Monday, October 30, 2023

जानेमन तुम कमाल करते हो!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *जानेमन तुम कमाल करते हो!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
जवळपास एक वर्षापूर्वी टी ट्वेंटी विश्वचषक २०२२च्या उपांत्य लढतीत इंग्लंडने टीम इंडियाचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवला होता. अर्थातच रोहीत ॲंड कंपनीला हा हिशोब चुकता करायला या एकदिवसीय विश्वचषकात नामी संधी चालून आली आणि त्यांनी त्या पराभवाचा पुरेपूर वचपा काढला आहे. इंग्लिश संघाच्या दहा विकेट्स घेत भारतीय संघाने तब्बल शंभर धावांनी बटलर कंपनीला सडेतोड उत्तर दिले आहे. बॅझबॉलच्या गुर्मीत वावरणाऱ्या इंग्लिश संघाला अवघ्या १२९ धावांत नेस्तनाबूत करत टीम इंडियाने आपला बदला पुर्ण केला आहे. 

झाले काय तर लखनौची खेळपट्टी अत्यंत नखरेल होती. विशेषतः गोलंदाजांच्या प्रेमात होती तर फलंदाजांना चकवणारी होती. बॅकफूट असो फ्रंट फूट, फलंदाजांना दोन्ही जागी डोळे फाडून संयम राखून फलंदाजी करणे अपेक्षित होते. त्यातच इंग्लिश संघाचे वेगवान असो की फिरकी गोलंदाज असो, टिच्चून गोलंदाजी करत असल्याने फलंदाजांची अवस्था माय जेवू घालत नाही, बाप भीक मागू देत नाही अशी होती. त्यातही आतापर्यंतच्या पाच सामन्यात धावांचा पाठलाग केल्याने पहिले लक्ष्य निर्धारित करणे थोडं अवघडच होतं. ज्याप्रकारे ख्रिस वोक्सने शुभमनला उडवले ते पाहता आपल्या संघाची दहीहंडी लवकरच फुटेल अशी शंकेची पाल चुकचुकली होती आणि झालेही तसेच.

या स्पर्धेत अजेय योद्धा म्हणून नावलौकिक असलेल्या विराटची धावबंदी करताच तो हाराकिरी करून बसला. भारतीय संघाची सध्या चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हा सर्वात कमजोर बाब आहे. आतापर्यंत आपण आलू से सोना ऐकले होते पण श्रेयस अय्यर कडे पाहता सोन्या सारख्या संधीचे माती करण्याचे श्रेय त्याला नक्कीच द्यावे लागेल. श्रेयसने आखूड टप्प्याच्या चेंडूवर हुकूमत नाही गाजवली तर छोटी हाईट बीग फाईट असलेला ईशान किशन कधीही त्याला खो देऊ शकतो. ४० धावांत तीन बाद ही खरोखरच वाईट स्थिती होती. मात्र अनुभवी रोहीत, राहुलने धीरे धीरे स्कोअर को बढाना है, हद से गुजर जाना है चालू केले होते.

दोघांनी ९१ धावांची बहुमूल्य भागिदारी केली मात्र समोर विली दिसताच राहुलचा संयम सुटला. विलीच्या चेंडूने थोडी उसळी घेताच राहुल फसला. केवळ सहा फलंदाज असल्याने भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र पुन्हा एकदा रोहीतने सूर्यासोबत २५ धावा जोडत आशा पल्लवीत केल्या होत्या. एकेक मोती गळत असतांना रोहीतने कर्णधाराची खेळी करताना संयम आणि साहसी फलंदाजीचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. रोहीत शतकाला गवसणी घालेल असे वाटतांनाच त्याची घालमेल झाली आणि तो परतला. एव्हाना सूर्या स्थिरावला होता आणि जडेजा सोबत कमीतकमी अडीचशेचा टप्पा गाठून देईल असे वाटत होते. मात्र जडेजा बाद झाला आणि मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य लोप पावले. अखेर सूर्याने मावळण्याच्या पहिले कमालीची फलंदाजी करून आपल्या पाठीराख्यांच्या जीवात जीव आणला.

पन्नास षटकांत २३० धावा आणि ते सुद्धा फलंदाजीत प्रचंड खोली असलेल्या इंग्लिश संघाविरुद्ध म्हणजे ऊंट के मुंहमे जीरा सारखे होते. त्यातही भारतीय संघाला जुना बदला घेऊन, किसी दिन ये तमाशा मुस्कूरा कर हम भी देखेंगे हे दाखवायचे होते. मात्र २३० धावांची राखण करणे म्हणजे नंगा नहायेंगा क्या और निचोडेंगा क्या सारखे कठीण होते. समाधानाची बाब म्हणजे ढालगज बुमराह आणि शार्प शुटर शमी सध्या तुफान फॉर्मात असल्याने कांटे की टक्कर होण्याची शक्यता होती.  खरेतर मो. शमी आणि कुलदीप यादव हे दोघेही मुल्यवान परंतु उपेक्षितच होते. मात्र या दोघांनी जबरदस्त कमबॅक दाखवत आपली निवड सार्थ ठरवली होती.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने कोणतीही दयामाया न दाखवता हल्ले सुरू केले होते. विशेषतः सिराजला त्यांनी लक्ष केले. पण पाचव्याच षटकांत बुमराहने इंग्लिश संघाचा पाया खचवला. खतरनाक डेव्हिड मलान आणि जो रूटला मुळापासून उपटून त्याने आपल्या संघाला झक्कास सुरुवात दिली. लगेच रोहीतने आपल्या निर्णय क्षमतेची चुणूक दाखवत मो.शमीला आक्रमणाला लावले. कारण रोहीत जाणून होता, मधुबन खुशबू देता है और शमी विकेट लेता है. शमीने सध्या जी यष्ट्यांची तोडफोड चालवली आहे ते पाहता तो मागच्या जन्मी लाकूडतोड्या असल्याची खात्री पटते. त्याने इंग्लिश संघाचा कणा असलेल्या बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टोला आपल्या धारदार, वेगवान गोलंदाजीने कापून काढले. चार बाद एकोणचाळीस धावसंख्या असतांना कुलदीप आला आणि जोस बटलरचा त्याने घास घेतला. ज्याप्रकारे कुलदीपने तो चेंडू वळवला ते पाहता जशी  मावळत्या उन्हांत केवड्याच्या वनांत नागीण सळसळली असे म्हणावेसे वाटते.

अवघ्या बावन्न धावांत अर्ध्या इंग्लिश संघाचा खुर्दा उडवत भारतीय संघाने सामन्यावर जबरदस्त पकड घेतली होती. मात्र अजूनही त्यांच्याकडे मोईन अली, लीयम लिविंगस्टोन, वोक्स, रशीद खान आणि वुड सारखे अष्टपैलू खेळाडू असल्याने आपल्या गोलंदाजांना उसंत घेऊन चालणार नव्हते. पण अर्धा संघ तंबूत परतल्याने इंग्लिश संघाचा धीर खचला होता‌. तसेच शमी, जडेजा, कुलदीप आणि बुमराहने नाड्या आवळल्याने इंग्लिश संघाची तडफड वाढली होती. मुख्य म्हणजे त्यांचा कोणताही फलंदाज धावांची तिशी गाठू शकला नाही. केवळ तीस धावांच्या दोन भागिदाऱ्या इंग्लिश संघाला तारू शकल्या नाहीत.

टीम इंडियाची या विश्वचषकात वाटचाल पाहता गोलंदाजांची कामगिरी नजरेत भरणारी आहे. जेंव्हा जेंव्हा बळींची गरज भासली तेव्हा तीळा तीळा दार उघड सारखे आपल्या गोलंदाजांनी बळी घेत विजयाचे दार उघडून दिले आहे. गोलंदाजांच्या प्रयत्नांना यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलचे योगदान विसरता येत नाही. क्षेत्ररक्षणाचे काही अपवाद वगळता बरीच सुधारणा झाली आहे. या सामन्यात सूर्याची बॅट तळपल्याने दोनशेचा टप्पा सहज ओलांडला गेला. मात्र शुभमन, विराट, श्रेयस आणि राहुलने महत्वाच्या क्षणी बेजबाबदार फटके मारल्याने संघ अडचणीत आला होता. अखेर फलंदाजांच्या चुकांवर पांघरूण घालत आपल्या गोलंदाजांनी सामना इंग्लंडच्या जबड्यातून खेचून आणला आहे. निश्चितच या सामन्यातील आपल्या गोलंदाजांची नेत्रदीपक कामगिरी पाहता, जानेमन तुम कमाल करते हो असे म्हणावेसे वाटते.
*********************************
दिनांक ३० ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, October 23, 2023

आज ब्ल्यू है शमी शमी!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *आज ब्ल्यू है शमी शमी!*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या एकविसाव्या सामन्यात यजमान टीम इंडियाने चिवट किवींचा प्रतिकार मोडून काढत आपला सलग पाचवा विजय नोंदवला आहे. २००३ पासून आयसीसी स्पर्धेत सातत्याने भारतीय संघाला छळणाऱ्या किवींना मो.शमी आणि विराटच्या भीमपराक्रमाने लोळवले आहे. जवळपास वीस वर्षे म्हणजे बीस साल बाद टीम इंडियाने गत पराभवांचा पुरेपूर वचपा काढला असून अंकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या स्पर्धेत प्रथमच गोलंदाजी आणि फलंदाजीत आपल्या संघाचा कस लागला असून न्युझीलंड चे कठीण गणित सोडविण्यात टीम इंडिया अखेर यशस्वी झाली आहे.

