Thursday, April 13, 2023

तामीया प्रवास वर्णन भाग ०२


इक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नहीं
***************************************
तामीया सहलीची पुर्वतयारी म्हणून आम्ही ३५ आसनी बस बुक केली होती. नागपूर ते तामीया (जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश) हे अंतर जवळपास १८० कि.मी असुन प्रवासाला साधारणतः चार तास लागतात. खरेतर नागपूर ते सावनेर पर्यंत चौपदरी महामार्ग आहे परंतु नंतर दुपदरी मार्ग असल्याने प्रवासाचा वेग मंदावतो. तसे पाहता नागपूर असो अथवा कोणतेही शहर, गजबजलेले रस्ते, मार्गावरील फुटकळ दुकाने, फेरीवाले, मोकाट जनावरे, वाहनचालकांचे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणे, चाकरमाण्यांची कार्यालयात जाण्याची धडपड तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची धुम स्टाईल,,, अशा एक ना अनेक कारणांनी वाहतुकीचा बोजवारा उडतो. या सर्व गोंधळात कोणताही अपशब्द न वापरता चारचाकी वाहन चालवणे खरोखरच दिव्य म्हणावे लागेल.

ठरल्याप्रमाणे बस अगदी तंतोतंत वेळी म्हणजेच सकाळी ११ वाजता त्रिमूर्ती नगरला पोहोचली परंतु बरेचश्या मित्रांचे अजुनही गुड मॉर्निंग झाले नसल्याने त्यांना थोडे कानपिचक्या देत आणावे लागले. दुसरा पिकअप प्वाईंट सिताबर्डीला होता आणि तिथून उर्वरित मित्र सोबत येताच बोर्डींग कंप्लीटेड ची घोषणा झाली आणि खऱ्या अर्थाने सहलीचा श्रीगणेशा झाला. 

एखादा कैदी तुरुंगातून सुटल्यावर त्याला जो आनंद होतो, अगदी तसाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता आणि त्याला कारणही तसेच होते. रोजच्या त्याच त्याच दैनंदिनीला रामराम ठोकत आज सर्व मोकळा श्र्वास घेत होते‌. प्रवासात विरंगुळा म्हणून पोर्टेबल डिजे, माईक सोबत घेतला असल्याने मनोरंजनाच्या बाबतीत आम्ही निश्चिंत होतो.बसने नागपुरची वेस ओलांडताच मित्रांच्या उत्साहाला उधाण आले. बसमध्ये कवी, गायक, शायर, गझलगायक आणि मिमिक्री करणाऱ्यांचे वारेमाप पिक आले. प्रत्येकजण व्यक्त होऊ पाहत होता. वय, व्यवसाय, डिग्रीची कृत्रिम लक्तरे आपोआप गळून पडू लागली. त्यातच आमची यंग ब्रिगेड संपूर्ण जोशात असल्याने बाकींनी आवरते घेत डीजे संगीताला प्राधान्य दिले. डीजेचा आवाज बसमध्ये घुमू लागताच बहुतेकांना जाग्यावर बसणे मुश्किल झाले आणि कुणी मधल्या मोकळ्या जागेत तर कुणी जागा मिळेल तिथे डीजेच्या तालावर थिरकू लागले. नाच संगीताच्या या धुंदीत एक सव्वा तास कसा निघून गेला ते कळलेच नाही आणि आमचा पहिला पाडाव असलेल्या सावनेरला आमच्या जेष्ठ मित्राकडे चहापाण्यासाठी थांबलो, जे साक्षात दानशूर कर्णाचे अवतार आहेत.

वास्तविकत: काळ बदलला, वेळ बदलली परंतू कृष्णसुदाम्याची मैत्री आजही कायमच आहे. अर्थातच सुदाम्याचे पेटेंट आमच्याकडे असल्याने कुठे आणि कधीही खिशात हात टाकायची फारशी गरजच भासत नाही. त्यातल्या त्यात सावनेर म्हटले की इथे विश्रांती आणि पोटपुजेची व्यवस्था हमखास होत असल्याने आम्ही सर्व निश्चिंत होतो. इथे सुदाम्याच्या पोह्याची जागी नागपुरी तर्री पोह्याने घेतली एवढाच काय तो बदल झाला असावा. अन्न हे जरी पुर्णब्रह्म असले तरी नागपुरकरांसाठी सावजी तर्री पोहे हेच पुर्णब्रह्म मानले जाते. एव्हाना पोटात कावळे ओरडत होते आणि आमच्यासमोर पंचपक्वानाच्या रूपात निरनिराळे खाद्यपदार्थ वाट बघत होते. फारसे आढेवेढे न घेता आम्ही सर्वांनी बटाटेवडे, चिवडा, समोसा, कचोरी, लाडू, जिलेबी यांच्यावर येथेच्छ ताव मारत तृप्ततेची ढेकर देत पुढच्या प्रवासाला निघालो.

महाराष्ट्राची सिमा ओलांडताच आमची बस मध्यप्रदेशातील नाक्यावर परमीटसाठी अडवण्यात आली. खरेतर सात दिवस आधीच प्रवासाचा मार्ग आणि दिवस ठरवुनही बसचे परमिट काढलेच गेले नव्हते. बस आॅपरेटरच्या दिरंगाईचा फटका आम्हाला बसला आणि जवळपास दिड तास तिथे आम्हाला खोळंबून रहावे लागले. अखेर दंडाची रक्कम भरताच बसने पुन्हा धावने सुरू केले. गांधीजी नेहमी म्हणायचे भारताचे खरे रूप बघायचे असेल तर खेड्याकडे बघा. मात्र सध्या वाहतुकीच्या सोयीसाठी गाव, खेडे आणि शहरांना टाळून बायपास मार्ग तयार होत असल्याने प्रवासात दिसणारे गावखेडे रुपी भारताचे दर्शन कमी होत चालले आहे. तरीपण सावनेर नंतर सौंसर, परासीया सारखी महत्त्वाची गावे न्याहाळत आमचा प्रवास सुरु होता. संध्याकाळ होताच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि हवेत आणखी गारठा जाणवायला लागला. जवळपास सातच्या सुमारास आम्ही आमच्या नियोजीत स्थळी म्हणजेच भव्यदिव्य अशा सिरेंडीपिटी लेक ॲंड रिसोर्ट ला पोहोचलो.
क्रमश:,,,,,
***************************************
दि. २५ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...