Saturday, March 26, 2022

आरोग्यसेवा ऑनलाईन २०५०

@#😈😈😈😈😈😈😈#@
    *आरोग्यसेवा ऑनलाईन २०५०*
********************************
रूग्ण,नातेवाईक, समाजकंटक यांच्याकडून होणारी मारहाण जीवघेणे हल्ले, हल्ल्याचे सरकार न्यायसंस्थेकडून होणारे निर्लज्ज समर्थन, मिडीयाकडून होणारी गळचेपी मुस्कटदाबी, कुचकामी कायदे आणि २४ तास प्रचंड तणाव दबावात राहणे अशक्य झाल्याने इसवी सन २०५० पर्यंत भारतात डॉक्टर नावाची जमात जवळपास नामशेष झाली असेल. त्या काळची आरोग्य सेवा काय असेल याचा ठोकळ अंदाज असा घेता येईल.

जवळपास बहुतेक सर्व डॉक्टर मंडळी आपला व्यवसाय सोडून इतर व्यवसायात रमलेले आढळतील. वृद्ध मायबाप आपली मुलेबाळे वैद्यकीय व्यवसाय सोडून इतरत्र उद्योगधंद्यात गुंतलेली पाहून देवाचे आभार मानत असतील.सरकारतर्फे हल्ल्यात मरण पावलेल्या डॉक्टरांच्या कुटूंबीयांसाठी निराधार योजना चालविली जाईल.  बहुतेक डॉक्टर हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याने त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची मागणी कुटूंबीय करतील.
 
छोटे क्लिनीक, खाजगी नर्सिंग होम जवळपास नामशेष झालेले असतील आणि मोठे हाॅस्पीटल तोडून तिथे जंगी माॅल, शोरुम उघडलेले दिसतील.  समजा एखादे मोठे हाॅस्पीटल उरलेच असेल तर सरकार त्याला वैद्यकीय पर्यटनस्थळ म्हणून घोषीत करेल. इथे चुकुनमाकून डॉक्टर होणाऱ्यांना हल्ल्यापासून बचावाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच इथे बळी पडलेल्या डॉक्टरांचा स्मृतीस्तंभ उभारलेला दिसेल.

दरम्यान डॉक्टर होण्यास कुणीच तयार नसल्याने सरकार विविध आकर्षक योजना आणेल. प्रवेश घेताच वैद्यकीय विद्यार्थ्यांना हेल्मेट,चेस्ट गार्ड, मिर्ची स्प्रे मोफत मिळेल. कमांडो ट्रेनिंग सोबतच रजिस्ट्रेशनच्या पहिले गन लायसन्स ची सुविधा, पेंशन योजना, मरणोत्तर शौर्यचक्र, विविध पारितोषिकांचे आमिष दिल्या जाईल.

आरोग्यसेवा संपुर्ण ऑनलाईन झाल्याने उपचाराकरीता ४२० या हेल्पलाईनवर काॅल केल्यास असे उत्तर मिळेल. साध्या आजाराकरीता एक दाबा, अपघाता करीता दोन दाबा, डीलीव्हरी करीता तिन दाबा, कोणत्याही ईमरजन्सीकरीता चार दाबा, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलायला पाच दाबा. प्रशिक्षणासाठी आपला काॅल रेकाॅर्ड केल्या जाऊ शकतो. आरोग्यसेवेचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद. 

दरम्यान प्रत्येक हाॅस्पीटल सरकारच्या ताब्यात असतील,,, प्रवेशद्वाराजवळ मेटल डीटेक्टर बसवलेले असतील. सुरक्षा रक्षक चांगली अंगझडती घेतल्याशिवाय कुणालाही प्रवेश नाकारतील, डॉक्टर नखशिखांत बुरख्यात असतील. ओळख पटू नये म्हणुन डॉक्टर नावाऐवजी केवळ सर्व्हिस कोड नंबर वापरतील,,,,जो रोज बदलत जाईल. 

दरम्यान पहिले सारखी वैद्यकीय सेवा २४ तास उपलब्ध नसल्याने उपचारावाचून रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढलेले असतील. बाळाला जन्म द्यायचा असल्यास रूग्णालयात आधी बुकींग करावे लागेल आणि व्हॅकन्सी असेल तरच प्रेग्नन्सी ठेवायचा अधिकार मिळेल. बुकींग न करता प्रेग्नन्सी राहीलीच तर सरकारची अवमानना ठरवून गर्भपात केला जाईल. मिलीटरी कॅम्प सारखे हाॅस्पीटलला संरक्षण असल्याने डॉक्टरवरील हल्ल्यात लक्षणीय कमी आलेली असेल. 

डॉक्टरांसाठी एवढे करुनही मॅरेज ब्युरो मध्ये डॉक्टर मुला मुलींनी कृपया आवेदन करू नये अशा स्पष्ट सुचना लिहीलेल्या आढळतील. ज्यांचे पुर्वज वैद्यकीय क्षेत्रात होते त्यांच्याकडे समाज त्याही वेळेस गुन्हेगारी नजरेने पाहण्यास कमी करणार नाही. शेवटी कधीकाळी डॉक्टर निर्यात करणारा आपला देश डॉक्टर आयात करू लागेल. 

आतंकवादी हल्ले, नैसर्गिक आपत्ती,,भुकंप,त्सुनामी ,चक्रीवादळ, अपघात  इत्यादी कारणांमुळे होणारे मृत्यु पाहून हळूहळू जनतेला डॉक्टरांच्या उपचारा शिवाय पण मृत्यु होऊ शकतो यावर विश्वास वाढेल. आपल्या जुन्याजाणत्या मंडळींकडून पहिल्या काळी २४ तास सर्वत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध होती हे ऐकून विश्वास वाटणार नाही. होऊ शकते एवढी सर्व उलथापालथ झाल्यावर रुग्ण,नातेवाईकांना डॉक्टरांची किंमत कळेल आणि वैद्यकीय क्षेत्राला परत चांगले दिवस येतील. 
*********************************
दि. २६ मार्च २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Sunday, March 20, 2022

द काश्मीर फाईल्स उत्तरार्ध

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *द काश्मीर फाईल्स, उत्तरार्ध*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
या चित्रपटाला अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पुनित इसार आदी दिग्गजांनी आकार दिला असला तरी सर्वात जास्त प्रभावित केले ते पल्लवी जोशीने. प्रोफेसर राधिका मेननच्या व्यक्तीरेखेला तिने अक्षरशः जिवंत केले आहे. जितकी हानी आतंकवाद्यांनी केली नसेल त्याच्या कैकपटीने हानी राधिका मेनन सारख्या स्लिपर सेलने केली आहे. युवावर्ग विशेषतः विद्यार्थ्यांना भ्रमित करुन त्यांच्या मनात देशविरोधाची बीजे रोवून देश पोखरण्याचे पातक डाव्या कंपूने पद्धतशीरपणे केले आहे.  कधी बुरहाण वाणीची भगतसिंगांशी तुलना करत तर कधी भारतीय लष्कराला खलनायक ठरवत या हरामखोरांनी या देशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

विशेषतः बडी बिंदी गॅंगचे प्रतिरूप साकारतांना पल्लवी जोशीने आपल्या सशक्त अभिनयाने प्रो.राधिका मेनन उभारली आहे. तिला पडद्यावर पाहताच राग, द्वेष, संताप, चिड अशा भावना मनात गर्दी करतात. सोबतच असल्या आस्तिनीतल्या सापांचा पहिले बंदोबस्त करणे किती गरजेचं आहे हे कळून येते. तिच्या तोंडचे,, काश्मीर भारताचा अविभाज्य अंग नाही, जगाच्या नकाशाप्रमाणे काश्मीर भारतात नाही, आय ॲम गोईंग टू नोव्हेअर लाईक धिस कंट्री, गव्हरमेंट भलेही उनकी हो, सिस्टम तो हमारा है, लाजिम है की हम भी देखेंगे,, इत्यादी संवाद प्रेक्षकांच्या डोक्यात सनक आणल्याशिवाय राहत नाही. मुख्य म्हणजे ती कृष्णा पंडितला विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार करुन काश्मिरात अजेंड्यानुसार रिपोर्टींगला पाठवते. जिथे तिचे क्रुरकर्मा बिट्टा कराटेशी लागेबांधे असतात.

खरेतर इथेच या लिब्रांडूंचे आतंकी कनेक्शन उघड होते. प्रो राधिका मेननचा बिट्टा कराटे सोबतचा फोटो,,, यासिन मलिक आणि अरूंधती रायच्या  फोटोची हुबेहूब प्रतिकृती असते. चिन्मय मंडलेकरने बिट्टा कराटेला साकारताना आपला अभिनय पणाला लावला आहे. अतिशय थंड डोक्याने तो हत्याकांड घडवतो आणि निर्लज्जपणे कबूली देतो. विशेषतः चित्रपटाच्या शेवटी काश्मिरी हिंदूंच्या हत्याकांडात त्याचे नराधम रुप पाहून काळीज थिजून जाते. छोटी मुले, स्त्रीया, वृद्धांना संपविताना पश्चात्तापाचा किंवा भितीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नसतो. 

दर्शन कुमारने साकारलेला कृष्णा पंडित हा खरेतर आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो. सुरवातीला वैचारिक गोंधळात अडकलेला कृष्णा पंडित जेंव्हा जळजळीत वास्तवाला सामोरा जातो तेव्हा त्याचा अभिनय खुलून दिसतो. काश्मीर नरसंहार बाबत इतके वर्ष दडवून ठेवलेले सत्य जसजसे बाहेर यायला लागले तसतसे प्रेक्षकांचे ह्रदय पिळवटून निघते. त्यावेळी सुद्धा मिडीया होता परंतु घडलेला नरसंहार त्यांच्या अजेंड्याला साजेसा नसल्याने त्याची फारशी दखल घेतली जात नाही.

अनुपम खेर यांनी आपल्या कसदार अभिनयाने पुष्करनाथ पंडितची व्यथा मांडली आहे. डिजीपी, आएएएस अधिकारी, डॉक्टर आणि मिडीया सहकारी सोबत असुनसुद्धा आपण आपल्या कुटुंबाला वाचवू शकलो नाही याचे शल्य त्याला आयुष्यभर असते. त्यातच नातू कृष्णा आझादी गॅंगच्या विळख्यात सापडल्याने तो उद्विग्न होतो. टुटे हुऐ लोग बताते नहीं उन्हे सुना जाता है, काश्मीर का सच हमेशा झुठ ही लगता है, लोग अखबार देखते है पढते नहीं, टीव्ही देखते है पर समझते नहीं, सपने पुरे नहीं होते उनके पिछे भागना पडता है, इम्पॉसिबल टेकस टाईम,, इत्यादी संवादातून काश्मीर नरसंहाराचे कटू सत्य मांडले जाते.

या सत्यपटाचा परमोच्च बिंदू म्हणजे कृष्णा पंडित चे जेएनयूतले भाषण. ढोंगी पुरोगाम्यांचा खरपुस समाचार घेत तो काश्मिरींचे वास्तव सर्वांसमोर मांडतो. ॠषी कश्यप पासून सुरू झालेली ही मालिका कान देऊन ऐकण्यासारखी आहे. शंकराचार्य असो की केरळ कश्मिरचे आध्यात्मिक संबंध असो, चरक सुश्रुत वाग्भट आदी आयुर्वेद महर्षींचा उल्लेख असो की विष्णू शर्माचे पंचतंत्र असो, नाट्यशाळा, भारतमुनी ,,, इतिहासाच्या गर्भात दडलेल्या आणखी काही महत्वाच्या बाबी असो,, धर्मांधांना काश्मीर आंदण देऊ पाहणाऱ्यांच्या डोळ्यात ते झणझणीत अंजन असते.

मुख्य म्हणजे काश्मिरची भुमी जणुकाही १९४७ नंतर अस्तित्वात आली असे ज्यांना वाटते त्यांनी हा चित्रपट एकदा जरूर पहावा. कश्मिर इज ए क्रेडल ऑफ सिव्हिलायझेशन, कश्मिर वॉज सेंटर ऑफ नॉलेज असे का म्हणतात ते लगेच कळून येईल. काश्मिरात नरसंहारा सोबतच सांस्कृतिक संहारही कसा झाला याचा ही विचार केला पाहिजे. मुख्य म्हणजे ज्यांच्यात ढोंगी पुरोगामीत्वाचा किडा जास्त वळवळत आहे त्यांच्यासाठी द काश्मीर फाईल्स हा रामबाण इलाज आहे. दुष्ट राजकारणी, हतबल प्रशासन, दुटप्पी,लाचार मिडीया आणि आपल्याच देशबांधवांबाबत असलेली कमालीची अनास्था या सर्वांचे एकत्र रुप बघायचे असेल तर द काश्मीर फाईल्स एकदा नक्की बघायला हवा.
**********************************
दि. २० मार्च २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, March 19, 2022

द कश्मिर फाईल्स पुर्वार्ध‌‌‌

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
          *द कश्मिर फाईल्स, पुर्वार्ध*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
द कश्मिर फाईल्स,,खरेतर जवळपास तिन तासांत मध्ययुगीन रानटी टोळ्यांचे धडधडीत सत्य मांडणारा सत्यपट होय. गलिच्छ राजकारण, आत्मा हरवलेला मिडीया आणि आपल्या देशबांधवांकडे कानाडोळा करण्याच्या स्वार्थी मानसिकतेचे अचूक चित्रण यांत करण्यात आले आहे. केवळ इतिहासच नव्हे तर वर्तमान आणि भविष्यकालीन संकटाची चाहूल देण्याची किमया या सत्यपटाने दिली आहे. शहामृगासारखे संकटकाळी वाळूत मान खुपसून बसले तरी संकट काही टळणार नाही.याऊलट झालेल्या नरसंहारातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे. धर्मांधांपुढे तुम्ही पुरोगामीत्वाच्या कितीही गळाभेटी घेतल्या, सर्वधर्मसमभावाच्या कितीही डफल्या वाजवल्या तरीही तुमचे अस्तित्व उकळत्या चहात पारले जी बिस्कीटांसारखे गळून पडणार हे निश्चित आहे. योगायोगाने या चित्रपटात सुद्धा पारले जी चा उल्लेख आहे मात्र यातून धडा घेतला नाही तर भविष्यात हारले जी म्हणून पस्तावण्याची वेळ येऊ शकते.

चित्रपटाचे कथानक विस्थापित झालेल्या पुष्करनाथ पंडितच्या कुटुंबावर केंद्रीत आहे. आपला मुलगा, सुन आणि एक नातू यांची आपल्या डोळ्यादेखत होणाऱ्या हत्यांचे साक्षीदार होण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर येते. मात्र ना सरकार, नोकरशाही अथवा कुठेच थारा न मिळाल्याने ही भळभळती जखम घेऊन तो जगत असतो. अर्थातच जेंव्हा मिडीया आणि शिक्षण प्रणालीतून सत्याचा विपर्यास मांडला जातो, तेंव्हा तो कळवळून उठतो. हत्याकांडात हात रंगल्यांचे उदात्तीकरण आणि पिडीतांनाच जेव्हा अपराधी ठरवले जाते तेव्हा हा चित्रपट का पहावा याचे उत्तर आपोआप मिळते.

या सत्यपटाला १९८० चा उत्तरार्ध आणि १९९० च्या पुर्वार्धाची पार्श्वभूमी आहे. शिवा आणि अब्दुल या मुलांच्या क्रिकेट सामन्यातून कथानक पुढे सरकते आणि प्रत्येक प्रसंग, प्रत्येक क्षण तिथल्या काळ्याकुट्ट अध्यायाची परत उघडत जाते. मुख्य कथानक १९ जानेवारी १९९० ला धरून असले तरी वातावरण निर्मिती बरेच काळापासून सुरू असते. पुष्करनाथ (अनुपम खेर) च्या कुटूंबात मुलगा करण पंडित (अमन इक्बाल), सुन शारदा पंडित (भाषा सुंबली), नातू शिवा आणि क्रिष्णा पंडित असतात. सोबतच त्याची डिजीपी हरीनारायन (पुनित इसार), आयएएस अधिकारी ब्रह्मदत्त (मिथुन चक्रवर्ती), डॉ महेश कुमार (प्रकाश बेलवाडी) आणि मिडीयातील प्रस्थ विष्णुराम (अनुप श्रीवास्तव) यांच्याशी उठबस असते. यामुळेच की काय पुष्करनाथ येणाऱ्या संकटाबाबत अनभिज्ञ असतो.

मात्र जिथे लष्करावर आणि पोलिसांवर हल्ले होत असतील तर पुष्करनाथ सारख्या सामांन्यांचा कुठे टिकाव लागणार? मुख्य म्हणजे काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना आणि व्यक्तींना प्रामुख्याने टिपून इतरांना एक धमकीवजा निरोप धाडला जातो. रलिव गलिव चलिव,,,अर्थातच आमचा धर्म स्विकारा अन्यथा चालते व्हा किंवा मरणास तयार रहा. अर्थातच ज्यांनी पिढ्यानपिढ्या तिथे वास्तव्य केले आहे त्यांच्यासाठी हे आभाळ फाटण्यासारखेच होते. मग इथेच नरसंहार आणि पलायणाचे भिषण वास्तव दृष्टीस येते. पुष्करनाथच्या घरी जेंव्हा बिट्टा कराटे नावाचा क्रुरकर्मा दाखल होतो तेव्हा जिव वाचवण्यासाठी करण पंडित तांदुळाच्या कोठीत लपतो. परंतू शेजारच्याने खाणाखुणा करताच तांदुळाच्या कोठीतच त्याच्या शरीराची चाळण करण्यात येते.

याप्रसंगी पुष्करनाथ बिट्टा कराटेला तू माझा शिष्य आहे, मी तुला शिकवले आहे याची आठवण करून देतो. मात्र बिट्टा कराटे आपल्या मिशन बद्दल कटीबद्ध असतो. मी तुमचा विद्यार्थी नाही तर एरीया कमांडर बिट्टा कराटे आहो याची ओळख करून देतो आणि या हत्येचे कुणीतरी साक्षीदार असावे म्हणून पुष्करनाथ आणि उरलेल्या सदस्यांना जिवंत सोडतो. तत्पूर्वी करण पंडितच्या रक्ताने माखलेले तांदूळ जबरदस्तीने त्याच्या पत्नीला खाण्यास भाग पाडतो. काय म्हणावे या क्रौर्याला. वास्तविकत: हे कथानक इथुनच पुढे सरकायला हवे होते. मात्र अचानक एक अंतर ठेऊन हे कथानक थेट जेएनयूत पोहोचते त्यामुळे प्रेक्षक चित्रपटास खिळून राहत नाही. त्यातच पात्रांच्या तोंडी बरेचदा स्थानिक भाषा वापरली आहे त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. तरीपण प्रत्येक वेळी इंग्रजी सबटायटल्स दिल्याने भावार्थ समजणे सुसह्य होते.