झाले काय तर एरवी दुहेरी मालिकेत गरीब गाय असणारा किवी संघ आयसीसी लढतीत आपल्या संघाला नेहमीच शिंगावर घेत वरचढ होत होता. दुहेरीत शांती आणि आयसीसी स्पर्धेत क्रांती करत किवी अक्षरशः डोक्यावर बसले होते. एकवेळ बर्म्युडा ट्रॅंगल चे रहस्य चुटकीसरशी सुटेल परंतु किवीजचा गुंता सोडवायला चांगलेच नाकी नऊ येत होते. बरेचदा अगदी हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास किवींनी हिसकावला होता. काही केल्या किवी विरूद्ध टीम इंडियाची खुलता कळी खुले ना अशी स्थिती झाली होती. त्यातही मैदान बदलले, संघ खेळाडू बदलले मात्र किवीं विरूद्ध इक रुत आए इक रुत जाए, मौसम बदले ना बदले नसिब अशी आपली वाईट परिस्थिती होती. हा संघ आपल्या साठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसला होता.

अखेर किवींच्या दुष्टचक्रातून सुटका होण्यासाठी धर्मशाळेचे मैदान सजले होते आणि रोहीतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. बहुदा दवबिंदू, निव्वळ पाच गोलंदाज आणि खेळपट्टीच्या ताजेपणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असावा. प्रारंभीच  सिराज आणि मो.शमी ने भन्नाट सुरूवात करून कर्णधाराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पण शमीच्या गोलंदाजीत जडेजाने रचिनचा झेल सोडत सोप्पा पेपर कठीण करून टाकला. या जीवदानाचा फायदा घेत त्याने मिचेलला सोबत घेत आपल्या गोलंदाजांना नाच नाच नाचविले. ना फिरकी, ना वेगवान गोलंदाजांना काही सुचेना. भरीस भर म्हणून खतरनाक फलंदाज मिचेलला बुमराहने सत्तरीत शतायुषी होण्याचा आशिर्वाद देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. 

दोन्ही संघासाठी तिसाव्या षटकापर्यंत आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. किवींना धावांचा खुराक वाढवायचा होता तर आपल्या संघाला विकेटचा बुस्टर डोझ हवा होता. दोन्ही किवी फलंदाज गुप्तधनावर कुंडली मारून बसलेल्या नागोबा सारखे खेळपट्टीवर तळ ठोकून बसले होते. आपल्या गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती, झेल पकडल्या जात नव्हते, चांगला खेळ करूनही गोलंदाजीत कमावलं डिआरएस मध्ये गमवावं लागत होतं. भारतीय चाहत्यांचा जीव अगदी मेतकुटीला आला होता. कोणीतरी यावं आणि आपल्या संघासाठी तेरी जुल्फ फिर सवारूं, तेरी मांग फिर सजादूं, कोण करणार असा प्रश्न पडला होता.

शेवटी या ट्रॅफिक जाम मधून टीम इंडियाला सहीसलामत काढण्याचा विडा मो. शमी ने उचलला. झुंजार फलंदाजी करणाऱ्या रचिनला गील कडून झेलबाद करत शमीने आज ब्ल्यू है शमी शमी ची झलक दाखवली. लगेचच पहिल्या स्पेलमध्ये दणके खाल्लेल्या कुलदीपने लॅथम, फिलीप्सचा काटा काढला. किवीचा अर्धा संघ बाद होऊनही खेळपट्टीवर डॅरेन मिचेल नावाचा मोठा अडथळा बाकी होता. एकतर तो सेट फलंदाज होता त्यामुळे किवी तीनशे चा टप्पा ओलांडण्याची भीती होती. मात्र सतत चार सामने अडगळीत टाकलेल्या मो‌.शमी सोबत त्याचा सामना होता. मो.शमीने  किवी कुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ पाडणार नाही याची आठवण ठेवत तब्बल पाच फलंदाजांची कत्तल केली. सॅंटनर व चॅपमनच्या दांड्या गुल करत शमीने त्याला संघाबाहेर ठेवणाऱ्यांना आरसा दाखवून दिला. 

खरेतर पाऊने तीनशेचे लक्ष्य सध्याचा टीम इंडियाचा फॉर्म पाहता मुश्किल नक्कीच नव्हते. तरीपण किवींची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहता बस युं गये और युं आए असे अजिबात नव्हते. समाधानाची बाब म्हणजे रोहीतचा दे दणादण ॲप्रोच संघासाठी वरदान ठरत आहे. आपली सुरुवातही झकास झाली होती. मुख्य म्हणजे किवींचा तापदायक गोलंदाज ट्रेंट बोल्ट फारसा प्रभावी ठरला नाही परंतु मॅट हेन्री ने बरीच चकवाचकवी केली. खरी गंमत आणली लॉकी फर्ग्युसनने. तुफानी वेग, आखूड टप्प्याचे चेंडू, त्यातही कधी बळी, कधी धावांचा रतीब. थोडक्यात काय तर प्यार लो प्यार दो गोलंदाजी.

लॉकीने सलामीवीरांना गटकवताच मैदानावरील पारा वाढू लागला होता. रोहीतने पाय न हलवता ऑफ बाहेरील चेंडू यष्ट्यांवर ओढून घेतला तर गील अप्पर कटचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर ने चांगल्या खेळीची कशी माती करायची हे दाखवून दिले. आखूड टप्प्याचा चेंडू त्याची दुखरी नस ठरत आहे. केवळ श्रेयसच कशाला, के एल राहुल आणि सूर्यकुमार ने सामना एकतर्फी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पुन्हा एकदा मैदानात वद जाऊ कुणाला शरण स्थिती निर्माण झाली आणि त्याचे एकमेव उत्तर होते,, विराट कोहली. वास्तविकत: विराटची खेळी, त्याचे सामना वाचवण्याचे कौशल्य आणि दृढ निर्धार पाहता असा खेळाडू निर्माण होत नसतो तर नियती मुद्दाम जन्माला घालत असते असे वाटते.

विराटने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पुन्हा एकदा टीम इंडियाची गाडी रूळावर आणली. संपूर्ण खेळीत केवळ आणि केवळ जिंकण्याची वृत्ती त्याला इतरांपासून महान बनवते. त्याला लयात बघून सुंदर ते ध्यान उभे विकेटवरी असे म्हणावेसे वाटते. विराटने ९५ धावांच्या खेळीत श्रेयस, राहुल आणि जडेजा सोबत महत्वपूर्ण अशा अर्धशतकी भागिदाऱ्या केल्या. जोपर्यंत विराट खेळपट्टीवर होता तोपर्यंत भारतीय चाहते निश्चिंत होते. मात्र बांगलादेश आणि या सामन्यात त्याला शतकाची मोहिनी पडू लागल्याचे दिसून येते. अर्थातच त्यात वावगे काहीच नाही. मात्र विराट शतक करतो काय अथवा नव्वदीत बाद होतो, यापेक्षा त्याचा सामन्यातील ॲप्रोच पाहण्यासारखा असतो. जडेजाने विराटला उत्तम साथ देत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची दक्षता घेतली.

थोडक्यात काय तर हा सामना सुद्धा आपल्या गोलंदाजांनी खेचून आणला आहे. आपल्या फलंदाजांना आवाक्यातले टार्गेट देऊन गोलंदाजांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. तर किवींनी फलंदाजीत जो फायनल टच हवा असतो, तो देण्यात ते कमी पडले. विशेषतः डॅरेल मिचेल नव्वदीत असताना शतकासाठी थबकला आणि रनरेटचा चोथा करुन बसला. शिवाय इतर फलंदाजांना हाताशी घेऊन तो संघाला तीनशे पार नेऊ शकला नाही.  मॅट हेन्री आणि थोड्याफार प्रमाणात सॅंटनर वगळता इतर किवी गोलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. काहीही असो, हा सामना बघून भारतीय क्रिकेट रसिक नक्कीच म्हणत असतील,,,
इसी खुशी को ढुंढ रहे थे, यही आजतक नहीं मिली!
आज से पहले, आज से जादा खुशी आज तक नहीं मिली!
**********************************
दिनांक २३ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Sunday, October 15, 2023

रुणुझुणु रुणुझुणु रे बुमराह!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *रुणुझुणु रुणुझुणु रे बुमराह*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या बाराव्या सामन्यात यजमान टीम इंडियाने पाकचे बारा वाजवत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. रोहितचे कल्पक नेतृत्व, त्याचा आपल्या गोलंदाजांवर असलेला विश्वास आणि गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्याने पाक संघाची डाळ शिजली नाही आणि ते मानहानीकारक पराभवाचे धनी ठरले आहेत. आयसीसी विश्वचषकात सतत आठव्यांदा पाक ची नांगी ठेचण्यात टीम इंडिया यशस्वी झाली आहे. भारतीय गोलंदाजांत,, विशेषतः सिराज बुमराह जोडीने पाक फलंदाजांना गुमराह करत आज कुछ तुफानी करते है हे दाखवून दिले आहे.

झाले काय तर क्रिकेटची कोणतीही लढत असो, भारत पाक लढतीची बरोबरी कोणत्याही इतर दोन संघांच्या लढतीशी करू शकत नाही. खरेतर हा एक साखळी सामना होता परंतु या सामन्याला अंतिम सामन्यापेक्षाही जास्त वलय प्राप्त झाले होते. त्याला कारणही तसेच आहे. प्रत्येक लढत जणुकाही धर्मयुद्धाच्या नजरेत लढणारे आणि विजय झाल्यास जगातल्या कानाकोपऱ्यातील आपल्या धर्म बंधूंना विजय अर्पण करण्याच्या कळलाव्या मानसिकतेने या सामन्यात पाकच्या चिंधड्या उडणे जणुकाही विधिलिखित होते असे वाटते. वास्तविकत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्ध, हल्ले याचा क्रिकेटशी काय संबंध? पण आगळीक ना करतील तर ते पाक खेळाडू कसले,, आणि याच कारणांमुळे पाकच्या पराभवाची तमाम क्रिकेटप्रेमी तेरा करु गिन गिन के इंतजार प्रमाणे वाट बघत होते.

दोन्ही संघाचे बलाबल बघता भारतीय संघ निश्चितच वरचढ होता, त्यातही मायदेशात, आपल्या प्रचंड पाठीराख्यांच्या साक्षीने खेळणे म्हणजे सोने पे सुहागा होते. भरीस भर म्हणून गत टी ट्वेंटी विश्वचषक असो की नुकताच पार पडलेला आशिया चषक असो, रोहित ॲंड कंपनीने पाक गोलंदाजांचे उठता लात बसता बुक्कीने स्वागत केल्याने आपल्या फलंदाजांत कमालीचा आत्मविश्वास भरला होता. तर गोलंदाजीत कधी नव्हे इतकी विविधता आज आपल्या संघात बघायला मिळत आहे. सिराज बुमराह जोडीला जडेजा कुलदीपच्या फिरकीने कळस चढवला आहे. तर हार्दिक पांड्या आपल्या मायावी गोलंदाजीने भाव खाऊन जातो. मार खाणार पण बळी मिळवून देणार हा त्याचा स्वभावधर्म!

राहिली बाब पाक संघाची तर फलंदाजीत ते सर्वस्वी बाबर रिझवान जोडीवर अवलंबून असतात. निश्चितच त्यांच्या इतर फलंदाजांना कमी लेखून चालणार नाही परंतु सामन्यात फलंदाजीची लय राखण्याइतपत ते सक्षम वाटत नाही. वैयक्तिक शतके झळकावणे आणि डावाची मांडणी करणे वेगळं. तर गोलंदाजीत कभी खुशी कभी गम असते. ज्यादिवशी शाहिनशहा आफ्रिदी चालला, स्वींग, सीम ची कवकुंडले त्याला लाभली की तो टॉप ऑर्डरचा खिमा करुन टाकतो. मात्र प्रारंभी त्याने विकेटची बोहणी नाही केली तर पाकची गोलंदाजी दारिद्र्य रेषेखालील वाटते. आफ्रिदीचा सहकारी, हॅरीस रौफचा कधीच खौफ वाटत नाही. त्याच्या वेगाला फलंदाज भीक घालत नाही. भरीस भर म्हणून पाकचे क्षेत्र रक्षण गचाळ आणि मनोरंजनात्मक असते.

नाणेफेक जिंकून रोहीतने बाबर ॲंड कंपनीला फलंदाजी दिली.  पाकने सावध, संतुलित सुरूवात केली. खेळपट्टी संथ आणि कमी उसळी ची होती. फुल लेंथ टाकून स्वींग, सीमची अपेक्षा करणे व्यर्थ होते. नेमके हेच हेरून बुमराहने आपली लाईन आणि लेंथ लगेचच ॲडजस्ट केली मात्र सिराजला थोडा वेळ लागला. सोबतच पाकची सलामी जोडी आठव्या षटकांत पोहचल्याने रोहितची चिंता वाढली होती. सिराजला चौकार पडत असले तरी रोहीतने त्याच्यावरचा विश्वास पडू दिला नाही. अखेर सिराजने कोंडी फोडत अब्दुल्ला शफीकला पायचीतात पकडले आणि भारतीय संघाने सुटकेचा निःश्वास टाकला. शफीकच्या बळीने हुरूप चढलेल्या आपल्या गोलंदाजांनी दबाब वाढवत इमानुल हक ला चुक करण्यास भाग पाडले. 

०२ बाद ७३ पासून बाबर रिझवान जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातच्या मिठाला जागत हे दोघेही अहिंसेचे पुजारी निघाले. दोघेही पन्नाशीत पोहचले परंतु विना षटकार! जणुकाही गुजराती पाहुणचाराने गदगदून जात त्यांनी दिनमे चले ढाई कोस सारखी फलंदाजी केली. ना धावगतीचा ते टेम्पो सेट करू शकले ना भारतीय गोलंदाजीचा दबाब झुगारू शकले. मात्र ही जोडगोळी कधीही स्फोटक होऊ शकते यात वाद नव्हता. त्यातही रिझवानची तडफड पाहण्यासारखी होती. दोन्ही संघाच्या घशाला कोरड पडली होती, पाक संघ ना वेगाने धावा करू शकत होता तर भारतीय संघ बळीसाठी व्याकूळ झाला होता. मात्र इथे पुन्हा एकदा सिराज संकटमोचक ठरला. विशेष फुटवर्क नसल्याने बाबर सिराजच्या लाईन लेंथच्या नेटवर्कला फसला. सिराजने बाबरच्या चिपळ्या वाजवत भारतीय संघासाठी फ्लड गेट्स मोकळे केले.

बाबरचा काटा निघताच पाक संघाने मागेल त्याला विकेट योजना चालू केली. आतापर्यंत घाम गाळणाऱ्या कुलदीपची तपश्चर्या फळाला आली. त्याने ३३ व्या षटकांत डबल धमाका करत सौद शकील, इफ्तिकार अहमदला नारळ दिला. पाकचा अर्धा संघ गारद झाला तरी रिझवान मैदानावर पाय रोवून उभा होता. त्यामुळे रोहीतला त्याचा हुकमाचा एक्का म्हणजेच बुमराहला पाचारण करावे लागले. यावेळी पाकवर निर्णायक हल्ला करत पाकला नेस्तनाबूत करणे गरजेचे होते आणि बुमराह साठी जुना चेंडू अल्लाऊद्दीनच्या जादुई दिव्यापेक्षा कमी नव्हता. त्याने ज्याप्रकारे रिझवान, शादाब खानला उडवले ते पाहता तो मागच्या जन्मी नक्कीच जादुगार असावा असे वाटते. चेंडू कधी आत कधी बाहेर, कधी वेगात तर कधी हळूवार सोडत त्याने पाकच्या मुळावर घाव घातले.

उर्वरित फलंदाजांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम प्रामाणिकपणे केले. त्यात पांड्या आणि जडेजाने आपली गंगाजळी भरून घेतली. खरेतर पाक असो की ऑस्ट्रेलिया, दोन्ही संघांविरुद्ध आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्याची दोनशे ची पावती फाडून आपल्या फलंदाजांना फारकाही कष्टाचे काम बाकी ठेवले नव्हते. अर्थातच दोनशेच्या आतले लक्ष्य भारतीय संघासाठी धडकी भरवणारे नक्कीच नव्हते. फक्त उत्सुकता होती पाकची गोलंदाजी कशीकाय प्रतिकार करणार याची. मात्र खेळपट्टी जागते रहो, मेरे भरोसे मत रहो सारखी असल्याने पाक गोलंदाजांना निव्वळ घाम गाळून नव्हे तर डोकं चालवून गोलंदाजी करायची होती. आफ्रिदीने आपले जुने शस्त्र फुल लेंथ गोलंदाजी करून पाहिली परंतु रोहीतने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट करून टाकले. प्रचंड ताकद आणि अचूक टायमिंगने रोहीतने पाक गोलंदाजांची धुलाई केली. ना आफ्रिदी चालला, ना रौफ ना हसन अली. 

सामन्याचा थोडक्यात आढावा घेतो म्हटले तर रोहीतने गोलंदाजांचा कल्पकतेने वापर करत पाकचे नाक दाबून ठेवले होते. विशेषतः सिराजला चौथे षटक देणे असो की बाबरसाठी पुन्हा आक्रमणाला लावणे असो. त्यातही रोहीतने कुलदीपला एका टोकाला बांधून ठेवत पाक फलंदाजांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही. आपल्या दोन्ही फिरकीपटुंनी विकेट टू विकेट गोलंदाजी केल्याने पाक फलंदाजी संथावली होती. मात्र खरी मजा आणली ती बुमराहने. त्याची उत्तम लाईन लेंथ सिराजसाठी मार्गदर्शक तत्वे ठरली‌ होती. गोलंदाजी सुद्धा प्रेक्षणीय असते हे बुमराहने दाखवून दिले. जुन्या चेंडूने नवीन कल्पना करत सेट झालेल्या रिझवानचा आणि शादाब खानचा बोल्ड काढणे यासाठी कमालीची हुशारी, कौशल्य लागते आणि ते बुमराहने दाखवून दिले. आपल्या पाच गोलंदाजांना प्रत्येकी दोन बळी जरी मिळाले असले तरी यामागे अदृश्य हात बुमराहचा आहे‌ त्याने संपूर्ण सामन्यात फलंदाजांना दबावात ठेवत इतर गोलंदाजांचे काम सोपे केले. अर्थातच या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. मोठा गाजावाजा झालेल्या पाक संघाचा टीम इंडियाने धुव्वा उडवत मिशन वर्ल्डकप २०२३ मध्ये आणखी एक यशस्वी टप्पा पार पाडला आहे.
*********************************
दि. १५ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Tuesday, October 10, 2023

जिया धड़क धड़क जाए

‌@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *जिया धड़क धड़क जाए!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*******************************
२०११ ला प्रदर्शित बॉडीगार्ड चित्रपटात सलमानचा एक संवाद आहे, मुझपे एक एहसान करना, मुझपे कोई एहसान मत करना! खरेतर भारत ऑस्ट्रेलिया लढतीला हा संवाद समर्पक ठरतो. झाले काय तर केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षण सुद्धा एखाद्या लढतीचे रूप कसे पालटू शकते याचे जिवंत उदाहरण या लढतीत दिसले. मिचेल मार्श ने विराटला दिलेलं जीवदान कांगारूंचा गळा घोटण्यास पुरेसं ठरलं. भावनांचा आणि धावांचा भुकेला असलेल्या क्रिकेट मुरारी, विराटने पुन्हा एकदा त्याला चेस मास्टर का म्हणतात हे दाखवून दिले.

सध्याच्या विश्वचषकात ज्याप्रकारे ३५० ते ४०० धावांचा टप्पा पार पाडला जात आहे ते पाहता टीम इंडियाला २०० धावा म्हणजे सोप्पा पेपर होता. मात्र ऑस्ट्रेलिया संघ हा कष्टकऱ्यांचा संघ आहे, श्रममेव जयते हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. या मुळ प्रवृत्तीला जागत ते भारताला विना कष्टाचे जिंकू देणार नाही हे निश्चित होतं. पण  प्रारंभीच एवढी दाणादाण उडवतील असं वाटलं नव्हतं. आपल्या तीन गडी बाद दोन धावां, हे ऐकून आत्ताही कंठ दाटून येतो. त्यातही ईशान किशन आणि श्रेयसची आगळीक अक्षम्य आहे असेच वाटते. राहिली बाब रोहितची तर तो चेंडू कहांसे आया था वो, छू के हमारे दिल को कहा गया उसे ढुंढो सारखा होता.

अर्थातच मैदानावर परिस्थिती गंभीर होती, विराटच्या साथीला राहुल होता. सततच्या अपयशाचे डाग पुसून काढण्यास राहुल उत्सुक होताच. तसेही राहुलला लग्न मानवले दिसते, त्याचे प्रतिबिंब त्याच्या सुधारलेल्या फलंदाजीत सध्या दिसत आहे. या दोघांनीही अनावश्यक दबाव न घेता, न कुंथता कायमचुर्ण घेतल्यासारखे सरळसोट कसोटी स्टाईल फलंदाजीला प्राधान्य दिले. मात्र चितलं ते घडत नाही. एक सरप्राइज बाऊंसरने विराटला चुकवले आणि करोडो क्रिकेट रसिकांचा श्र्वास क्षणांसाठी थांबला होता. मात्र ॲलेक्स कॅरी आणि मिचेल मार्शने पहले आप, पहले आप करत विराटवर एहसान केले. वास्तविकत: तो झेल कांगारूंसाठी तू जो मिला, हो गया सब हासील सारखा होता. विचार करा ०४ बाद २० धावा हे किती वेदना दायक चित्र असतं.

