@#👿👿👿👿👿👿👿👿#@
*तन्हा तन्हा लौटा हूं,भरी महफिलसे!*
*डॉ अनिल पावशेकर*
********************************
कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की तिसऱ्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकण्याचे आपले स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलिया ने सहाव्यांदा हा चषक पटकावला आहे. अत्यंत उत्कंठा लागलेल्या या लढतीत भरवश्याच्या म्हशीला टोणगा झाला आहे. अंतिम फेरीपर्यंत स्वप्नवत कामगिरी करणारा आपला संघ कांगारूंचा चक्रव्यूह भेदू शकला नाही आणि लाखो करोडो देशवासियांना दुःखाचा आवंढा गिळावा लागला आहे. १९८७ पासून क्रिकेट जगतावर दादागिरी दाखवणाऱ्या कांगारूंनी आपल्या लौकिकाला जागत गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही दर्जेदार कामगिरी करत दोन्ही संघांतील फरक दाखवून दिला आहे.
झाले काय तर अंतिम सामना कसा खेळायचा असतो, कसा गृहपाठ करायचा असतो, घेतलेल्या निर्णयाला प्रत्यक्षात कसे उतरवायचे असते याचा संपूर्ण सातबारा काल कांगारूंनी क्रिकेट जगताला दाखवला आहे. अगदी नाणेफेक जिंकून ज्या स्मितहास्याने कमीन्सने क्षेत्ररक्षण पत्करले ते पाहता कांगारूंच्या दृढनिश्चयाची कल्पना येते. काळीसावळी खेळपट्टी आणि दवबिंदू ची शक्यता लक्षात घेत कमीन्सने रोहीत ॲंड कंपनीला फलंदाजीला उतरवले आणि त्यांचा अभ्यास किती पक्का आहे याची जाणीव झाली. अनुभवी मिचेल स्टार्कला फारसे स्वींग, सीम न दिसल्याने कमीन्सने कडेकोट क्षेत्ररक्षणाची तटबंदी उभारली.
फलंदाजांसाठी ऑन,लेग ला सगळा फौजफाटा उभारून आपल्या फलंदाजांची कोंडी केली गेली. नेहमीप्रमानेच रोहीतने हल्ले करत डावाला सुरुवात केली परंतु यावेळी शुभमनने त्याला फारशी साथ दिली नाही. तरीपण रोहीतचे विराटच्या साथीने दे दणादण सुरू होते. इथेच कमीन्सने कल्पकता दाखवत चक्क रोहीतची विकेट विकत घेतली. पार्ट टाइम फसव्या ग्लेन मॅक्सवेलला पाहून रोहीतच्या तोंडाला पाणी सुटले. मात्र मॅक्सवेल नावाची शेळी त्याच्या शिकारीसाठी आणली गेली आहे याचा त्याला विसर पडला. इतर सामन्यात रोहीतने मानवी बॉम्ब होऊन प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे पचले होते. मात्र अंतिम सामन्यात कुठेतरी यावर नियंत्रण ठेवणे किंवा आवर घालणं गरजेचे होते. इथेच रोहीतची गफलत झाली.
मॅक्सवेलच्या षटकांत चौकार षटकार सहीत दहा धावा झाल्या असतांनाही रोहीत पुढे सरसावला आणि संघाला बॅकफूटवर ढकलून गेला. खरेतर कांगारूंना सामन्यात वर्चस्व गाजवण्यास हा क्षण पुरेसा ठरला. कारण यानंतर श्रेयस कधी आला कधी गेला कळलेच नाही. त्यातही केवळ सहा फलंदाज आणि एकमेव अष्टपैलू म्हणून जडेजा असल्याने विराट, राहुलवर दबाव स्पष्ट दिसत होता. या दोघांनीही फलंदाजीत अहिंसा परमो धर्मचा वसा घेतल्याने संघ चिखलात फसला तो त्यातून शेवटपर्यंत बाहेर पडू शकला नाही. एकवेळ बेडकाची शितनिद्रा (हायबरनेशन) लवकर संपली असती परंतु विराट, राहुलची शांत,संयमी, प्युअर व्हेज फलंदाजी काही केल्या टॉप गिअर टाकत नव्हती.
भरीस भर म्हणून कांगारू क्षेत्ररक्षक जणुकाही शिलाजीत खाल्यासारखे मैदानात दम दाखवत होते. तिशीचे लाबुशेन, ट्रॅव्हिस हेड आणि छत्तीसचा वॉर्नर जिंकू किंवा मरू वृत्तीने प्रत्येक चेंडूवर झेपावत होते. हेड ने रोहीतचा जो झेल पकडला तो केवळ आणि केवळ हेडच पकडू शकतो इतका तो कठीण होता, त्यात त्याचे जबरदस्त कमिटमेंट होते. इकडे हेडने रोहीतचा झेल पकडला आणि भारतभर सागरा प्राण तळमळला झाले. भलेही आपले टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज बाद झाले होते परंतु विराट, राहुलच खेळपट्टीवर पंगत मारून बसणं टीम इंडियाच्या अंगलट आलं. या दोघांनीही जवळपास पंधरा षटके ना चौकार हाणला ना षटकार. कांगारूंचा दबाव झुगारून टाकण्यात हे दोघेही अपयशी ठरले. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली परंतु ती वांझोटी ठरली.
दोघांच्याही दिनमे चले ढाई कोस खेळीने ना संघाचा टेम्पो वाढला, ना येणाऱ्या फलंदाजांना आत्मविश्वास राहीला, ना या दोघांना. याच दबावात विराट आपली विकेट गमावून बसला. पॅट कमीन्सने या संपूर्ण स्पर्धेत स्लो बाऊंसर, स्लोअरवन वर बळींची माया जमवली. आपले संघ व्यवस्थापन यावर तोडगा का काढू शकले नाही ते कळायला मार्ग नाही. त्याचीच री जोश हेझलवूडने ओढली. जडेजा काय नी सूर्या काय ,, दोघांनाही कांगारूं गोलंदाज कुक्कल बाळ समजून खेळवत होते. सूर्यासाठी लेगला तटबंदी उभारली आणि चेंडूची गती कमी केली की तो लवकरच मावळतो हे प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चांगले लक्षात आले आहे. रोहीत सोडला तर पांव भारी होना म्हणजे काय असते हे आपल्या फलंदाजांचे फुटवर्क पाहून समजत होते. कांगारूंच्या दडपणाखाली आपले खेळाडू फुटवर्क विसरून गेले होते. पुढे जातो तर बाऊंसर, मागे जातो तर इनर सर्कलचे क्षेत्ररक्षक खाऊ की गिळू करत सिंगल देत नव्हते.
संपूर्ण स्पर्धेत आपली फलंदाजी इतकी हतबल आणि फॅमिली प्लॅनिंग चे ऑपरेशन झाल्यासारखी पाहण्यात आली नव्हती, निव्वळ खेळत होते पण धावा होत नव्हत्या. जणुकाही भारताचा दुय्यम संघ फलंदाजीला उतरला आहे असे वाटत होते. अखेर व्हायचे तेच झाले. अडीचशेच्या आत आपला गाशा गुंडाळला गेला. वास्तविकत: इतकी धावसंख्या कांगारूंना दमवायला पुरेशी नसली तरी टक्कर देण्याइतपत नक्कीच होती. त्यातही शमी बुमराहने सनसनाटी सुरूवात करून दिली होती. मुख्य म्हणजे स्टीव्ह स्मिथने रिव्ह्यू न घेता एक विकेटची गिफ्ट पण दिली होती.
शमी, बुमराहने जी अप्रतिम सुरूवात करून दिली, ती लय ना फिरकीपटुंनी राखली, ना सिराज ने. पहिला पॉवर प्ले संपताच हेड ने आपले असली रूप दाखवले. खरेतर काहीही झाले तरी आक्रमण हाच बचावाचा उत्तम मार्ग आहे हे हेडने जाणून दणक्यात फलंदाजी केली. बरेचदा स्टंप उघडे सोडून तो फटकेबाजी करत होता. नंगे से खुदा डरे म्हणतात ते याचसाठी! कित्येकदा तो बिट झाला, बाद होता होता वाचला. पण बचेंगे तो और लढेंगे करत त्याने वायग्रा फलंदाजी केली. बचानेवालेसे मारनेवाला बडा होता है, हे त्याने दणकेबाज फलंदाजी करत दाखवून दिले. तसेही ऑसी म्हटले की त्यांच्या रक्तात आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स असो वा नसो, आक्रमक पेशी प्रचुर मात्रेत असतात. कांगारूंच्या आक्रमक ॲप्रोच पुढे रोहीतचा संघ गरीब गाय वाटत होता.
खेळात हारजीत तर होणारच. मात्र अंतिम सामन्यात, मोठ्या स्टेजला प्लॅनिंग, होमवर्क किती करता यावर सगळं अवलंबून असते. एकदिवसीय सामना म्हटला की धावगतीची काळजी घेतलीच पाहिजे. कामचलाऊ हेड आणि मिचेल मार्शच्या दोन दोन षटकांत केवळ चार पाच धावा निघत असेल तर प्रमुख गोलंदाजांच्या षटकांबाबत न बोललेले बरे! विराट, राहुलने इतके कोषात जाऊन खेळणे संघाला भारी पडले. कांगारूंनी टीम इंडियाची शिकार करताना तब्बल सात गोलंदाज वापरले तर आपल्याकडे फक्त पाचच पर्याय होते. कांगारूंनी एकंदरीत बावीस चौकार आणि पाच षटकार ठोकले तर आपण फक्त बारा चौकार आणि तीन षटकार. म्हणजेच कांगारूंनी बाऊंड्रीने ११८ धावा, तर आपण केवळ ६६ धावा गोळा केल्या.
थोडक्यात काय तर मेहनती, अभ्यासू, ध्येयवेड्या आणि प्रचंड चिकाटीच्या विद्यार्थ्यांने मेरीटच्या विद्यार्थ्यांला मात दिली. अंतिम फेरीपर्यंत दमदार कामगिरी करण्याऱ्या टीम इंडियाचे श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तरीपण क्रिकेट जगतात एका बाजूला ऑस्ट्रेलियन संघ आणि दुसऱ्या बाजूला इतर सर्व संघ अशी दरी पहायला मिळते. इतर संघ विजयी जरूर होऊ शकतात, होतात. पण चॅम्पियन म्हणून बिरूदावली एकच संघ मिरवू शकतो आणि तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघ. प्रत्येक सामना अंतिम सामना म्हणून खेळण्याची वृत्ती त्यांना चॅम्पियन बनवून जाते. राहिली बाब टीम इंडियाची तर, या सामन्यात कांगारूंची कामगिरी त्यांच्या पेक्षा सरस झाली. रोहीतचा उताविळपणा, विराट राहुलचा संथपणा, जडेजा सूर्याला सूर न गवसण्याने आपला संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. तर बुमराह,शमी वगळता इतर गोलंदाज दबाव टाकू शकले नाही. दिमतीला ढिसाळ,सुस्त क्षेत्ररक्षणाने उरलेसुरले काम पूर्ण केले. टीम इंडियाची या सामन्यात भट्टी जमलीच नाही. त्यामुळे,, तन्हा तन्हा लौटा हूं मैं तो भरी महफिलसे अशी आपल्या संघाची अवस्था झाली.
*********************************
दि. २० नोव्हेंबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com