हे कथानक जेंव्हा जेएनयूत पोहोचते तेव्हा पुन्हा एकदा काश्मीर अध्यायाचा कसा विपर्यास केला जातो याचे दर्शन घडते. विशेषतः डाव्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जे इतिहासाचे विकृतीकरण आणि धर्मांधांच्या क्रौर्याला कुरवाळण्याचे पातक केले आहे ते पाहून चिड येते. युवापिढीला काश्मीर प्रकरणी कसे भ्रमित केले जाते, युवा शक्तीचा देशविरोधात कसा वापर केला जातो याचे जिवंत चित्रण इथे केलेले आहे. पुष्करनाथ आपल्या एकमेव जिवंत नातवासोबत म्हणजेच कृष्णासोबत शरणार्थी शिबिरात आयुष्याचे उरलेले दिवस मोजत असतो. तर कृष्णा पंडित जेएनयूत प्रोफेसर राधिका मेननच्या हाताखाली शिक्षणाचे धडे घेत असतो. देशविरोधाने ठास्सून भरलेली प्रो.राधिका मेनन एकीकडे तर दुसरीकडे नरसंहार आणि पलायनाची भळभळती जखम उराशी घेऊन लाचारीचे जिवन जगणारा पुष्करनाथ यांच्या वैचारिक द्वंद्वात कृष्णा पंडितचा अक्षरशः सॅंडविच होतो.

प्रो.राधिका मेनन आणि त्यांचे टोळके विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत कृष्णा पंडितला अध्यक्षपदाची उमेदवारी देते. मग इथेच डाव्यांचे कटकारस्थान सुरू होते. काश्मिरातील नरसंहार आणि पलायनाला देश कसा जबाबदार आहे,  संघवाद से आझादी, मनुवाद से आझादी कशी जरुरी आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. प्रत्येक कहाणीला खलनायकाची गरज असते आणि काहीही करून, कसेही करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे यासाठी सोयऱ्याच्या जोड्याने विंचू मारण्यासारखे,,, कृष्णा पंडितलाच काश्मिरात काश्मिरींवर सरकार आणि लष्कराद्वारे कसे अत्याचार होत आहेत याच्या संकलनासाठी पाठवलं जातं. मात्र सत्य कितीही झाकलं तरी ते लपून राहत नाही. जेव्हा कृष्णा पंडित त्याच्या आजोबांचा म्हणजेच पुष्करनाथचा अस्थिकलश घेऊन दाखल होतो तेव्हा त्याला ग्राउंड रिअलीटी कळते. पुष्करनाथचे सहकारी ब्रह्मदत्त, हरीनारायण, डॉ महेश कुमार आणि विष्णुराम यांच्या तोंडून अखेर सत्य बाहेर पडतेच. कृष्णा पंडितला आपले कुटुंब अपघातात नव्हे तर हत्याकांडात मारले गेले याची जाणीव होते. खरेतर इथुनच द कश्मिर फाईल्स मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करते.
क्रमशः,,,
**********************************
दि. १९ मार्च २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, March 11, 2022

फूल खिले है गुलशन गुलशन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *फूल खिले है गुलशन गुलशन*
              *डॉ अनिल पावशेकर*
********************************
अवघ्या देशाच्या नजरा लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून मतदारांनी कांग्रेसला चांगलाच हात दाखविल्याचे दिसत आहे. २०२४ च्या फायनल पुर्वी झालेल्या या सेमी फायनलमध्ये भाजपने ४/१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात मोदी योगींच्या डबल इंजिनने बुवा बबुआ सहित उरल्यासुरल्या काँग्रेसचा धुव्वा उडविला आहे. हत्ती,सायकल आणि पंजाला बेदरकारपणे चिरडून योगींच्या बुलडोझर ने यहाँ के हम सिकंदर हे दाखवून दिले आहे. अर्थातच या लढतीत योगी आदित्यनाथ मॅन ऑफ दि मॅच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅन ऑफ दि सिरीज ठरले आहेत.

खरेतर या निवडणुकांना बेरोजगारी, महागाई, कोरोनाच्या लाटां सारखी दुर्दैवी पार्श्वभूमी होती. त्यातच शाहिनबाग, दलालांचे आंदोलन आणि सोबतच हिजाब प्रकरणाचा तेजतर्रार तडका होता. मात्र मोदी योगींच्या जोडगोळीने या नोबॉल, वाईडबॉलला लिलया खेळत चार राज्यांत धडाकेबाज पुनरागमन केले आहे. त्यातच वामपंथीय लालमिडीया आणि जेएनयू छाप माकडे २०१४ पासूनच हात धुवून मोदींच्या मागे लागली होती. मात्र सुशासन, सुरक्षा आणि राष्ट्रवादाचे शिवधनुष्य उचललेल्या मोदींचा ते बाल ही बाका करु शकले नाही.

मुख्य म्हणजे निवडणुका म्हटल्या की धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळणे, जातपातधर्माच्या राजकारणाचे आखाडे बांधणे, अव्यवहार्य मोफत योजनांची मुक्त उधळण करणे इत्यादी विरोधकांच्या पारंपरिक पद्धतीला फाट्यावर हाणत भाजपने ही लढाई जिंकली आहे. पाच राज्यांच्या लढतीत सर्वांचे पंचप्राण दडले होते युपीत आणि तिथेच भाजपची खरी कसोटी होती. कारण एकतर अवाढव्य राज्य, प्रचंड लोकसंख्या आणि ॲंटी इन्कम्बन्सी फॅक्टर. मात्र योगींची स्वच्छ प्रतिमा, मोदींचे राष्ट्रव्यापी धडक नेतृत्व, मजबूत पक्ष संघटन या बाबी महत्त्वाच्या ठरल्या.

तर दुसरीकडे सपा, बसपा, कांग्रेस आदी विरोधकांचे दाही दिशांना दहा तोंडे होती. प्रत्येक विरोधक "मै झुकेगा नहीं साला" मुडमध्ये होता. बसपा ची स्थिती नाव गंगुबाई हाती कथलाचा वाडा अशी होती. हत्ती आणि पक्षप्रमुखांच्या पुतळ्यांपुढे या पक्षाची मजल गेली नाही. कधीकाळी तिलक तराजू और तलवार,,, आणि हाथी नहीं गणेश है,,सारख्या घोषणांनी मैदान मारणारा हा पक्ष या निवडणुकीत रसातळाला गेला. एकहाती सत्ता काबीज करणाऱ्या मायावतींना यावेळी बोटावर मोजण्या इतक्या जागांवर समाधान मानावे लागले.

समाजवादी पक्षाची तर गोष्ट निराळीच होती. त्यांच्यासाठी एम वाय फॅक्टर जणुकाही निवडणुका जिंकण्याचा पासवर्ड होता. मात्र यावेळी एम वाय फॅक्टर अपडेट होऊन तो मोदी योगींत परिवर्तीत झाला होता. मुलायमसिंगांची कवचकुंडले असल्याने अखिलेश यादवांचा आयत्या बिळात नागोबा झाला होता. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जन्मदात्या बापाला युज ॲंड थ्रो करणाऱ्या अखिलेश यादवला या निकालाने दिवसा तारे दिसू लागले असेल. सैफईचा नंगानाच म्हणजे युपीचा विकास नव्हे हे मतदारांनी लक्षात ठेवल्याने समाजवादी पक्ष फारशी चमक दाखवू शकला नाही.

कांग्रेसने यावेळी खांदे बदल करत प्रियंका वाड्रा यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवली. परंतु पळसाला पाने तिनंच राहिली. लडकी हूं लड सकती हूं सह प्रियंकांनी वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ना मतदारांनी, ना कोणत्या राजकीय पक्षांनी त्यांना गांभीर्याने घेतले. अखेर कांग्रेस पक्ष या निवडणुकीत युपीत दोन आकडी संख्याही गाठू शकला नाही. एवढेच नव्हे तर अमेठी, रायबरेली सारख्या परंपरागत मतदार संघातूनही त्यांचा बाजार उठवल्या गेला. तत्पूर्वी राहुल गांधींनी हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांचे अजब तर्कट समोर आणले होते, ज्याचा त्यांनाच तोटा झाला.