सामन्याचा दबाव काय असतं हे त्यावेळी दिसून आले. यानंतर मात्र हळूहळू कांगारूंची सामन्यावर पकड सैल होत गेली. विराट चे फ्लिक आणि राहुलच्या कव्हर ड्राईव्हने सामन्यात रंग भरला. भरीस भर म्हणून खतरनाक गोलंदाजी करणाऱ्या हेझलवूडला आक्रमणातून हटवल्याने कांगारूंची धार बोथट झाली. इथेच पॅट कमिन्स रणनीतीत चुकला. झॅम्पा नावाच्या ॲडम्सला कमिन्स ने आणले परंतु राहुलने त्याला चौकारांची झप्पी देत त्याची हवा काढून टाकली. राहुलने या सामन्यात आपल्या क्लासी फलंदाजीचे दर्शन दिले. ज्याप्रकारे सामन्याच्या प्रचंड दबावाला झुगारत आपल्या दोन्ही फलंदाजांनी डोके शांत ठेवून फलंदाजी केली ते पाहता या दोघांनी चेन्नईत बर्फाचा होलसेल व्यापार सुरू करायला हरकत नाही.

लढत जवळपास भारताकडे झुकल्यावर कमिन्स ने परत एकदा हेझलवूडला आणले मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. चेंडू सॉफ्ट झाला होता, लक्ष्य किरकोळ उरले होते, इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले होते. दांत आणि नखं नसलेला हेझलवूड शुद्ध शाकाहारी गोलंदाज वाटत होता. केवळ उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून त्याला विराटचा बळी मिळाला मात्र तोपर्यंत हत्ती गेला आणि शेपूट उरले होते. त्यातही क्लासी राहुलची फलंदाजी आणखी यौवनात आली होती. सोबतच कुंगफू पांड्या असल्याने कांगारूंना या विश्वचषकात विजयारंभ करता आला नाही. टीम इंडियाचं घोडं या सामन्यात न्हालं असलं तरी आपल्या गोलंदाजांनी पुर्वार्धात केलेल्या कामगिरीला विसरता येणार नाही.

नाणेफेक जिंकून कांगारूंचे फलंदाजीचे स्वप्न बुम बुम बुमराहने लवकरच भंग केले होते. त्याने मार्शला टाकलेल्या चेंडूने अगदी नागासारखा फणा काढत बॅटला दंश केला आणि उर्वरित काम विराटने अफलातून झेल घेत पुरे केले. तरीपण वॉर्नर आणि स्मिथने अस्सल कांगारू बाणा दाखवत चिवट फलंदाजी केली. मात्र भारतीय फिरकीची भानामती ते पचवू शकले नाही. हाथोडा छाप फलंदाजी करणारा वॉर्नर अखेर कुलदीपला शरण गेला. यानंतर सर जडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावून आले. जडेजाच्या जादूने स्मिथ सारखा कसलेला फलंदाज चारी मुंड्या चीत झाला. वेग आणि गुडलेंथचा टप्पा जडेजाला बळी च्या बाबतीत मालामाल करून गेला. ज्याप्रकारे जडेजाने स्मिथचा ऑफ स्टंप उडवला ते पाहता स्मिथला आपल्या विकेट पेक्षा सर्वांसमक्ष जडेजाने मामा बनवल्याचे दुःख जास्त झाले असेल.

 लगेचच तिसाव्या षटकांत जडेजाने लाबुशेन आणि ॲलेक्स कॅरी ला घरी पाठवत कांगारूंचा बाजार उठवला. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला कुलदीपने संपवले तर रवी अश्विनने कॅमरून ग्रीन ला. कमिन्स, झॅम्पा आणि स्टार्क ची वळवळ बुमराह, पांड्या, सिराजने संपुष्टात आणली. कांगारूं तर्फे वार्नर स्मिथने ६९ धावांची आणि स्मिथ लाबुशेन ने ३६ धावांची भागीदारी केली. मात्र ५० षटकांच्या सामन्यात अशा भागिदाऱ्या कुचकामी ठरतात.

सामन्याचा आढावा थोडक्यात घ्यायचे झाले तर एक उत्कृष्ट संघाचा राहुल विराटने उत्तम पाठलाग केला असे म्हणू शकतो‌. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंचा दबदबा जगजाहीर असूनही ऑस्ट्रेलियन संघ एकमेव ॲडम झॅम्पाच्या भरवशावर कसाकाय आला याचे आश्चर्य वाटते. या सामन्यातील यशस्वी गोलंदाज जडेजा आणि हेझलवूड, दोघांनीही गुडलेंथचा टप्पा धरून ठेवत यश मिळवले. भारतीय फिरकीचे त्रिकुट सामन्यागणिक आणखी तिखट होत जाईल यात शंका नाही. मात्र उर्वरित सामन्यात ईशान, रोहीत आणि श्रेयसने ,,'दो मिनट में मॅगी'  पेक्षा जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून चाहत्यांची धडधड वाढणार नाही याची काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे. कारण प्रत्येक वेळी प्रतिस्पर्धी संघाला आपले गोलंदाज दोनशेत गुंडाळतीलच असे नाही.
*********************************
दि. ०९ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...