Monday, February 24, 2025

सुपर संडे ला पाक चा सुपडा साफ!

 #@😈😈😈😈😈😈😈😈@#

  “सुपर संडे ला पाक चा सुपडा साफ”

               ‘डॅा अनिल पावशेकर’

++++++++++++++++++++++++

चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने परंपरागत वैरी पाक चा सुपडा साफ केला असून उपांत्य फेरीचे बर्थ कन्फर्म केले आहे. तर सतत दुसऱ्या पराभवाने पाकचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील सामन्यातील चुकांपासून बोध न घेत रिझवान ॲंड कंपनीने पुन्हा एकदा गोगलगाय छाप फलंदाजीने आत्मघात करून घेतला. त्यांचे प्रमुख फलंदाज बाबर आझम, मो. रिझवान असो की सौद शकील यांनी थोडीफार फलंदाजी केली परंतु ना त्यात पुरेसा वेग होता ना त्याने त्यांच्या डावाला आकार आला.

खरेतर फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो, त्याचप्रमाणे २४१ सारख्या तोकड्या टारगेटला धारदार गोलंदाजी आणि पोलादी क्षेत्ररक्षणाने वाचवायचे असते. जी कहाणी पाक फलंदाजीची, तिच त्यांच्या गोलंदाजीची. शाहीन आफ्रिदी, हॅरीस रौफ आणि नसीम शहा म्हणजे जणुकाही नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाडा. इतर गोलंदाज म्हणजे आनंदी आनंद. त्यातही पाक संघात इतके नवनवीन खेळाडू आहेत की कोणी एका दमात जर संघात खेळणार्या अकरा जणांची नावे तोंडपाठ सांगितली तर आयसीसी एका लाखाचे बक्षीस जाहीर करू शकते.

वास्तविकत: दुबईच्या मैदानावर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचे जिंकण्याचे प्रमाण जास्त आहे. तरीही पाक ने प्रथम फलंदाजी पत्करली. पण बाबर आझम आणि इमाम उल हक ला चांगली वेगवान सुरुवात करता आली नाही. मुख्य म्हणजे मो. शमी दुखापतीने बाहेर पडल्याने भारतीय गोलंदाजी संकटात होती. पाक सलामीवीरांना प्रतिहल्ला करण्याची नामी संधी होती. पण ते चुकले. याउलट आपल्या संघाने संकटात संधी शोधत दोन्ही सलामीवीरांना सेंड ॲाफ दिला. पांड्याने बाबर आझमला चकवले तर अक्षर पटेलने इमाम उल हक ला डायरेक्ट थ्रो वर धावबाद केले.

पहिल्या पॅावर प्ले चा कचरा झाल्याने मो. रिझवान आणि सौद शकील दबावात आले. दोघेही खेळपट्टीवर दळण दळत बसले. पहिल्या चारही फलंदाजांनी इतके चेंडू निरंक (डॅाट बॅाल) खेळले की आपण एखादा कसोटी सामना तर बघत नाही ना असा भास होत होता. भरीस भर म्हणजे पहिल्या सामन्या प्रमाणे या सामन्यात सुद्धा आपण शेजारधर्म निभावला. पहिले रिझवानला तर नंतर सौद शकीलला जीवदान देण्यात आले परंतु हे दोघेही त्याला कॅश करू शकले नाहीत. आपल्या संघाने लागोपाठ दोन सामन्यात स्थिरावलेल्या दोन फलंदाजांना जीवदान दिले, सुदैवाने ह्या चूका दोन्ही सामन्यात भारी पडल्या नाहीत.

राहिली बाब प्रत्युत्तराची तर रोहित ॲंड कंपनीचा पाक ला सरळ इशारा होता, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे. त्यातही पाकचा प्रमुख गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर आपल्या सलामीवीरांनी हल्लाबोल करत आपले इरादे स्पष्ट केले. भलेही रोहीत लवकर बाद झाला परंतु तो विजयाचा रोडमॅप दाखवून गेला. भारतीय संघाचा छावा शुभमन गिलने रिझवान सेनेवर प्रतिहल्ला करत पाक गोलंदाजांना बॅकफुटवर आणले. त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, शॅार्ट आर्म पुल पाहणे सुखावह होते. दिमतीला विराट असल्याने त्याचा खेळ आणखी बहरला. शुभमनला बाद करण्याची एक संधी पाक ने दवडली आणि तिथून टीम इंडियाची गाडी सुसाट निघाली.

संघाचे शतक होताच शुभमन परतला पण पाकचे हाल काही कमी झाले नाही. श्रेयस अय्यर सध्या डिमॅालीशन मुड मध्ये खेळत असून त्याने या सामन्यातही आपली बॅट परजली. त्यालाही जीवदान देत पाकने सामन्यात परण्याची संधी दवडली. त्याने विराट सोबत वेगवान शतकी भागीदारी करत आपल्या विजयाचे तोरण बांधले. या सर्व घडामोडींचा सुत्रधार होता किंग कोहली. ज्याप्रकारे ट्रॅव्हीस हेड भारताला छळतो अगदी तिच कहानी विराटची पाक सोबत आहे. पाक गोलंदाज दिसतात विराटचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्याला फलंदाजीत अमर राहण्याचे वरदान मिळाले आहे असे वाटते.

एकदिवसीय सामन्यात पाठलाग कसा करायचा, दडपण न घेता धावफलक कसा हलवायचा, क्षेत्ररक्षणातील मोकळ्या जागा हेरून एकेरी दुहेरी धावा कशा करायच्या याचे त्याने या सामन्यात सुरेख प्रदर्शन केले. मुख्य म्हणजे या वयातही ज्या चपळतेने तो धावतो ते पाहता तो मागच्या जन्मी नक्कीच चित्ता असेल असे वाटते. विराटचा क्लास, त्याचा फिटनेस, त्याची एकाग्रता, सामना जिंकण्याचा द्रुढनिश्चय त्याला किंग कोहली का म्हणतात हे दाखवून देते. पाक कडे विराटचा तोड नव्हता, ना त्यांची गोलंदाजी तितकी परिणामकारक होती. त्यातच मोक्याच्या क्षणी महत्वाचे झेल सोडल्याने पाकला सामन्यात कमबॅक करता आले नाही. थोडक्यात काय तर पाक संघाची अवस्था सध्या डाळ शिजत नाही, वरण उकळत नाही अशी झाली आहे. 

प्रदीर्घ काळानंतर त्यांना आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याची संधी मिळाली परंतु ना त्यांची फलंदाजी बहरली ना गोलंदाजी. ना वरिष्ठ खेळाडू कसोटीवर उतरले ना ज्युनियर खेळाडू. एकंदरीत काय तर सगळंच मुसळ केरात! याउलट भारतीय गोलंदाज विशेषतः हार्दिक पांड्याने बाबर आणि सौद शकीलला बाद करत मोठी कामगिरी बजावली.  तर कुलदिपच्या फिरकीपुढे इतर फलंदाज हतप्रभ दिसले. आपल्या संघांने दोन झेल जरूर सोडले परंतु दोन फलंदाजांना धावबाद करत बॅकलॅाग भरून काढला. भारतीय फलंदाजीचा सध्या वसंत ऋतू सुरू असून रोहीत, शुभमन, विराट, अय्यर फलंदाजीत बहरत आहे. फक्त मो. शमीचा फिटनेस चिंतेची बाब दिसून येते. लागोपाठ दोन सामने जिंकून टीम इंडिया आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचली आहे. पाकची कूर्मगती फलंदाजी, पांड्या कुलदीपची प्रभावी गोलंदाजी, शुभमन अय्यर आणि कोहली ची विराट फलंदाजी ह्या सामन्याच्या मुख्य बाबी ठरल्या. 

++++++++++++++++++++++++

दिनांक २४ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

Friday, February 21, 2025

बांग्लादेश टायगर्सने झुंजवले!

 #@😈😈😈😈😈😈😈😈#@

        “बांग्ला टायगर्सने झुंजवले”

            ‘डॅा अनिल पावशेकर’

++++++++++++++++++++++++

दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात शेजारी बांग्ला टायगर्सनी टीम इंडियाला चांगलेच झुंजवले आहे. प्रारंभी निरस वाटणाऱ्या लढतीत बांगलादेशने चिवट फलंदाजी करत रंगत भरली आणि उत्तरार्धात त्यांच्या गोलंदाजांनी नियंत्रित मारा करत टीम इंडियाला घाम गाळायला लावला. बांगलादेशी संघ नेहमीच आपल्या संघासाठी एक लिटमस टेस्ट असते आणि याचाच प्रत्यय या सामन्यातही पाहायला मिळाला. मुख्य म्हणजे त्यांनी रोहीत, विराटचा  चांगला होमवर्क केला परंतु शुभमन गिल आणि के एल राहुलने त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले. दोन्ही संघांनी ऐन मोक्याच्या वेळी गचाळ क्षेत्ररक्षण करत याबाबतीत दोघांचाही डीएनए एकच आहे हे दाखवून दिले.

झाले काय तर आयसीसी ओडीआय रॅंकिंग मध्ये अव्वल असलेल्या भारतीय संघाची गाठ नवव्या स्थानी असलेल्या बांगलादेशशी होती. मात्र बरेचदा आपला संघ थोराशी थोर आणि लहानाशी लहान याप्रकारे खेळतो. कारण ज्याप्रकारे मो.शमी, हर्षित राणा आणि अक्षर पटेलने बांग्ला संघाची ५ बाद ३५ अशी धुळधाण केली ते पाहता हा संघ शंभरीत निपटेल असे वाटले होते. पण क्रिकेट एवढे सहजसोपे नसते. अक्षरच्या हॅटट्रीकची संधी आणि बांगला संघाची मान मुरगळायची नामी संधी रोहीतने गमावली आणि तो क्षण बांगलादेश साठी पुनर्जन्म ठरला. लगेचच पांड्याने तौहीद ह्रदयला जीवदान देत बांग्ला संघाचे ह्रदय धडधडत राहील याची काळजी घेतली. अर्थातच आपला संघ इतका परोपकारी होत असतांना राहुल तरी कसा मागे राहील, त्यानेही यष्टीचित करण्याची सोपी संधी गमावून प्रतिस्पर्धी संघाला आयसीसीतून चक्क जनरल वार्डात आणले. गलितगात्र झालेल्या संघाला तीन बुस्टर डोज देऊन सुद्रुढ केल्याबद्दल आपल्या संघाला यावर्षीच्या नोबेलसाठी आपली दावेदारी नक्कीच मजबूत करता येईल.

लाईफ आफ्टर डेथ हे काय असते हे जीवदान मिळालेल्या जाकर अली आणि तौहीद ह्रदय यांनी दाखवून दिले. तोपर्यंत खेळपट्टी फलंदाजीला साजेशी झाली आणि या दोघांनीही त्यावर १५४ धावांचे महाकाव्य लिहिले. एकेरी दुहेरी धावा आणि संधी मिळताच चेंडू सीमारेषेपार करतया दुक्कलीने आपली गोलंदाजी बेरंग करून टाकली. वास्तविकत: ५ बाद ३५ असतांना तिथे प्रतिस्पर्ध्याला चिरडायला बुमराह नावाचा बुलडोझर हवा होता परंतु तो जायबंदी असल्याने निवडीस मुकला होता. तर शमीने भलेही पुनरागमन झकास केले पण तो या सामन्यात टेरर वाटला नाही. शिवाय त्याचे वय, फिटनेस पाहता रोहीतने त्याला काळजीपूर्वक जपले. याचाच फायदा बांगलादेशी फलंदाजांनी घेतला आणि त्यांनी धावसंख्या फुगवली.

सुरुवातीला झालेल्या पडझडी नंतर सर्वबाद २२८ ही धावसंख्या निश्चितच कौतुकास्पद होती. सोबतच या धावपट्टीवर कसा खेळायचे याचा परिपाठ त्यांनी दाखवला होता. मात्र नवीन चेंडू आणि रोहीतच्या बादशाही फलंदाजीची जुगलबंदी आपल्या डावाच्या प्रारंभी दिसली. रोहीत पुढे बांग्ला गोलंदाज खुजे वाटत होते परंतु अती आक्रमणाच्या नादात रोहीत फसला. २०२३ विश्वचषकात अंतिम सामन्यात ज्याप्रकारे बाद झाला होता, अगदी तसेच या सामन्यातही तो बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर विराटने धुरा सांभाळली पण तो लयीत दिसला नाही. तसेही विराटसाठी ॲाफ च्या बाहेर चेंडू आणि लेग स्पिनर हे सरकारमान्य सापळे आहेत आणि विराट त्यात अलगद अडकतो. मग तो आदील रशिद असो की रिशद होसेन असो. पाठोपाठ श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने मोठ्या फटाक्यांच्या नादात आपली विकेट फेकली. खेळपट्टी संथ, त्यातच ती फिरकीला साथ देऊ लागल्याने फलंदाजी सोपी नव्हती. विशेषत: नवीन फलंदाजांनी शुभमनचा कित्ता गिरवायला हवा होता. अचानक तीस धावांत तीन बळी गेल्याने आपल्या क्रिकेट प्रेमींची धाकधूक वाढली होती. जिंकायला अवघ्या ८५ धावा हव्या होत्या आणि सहा फलंदाज बाकी असूनही मैदानात आपली स्थिती धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली होती.

राहुलने शुभमनच्या साथीने मोर्चा जरूर सांभाळला परंतु तो सामन्याच्या दबावात दिसत होता. खरेतर यावेळी बांगलादेशचा अप्पर हॅंड होता परंतू त्यांचा क्षेत्ररक्षक जाकर अली अत्यंत स्वाभिमानी खेळाडू निघाला. त्याने रोहीतने दिलेल्या जीवदानाची परतफेड याच सामन्यात राहुलला जीवदान देऊन केली. कर्माच्या द्रुष्टीने हे योग्य होते परंतु यामुळे बांगलादेशचा संघ बॅकफुटवर आला. हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. इथून मग शुभमनने दमदार शतक झळकावले तर राहुलने त्याचा क्लास दाखवला. सामना अटीतटीचा होत असतानाच गचाळ क्षेत्ररक्षणाने बाजी पलटली.

सामना भलेही आपण जिंकला पण जाकर अली आणि तौहीद ह्रदयच्या संयमी फलंदाजीने सर्वांचे ह्रदय जिंकले. अर्धा संघ तंबूत परतूनही या दोघांनीही दाखवलेली जिद्द, समयसूचकता, क्रिकेट सेन्स वाखाणण्याजोगे आहे. गोलंदाज भरात असताना त्यांनी ठंडा करके खाओ पॅालीसी वापरली. प्रतिस्पर्धी संघांतील फलंदाज म्हणून त्यांना खेळतांना आपल्याला थोड्या वेदना जरूर होत होत्या परंतु त्या प्यार का दर्द है, मिठा मिठा प्यारा प्यारा या प्रकारच्या होत्या. कर्जबाजारी झालेल्या बांगलादेशी संघाचे त्यांनी चक्क आमार बांगला सोनार बांगला केले. या दोघांनीही आपल्या फलंदाजीने संघाच्या फाटल्या गोधडीला ढाके की मलमल सारखे सुंदर रूप दिले.

भारतीय गोलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर मो.शमीचे नक्कीच कौतुक करावे लागेल. ३४ वर्षीय शमीने शारिरिक मानसिक आघात सहन करत आपले प्रदर्शन उंचावले. वास्तविकत: खेळपट्टी राज कपूरच्या मंद मंद, संथ संथ मंदाकिनी सारखी परंतु मो. शमीने आपल्या लाईन, लेंथ आणि सिम गोलंदाजीने तिची सौंदर्यस्थळे दाखवली. त्यात तब्बल पाच बांगलादेशी फलंदाज घायाळ झाले. हर्षित राणा तर सरप्राईज पॅकेज वाटतो. तो केव्हा येतो, केव्हा बळी घेतो समजतच नाही. तर संघांतील अक्षर, जडेजा आणि कुलदीप या फिरकीपटुंची भाउगर्दी पचायला जड जाते.

थोडक्यात काय तर बांगलादेशला छोटा बच्चा समजणे कोणत्याही संघाला भारी पडू शकते. जाकर अली आणि तौहीद ह्रदय ज्याप्रकारे कानामागून आले आणि तिखट झाले ते पाहता बांगलादेशी फलंदाज मोठा स्कोअर जरी नाही उभारू शकले तरी ते आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारू शकतात. त्यातच त्यांचे फिरकीपटू पाक, दुबई खेळपट्टीवर इको फ्रेंडली आहेत. आपल्या कडे एखादा आणखी वेगवान गोलंदाज हवा होता असे राहून राहून वाटते. अर्शदीपची टी ट्वेंटीतली क्षमता वादातीत आहे. पण या स्पर्धेत रोहीत त्याचा कसा वापर करतो हे येणाऱ्या सामन्यात पाहायला मिळेल. राहुलने फलंदाजीत पासिंग मार्क जरी मिळवले असले तरीही तो यष्टीरक्षणात काठांवर पास आहे. टीम इंडिया हा सामना जरी जिंकला असला तरीही पाक आणि किवी संघासमोर आपल्या गोलंदाजांची परिक्षा घेतली जाईल. फलंदाजीत रोहीतच्या झंझावाताला शुभमन ॲंड कंपनीचे कोंदण लाभले तर टीम इंडिया कोणत्याही गोलंदाजी आक्रमणावर प्रभुत्व गाजवू शकते. टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या पहिल्यावहिल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

++++++++++++++++++++++++

दिनांक २१ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Friday, February 14, 2025

चॅम्पियन ट्रॅाफीचे प्री वेड शूट!

 @#😈😈😈😈😈😈😈😈#@

       चॅम्पिअन्स ट्रॅाफीचे प्री वेड शूट!

            डॅा अनिल पावशेकर

++++++++++++++++++++++++

देशातील विधानसभा निवडणुकांचे वादळ शांत झाले असून प्रयागराज महाकुंभही शेवटच्या टप्प्यात आले आहे. यानिमित्ताने देशभरात उसळलेला भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्माचा अलोट उत्साह उमंग आपण सर्वांनी अनुभवला आहे. भौतिक शास्त्राच्या नियमानुसार एनर्जी नेव्हर एंड्स प्रमाणे अर्थातच ही एनर्जी, हा उत्साह आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता असून याचा केंद्रबिंदू प्रयागराज ऐवजी पाकिस्तान, दुबईत क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या निमित्ताने दिसणार आहे. याचीच एक पुर्वतयारी किंवा सराव म्हणून इंग्लिश संघाचा टी ट्वेंटी, एकदिवसीय क्रिकेट सामन्याचा दौरा पार पडला आहे. थोडक्यात काय तर याला हल्लीच्या भाषेत चॅम्पियन्स ट्रॅाफीचे प्रीवेडींग शूट नक्कीच म्हणता येईल.

झाले काय तर टी ट्वेंटी दिग्विजयाचा मधुचंद्र संपतो न संपतो तोच कसोटी अजिंक्यपदासाठी न्यूझीलंड आणि ॲास्ट्रेलिया संघांशी आपला सामना झाला. त्यात किवी संघाने आपल्या संघाची लक्तरे वेशीवर टांगली होती, मायदेशात एवढी नाचक्की क्रिकेट प्रेमींना चांगलीच झोंबली होती. भरीस भर म्हणून उरलीसुरली कसर ॲास्ट्रेलियाने भरून काढली. तिथे पहिली कसोटी जिंकूनही आपला संघ कामगिरीत भिकारच राहिला. एकटा बुमराह तो काय लढला परंतु अकेला चना भाड नहीं झोंक सकता हे विसरून कसे चालणार? चिंतेची बाब म्हणजे तिथे विराट, रोहितची कामगिरी नीरव मोदी, विजय माल्या सारखी कर्जबाजारी दिसली.

चॅम्पियन्स ट्रॅाफीचे घोडामैदान जवळ असताना आपल्या संघाची वाताहत वेदनादायक होती. पण म्हणतात ना “महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहाती” आणि झालेही तसेच. बडे मियां रोहीत, विराट अपयशी ठरत असतानाच छोटे मियां तिलक वर्मा, अभिषेक शर्माने टी ट्वेंटीत इंग्लिश संघाचा बॅंड वाजवला. पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा दणका देत भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. याच पॅाझीटीव्ह एनर्जीने आपल्या सिनिअर संघात जीव ओतला आणि त्याचेच रूपांतर एकदिवसीय मालिकेत इंग्लंडला ब्राऊनवॅाश देण्यात झाले.

सध्याच्या आयसीसी एकदिवसीय सामन्याच्या श्रेणीत भारतीय संघ अव्वल स्थानावर असून इंग्लंडचा संघ सातव्या स्थानी आहे. त्यातच इंग्लंडने बॅझबॅालची दिक्षा घेतल्याने ते प्रतिस्पर्धी गोलंदाजांना उठता लात बसता बुक्की देतात. मात्र भारतीय खेळपट्टीवर त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. इथल्या खेळपट्ट्या जरी फिरकीपटुंचे माहेरघर असले तरी त्यांनी मो. शमी, हर्षित राणा आणि अर्शदिपला ठंडा करके खाओ पॅालिसीने हातळायला हवे होते. शिवाय अक्षर पटेल, जडेजा आणि वरूण चक्रवर्तीची फिरकी त्यांच्यासाठी भुलभुलैय्या ठरली. बॅझबॅालचा सामना गॅातीबॅालशी झाला आणि निकाल सर्वासमोर आहे.

इंग्लिश फलंदाज सॅाल्ट, डकेट, बेथेल, लिविंगस्टोन यांसोबतच कर्णधार जॅास बटलर आणि ॲाफिसर ॲान स्पेशल ड्युटी म्हणजेच जो रूट एक भक्कम फलंदाजी युनिट होते. यांनी सर्वांनी प्रारंभ चांगला केला परंतु ते पन्नाशीच्या उंबरठ्यावर परतले. टी ट्वेंटीत पन्नाशीची खेळी संघाला तारून नेते परंतु एकदिवसीय सामन्यात शतकी खेळी निर्णायक ठरते. इंग्लंडच्या फलंदाजीतील हाच कच्चा दुवा होता, त्याच्या यशाची किरपा तिथेच लटकली होती. जो रूटची ६९ धावांची खेळी ही सर्वोच्च होती. महत्वाची बाब म्हणजे हा संघ तिन्ही सामन्यात पन्नास षटके पूर्ण खेळू शकला नव्हता.

खरेतर फुटका डोळा काजळाने साजरा करायचा असतो. इंग्लंडच्या मर्यादित फलंदाजीला गोलंदाजांनी कव्हर फायर द्यायला पाहिजे होते. याकरिता त्यांच्याकडे जोफ्रा आर्चर, मार्क वूड सारख्या लोडेड गन्स होत्या, मात्र त्या मिसफायर झाल्या. निव्वळ वेगाला आजकाल कोणी भीक घालत नाही. फिरकीत अब्दुल रशिदने चमक दाखवली परंतु त्याचे प्रयत्न थीटे पडले. पार्ट टाईम जो रूट आणि लिविंगस्टोनची फिरकी आपल्या फलंदाजांच्या पासंगाला पुरत नव्हती. ज्या आक्रमक खेळासाठी बटलर ॲन्ड कंपनी ओळखली जाते, ते फलंदाजी, गोलंदाजीत बोथट निघाले.

राहिली बाब आपल्या फलंदाजांची तर त्यांनी कात टाकल्यासारखी खेळी केली. विशेषतः शुभमन गिल, रोहीत, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलच्या खेळीने टीम इंडिया मालिकेत बहुमताने विजयी झाली. शुभमन गिल ने एक शतक आणि दोन अर्धशतक ठोकत तब्बल २६९ धावा कुटल्या. तर श्रेयस अय्यरनेही १८१ धावा करत आपली निवड सार्थ ठरवली. वास्तविकत: पहिल्या सामन्यात विराट अनफीट असल्याने अय्यरची वर्णी लागली परंतु त्याने संधीचे सोने केले आणि चॅम्पियन्स ट्रॅाफीकरीता आपले तिकीट कन्फर्म केले. या सर्वात अक्षर पटेल हे सरप्राईज पॅकेज होते. किफायती मारा आणि उपयुक्त डावाखोरा फलंदाज असलेला परंतु लो प्रोफाइल असलेल्या अक्षरने तिन्ही सामन्यात अष्टपैलू खेळ केला.

प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर या मालिकेत मैफिल जर कोणी लुटली असेल तर ती दुसऱ्या सामन्यातल्या रोहीतच्या शतकाने. हिटमॅन नावाने प्रसिद्ध रोहितने क्रिकेट मध्ये जी षटकार क्रांती केली त्याला तोड नाही. त्याच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात मिळून तब्बल ६३१ षटकार आहेत. सर्वाधिक षटकार ठोकण्यात तो प्रथम क्रमांकावर आहे. ज्याप्रकारे तो चेंडूला हवेत उडवतो ते पाहता आयसीसीने त्याला तहहयात फ्री फ्लाईंगची सुविधा द्यायला हरकत नाही. त्याचे षटकार ज्याप्रमाणे सिमारेषेची बंधने ध्वस्त करत प्रेक्षकांत लॅण्ड करतात ते पाहता मॅच रेफ्रींनी त्याला सहा धावांऐवजी आठ धावांचा बोनस द्यावा. थोडक्यात काय तर रोहित म्हणजे दिसायला भोळा आणि सिक्सरवर डोळा असे आहे. 

त्याचे कटक चे शतक म्हणजे डोळ्यांसाठी अमीट पर्वणी होती. कव्हर, लॅांग ॲाफ, लॅांग ॲान, लेग ला त्याने एफर्टलेस सिक्सर हाणले. जणुकाही एखादा निष्णात चित्रकार कुंचल्याचे फटकारे ओढत आहे असे वाटत होते. रोहीत रंगात आला की कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या फलंदाजीची मिठ मिरची ओवाळून द्रुष्ट काढाविशी वाटते. त्यातच त्याचा शांत, निर्विकार चेहरा पाहून त्याच्या “जीगरमा बडी आग है”यावर विश्वास बसत नाही. शतक तर शुभमन ने पण केले परंतु त्याला रोहितच्या शतकाचे सौंदर्य नाही. शेवटच्या सामन्यात विराटला सूर गवसलेला दिसला. त्यानेही अर्धशतक ठोकत बॅट ला लागलेला गंज दूर करण्याचा प्रयत्न केला.

नुकतेच अवकाशात ग्रह एकारेषेत येऊन एक अनोखा नजारा आपण अनुभवला होता. याचीच मिनी कॅापी म्हणून रोहीत, शुभमन, अय्यर, अक्षर आणि विराट हे तारें जमीं पर आपल्या फलंदाजीने क्रिकेट रसिकांना सुखावून गेले आहेत. चॅम्पियन्स ट्रॅाफी हाकेच्या अंतरावर आली असताना टीम इंडियाचे प्रदर्शन सुखकर आहे. मात्र बुमराह संघात नसल्याने मनात हुरहूर लागली आहे. तरीपण शो मस्ट गो ऑन! भारतीय संघ आपल्या गटात बांगलादेश, पाक आणि न्यूझीलंडला टक्कर देणार आहे. तमाम क्रिकेट रसिकांतर्फे भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॅाफी साठी हार्दिक शुभेच्छा!

++++++++++++++++++++++++

दिनांक १४ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

Tuesday, February 11, 2025

टूटा है “आप” का घमण्ड!

   @#😈😈😈😈😈😈😈😈#@

          *टूटा है “आप” का घमण्ड*

              *डॅा अनिल पावशेकर*

++++++++++++++++++++++++

बहूप्रतिक्षित दिल्ली विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून भाजप ला तब्बल २७ वर्षांनंतर राजधानीत सोनियाचे दिवस आलेले आहेत. एक दशकानंतर केजरीवालांचा बालेकिल्ला भेदून भाजपने हरयाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्ली काबीज करत विजयाची हॅट्रिक साधली आहे. पंतप्रधान मोदी मला पन्नास वर्षांत काय, या जन्मात दिल्लीत हरवू शकत नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या केजरीवालांची घमेंड जनतेने उतरवून लावली आहे. इंडी आघाडीचा बुडबुडा या निमित्ताने फुटला असून तिहेरी लढतीत भाजपने आम आदमी पक्षाला सत्तेतून बेदखल केले असून कॅांग्रेसची दुकानदारी बंद करून टाकली आहे.

असे म्हणतात की, अहंकार से तीन गये धन, वैभव, वंश, ना मानो तो फिर देखो रावण, कौरव, कंस. अगदी असेच काही अहंकाराने केजरीवाल यांचे झाले आहे. अन्ना आंदोलनात जन्मलेले हे रसायन शॅार्ट कट, रेडीमेड राजकारणाने दोन तीनदा सत्तेत आलेले होते. पण दिल्लीत कावळ्याच्या हाती मिळाला कारभार आणि त्याने हागून भरला दरबार असे झाले. मोफत वीज, मोफत पाणी, महिलांना मोफत प्रवास इ. स्वस्त लोकप्रिय करामतींनी देशात फुकटचंद राजकारणाची अनिष्ट परंपरा सुरू झाली. कोणताही राजकीय पक्ष फुकटची रेवडी वाटपा पासून स्वतःला दूर ठेवू शकला नाही. मतांसाठी प्रलोभनांची यादी दर निवडणुकीत वाढतच चालली आहे.

त्यातच मोहल्ला क्लिनिक असो की विश्वस्तरीय शाळांची कल्पना असो. यातील वास्तव आणि कल्पना यात जमीन अस्मानचा फरक असून केजरीवालांनी आपली प्रतिमा या ग्रहावरील एकमेव इमानदार राजकारणी अशी करून घेतली. राजनीती में नहीं आऊंगा जी, बंगला गाडी नहीं लुंगा, बच्चोंकी कसम खाता हूं असे शब्दांचे बुडबुडे उडवले. डबल एक्स एल ढगाळ शर्ट, ढिला फुलपॅंट, पायात स्लिपर आणि खिशाला पाच रुपयांचा पेन रोवून केजरीवालांनी आपण आम आदमी आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण कथनी आणि करणीतला फरक ओळखायला जनतेला दहा वर्षे लागली.

केजरीवालांचा सत्तेतील हनीमून संपताच जनता भानावर आली. दिल्लीकरांना वेठीस धरणारे शाहिनबाग आंदोलन असो की शेतकरी आंदोलन असो, पेयजल आपुर्ती, सांडपाणी व्यवस्था, कचरा नियोजन , वायु प्रदूषण, यमुना प्रदूषण, बोकाळलेला भ्रष्टाचार यांचा जनतेला उबग आला. या सर्वांवर मात केली ती मद्यघोटाळ्याने. सोबतच सरकारी अधिकाऱ्याला बंगल्यावर बडवणे असो की सहकारी स्वाती मालिवालला तुडवणे असो. केजरीवालांच्या पापाचा घडा भरला होता. त्यातच त्यांनी आप चे प्रमुख नेते, साथीदार यांना कट कारस्थाने करून हाकलून लावले होते आणि उरलेले तुरुंगाची हवा खात होते. पक्षात केजरीवालांचा वन मॅन शो सुरू होता. मात्र मद्य घोटाळा आप च्या शव पेटीवरील शेवटचा खिळा ठरला.

राहिली बाब मित्र पक्षांची तर  केजरीवालांनी दिल्लीत कॅांग्रेसला सिगरेटच्या थुटका एवढेही महत्व दिले नव्हते. नेहमीप्रमाणे कॅांग्रेस भाजपच्या पराभवासाठी आपल्याला वॅाक ओव्हर देईल या भ्रमात ते राहिले. तसेही आप ने गोवा हरयानात कॅांग्रेसच्या बुडाला आग लावली होती तर पंजाबात समूळ उच्चाटन केले होते. केजरीवालांच्या युज ॲण्ड थ्रो नितीने कॅांग्रेसही यावेळी हम भी डुबेंगे सनम तुमको भी ले डुबेंगे या मुड मध्ये होती. त्यातच आपले उपद्रवमुल्य जाणलेला ओवेसींचा पक्ष मैदानात उतरला होता. बटेंगे तो कटेंगे हे उमर अब्दुल्लांच्या लक्षात आले होते मात्र आप आणि कॅांग्रेस एकमेकांची कबर खोदण्यात व्यस्त होते. आधीच दुभंगलेली इंडी आघाडी यानिमित्ताने आणखी खिळखिळी झाली आणि याचा फायदा भाजपला झाला.

राहिली बाब भाजप ची तर लोकसभेला दाखवलेला अती आत्मविश्वास आणि फुशारकी, त्यातून घटलेले संख्याबळ त्यांना जमीनीवर आणण्यासाठी पुरेसा ठरले. उतू नका मातू नका करत भाजपने कंबर कसून हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्रात बाजी मारली होती. केजरीवाल ॲण्ड कंपनीचा भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, अनागोंदी आदी मुद्द्यांवर त्यांनी रान पेटवले. सोबतीला शिशमहलचा मुद्दा जनमानसात केजरीवालांची पोल खोलण्यात महत्वपूर्ण ठरला. मोफत रेवडी सोबतच महिलांना २५०० रू. महिना महिला मतदारांना प्रभावित करून गेला. धर्मांधांचे तुष्टीकरण ऐवजी सर्वांचे संतुष्टीकरण सोबतच मोदी की गॅरंटी, विकासाची ग्वाही आणि भाजपची सांघिक कामगिरी भाजपला यश देणारी ठरली.

थोडक्यात काय तर दिल्लीत भाजप हा पक्ष इतर सर्व पक्षांचा बाप ठरला असून कॅांग्रेस पक्ष जवळपास समाप्त झाला आहे. सतत तीन विधानसभा निवडणुकीत शून्य जागा घेत कॅांग्रेसने अप्रिय हॅट्रिक साधली आहे. सोनियाजी, राहूल गांधीं, प्रियंका सारखे दिग्गज कॅांग्रेस नेते दिल्लीत असूनही पक्षाला दिल्लीत भोपळा फोडता आला नाही. तर आप पक्ष भलेही पराभूत झाला असेल तरीही त्यांना ४३.५७ टक्के मते मिळाली ही बाब दुर्लक्षित करता येणार नाही. एक मात्र खरे केजरीवालांनी पराभव मान्य करून उठसूठ ईव्हीएम च्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्यांना उघडे पाडले आहे. तसेच मतांच्या टक्केवारीत एक दोन टक्के जरी फरक पडला तरी जागा वरखाली होऊ शकते हे महाराष्ट्रात लोकसभा विधानसभा निवडणुकांवर शंका घेणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. 

दिल्लीचा दिग्विजय भाजपाच्या पथ्यावर पडला असून इंडी आघाडीचे जहाज फुटण्याच्या मार्गांवर आहे. सोबतच आगामी बिहार आदी विधानसभा निवडणुकांत भाजप आणखी जोमाने उतरेल यात वाद नाही. तर कॅांग्रेसच्या सतत अपयशाने इंडी आघाडीत कॅांग्रेस पिछाडीवर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजप जवळपास संपूर्ण देश पादाक्रांत करत आहे. तर केजरीवालांच्या हातात केवळ पंजाब असून गमावलेले राज्य आणि विश्वासार्हता परत मिळवण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. 

++++++++++++++++++++++++

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...