असंघटित आणि विस्कळीत विरोधकांचा मोदी योगी जोडीने येथेच्छ समाचार घेतला. तर विरोधकांच्या उरल्यासुरल्या आशा दलालांच्या आंदोलनावर टिकल्या होत्या. मात्र भाडोत्री आणि लंगडे घोडे असलेल्या टिकैतचे निवडणुकांपुर्वीच विसर्जन केल्याने दलालांचे आंदोलनही विरोधकांना संजिवनी देऊ शकले नाही. तर राज्याची सुत्रे सांभाळताच योगींनी युपीचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले.गोरगरीब जनता, दुर्बल असहाय घटक आणि महिलावर्ग यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सोबतच राज्यात वर्षानुवर्षे बळावलेल्या गुंडगिरीला लगाम घातला. पोलिसदल बळकट करून गुंडांच्या वळकटी बांधण्याने कायदा सुव्यवस्था सुरळीत केली. लाथोंके भुत बातोंसे नहीं मानते हे योगींनी चांगले माहीत असल्याने त्यांनी बुलडोझरची क्लृप्ती वापरली.

यासोबतच जाज्वल्य देशाभिमान आणि धर्माची पताका खांद्यावर घेऊन उत्तर प्रदेशाची वाटचाल उत्तम प्रदेशाकडे केली. राष्ट्रीय स्तरावर मोदींनी हिंदुत्वाचे अग्निकुंड धगधगते ठेवण्याचे कार्य केले. यांत सोमनाथ ते केदारनाथ, अयोध्या ते काशीचा नकाशा बदलवून टाकला. यामुळेच कधीकाळी हिंदूत्व म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे दचकणारे विरोधक मंदिरात रमू लागले. कुणी हनुमान चालीसा म्हणू लागले तर कुणाला आपले दत्तात्रेय गोत्र आठवले. हिंदुंच्या रक्ताला चटावलेली बंगाली दीदी चक्क काशी विश्वेश्वराच्या पायाशी लोळण घेऊ लागली. रामभक्तांचे रक्त सांडवणाऱ्या समाजवाद्यांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण येऊन दृष्टांत देऊ लागले. अर्थातच ही किमया एका रात्रीत झाली नाही आणि त्याचे किमयागार होते मा.नरेंद्र मोदी.

निश्चितच सोन्याच्या किंमतींनी बावन्न हजारांचा टप्पा ओलांडला असला तरीही हिंदुत्वाचे बावन्नकशी सोने असलेल्या मोदी योगींनी हिंदुत्वाला नवीन झळाळी दिली आहे. जवळपास ग्लानीत असलेल्या हिंदुत्वाला जागृत करून धर्माभिमानाची पताका देशविदेशात फडकवली आहे. विकास तर वेळेनुसार क्रमाक्रमाने होतच राहील यात शंका नाही. याच विकासाला सर्वसमावेशक हिंदुत्वाचा मुलामा असल्यानेच देश प्रगतीपथावर आहे. सिरीया, उक्रेन आदी देश विकासावर चालूनही भकास का झाले यांचे उत्तर प्रखर राष्ट्रवादात दडले आहे. नेमकी हीच बाब हेरून या निवडणुकांत भाजप यशस्वी झाला आहे. कधीकाळी अवघ्या दोन खासदारांचा पक्ष म्हणून टर उडवल्या गेलेल्या भाजपने गगनभरारी घेत संपूर्ण देशात आपला झेंडा रोवला आहे. कमळ केवळ चिखलातच नव्हे तर देशभरात बहरू शकते हे या निकालांनी दाखवून दिले आहे. येत्या काळात भाजप हीच कामगिरी वृद्धिंगत करत "फूल खिले है गुलशन गुलशन" अशा स्थितीत येईल अशी अपेक्षा आहे.
*********************************
दि. ११ मार्च २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...