Friday, November 18, 2022

तस्मै श्री गुरवे नमः, डॉ राठी सर

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   तस्मै श्री गुरवे नम:, डॉ.राठी सर
              डॉ अनिल पावशेकर
**********************************
 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू,,, या श्लोकात गुरू म्हणजेच शिक्षकांचे महत्व प्रतिपादीत केले आहे. अर्थातच मातीच्या गोळ्याला योग्य आकार देण्याचे पुण्यकर्म गुरूद्वारे केले जाते. बालपण ते युवावस्था किंबहुना आजिवन गुरुंचे मार्गदर्शन लाभल्याने जिवन सुकर, सुलभ होते. असेच आमचे महाविद्यालयीन गुरुवर्य डॉ जगमोहन राठी सर यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचा आणि महाविद्यालयीन कालाचा आढावा या लेखाद्वारे घेण्याचा प्रयत्न केला आहे.

सन १९८६ पासून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विदर्भातील ३०% जागा इतर विभागांसाठी (मुंबई,मराठवाडा) राखीव करण्याचा निर्णय झाला आणि आमच्या स्वप्न,भविष्याची राखरांगोळी करून गेला. योग्यता असुनही विभागीय आरक्षणाचा दुष्टचक्रात कित्येक गुणवंतांचा शैक्षणिक मुडदा पाडला गेला. कारण त्यावेळी वैद्यकीय प्रवेश बारावी बोर्डाच्या गुणांवरून केले जात असायचे. विदर्भाच्या तुलनेत मुंबई आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना भरमसाठ मार्क्स मिळत असायचे. विदर्भातील जागा या दोन विभागातील विद्यार्थी पटकवायचे परंतू विदर्भातील विद्यार्थी मागे पडायचे.अर्थातच हे हलाहल पचवून आम्ही आलीया भोगाशी असावे सादर म्हणून पुढे सरसावलो. मात्र या घटनेचा मनावर इतका परिणाम झाला आणि दु:खाच्या बाबतीत आम्ही इतके आत्मनिर्भर झालो की यानंतर "दुख किस बला का नाम है" हे आमच्या आयुष्याचे ब्रिदवाक्य ठरले. आत्यंतिक दु:खातही आमचा हसरा चेहरा पाहून मित्रमंडळी आजही आम्हाला चेष्टेने लाफिंग डॉक्टर म्हणतात.

सांगायचे तात्पर्य असे की बीएएमएस प्रथम वर्षाला एकमेकांचे दु:खी, अगतिक, केविलवाणे, गरिब आणि बापुडे चेहरे वारंवार पाहुन आम्हाला थोडी धिटाई आली होती. मनातल्या मनात "दुनिया में कितना गम है,मेरा गम कितना कम है" हे गुणुणत असायचो. त्यातच काही बेफिकीर, बंडखोर, मस्तवाल आणि उद्धट मित्रांची साथ मिळताच ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला अशी आमची स्थिती झाली होती. मात्र याच बऱ्यावाईट संगतीने आम्ही वैज्ञानिक नसलो तरी दु:खाचे रुपांतर सुखात करायला शिकलो.

एवढी कलाकारी अंगी येताच मग १९८८ साल उजाडले आणि सुरू झाली आमची मस्ती की पाठशाला. आमचे कॉलेज आमच्यासाठी नंदनवन होते. लहानपणी बागडण्याची उरलीसुरली हौस इथे कशी पुर्ण करता येईल यातच आमची विचारशक्ती गुंतुन जायची. मस्ती, टवाळखोरी आणि दंगलमंगल साठी कॉलेजचा वेळ कमी पडायचा. यासाठी मग क्लासरूममध्ये शिक्षक आले की आम्हा मित्रांचे विविध सुप्तगुण वर उफाळून यायचे आणि त्याचे प्रदर्शन घडत असे. निश्र्चितच गुरूजनांचा आम्ही आदर  करायचो तर काही गुरुवर्य आम्हाला मित्रवत वाटायचे. किंबहुना आमच्या मर्कटटोळीला कसे हाताळायचे याचे त्यांना पुरेपूर ज्ञान असावे.

द्वितीय वर्षाला स्वस्थवृत्त नावाचा विषय होता. अर्थातच "(त्यावेळी) नॉन क्लिनिकल  विषय म्हणजे निव्वळ टाईमपास" असतो हा आमचा ठाम समज होता. मधल्या सुटीत गायब होऊन आम्ही थेट शेवटच्या स्वस्थवृत्ताच्या क्लासला यायचो आणि निव्वळ उधम करायचो. काही तंतरलेले तर काही मंतरलेले विद्यार्थी इतर क्लासेसला मागच्या रांगेत बसायचे परंतु स्वस्थवृत्ताच्या क्लासला अगदी समोर ठिय्या मांडून बसायचे.  मात्र आमच्या दंगामस्तीला आवर घातला तो डॉ. जगमोहन राठी सरांनी.

उंचपुरे, गौरवर्ण, नावाप्रमाणेच चेहऱ्यावर सदैव मनमोहक स्मितहास्य आणि लोभस व्यक्तीमत्वाचे धनी असलेले राठी सर क्लासमध्ये येताच आम्ही जल्लोषात डुंबून जायचो. खरेतर योग  शिकविण्यात सरांचा हातखंडा असायचा. मात्र त्यावेळी आमच्या दृष्टीने योग हा विषय निरुपयोगी असून रसायन वाजीकरण आम्हा मित्रांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आणि कान टवकारण्याचा विषय होता. हाच विषय सरांनी शिकवावा यासाठी आम्ही मित्र आग्रही असायचो. परंतू यात ज्ञानार्जन कमी आणि मनोरंजन जास्त असल्याने तसेच आमच्या टोळक्याची दुष्ट मनिषा ओळखून सर यातून सहज मार्ग काढायचे.

खरेतर सर आम्हाला गुरु कमी मित्र जास्त भासायचे. शांत, संयमी आणि एखाद्या हिरो सारखे व्यक्तीमत्व लाभलेले सर विद्यार्थ्यांत प्रचंड लोकप्रिय होते. मुख्य म्हणजे कबीर बेदी नंतर चेहऱ्यावर दाढी शोभायची ती फक्त राठी सरांच्या. विशेष म्हणजे द्वितीय वर्षाला आमची आनंदवनला शैक्षणिक सहल आयोजित केली होती. आमच्या क्लासची किर्ती पाहता सहसा कोणीही शिक्षक सोबत यायला धजावत नसायचे. कारण आमच्या खोड्या आणि धिंगाणा पाहता आम्ही आमच्या पुर्वजांचे अर्थातच बंदरांचे खरेखुरे वारसदार आहोत यात कुणालाही शंका येत नसायची, त्यामुळे अशा बॅचच्या दूर राहणेच गुरूजन पसंत करायचे.

तरीपण राठी सरांनी हे शिवधनुष्य योग्यरीत्या पेलले आणि आम्ही सर्वांनी सहलीचा मनमुराद आनंद लुटला. ३६४ दिवस हसण्या खिदळण्यात गेले की त्याची भरपाई वायवा म्हणजेच तोंडी परिक्षेत व्हायची. विषमज्वर म्हणजे मलेरिया की टायफॉइड यातच आमचा नेमका घोळ व्हायचा आणि वायवामध्ये तोच लोच्या झाला. अखेर शेवटची हेल्पलाईन म्हणून आमच्या नजरा राठी सरांवर खिळल्या. सर मात्र नेहमीप्रमाणेच निर्गुण निराकार आणि शांतचित्ताने आमची घालमेल बघत होते. अखेर मंदस्मित करत सरांनी "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" चा संकेत देताच आम्ही नि:श्र्वास सोडला होता आणि दुसऱ्या वर्षीची परिक्षा पहिल्या प्रयत्नातच उरकवली होती.

आपल्या स्वच्छ प्रतिमेने आणि आपुलकीच्या वागण्याने सरांनी विद्यार्थ्यांच्या ह्रदयावर कायम राज्य केले आहे. "श्री" मधून सरांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि युजी, पीजी, विभागप्रमुख ते उपप्राचार्य पदापर्यंत यशस्वी मजल मारली. सर सध्या डी वाय पाटील आयुर्वेद विद्यापीठात पीएचडी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.२०१४/१६ या कालावधीत निमा नागपूर संघटनेचे अध्यक्षपद सरांनी उत्तमपणे भुषविले. तर आपल्या संघटनकौशल्याने लायन्स क्लबमध्ये अध्यक्षपद आणि झोन चेअरपर्सन पदांची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळली. सोबतच विदर्भ प्रांतिय आयुर्वेद संम्मेलनचे कोषाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे.

जवळपास ३४ वर्षांचे शैक्षणिक ज्ञानकुंड चेतवत सरांनी शेकडो विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांना केवळ ओरडून, शिक्षा करून किंवा नापास करून नाही तर त्यांच्यात विश्र्वास जागवून आणि खेळीमेळीच्या वातावरणाने घडवता येते हे त्यांनी दाखवून दिले आहे. आजही सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात सरांचा उत्साह आणि वावर एखाद्या तरुणाला लाजवणारा आहे. विशेषतः मी आणि प्रदिप पाटील म्हणजेच जय विरुची जोडी भेटली की सरांची कळी आणखीनच खुलते आणि आम्ही गप्पांत रमून जातो.

मनमोकळा स्वभाव आणि अजातशत्रू असलेले राठी सर आज वयाची ६८ वर्षे पूर्ण करून ६९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. खरेतर चिरतरुण असलेले राठी सर जरी २०१३ साली निवृत्त झाले असले तरी आजही टाईम ट्रॅव्हल करून परत १९८८ मध्ये जावे, सरांच्या क्लासमध्ये पुन्हा खेळीमेळीच्या वातावरणात पुन्हा रंगून जावे असे मनोमन वाटते. मात्र आपण सर्व वेळेसमोर खुजे आहोत. ते कॉलेजचे रम्य दिवस आणि त्या सोनेरी आठवणींनी आजही मन उचंबळून येते. आपण सर्वांतर्फे श्रीयुत राठी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्र्वर आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
🙏🌹🙏
**********************************
दि. १८ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Wednesday, November 16, 2022

मरावे परी फ्रिजरुपी उरावे,,!

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
        *मरावे परी फ्रिजरुपी उरावे,,!*
             *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
नुकतेच दिल्ली येथील श्रद्धा हत्याकांड उघडकीस आले आणि समाजमन परत एकदा ढवळून निघाले आहे. कल्पनेपेक्षाही भयंकर घडलेल्या या कृत्याने मानव हा अजूनही पशू अवस्थेतच आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आधुनिकतेचा हव्यास, मला कोणाचीही गरज नाही, मला सर्वकाही कळते, मी सज्ञान आहे, मी कमावती आहे, हम जमाने के साथ है, आईवडील नातेवाईक जणुकाही खलनायक आहेत अशा सर्व प्रकारच्या विचारांच्या परिपाकातून, कायद्याला वाकुल्या दाखवत ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. तसेच यानिमित्ताने केवळ मुलांना जन्माला घातले म्हणजे पालकांची कर्तव्यपुर्ती होते असे नाही तर व्यवस्थीत, निकोप, योग्य प्रकारे त्यांचे पालनपोषण केले नाही तर अशी परिस्थिती कोणावरही येऊ शकते.

झाले काय तर या हत्याकांडाला लव्ह जिहादचे लेबल लावले की सर्वकाही प्रश्न सुटल्यात जमा आहे असे अजिबात नाही. किंबहुना अशा घटना वारंवार का घडतात आणि नेमक्या हिंदू मुलीच का बळी पडतात याचाही विचार करणे तेवढेच गरजेचे आहे. यांत सर्वात पहिले मुद्दा येतो घरगुती कारणांचा. आजकाल मुलंबाळं झाले की आईवडिलांना आभाळ ठेंगणे वाटते. मुलांना जन्म देऊन त्यांनी कोणतेतरी पारलौकिक कार्य केल्याचा त्यांना भास होतो. यापूर्वी कोणी मुलांना जन्म दिला नाही आणि यापुढे कोणाला मुलंबाळं होणार नाही या थाटात आईवडीलांचा तोरा असतो. मात्र घराच्याच बाजूला मोकाट कुत्री दर सहा महिन्याला कमीतकमी अर्धा डझन पिल्ले देतात हे ते सोयीस्करपणे विसरतात.

कुटुंबात माय डॉटर माय प्रिंन्सेस पासून मेरा बेटा मेरा राजकुमारची टेप चालू होते भलेही मग कमरेला फाटकी चड्डी का असेना. यातच मग मुलांचे फाजील लाड चालू होते. आईवडील मुलांचे पालक असूनही जणुकाही ते मुलांचे सेवक असल्यासारखे वागतात. मुलांनी जे म्हटले ते घेऊन देतात, मग आर्थिक परिस्थिती असो वा नसो. मात्र बरेवाईट काय, योग्य काय हे सांगायचे विसरतात. सोबतच मुलांना ना ऐकवण्याची सवय लावतांना दिसत नाही. अशाच फाजील लाडांचे परिणाम म्हणून मुलांत व्हिआयपी सिंड्रोम तयार होतो, मुलं शेफारून जातात आणि आईवडिलांना कवडीची किंमत देत नाहीत.

यासोबतच कुटुंबातील सदस्यांत किती सौहार्दाचे वातावरण आहे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. पालकांचा आपसात सुसंवाद नसेल तर घराचे स्मशान व्हायला वेळ लागत नाही. कुठेकुठे पालक आपली जबाबदारी विसरून मुलाबाळांसमोर लैला मजनू सारखे राहतात. अथवा पटापट मुलं जन्माला घालून पालक आपल्या अलग विश्वात रमत असतात. तर कुठे मुलांना पालकांसमोर तोंड उघडण्याची परवानगी नसते. अशा आणि यासारख्या परिस्थिती मुळे मुलांचा भावनिक कोंडमारा होतो. यातून मग भावनाशून्य मुलं निपजतात. जोपर्यंत मुलं लहान आहेत, परावलंबी आहेत तोपर्यंत हा बालज्वालामुखी शांत असतो. युवावस्थेत हार्मोन्सचा तडका लागताच हा ज्वालामुखी उफाळून येतो.

मुलांना सर्वकाही घेऊन दिले म्हणजे आपली जबाबदारी संपली असे नव्हे तर त्यांना आपुलकीची, प्रेमाची सुद्धा गरज असते. परंतु आजकाल पालकांकडे एवढा वेळ असतोच कुठे? मग यातूनच कुठे कोणी प्रेमाचे जाळे फेकले तर अशी मुलं त्यात अलगद फसतात. आपल्याला कोणीतरी विचारतोय, भाव देतोय या कल्पनेनेच मुली भारावून जातात. तसेही आपली मुलं नक्की काय करतात, कोणाला भेटतात याचे काही सोयरसुतक नसल्याने टपलेल्या गिधाडांचे आयतेच फावते. सोबतच मुलं सज्ञान असली, कमावती असली तर वेगळे विचारायलाच नको.त्यातच गर्लफ्रेंड, ब्वॉयफ्रेंडला लिव्ह इन चे कोंदण लाभले की नैतिक अनैतिकतेचा संबंध येतोच कुठे?

खरेतर अशावेळी मुलींना आणखी जबाबदारीने वागायला हवे. कारण छुरी खरबुजेपे गिरे या खरबुजा छुरी पे गिरे, आखिर कटना तो खरबुजेको ही है. शिवाय आपण नक्की कोणासोबत जात आहोत याचे तारतम्य कोण बाळगणार? आपले रितीरिवाज काय,मान्यता काय, आवडनिवड काय याचा विचार करायलाच हवा. दुरून डोंगर साजरे असते मात्र डोंगरावर गेल्यावर दगडधोंडे असतात त्याचे काय? शिवाय अशा घटना वारंवार घडत असताना आपण सावध व्हायला नको काय? प्रत्येक वेळी विषाची परिक्षा करणे जरूरी असते काय? आईवडील, नातेवाईकांना काहीतरी समजत असेल तेंव्हाच त्यांनी आफताबच्या संबंधांचा विरोध केला असेल ना, आईवडील प्रत्येक वेळी बरोबर नसले तरी प्रत्येक वेळी चुकीचे कसे काय असू शकतात याचाही एकदा विचार करायला हवा होता.

राहिला प्रश्न आफताबचा तर जणुकाही ही एक समांतर व्यवस्था तर जाणुनबुजून तयार केली नाही ना असे वाटते. एवढे क्रौर्य करायला त्याचे हात धजावलेच कसे हा प्रश्न आहे. एवढा गुन्हा त्याने एकट्याने केला की आणखी कोणी त्यात सामील आहे याचाही तपास व्हायला हवा. श्रद्धाच्या शरीराचे पस्तीस तुकडे करेपर्यंत आणि विस दिवस ते फ्रिजमध्ये भरून ठेवेपर्यंत त्या सोसायटीत कोणालाच याचा सुगावा कसा काय लागला नसेल? किंबहुना एखाद्याला काही कल्पना आली असेल तरी मला काय त्याचे या मानसिकतेतून ही घटना दडली गेली असावी. केवळ आफताबच कशाला आजच्या युवापिढी समोर आपण काय वाढून ठेवलंय याचा मागोवा कोण घेणार? बालपणापासून ते युवावस्थेपर्यंत मग ते टीव्ही, व्हिडिओ गेम असो की सोशल मिडिया अथवा चित्रपट,,,! बलात्कार,खून, मारामाऱ्या सारख्या असंख्य घटना त्यांच्या नजरेखालून गेल्या असतात.

त्यातच सामाजिक जीवनात, सोशल मिडियात अनैतिकता, अनाचाराचे उदात्तीकरण त्यांच्यातल्या पशूला खतपाणी घालत असतात. कोणी समजवायला गेले तर त्याची अडाणी, गावरान, जुनाट विचारांचे, आउटडेटेड लोक म्हणून खिल्ली उडविली जाते. पहिले तर मुलांवर केवळ घरच्यांचाच नव्हे तर मोहल्यातील थोरमोठ्यांचा वचक राहत असे. आजकाल तर घरातले मोठे लहानांना वचकून राहतात. मग कसले संस्कार आणि कसली जीवनमुल्ये राहणार? शिवाय कायद्याचा धाक तरी कुठे उरला आहे? अन्यथा एवढं क्रौर्य करताना खुन्याने दहावेळा विचार केला असता. दोषींना सजा आणि पिडीतांना न्याय मिळण्याबाबत तर बोलायलाच नको. तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात पिडीतांचे अश्रू आटून जाते मात्र पदरात न्याय पडेल की नाही याची शाश्वती नसते.

अशा प्रकरणात फारतर जनता धरणे, आंदोलन, मोर्चा, निषेध यापलिकडे काय करणार! तसेही आरोपी आफताब असल्याने ढोंगी पुरोगामी, बॉलिवूड, बडी बिंदी आणि डर लगता है गॅंग या हत्याकांडाबाबत मुग गिळून बसणार. जन पळभर म्हणतील हाय हाय करत हे हत्याकांड पण काळाच्या विस्मृतीत जाईल. मात्र ही भुताटकी प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येईल तेंव्हाच आम्हाला जाग येईल काय हा प्रश्नच आहे. आज श्रद्धा गेली उद्या आणखी कोणी दुसरी जाईल, ही श्रृंखला कधी तुटणार याचे उत्तर कोण देईल? मुलींच्या नशिबात तंदुरी, सुटकेस ते फ्रिजपर्यंतचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार? एकट्या आफताबला फाशी देऊन खरेच ही समस्या सुटेल काय? केवळ पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाच्या भरवशावर हा विषय सुटणार नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सोबतच माझी सामाजिक जबाबदारी जोपर्यंत आपण ओळखणार नाही, स्वीकारणार नाही तोपर्यंत अशाच अनेक श्रद्धांना आपल्याला श्रद्धांजली वाहावी लागणार. अर्थातच मुलींनी अशा दुर्दैवी घटनांतून योग्य तो बोध घ्यावा, अन्यथा मरावे परी फ्रिजरुपी उरावे यातून तुमची सुटका कोणीही करू शकणार नाही.
**********************************
दि. १६ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, November 11, 2022

ॲडीलेडला घोडं का अडलं?

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *ॲडीलेडला घोडं का अडलं?*
             *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
ॲडीलेड ओव्हलवर झालेल्या उपांत्य सामन्यात अखेर इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत उत्सुकता लागलेल्या या लढतीत इंग्लंडने शत प्रतिशत कामगिरी करत टीम इंडियाला अक्षरशः कान धरून बाहेर काढले आहे. दोन्ही संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत जमीन अस्मानाचा फरक असल्याचे इंग्लंड संघाने दाखवून देत ते फायनलमध्ये थाटात दाखल झाले आहेत. उपांत्य फेरीत प्रारंभ ते शेवटपर्यंत टीम इंडिया इंग्लंडचे चक्रव्यूह भेदू शकली नाही आणि अखेर ॲडीलेडला टीम इंडियाच्या घोड्याने पेंड खाल्लं.

झाले काय तर 'जींदा रहने के लिये तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम' असे म्हटले जाते. अगदी असेच फायनल पर्यंत जीवंत राहण्यासाठी टीम इंडियाला आरसा दाखवणारा एकतरी सामना हवा होता. आपल्या नशिबाने आपल्या संघाची स्थिती दाखवणारे तब्बल तीन सामने आपल्या वाट्याला आले होते. प्रारंभीला पाकविरुद्ध आपले प्राण कंठाशी आले होते तर द.आफ्रिकेने आपल्याला चक्क धोबीपछाड दिली होती. त्यातच हाफ टिकीट बांग्लादेशविरुद्ध आपण धापा टाकत जिंकलो होतो. मात्र विनिंग कॉम्बीनेशन बदलायचे नाही या अंधश्रद्धेतून आपला संघ बाहेर पडला नाही.

आपली फलंदाजी विराट, सूर्यकुमार आणि पांड्या भोवती केंद्रीत राहिली. सलामी जोडी रोहीत राहुल म्हणजे जागते रहो मेरे भरोसे मत रहो सारखे होते. त्यातच राहुलने उपांत्य फेरीपुर्वी दोनदा पन्नाशी गाठली. मात्र या दोन खेळींच्या मुद्दलावर तो आणखी कितीदा टीम इंडियाला वेठीस धरेल हे सांगता येत नाही. सेमीफायनलला राहुलची फ्लॉप खेळी पाहण्यापेक्षा राहुलबाबाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असते तर क्रिकेट रसिकांचे तेवढेच मनोरंजन झाले असते.जणुकाही के एल राहुलला झेलणे आता अनिवार्य झाले आहे असे त्याच्या संघातील अढळस्थानावरून वाटत आहे.

खरेतर टीम इंडिया सेमीफायनल साठी मानसिक दृष्ट्या तयार होती की नाही हा प्रश्नच पडतो. ज्याप्रमाणे आपली संथ सुरूवात झाली ती पाहता आपल्यासाठी दिडशेचा टप्पा म्हणजे 'दिल्ली बहोत दूर है' झाले होते. मात्र विराट, पांड्या ने पुन्हा एकदा संघाला तारून नेले. अर्थातच आपल्या फलंदाजीतील उणीवांसोबतच इंग्लंडच्या गोलंदाजांनाही दाद द्यावी लागेल. कधीकाळी फिरकीपटूंना धुवून काढणारे भारतीय फलंदाज आदील रशीद, लीविंगस्टोन समोर चाचपडत होते. तर सूर्यकूमारविरूद्ध गोलंदाजांनी वेगात बदल करत त्याची वाघनखे काढून टाकली होती. तरीपण एकशे अडुसष्ट धावा आपल्या गोलंदाजांसाठी अपुऱ्या नव्हत्याच. मात्र गरज होती ती 'धावा रक्षति रक्षित:' हा मुलमंत्र जपण्याची आणि तिथेच सगळा घोळ झाला.

विश्वचषकापासून दोन पावलं दूर असलेल्या टीम इंडियाला करबो लडबो जीतबो शिवाय पर्याय नव्हता आणि यासाठी सुरवातीला बळी टिपणे हा एकमेव मार्ग होता. आपला उद्देश स्पष्ट होता परंतु आपले शस्त्र बोथट निघाले. निरूपा रॉयने जितकी लेकरं हरवली नसतील तितक्या धावा भुवनेश्वर कुमार सहज सांडवतो. भुवीने धावांचे कॉक उघडताच मैदानात ॲलेक्स हेल्सच्या रुपात हेल स्टॉर्म अवतरले. जोडीला बटलरचा जोश असल्यावर टीम इंडियाच्या दुःखाला पारावर उरले नाही. गोलंदाजीत बदल जरूर होत गेले परंतु त्यांना अनलिमिटेड मार चुकला नाही. इंग्लंडच्या बेदरकार फलंदाजी पुढे आपल्या गोलंदाजांची घडी विस्कटून गेली. आपले लक्ष्य गाठायला इंग्लंडला सोळा षटकं पुरेशी ठरली.

निश्चितच खेळ म्हटले की हारजीत तर होणारच. परंतु सध्यातरी आपला संघ फारतर द्विपक्षीय मालिका जिंकतो आणि आयसीसी स्पर्धेत ढेपाळतो. हे म्हणजे चढाई जिंकून लढाई हरण्यासारखे आहे. घरमे शेर बाहर मे ढेर आणखी किती दिवस चालणार? याची सुरुवात संघनिवडीपासून व्हायला हवी. आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळणारे आपले खेळाडू आयसीसी स्पर्धेच्या वेळी कसे काय अनफीट होतात. टी ट्वेंटी विश्वचषक डोळ्यासमोर असतांना बुमराहला ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विपक्षीय मालिकेत का खेळवले गेले? त्यातही कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी ट्वेंटीसाठी योग्य खेळाडू शोधून तयार करणे गरजेचे आहे. 'जो फिट है वो हिट है' असे असतांना वयस्कर खेळाडूंना सन्मानाने निरोप द्यायला हवा मग तो कोणताही खेळाडू असो.

फलंदाजीत राहुल रोहीत, गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार अश्विन, यष्टीरक्षणात पंत कार्तिक आणि कर्णधार म्हणून परत एकदा रोहीत राहुलचे पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे. खायला काळ आणि भुईला भार असणारे खेळाडू संघात ठेऊन शेवटी आपलाच कपाळमोक्ष होत आहे. जरी टीम इंडिया सेमीफायनल जिंकली असती तरी उपरोक्त खेळाडूंच्या क्षमतेवर कधी ना कधी प्रश्नचिन्ह निर्माण झालेच असते. जोपर्यंत संघ जिंकत आहे तोपर्यंत अपयश झाकले जाते परंतु पराभव होताच ह्या जखमा ठळकपणे दिसून येतात. यासोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळण्याबाबत सुतोवाच केले आहे त्याबाबत विचार व्हायला हवा.

कधीकाळी फिरकीसमोर लेझीम खेळणारे परदेशी खेळाडू आयपीएलच्या बुस्टर डोझने आता फिरकी सहज खेळतात. अश्विन अक्षर चहल देशात गाजतात पण विदेशात मार खातात. मो. सिराज, हर्षल पटेलला संधी मिळाली नाही तर दिपक हुड्डा मिळालेल्या संधीचे सोने करू शकला नाही.  याउलट पाक संघाने सुरवातीला दणके खाऊनही तो संघ अंतिम फेरीत पोहोचला. अर्थातच यात 'तेरी मेहरबानीया तेरी कदरदानीयाचा' सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांनी सेमीफायनलला किवीजला बुकलून काढत आपला दम दाखवून दिला. तिच कहानी इंग्लंडची, आयर्लंड कडून पराभवाची नामुष्की पत्करुनही त्यांनी आपला दर्जा उंचावत फायनलमध्ये धडक मारली.

खरेतर पराभवाचे पोस्टमॉर्टेम करताना संघनिवड, संघबदल अत्यंत गरजेचे आहे. तसेही भाकर परतवली नाही तर करपते, घोडा फिरवला नाही तर अडतो याचप्रमाणे टीम इंडियात फेरबदल अपेक्षित आहे. सुनिल गावस्कर यांनी सुद्धा काही खेळाडूंच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत ते अगदी योग्य आहे. नाही तर जबतक सूरज चांद रहेगा, राहुल तेरा (टीम मे) नाम रहेगा म्हणून काय फायदा होणार? खेळाडूंचे प्रदर्शनानूसार मुल्यमापन कधी होणार? भुतकाळातील कामगिरीने आणखी किती वेळ वर्तमानाचा बळी देणार? यशाला अनेक बाप असतात, अपयश अनाथ असतं. तरीपण टीम इंडियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कडू गोळी नव्हे तर सर्जिकल ऑप्शन कधीही योग्य राहील. अन्यथा येरे माझ्या मागल्या होईल आणि टीम इंडियावर नेहमी करीता 'गुड फॉर सेमीफायनल' चा ठप्पा लागेल. 
*********************************
दि. ११ नोव्हेंबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, November 7, 2022

मंतरलेल्या दिवसांचे तंतरलेले साथीदार,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
   *मंतरलेल्या दिवसाचे तंतरलेले साथीदार*
*************************************
आपल्या जिवनात आईवडील आणि गुरुसोबतच मित्रांचे अनन्यसाधारण महत्व असते. आपले राहणीमान, वागणूक आणि सामाजिक वावर यावर आपल्या मित्रपरिवाराचा चांगलाच ठसा उमटला असतो.Man is known by company  he keeps असे म्हटले जाते ते याकरीता. विशेषतः कॉलेजच्या दिवसातले मित्र आपल्याला जास्त जवळचे वाटतात कारण ते जास्तवेळ आपल्या सोबत असतात आणि मुख्य म्हणजे या मैत्रीला युवावस्थेचा तडका, उत्साहाची भरती आणि बेफिकरीची धुंद असल्याने एक आगळीवेगळी मजा असते. अर्थातच मैत्री हा माझा विकप्वाईंट असल्याने मी बालपणापासून माझा मित्रपरिवार चांगला जपला आहे. याबाबतीत तरी मी जो मित्रवान तो भाग्यवान आहे असे ठामपणे म्हणू शकतो.

"श्री" ८६ बॅचला ज्या बेधुंद आणि धुरंदर मित्राची संगत लाभली त्यात प्रदिप पाटीलचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपल्या धुंदीत जगणारा हा अवलीया बाकी जगाला सिगरेटच्या  थुटक्याऐवढीही किंमत देत नसे. शर्टची वरची दोन बटने उघडून, गळा चेहऱ्यावर पावडर शिंपडून, सर्वांना दिसेल असा सोन्याचा गोफ गळ्यात घालून ही स्वारी कॉलेजच्या पोर्चमध्ये उभी राहीली की आमचे थ्रीडी स्कॅनींग चालू व्हायचे. अर्थातच आमच्या हाती काही नाही यायचे पण याच्या गळाला अलगद मासे फसायचे.

अभ्यासाच्या नावाने आनंदीआनंद असल्याने सहजा कोणी क्लासमध्ये बसण्यास अजिबात उत्सुक नसायचो. मात्र घरून आणलेले खाण्याचे डब्बे लंगरमध्ये आल्यासारखे कोणीही खाऊन मोकळे व्हायचे आणि माझी उपासमार व्हायची. परंतु प्रदिप पाटील आणि युवराज काळे हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले असल्याने माझी पोटपाण्याची चांगली सोय व्हायची. या दोघांनी कॉलेज जिवनापासून ते आतापर्यंत कधीही मला बिलाकरीता खिशात हात टाकू दिला नाही. अशी आमची मैत्री ही कृष्णसुदाम्याच्या तोडीचीच आहे. 
 
प्रदिप गांधीनगरला आणि मी देवनगरला राहत असल्याने एकमेकांकडे नियमीतपणे जाणेयेणे असायचे. जेव्हा प्रदिपच्या परिवारातील सदस्य बाहेरगावी जायचे तेव्हा मी प्रदिपकडे स्वयंपाक करून आम्ही चांगला ताव मारत होतो. आता मात्र मी पाककला विसरत चालल्याने स्वयंपाकघरात फक्त जेवनापुरती उपस्थिती लावतो.

 त्याकाळी दुरदर्शनवर युजीसीचा कंट्रीवाईड क्लासरुम नावाचा कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचा. अगदी तद्वतच आमचा कंट्रीवाईन क्लासरुम प्रोग्राम असायचा. अर्थातच त्या वयात काय बरे, काय वाईट याची फारकाही समज नसल्याने किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अथवा आपण वेगळ्याच ग्रहावरचे प्राणी असल्याची गुर्मी असल्याने आम्ही कोणालाच मोजत नव्हतो ना कुणाची फिकर करत होतो.  

मात्र बाहेर कितीही बेशिस्त वागलो तरी आम्हाला आमच्या गुरूजनांचा विशेष लळा होता. कारण ते काय शिकवायचे आणि आम्ही काय समजायचो याचे काही सोयरसुतक नसल्याने आनंदीआनंद होता. मुख्य म्हणजे पहिले एकदोन क्लास होताच आमचा संयम सुटायचा, मग कधी संगम टॉकीज तर कधी आशिर्वाद टॉकीजकडे मोर्चा वळायचा. मस्तपैकी मॅटीनी शो पाहून ताजेतवाने झालो की संस्कृत किंवा स्वस्थवृत्ताच्या क्लासमधये झोपा काढायचो.

 त्याकाळी श्री राठी सर स्वस्थवृत्त तर पंडीत श्री शर्मा सर संस्कृत शिकवायचे. श्री राठी सर आमचे आवडते सर. त्यांचे ते राजबिंडे रुप, एखाद्या हिरोसारखे व्यक्तीमत्व आणि मुख्य म्हणजे युवा विद्यार्थ्यांसोबत त्यांची केमिस्ट्री चांगली जुळल्याने ते आम्हाला मित्रासारखे वाटायचे. संस्कृतचा क्लास म्हणजे आमच्यासाठी काला अक्षर भैस बराबर असायचा. परंतु खोड्या करायचो, चित्रविचित्र आवाज काढायचो आणि पंडीतजी मग अंगावर खेकसत आम्हाला क्लासबाहेर काढायचे,, याच्यात आम्हाला स्वतःचा गौरव वाटायचा.

युजी आणि पीजी आम्ही दोघेही सोबत असल्याने आमची ढवळ्यापवळ्याची जोडी नेहमी चर्चेत रहायची. विशेष म्हणजे "पीजी"ला प्रदिपने "पीजीओ" जिप घेतली आणि तो ड्रायव्हर तर मी कंडक्टर म्हणून गुरूजनांच्या सेवेत २४ तास असायचो. पीजी आटोपताच दोघांनीही आपापले वेगळे बस्तान मांडले आणि आपापल्या संसारात रमलो. परंतु नेमके एकाचवेळी दोघेही काळाच्या दुष्टचक्रात सापडल्याने चांगलेच भरडले गेलो. संदर्भ वेगळे, पार्श्वभूमी वेगळी असली तरी ज्याचे जळते त्यालाच कळते अशी परिस्थिती होती.

मात्र संकटाला संधी समजून पुढे जाण्यातच खरा अर्थ असतो. झाले काय तर संकटाने पिळून निघताच आम्ही दोघेही खऱ्या अर्थाने मुक्त झालो. अभिमान, दंभ, फुशारकी, स्वार्थ, फायदा, तोटा, नफा, नुकसान, मानसन्मान ही अवजड लक्तरे आपोआप गळून पडायला लागली आणि उरले ते निर्मळ मन. आयुष्यात संकटे तर येणारच मात्र आपण त्याला कसे तोंड देतो हे जास्त महत्त्वाचे आहे. 

आज प्रदिप आयुष्यातील प्रचंड उलथापालथ पचवून ठामपणे उभा आहे. अर्थातच Behind every successful man, there is a woman हे विसरून कसे चालणार? प्रदिपच्या आयुष्यात आलेल्या वादळी तुफानाला परतवून लावतांना अर्चना वहिनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत साक्षात सावित्रीलाही मागे टाकले. या दोघांच्या संसारवेलीवर अतिशय गोड आणि गुणी अशी रुचा आणि रिया ही फुले उमलली आहे. कर्मधर्मसंयोगाने आज प्रदिप आणि रुचा या दोघांचाही  वाढदिवस आहे. आपण सर्वांतर्फे या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिवनाकरीता प्रभुचरणी मंगलप्रार्थना.
🌹🌹🌹💐💐💐💐🎂🎂🍰🍰🥧🥧🍮🍮🍭🍭🍬🍬🍫🍫🍫🍿🍿🌹🌹🌹🌹💐💐
डॉ प्रदिप पाटील हे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, त्रिमुर्तीनगर, नागपुरचे संचालक असून नॉन सर्जिकल कार्डीॲक उपचार पद्धतीचे तज्ञ आहेत.
*************************************
दि. ०६ नोव्हेंबर २०२२
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Thursday, November 3, 2022

राहुल गडाला जेंव्हा जाग येते,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *राहुल गडाला जेंव्हा जाग येते*
            *डॉ अनिल पावशेकर*
********************************
ॲडीलेड ओव्हल मैदानावर रंगलेल्या लढतीत टीम इंडियाने बांग्लादेशाचा कडवा प्रतिकार मोडून काढत सेमीफायनलचे तिकीट जवळपास कन्फर्म केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा कायम ठेवणाऱ्या या द्वंदात अखेर बांग्लादेशी फलंदाजांचे प्रयत्न तोकडे पडले आणि तमाम भारतीय पाठीराख्यांचा जीव भांड्यात पडला. मुख्य म्हणजे आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या के एल राहुलला ऐनवेळी फॉर्म गवसला आणि केवळ फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही त्याने चुणूक दाखवत संघाच्या विजयात हातभार लावला. एक खेळी, एक थ्रो सामन्याला कशी कलाटणी देऊ शकते हे राहुलच्या खेळी वरून आज दिसून आले.

झाले काय तर द.आफ्रिके विरूद्धच्या पराभवाने टीम इंडियावर जे शंका कुशंकांचे मळभ होते, त्याला आजच्या प्रदर्शनाने धुवून काढले आहे. खरेतर भारतीय संघाचा प्रारंभ आजही नेहमीप्रमाणेच झाला. सुरुवातीला रोहीतला जीवदान मिळूनही तो त्याचा फायदा उठवू शकला नाही. मात्र या सामन्यात राहुल जणुकाही शक्तीमान बनून आला होता. तीन चौकार आणि चार षटकांची बरसात करत त्याने सामन्याचा केवळ अर्धशतकच नाही झळकवले तर बांगलादेशी गोलंदाजांची दादागिरी संपुष्टात आणली. मात्र भारतीय फलंदाजीचा भार खऱ्या अर्थाने उचलला तो विराटने. जणुकाही कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हे केवळ त्याच्यासाठीच लिहिले असावे असे वाटते.

सध्यातरी भारतीय फलंदाजीचा ठेका विराट, सूर्याकुमार यादव या बडे मियां छोटे मियां जोडीकडे असेच वाटते. रोहीत, पांड्या आणि दिनेश कार्तिक यांना अजूनही फलंदाजीचा शुभमुहूर्त सापडलेला दिसत नाही. त्यामानाने राहुलने देर आए दुरुस्त आए करत थोडाफार डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. या विश्वचषकात विराटचा फलंदाजी आणि या सामन्यातील त्याच्या चौसष्ट धावा पाहता आयसीसीने  चौसष्टाव्या जारण मारण या कलेला विराट मर्दन कला म्हणून गौरविल्यास वावगे वाटू नये. भलेही विराट सेहवाग किंवा ख्रिस गेलसारखी गोलंदाजांची कत्तल करत नाही परंतु कोळ्यासारखे जाळे विणून गोलंदाजांना नामोहरम करतो.

सामन्याचा पुर्वार्ध निश्चितच टीम इंडियाने गाजवला मात्र खरी मजा उत्तरार्धात आली. ऐनवेळी बांगलादेशी सलामीवीरांनी टायगर अभी जींदा है दाखवून देत भारतीय गोलंदाजांना पळती भुई थोडी केली. बांगलादेशच्या धडधडत सुटलेल्या मिताली एक्स्प्रेसने रोहीतची धडधड वाढवली होती.(दोन्ही देशांच्या दरम्यान मैत्री, बंधन, मिताली अशा तीन एक्स्प्रेस चालतात.) त्यातही लीटन दासने भारतीय गोलंदाजांना आपले दास बनवल्याने आपल्या गोलंदाजांकडे दे रे कान्हा चोळी लुगडी म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. तसेच त्याने मागेल त्याला चौकार षटकार देऊ केल्याने नक्की कोणाला गोलंदाजी द्यावी हा रोहित पुढे यक्षप्रश्नच होता. मैदानावर जणुकाही आमार शोनार बांग्लाची स्वप्नपूर्ती होते की काय अशी भिती वाटू लागली होती.

अखेर दवा काम नहीं करती, दुवां काम करती है हेच खरे ठरले. वरुणराजाने वाईल्ड कार्ड एंट्री मारताच बांग्लादेशचा संघ ओल्या दुष्काळात सापडला. तर तिकडे क्रिकेटचे राहुकेतू म्हणजेच डकवर्थ लुईस नियमाने सामन्याचा ताबा घेतला. वास्तविकत: या नियमाने प्रथमच दोन्ही संघांना फायदा झाला. बांगलादेशला सोपा पेपर मिळाला मात्र पावसाच्या व्यत्ययाने बांगला संघ फलंदाजीचा टेम्पो हरवून बसल्याचा फायदा आपल्याला झाला. सामना पुन्हा सुरू होताच दुसऱ्या चेंडूवर राहुलने अफलातून थ्रो करत लीटन दासला रिटर्न दास केले. खरेतर इथुनच बांग्लादेशाची गाडी रुळावरून घसरू लागली. राहुलचा हा रॉकेट थ्रो टीम इंडियासाठी विजयाचा पोस्ट डेटेड चेक होता. इथुनच भारतीय संघाचे मनोबल सातव्या अस्मानावर गेले. लगेचच दहाव्या षटकात मो.शमीने नजमूल हसनला जाळ्यात ओढत बांग्लादेशला दुसरा धक्का दिला.

सामना सोळा षटकांपुरता मर्यादित झाल्याने मैदानावर प्रचंड कापाकापी अपेक्षीत होती. मात्र बारावे षटक बांगलादेशचे बारा वाजवून गेले आणि याचे श्रेय जाते सिंग इज किंग अर्शदिपला.त्याने अफीफ हसन आणि शाकिब अल हसनला आपला बकरा बनवले. मुख्य म्हणजे आज गोलंदाजांच्या मेहनतीला न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केले. राहुलच्या परफेक्ट थ्रो ने चार्ज झालेल्या सूर्यकुमार आणि दिपक हुड्डाने डिपमध्ये सामन्याचा दबाव झेलत उत्कृष्ट झेल पकडले. अर्शदिपचाच कित्ता गिरवत पांड्या ने तेराव्या षटकांत डबल धमाका करत बांग्ला संघाची तिरडी बांधणे सुरू केले.

चौदाव्या षटकांत अर्शदिपने टिच्चून मारा केला आणि बांग्ला संघाला शेवटच्या दोन षटकांत जवळपास एकतीस धावा हव्या होत्या. प्रसंग बिकट होता. कारण चेंडू पांड्याच्या हाती होता. खरेतर पांड्या असो वा भुवनेश्वर कुमार, शेवटून दुसरे षटक यांच्या हाती देणे म्हणजे विजय माल्याला भरमसाठ कर्ज‌‌‌ देण्यासारखे जोखमीचे काम होते. मात्र पांड्या आपल्या व्यापारी वृत्तीला जागला. पंधराव्या षटकात त्याने एक चौकर षटकार खाऊनही फक्त अकरा धावा दिल्या. शेवटचे षटक अर्शदिपच्या वाट्याला आले आणि पुन्हा एकदा त्याला हिरो बनन्याचा चान्स मिळाला. त्याला दुसऱ्या चेंडूवर षटकार बसुनही पठ्ठ्याने धीर सोडला नाही आणि खोलवर टप्पा ठेवत बांग्ला संघाची कबर खोदली.

मध्यंतरानंतर थरारक झालेल्या या लढतीत बांग्ला संघाची मध्यफळी अचानक कोसळली. मुख्य म्हणजे कर्णधार शाकिब 
अल हसन खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र अर्शदिप, पांड्या ने बाराव्या आणि तेराव्या षटकांत प्रत्येकी दोन बळी घेत बांगला टायगर्सला काबूत ठेवले. मैदान ओले झाल्याने आपल्या फिरकीपटूंना फारसा वाव मिळाला नाही. मात्र खेळपट्टीची साथ नसली की भुवनेश्वर कुमार कधीही आपला सेल चालू करू शकण्याची भीती राहते. तर दिनेश कार्तिकच्या किपींगवर वयाच्या सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. सामना जरी आपण जिंकला असला तरी विराट सूर्यकुमार वगळता इतर फलंदाजांना सुर गवसने गरजेचे आहे. तर राहुलने आपले प्रदर्शनात सातत्य ठेवल्यास सलामीची डोकेदुखी कमी होईल.

 समाधानाची बाब म्हणजे आज क्षेत्ररक्षणात एक धावबाद आणि चार झेल टिपत भारतीय संघाने मेरीटची कामगिरी केली आहे. याउलट बांग्लादेशी फलंदाजांनी पुढे पाठ मागे सपाट केल्याने चांगल्या प्रारंभानंतरही ते सामना जिंकू शकले नाही. राहुलची सलामीची धडाकेबाज खेळी सामन्याची रूपरेषा लिहून गेली. सलामीच्या फलंदाजाने धावा केल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम इतर फलंदाजांवर होतो तेंव्हा कुठे आपण १८४ धावा सहज जमवू शकलो. थोडक्यात काय तर राहुल गड्याला जाग आली जी टीम इंडियाच्या पथ्यावर पडली. भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. 
*********************************
दि. ०३ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Tuesday, November 1, 2022

ऑस्कर गोज टू टीम इंडिया?

‌@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *ऑस्कर गोज टू टीम इंडिया?*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
गेल्या रविवारी पर्थच्या ऑप्टस मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना झाला आणि अचानक ऑस्कर पुरस्काराची तीव्र आठवण झाली. दरवर्षी चित्रपट क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. मात्र या सामन्यात टीम इंडियाचे प्रदर्शन, देहबोली पाहता यावर्षी आपली ऑस्कर पुरस्काराने झोळी भरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्थातच मैदानातील गणिते मैदानातच सोडवली जातात तरीपण टीम इंडियाने या सामन्यात जे घालीन लोटांगण केले ते पाहता ये बात कुछ हजम नहीं हुई असेच म्हणावेसे वाटते.

झाले काय तर या विश्वचषकात बोहणीलाच परंपरागत प्रतिद्वंदी पाकला चारी मुंड्या चीत करत टीम इंडियाने आपले मिशनचा श्रीगणेशा केला होता. दुसरी लढत द.आफ्रिकेसोबत होती. याच प्रोटीयाज संघाला एकदोन महिन्याआधी आपल्या दुय्यम संघाने उठता लाथ बसता बुक्की मारली होती. मग असे कोणते आभाळ कोसळले की ज्यात आपल्या शेर संघाची शेळी झाली? मेलबोर्न आणि पर्थच्या बाऊंन्स मध्ये फारतर उन्नीस बीस चा फरक आहे. असे असताना आपले फलंदाज दहा गेले पाच राहिले सारखे का करत होते? एवढ्या लवकर आपल्या दिग्गज फलंदाजांचे हातपाय का लटपटले असावे? ऑप्टस मैदानावर असा कोणता सैतान आला होता ज्याला पाहून आपले पाच रथी महारथी फलंदाज सातच्या आंत (एकोणपन्नास धावांत पाच गडी बाद) घरात पोहचले?

खरेतर 'वेल बिगन इज हाफ डन' असे म्हणतात. मात्र राहुल रोहीत जोडीचे प्रदर्शन पाहता पहिले दोन बळी नवसाला दिल्यासारखे असतात. त्यातही कर्णधार रोहीत शर्मा कसाबसा पासींग मार्क कमावतो. मात्र के. एल. राहुलचे काय? प्रत्येक सामन्यानंतर त्याला एटीकेटी करून पुढे ढकलले जाते. इतके भिक्कार प्रदर्शन करूनही त्याचे संघातील अढळस्थान पाहता यापुढे ध्रुवताऱ्याला राहुलतारा असे नामकरण करण्याची मागणी पुढे येऊ शकते. एकवेळ निद्रिस्त ज्वालामुखी धडधडून पेटेल मात्र राहुलबाबाच्या बॅटला जाग कधी येईल ते सांगता येणार नाही. निश्चितच नशीब असावे तर राहुलसारखे. ना धावांची चिंता ना संघातल्या स्थानाची चिंता, वरून संघाचे उपकर्णधारपद. काहीही असो के एल राहुल खेळपट्टीवर धावा करायला जातो की भुमीपुजनाला जातो हे त्याने एकदा स्पष्ट करायला हवे.

प्रथम फलंदाजी करुन फळ्यावर एकशे तेहत्तीस धावा म्हणजे ऊंट के मुंहमे जीरा सारखे होते. एकूण नऊ गडी बाद झालेत आणि मुख्य म्हणजे त्यात आपले आठ फलंदाज झेलबाद झाले. बहुतेक सर्वांनाच उंच उंच उडण्याचे वेध लागले असावे. द.आफ्रिकेची गोलंदाजी निश्चितच दर्जेदार आहे यात वादच नाही. तरीपण लुंगी एनगीडीच्या चेंडूवर आपल्या फलंदाजांना लुंगी डान्स करायची काय गरज होती? सुपरफास्ट रबाडा, ॲनरीच नॉर्जेला पचवून एनगीडी,वेन पार्नेला शरण जाण्यात कोणता शहाणपणा आहे? 

तसेही फलंदाजीच्या बळकटीसाठी दिपक हुड्डाची संघात वर्णी लागली. परंतु ना त्याला फलंदाजीत चमक दाखवता आली ना त्याच्या हातात चेंडू सोपवला गेला. दिपक हुड्डा अष्टपैलू खेळाडू असून तो फिरकी गोलंदाजी करतो असे ऐकले आहे. मात्र तो कधी गोलंदाजी करताना दिसला नाही, जंगलमे मोर नाचा लेकिन किसने देखा हा प्रश्नच आहे. एकवेळ बर्म्युडा ट्रॅंगलचे रहस्य कळेल परंतु दिपक हुड्डाच्या गोलंदाजीचे रहस्य कळणे कठीण आहे.राहिला प्रश्न सूर्य कुमारचा तर अकेला चना भाड नहीं फोड सकता हे ही तितकेच खरे आहे. इतर सहकाऱ्यांनी तू चल मै आया केल्याने आपल्या संघाची घागर पुर्णपणे भरलीच नाही.

तरीपण १३३ धावांची खिंड प्राणपणाने लढली असती तर तेवढेच मनाला समाधान लाभले असते. सुरुवातीचे तीन बळी वगळता आपला संघ 'येऊ कशी कशी मी नांदायला' सारखा दिसला. आपला संघ निर्गुण निराकार भावाने जो जे वांछील ते तो लाहो करत राहिल्याने अखेर व्हायचे तेच झाले. त्यातही आपले क्षेत्ररक्षक नक्की कोणत्या संघाकडून खेळत आहे तेच समजत नव्हते. विराटच्या हाताला तर जणुकाही लोणी चोपडले असावे इतक्या सहजतेने चेंडू त्याच्याकडून सुटला. तर रोहीत शर्माने धावबाद करतांना अहिंसा परमो धर्मचा राग आवळला. अर्थातच जिथे रोहीत विराट दर्यादिली दाखवत होते तिथे इतरांनी झेल सोडले तर त्यात वावगे ते काय? निव्वळ पाच गोलंदाज घेऊन खेळणे आणि त्यातही १३३ धावांचे रक्षण, तुमच्या वस्त्रहरणासाठी अच्छे दिन होते आणि झालेही तसेच.

वास्तविकत: ही बाजी जिंकून टीम इंडिया सेमीफायनला बाजीगर ठरली असती. परंतु यामागे पाकला अडवा, पाकला जिरवा ही रणनीती तर नसावी अशी शंका येते. तसेही पाकसमर्थकांनी भारताचा पराभव होताच प्रचंड आदळआपट केली. मात्र पाकला सेमीफायनलची तिकिट देण्याचे काम बाबर आझमचे आहे. त्याने कुटूंब प्रमुख या नात्याने माझा संघ माझी जबाबदारी घ्यायला हवी. एखाद्या संघाला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी अशा चाली बरेच संघ खेळतात. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे अशी ही मानसिकता असते. यापुर्वी याचा फटका टीम इंडियाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे उगाचच तेरी कमीज मेरी कमीजसे सफेद कैसी म्हणून फायदा नाही.

 गेल्या आशिया चषकांत आपला संघही असाच उधारका सिंदूरच्या प्रतिक्षेत होता. मात्र जर तरच्या तमाशात कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. आपल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. पाकचा झिंबाब्वे विरूद्धचा पराभव आणि भारताचा द.आफ्रिकेविरूद्ध पराभव पाकला विश्वचषकाबाहेर काढण्यास पुरेसा ठरू शकतो. तरीपण भारताने जाणूनबुजून द.आफ्रिकेविरूद्ध लढत सोडली असा एक मतप्रवाह आहे. विशेषतः फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपल्या खेळाडूंचे प्रदर्शन पाहता ते ऑस्कर सहज मिळवू शकतात असा टीम इंडियावर आरोप होत आहे. 

याच मैदानावर लिंबूटिंबू झिंबाब्वे ने बलाढ्य पाकला १३० धावांत रोखलेले होते. त्यामुळे टीम इंडिया सुद्धा असा करिष्मा करू शकेल असे चाहत्यांना वाटत होते. मात्र लढतीचा अंतिम परिणाम टीम इंडियाच्या लौकिकासारखा नव्हता. मारक्रम मिलर जोडीने मिले सुर मेरा तुम्हारा करत भारतीयांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरले. अशा पार्श्वभूमीवर द.आफ्रिका,,तू जीता नहीं, तुझे जीतवाया गया है अशा संशयकल्लोळ निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र आता रात गई बात गई हे ध्यानात ठेवावे लागेल. सुदैवाने भारताचे यापुढील सामने ॲडीलेड, मेलबोर्नला आहे. त्यामुळे तिथे पर्थची वेगवान भुताटकी निश्चितच नसेल. भरीस भर म्हणून उर्वरित लढती बांग्लादेश , झिंबाब्वे विरूद्ध आहेत. त्यामुळे टीम इंडियाला सेमीफायनला जाण्यासाठी फारसे कष्ट उपसावे लागणार नाही अशी अपेक्षा आहे.
**********************************
दि. ०१ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...