#@😈😈😈😈😈😈😈😈@#
*ताश्कंद सिटी टूर, भाग ०६*
*डॅा अनिल पावशेकर*
—————————————————
ताश्कंद शहराची ओळख म्हणजे तिथली विविध स्मारके. त्यातही द्वितीय विश्व युद्ध, १९६६ चा भुकंप आणि तैमूरशी निगडीत स्मारकांचा समावेश होतो. तैमूर चौकातून मेट्रो पकडून केवळ पाच मिनिटांत इंडीपेन्डेन्स चौक गाठता येतो. खरेतर हा चौक म्हणजे या शहराची ओळख होय. जवळपास १२ हेक्टर्स क्षेत्रात विस्तारीत हा भाग व्रुक्षवल्ली, फुलझाडे आणि कारंज्यांनी सुशोभीत करण्यात आला आहे. १० ग्रॅनाईटचे कॅालम, शुभ्र मार्बल्सची डिझाइन आणि मेटल बॅार्डरने हे सर्व कॅालम जोडलेले आहेत. यावर पक्षांची कलाक्रुती रेखाटण्यात आली आहे. पहिले या चौकाला लेनिन चौक म्हणायचे परंतु १९९१ ला सोवीयत संघापासून हा देश स्वतंत्र होताच याचे नामकरण मुस्तकिलीक मायडोनी म्हणजेच इंडीपेन्डेन्स चौक असे करण्यात आले. सोबतच लेनिनचा पुतळा हटवून तेथे गोल्डन ग्लोब, ज्यावर उज्बेकिस्तानचा नकाशा आहे, बसवण्यात आला आहे.
गोल्डन ग्लोबच्या खाली एक शिल्प आहे, ज्यात एक माता आपल्या बाळाला सांभाळून बसलेली आहे. माता मात्रुभूमीचे तर बाळ उज्वल भविष्याचे प्रतिक मानले जाते. या चौकात लष्करी कवायती, सार्वजनिक समारंभांचे आयोजन केले जाते. या चौकालगतच उझ्बेकचे संसद भवन, मंत्रालये असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. जवळच द्वितीय विश्वयुद्धाचे स्मारक आहे. जवळपास सर्वच संस्क्रुतीत मातेचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि याचेच प्रतिबिंब इथे पदोपदी पहायला मिळते. एक मोठ्या स्मारकाच्या रुपात हा भाग निर्माण केला आहे ज्यात एक शोकग्रस्त माता जमिनीकडे टक लावून बघत आहे, जिच्या सुपुत्रांनी देशाकरीता बलिदान दिले आहे. इथे एक ज्योत सतत तेवत असते. बाजूच्या इमारतीत द्वितीय विश्वयुद्धात प्राणाची आहुती दिलेल्या उज्बेकच्या बारा प्रांतातील सैनिकांची नावे आणि बलिदानाचे वर्ष पितळी पत्र्यांवर पुस्तकाच्या रूपाने प्रदर्शनार्थ लावलेली आहेत.
मॅान्युमेंट अॅाफ करेज, १९६६ ला ताश्कंद भुकंपात बळी पडलेल्यांना हे स्मारक समर्पित आहे. ८.३ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेच्या भुकंपाने ताश्कंद शहर आणि आसपासच्या भागांत दोनशेहून जास्त बळी घेतले तर तीस हजारांपेक्षा अधिक लोकांना बेघर केले आणि ऐतिहासिक स्थळ नष्ट झालेत. ताश्कंद सोबतच आणखी तीन शहरे सुद्धा या नैसर्गिक आपत्तीला बळी पडली. मात्र दहा वर्षात बळी पडलेल्या प्रत्येक शहरात मॅान्युमेंट अॅाफ करेज उभारण्यात आले आहे. या स्मारकात दगडी शिल्प असून एक व्यक्ती, पत्नी आणि मुलासोबत भुकंपापासून बचाव करतांना दिसत आहे. समोरच आणखी दोन दगडी शिल्प आहेत. एका दगडी चबुतर्यावर भुकंपाची तारीख २६ एप्रिल १९६६ कोरली आहे तर दुसर्या चबुतर्यावर भुकंपाची वेळ ५.२४ कोरलेली आहे. दुसर्या चबुतर्यापासून मानवी दगडी शिल्पापर्यंत जमिनीत एक फट, भेग, चिरा दाखवला आहे, जो त्या भुकंपाची तिव्रता दाखवतो.
या स्मारकापासून हाकेच्या अंतरावर आणखी एक दगडी स्मारक आहे, त्याला शोमुराडोव्हज मॅान्युमेंट म्हणतात. भलेही द्वितीय युद्धात शत्रुसैन्य ताश्कंद पर्यंत नाही पोहोचले परंतु युद्धाच्या झळा मात्र इथपर्यंत जरूर पोहोचल्या. या युद्धात इथले सैन्य कामी आले, अनेक कुटुंबे अनाथ झाली. अशावेळी शोमुरडोव्ह नावाच्या व्यक्तीने, जो व्यवसायाने लोहार होता, मानवीय संवेदनाने ओतप्रोत होता, युद्धात अनाथ, बेघर झालेल्या बालकांचा सांभाळ, संगोपनाचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास देखिल नेला. देशविदेशातील, जर्मनी सारख्या शत्रू राष्ट्रातील अशी एकंदर १४ बालके त्याने सांभाळली, लहाण्याची मोठी केली. त्याच्या याच मानवीय कार्यासाठी त्याचे १९८२ ला स्मारक उभारण्यात आले.
दिवसभराच्या भटकंती नंतर संध्याकाळचे आकर्षण होते गाला डिनर. अर्थातच ही एक प्रकारची मेजवानी असते, ज्यात गीत, संगीत, नाचगाणे याची संगत असते. गीत संगीता बाबत इथे बॅालिवूडची गाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. शिवाय इथे येणार्या पर्यटकांत ६०% पर्यटक भारतीय असल्याने हिंदी गाण्यांना प्राधान्य दिले जाते. भरीस भर म्हणून या मेजवानीत ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स अनलिमिटेड असल्याने दर्दींची चंगळ असते. त्यातही बॅले डान्स असला की सोने पे सुहागा म्हणून समजा.
क्रमशः,,,
—————————————————
दिनांक २४ मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment