@#😈😈😈😈😈😈😈😈#@
मॅंचेस्टरचा मुकाबला बरोबरीत
✍️ डॅा अनिल पावशेकर ✍️
—————————————————
मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात झुंजार खेळी करत मालिका जिंकण्याचे इंग्लंडचे मनसुबे उधळून लावले आहे. तब्बल दिडशे षटकांच्यावर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून दमल्या भागलेल्या भारतीय संघाने बेन स्टोक्स ॲन्ड कंपनीचा मारा बोथट करत सामना अनिर्णित राखला आहे. खरेतर हा भारतीय संघाचा नैतिक विजय आहे. कारण ३११ धावांची ऊधारी चुकवतांना भोपळा न फोडताही दोन मोहरे गमावल्यावर ज्या प्रकारे राहुल, गील, वॅाशिंग्टन सुंदर यांनी खिंड लढवली ते नक्कीच कौतुकास्पद आहे.
झाले काय तर ही कसोटी मालिका अंतिम टप्प्यात आली असून इंग्लंड २/१ असा आघाडीवर आहे. वास्तविकत: भारतीय संघाने ३/० अशी बढत घ्यायला हवी होती. मात्र आपला संघ तुलनेत नवखा, थोडा अनुनुभवी असल्याने विजयाचा फायनल पंच आपण मारू शकलो नाही. मात्र पहिली कसोटी असो की लॅार्डसची, भारतीय संघाने पाचव्या दिवसापर्यंत झुंज दिली होती. थोडक्यात काय तर इंग्लंडला सहजासहजी विजय मिळवता आला नव्हता. अर्थातच शुभमन गिलचा संघ म्हणजे “छोटा बच्चा समझके हमको ना समझाना रे” हे इंग्लिश संघाला समजले असेलच.
राहिली बाब चौथ्या कसोटीची तर पहिल्या दिड दिवसात पीच गोलंदाजांच्या प्रेमात असल्याने भारतीय संघाची फलंदाजी बहरली नाही. जैस्वाल, राहुल, साई सुदर्शन आणि पंत ला चांगला स्टार्ट मिळूनही ते मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. आयसीसीने पंत ला संघनिरपेक्ष खेळाडू म्हणून घोषित करायला हवे. कारण तो नक्की कोणत्या संघाकडून खेळतो, कोणत्या संघाला फायदा पोहोचवतो हे शेवटपर्यंत गुपित असते. ग्लॅमरस किंवा चित्रविचित्र फटकेबाजी करून तो स्वत:ला आणि आपल्या संघाला शारिरिक मानसिक इजा पोहोचवतो.
त्याचे बेधडक खेळणे कधी बेपर्वाई बेजबाबदारपणात परिवर्तित होते ते सांगता येत नाही. म्हणूनच “आले पंतच्या मना तेथे कोणाचे चालेना” असे म्हणावेसे वाटते. पंतची शारीरिक जखम भारतीय संघाच्या मनात खोलवर जखम करून गेली. तर लोअर ॲार्डर ३१४/६ ते ३५८/१० असा पुन्हा एकदा कोसळला. परत एकदा मोठी धावसंख्या उभारून इंग्लंडला कचाट्यात पकाडायची संधी आपण गमावली. त्यातच दुसऱ्या दिवशी इंग्लंड फलंदाजीला येताच पीचने रंग बदलला. अचानक पीच इको फ्रेंडली म्हणजेच बॅटर फ्रेंडली झाल्याने इंग्लंडचे चांगले फावले.
भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा आणि खेळपट्टीचा सॅाफ्ट कॅार्नर मिळताच इंग्लंड संघाने त्यावर ६६९ धावांचा प्रेमग्रंथ रचला. क्राऊली, डकेट, पोप पाठोपाठ रूट, स्टोक्सने दणदणीत दिडशतकी खेळी करत भारतीय गोलंदाजीची पिसे काढली. भरीस भर म्हणून त्यांच्या “लोअर ॲार्डरने संघाचे हमदर्द बनत साथ दिली, जी आपल्या साठी सरदर्द ठरली”. बुमराहची अंगदुखी आता भारतीय संघाची डोकेदुखी ठरली आहे. त्यातच सिराजची मेहनत प्रत्येक वेळी रंगत आणेलच असे नाही. तर ठाकूरचा शार्दूलविक्रिडीत समास अजूनही क्रिकेट रसिकांना अगम्य आहे. “आम्ही कोण म्हणून काय पुसता आम्ही असू संघ लाडके” या न्यायाने तो आजही संघात कायम आहे.
फिरकी बाबत बोलायचे झाले तर जडेजा, वॅाशिंग्टनची जोडी इंग्लंडला वेसण घालू शकली नाही. लॅार्ड्सचा कटू अनुभव पाहता ३११ धावांची पोकळी कशी भरून काढणार ही चिंतेची बाब होती. त्यातच जैस्वाल, साई सुदर्शनने नमनाला घडीभर तेल ओतल्याने पुन्हा एकदा आपला शेअर बाजार गडगडण्याची दाट चिन्हे दिसत होती. मात्र कर्णधार गील आणि राहुलने मान खाली घालून फलंदाजी केली. या दोघांनी १८८ धावांची भक्कम भागीदारी रचत इंग्लंडला थोपवले. मात्र स्वराज्यावरचे संकट काही टळले नव्हते. हे दोघेही माघारी परतताच सगळी भिस्त जडेजा, सुंदर जोडीवर होती. कारण पंत जायबंदी झाल्याने त्याचे काही खरे नव्हते. तर शार्दूल सहीत लोअर ॲार्डर वरूण राजाकडे आस लावून बसले होते.
अखेर या डाव्याखुर्या दुक्कलीने सर्वस्व पणाला लावत बाजी मारली. दोघांनीही दमदार शतक झळकावून इंग्लंडचा हिरमोड केला. लढत भलेही बरोबरीत सुटली तरीदेखील आपल्या संघाची त्यांनी अब्रू राखली. अन्यथा मालिकेतील अंतिम सामना केवळ औपचारिकता राहिला असता. मात्र हा सामना बरोबरीत सुटताच भारतीय संघाला शेवटचा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर दुसरीकडे इंग्लंडला मालिका जिंकण्यासाठी शेवटच्या कसोटीत भारतीय संघाचा पायबंद करावा लागेल.
हा सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंड संघाचा अप्रत्यक्ष हात दिसून येतो. ज्याप्रकारे त्यांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी झेल सोडले ते पाहता क्षेत्ररक्षणाचे महत्व अधोरेखित होते. गील, जडेजाचे झेल सोडून त्यांनी स्वत:च्या पायावर कुर्हाड मारून घेतली. तर आतापर्यंत मालिकेत सर्वाधिक त्रासदायक ठरलेल्या बेन स्टोक्सचे जखमी होणे भारतीय संघाच्या पथ्यावर पडले. निसर्ग सुद्धा भारतीय संघासाठी तारणहार ठरला. एकतर पीच स्लिपींग ब्युटी, त्यातच कधी पावसाचे शिडकावे तर कधी अपुरा प्रकाश मदतीला आला. सामना अनिर्णित अवस्थेकडे मार्गक्रमण करत असताना कहाणीत एक ट्वीस्ट बाकी होते, खरेतर ते मानसिक द्वंद्व होते आणि याची सुरुवात केली ती इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने.
जडेजा ८९ तर सुंदर ८० धावांवर नाबाद असतांना बेन स्टोक्सने जडेजाला सिझफायरचा पर्याय दिला. मात्र हातातोंडाशी आलेल्या शतकांना आपले दोन्ही फलंदाज कसेकाय नाकारणार? स्टोक्सच्या “पुकारता चला हूं मै” ला जडेजा सुंदर जोडीने “ना ना ना ना ना रे” करत प्रत्युत्तर दिले. दोघांनीही इंग्लंडची तब्येतीत जीरवत आपापले शतक साजरे केले. या मानसिक धक्क्याने इंग्लंड संघ चिडला. त्यांना जेंटलमेन्सच्या गेम ची आठवण झाली. परंतु जखमी पंतला घातक गोलंदाजी करतांना त्यांना स्फुरण चढले होते. अखेर व्हायचे तेच झाले, भारतीय संघाने मानसिक दबाव टाकत अनिर्णित सामन्यात नैतिक विजय मिळवला.
थोडक्यात काय तर जडेजा, सुंदर लढले आणि त्यांनी इंग्लंडला रडवले. राहुल,गील,जडेजा आणि वॅाशिंग्टन सुंदरने इंग्लंडच्या नाकावर टिच्चून फलंदाजी केली. सुंदरने गॅबा २०२१, अहमदाबाद २०२१, एमसीजी २०२४ आणि मॅंचेस्टर २०२५ ला संघ अडचणीत सापडला असताना उपयुक्त कामगिरी करत संघाला तारले आहे. तर सर जडेजा संघासाठी तन की शक्ती मन की शक्ती बोर्नव्हिटा आहे. गील राहुल जोडीने ७० षटके तर जडेजा सुंदर जोडीने जवळपास ५० षटके फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला. तर इंग्लंड संघाकडे शेवटच्या दिवशी रफ जागेचा फायदा घेणारा स्पेशलीस्ट फिरकीपटू नव्हता, डॅासनची कामगिरी यथातथाच राहिली. सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून जरी बेन स्टोक्सची निवड झाली असली तरीही खरी महफील लुटली ती जडेजा सुंदर जोडीनेच.
—————————————————
दिनांक २८ जुलै २०२५
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
—————————————————
