट्रीय प्राणी असल्याने हत्तीला तिथे अनन्यसाधारण महत्व आहे.  ऑडीटोरीयमच्या प्रवेशद्वाराजवळच गणेशाची भव्यदिव्य मुर्ती पाहुन दोन्ही हात आपोआप जोडले जातात. श्रीगणेशासमोर नतमस्तक होऊन आम्ही आत प्रवेश केला. अत्याधुनिक साऊंड आणि लाईट सिस्टिमने युक्त षटकोनी ऑडीटोरीयम मध्ये जवळपास एक तास आपल्यासमोर थाई संस्कृती, धार्मिक उत्सव, मार्शल आर्ट चे उत्तम सादरीकरण केले जाते. एवढेच कायतर लढाईच्या सिनमध्ये प्रत्यक्षात हत्तींनाच उतरवल्याने डोळ्याचे पारणे फिटते. या शोनंतर लगेच ओपन स्टेडीयममध्ये हत्तींच्या कळपाद्वारे  बास्केटबॉल, फुटबॉल, शुटींग, पेंटिंग इ. करामती लीलया पार पाडल्या जातात. इथे हौशी पर्यटक हत्तींसोबत फोटोग्राफी करु शकतात.

४) अंडर वाँटर वर्ल्ड (अँक्वा पार्क)
दिवस मावळतीला येताच आम्ही ॲक्वा पार्कला आलो. इथे मोठ्या टँकमध्ये १०० मिटर खाली ॲक्रिलीक टनलद्वारे आपण सागरी जीवनाला अगदी जवळून न्याहळू शकतो. विविध स्पेशीजचे सागरी जीवन पाहतांना जसे सी हाॅर्स, माशांच्या अनेकविध प्रजाती, स्टोनफिश, फाॉसिल्स फिश, खतरनाक शार्क, कासव, जेलीफिश वगैरे आपल्या सभोवताल पाहून खरोखरच मन प्रसन्न होते. इथे काही ठराविक जागी तुम्ही माशांना फिडसुद्धा करू शकता.

५) आर्ट इन पँराडाइज गँलरी
मि. शिन जीन येऊल यांच्या अथक परिश्रमाने जवळपास सहा हजार स्क्वे. मिटर परिसरात ही आर्ट इन पॉराडाइज गॅलरी उभी झाली आहे. यात दहा सेक्शन्स असून पंधरा प्रोफेशनल आर्टिस्ट द्वारा दिडशेच्यावर थ्री डी पेंटिंग्ज साध्या भिंतीवर साकारल्या गेल्या आहेत. या पेंटिंग्जचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही ठराविक जागेवर किंवा बिंदुवर उभे राहीले तरच फोटोमध्ये त्याचा थ्री डी इफेक्ट दिसतो. याकरीता बऱ्याच पेंटिंग्ज जवळ फोटोपाॅइंट्स पण मार्क केलेले आहेत. जंगली प्राणी, डायनॅसोर्स, सागरी जीवन, जंगल सफारी, काही ऐतिहासिक व्यक्तिमत्वे जसे ईजिप्शियन राजे, रजवाडे, मोनालीसा किंवा आईनस्टाईन यांच्यासारख्या प्रतिमा हुबेहूब साकारल्याने काही काळ आपण अनाहुतपणे इतिहासाची सफर करून येतो. सर्व पेंटिंग्ज पाहतो म्हटले तर कमीतकमी दोन तास तरी सहज लागतात.

६) अल्काझार शो
पटायात होणाऱ्या संध्याकाळच्या शोमध्ये सर्वाधिक सभ्य आणि परिवारासह पाहता येणारा शो म्हणून अल्काझार शो चे नाव जरूर घ्यावे लागेल. थाई संस्कृती, रुढी, परंपरा, लोकनृत्य यांचा अनोखा संगम म्हणून या शो कडे बघावे लागेल. अर्थातच या शोमध्येसुध्दा कधीकधी नर्तकी टू पिस मध्ये येतात परंतु त्यात अश्लिलता नसते. म्युझिक, डान्स, रंगबिरंगी पोषाख, हाय टेक्नॉलॉजी, काॅम्प्युटराईज्ड लायटिंग सिस्टम, स्टुडिओ कलर्स, सर्कल डिटीएस साऊंड सिस्टिमद्वारे सादर करण्यात येणारा हा शो खरोखरच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. शिडशिडीत बांध्याच्या, उंच, गोऱ्यापान आणि कमालीच्या देखण्या नर्तकी जेंव्हा अफलातून नृत्य सादर करतात तेंव्हा प्रत्यक्ष अप्सराच धरतीवर अवतरल्याचा भास होतो.

तिसरा दिवसाच्या भटकंतीने आम्ही सर्व प्रचंड दमलो होतो. शरीरातील पेट्रोल संपल्याने सर्वांचे पाय आपसुकच अम्मा रेस्टॉरंटकडे वळले. सुदैवाने तिथे भारतीय कुक असल्याने आम्हाला मनासारखे जेवन मिळाले. फिश करी आणि चिकन मसाल्यावर येथेच्छ ताव मारल्यावर आमच्या तिसऱ्या दिवसाची सांगता झाली.
क्रमशः,,,,,,,,,,
**************************************
दि. ०३ डिसेंबर २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...