@#😈😈😈😈😈😈😈😈#@
चॅम्पिअन्स ट्रॅाफीचे प्री वेड शूट!
डॅा अनिल पावशेकर
++++++++++++++++++++++++
देशातील विधानसभा निवडणुकांचे वादळ शांत झाले असून प्रयागराज महाकुंभही शेवटच्या टप्प्यात आले आहे. यानिमित्ताने देशभरात उसळलेला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्माचा अलोट उत्साह उमंग आपण सर्वांनी अनुभवला आहे. भौतिक शास्त्राच्या नियमानुसार एनर्जी नेव्हर एंड्स प्रमाणे अर्थातच ही एनर्जी, हा उत्साह आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असून याचा केंद्रबिंदू प्रयागराज ऐवजी पाकिस्तान, दुबईत क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या निमित्ताने दिसणार आहे. याचीच एक पुर्वतयारी किंवा सराव म्हणून इंग्लिश संघाचा टी ट्वेंटी, एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा दौरा पार पडला आहे. थोडक्यात काय तर याला हल्लीच्या भाषेत चॅम्पियन्स ट्रॅाफीचे प्रीवेडींग शूट नक्कीच म्हणता येईल.
झाले काय तर टी ट्वेंटी दिग्विजयाचा मधुचंद्र संपतो न संपतो तोच कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंड आणि ॲास्ट्रेलिया संघांशी आपला सामना झाला. त्यात किवी संघाने आपल्या संघाची लक्तरे वेशीवर टांगली होती, मायदेशात एवढी नाचक्की क्रिकेट प्रेमींना चांगलीच झोंबली होती. भरीस भर म्हणून उरलीसुरली कसर ॲास्ट्रेलियाने भरून काढली. तिथे पहिली कसोटी जिंकूनही आपला संघ कामगिरीत भिकारच राहिला. एकटा बुमराह तो काय लढला परंतु अकेला चना भाड नहीं झोंक सकता हे विसरून कसे चालणार? चिंतेची बाब म्हणजे तिथे विराट, रोहितची कामगिरी नीरव मोदी, विजय माल्या सारखी कर्जबाजारी दिसली.
चॅम्पियन्स ट्रॅाफीचे घोडामैदान जवळ असताना आपल्या संघाची वाताहत वेदनादायक होती. पण म्हणतात ना “महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहाती” आणि झालेही तसेच. बडे मियां रोहीत, विराट अपयशी ठरत असतानाच छोटे मियां तिलक वर्मा, अभिषेक शर्माने टी ट्वेंटीत इंग्लिश संघाचा बॅंड वाजवला. पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा दणका देत भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. याच पॅाझीटीव्ह एनर्जीने आपल्या सिनिअर संघात जीव ओतला आणि त्याचेच रूपांतर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला ब्राऊनवॅाश देण्यात झाले.
सध्याच्या आयसीसी एकदिवसीय सामन्याच्या श्रेणीत भारतीय संघ अव्वल स्थानावर असून इंग्लंडचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यातच इंग्लंडने बॅझबॅालची दिक्षा घेतल्याने ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांना उठता लात बसता बुक्की देतात. मात्र भारतीय खेळपट्टीवर त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. इथल्या खेळपट्ट्या जरी फिरकीपटुंचे माहेरघर असले तरी त्यांनी मो. शमी, हर्षित राणा आणि अर्शदिपला ठंडा करके खाओ पॅालिसीने हातळायला हवे होते. शिवाय अक्षर पटेल, जडेजा आणि वरूण चक्रवर्तीची फिरकी त्यांच्यासाठी भुलभुलैय्या ठरली. बॅझबॅालचा सामना गॅातीबॅालशी झाला आणि निकाल सर्वासमोर आहे.
इंग्लिश फलंदाज सॅाल्ट, डकेट, बेथेल, लिविंगस्टोन यांसोबतच कर्णधार जॅास बटलर आणि ॲाफिसर ॲान स्पेशल ड्युटी म्हणजेच जो रूट एक भक्कम फलंदाजी युनिट होते. यांनी सर्वांनी प्रारंभ चांगला केला परंतु ते पन्नाशीच्या उंबरठ्यावर परतले. टी ट्वेंटीत पन्नाशीची खेळी संघाला तारून नेते परंतु एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी निर्णायक ठरते. इंग्लंडच्या फलंदाजीतील हाच कच्चा दुवा होता, त्याच्या यशाची किरपा तिथेच लटकली होती. जो रूटची ६९ धावांची खेळी ही सर्वोच्च होती. महत्वाची बाब म्हणजे हा संघ तिन्ही सामन्यात पन्नास षटके पूर्ण खेळू शकला नव्हता.
