#@😈😈😈😈😈😈😈😈@#
*नांव मोठं लक्षण खोटं, भाग ०५*
*डॅा अनिल पावशेकर*
—————————————————
ताश्कंद प्रवासाचा दुसरा दिवस चिमगम माऊंटेन आणि चारवाक लेक च्या भ्रमंतीत गेल्यानंतर रात्रीच्या जेवणाकरीता आर के रेस्टॅारंटचे बुकिंग होते. ताश्कंदच्या इंडीयन रेस्टॅारंट मध्ये हे सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय सुद्धा आहे. रणधीर कपूर, रिषी कपूर आणि शशी कपूरने इथे भेट दिल्याचे कळते. बॅालिवूड कलावंतांचे पोट्रेट सर्वत्र दिसतात. मात्र आम्हाला इथे फारसा चांगला अनुभव आला नाही. पाच व्यक्तींच्या मानाने जेवन अपुरे होते तर चव अगदी साधारण. त्यातही कर्मचार्यांची वागणूक उद्धट प्रकारची. अर्थातच याची आम्ही व्यवस्थापनाकडे लेखी तक्रार जरूर केली. कितपत याची दखल घेतली जाईल, घेतली गेली असेल हे जरी सांगता येत नसले तरी जर आपण एखाद्या सेवेबाबत समाधानी नसलो तर तक्रार जरूर करावी. एकंदरीत काय तर आर के रेस्टॅारंट नांव मोठे लक्षण खोटे असेच वाटले.
तिसर्या दिवशीचा बेत ताश्कंद सिटी टूर चा होता. ताश्कंदला स्टोन सिटी सुद्धा म्हणतात. कारण या शहरात भरपूर दगडी स्मारके आहेत. सोवीयत संघाच्या पोलादी पंजातून स्वतंत्र होत हे शहर मोकळा श्वास घेत आहे. मात्र अस्मानी आणि सुलतानी अन्याय, अत्याचाराच्या खाणाखुणा आजही विविध स्मारकांच्या रूपात जतन केल्या आहेत. मेमोरीयल कॅाम्प्लेक्स अॅाफ व्हिक्टिम्स अॅाफ पॅालिटीकल रिप्रेशन. हे स्मारक २००० साली निर्माण करण्यात आले असले तरी याला १८६० ते १९९१ पर्यंतच्या रक्तरंजीत लढ्याची पार्श्वभूमी आहे. रणाविना स्वातंत्र्य कुणा मिळाले आणि माटी मांगे खून हे तितकेच खरे आहे. रशियन साम्राज्य विस्तार वाद्यांनी न केवळ या भूमीत शहरांचा विध्वंस केला तर जनतेचेही अतोनात हाल केले. मग ते छळछावण्या असोत की तुरूंग. स्टॅलीनचा कार्यकाळाबद्दल तर बोलायलाच नको.
ताश्कंद टिव्ही टॅावरच्या समोर असलेले हे स्मारक आठ उंच खांबांनी निर्मित असून छत गोलाकार, निळसर रंगाचे आहे. हे स्मारक बांधतांना जमिनीत बरीच मानवी सांगाडे आढळल्याने या स्मारकाच्या मधोमध एक सामुहिक कबर बांधलेली आहे. रशियन साम्राज्य विस्तारवादी, स्टॅलीन आणि केजीबीच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या स्म्रुती प्रित्यर्थ या स्मारकाची निर्मिती उज्बेकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष इस्लाम कारिमोव्ह यांनी केली आहे. या स्मारका लगतच एका वास्तूत १८६० ते १९९१ पर्यंतचा ऐतिहासीक ठेवा म्युझीयम रूपाने जपून ठेवला आहे. या संपुर्ण परिसराला चिर्चीक नदी वेढा घालून जाते तसेच सुंदर फुलझाडांनी या भागाला सुशोभीत केलेले आहे.
प्रत्येक शहराची एखाद्या खाद्यपदार्थाने ओळख असते. ताश्कंद शहर हे ताश्कंद पुलाव साठी प्रसिद्ध आहे आणि बेश्क्यू झोन हे रेस्टॅारंट तर मध्य आशियातले सर्वोत्तम ताश्कंद पुलाव साठी नंबर वन मानले जाते. टिव्ही टॅावर लगतचे हे रेस्टॅारंट खाद्यप्रेमींनी सदैव गजबजून गेलेले असते. इथले आकर्षण म्हणजे तुम्ही इथे नान, पुलाव आदी निर्माण करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष बघू शकता. आठ दहा मोठ्या भट्ट्या, तंदुर, विशाल कढयांत नान, पुलाव तयार केला जातो. डायनिंग टेबलवर जेंव्हा प्लेटमध्ये पुलाव येतो तेंव्हा आपण सहज दोन प्लेट पुलाव खाऊ शकतो असे वाटते. पण प्रत्यक्षात असे होत नाही. कारण पुलावातील प्रत्येक भाताचा कण तेल तुपात ओलाचिंब झालेला असतो. जणुकाही एखादी माता आपल्या लाडक्या लेकराला आनंदाने न्हाऊ माखू घालते अगदी तसेच.
जसे आपल्याकडे कण कण में भगवान, तसे इकडे कण कण में कोलेस्टेरॅाल! सोबतच पुलाववर ड्राय फ्रुट्सचा शिडकावा बसल्या जागी गुंगी आणणारा असतो. दिमतीला भव्यदिव्य नान, बुंदी रायता, रंगबिरंगी सलाद, योगर्ट काय खावे काय खाऊ नये काही सुचत नाही. त्यातच हा पुलाव नॅानव्हेज असल्याने खाता खाता दम लागून थकले रे नंदलाला अशी आपली अवस्था होते. गमतीची बाब म्हणजे माझ्या पुलावमध्ये सुपारीच्या आकाराची दोन पांढरी अंडी दिसताच मी ती प्लेट टूर गाईड आयना कडे सरकवून दिली. तिने मात्र मिटक्या मारत तो पुलाव फस्त केला. नंतर तिने सांगितले की ती अंडी स्क्विरील ची होती. इथे कोणत्या खाद्यपदार्थात काय टाकतील याचा नेम नाही. अगदी ब्रेड, नान यांत सुद्धा!
यानंतर पुढचे ठिकाण होते ताश्कंद मेट्रो. १९६६ च्या भुकंपात उध्वस्त झालेल्या या शहरात विना अडथळा, कमी वेळेत प्रवासासाठी मेट्रोची गरज होती. याच निकडीतून १९६८ ला मेट्रोचे प्लॅनिंग सुरू झाले. सोवीयत संघातील ही सातव्या क्रमांकाची तर मध्य आशियातील पहिली मेट्रो आहे. १९७७ ला ही प्रवासी सेवेत रूजू झाली. यांत चार सर्व्हिस लाईन्स आहेत जे पन्नास मेट्रोस्थानकांना जोडतात. चार कोच असलेल्या या मेट्रोची अॅव्हरेज स्पिड ४६ किमी प्रती तास आहे तर एकंदरीत मार्गाची लांबी ७० किमी आहे. साधारणतः सहा लाख प्रवासी रोज ये जा करतात. जुन्या धाटणीची पण मजबूत असलेली ही मेट्रो यंत्रणा जवळपास ९ रिश्टर स्केल तिव्रतेच्या भुकंपाला सहन करण्याइतपत सक्षम बनवलेली आहे.
मला मात्र ताश्कंद मेट्रोपेक्षा नवी दिल्लीची एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रो सरस वाटली. १२० किमी प्रती तासाच्या भन्नाट वेगाने धावणारी एक्सप्रेस मेट्रो २०११ पासून प्रवाश्यांच्या सेवेत आहे. अॅारेंज लाईन म्हणून ओळख असलेल्या ह्या मेट्रोची लांबी २२.७ किमी असून यापैकी १५.७ किमी मार्ग जमिनीखाली तर बुद्धजयंती पार्क ते महिपलपूर पर्यंतचा ७ किमी मार्ग जमिनीवर आहे. या मार्गावर सात मेट्रो स्थानके असून नवी दिल्ली ते एअरपोर्ट पर्यंतचे अंतर अवघ्या १५ मिनिटांत कापते. या मेट्रोच्या देखभालीसाठी तब्बल १०० अधिकारी कार्यरत असून ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो आहे. नवी दिल्ली ते यशोभूमी द्वारका सेक्टर २५ पर्यंतची हिची व्याप्ती असून दररोज अंदाजे ८२,००० प्रवासी या मेट्रोने प्रवास करतात.
—————————————————
दिनांक २३ मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment