Saturday, January 29, 2022

मारली वाईन तर तबियत फाईन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
      *मारली वाईन तर तबियत फाईन*
************************************
सध्या देशभरात थंडीची लाट असली तरी महाराष्ट्रातील जनतेला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण लोककल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या शासनाने जनतेच्या भल्यासाठी भलामोठा निर्णय घेतला आहे. खंडणीची पार्श्वभूमी असलेल्या सरकारने जनतेच्या आनंदात खंड पडू नये तसेच अखंड तळीरामांच्या दुःखाचे परिमार्जन करण्यासाठी वाईन सुपरमार्केट, किराणा आदी जागी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेतर या ऐतिहासिक निर्णयामुळे तमाम वाईनप्रेमीत आनंदाची लाट उसळली असून अखिल भारतीय तळीराम संघटनेतर्फे शासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर इथल्या लोकांना सरकारच्या कामाचे मुळी कौतुकच नाही. आता वाईन जागोजागी उपलब्ध झाल्याने सरकारचे कित्येक गंभीर प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी अपेक्षा आहे. पहिला प्रश्न म्हणजे समानतेचा. निश्चितच गरिब असो वा श्रीमंत, "वाईनच्या लाईन" मध्ये खरीखुरी समानता पाळली जाते. समतेचे धोरण म्हणजे आणखी काय वेगळे हवे. सोबतच गल्लीबोळात वाईन उपलब्ध झाल्याने गरजू जनतेला उगीचच पायपीट करावी लागणार नाही. शिवाय किराणा दुकानदार ओळखीचा असल्याने अडी नडीच्या वेळी उधारी पण मिळू शकते. यातच सामाजिक सद्भावना पण जपली जाते.

केंद्राच्या "आत्मनिर्भर भारत" ध्येयाला राज्य सरकारच्या या निर्णयाने चालना मिळेल अशी सर्वत्र चर्चा आहे. आता किराणा व्यापाऱ्यांना कोणी हलक्यात घेणार नाही. तर मुली किराणा दुकान पाहून "होणार सुन मी त्या घरची" हे गाणे गातील. मुलांना सुद्धा आता उच्चशिक्षणाचे वेड राहणार नाही. बारामाही तसेच कोणत्याही जागी हमखास चालणारा धंदा म्हणून मुले मेडीकल, इंजिनिअरिंग आणि इतरही शाखेपेक्षा सरळ किराणा दुकान टाकणे पसंत करतील. वाईन विक्रीमुळे किराणा दुकानात स्पर्धा वाढल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुरासुंदरींची वर्णी लागेल. एकप्रकारे हे रोजगार निर्मितीचे साधन होईल.

महाराष्ट्रात आलेली भरभराट पाहता इतर राज्यातून इथे इच्छुकांचे लोंढे येणार आणि "घर घरसे किराणा निकलेगाच्या" घोषणा सर्वत्र ऐकू येतील. वाईनविक्री चे आधुनिक जनक म्हणून महाराष्ट्राचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आदराने घेतले जाईल. सरकारतर्फे आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गासाठी ड्रींकींग पार्क योजना राबविण्यात येईल. तसेच नियमितपणे किराणा दुकानातून वाईन घेणाऱ्यांना "वाईनबंधन" बांधण्यात येईल. प्रत्येक किराणा दुकानाबाहेर ग्राहकांना वश करण्यासाठी "पिऊन दाखवले" च्या स्पर्धा आयोजित केल्या जाईल.

वाईन निर्णयाने किराणा दुकानांचा कायापालट होईल. मात्र किराणा सामानात एकाची भर पडल्याने गृहिणींचे बजेट बिघडू शकते. मात्र "माझे घर माझी जबाबदारी" असल्याने सरकार तिथे काय करणार? वाईनची उपलब्धता सहज झाल्याने वाईनप्रेमींच्या संख्येत अचानक वाढ संभवू शकते. मग याचाच परिणाम म्हणून येणाऱ्या महानगरपालिका निवडणूकीत महापौराऐवजी "मद्यपौर आमचाच" ची मागणी होऊ शकते. कारण सर्वात जास्त राजस्व देणारे म्हणून मद्यपींना राजदरबारी मोठे स्थान असेल. पुढे चालून तर वाईनच्या राजस्वने गदगद झालेले सरकार चक्क वाईनश्री, वाईन भुषण पुरस्कार जाहीर करू शकते.

वास्तविकत: हे लोककल्याणकारक सरकार आम जनतेसाठी राब राब राबते. मग आम ऐवजी 'जाम' जनतेसाठी थोड्याफार सुधारणा केल्या तर इतरांना पोट दुखायचे कारण काय? विद्यमान सरकारच्या दृष्टीने अन्न, वस्त्र, निवारा आणि 'सुरा' (वाईन) ह्या महाराष्ट्रातील जनतेच्या प्राथमिक गरजा आहेत. शिवाय कोरोनाची तिसरी लाट सुरू असताना "दो गज की दुरी,ग्लास है जरुरी" योजना राबविण्यात वावगे ते काय असणार? तसेच कोरोनाच्या लाटेत राज्याची अर्थव्यवस्था ज्या वाईनने सांभाळली तिला आता किराणाश्रय मिळाल्याने सरकार खाल्लेल्या मिठाला आणि पिलेल्या वाईनला जागले असेच म्हणावे वाटते.

एकंदरीत काय तर या राज्याचे सर्व प्रश्न सुटले असून जनता सोनियाचे दिवस अनुभवत आहे. मागेल त्याला आरक्षण मिळाल्याने राज्यात आनंदीआनंद आहे. बळीराजा संपुर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळाल्याने सुखावला आहे. बेरोजगारांना विशेष कौशल्यासाठी किराणा दुकानात नौकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आजुबाजू चोहीकडे वाईनमार्ट उघडल्याने माता भगिनी आता रस्त्यावर बिनधास्त फिरू पाहत आहे. एसटी कर्मचारी असो अथवा आणखी कोणी,,ना कुठे संप आहे, ना कुठे उपोषण. या भुतलावरील समृद्ध आणि संपन्न राज्य म्हणून आपले राज्य नावारुपाला आल्याने जनता सुखाने गदगदीत झाली आहे. फक्त आता एकच उरले आहे, एकदाचे सरकारने "मारली वाईन तर तबियत फाईन" हे ब्रीदवाक्य म्हणून जाहीर करून टाकावे. कमीतकमी दारुबंदी साठी झटणाऱ्यांना तेवढाच दिलासा मिळेल.
**********************************
दि. २९ जानेवारी २०२२
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Saturday, January 22, 2022

या चिमण्यांनो परत फिरारे,,,!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *या चिमण्यांनो परत फिरारे,,,,!*
              *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
बोलॅंड मैदानावर द.आफ्रिकेने भारतीय संघाची बोलती बंद केली असून एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ठोकून काढत द आफ्रिकेने भारतीय संघाची लक्तरे वेशीवर टांगली आहे. भारतीय संघ आता इतका गलितगात्र झाला आहे की १९८३ चा कपीलचा संघही यांना सहज हरवू शकतो अशी स्थिती आहे. एवढे मुर्दाड प्रदर्शन पाहूनही टीम इंडिया का पेटून उठत नाही याचे आश्चर्यच वाटते. किंबहुना आमची अशाच मानहानीकारक पराभवाची लायकी आहे याची कळत नकळत कबूली तर देत नाही ना अशी शंका येते. निश्चितच खेळ म्हटले की हारजीत तर होणारच परंतू द.आफ्रिकेचा संघ म्हणजे वेस्ट इंडीजच्या क्लाइव्ह लॉइडचा संघ नव्हे तरीपण आपला संघ एवढा का ढेपाळला याचे पोस्टमॉर्टेम व्हायलाच हवे.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या सगळ्या पानिपतामागे संघात एकी नसणे, बेबनाव असणे हे प्रमुख कारण आहे. याकरिता माजी कर्णधार विराट आणि आणि बीसीसीआय यांच्यातील मानापमान नाट्य जबाबदार आहे. विराट प्रकरणातून धडा घेऊन बीसीसीआयने यापुढे तरी कोणत्याही खेळाडूला मुजोर व्हायच्या पहिलेच त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. कोणताही खेळाडू हा क्रिकेट पेक्षा मोठा नाही हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. सोबतच खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस पाहूनच त्याची संघात निवड करावी. पस्तिशीकडे झुकलेले, दमलेले भागलेले वयोवृद्ध खेळाडूंचा वनडे आणि टी ट्वेंटीत विचार करायला नको. खेळाडूंच्या भुतकाळातील सोनेरी आठवणींच्या आधारे ते खेळाडू  वर्तमानातील लढाया जिंकून देऊ शकत नाही हा इतिहास आहे.

खरेतर टीम इंडियाला आता थातुरमातुर औषधींची नव्हे तर मोठ्या ऑपरेशनची गरज आहे. कसोटी सामन्यांकरीता अश्विन, भुवनेश्वर कुमार यांचा जरूर विचार करावा परंतु झटपट क्रिकेट साठी त्यांना आणि यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती दिलेलीच बरी. खरेतर विराट आता संघासाठी किती घाम गाळेल हा यक्षप्रश्न आहे. कारण त्याची कर्णधार पदाची अंगवस्त्रे बीसीसीआयने फेडल्यापासून तो प्रतिशोधाच्या आगीत जळत असेल यात वाद नाही. मानहानी आणि पदवनती झाल्याने त्याच्या फलंदाजीचे फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झाले आहे. यामुळे यापुढे विराटची बॅट मैदानावर खेळेल मात्र सामने जिंकून देईल की नाही हे येणारा काळच सांगेल. विशेषतः जे सामने औपचारिक आहेत अन्यथा मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तिथे त्यांची बॅट तळपू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शतक सुद्धा झळकवू शकतो.

विराट बाबतीत तरी सध्या एवढेच म्हणू शकतो की " अहंकार से तिन गये,, धन वैभव वंश, ना मानो तो फिर देखो,,, रावण कौरव कंस". विराट पतनानंतर लगबगीने राहुलच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. मात्र सध्यातरी त्याच्या नेतृत्वात संघाची "मागितली टाळी, मिळाली केळी" अशी अवस्था आहे. शिवाय संघातल्या अनागोंदीचा त्याला सामना करावा लागत आहे. सोबतच त्याचे वैयक्तिक प्रदर्शन "कभी खुशी कभी गम" असे आहे. त्याला खंबिरपणे साथ देईल असा मर्द मराठा आणि मावळ्यांच्या शोधात तो आहे. याकरीता "नाव मोठे लक्षण खोटे" असणाऱ्यांना निवड समितीने शाल श्रीफळ देणं आवश्यक आहे. अन्यथा क्रिकेट जगतात टीम इंडियाचा दबदबा नामशेष होण्याची संभावना आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरकस प्रयत्न केले असले तरी गोलंदाजांनी सामन्याची माती केली. कधी फलंदाज पाठलाग करताना दमतात तर कधी गोलंदाज  सामना वाचवू शकत नाही. किंबहुना आपल्या खेळाडूंत सामना जिंकण्याची भुकच दिसत नाही. याला अतिक्रिकेट हे एक कारण असू शकते. सोबतच आयपीएलमुळे खेळाडूंच्या चरणी कुबेराच्या धनराशी लोळण घेत असल्याने त्यांना कमवण्याची चिंताच उरली नाही. आयपीएलने सर्वात जास्त नुकसान टीम इंडियाचे झाले आहे.कारण आयपीएलमुळे विदेशी खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्या, इथले वातावरण आणि प्रत्येक भारतीय खेळाडूंचे विक प्वाईंट्स लक्षात आले आहेत.

आयपीएलचा तमाशा भरवण्यापेक्षा बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांकडे जास्त लक्ष दिले तर ते भारतीय क्रिकेट साठी बरे राहिल. टीम इंडियात खुर्च्या उबवणाऱ्या खेळाडूंना रणजीसारख्या सामन्यात जुंपावे. आयपीएलमुळे निश्चितच काही गुणी खेळाडू पटलावर आले आहे परंतु वरिष्ठ खेळाडू सुस्त झाले आहे. टीम इंडियाच्या भल्यासाठी बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला डोक्यावर बसवू नये. शिवाय प्रशिक्षकाच्या कामगिरीचे मूल्यमापन अत्यंत जरुरी आहे. शिवाय संघात असेपर्यंत खेळाडूंना जाहिरात करण्यास मज्जाव करावा. कारण आयपीएल आणि जाहिरातीतून आलेल्या अमाप संपत्तीने काही खेळाडू माजले आहेत.अर्थातच अशा विराट खेळाडूंना बीसीसीआयने डच्चू देऊन त्यांचे डोके ताळ्यावर आणणे आवश्यक आहे. तरच हे खेळाडू देशासाठी घाम गाळतील अन्यथा औपचारिकता म्हणून सामने खेळतील आणि असेच सामने गमावत राहतील. 

बीसीसीआयने लंगड्या घोड्यांवर डाव लावण्यापेक्षा उदयोन्मुख खेळाडूंना वाव द्यायला हवा. सोबतच प्रसिध कृष्णा, मो.सिराज, अक्षर पटेल, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर सारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात यावे. सध्यातरी भारतीय संघाची गंभीर अवस्था पाहता आणखी नामुष्की ओढवण्यापेक्षा या संघाला उर्वरित सामने न खेळता परत बोलावले तर ते चांगले राहिल. कमीतकमी आणखी नामुष्की ओढवण्यापेक्षा "झाकली मुठ सव्वा लाखाची" तरी राहिल. एकंदरीत काय तर भारतीय संघाची करुण, दारुण अवस्था पाहता "या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या" असे म्हणावेसे वाटते.
************************************
दि. २२ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Thursday, January 20, 2022

पुन्हा एकदा "हारले जी"

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
            *पुन्हा एकदा "हारले जी"*
              *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
दुसऱ्या कसोटी पासून टीम इंडियाचे सुरू झालेले नष्टचर्य काही केल्या संपायचे लक्षण दिसत नाही. कसोटीच्या पराभूत मानसिकतेतून अजूनही टीम इंडिया बाहेर आली नसून पहिल्याच वन डे मध्ये पराजित झाली आहे. नवा गडी नवा राज प्रमाणे राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले नशिब आजमवायला निघाला परंतु सध्यातरी राहुल आणि यशाचा बहुतेक छत्तिसचा आकडा असल्यासारखे क्रिकेट असो वा राजकारण, दोन्हीकडे पाटी कोरी आहे.

खरेतर भारतीय क्रिकेटचे विराटपर्व इतिहास जमा होऊन राहुल पर्वाला सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही आपल्या संघाची गाडी रुळावर आलेली दिसत नाही. गुणवान गोलंदाजांना लय सापडत नाही तर फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहता येत नाही. भरीस भर म्हणून क्षेत्ररक्षणातला स्तर खालावत चालला आहे. कदाचित याला कारणीभूत द.आफ्रिकेची काळी जादू तर नसावी अशी शंका येत आहे.अन्यथा खेळाडू विना पगार खेळत असावे. कारण टीम इंडियाची ती जिद्द, तो जोश, हरलेला सामना जिंकणे असो की मैदानातला दबदबा असो, सर्व काही हरवल्या सारखे वाटत आहे. किंबहुना टीम इंडिया केवळ औपचारिकता म्हणून तर हे सामने खेळत नाही ना अशी शंका येते. मुख्य म्हणजे खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज वरून विजयाची भुक दिसून येत नाही.

वास्तविकत: द आफ्रिकेने अठराव्या षटकापर्यंत तीन गडी गमावून जेमतेम अडुसष्ठ धावा केल्या होत्या. याच वेळी विरोधी संघाला आवळण्याची गरज होती. मात्र कर्णधार टेम्बा बवूमा आणि वॅन डर ड्युसेनने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या जोडीने तब्बल द्विशतकी भागीदारी करत त्यांच्या संघाला सुस्थितीत नेले. दोन्ही फलंदाजांनी शतक ठोकत भारतीय गोलंदाजी खिळखिळी करून टाकली. मात्र तरीही धावसंख्या तिनशेच्या आत असल्याने भारतीय संघावर खुप मोठे संकट कोसळले अशातला भाग नव्हता. फक्त गरज होती निर्धार पुर्वक सामना जिंकण्याची.

भारतीय संघ पाठलाग करताना उतरताच द.आफ्रिकेने हुशारीने फिरकीपटूला आणले. मात्र तो शेन वॉर्न किंवा मुरलीधरन नव्हता. तरीपण त्याला "घालीन लोटांगण वंदिन चरण" करत जबरदस्त आदर दिला गेला. जवळपास तिनशे धावा करायच्या असतांना आणि पॉवर प्ले असतांना सलामीवीरांनी "अहिंसा परमो धर्म" चा जाप करायला नको होता. अखेर फिरकीसमोर लेझीम खेळत राहुलने आपली विकेट गमावली. त्यामानाने शिखर धवनने चांगली खेळी केली. त्याला विराटची साथ लाभताच हा सामना भारतीय संघ हसत खेळत जिंकणार असे वाटत होते. या दोघांच्या फलंदाजी समोर द. आफ्रिकेचा मारा अत्यंत सामान्य वाटत होता.

मात्र शिखर धवन परतताच पुन्हा एकदा टीम इंडिया धरण फुटल्यासारखी कोसळली. खरेतर भारतीय फलंदाजी विराटभोवती घुटमळते. शिवाय विराट धावांचा पाठलाग करतांना बब्बर शेर आहे. मात्र या सामन्यात त्याच्या शेर पावशेर धावा पाहून कुठेतरी टीम इंडिया गटांगळ्या खाणार हे ठरले होते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विराटची कर्णधार पदाची कवचकुंडले काढल्याने तो नक्की कोणत्या मानसिकतेतून जात असेल याबाबत न बोललेलचं बरं.  विराट म्हणजे "जहाँ मॅटर बडा, वहाॅं विराट खडा" असे समिकरण होते. तसेच या सामन्यात कमीतकमी एका फलंदाजाने शतक ठोकून डाव सांभाळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्येक फलंदाज "जागते रहो,मेरे भरोसे मत रहो" सारखे खेळले.

विराट नंतर दोन्ही अय्यर बाऊंसरवर धाराशायी झाले. तर रिषभ पंतने घोर निराशा केली. तो मॅचविनर आहे यात वाद नाही मात्र मॅच्युरिटी नावाची काही गोष्ट असते याचे त्याला भान नाही. कदाचित पद्मीनी कोल्हापूरे, सचिन पिळगावकर सारखा तो कायम बाल्यावस्थेतच राहणार काय असा प्रश्न पडतो. शेवटी शार्दुल ठाकूरने आपली ठाकूरकी दाखवली मात्र तोपर्यंत आपल्या संघाची अंतिम यात्रा निघाली होती. त्याची पन्नाशी ना त्याला समाधान देऊ शकली ना संघाला विजयी करू शकली. 

अखेर पहिल्याच वनडे मध्ये पराभवाची नामुष्की आपल्या संघावर आली. राहुलच्या नेतृत्वाबद्दल सध्यातरी फारकाही बोलणे योग्य ठरणार नाही.मात्र फलंदाजीत त्याला आपला रेकॉर्ड नक्कीच सुधारावा लागेल. तर शिखर धवन आणि विराटला आणखी जबाबदारीने खेळावे लागेल. श्रेयस अय्यर असो की व्यंकटेश अय्यर, या दोघांनाही मिळालेल्या संधीचे सोने करावे लागेल. सोबतच सूर्यकुमार यादवचे लोणचे घालू नये एवढी अपेक्षा आहे. व्यंकटेश आय्यरला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात घेतले असेल तर त्याला एकही षटक का दिले नाही याचे आश्चर्य वाटते. खरेतर कालचा सामना पाहून पुजारा, रहाणे सुखावले असतील. आम्ही दोघं नसतांनाही टीम इंडिया सामने हरू शकते हे पाहून दोघांचा ऊर भरून आला असेल. शेवटी काय तर जवळपास एकशे तीस करोड जनसंख्येतून आपण अकरा खेळाडूंत जागा पटकावली आहे तर कमीतकमी प्रदर्शनही त्याच दर्जाचे करणे भारतीय खेळाडूंना गरजेचे आहे. अन्यथा क्रिकेट रसिक कसोटी सोबतच एकदिवसीय सामन्यांकडे पाठ फिरवतील अशी भिती वाटते.
***********************************
दि. २० जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, January 17, 2022

कोहलीची विराट पतंग कटली

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *कोहलीची 'विराट' पतंग कटली*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
 देशभरात नुकतेच मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे. यानिमित्ताने नामचीन पतंगबाजांनी मोठ्या मोठ्या पतंगी लिलया कापल्या आहेत. क्रिकेटच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाशक्तीमान असलेल्या बीसीसीआयने नायलॉन मांजा पेक्षाही मजबूत असलेल्या निवड समितीद्वारे कोहलीची विराट पतंग कापली आहे. खरेतर मोठ्या विश्वासाने बीसीसीआयने विराटकडे टीम इंडियाची धुरा सोपवली होती. मात्र विराट "कानामागून आला आणि शहाणा झाल्याने" त्याच्यावर निवड समितीची खप्पा मर्जी झाली होती. याच वादाचे रुपांतर वादळात होऊन विराटच्या डोक्यावर असलेलं कर्णधार पदाचं छप्पर उडून गेले आहे.

झाले काय तर धोनीचा सूर्य मावळताच टीम इंडियाला कोहलीच्या रूपाने एक विराटसूर्य गवसला होता. खंदा फलंदाज, तडफदार कर्णधार आणि लढवय्या सरदार म्हणून विराटने अल्पावधीतच क्रिकेट जगतावर आपली छाप सोडली. टीम इंडियाला आक्रमकतेचे बाळकडू जरी सौरभ गांगुलीने दिले असले तरी त्याला धार लावण्याचे काम विराटने केले होते. मैदानावर त्याच्या दादागिरीला त्याची बॅटही साथ देत होती. त्यातच विराटचा झंझावात पाहता तो सचिनचे रेकॉर्ड तोडण्याच्या गावगप्पा सर्वत्र ऐकू येत होत्या. विरोधी संघाशी दोन हात करणे असो की मैदानावर प्रेक्षकांशी पंगा घेणे असो, विराटने प्रत्येक वेळी जशास तसे उत्तर दिले होते. विराटच्या या डॅशिंग रुपचे त्याचे समर्थकच नव्हे तर विरोधकही कौतुक करत होते.

विराटच्या क्रिकेट लिला पाहता क्रिकेट जगतात त्याची ओळख किंग कोहली म्हणून झाली होती. विराटच्या आक्रमकतेला शास्त्री बुवाचा वरदहस्त लाभताच कोहलीच्या गुणवंत खेळाडूची जागा एका उन्मत्त कर्णधाराने घेतली. शास्त्री बुवांची ढाल चिलखते घेऊन विराटने संघात आपली हुकूमशाही सुरु केली. शास्त्री विराट या गुरूशिष्याने बीसीसीआयला हायजॅक करून टाकले होते. "हम करे सो कायदा" या न्यायाने कुलदिप यादव आणि इतरही नावडत्या खेळाडूंची कुचंबणा केली गेली. मात्र जोपर्यंत टीम इंडिया जिंकत होती तोपर्यंत याबाबत फारशी चर्चा होत नव्हती. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी असो की २०१९ चा वर्ल्ड कप असो, संघाची माती होताच विराटच्या नेतृत्वावर शंका घेण्यात येऊ लागली होती.

अर्थातच विराटचे मुसके आवळायला मध्यंतरी सन्मार्गी असलेल्या अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदी नेमले होते. मात्र मस्तवाल झालेल्या विराटने उलट कुंबळेलाच पद सोडण्यास बाध्य केले होते. दरम्यान बीसीसीआयचे सुकाणू सौरभ गांगुलीने घेतले आणि इथेच ठिणग्या उडायला सुरुवात झाली. एका म्यानात दोन तलवारी राहणे शक्यच नव्हते. गांगुलीने बीसीसीआयचा पदभार स्वीकारताच टीम इंडियाला आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. विराट मातीचा गोळा असेपर्यंत बीसीसीआय त्याला आकार देऊ शकली असती. परंतु आता उशीर झाला होता. उत्कृष्ट फलंदाज असलेल्या विराटचे एका उद्दाम कर्णधारात रूपांतर झाले होते. त्यातच त्याच्या फलंदाजीत धावा आटू लागल्या होत्या.

भरीस भर म्हणून टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंनी त्याच्याविषयी तक्रार करणे सुरू केले होते. टीम इंडिया २०१९ चा वर्ल्डकप, जागतिक कसोटी विजेतेपद आणि टी ट्वेंटी सारख्या स्पर्धात ढेपाळली आणि विराटचा परतीचा प्रवास सुरू झाला. कर्णधार पदाच्या मुकुटाला साजेसा असा विश्वचषक त्याला पटकवता आला नाही. त्यातच टीम इंडिया द.आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिका जिंकण्यास उत्सुक होती आणि त्यासाठी सर्वच प्रचंड आशावादी होते. मात्र केपटाऊनला टीम इंडिया नावाच्या भरश्याच्या म्हशीला टोणगा झाला. आधीच विराटला टी ट्वेंटी ची सुभेदारी गमवावी लागली होती. त्यातच एकदिवसीय संघासाठी त्याला कर्णधार पदाची झुल उतरावी लागली. दोन्हीकडे कोंडी झाल्याने विराट चवताळला. परंतु त्याच्या पाठीशी ना शास्त्रीबुवा होते ना आणखी कोणी. यावेळी त्याला "सुखके सब साथी, दुख मे न कोय" चा प्रत्यय आला असेल.

अर्थातच मानभंगाने पेटलेल्या विराटने कर्णधार पद सोडले. आपण खेळात १२०% टक्के योगदान देण्याचा उल्लेख त्याने केला परंतु त्याने कळत नकळत काही खेळाडूंबाबत चारसौ बिसी केली हे तो विसरला. मग बीसीसीआयने त्याला चारशे चाळीसचा झटका दिला त्यात वावगे काय. विराटसाठी त्याने जे पेरले तेच त्याच्यासाठी उगवले. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतोच. बीसीसीआय, निवड समिती आणि विराटमध्ये असलेला लव्ह ट्रॅंगल शेवटी हेट स्टोरीमध्ये रूपांतरीत झाला. याप्रकरणी जुळवाजुळवी करण्याचा प्रयत्न झाला परंतु "रहिमन धागा प्रेम का मत तोरो चटकाए, टूटे पे फिर ना जुरें, जुरें गाॅंठ परी जाय" हेच खरे ठरले.

पाण्यात राहून माशाशी वैर करू नये हे विराटला बीसीसीआयशी पंगा घेतांना समजायला पाहिजे होते. त्याला शिखरावर जायचे होते मात्र शिखराकडे जातांना झुकून जावे लागते हा साधा नियम आहे. "गॉड ऑफ क्रिकेट" सचिन याचे उत्तम उदाहरण आहे.  कोहलीने सचिनमार्गा ऐवजी विराटमार्ग निवडला. मात्र त्या मार्गावर डेड एंड आहे हे त्याच्या ध्यानात आले नसावे. कमीतकमी सात वर्षे टीम इंडियाचे सारथ्य करताना त्याने आपला एखादा वारसदार निर्माण केला असता तर आणखी बरे झाले असते. 

विराट पायउतार होताच बीसीसीआयला कोणाच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकावी यासाठी डोकेदुखी वाढली असणार. कारण रोहित नक्की केंव्हा फिट होणार हे कोडंच आहे. के एल राहुलला आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्व करतांना मोठा फरक जाणवला असेल. पुजारा रहाणे सध्या पेन्शनर आहेत. त्यांचा अनुकंपा तत्वावर फारतर झिंबाब्वे, बांगलादेश विरुद्ध विचार केला जाऊ शकतो.रिषभ पंत कर्णधार पदासाठी ना छोटा आहे ना मोठा आहे. जसप्रीत बुमराह कर्णधार पदाचे मटेरियल आहे किंवा नाही याबाबत शंका आहे. खरेतर वासरात लंगडी गाय शहाणी म्हणून अश्विनचा विचार केला जाऊ शकतो. शिवाय संघात विराट असतांना नाकापेक्षा मोती जड ठरू नये यासाठी कुवतीचा कर्णधार अपेक्षित आहे.

 विराटची घणाघाती फलंदाजी, त्याचा मुठा आवळत मैदानावर वावर, जिंकण्याचा जोश,विकेट मिळताच त्वेषाने धावणे,, क्रिकेट रसिक कधीच विसरणार नाही. तरीपण त्याने क्रिकेट युद्धात टीम इंडियाला चढाया जिंकून दिल्या. मात्र निर्णायक लढतीत तो अपयशी ठरला. एक साहसी, सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून जरी ओळखला गेला असला तरी त्याचे याप्रकारे पायउतार होणे क्रिकेट प्रेमींसाठी धक्कादायक ठरले आहे. कर्णधार म्हणून जवळपास सात वर्षे टीम इंडियावर अधिराज्य केलेल्या विराटला "विद्या विनयेन शोभते" चा विसर पडला आणि हेच त्याच्या पतनाला कारणीभूत ठरले आहे. कर्णधार विराटच्या निर्गमनाबाबत आपण फारतर एवढंच म्हणू शकतो,,,,
"पलट के सु ए चमन देखने से क्या होगा,,वो शाख ही ना रहीं जो थी आशियाॅं के लिये"
"ना तू जमीं के लिये हैं न आसमां के लिये,, तेरा वजूद है अब सिर्फ दास्ताॅं के लिये"
************************************
दि. १७ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Saturday, January 15, 2022

केपटाऊनला टीम इंडिया डाऊन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *केपटाऊनला टीम इंडिया डाऊन*
               *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
प्रचंड गाजावाजा करत फ्रीडम श्रृंखला सर करायला निघालेल्या टीम इंडियाने चाहत्यांना निराश केले आहे. सेंच्युरीअन मैदानातून उड्डाण भरलेल्या टीम इंडियाचे अखेर केपटाऊनला मिटर डाऊन झाले आहे. दुसऱ्या कसोटीतील चुकांमधून काही धडे न घेता "हम नहीं सुधरेंगे" चा धडा आपल्या संघाने घेतल्याने मालिका गमावली आहे. खेळात हारजीत तर होणारच आहे. परंतु तिसऱ्या कसोटीत फलंदाजांनी हाराकिरी करत मालिका द.आफ्रिकेला अर्पण केली आहे. बुजगवाण्या खेळाडूंनी भारतीय संघाला पोकवण्याचे काम इमानेइतबारे केले असून द.आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

खरेतर या मालिकेचे नाव "ससा कासव शर्यत" ठेवले असते तर ते जास्त संयुक्तिक ठरले असते. मालिकेच्या प्रारंभी बढत घेऊनही भारतीय सश्याला आफ्रिकन कासवाने सहज हरवले. पहिल्या कसोटीतील विजयाने उन्मत्त झालेल्या टीम इंडियाच्या गजराजला डीन एल्गर नावाच्या माहुताने चांगलेच काबूत केले. पराभवाने खचून न जाता डीन एल्गरने संघात आपल्या कर्तृत्वाने प्राण फुंकून आपल्या संघाला वर खेचले. अनुभवी कसिगो रबाडा, लुंगी एनगिडीने आपल्या सहकारी गोलंदाजांसोबत अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले होते. थोडी लाज राखायला भारतीय फलंदाजांनी या मालिकेत दोन शतके जरुर झळकावली परंतु ते प्रयत्न तोकडे पडले. फलंदाजांच्या ढेपाळलेल्या कामगिरीने यौवनात असलेली आपली गोलंदाजीही भरकटून गेली. फलंदाजांच्या सुमार आणि गोलंदाजांच्या साधारण कामगिरीने भारतीय संघाची अवस्था "डाळ शिजत नाही,वरण उकळत नाही" अशी झाली होती.

भारतीय फलंदाजी कागदावर बलाढ्य आहे. मात्र त्यांचा "घरमें शेर, बाहर मे ढेर" चा प्रत्यय या मालिकेत पहायला मिळाला. पहिली कसोटी सोडल्यास उर्वरित कसोटीत जणुकाही दोनशेच्या आसपासच धावा करायचा विडा टीम इंडियाने उचलल्याचे दिसत होते. मयंक आणि राहुलच्या सलामी जोडीने थोडीफार चुणूक दाखवली होती परंतु आफ्रिकन वेगापुढे ते हतबल ठरले. विराटच्या एकखांबी तंबूवर विसावून पाच दिवसांची कसोटी जिंकता येत नाही. याकरिता मध्यफळीत पुजारा,रहाणेचा समावेश होता. मात्र या दोन्ही खेळाडूंना बहुतेक बीसीसीआयने ध्रुवताऱ्यासारखे अढळपद दिले असावे. इतकी बेक्कार फलंदाजी तर गल्लीबोळातले पोरं सुद्धा करत नसणार. या दोन्ही फलंदाजांनी मध्यफळीत केलेला खेळखंडोबा पाहता या दोघांनी "राष्ट्रीय अंडी उबवणे उपक्रम" हाती घ्यायला हरकत नाही.

खरेतर या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी आत्मचरित्र लिहून "फलंदाजी कशी करु नये" याबाबत नवोदितांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. सोबतच निवड समितीने या दोघांना संबंधीत रणजी संघाचे कर्णधार पद देऊन सन्मानाने शाल श्रीफळ द्यायला हरकत नाही. एवढे असले तरी कसोटी सामन्यांपासून प्रेक्षकांना दूर करण्याचे श्रेय या दोन फलंदाजांना नक्कीच जाते. फलंदाजीच्या शेपटाकडे पाहिल्यास रिषभ पंत असो की हनुमा विहारी, यांना उर्वरित फलंदाजांना घेऊन धावसंख्या फुगवता आली नाही. अंतिम कसोटीत रिषभ पंतने शतक जरूर झळकावले परंतु बुमराहला स्ट्राईक देऊन त्याने संघाचा खेळ खल्लास करून टाकला. वास्तविकत: बुमराह हा अकराव्या क्रमांकाचा फलंदाज. त्याच्या गोलंदाजीला तोड नसली तरी तो मनोरंजनात्मक फलंदाजी निश्चितच करतो. यापुर्वी आपण मुथय्या मुरलीधरन आणि हरभजनजी कॉमेडी फलंदाजी पाहिली होती. त्यांचाच वारसा बुमराह पुढे नेत आहे. मात्र त्यावर विश्वास ठेऊन रिषभ पंतने घोडचूक केली आणि भारतीय संघाचा डाव लवकर संपुष्टात आला. 

नाही म्हणायला आपल्या संघात शार्दुल ठाकूर आणि अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या भुमिकेत आहेत. परंतु हे दोघेही फार चमक दाखवू शकले नाही किंबहुना त्यांनी कामगिरीत सातत्य राखले नाही. विराट सहीत भारतीय खेळाडूंनी मैदानावर आक्रमकता जरूर दाखवली. मात्र ही लढाई "शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ" अशी होती आणि इथेच भारतीय संघ गडबडला. भारतीय आक्रमणाला द.आफ्रिकन फलंदाजांनी खेळपट्टीवर धिरोदात्तपणे उभे राहीत चौथ्या डावात भारतीय गोलंदाजांचा चोथा करून टाकला. खेळपट्टीवर चेंडू जेवढा उसळत होता त्यापेक्षा जास्त भारतीय खेळाडू विकेटसाठी उसळत होते. मात्र डीन एल्गर ॲंड कंपनीने शांतपणे भारतीय आक्रमणाची धार बोथट करत आपले लक्ष्य गाठले.

संपूर्ण दौऱ्याचा विचार करता भारतीय संघ आणि कर्णधार निवडीबाबत जे मानापमानाचे नाट्य रंगले त्याचा प्रतिकूल प्रभाव संघाच्या कामगिरीवर झाला. पहिली कसोटी जिंकताच द.आफ्रिकेवर दबाव आणून मालिका जिंकण्याची नामी संधी भारताला होती. मात्र दुसऱ्या कसोटीत विराट संघात नसणे द.आफ्रिकेच्या पथ्यावर पडले. त्यातच राहुलला कसोटीचे कर्णधार पद झेपले नाही. पुजारा रहाणे जोडीने "हम बने तुम बने टीम इंडियाको डुबानेके लिये" चा राग आवळल्याने संघाची गाडी चिखलात फसली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करून थोड्याफार आशा जागवल्या होत्या. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेला जिंकण्यापासून ते थोपवू शकले नाही. या मानहानीकारक पराभवानंतर निवड समितीने संघात जागा अडवून बसलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवणे गरजेचे आहे. सोबतच रूतूराज गायकवाड, श्रेयस अय्यर,शुभमन गिल आदी खेळाडूंचा जरूर विचार करावा. भुतकाळातील कामगिरीपेक्षा वर्तमान फॉर्म,फिटनेसच्या आधारे संघनिवड करावी. अन्यथा "काम के ना काज के दुश्मन अनाजके" खेळाडू संघात भरल्यास भविष्यात आणखी नाचक्की अटळ आहे.
************************************
दि. १५ जानेवारी २०२२
मो‌.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, January 7, 2022

दुसऱ्या कसोटीत डीन एल्गरचा एल्गार

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
  *दुसऱ्या कसोटीत डीन एल्गरचा एल्गार*
               *डॉ अनिल पावशेकर*
************************************
वान्डरर्स मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिका संघाने वंडरफुल कामगिरी करत भारतीय संघाला धुळ चारली आहे. पहिल्या कसोटीत अजेय ठरलेल्या भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत सहज मात देत द.आफ्रिका संघाने मालिकेत बरोबरी साधली आहे. चौथा डाव आणि दोनशेच्या वरचे लक्ष्य म्हणजे हाराकिरी करणे नव्हे हे डीन एल्गरने भारतीय संघाला दाखवून दिले आहे. शामी, बुमराह, सिराज, अश्विन आणि शार्दुल ठाकूर विरोधात द.आफ्रिकेच्या कर्णधाराने एल्गार पुकारत त्याचा संघाला विजयपथावर आणले आहे. डीन एल्गरच्या अनोळखी खेळाडूंनी भारतीय संघाच्या नावाजलेल्या खेळाडूंना दणका देत "जो है नामवाला वहीं तो बदनाम है" हे दाखवून दिले.

खरेतर द.आफ्रिकेचा सध्याचा संघ म्हणजे भारतीय संघासमोर कच्चा निंबू आहे. त्यातही त्यांच्या संघातील अकरा खेळाडूंचे नाव कोणी एका दमात आणि स्पष्ट उच्चारात  घेईल अशी परिस्थिती नाही. तरीही या संघाने भारतीय संघाला दुसऱ्या कसोटीत नाक रगडायला भाग पाडले. याला कारणीभूत भारतीय संघाची "लहानात लहान,थोरात थोर" ही मन:स्थिती आहे. भारतीय संघ वेळ पडली तर कोणत्याही बलाढ्य संघाला त्याच्या अंगणात जाऊन बुकलून काढतो किंवा लिंबूटिंबू संघासमोर लटपट कापतो. शिवाय पहिली कसोटी जिंकून दुसरी कसोटी हरण्याचा कपाळकरंटेपणा केवळ आपलाच संघ करू शकतो.

हा पराभव भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र यात दुःख कमी आणि राग,उद्वेग जास्त आहे. या पराभवाचे पोस्टमॉर्टेम करायचे झाले तर संघनिवड हे प्रमुख दुखणे आहे. एकतर विराटचे दुसऱ्या कसोटीत न खेळणे असो की पुजारा रहाणेचे संघात असून नसणे असो. पुजारा रहाणे ही पस्तिशीकडे झुकलेली जोडी संघासाठी पांढरा हत्ती ठरत आहे. "असून अडचण नसून खोळंबा" ठरलेल्या या दोघांनी मध्यफळीचा नुसता विचका केला आहे. निश्चितच या खेळाडूंनी भुतकाळात चांगली कामगिरी केली आहे. मात्र भुतकाळाच्या कामगिरीवर या दोघांचे आणखी किती लाड करावे याला मर्यादा असल्या पाहिजेत.

वास्तविकत: ही जोडी म्हणजे भारतीय संघाचे हळद कुंकू आहे. मात्र सध्यातरी हळदही रुसली, कुंकूही रुसले असल्याने भारतीय संघावर संक्रांत आली आहे. या दोघांनी यापुढेही हाच नन्नाचा पाढा चालू ठेवला तर येत्या संक्रांतीपर्यंत या दोघांना शाल श्रीफळासहित निरोप समारंभ मिळू शकतो. याउलट यांच्याच वयाच्या डीन एल्गरने या दोघांपेक्षा कमी कसोटी खेळण्याचा अनुभव असूनही संघाला एकहाती तारले आहे. पहिल्या डावात तर पुजारा रहाणेची उडालेली दैना पाहता हे दोघे मिळून जवळपास पाऊने दोनशे कसोटी खेळले असतील यावर विश्वास बसत नाही. दुसऱ्या डावात लोकलाजेखातर या दोघांनी अर्धशतकी खेळी केल्या मात्र त्या "वाळवंटात मुतलं, ना ओहोळ ना ठिगळ" या प्रकारच्या ठरल्या.

या दोघांचे यापुर्वीही एखादे अर्धशतक, शतक ठोकायचे आणि पुढील सामने गाभण करायचे हा प्रकार आपण अनुभवला आहे. मात्र "एका पिसाने (अर्धशतकाने) मोर होता येत नाही" हे राहुल द्रविडने या दोघांना सांगायला हरकत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जोपर्यंत खेळाडू आपलं सर्वस्व झोकून उत्तम प्रदर्शन करत नाही तोपर्यंत तुम्ही साक्षात ब्रह्मदेवाला जरी प्रशिक्षक केले तरी काही फरक पडणार नाही. शिवाय प्रदर्शनावर आधारीत संघनिवड होत नाही तोपर्यंत वरिष्ठ खेळाडू सामन्यात असाच खेळ खंडोबा करत राहणार. यापुढे या दोघांची निवड कामगिरीवर असावी, अर्धशतकाच्या व्याजावर नव्हे, इतके तरी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

इतर फलंदाजांबाबत बोलायचे झाले तर सध्यातरी मयंक, राहुलने समाधानकारक कामगिरी केली आहे. मात्र पुजारा,रहाणे सोबतच रिषभ पंतच्या बेजबाबदारपणाचा फटका भारतीय संघाला बसला आहे. सोबतच कमी संधी मिळालेल्या हनुमा विहारीला तिस चाळीस धावांची वेस ओलांडून "शतकी विहार करावा लागेल". अश्विन, शार्दुलला त्यांच्यात दडलेल्या फलंदाजाला खुलवावे लागेल तरच कुठे भारतीय संघ समाधानकारक धावसंख्या उभारू शकेल. अन्यथा दोनशे अडीचशे धावांचा पाठलाग द.आफ्रिकेचा संघ सहज करू शकतो हे या कसोटीत दिसून आले आहे.

भारतीय संघाची गोलंदाजी, फलंदाजी पेक्षा नक्कीच उजवी आहे. मात्र चौथ्या डावात ती भेदक दिसली नाही. अडीचशेच्या आतले आव्हान टिकवणे भारतीय गोलंदाजांना जमले नाही. पंजाबात ज्या सहजतेने मोदींचा ताफा रोखला गेला, त्यापेक्षाही सरसपणे डीन एल्गरने भारतीय मारा थोपवला. वरुणराजाने भारतीय संघाला थोडासा दिलासा जरूर दिला मात्र दोन दिवसांचा खेळ बाकी असल्याने व.आफ्रिकेला आरामशीर विजय मिळवता आला. एल्गरच्या गोलंदाजांनी विशेषतः रबाडा, एनगीडीने आपल्या नवख्या सहकाऱ्यांसह अप्रतिम मारा करत भारतीय फलंदाजांना वेसण घातले होते.

तीन कसोटी सामन्यांची ही मालिका आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. अंतिम कसोटीत भारतीय सलामीवीरांसोबतच पुजारा रहाणे जोडीला लौकिकाला साजेशी कामगिरी करणे जरुरी आहे. रिषभ पंतने अजूनही आपण पाळण्यातले खेळाडू आहो या मानसिकतेतून बाहेर पडणे आवश्यक आहे. आक्रमकता आणि आक्रस्ताळेपणा यात पुसटशी रेषा असते याचे त्याला भान ठेवावे लागेल. तर हनुमा विहारीला भारतीय फलंदाजीचे शेपूट "हनुमानाच्या शेपटी सारखे" कसे वाढवता येईल याचा विचार करावा लागेल. मुख्य म्हणजे  भारतीय गोलंदाजांना पुरेशी संधी देण्याइतपत फलंदाजांनी धावा करणे क्रमप्राप्तच आहे. तरच कुठे आपण द.आफ्रिकेचा आतापर्यंत अजेय असलेला किल्ला सर करू शकतो. अन्यथा "बडे बेआबरु होकर तेरे कूचे से हम निकले" असे म्हणायची भारतीय संघावर पाळी येऊ शकते.
*************************************
दि. ०७ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...