खरेतर फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो. इंग्लंडच्या मर्यादित फलंदाजीला गोलंदाजांनी कव्हर फायर द्यायला पाहिजे होते. याकरिता त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर, मार्क वूड सारख्या लोडेड गन्स होत्या, मात्र त्या मिसफायर झाल्या. निव्वळ वेगाला आजकाल कोणी भीक घालत नाही. फिरकीत अब्दुल रशिदने चमक दाखवली परंतु त्याचे प्रयत्न थीटे पडले. पार्ट टाईम जो रूट आणि लिविंगस्टोनची फिरकी आपल्या फलंदाजांच्या पासंगाला पुरत नव्हती. ज्या आक्रमक खेळासाठी बटलर ॲन्ड कंपनी ओळखली जाते, ते फलंदाजी, गोलंदाजीत बोथट निघाले.
राहिली बाब आपल्या फलंदाजांची तर त्यांनी कात टाकल्यासारखी खेळी केली. विशेषतः शुभमन गिल, रोहीत, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या खेळीने टीम इंडिया मालिकेत बहुमताने विजयी झाली. शुभमन गिल ने एक शतक आणि दोन अर्धशतक ठोकत तब्बल २६९ धावा कुटल्या. तर श्रेयस अय्यरनेही १८१ धावा करत आपली निवड सार्थ ठरवली. वास्तविकत: पहिल्या सामन्यात विराट अनफीट असल्याने अय्यरची वर्णी लागली परंतु त्याने संधीचे सोने केले आणि चॅम्पियन्स ट्रॅाफीकरीता आपले तिकीट कन्फर्म केले. या सर्वात अक्षर पटेल हे सरप्राईज पॅकेज होते. किफायती मारा आणि उपयुक्त डावाखोरा फलंदाज असलेला परंतु लो प्रोफाइल असलेल्या अक्षरने तिन्ही सामन्यात अष्टपैलू खेळ केला.
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर या मालिकेत मैफिल जर कोणी लुटली असेल तर ती दुसऱ्या सामन्यातल्या रोहीतच्या शतकाने. हिटमॅन नावाने प्रसिद्ध रोहितने क्रिकेट मध्ये जी षटकार क्रांती केली त्याला तोड नाही. त्याच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून तब्बल ६३१ षटकार आहेत. सर्वाधिक षटकार ठोकण्यात तो प्रथम क्रमांकावर आहे. ज्याप्रकारे तो चेंडूला हवेत उडवतो ते पाहता आयसीसीने त्याला तहहयात फ्री फ्लाईंगची सुविधा द्यायला हरकत नाही. त्याचे षटकार ज्याप्रमाणे सिमारेषेची बंधने ध्वस्त करत प्रेक्षकांत लॅण्ड करतात ते पाहता मॅच रेफ्रींनी त्याला सहा धावांऐवजी आठ धावांचा बोनस द्यावा. थोडक्यात काय तर रोहित म्हणजे दिसायला भोळा आणि सिक्सरवर डोळा असे आहे.
त्याचे कटक चे शतक म्हणजे डोळ्यांसाठी अमीट पर्वणी होती. कव्हर, लॅांग ॲाफ, लॅांग ॲान, लेग ला त्याने एफर्टलेस सिक्सर हाणले. जणुकाही एखादा निष्णात चित्रकार कुंचल्याचे फटकारे ओढत आहे असे वाटत होते. रोहीत रंगात आला की कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या फलंदाजीची मिठ मिरची ओवाळून द्रुष्ट काढाविशी वाटते. त्यातच त्याचा शांत, निर्विकार चेहरा पाहून त्याच्या “जीगरमा बडी आग है”यावर विश्वास बसत नाही. शतक तर शुभमन ने पण केले परंतु त्याला रोहितच्या शतकाचे सौंदर्य नाही. शेवटच्या सामन्यात विराटला सूर गवसलेला दिसला. त्यानेही अर्धशतक ठोकत बॅट ला लागलेला गंज दूर करण्याचा प्रयत्न केला.
नुकतेच अवकाशात ग्रह एकारेषेत येऊन एक अनोखा नजारा आपण अनुभवला होता. याचीच मिनी कॅापी म्हणून रोहीत, शुभमन, अय्यर, अक्षर आणि विराट हे तारें जमीं पर आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना सुखावून गेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॅाफी हाकेच्या अंतरावर आली असताना टीम इंडियाचे प्रदर्शन सुखकर आहे. मात्र बुमराह संघात नसल्याने मनात हुरहूर लागली आहे. तरीपण शो मस्ट गो ऑन! भारतीय संघ आपल्या गटात बांगलादेश, पाक आणि न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. तमाम क्रिकेट रसिकांतर्फे भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॅाफी साठी हार्दिक शुभेच्छा!
++++++++++++++++++++++++
दिनांक १४ फेब्रुवारी २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment