व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०
फ्रेंच राजवटीचे 'मुक' "साक्षीदार"
***************************************
परकिय आक्रमक मग ते कोणतेही असो, नवीन प्रदेशात आक्रमण करताच स्थानिक संस्कृतीची धुळधाण करत आपली संस्कृती तिथे रूजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे धार्मिक आक्रमण होय. अर्थातच व्हियतनामची भुमीसुद्धा याला अपवाद नाही. बौद्ध संस्कृती आणि पगोडा यावर घाला घालत फ्रेंचांनी तिथे आपली संस्कृती मांडण्याचा प्रयत्न केला आणि याचेच मुक साक्षीदार म्हणून प्रेसिडेन्स पॅलेस, नॉट्रेडेम कॅथेड्रल यासोबतच सेंट्रल पोस्ट ऑफिस आज आपण बघू शकतो.
१) प्रेसिन्डेन्स पॅलेस,,,,
खरेतर फ्रेंचांनी १८५८ पासून व्हिएतनामला आपली वसाहत बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. १८६७ पर्यंत फ्रेंचांनी दक्षिण व्हिएतनामवर संपुर्ण कब्जा करत तिथे आपले साम्राज्य उभे केले. आज जी वास्तू प्रेसिडेंट पॅलेस म्हणून ओळखली जाते, ती पुर्वी नोरोडॉम पॅलेस म्हणून प्रसिद्ध होती. पुर्वीच्या लाकडी पॅलेसला तोडून नवीन इमारत बांधण्यात आली. १२ हेक्टर जागेवर उभ्या या इमारतीत बगिचा, हिरवीगार झाडी आणि लॉन आहे. ही वास्तू बराच काळ फ्रेंच गव्हर्नरच्या ताब्यात राहिल्याने गव्हर्नर्स पॅलेस म्हणून सुद्धा ओळखली जाते.
१९४५ च्या दरम्यान जापान्यांनी काही काळ यावर कब्जा केला होता परंतु दुसऱ्या महायुद्धात जापानचा पाडाव होताच त्यांनी इथुन आपला गाशा गुंडाळला. १९६२ च्या युद्धात या पॅलेसवर विमानांनी बॉंम्बहल्ले करत डावी बाजू संपुर्णपणे नष्ट केली. अखेर संपुर्ण इमारत पाडून तिथे १९६२ ते १९६६ पर्यंत नवीनतम चार मजली प्रेसिडेंट पॅलेस उभारण्यात आले. १९७५ ला उत्तर व्हिएतनामी कॉम्युनिस्ट सैन्याने अमेरिका धार्जिण्या दक्षिण व्हिएतनामचा पाडाव करण्यासाठी याच प्रेसिडेंट पॅलेसवर रणगाडे घुसवत आक्रमण केले आणि दिर्घकाळ चाललेले हे युद्ध संपुष्टात आणले. यालाच सेगॉन फॉल्स असे म्हणतात आणि याच घटनेने उत्तर दक्षिण व्हिएतनाम एकत्र येऊन एका भक्कम राष्ट्राची निर्मिती झाली. याच घटनेचे स्मरण म्हणून या वास्तूला रियुनिफिकेशन पॅलेस सुद्धा म्हणतात.
२) नोट्रोडेम कॅथेड्रल,,,,
सेगॉन शहराच्या कुशीत आणि सेगॉन नदीच्या काठावर नोट्रेडेम कॅथेड्रल दिमाखात उभे आहे. १८६३ ते १८८० दरम्यान बांधल्या गेलेल्या या महाकाय वास्तुचे संपूर्ण बांधकाम साहित्य फ्रांसवरून मागवले गेले होते. १८९५ ला मुळ इमारतीला सहा ब्राॉंझ बेलसह दोन बेल टॉवर्स जोडण्यात आले. या दोन्ही टॉवरवर ३.५ मी. लांबीचे आणि २.५ मी. रुंदीचे ६०० किलो वजनाचे क्राॅस लावण्यात आले. यामुळे या कॅथेड्रलची उंची ६०.५ मीटर एवढी भरते. या इमारतीचा पाया एवढा मजबूत बांधला गेला होता की तो संपूर्ण कॅथेड्रलच्या दहापट वजन सांभाळू शकेल.
या कॅथेड्रल पुढे असलेल्या बागेत पुर्वी बिशप ऑफ एड्रनचा पुतळा होता, जो १९४५ ला हटवला गेला. मात्र त्याच जागी १९५९ ला व्हर्जिन मेरीचा पुतळा बसविण्यात आला. एक मात्र खरे, अंधश्रद्धा ही खरोखरच कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नसून धर्म, जातपात, देश आणि राष्ट्रांच्या सिमा ओलांडत ती कुठेही आढळू शकते. ऑक्टोबर २००५ ला इथेच व्हर्जिन मेरी पुतळ्याच्या उजव्या गालावरून अश्रू ओघळण्याची अफवा पसरली आणि भाविकांनी एकच गर्दी केली होती. अखेर प्रशासनाला काही काळ हा परिसर ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली होती.
३) सेंट्रल पोस्ट ऑफिस ,,,,
फ्रेंचांनी आपला सरकारी कारभार सुरळीत चालण्यासाठी काही प्रशासकीय इमारती सुद्धा बांधल्या, सेंट्रल पोस्ट ऑफिस ही त्यातलीच एक इमारत होय. नॉट्रेडेम कॅथेड्रलच्या डाव्या बाजूला ही इमारत आजही सुस्थितीत उभी आहे. १८८६ ते १८९१ दरम्यान बांधल्या गेलेल्या या इमारतीत "टेलिग्राफिक लाईन्स ऑफ सदर्न व्हिएतनाम ॲंड कम्बोडीया" आणि "सेगॉन ॲंड इट्स सराऊंडींग्ज १८९२" असे दोन पेंटोमॅप लावलेले आहे. सध्या ही वास्तू विविध दुकानांनी गजबजलेली असते.
क्रमशः,,,,,,,
***************************************
दि. ०३ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment