Wednesday, June 28, 2023

आग आगीवर झाली फिदा!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         आग आगीवर झाली फिदा!
              डॉ अनिल पावशेकर
***********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात २५ हेक्टर जागा व्याघ्र सफारी करता आरक्षित आहे. कॅप्टीव्ह झू अर्थातच बंदिस्त सफारीच्या या प्रकारात पर्यटक एका बस मधून पर्यटनाचा आनंद घेतात तर राजकुमार नावाचा आठ वर्षांचा वाघ आणि बारा वर्षांची ली नावाची वाघीण मुक्तपणे संचार करत असते. सध्यातरी इथे या जोडागोळीची सत्ता असून दोघांच्या दर्शनाने पर्यटकांचे व्याघ्र सफारीचे पैसे वसूल होतात. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे या दोघांच्या लीला पाहून गोरेवाडा सफारी सार्थकी लागल्याचे समाधान मिळते.

या व्याघ्र जोडीची कहानी रंजक आहे. असे म्हणतात की राजकुमार नावाच्या वाघाला जंगलापेक्षा भंडारा क्षेत्रातील मानवी वस्तीची ओढ जास्त होती. त्यातही हे महाशय लग्नसमारंभात आवर्जून हजेरी लावायचे. हे प्रकरण इतके वाढले होती की याची स्वारी चक्क स्टेजपर्यंत धडक द्यायची. जणुकाही लग्नसमारंभ बाजूला राहिले आणि यहाँ के हम है राजकुमार म्हणून ऐटीत वावरायचा. याचा हाच बिनधास्तपणा पाहून याचे राजकुमार असे नामकरण करण्यात आले असावे. तर ली ह्या वाघीणीला पहिले रेस्क्यू सेंटर नंतर सफारी भागात दाखल करण्यात आले आहे. खरेतर जंगल सफारीत कितीही सुंदर प्राणी दिसले तरी जोपर्यंत व्याघ्र दर्शन होत नाही तोपर्यंत मनाला हुरहुर लागून राहते. मात्र इथे या युगलाचे मनसोक्त दर्शन घडते. 

राजकुमार नावाप्रमाणेच अवाढव्य, ऐटीत चालणारा, रांगडा‌. राजकुमार चे थोडक्यात वर्णन करायचे झाले तर गडी अंगाने उभा नी आडवा, त्याच्या रुपात रानटी गोडवा. तर ली वाघीण त्यामानाने छोट्या आकाराची, शांत. मात्र दोघांचीही गट्टी चांगली जमली होती. जणुकाही तू जहां जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा प्रमाणे ली राजकुमारला फॉलो करत होती. या दोघांचा लाडीवाळपणा पाहून प्रेम हे केवळ आंधळं नसतं तर ते कधी कधी रांगडं असतं, जंगली आणि हिंसक सुद्धा असतं वाटू लागतं. हे दोघेही जेंव्हा पर्यटक बस ला खेटून उभे राहतात तेव्हा जीवाचा थरकाप उडतो. पण त्या दोघांनाही बस आणि पर्यटकांशी काही देणं घेणं नसतं. कारण तिकडे आग आगीवर फिदा झाली असते.

वाघ हा मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी असून तो भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो नैसर्गिक अन्नसाखळीत सर्वोच्च स्थान भुषवतो. त्याची शिकार क्षमता जबरदस्त असून तो मुख्यत्वे तृणभक्षी प्राण्यांची शिकार करतो. जंगलात वाघ असणे जंगलाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाघाच्या भीतीने लाकूडतोडे अथवा जंगलावर अवलंबून असणारे लोक जंगलात जात नाही आणि जंगल सुरक्षित राहते. वाघ नसला तर जंगलांची बेसुमार कत्तल होऊन जंगले लवकर साफ होण्याची तसेच सभोवतालचे तापमान वाढण्याची  भीती असते. तृणभक्षींची संख्या आटोक्यात ठेवण्यासाठी, जंगल संपदा अबाधित राखण्यासाठी तसेच जागतिक तापमान नियंत्रित करण्यासाठी व्याघ्र रक्षण, व्याघ्र संवर्धन गरजेचं आहे.

वाघाचे शास्त्रीय नाव पॅंथेरा टायग्रीस असून या प्रजातीची उपलब्धता चिंताजनक आहे ‌. भारतात वाघ संर‌क्षित प्राणी असून त्याची शिकार दंडनीय अपराध आहे. सध्या भारतासहित म्यानमार, थायलंड, चीन आणि रशियात आढळतो‌. वाघांच्या पाच उपप्रजाती असून त्यात इंडोचायनीज वाघ अथवा कोर्बेटी वाघ, मलेशियन वाघ, सुमात्रन वाघ, सायबेरियन वाघ आणि दक्षिण चिनी वाघ यांचा समावेश होतो. तर बाली वाघ, जावन वाघ आणि कॅस्पियन वाघ जवळपास नामशेष झालेले आहेत. मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व आढळते. यांत कान्हा, बांधवगड, मेळघाट, ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य येतात.

सायबेरियन वाघ आकाराने सर्वात मोठा असतो तर भारतीय वाघ त्याच्या तुलनेत छोटा असतो. वाघ पुर्णतः मांसाहारी असून तीक्ष्ण दांत, मजबूत जबडा आणि चपळ शरीर ही त्याची शिकारीची आयुधं आहेत. सांबर, रानगवा, हरणे, नीलगाय, रानडुक्कर यांसारखी मध्यम ते मोठ्या आकाराच्या प्राण्यांची तो शिकार करतो. वाघ पहिले सावज हेरतो, दबा धरून बसतो आणि जास्तीत जास्त जवळ जाऊन सावजावर हल्ला करतो. वाघ शिकार साधल्यावर ती गुहेत किंवा दाट झाडीत लपून ठेवतो कारण अस्वले, तडस, गिधाडे त्यावर टपून बसलेले असतात. शिकार केल्यानंतर भक्ष्यानुसार त्याला तीन ते सात दिवस शिकार पुरते. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघ प्राधान्य देतो.

भल्या मोठ्या वाघाला ढाण्या वाघ म्हणतात. भारतीय संस्कृतीत वाघाला आदरयुक्त भीतीचे स्थान आहे. जंगलचा राजा म्हणून ओळख असलेला हा प्राणी जनसामान्यांत शौर्य, राजबिंडेपणा, सौंदर्य आणि राकटतेचे प्रतिक मानले जाते. वाघाला आपल्या संस्कृतीत पार्वतीचा अवतार असलेल्या महिषासुर मर्दिनीचे व तिच्या अनेक रुपांचे वाहन बनवले आहे. अनेक संस्थानिक तसेच राजकीय पक्षांच्या मानचिन्हांवर वाघ विराजमान आहे. मात्र वाघांचे नैसर्गिक निवासस्थान नष्ट करणे, निवासस्थान खंडीत करणे आणि त्यांची शिकार करण्यामुळे वाघांच्या संख्येवर विपरित परिणाम होत आहे. सध्या भारतात अंदाजे ३१७६ वाघ असून महाराष्ट्रात ४४६ वाघ असल्याचे सांगितले जाते.

वाघ हा एकटा राहणारा प्राणी असून प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टे वेगवेगळे असतात, जसे प्रत्येक माणसाचे ठसे वेगवेगळे असतात. पंजाची ठेवणही वेगळी असते. वाघ पट्टीचे पोहणारे असून आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून अथवा झाडांवर नखांचे ओरखडे मारुन निश्चित करतात. प्रत्येक वाघाचे शिकारी क्षेत्र ६० ते १०० चौ.किमी. असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात इतर नर वाघांना येण्यास मज्जाव करतात. मात्र अनेक वाघीणींना आपल्या क्षेत्रात सामील करून घेतो‌. नर वाघ आपल्या क्षेत्रात आपल्या पिल्लांचेही अतिक्रमण सहन करत नाही. पण काही वेळ नर वाघांनी पित्याची भूमिका देखिल बजावल्याचे आढळते. वाघांच्या तुलनेत वाघीणींचे क्षेत्र कमी म्हणजेच १५ ते २० चौ. किमी. असते.

वाघ अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी त्याला एक शिकार मिळवायला सरासरी वीस प्रयत्न करावे लागतात. माणूस वाघांचे नैसर्गिक भक्ष्य नाही. वाघ शक्यतो माणसांशी संपर्क टाळतो. जो वाघ वारंवार माणसांवर हल्ले करतो, नेहमी भक्ष्य बनवतो त्याला नरभक्षक वाघ म्हणतात. विशेषतः सुंदरबन येथील प्रतिकुल नैसर्गिक परिस्थितीने, खाऱ्या पाण्याने वाघ जास्त आक्रमक होतात. तसेच वृद्धपण, जखमांमुळे, इतर शिकार साधता न आल्याने किंवा काही पुर्वानुभवांमुळे वाघ नरभक्षक होतात. उत्तरेकडील भागात मानवी मृतदेहांना नदीत वाहून देण्याच्या अंत्यसंस्काराच्या प्रथेने वाघांना आयते भक्ष्य मिळाल्याने ते नरभक्षक बनतात असाही एक मतप्रवाह आहे.

व्याघ्र संरक्षण, संवर्धनाला आजच्या घडीला प्राधान्य दिले जात आहे. यांत शिकाऱ्यां विरूद्ध कडक नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. सोबतच व्याघ्र संख्या वाढीच्या दृष्टीने वाघांच्या वसती स्थानातून मनुष्य वस्ती पूर्णपणे हटवून माणुस व वाघ यांतील संघर्ष टाळता येईल. जंगलातील कुरणांचा विकास करून हरीणांच्या व इतर भक्ष्यांच्या संख्येत वाढ करण्यावर भर दिला पाहिजे. घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ वाढवणे, उन्हाळ्यात उपासमार व पाण्याचा दुर्भिक्षापासून जंगलातील प्राण्यांना वाचवणे, नैसर्गिक पाणवठे संवर्धित करणे, कृत्रिम पाणवठ्यांची सोय करणे तसेच पुरापासून संरक्षणासाठी चौथारे किंवा उंचावरील जागांची निर्मिती करणे याद्वारे व्याघ्र आणि इतर प्राण्यांचे संवर्धन शक्य होऊ शकते. एखाद्या जंगलात क्षमतेपेक्षा जास्त व्याघ्रसंख्या आढळली तर इतर कमी वाघ असलेल्या जंगलात त्यांचे पुनर्वसन करणे आदी बाबी व्याघ्र संरक्षण, संवर्धनास करता येईल.
गोरेवाडा सफारी वर्णन समाप्त.
*********************************
दि. २८ जून २०२३ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Sunday, June 25, 2023

पुरोगामी मधुमेहाचे मधुर भंडार !

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *पुरोगामी मधुमेहाचे "मधुर भंडार"*
             *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुर भांडारकर यांचा इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून काँग्रेसने या चित्रपटावर बंदीची मागणी केलेली आहे. चित्रपट आणि विवाद आपल्याकडे नित्याचेच आहे तरीपण आणिबाणी सारख्या वादग्रस्त विषयावर आधारित या चित्रपटाला होणारा प्रखर विरोध पाहता राजकीय वातावरण परत एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहे. अर्थातच श्रीमती इंदीराजी आणि आणिबाणी सारखे संवेदनशील विषय असल्याने काँग्रेसचा या चित्रपटाला होणारा विरोध स्वाभाविक आहे. स्वतः मधुर भांडारकरांनी हा चित्रपट ७०% काल्पनिक तर केवळ ३०% सत्यघटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे तरीपण यामुळे विरोधकांचे समाधान झाले नसून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

४८ वर्षीय मधुर भांडारकर हे सिनेजगतात एक चर्चित नाव असून त्यांचे चित्रपट बऱ्यापैकी गाजलेले आहेत. चांदणी बार (२००१), पेज थ्री (२००५), ट्राफीक सिग्नल (२००७), फॅशन (२००८) इ. यापैकी ट्राफीक सिग्नल या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ निर्देशकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  राजकीय, सामाजिक आणि ज्वलंत विषय चित्रपटातून योग्यप्रकारे हाताळण्यात मधुर भांडारकर पटाईत आहेत. यामुळेच या चित्रपटाचे रसिकांना आकर्षण आहे.

आणिबाणी बद्दल बोलायचेच झाले तर निश्चितच हा काळ भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने सर्वात काळाकुट्ट भाग ठरतो.राजकारणात सत्ता सांभाळतांना काही अप्रिय निर्णय घ्यावेच लागतात,, अर्थातच तत्कालीन परिस्थितीवर सुद्धा बरेच काही अवलंबून असते. श्री राजनारायन यांनी १९७१ ला रायबरेली इथून श्रीमती इंदीराजींविरूद्ध पराभूत होताच अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या केसमध्ये मतदारांना आमिष देणे, सरकारी मशीनरीचा दुरुपयोग करणे, सरकारी संस्थानांचा गैरवापर करणे यासहीत तब्बल १४ आरोप श्रीमती इंदीराजींवर ठेवण्यात आले.अखेर १२जून १९७५ ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री जगमोहन सिन्हा यांनी श्रीमती इंदीराजींना दोषी ठरवत त्यांना सहा वर्षांकरीता पदापासून बेदखल केले.

 २५ जून १९७५ ला सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निकाल कायम ठेवला परंतु श्रीमती इंदीराजींना पंतप्रधान पदी राहण्याची परवानगी दिली. अर्थातच यामुळे श्री जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शवत २५ जून १९७५ ला श्रीमती इंदीराजींच्या राजिनाम्याची मागणी करत देशव्यापी प्रदर्शनाची हाक दिली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अखेर श्रीमती इंदीराजींनी तत्कालीन राष्ट्रपती मा. फक्रुद्दीन अली अहमद यांच्याद्वारे संविधान कलम ३५२ अंतर्गत आणिबाणी जाहीर केली. यामुळे देशभरात एकच गदारोळ उडाला. निवडणूका रद्द करण्यात आल्या, विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले, नागरिकांना मौलीक अधिकारापासून वंचित व्हावे लागले तर प्रेसवर अमर्याद बंधने आली. याचकाळात श्री संजय गांधी यांनी नसबंदी अभियान केल्याने एकच हल्लाकल्लोळ माजला. अखेर २१ महिन्याचा कालावधी घेऊन हा काळा अध्याय बंद झाला.

खरेतर श्रीमती इंदीराजींचे भारतीय राजकारणात अमुल्य योगदान आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला तोड नाही. कणखर बाणा, प्रचंड आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती आणि आपल्या पोलादी नेतृत्वाने त्यांनी विरोधकांना सहज नमवले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची चांगली ओळख होती. विकसनशील राष्ट्रांच्या अलिप्त चळवळीत त्या अग्रेसर होत्या. त्यांचा दरारा एवढा होता की त्याकाळी इंदीरा इज इंडीया असे हमखास म्हटले जायचे. संपूर्ण भारतात त्या तुफान लोकप्रिय होत्या. अशाप्रकारे या वादळी व्यक्तिरेखेवर चित्रपट म्हणजे येऱ्यागबाळ्याचे काम नव्ह परंतु मधुर भांडारकर यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. 

आता प्रश्न असा आहे की कला,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषणस्वतंत्रतेच्या मर्यादा कोण आणि कशा ठरवणार? याबाबतीत आपले नेहमीचे पुरोगामी दुटप्पी भूमिका घेत आहेत. माय नेम इज खान या चित्रपटाला शिवसेनेने विरोध करताच तमाम पुरोगामी मंडळी शाहरुख खानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. बाॅलीवुडमधले तमाम धुरंधर शिवसेनेचा विरोध झुगारून आंगठे आणि चिमटे दाखवत चित्रपट पहायला गर्दी करू लागली होती. एवढेच काय तर पुरोगामीत्वाच्या बाबतीत हम भी कुछ कम नही  हे दाखविण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री आपल्या पोलिसांच्या प्रचंड फौजफाटेसह चित्रपटाला हजर होतेच. मिडीयात तर शाहरूख खानचा अखंड जप यानिमित्ताने बघायला मिळाला. मग प्रश्न असा पडतो की हाच न्याय इंदू सरकारला का नाही? ढोंगी पुरोगाम्यांच्या  अशाच दुटप्पी वागण्याचा फटका शिक्षणाच्या आयचा घो, गुलाम ए मुस्तफा, बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटांना बसला.

 याऊलट कोणीच बंदीची मागणीसुद्धा केली नसतांना व्हॅटीकन नाराज होऊ नये म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने दा विंची कोड नावाच्या परदेशी चित्रपटाला भारतात प्रदर्शनाची परवानगी दिली नव्हती. राणी पद्मावती चे शुटींग करनी सेनेने उधळताच तमाम ढोंगी पुरोगाम्यांना असहिष्णुतेच्या भयंकर उलट्या व्हायला लागल्या होत्या. पुरस्कार वापसीचे नाट्यप्रयोग याच काळात केले गेले. गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध करणारे कलेचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी ठरतात तर आता विरोध करणाऱ्यांना काय म्हणावे हा प्रश्नच आहे. गुलाम अलीच्या मैफिलीत बेधुंद होणारे,,हाच गुलाम अली पाकिस्तानात गेल्यावर आपले खरे रुप दाखवतो तेव्हा आपले ढोंगी पुरोगामी अचानक बेपत्ता होतात.  पाकिस्तानी गायक, कलाकारांना विरोध करणारे मानवतेचे दुश्मन ठरतात परंतु हीच मंडळी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरुद्ध विषवमन करतात.

अर्थातच कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा परिस्थितीचे विकृत सादरीकरण निंदनीय आहेच. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगार किंवा अपराध्यांचे उदात्तीकरण नकोच.आमिर खानच्या पी के या चित्रपटात हिंदूंची आणि देवीदेवतांची येथेच्छ निंदानालस्ती करण्यात आली परंतु ही कला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती होती. एम एफ हुसेन हिंदू देवीदेवतांची नग्न छायाचित्रे काढतो तो कलेचा अविष्कार असतो. तर सलमान रश्दीच्या काही पुस्तकांवर बंदी घालून आणि बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन जीव मुठीत घेऊन जगतांना आपण आपली धर्मनिरपेक्ष परंपरा जपतो.  

आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो पण याच ढोंगी पुरोगामी आणि त्यांच्या वामपंथीय कंपूने भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवादी, हिंदू जासूस सारखे शब्द प्रयोग चलनात आणले. अर्थातच जनतेला यातला फोलपणा लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणूनच पुरोगामीत्वाचा मधुमेह झालेल्यांना भांडारकरचा हा मधुर डोज कितपत सहन होते हे पाहणे रंजक ठरेल.  माय नेम इज खानला एक न्याय आणि इंदू सरकारला वेगळा न्याय हा कायद्याच्या कोणत्या कसोटीत बसतो हे ढोंगी पुरोगाम्यांनी स्पष्ट करणे गरजेचं आहे. 
**********************************
दि. १९ जुलै २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Saturday, June 24, 2023

इंग्लंडवर बॅझबॉलचे बुमरॅंग

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
          इंग्लंडवर बॅझबॉलचे बुमरॅंग
               डॉ अनिल पावशेकर
*********************************
१९७६ ला प्रदर्शित कालीचरण या हिंदी चित्रपटात अभिनेते अजित (दिनदयाल सेठ) यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. सारा शहर मुझे लाॅयन के नाम से जानता है और इस शहर में मेरी वहीं हैसीयत है, जो जंगल में शेर की होती है! सांगायचं तात्पर्य इतकंच की नुकतीच ॲशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या बॅझबॉलचा उदोउदो होत असला तरी कांगारूंच्या विजयांत फिरकीपटू नॅथन लॉयन हा छुपा रुस्तम ठरला आहे. सायलेंट किलर ठरलेल्या या लॉयनने दोन्ही डाव मिळून इंग्लंडचे आठ फलंदाज गारद केले. तसेच शेवटच्या दिवशी धीरोदात्तपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला.

झाले काय तर ॲशेस मालिका म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी जीव की प्राण असतो. त्यातही कांगारूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकून अश्वमेधाचा घोडा थेट एजबस्टन बर्मिंगमला उतरवला होता. अर्थातच ॲशेस जिंकून जागतिक क्रिकेटचे इंद्रपद मिळवणे हे कांगारूंचे स्वप्न होते. मात्र प्रतिस्पर्धी इंग्लंडचा संघ कच्च्या गुरूचा चेला नव्हता. कांगारूंचा हाडवैरी असलेला, किवीजचा तडाखेबंद फलंदाज ब्रेंडन मॅक्युलन ने इंग्लंड संघारी धुरा सांभाळताच इंग्लिश संघात अमुलाग्र बदल केले होते. नजर बदलो, नजरीया बदल जाएगा प्रमाणे त्याने क्रिकेट खेळण्याची बाराखडी बदलवून टाकली. फलंदाजी करताना विरोधी गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की हे त्याचे सरधोपट समीकरण.

याच गुरूमंत्राला जागत इंग्लिश संघाने अवघं क्रिकेट जगत दणाणून सोडलं होतं. त्यांच्या आक्रमक आणि फिअरलेस क्रिकेटने टी ट्वेंटी, एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ कसोटी सामने जिंकण्याचा सपाटा लावला होता. धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलनचे टोपणनाव बॅझ आणि याचंच प्रतिबिंब म्हणून इंग्लंडच्या दणकेबाज खेळाला बॅझबॉल क्रिकेट हे नाव मिळाले. मात्र बॅझबॉल क्रिकेट हे एकप्रकारे दुधारी तलवार आहे. कारण बरेचदा शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ ठरते आणि यामुळेच ॲशेसच्या पहिल्या कसोटीत कांगारू वरचढ ठरले. एकीकडे इंग्लंड संघ आक्रमक क्रिकेट खेळतांना कांगारूंनी ठंडा करके खाओ ची भुमिका घेतल्याने पहिल्या लढतीत कांगारूंची सरशी झाली.

वास्तविकत: दोन्ही संघ तुल्यबळ होते. इंग्लंडच्या जो रूट, क्राउली, हॅरी ब्रुकच्या तुलनेत कांगारूंचे वॉर्नर, ख्वाजा, स्मिथ तोडीस तोड होते. जेम्स ॲंडरसन, स्टुअर्ट ब्रॉडच्या तुल्यबळ जोश हेझलवूड, बोलॅंड होते. दोन्ही संघांकडे बेन स्टोक्स, मोईन अली, कॅमरून ग्रीन, पॅट कमीन्स सारखे अष्टपैलू खेळाडू होते. जॉन बेअरस्टो, ॲलेक्स कॅरी दोघेही उत्तम यष्टीरक्षक फलंदाज होते. तरीपण कांगारूंचा नॅथन लायन हा हुकमाचा एक्का या सामन्यात निर्णायक ठरला. गोलंदाजीतील विविधता कांगारूंच्या पथ्यावर पडली आणि ही तुल्यबळ लढत अखेर कांगारूंनी जिंकली.

फर्स्ट डे फर्स्ट शो ला इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली आणि अवघ्या ७८ षटकांत आठ बाद ३९३ धावांवर डाव घोषित केला. जो रूट चांगला लयीत असतांना डाव घोषित करण्यास नक्कीच वाघाचं काळीज लागतं आणि ते बेन स्टोक्स ने दाखवून दिले. कंटाळवाणे आणि रटाळ क्रिकेटला मुठमाती देण्याचं इंग्लंडच्या या कृतीचे अस्सल क्रिकेट प्रेमी नक्कीच स्वागत करतील. लगेच इंग्लंडने ऑसींना दबावात आणून ३८६ धावांत रोखले. खरी कसोटी यानंतरच होती. कारण दोन्ही संघांच्या पहिला डावातील धावसंख्येत फारसा फरक नसल्याने दुसरा डाव निर्णायक ठरणार होता आणि इथेच दोन्ही संघांचा कस लागणार होता.

इंग्लंडच्या पहिल्या डावात जो रूट ने तर कांगारूतर्फे उस्मान ख्वाजाने शतक झळकावले होते. मात्र इंग्लिश संघ दुसऱ्या डावात फलंदाजीत ढेपाळला. जो रुट, हॅरी ब्रुक आणि बेन स्टोक्सने चाळीशी गाठली परंतु कांगारूंना आव्हान देण्याइतपत लक्ष्य ते गाठू शकले नाही. चौथ्या डावात २८० धावांचे आव्हान कांगारूं साठी त्यामानाने सोप्पा पेपर होता ‌ त्यांतही ख्वाजा,वॉर्नरने प्रारंभीच ६१ धावांची सुरेख सलामी देत सामन्यावर पकड मिळवली होती. इंग्लंडचं खरं दुखणं म्हणजे त्यांचे भरवश्याचे गोलंदाज जेम्स ॲंडरसन आणि मोईन अली निष्प्रभ ठरणे होय. ब्रॉड आणि रॉबिन्सन ने कांगारूंचा अर्धा संघ बाद केला परंतु कांगारूंचा शेपटाकडून त्यांना कडवी झुंज मिळाली.

ॲलेक्स कॅरी च्या रूपात आठवा ऑसी फलंदाज बाद झाला आणि अजूनही त्यांना जवळपास पन्नास धावा हव्या होत्या. मात्र इथेच चमत्कार घडला. कर्णधार पॅट कमीन्स आणि चिवट नॅथन लॉयनने अभेद्य भागिदारी करत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले. शेवटच्या काही षटकांत तर ऑन, लेगला तटबंदी उभारून दोन्ही फलंदाजांच्या बरगड्यांना लक्ष केले गेले. शेवटची लाईफलाईन म्हणून नॅथन लॉयनचा झेल इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे म्हणजेच बेन स्टोक्स कडे उडाला परंतु तो दिवस इंग्लंडचा नव्हताच‌. कमीन्स, लायन्सने इंग्लिश गोलंदाजांना भीक न घालत दृढनिश्चयी खेळी केली आणि कांगारू संघाला चॅम्पियन संघ का म्हणतात हे दाखवून दिले.

थोडक्यात काय तर इंग्लंड संघाने बॅझबॉल क्रिकेट खेळत क्रिकेट मध्ये नवीन ट्रेंड आणला आहे‌. यामुळे क्रिकेट रसिकांना गतिमान खेळ पहायला मिळत आहे. निश्चितच यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंगत येऊन कसोटी सामन्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांच्या जय पराजयात उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायन हे दोन बिंदू महत्वाचे ठरले. जो रुटची सशा सारखी चपळ वेगवान खेळी आणि ख्वाजाची शांत संयमी कासव खेळी, ससा कासव शर्यतीची आठवण करून गेली. जो रूट चे फ्लिक आणि ख्वाजाचे पुल फलंदाजीची मेजवानी देऊन गेले.

 उस्मान ख्वाजा दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना पुरून उरला. दोन्ही डावात त्याने प्रत्येकी दोन महत्वपूर्ण भागिदाऱ्या करत आपल्या संघाला सावरले. मात्र वेगवान गोलंदाजांच्या भाऊगर्दीत फिरकीपटू लायन सर्वात यशस्वी ठरला. प्लेअर ऑफ दी मॅच भलेही उस्मान ख्वाजा ठरला असला तरी या सामन्याचे सिंहावलोकन करताना नॅथन लॉयनचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. पहिल्या डावात इंग्लंडचे डाव लवकर घोषित करणे, तर दुसऱ्या डावात पुरेशी धावसंख्या न उभारणे आणि सरतेशेवटी कांगारू शेपटाचे वळवळणे इंग्लंडच्या मुळावर आले. मात्र इंग्लिश संघावर बॅझबॉलचे बुमरॅंग झाले असले तरी उर्वरित सामन्यात कांगारूंचा हिशोब करण्यास ते सक्षम आहेत.
***********************************
दि‌. २३ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, June 23, 2023

इंग्लंडवर बॅझबॉलचे बुमरॅंग!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *ये दिल मांगे मोर, भाग ०६*
                *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
*बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर इथल्या हर्बीवोर सफारीचं मोर हा पक्षी प्रमुख आकर्षण असतो. झुंडीत सात ते आठच्या संख्येने असलेले मोर सतत इकडून तिकडे झेपावत आपले लक्ष वेधून घेतात. खरेतर मोर हा पक्षांचा राजा पण पक्षांना उडण्याचे जे वरदान प्राप्त झाले आहे, त्यापासून मोर वंचित आहे. मोरांचे वजन जास्त असल्याने ते फारकाळ उडू शकत नाही. तरीपण काही काळ हवेत झेप घेऊन हे उडण्याची हौस पूर्ण करून घेतात. अतिशय सुंदर, सावध, लाजाळू, हुशार आणि उडण्यापेक्षा चालणे पसंत करणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव पावो क्रिस्टॅटस आहे.*

*सांस्कृतिक संदर्भात मोराला सरस्वती देवी आणि कार्तिकेयाचे वाहन मानले जाते. यामागे नैसर्गिक जीवनसाखळी अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे ‌. अनेक प्राणी, पक्षांना विशिष्ट देवी देवतांशी जोडून त्यांचे जतन, संवर्धन करण्याचा उद्देश असावा असे वाटते. २६ जानेवारी १९६३ ला मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले गेले होते. १९७२ च्या वन्यजीव कायद्यांतर्गत मोरांचे संरक्षण केले जाते. मोरांची सतत घटणारी संख्या रोखण्यासाठी १९८२ ला मोराच्या शिकारीवर बंदी घातली गेली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली गावांत मोराच्या झुंडी आढळतात. बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे राज्यातील, देशातील एकमेव मयुर अभयारण्य आहे.*

*मोरांचे तीन प्रकार आढळतात. सर्वाधिक सुंदर आणि आकर्षक असलेले भारतीय मोर अथवा निळा मोर, दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर आणि तिसरा प्रकार म्हणजे आफ्रिकेतल्या कांगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.  भारता सोबतच नेपाळ, श्रीलंका, भुतान, म्यानमार आणि पाकिस्तान मध्ये मोर आढळतात. पानझडी जंगल, शेतबागां सोबतच पाणवठ्याजवळ त्यांचे वास्तव्य असते. मात्र मोरांमध्ये प्रतिकुल हवामानाशी जुळवून घेण्याची अद्वितीय क्षमता असल्याने ते युरोपच्या थंड हवामानात अथवा राजस्थान सारख्या उष्ण, कोरड्या वाळवंटातही तग धरू शकतात. मोराच्या खाद्यात झाडांची पाने, फळे, धान्य, भाज्या, कीटक, साप, सरडे, अळ्या यांचा समावेश होतो.*

*मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी असून याची लांबी जवळपास एक मीटर असते. लांब, इंद्रधनुषी शेपटी साठी प्रसिद्ध असलेल्या मोराचे डोळे तपकिरी गडद रंगाचे असते. डोके लहान असून त्यावर मुकुटा सारख्या हिरव्या तपकिरी रंगाचे पिसे असतात. मोरांच्या शेपटीची पिसे हिरवट निळ्या रंगाची असून त्यावर निळा डाग सहज नजरेत भरतो. पाय लांब आणि काटकुळे असतात. मान लांब आणि सुंदर निळ्या मखमली रंगाची असते. गळ्यातील निळ्या रंगामुळे त्याला निळकंठ म्हणतात तर तो सापांना मारून खातो म्हणून त्याला भुजंगभुक सुद्धा म्हणतात. मोरांच्या आवाजाला केकारव म्हणतात, जो म्यांव म्यांव किंवा म्युंहू म्युंहू असा असतो.*

*पावसाळ्याच्या सुरुवातीला (साधारणतः मे,जून) मोरांचा विणीचा हंगाम असतो. या हंगामात मोर नराला पिसारा असतो‌ व विणीचा हंगाम संपताच तो झडून जातो. नर मोर, मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो. मोरांच्या अंड्यांतून तिस दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. मादी मोर (लांडोर) वर्षातून दोनदा अंडी घालतात. मोरांत दुरचे आवाज ऐकण्याची क्षमता असते. मोर दरवर्षी आपली पिसे बदलतो, जुनी पिसे पडून त्याजागी नवीन पिसे येतात. मोरांचे आयुष्यमान साधारणतः पंधरा ते वीस वर्षांचे असते. मोर शेतकऱ्यांचा मित्र असतो. पीक नष्ट करणारे कीटक मोर खातो. सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो. सोबतच   देवतांना नैवेद्य दाखवणे, गोलाकार पंखा बनवने अथवा फुलदाणीत सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो.*

 *असे म्हणतात की मोराच्या प्रभावाने मुघल बादशहा शहाजहानने मयुर सिंहासन तयार केले होते. त्याला तख्त ए ताऊस असे नाव दिले गेले. कारण फारसी मध्ये मोराला तौस म्हणतात. हे मयुर सिंहासन सात वर्षांत सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर मौल्यवान जवाहिऱ्यांनी तयार केले गेले होते. लाल किल्ल्यातील दिवाण एक खास मध्ये स्थापित हे मयुर सिंहासन त्यावेळी अंदाजे एक कोटी रूपये किंमतीच्या सामनातून तयार केले गेल्याचे सांगण्यात येते. इ‌.स. १७३९ ला इराणचा बादशाह नादिर शहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले. यांत त्याने कोहिनूर, दर्या ए नूर सोबतच मयुर सिंहासन लुटून ते इराणला नेले.* 
क्रमशः,,,,
*********************************
दि. २२ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Thursday, June 22, 2023

निमा संघटनेचे आधारवड, डॉ विनायक टेंभुर्णीकर सर.

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *निमा संघटनेचे आधारवड*
          *डॉ विनायक टेंभुर्णीकर सर*
***********************************
साल २०११, स्थळ कोल्हापूर, वेळ सकाळी १० वाजताची आणि निमित्त होते निमा राज्य शाखेच्या वार्षिक बैठकीचे. राज्यभरातील निमाचे प्रतिनिधी याकरिता प्रचंड संख्येने उपस्थित होते. मुख्य म्हणजे पुढच्या वर्षाकरीता नविन अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड करायची असल्याने वातावरण चांगलेच धुमसत होते. शिवाय या बैठकीला यवतमाळ येथील वार्षिक बैठकीत झालेला अभुतपुर्व गोंधळ तसेच निमाच्या एका जेष्ठ पदाधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची कटू पार्श्वभूमी लाभल्याने सभास्थानी ताणतणाव जाणवत होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन गृहराज्यमंत्री मा.सतेज पाटील हे उपस्थित होते.

एकदाचा उद्घाटनाचा औपचारिक प्रसंग पार पडला आणि मा.गृहराज्यमंत्री सभागृहातून बाहेर पडताच प्रचंड गोंधळाला सुरुवात झाली. याचे कारण असे होते की तत्कालीन निमा राज्य शाखेचे अध्यक्ष यांनी परत एकदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याचे सुतोवाच केले होते. मात्र यवतमाळला सहजरीत्या जिंकलेली लढाई यावेळी त्यांना सोपी नव्हती. त्यांच्या उमेदवारीला काही सदस्यांचा तीव्र विरोध होता. तसेच यादरम्यान काही मंडळींनी पेपरबाजी केल्याने वातावरण आणखी प्रक्षोभक झाले होते. मा. अध्यक्ष बोलायला उभे राहताच विरोधकांचा संताप अनावर झाला आणि एकच गोंधळ उडाला. कोणीही कोणाचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. जो तो स्टेजवर चढण्यासाठी उत्सुक होता. जिंदाबाद, मुर्दाबाद चे नारे सभागृहात निनादले जाऊ लागले होते. परिस्थिती स्फोटक होत असल्याचे पाहताच कोणीतरी पोलिसांना पाचारण केले मात्र यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

अखेर स्टेजवरील एक व्यक्ती उभी राहीली आणि आपल्या अधिकारवाणीने त्यांनी संतप्त सभागृहाला सांभाळले. सर्वात पहिले त्यांनी सभागृहात दाखल झालेल्या पोलिसांना परत पाठवल्याने वातावरण निवळण्यास मदत झाली. या व्यक्तीने सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता मोठ्या कौशल्याने ती आणिबाणीची परिस्थिती हाताळली आणि अपेक्षित असलेल्या एका मोठ्या संघर्षाला विराम दिला होता. तसेच अध्यक्ष निवडीवरून जो असंतोष खदखदत होता त्यावर तोडगासुद्धा काढला. अखेर या सर्व अप्रिय घटनेवर पडदा टाकण्यासाठी तत्कालीन निमा राज्य शाखेच्या अध्यक्षांनी समजुतदारपणा दाखवत आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली आणि संपूर्ण सभागृह जल्लोषात डुंबून गेले.

मित्रांनो त्यावेळी संकटमोचक म्हणून जी व्यक्ती धावून आली होती, ती व्यक्ती म्हणजेच डॉ विनायक टेंभुर्णीकर सर होय. त्या दिवशी सरांनी आपल्या समयसूचकतेचा परिचय देत सभागृहाला आटोक्यात आणले होते. सर निमा संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि या संघटनेचा व्याप आणि व्याप्ती पाहता त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. खरेतर निमा संघटनेचा जन्मच आयुर्वेद युनानी विद्यार्थी, व्यावसायीक, शिक्षक यांच्या भल्यासाठी झाला आहे. तसेही आयुर्वेद म्हटले की संघर्ष पाचविलाच पुजला आहे. मात्र या सर्व संघर्षाला पुरून उरत निमा संघटना आजही सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे.

वास्तविकत: २०१५ ला आयुर्वेद स्नातकांना इंटीग्रेटेड प्रॅक्टिसचा कायदा महाराष्ट्रात करण्यात आला होता. मात्र इतर राज्यात परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. त्यातच आयुर्वेद द्वेष्ट्यांनी एनसीआयएसएम चे पिल्लू सोडून गोंधळात आणखी भर घातली. खरेतर हा आयुर्वेद पदविधारकांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता. कित्येक कुटुंब देशोधडीला लागण्याची परिस्थिती उद्भवली होती. आयुर्वेदाच्या नावाने बाशिंग बांधून बसलेल्या इतर संघटना यावेळी मुग गिळून गप्प बसल्या होत्या. तरीही आयुर्वेद पदविधारकांना एकमेव अपेक्षा आणि आशा होती ती फक्त एकाच संघटनेकडून आणि ती म्हणजे निमा कडून. 

याकरिता सरांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षाची  रुपरेषा आखण्यात आली. सर्वप्रथम स्थानिक लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो की खासदार यांच्या भेटीगाठी घेऊन सत्यपरिस्थितीची त्यांना जाणीव करून देण्यात आली. तसेच सरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कारण सरकार दरबारी आयुर्वेदाला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली आहे. पुढच्या रणनिती नुसार प्रत्येक जिल्ह्यात मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचा मार्ग अवलंबला गेला. याप्रसंगी निमा नागपूरने ६ ऑक्टोबर २०१७ ला एक भव्य मोर्चा आयोजीत करून पुढील लढ्याचे रणशिंग फुंकले होते.

दरम्यान निमाने एमसीआयएसएचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. याकरीता चलो दिल्लीचा नारा देण्यात आला. मात्र आपला व्यवसाय सांभाळून किती व्यावसायीक यात सामील होतील याबाबत सर्वच साशंक होते. या आरपारच्या लढाईसाठी सरांनी देशभरातल्या शाखांना काही मार्गदर्शक तत्वांसोबत एकत्र येण्याचे आवाहन केले होते. सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ६ नोव्हेंबरला २०१७ ला दिल्लीत निमाने भुतो न भविष्यती असा हजारोंचा महामोर्चा आयोजित करून दाखवला होता. आयुर्वेदाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने आपल्या न्याय्य हक्कांसाठी निघालेला हा एकमेव मोर्चा म्हणून याची दखल घेतली गेली.

अर्थातच या रस्त्यावरच्या लढाईनंतर खरी लढाई होती ती कागदपत्रांची. मग यातच निमाच्या लिगल सेलने आपले सर्वस्व झोकून दिले. अखेर प्रचंड खलबते, विचार विमर्श आणि अडथळ्यांना पार पाडत निमाने आपल्या मागण्या सरकार दरबारी राजी करून घेण्यास सरकारला भाग पाडले. मात्र यासाठी महिनोमहिने दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागले. आयुर्वेद युनानी ची मातृसंघटना असलेल्या निमाने तनमनधनाने हा लढा शेवटपर्यंत तडीस नेल्याने या संघर्षाचे सार्थक झाले. निश्चितच या लढ्यात तळागाळातील निमा कार्यकर्ते असो की सर्वोच्च पदावरील नेते असोत, आपल्या हक्कासाठी लढलेल्या या लढ्याला तोड नाही.

अर्थातच या लढ्याचे डॉ विनायक टेंभुर्णीकर सरांनी यशस्वी सारथ्य करून समस्त आयुर्वेद युनानी जगताला जगण्याचे बळ दिले आहे. प्रसंग कितीही बाका असो, त्याचा धिरोदात्तपणे सामना करत त्यावर मात करणे यात सरांची हातोटी आहे. प्रश्न स्थानिक असो वा केंद्रीय, तेवढ्याच कल्पकतेने समस्येचे निराकरण करण्यात सरांचा हात कोणी पकडू शकत नाही. राज्य शाखेचे व्यवस्थापन सांभाळत अखिल भारतीय स्तरावर समन्वय राखणे म्हणजे करंगळी वर गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे आहे. मात्र सरांनी राज्य आणि केंद्र दोन्ही जागी अचूक बॅटींग करत निमाचा डोलारा कल्पकतेने सांभाळला आहे.

निमा संघटनेच्या भरभराटीसाठी अनेकविध उपक्रम आणि योजना सरांच्या कारकिर्दीत पार पडल्या आहेत. मग ते निमा विमेन्स फोरमची स्थापना असो की स्टुडंट विंग ला बळकटी देणे असो. याशिवाय आयुर्वेदाच्या प्रत्येक विभागासाठी निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी सारख्या स्वतंत्र शाखा स्थापन करणे असो. सोबतच कोरोना काळात बीएएमएस  डॉक्टरांना शासनदरबारी नोकरीतील हक्क, अधिकार मिळवून देणे असो, अथवा आयुर्वेद विद्यार्थ्यांचा आरोग्य विद्यापीठाने केलेला खेळखंडोबा असो, सरांच्या दृढपाठींब्याने निमा संघटना समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. 

आज सरांचा वाढदिवस आहे. आपण सर्वांतर्फे सरांना निरोगी, दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. सरांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली निमा संघटना आणखी भरारी घेईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे.
धन्यवाद 🙏🌹
********************************
दि. २२ जुन २०२३
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++

ये दिल मांगे मोर, भाग ०६

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       ये दिल मांगे मोर, भाग ०६
           डॉ अनिल पावशेकर
*********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर इथल्या हर्बीवोर सफारीचं मोर हा पक्षी प्रमुख आकर्षण असतो. झुंडीत सात ते आठच्या संख्येने असलेले मोर सतत इकडून तिकडे झेपावत आपले लक्ष वेधून घेतात. खरेतर मोर हा पक्षांचा राजा पण पक्षांना उडण्याचे जे वरदान प्राप्त झाले आहे, त्यापासून मोर वंचित आहे. मोरांचे वजन जास्त असल्याने ते फारकाळ उडू शकत नाही. तरीपण काही काळ हवेत झेप घेऊन हे उडण्याची हौस पूर्ण करून घेतात. अतिशय सुंदर, सावध, लाजाळू, हुशार आणि उडण्यापेक्षा चालणे पसंत करणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव पावो क्रिस्टॅटस आहे.

सांस्कृतिक संदर्भात मोराला सरस्वती देवी आणि कार्तिकेयाचे वाहन मानले जाते. यामागे नैसर्गिक जीवनसाखळी अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे ‌. अनेक प्राणी, पक्षांना विशिष्ट देवी देवतांशी जोडून त्यांचे जतन, संवर्धन करण्याचा उद्देश असावा असे वाटते. २६ जानेवारी १९६३ ला मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले गेले होते. १९७२ च्या वन्यजीव कायद्यांतर्गत मोरांचे संरक्षण केले जाते. मोरांची सतत घटणारी संख्या रोखण्यासाठी १९८२ ला मोराच्या शिकारीवर बंदी घातली गेली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली गावांत मोराच्या झुंडी आढळतात. बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे राज्यातील, देशातील एकमेव मयुर अभयारण्य आहे.

मोरांचे तीन प्रकार आढळतात. सर्वाधिक सुंदर आणि आकर्षक असलेले भारतीय मोर अथवा निळा मोर, दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर आणि तिसरा प्रकार म्हणजे आफ्रिकेतल्या कांगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.  भारता सोबतच नेपाळ, श्रीलंका, भुतान, म्यानमार आणि पाकिस्तान मध्ये मोर आढळतात. पानझडी जंगल, शेतबागां सोबतच पाणवठ्याजवळ त्यांचे वास्तव्य असते. मात्र मोरांमध्ये प्रतिकुल हवामानाशी जुळवून घेण्याची अद्वितीय क्षमता असल्याने ते युरोपच्या थंड हवामानात अथवा राजस्थान सारख्या उष्ण, कोरड्या वाळवंटातही तग धरू शकतात. मोराच्या खाद्यात झाडांची पाने, फळे, धान्य, भाज्या, कीटक, साप, सरडे, अळ्या यांचा समावेश होतो.

मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी असून याची लांबी जवळपास एक मीटर असते. लांब, इंद्रधनुषी शेपटी साठी प्रसिद्ध असलेल्या मोराचे डोळे तपकिरी गडद रंगाचे असते. डोके लहान असून त्यावर मुकुटा सारख्या हिरव्या तपकिरी रंगाचे पिसे असतात. मोरांच्या शेपटीची पिसे हिरवट निळ्या रंगाची असून त्यावर निळा डाग सहज नजरेत भरतो. पाय लांब आणि काटकुळे असतात. मान लांब आणि सुंदर निळ्या मखमली रंगाची असते. गळ्यातील निळ्या रंगामुळे त्याला निळकंठ म्हणतात तर तो सापांना मारून खातो म्हणून त्याला भुजंगभुक सुद्धा म्हणतात. मोरांच्या आवाजाला केकारव म्हणतात, जो म्यांव म्यांव किंवा म्युंहू म्युंहू असा असतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला (साधारणतः मे,जून) मोरांचा विणीचा हंगाम असतो. या हंगामात मोर नराला पिसारा असतो‌ व विणीचा हंगाम संपताच तो झडून जातो. नर मोर, मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो. मोरांच्या अंड्यांतून तिस दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. मादी मोर (लांडोर) वर्षातून दोनदा अंडी घालतात. मोरांत दुरचे आवाज ऐकण्याची क्षमता असते. मोर दरवर्षी आपली पिसे बदलतो, जुनी पिसे पडून त्याजागी नवीन पिसे येतात. मोरांचे आयुष्यमान साधारणतः पंधरा ते वीस वर्षांचे असते. मोर शेतकऱ्यांचा मित्र असतो. पीक नष्ट करणारे कीटक मोर खातो. सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो. सोबतच   देवतांना नैवेद्य दाखवणे, गोलाकार पंखा बनवने अथवा फुलदाणीत सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो.

 असे म्हणतात की मोराच्या प्रभावाने मुघल बादशहा शहाजहानने मयुर सिंहासन तयार केले होते. त्याला तख्त ए ताऊस असे नाव दिले गेले. कारण फारसी मध्ये मोराला तौस म्हणतात. हे मयुर सिंहासन सात वर्षांत सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर मौल्यवान जवाहिऱ्यांनी तयार केले गेले होते. लाल किल्ल्यातील दिवाण एक खास मध्ये स्थापित हे मयुर सिंहासन त्यावेळी अंदाजे एक कोटी रूपये किंमतीच्या सामनातून तयार केले गेल्याचे सांगण्यात येते. इ‌.स. १७३९ ला इराणचा बादशाह नादिर शहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले. यांत त्याने कोहिनूर, दर्या ए नूर सोबतच मयुर सिंहासन लुटून ते इराणला नेले. 
क्रमशः,,,,
*********************************
दि. २२ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Sunday, June 18, 2023

लव्ह यू डियर, भाग ०५

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
            लव्ह यू डियर, भाग ०५
              डॉ अनिल पावशेकर
*********************************
बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर इथे हर्बीवोर सफारी करिता चाळीस हेक्टर भूभाग आरक्षित आहे. यांत सर्वाधिक संख्या आहे ती स्पॉटेड डियर अर्थातच ठिपक्यांच्या हरणांची.चला तर मग डियर सफारीला. 'मज आणुनी द्या ते हरीण अयोध्यानाथा' हा सीतामाईने प्रभू श्रीरामांजवळ केलेला सुवर्णमृगाचा लाडीवाळ हट्ट सर्व परिचित आहे. विटकरी कातडीवर पांढरे ठिपके (स्पॉटेड डियर) अतिसुंदर डोळ्यांचा आणि पाहता क्षणीच कोणीही मोहात पडावे असा लोभस प्राणी म्हणजे हरीण‌. याची सुंदरता काय वर्णावी, हरीणांचे डोळे एवढे सुरेख असतात की एखाद्या सुंदर डोळ्यांच्या स्त्री ला हरीणाक्षी, मृगनयनी असे म्हटले जाते.

वास्तविकत: हरणांचा उल्लेख प्राचीन गुहांतील चित्रांपासून इतिहासातात, पौराणिक, धार्मिक कथा आणि साहित्यात आढळतो. हरीणांचे दोन मुख्य उपकुळे म्हणजे सारंग हरणे (सर्व्हीडी) आणि कुरंग हरणे(ॲंटीलोप) ही होय. जगभर असणाऱ्या १८० जातींतील दहा सारंग जाती आणि सहा कुरंग जातींची हरणे भारत, तिबेट, नेपाळ, भूतान इथे आढळतात. भारतात चितळ,सांबर,बारासिंगा, काश्मिरी हंगुल, मणिपुरी संगई, दरडा, कस्तूरी मृग, सिक्कीम शाऊ, पिसोरी आणि पाडा ही सारंग हरणे आढळतात तर चौसिंगा, नीलगाय, काळवीट चिंकारा, गोआ, तिबेटी चीक ही कुरंग हरणे आढळतात.

चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे सारंग हरीण आहे. सारंग हरणाला दरवर्षी नवे शिंग येतात. प्रथम त्यावर मखमली आवरण असते, हळूहळू वाळून त्याचे पोपडे पडतात. यांच्या शिंगांना फांद्यांसारखी इतर शिंगे फुटलेली दिसतात. सारंग कुळात फक्त नरांनाच शिंगे असतात. हरणांच्या पायांना विभागलेले खूर असतात. मध्य भारतात विशेषतः कान्हा, बांधवगड इथे चितळांची संख्या लक्षणीय आहे. खुरटी जंगले, माळराण, गवताळ कुरणे ही हरणांचे नैसर्गिक अधिवास असून ते मोठ्या झाडांखाली कळपाने राहतात. कोवळे लुसलुशीत गवत, कोवळा झाडपाला, शेतातील पिकांची पाने, शेंगा हे त्यांचे आवडते खाद्य होय.

हरीणांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. वजन साधारणतः तीस ते पंच्याहत्तर किलो इतके तर आकार १.७ मीटर इतका असू शकतो. उंचीने शेळी बकरीपेक्षा थोडे जास्त, तोंड निमुळते , दोन उभे कान, लहान शेपटी आणि चार काटकुळे पाय असतात. हरीणांची श्रवण आणि गंध क्षमता तीव्र असते आणि रात्रीची दृष्टी उत्तम असते. हरीण चांगले पोहू शकतात तसेच लांब उडी मारू शकतात. हरणे वेगाने धावतांना सुद्धा त्यात एक कौशल्य असते. धावत धावत वेगात लगेच वळणे घेऊन दिशा बदलतात. हरणांचा रंग ॠतूनुसार बदलतो. पावसाळा आणि हिवाळ्यात गडद तर उन्हाळ्यात रंग फिका पडतो.

हरणाचे बछडे जन्मल्यानंतर तासभरातच उठून चालण्याचा प्रयत्न करू लागते आणि दोन आठवड्यात गवत खाण्यास सुरुवात करते. हरीण एकावेळी एकाच बछड्याला जन्म देतो. क्वचितच दोन बछडे जन्माला येतात. हरणांच्या बछड्यांच्या अंगाला हरीणाच्या अंगासारखा वास नसतो. हा गंध नसल्याने वाघ, बिबट, रानकुत्र्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून त्यांचे रक्षण होते. हरणांच्या डोळ्यांची रचना अशी असते की त्यांना खूप रूंद असा परिसर सहज न्याहाळता येतो. शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी हरीण पाणी पितांना काही हरणे उभे राहून, सभोवार सावध नजर फिरवून एकमेकांना संकेत देतात. 

आखीवरेखीव, बांधेसूद, देखणा आणि चपळ असलेला हा प्राणी स्वभावाने गरीब, घाबरट असतो. तरीपण त्याच्या नजरेत दिसणारी निरागसता आणि करूणा आपल्या मनाचा ठाव घेते. अतिशय सुंदर झळाळणाऱ्या कातडीचा, विविध प्रकारच्या शिंगांचा, सोनेरी, पिवळ्या, लालसर रंगाचा आणि अंगभर पांढऱ्या ठिपक्यांचा हा प्राणी सहजच आपले लक्ष वेधून घेतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या सोनेरी उन्हात यांच्यावरून नजर हटत नाही. सारखे पाहतच रहावे वाटते. कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. त्यातही हरीणांचे गोजिरवाणे बछडे पाहून त्यांना लगेच उचलून घ्यावे किंवा मनसोक्त बिलगावे आणि म्हणावे वाटते,, लव्ह यू डियर!
*********************************
दि. १८ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, June 16, 2023

सौंदर्याचे चिरतरुण रुपडे, स्टेफी ग्राफ

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   सौंदर्याचे चिरतरुण रुपडे, स्टेफी ग्राफ
                डॉ अनिल पावशेकर
********************************
१९८५ च्या काळात महिला टेनिसचे नाव घेतले की मार्टीना नव्रातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड यांचे नाव हमखास पुढे यायचे. मार्टीनाचा जन्म तर जणुकाही ग्रॅंड स्लॅम जिंकण्यासाठीच झाला आहे असे एकंदरीत तिच्या खेळावरून वाटत असायचे. मात्र असे असले तरी वेळ काढून मार्टीनाचा खेळ बघावा असे कधीच वाटत नव्हते. दरम्यान दुरदर्शनने जनमानसात आपले जाळे चांगले पसरवले होते आणि याचदरम्यान मार्टीना व ख्रिस एव्हर्टच्या साम्राज्याला धक्का द्यायला जर्मनीची एक नवोदित टेनिस सुंदरी अवतरण घेत होती. या टेनिस सुंदरीने जर्मनीत टेनिसची लोकप्रियता वाढवली असे म्हणतात परंतू हे अर्धसत्य असून या सम्राज्ञीने न केवळ जगात टेनिस ची लोकप्रियता वाढवली तर आपल्या सुंदर खेळाने जगभरातील प्रेक्षकांना टिव्हीसमोर खिळवून ठेवले होते.

या टेनिस सम्राज्ञीचे नाव होते स्टेफनी मरिया ग्राफ परंतू ही स्टेफी नावानेच प्रसिद्ध होती‌. १४ जुन १९६९ ला मॅनहेम, पश्चिम जर्मनीत जन्मलेल्या या टेनिस ललनेने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना तर टेनिस कलेने विरोधकांना पुरते घायाळ केलेले होते. ५ फुट ९ इंच उंची, गौरवर्ण, हलके निळे डोळे, सोनेरी केसांची ही सोनपरी टेनिस कोर्टवर अवतरली की "तुम हुस्नपरी, तुम जाने जहाँ, तुम सबसे हसी, तुम सबसे जवाॅं" ह्या ओळी आपोआप ओठांवर यायच्या. मुख्य म्हणजे स्टेफीचा कोर्टवर सहजसुंदर सभ्य वावर, त्यातच तिच्या पांढराशुभ्र पोषाखात ती एकदम डिसेंट दिसायची, क्वचित प्रसंगी रंगीत कपड्यात तर आणखीनच मोहक दिसायची आणि तिचे भारतीय साडी मधले रुप कित्ती कित्ती विलोभनीय असणार याची तर कल्पनाच करवत नसे. बस आपल्या हातात "बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दिवाणा" एवढेच म्हणायचे बाकी असायचे.

अर्थातच "काबिले तारिफ होने के लिये, वाकिफ ऐ तकलीफ होना पडता है" हे विसरून कसे चालणार. स्टेफीचा जन्मच टेनिस प्रशिक्षकाच्या घरी झाल्याने आणि मातापिता दोघांच्याही नसानसांत टेनिस खळखळून वाहत असल्याने स्टेफीने टेनिसचे बाळकडू चिमुरड्या वयातच घेतलेले होते‌. अवघ्या तीन वर्षांची असतांना तिने घरबसल्या टेनिसची रॅकेट कशी फिरवायची याचे धडे घेतले तर चौथ्या वर्षी तिची चिमुकली पाऊले टेनिस कोर्टवर अवतरली. पाचव्या वर्षापासून तिने टेनिस स्पर्धेचा श्रीगणेशा केला तर सहाव्या वर्षी तिने आयुष्यातील पहिलीवहिली टेनिस स्पर्धा जिंकली. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" असे म्हणतात मात्र स्टेफीचे पाय थेट टेनिस कोर्टवरच दिसू लागल्याने तिला आपले घर आणि प्रशिक्षक मातापित्यासोबत उज्वल भविष्यासाठी आपले घरदार सोडणे अपरिहार्य झाले होते.

अखेर मजल दरमजल स्टेफी एक्स्प्रेस १९८७ च्या फ्रेंच ओपनच्या फायनलला पोहोचली आणि तिने मार्टीना नव्रातिलोव्हाला धुळ चारत आपले पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. इथून तिच्या टेनिस करिअरची गाडी सुसाट सुटली ती थेट १९९९ च्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद सहाव्यांदा जिंकेपर्यंत. आपल्या स्वर्णीम कारकिर्दीत तिने ऑस्ट्रेलियन ओपन ४ वेळा, अमेरिकन ओपन ५ वेळा, फ्रेंच ओपन ६ वेळा, विम्बल्डन ७ वेळा जिंकली. १९८८ ला स्टेफीने ४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासोबतच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकत "गोल्डन स्लॅमची" कामगिरी करून दाखवली आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू ठरली. तसेच प्रत्येक ग्रॅंड स्लॅम स्पर्धा कमीतकमी ४ वेळा जि़कण्याचा मान तिलाच जातो. डब्ल्युटीए च्या मानांकनात सर्वोच्च स्थानी सर्वात जास्त वेळ आरूढ राहण्याचा भिमपराक्रम (तब्बल ३७७ आठवडे) स्टेफीच्याच नावावर आहे. महिला टेनिसमध्ये पदकतालिकेत ती मार्टीना (१६७), ख्रिस एव्हर्ट‌‌‌ (१५७) नंतर १०७ टायटलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

स्टेफीच्या या भव्यदिव्य यशामागे तिची अथक मेहनत, खेळाप्रती समर्पन आणि प्रचंड आत्मविश्वास दडलेला आहे. ग्रास कोर्ट हे तिचे आवडते मैदान असले तरी क्ले कोर्ट, हार्ड,फास्ट कोर्ट यावरही तिचा झंझावात बघायला मिळायचा‌. तिचे जबरदस्त फुटवर्क आणि ताकदवर फोरहॅंड फटके तिच्या विरोधकांना खेळताना चांगलेच घाम फोडायचे. इनसाईड आऊट फोरहॅंड पॉवरफुल ड्राईव्ह हे तिचे रामबाण अस्त्र होते. तिच्या रॅकेट ची स्पिड आणि स्विंग कमालीचा होता. तिची १७४ कि.मी‌. प्रती तासाची अचूक आणि ताकदवर सर्व्हिस महिला टेनिसमध्ये वेगवान सर्व्हिस मानली जायची.

एवढे सर्व यश पदरात पडल्यावरही तिला अहंकार कधी शिवला नाही. थोडी लाजाळू आणि विनम्र असलेली स्टेफी विद्या विनयेन शोभते ची जिवंत उदाहरण होती. कोर्टवर कधीच आदळआपट नाही की पंचाचे निर्णय विरोधात गेले तर उगाचाच त्रागा नाही. अनावश्यक वादविवाद नाही की एवढी मोठी स्टार खेळाडू असून कुठलाच बडेजाव नाही. असे असले तरी तिच्या आयुष्यात काही अप्रिय आणि कटू प्रसंग आलेले होते.

 असेच एकदा स्टेफी सामना खेळत असतांना एका चाहत्याने स्टेफी,विल यु मॅरी मी असा खोचक प्रश्न विचारला होता. क्षणभर तर स्टेफी या अचानक प्रश्र्नाने स्तब्ध झाली, नंतर लगेचच स्त्रीसुलभ सहजतेने लाजली, मुरडली मात्र लगेचच हजरजबाबीपणाने हाऊ मच मनी यु हॅव असे बाणेदार उत्तर देत सर्वांची मने जिंकली.१९९३ ला स्टेफीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली मोनिका सेलेस कोर्टवर खेळत असतांना स्टेफीच्या एका जर्मन चाहत्याने मोनिका सेलेसच्या खांद्यावर चाकुने सपासप वार केले होते. स्टेफीला नंबर वन होता यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले होते. मात्र झालेल्या या हिंसक घटनेने मोनिका सेलेस दोन वर्षांच्या वर काळासाठी टेनिस पासून दुर राहिली होती. १९९५ ला काल्फ मसल दुखापतीने ती चांगली हैराण झाली होती तर तिचे प्रशिक्षक आणि वडिलांना कर विवाद प्रकरणात ४५ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती,जी नंतर २५ महिने करण्यात आली होती.

१९९७ ते १९९९ दरम्यान टोंगळे आणि कंबरेच्या दुखापतीने तिला ग्रासले होते आणि हळूहळू तिला "हेल्थ इज वेल्थ" चे महत्व पटायला लागले होते. शिवाय आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापेक्षा "आरोग्यं धनसंपदा" किती महत्त्वाची आहे हे कळून चुकले होते. तसेच अमांडा कोईत्झर, याना नोवोत्ना, लिंड्से डेव्हनपोर्ट, मार्टीना हिंगिस आणि विलियम्स भगिनींद्वारे तिला कडवट झुंज देण्यात येऊ लागली होती. यामुळे "स्टेफी ग्राफच्या यशाचा ग्राफ" खाली डोकावूं लागला होता.

अखेर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून तिने १९९९ चे फ्रेंच ओपन जिंकूनही निवृत्तीचा निर्णय घेतला. स्टेफीच्या निवृत्तीने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली. ज्यांना टेनिसची एबीसीडी कळत नव्हती त्यांना फोरहॅंड, बॅकहॅन्ड, टेनिस कोर्ट, ग्रॅंड स्लॅम सारख्या शब्दांना स्टेफीने मुखोदगत करून दिले होते. स्टेफी जिंकली की चाहत्यांना स्वत: बाजी मारल्याची फिलींग येत होती तर स्टेफीला हरवणारी खेळाडू चाहत्यांसाठी व्हिलन ठरत असायची. "टेनिस करिता स्टेफी आणि स्टेफी करिता चाहते" असा अलिखित नियमच तयार झाला होता. एक मात्र खरे स्टेफीला जे चाहत्यांचे प्रेम, पसंती मिळाली, त्याची बरोबरी आणखी कोणत्या टेनिस खेळाडूला मिळाली असेल असे वाटत नाही.

स्टेफीने जरी १९९९ ला अधिकृतपणे टेनिस मधून निवृत्ती स्विकारली असली तरी टेनिस रसिकांच्या हृदयातून ती कधीच निवृत्त होऊ शकणार नाही. तिचे टेनिस कोर्टवरचे आकर्षक पददालित्य, प्वाईंट जिंकली अथवा हरल्यावर निमुटपणे मान खाली घालत आपल्या जागी परतणे, सर्व्हिसची वाट बघतांना तिचे धारदार नाक आणि तिक्ष्ण नजर, सतत हलणारी केसा़च्या वेणीची शेपटी,,,,सर्वकाही लोभस आणि निव्वळ मन वेडावून टाकणारे होते. मात्र २००१ ला या टेनिस सम्राज्ञीने अमेरिकेचा नंबर एक खेळाडू आंद्रे अगासी याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या जगभरातील चाहत्यांची "इक दिले टुकडे हजार हुऐ, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा" अशी स्थिती झाली. लवकरच तिच्या संसारवेलीवर जेडेन आणि जाझ अशी दोन गोंडस फुले अवतरली. आपल्या टेनिस कारकिर्दीत प्रचंड व्यस्त असुनही तिला चांगले सामाजिक भान होते.

 १९९८ ला तिने युद्ध अथवा इतर कारणांनी जखमी, विकलांग बालकांसाठी "चिल्ड्रेन फॉर टुमारो" या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. १४ जून , आज स्टेफीचा वाढदिवस, तमाम टेनिसप्रेमींतर्फे स्टेफीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
***********************************
दि‌. १४ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Thursday, June 15, 2023

सौंदर्याचे चिरतरुण रुपडे,स्टेफी ग्राफ

 १९९८ ला तिने युद्ध अथवा इतर कारणांनी जखमी, विकलांग बालकांसाठी "चिल्ड्रेन फॉर टुमारो" या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. १४ जून , आज स्टेफीचा वाढदिवस, तमाम टेनिसप्रेमींतर्फे स्टेफीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌹💐🎉
***********************************
दि‌. १४ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Tuesday, June 13, 2023

ओव्हलची शोकांतिका, उत्तरार्ध

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
      *ओव्हलची शोकांतिका, उत्तरार्ध*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
ओव्हलला तिसऱ्या दिवशीची अवस्था आसमां से गिरे और खजूर पे लटके अशी होती. भारतीय संघाने फॉलोऑन तर वाचवला होता परंतु पाऊने दोनशे धावांचे ओझे त्यांच्या मानगुटीवर होते. ऑसीच्या दुसऱ्या डावात आपल्या गोलंदाजांनी पहिल्या डावातील चुका टाळत सव्वाशे धावांत कांगारूंचा अर्धा संघ गारद केला होता. पण ऑसी फलंदाजांना पाऊने दोनशे धावांची शिदोरी गाठी असल्याने ते मनमोकळेपणे फलंदाजी करत होते. आपला संघ सामन्यात मुंगीच्या पावलांनी का होईना घरवापसी करत आहे असे वाटत होते. मात्र ॲलेक्स कॅरी आणि स्टार्कने टीम इंडियाच्या स्वप्नांवर पाणी फेरले. अखेर आठ बाद २७० धावांवर ऑसींनी आपला डाव घोषित करुन भारतीय संघाला ४४४ धावांचे आव्हान दिले.

चौथा डाव आणि जिंकायला ४४४ धावा, ते सुद्धा कांगारूंच्या तुफानी आक्रमणापुढे म्हणजे भारतीय संघाला ४४० व्होल्टचा झटका होता. शेवटी आलिया भोगाशी असावे सादर करत भारतीय संघ लढण्यास सज्ज झाला. सलामीवीर रोहित,शुभमनचा पॉझिटिव्ह ॲप्रोच पाहून क्रिकेट प्रेमींत फिलगुड फॅक्टर निर्माण झाला. मात्र हा आनंद क्षणभंगुर ठरला‌. शुभमन पंचांच्या सदोष कामगिरीचा बळी ठरला. तरीपण या धक्क्यातून सावरत रोहित आणि पुजाराने शर्थीने खिंड लढवण्यास सुरूवात केली. तर शत प्रतिशत विजयासाठी कांगारू आसुसले होते. मैदानात भारतीय फलंदाज आणि तिखट कांगारु गोलंदाजांत निकराचे युद्ध सुरू होते. शेवटी रोहित, पुजारा वेगवान माऱ्याला भीक घालत नाही हे दिसताच ऑसींनी आपले मायावी अस्त्र बाहेर काढले.

नॅथन लॉयनने राऊंड दी विकेटचा पवित्रा घेताच अनुभवी रोहितने सावध व्हायला पाहिजे होते. यावेळी शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ ठरणार होती. भारतीय संघासाठी अच्छे दिन आले असतांनाच कुठे माशी शिंकली कोण जाणे. अचानक रोहितने नफरत के बाजारमे मोहोब्बत वाटने सुरू केले. इतका वेळ संयमाने फलंदाजी करणारा रोहित नॅथनला पॅडल स्विप करायला गेला आणि ओव्हल ते ऑस्ट्रेलिया पर्यंत एक आनंदाची लहर पसरवून गेला. जागतिक कसोटी अजिंक्यपद सारख्या मोठ्या स्टेजवर रोहितचा आळशी आणि बेजबाबदार फटका टीम इंडियाची वाट लावून गेला. रोहितच्या वाढत्या वय आणि वजनाने त्याच्या फलंदाजीवर कब्जा केल्याचे दुर्दैवी दृष्य यावेळी बघायला मिळाले.

रोहीत बाद होताच विराट, पुजाराच्या  दिमतीला आला. पण पुजारा रोहितचा विरह सहन करू शकला नाही. जागते रहो मेरे भरोसे मत रहो करत त्याने मैदान सोडले. खरेतर पुजाराने जवळपास वर्षभर इंग्लंडला कौंटीत घाम गाळून प्रतिष्ठा कमावली होती. मात्र पॅट कमीन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्याने आपली विकेट फेकली. पॅटच्या बाऊंसरची मेनका पाहताच पाहताच पुजाराच्या बॅटचे ब्रह्मचर्य कचकड्याचे ठरले. स्वप्नातसुद्धा अप्परकट न खेळणाऱ्या पुजाराने अनपेक्षित कट करत आपल्या हाताने मरण ओढवून घेतले. चार पाच चेंडूच्या अंतराने रोहित, पुजाराने आत्मघात करत संघाला पुन्हा एकदा पराभवाच्या दिशेने ढकलले.

 अवघ्या शंभर धावांत प्रमुख तीन फलंदाज बाद झाल्याने चारशे चौरेचाळीसचा गोवर्धन कोण उचलेल हा प्रश्नच होता. जरी विराट, रहाणे बाकी होते तरी जडेजा, श्रीकर भरत आणि शार्दुल ठाकूरच्या तिसऱ्या आघाडीचा भरवसा नव्हता. त्यातही जोपर्यंत एखादा फलंदाज एक टोक धरून तिहेरी धावसंख्या करत नाही तोपर्यंत काही खरे नव्हते. सामना नाही जिंकला तरी चालेल पण कमीतकमी अनिर्णित जरी ठेवला असता तरी भारतीय चाहत्यांना ते पुरेसे होते. मात्र चितले ते घडत नाही. ना सामना अनिर्णित राखला गेला ना कुठे फायटींग स्पिरीट दिसले. आपल्या राजकारण्यांना जेवढा धाक सीबीआय,इडीचा वाटतो त्याच्या कैकपट धाक ऑसी गोलंदाजांचा आपल्या फलंदाजांवर दिसला. पहिल्या डावात जवळपास पन्नाशी काढणारे जडेजा, शार्दुल ठाकूर दुसऱ्या डावात भोपळ्यांचे मानकरी ठरले.

एकंदरीत काय तर या सामन्यात टीम इंडियाची भट्टी जमलीच नाही. मुख्य म्हणजे आपले प्रमुख फलंदाज कागदी वाघ ठरले. शुभमन, पुजाराचे पहिल्या डावात स्टंप उडणे असो की दुसऱ्या डावात रोहीत पुजाराचे अपयश असो, रहाणेचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजात खेळपट्टीवर टिकून राहण्याची वृत्ती आढळली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये जी झुंजार वृत्ती लागते ती टी ट्वेंटी आणि आयपीएलच्या भडीमारात आपले फलंदाज गमावून बसले. हा केवळ नाममात्र कसोटी सामना नव्हता तर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना होता. त्यामुळे ती जिद्द, ती जिंकण्याची भुक, प्रसंगी आयपीएल वर पाणी सोडण्याची दानत आपल्या खेळाडूंत दिसली नाही.

दहा वर्षे झाली आपला संघ आयसीसीचा कोणताही चषक जिंकू शकला नाही हे आपले दुर्दैव आहे. तिमाही,सहामाहीत चांगल्या गुणांनी पास होणारा आपला संघ वार्षिक परिक्षेत का नापास होतो याचा निवड समितीने जरूर विचार करावा. क्रिकेटच्या तीन प्रकारासाठी तीन वेगवेगळ्या संघाची बांधणी करुन तीन वेगवेगळ्या कर्णधारांना जबाबदारी सोपवली पाहिजे. मुख्य म्हणजे एखादा चांगला खेळाडू चांगला प्रशिक्षक असतोच असे नाही या वास्तवाचे भान ठेवायला हवे. त्यामुळे द्रविड ऐवजी एखाद्या खमक्या प्रशिक्षकाची टीम इंडियाला नितांत गरज आहे हे ओळखायला हवे. शिवाय टीम इंडियात आपल्या सारखे हाडामांसांचे खेळाडू खेळतात, सुपरमॅन, स्पायडर मॅन आणि आयर्न मॅन नव्हे. त्यामुळे आपल्या खेळाडूंना परदेशात खेळताना कमीतकमी दोनतीन प्रॅक्टिस मॅचेस खेळवणे गरजेचे आहे. 

संघातील जुन्या खोडाला आणखी पालवी फुटणे अशक्य असल्याने त्यांना शाल श्रीफळ देऊन निरोप द्यावा. वेगवान आणि फिरकी गोलंदाजीत नवनवीन उपलब्ध पर्याय कोमेजणार नाही याची दक्षता घ्यावी. आयपीएलची वाळवी (आर्थिक दृष्टीने) समूळ नष्ट जरी करता येत नसली तरी आयपीएलच्या सामन्यांची संख्या जरूर कमी करता येऊ शकते. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात कमीतकमी एक महिन्याचे अंतर राखले गेले पाहिजे. अन्यथा आपल्या संघावर लागलेला गुड सेमीफायनलीस्ट आणि फायनल्सचे चोकर्स असलेला डाग कोणत्याही साबणाने धुवून काढता येणार नाही. भाकर केवळ राजकारणातच नव्हे तर टीम इंडियात सुद्धा फिरवण्याची गरज आहे हे याठिकाणी नमूद करावेसे वाटते.
*********************************
दि. १३ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Monday, June 12, 2023

ओव्हलला टीम इंडियाचं वाट्टोळं, पूर्वार्ध

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
 ओव्हलला टीम इंडियाचं वाट्टोळं, पूर्वार्ध
              डॉ अनिल पावशेकर
*********************************
ओव्हल मैदानावर झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सामन्यात चॅम्पियन ऑसी संघाने टीम इंडियाचा दणदणीत पराभव केला आहे. आयपीएल मे शेर बाहरमे ढेर या उक्तीला जागणाऱ्या भारतीय संघाची लज्जास्पद कामगिरी पाहून भारतीय क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला आहे. जणुकाही आयसीसी चषक जिंकणे हे आता आपल्या संघासाठी दिवास्वप्न ठरले आहे असे वाटते‌. अयोग्य संघनिवड, खेळपट्टीचा अचूक अंदाज न घेणे, गोलंदाजीत सातत्याचा अभाव, ठिसूळ फलंदाजु, रोहितचे निष्प्रभ नेतृत्व, द्रविडच्या प्रशिक्षक म्हणून मर्यादा भारतीय संघाच्या पतनाला कारणीभूत ठरल्या आहे.

झाले काय तर आयपीएलच्या वरातीमागून जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे घोडे नाचवले गेले. मात्र आपले घोडे दमले, भागलेले होते हे विसरून कसे चालेल. सध्यातरी टीम इंडिया म्हणजे जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले. तो ची भारतीय संघ ओळखावा, पराभव तेथेची जाणावा अशी स्थिती आहे. मुख्य म्हणजे अश्विनला बाहेर बसवून उमेश यादवची निवड धक्कादायक होती. वेगवान गोलंदाजांच्या भाऊगर्दीत अश्विन सारखा ऑफ स्पिनर काय करू शकतो  हे नॅथन लॉयनने या सामन्यात पाच बळी घेऊन दाखवले आहे. भलेही नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतली हा जुगार जरी असला तरी गोलंदाजांकडून शिस्तबद्ध कामगिरीची अपेक्षा होती. कांगारूंच्या दोन्ही डावात आपल्या गोलंदाजांनी प्रारंभी सत्तर अंशी धावांत तीन तीन बळी घेऊन चुणूक दाखवली होती. मात्र नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या झाले.

ओव्हलला गोलंदाजांनी खोल टप्पा टाकणे अपेक्षित होते. ते त्यांच्या यशाचं गमक होतं. तर डोकेदुखी ठरलेल्या ट्रॅव्हिस हेडला शॉर्ट पीचवर पकडणे जरुरी होतं. याकरिता भारतीय संघाचा गृहपाठ कमी पडला. याच ट्रॅव्हिस हेडने आपल्या गोलंदाजांना बॉल पणीचा काळ सुखाचा नसतो हे दाखवून दिले. त्याने खडूस स्मिथच्या साथीने निर्णायक भागीदारी करत भारतीय संघाला घुटने टेकवण्यास विवश केले. पहिल्याच दिवशी या दुक्कलीने सव्वा तिनशेचा टप्पा ओलांडत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. नशीब समजा दुसऱ्या दिवशी नवीन चेंडू आपल्या मदतीला धावून आला आणि कसेबसे का होईना कांगारूं संघाला गुंडाळण्यात आपण यशस्वी ठरलो. मात्र तोपर्यंत थेम्सच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.

ऑसीचा पाठलाग करतांना रोहीत, शुभमन, पुजारा, विराट, रहाणे या प्रमुख फलंदाजांसोबतच जडेजा, श्रीकर भरत, शार्दुल ठाकूर यांच्या तिसऱ्या आघाडीवर भिस्त होती. मात्र प्रत्यक्षात काय घडले ते सर्व स्पष्ट आहे. एकटा रहाणे आणि तिसऱ्या आघाडीने जोर मारला परंतु बहुमतापासून ते कोसो मैल दूर होते. वरच्या फळीतील दिग्गजांनी मनी नाही धाव, देवा मला पाव केले आणि टीम इंडियाचे सरकार तिनशेच्या आत कोसळले. कांगारूंना पहिल्या डावात जवळपास पाऊने दोनशे धावांची आघाडी मिळताच अब की बार कांगारू सरकार येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. रोहित, शुभमनचे चार चेंडूच्या अंतराने बाद होणे धक्कादायक होते. त्यातही शुभमन आणि पुजाराची चेंडूवरची नजर हटी दुर्घटना घटी संघाला हादरवून गेली. 

शुभमनला एकवेळ माफ केले जाऊ शकते परंतु पुजाराने काय केले हा प्रश्नच उरतो. त्याचा वर्षाभराचा कौंटी क्रिकेटचा अनुभव कुठे गेला?ओव्हलवर केवळ फलंदाज नव्हे तर यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा चेंडूवर नजर ठेवावी लागते. ऑसींनी विराट साठी विशेष पाहुणचार ठेवला होता. सुरवातीला दोन षटकानंतर स्टार्कला विश्रांती देऊन ताजेतवाने ठेवले आणि त्याने नंतर अचूकपणे विराटला टिपले. या पडझडीतही पहिले रहाणे जडेजाने किल्ला लढवला. जणुकाही चेन्नई सुपर किंग्ज भारतीय संघाच्या मदतीला धावल्या सारखे वाटत होते. श्रीकर आला कधी गेला कधी काही कळलेच नाही. संघ फॉलोऑनच्या सावटाखाली असताना रहाने शार्दुलची मराठमोळी जोडी धावून आली आणि पुन्हा एकदा दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा याची आठवण झाली.

या जोडीने जरी आपल्या संघाचे वस्त्रहरण थोपवले होते तरी आपला संघ जवळपास पाऊने दोनशे धावांनी माघारला होता. म्हणायला जरी हा आकडा दोनशेच्या आतला असला तरी चौथ्या डावात फलंदाजी, खेळपट्टीचा बदललेला सूर आणि तेवढेच खतरनाक ऑसी गोलंदाजी आक्रमण पाहता ही धावसंख्या आणखीनच भितीदायक वाटत होती. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय संघाने जी काही थोडीफार धावसंख्या उभारली त्याकरिता ऑसी कर्णधार पॅट कमीन्स आणि त्याच्या क्षेत्ररक्षकांचे आभार मानले पाहिजे. वास्तविकत: नोबॉल वर बळी घेण्याचे पेटंट भारतीय गोलंदाजांकडे आहे. मात्र सतत आयपीएल साठी भारतात येणाऱ्या पॅट कमीन्सला भारतीय गोलंदाजांचा वाण नाही पण गुण लागला. भविष्यात पॅट कमीन्सने नो बॉल वर बळी कसे मिळवावेत याचे कोचिंग क्लासेस काढले तर आश्चर्य वाटायला नको.
क्रमशः,,,,,!
***********************************
दि. १२ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

किसी का भाई किसी की जान!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
  *किसी का भाई, किसी की जान, ०४*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
हर्बीवोर सफारी अर्थातच तृणभक्षक प्राण्यांच्या सफारीत काळवीट, ठिपक्यांचे हरीण, नीलगाय रोही, मोर यांचा समावेश होतो. या सफारी करिता ४० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली असून याकरिता जंगल आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत ही थीम साकारली आहे. एकाचवेळी इतक्या प्राण्यांचे कळप पाहून डोळ्यांचे पारणे फिटते‌‌. कधी काळवीटांच्या नैसर्गिक सौंदर्याचे तर कधी मोरांचे मनमोहक दर्शन घडते. सोबतच निवांतपणे चरणारे हरीणांचे कळप पाहून मनाला समाधान वाटते तर कधी उंच धिप्पाड नीलगायी तुमचे लक्ष वेधून घेतात. इतक्या प्रमाणात मुके प्राणी एकमेकांशी मिळून मिसळून राहतांना पाहून हम साथ साथ है ची आठवण येते.   

या प्राण्यांपैकी काळवीट हे कुरंग कुळातील प्रमुख हरीण असून या प्रजातीचा दुर्मिळ गटात समावेश झाला आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ अंतर्गत भारतात काळवीटांच्या शिकारीस मनाई आहे. काळवीट हा सामाजिक प्राणी असून १० ते ५० च्या कळपात राहतो. काळवीट मुळात सावध आणि लाजाळू असल्याने सहसा नजरेस पडत नाही. त्यांच्यात गंध आणि श्रवणाची क्षमता तुलनेत तीक्ष्ण नसल्याने दृष्टी वर अवलंबून असतात. चांगली दृष्टी त्यांना धोके शोधणे आणि त्वरित प्रतिक्रिया देण्यास मदत करते. धोका जाणवताच ते हवेत उडी मारून पळून जातात. काळवीटाची कमाल गती ८० किमी प्रती तास इतकी असू शकते.

काळवीटांचा वावर प्रामुख्याने भारतातील शुष्क प्रदेशातील माळरानावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत, रेहेकुरी इथे काळवीटांचे अभयारण्य आहे. तसेच पुणे, सोलापूर सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानात सुद्धा आढळून येतात. नर काळवीट मादी काळवीटापेक्षा आकारमानाने मोठे असतात. उंची ७४ ते ८४ सेमी, लांबी १.८ मीटर आणि वजन २० ते ५७ किलो इतके असते. नरांना ३५ ते ७५ सेमी लांब रिंग्ड, सर्पील आकाराची शिंगे असतात. ही शिंगे पोकळ असून हाडांच्या सांगाड्याचा एक भाग असतो. तसेच ही शिंगे कधीही गळून पडत नाही. मादी काळवीटांमध्ये लहान शिंगे विकसित करण्याची क्षमता असते.

नर काळ्या रंगाचा तर मादी भुऱ्या रंगाची असून नरांच्या वरच्या पृष्ठीय आवरणाचा रंग गडद तपकिरी, काळा असतो तर खालच्या बाजूचे शरीर पांढरे असते. पायांचे खुर नाजूक आणि टोकदार असतात. नाकपुड्या अरूंद, मेंढीसारख्या आणि लहान शेपटी असते. गवत, फुलांची रोपे आणि बाभळीचे झाडे हा त्यांचा प्रमुख आहार असतो. काळवीट संवादासाठी विविध आवाज काढू शकतात. त्यांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. साधारणपणे सहा महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मादा काळवीट एका वासराला जन्म देते. नर नवजातच्या डोक्यावर आणि मानेवर काळे ठिपके असतात तर मादा नवजात पिवळ्या रंगाची असते. बाळ काळवीट जन्मानंतर लवकरच धावू शकतो.

खरेतर काळवीट या प्राण्याला प्रकाशझोतात आणण्याचे काम केले ते म्हणजे सुपरस्टार सलमान खानने. नुकताच सलमानचा भाईजान हा रिलीज झाला आहे ‌ 'किसी का भाई किसी की जान' ही त्या सिनेमाची कॅचलाईन. १९९८ ला हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर, राजस्थानला असतांना त्याच्यावर दोन काळवीटांच्या शिकारीचा आरोप आहे. भलेही सलमान आपल्या चाहत्यांसाठी भाई असला तरीही काळवीट हे बिष्णोई समाजासाठी जान आहे, आराध्य आहे. नेमके सलमान इथेच चुकला आणि काळवीट शिकार प्रकरणी त्याला सहा दिवसांचा तुरुंगवास घडला होता. 

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सलमानला येणाऱ्या काळात, काळवीटांच्या शिकारीचा काळा अध्याय काळवंडून सोडेल की तो नेहमीप्रमाणे सहिसलामत सुटेल हे सध्यातरी सांगणं कठीण आहे.एक मात्र खरे, कुठेही प्रवास अथवा पर्यटनाला जातांना तिथल्या स्थानिक संस्कृतीचा आदर करणे गरजेचे आहे. अन्यथा सलमानसारखे तुम्ही कितीही बीईंग ह्युमन असले तरी मुक्या प्राण्यांना सुद्धा जगण्याचा तुमच्याएवढाच अधिकार आहे हे विसरून कसे चालणार? काळवीट शिकार प्रकरणी केवळ सलमानच नाही तर त्याचे सहकारी सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे ही मंडळी सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडली होती.
क्रमशः,,,
********************************
दि. ११ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Thursday, June 8, 2023

किसी का भाई किसी की जान !

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
  *किसी का भाई, किसी की जान, ०४*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
हर्बीवोर सफारी अर्थातच तृणभक्षक प्राण्यांच्या सफारीत काळवीट, ठिपक्यांचे हरीण, नीलगाय रोही, मोर यांचा समावेश होतो. या सफारी करिता ४० हेक्टर जमीन निश्चित करण्यात आली असून याकरिता जंगल आणि नैसर्गिक पाण्याचे स्रोत ही थीम साकारली आहे. एकाचवेळी इतक्या प्राण्यांचे कळप पाहून डोळ्यांचे पारणे फिटते‌‌. कधी काळवीटांच्या नैसर्गिक सौंदर्याचे तर कधी मोरांचे मनमोहक दर्शन घडते. सोबतच निवांतपणे चरणारे हरीणांचे कळप पाहून मनाला समाधान वाटते तर कधी उंच धिप्पाड नीलगायी तुमचे लक्ष वेधून घेतात. इतक्या प्रमाणात मुके प्राणी एकमेकांशी मिळून मिसळून राहतांना पाहून हम साथ साथ है ची आठवण येते.   

या प्राण्यांपैकी काळवीट हे कुरंग कुळातील प्रमुख हरीण असून या प्रजातीचा दुर्मिळ गटात समावेश झाला आहे. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची-१ अंतर्गत भारतात काळवीटांच्या शिकारीस मनाई आहे. काळवीट हा सामाजिक प्राणी असून १० ते ५० च्या कळपात राहतो. काळवीट मुळात सावध आणि लाजाळू असल्याने सहसा नजरेस पडत नाही. त्यांच्यात गंध आणि श्रवणाची क्षमता तुलनेत तीक्ष्ण नसल्याने दृष्टी वर अवलंबून असतात. चांगली दृष्टी त्यांना धोके शोधणे आणि त्वरित प्रतिक्रिया देण्यास मदत करते. धोका जाणवताच ते हवेत उडी मारून पळून जातात. काळवीटाची कमाल गती ८० किमी प्रती तास इतकी असू शकते.

काळवीटांचा वावर प्रामुख्याने भारतातील शुष्क प्रदेशातील माळरानावर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत, रेहेकुरी इथे काळवीटांचे अभयारण्य आहे. तसेच पुणे, सोलापूर सोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानात सुद्धा आढळून येतात. नर काळवीट मादी काळवीटापेक्षा आकारमानाने मोठे असतात. उंची ७४ ते ८४ सेमी, लांबी १.८ मीटर आणि वजन २० ते ५७ किलो इतके असते. नरांना ३५ ते ७५ सेमी लांब रिंग्ड, सर्पील आकाराची शिंगे असतात. ही शिंगे पोकळ असून हाडांच्या सांगाड्याचा एक भाग असतो. तसेच ही शिंगे कधीही गळून पडत नाही. मादी काळवीटांमध्ये लहान शिंगे विकसित करण्याची क्षमता असते.

नर काळ्या रंगाचा तर मादी भुऱ्या रंगाची असून नरांच्या वरच्या पृष्ठीय आवरणाचा रंग गडद तपकिरी, काळा असतो तर खालच्या बाजूचे शरीर पांढरे असते. पायांचे खुर नाजूक आणि टोकदार असतात. नाकपुड्या अरूंद, मेंढीसारख्या आणि लहान शेपटी असते. गवत, फुलांची रोपे आणि बाभळीचे झाडे हा त्यांचा प्रमुख आहार असतो. काळवीट संवादासाठी विविध आवाज काढू शकतात. त्यांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. साधारणपणे सहा महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मादा काळवीट एका वासराला जन्म देते. नर नवजातच्या डोक्यावर आणि मानेवर काळे ठिपके असतात तर मादा नवजात पिवळ्या रंगाची असते. बाळ काळवीट जन्मानंतर लवकरच धावू शकतो.

खरेतर काळवीट या प्राण्याला प्रकाशझोतात आणण्याचे काम केले ते म्हणजे सुपरस्टार सलमान खानने. नुकताच सलमानचा भाईजान हा रिलीज झाला आहे ‌ 'किसी का भाई किसी की जान' ही त्या सिनेमाची कॅचलाईन. १९९८ ला हम साथ साथ है या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी जोधपूर, राजस्थानला असतांना त्याच्यावर दोन काळवीटांच्या शिकारीचा आरोप आहे. भलेही सलमान आपल्या चाहत्यांसाठी भाई असला तरीही काळवीट हे बिष्णोई समाजासाठी आराध्य आणि जान आहे. नेमके सलमान इथेच चुकला आणि काळवीट शिकार प्रकरणी सहा दिवसांचा तुरुंगवास घडला होता. 

सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सलमानला येणाऱ्या काळात, काळवीटांच्या शिकारीचा काळा अध्याय काळवंडून सोडेल की तो नेहमीप्रमाणे सहिसलामत सुटेल हे सध्यातरी सांगणं कठीण आहे.एक मात्र खरे, कुठेही प्रवास अथवा पर्यटनाला जातांना तिथल्या स्थानिक संस्कृतीचा आदर करणे गरजेचे आहे. अन्यथा सलमानसारखे तुम्ही कितीही बीईंग ह्युमन असले तरी मुक्या प्राण्यांना सुद्धा जगण्याचा तुमच्याएवढाच अधिकार आहे हे विसरून कसे चालणार? काळवीट शिकार प्रकरणी केवळ सलमानच नाही तर त्याचे सहकारी सैफ अली खान, तब्बू, निलम आणि सोनाली बेंद्रे ही मंडळी सुद्धा कायद्याच्या कचाट्यात सापडली होती.
क्रमशः,,,
********************************
दि. ०७ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Wednesday, June 7, 2023

लव्ह यू डियर, भाग ०५

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
            *लव्ह यू डियर, भाग ०५*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
बाळासाहेब ठाकरे, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर इथे हर्बीवोर सफारी करिता चाळीस हेक्टर भूभाग आरक्षित आहे. यांत सर्वाधिक संख्या आहे ती स्पॉटेड डियर अर्थातच ठिपक्यांच्या हरणांची.चला तर मग डियर सफारीला. 'मज आणुनी द्या ते हरीण अयोध्यानाथा' हा सीतामाईने प्रभू श्रीरामांजवळ केलेला सुवर्णमृगाचा लाडीवाळ हट्ट सर्व परिचित आहे. विटकरी कातडीवर पांढरे ठिपके (स्पॉटेड डियर) अतिसुंदर डोळ्यांचा आणि पाहता क्षणीच कोणीही मोहात पडावे असा लोभस प्राणी म्हणजे हरीण‌. याची सुंदरता काय वर्णावी, हरीणांचे डोळे एवढे सुरेख असतात की एखाद्या सुंदर डोळ्यांच्या स्त्री ला हरीणाक्षी, मृगनयनी असे म्हटले जाते.

वास्तविकत: हरणांचा उल्लेख प्राचीन गुहांतील चित्रांपासून इतिहासातात, पौराणिक, धार्मिक कथा आणि साहित्यात आढळतो. हरीणांचे दोन मुख्य उपकुळे म्हणजे सारंग हरणे (सर्व्हीडी) आणि कुरंग हरणे(ॲंटीलोप) ही होय. जगभर असणाऱ्या १८० जातींतील दहा सारंग जाती आणि सहा कुरंग जातींची हरणे भारत, तिबेट, नेपाळ, भूतान इथे आढळतात. भारतात चितळ,सांबर,बारासिंगा, काश्मिरी हंगुल, मणिपुरी संगई, दरडा, कस्तूरी मृग, सिक्कीम शाऊ, पिसोरी आणि पाडा ही सारंग हरणे आढळतात तर चौसिंगा, नीलगाय, काळवीट चिंकारा, गोआ, तिबेटी चीक ही कुरंग हरणे आढळतात.

चितळ हे भारतात सर्वाधिक आढळणारे सारंग हरीण आहे. सारंग हरणाला दरवर्षी नवे शिंग येतात. प्रथम त्यावर मखमली आवरण असते, हळूहळू वाळून त्याचे पोपडे पडतात. यांच्या शिंगांना फांद्यांसारखी इतर शिंगे फुटलेली दिसतात. सारंग कुळात फक्त नरांनाच शिंगे असतात. हरणांच्या पायांना विभागलेले खूर असतात. मध्य भारतात विशेषतः कान्हा, बांधवगड इथे चितळांची संख्या लक्षणीय आहे. खुरटी जंगले, माळराण, गवताळ कुरणे ही हरणांचे नैसर्गिक अधिवास असून ते मोठ्या झाडांखाली कळपाने राहतात. कोवळे लुसलुशीत गवत, कोवळा झाडपाला, शेतातील पिकांची पाने, शेंगा हे त्यांचे आवडते खाद्य होय.

हरीणांचे सरासरी आयुर्मान दहा ते पंधरा वर्षांचे असते. वजन साधारणतः तीस ते पंच्याहत्तर किलो इतके तर आकार १.७ मीटर इतका असू शकतो. उंचीने शेळी बकरीपेक्षा थोडे जास्त, तोंड निमुळते , दोन उभे कान, लहान शेपटी आणि चार काटकुळे पाय असतात. हरीणांची श्रवण आणि गंध क्षमता तीव्र असते आणि रात्रीची दृष्टी उत्तम असते. हरीण चांगले पोहू शकतात तसेच लांब उडी मारू शकतात. हरणे वेगाने धावतांना सुद्धा त्यात एक कौशल्य असते. धावत धावत वेगात लगेच वळणे घेऊन दिशा बदलतात. हरणांचा रंग ॠतूनुसार बदलतो. पावसाळा आणि हिवाळ्यात गडद तर उन्हाळ्यात रंग फिका पडतो.

हरणाचे बछडे जन्मल्यानंतर तासभरातच उठून चालण्याचा प्रयत्न करू लागते आणि दोन आठवड्यात गवत खाण्यास सुरुवात करते. हरीण एकावेळी एकाच बछड्याला जन्म देतो. क्वचितच दोन बछडे जन्माला येतात. हरणांच्या बछड्यांच्या अंगाला हरीणाच्या अंगासारखा वास नसतो. हा गंध नसल्याने वाघ, बिबट, रानकुत्र्यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून त्यांचे रक्षण होते. हरणांच्या डोळ्यांची रचना अशी असते की त्यांना खूप रूंद असा परिसर सहज न्याहाळता येतो. शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी हरीण पाणी पितांना काही हरणे उभे राहून, सभोवार सावध नजर फिरवून एकमेकांना संकेत देतात. 

आखीवरेखीव, बांधेसूद, देखणा आणि चपळ असलेला हा प्राणी स्वभावाने गरीब, घाबरट असतो. तरीपण त्याच्या नजरेत दिसणारी निरागसता आणि करूणा आपल्या मनाचा ठाव घेते. अतिशय सुंदर झळाळणाऱ्या कातडीचा, विविध प्रकारच्या शिंगांचा, सोनेरी, पिवळ्या, लालसर रंगाचा आणि अंगभर पांढऱ्या ठिपक्यांचा हा प्राणी सहजच आपले लक्ष वेधून घेतो. सकाळच्या कोवळ्या उन्हात आणि सायंकाळच्या सोनेरी उन्हात यांच्यावरून नजर हटत नाही. सारखे पाहतच रहावे वाटते. कितीही पाहिले तरी समाधान होत नाही. त्यातही हरीणांचे गोजिरवाणे बछडे पाहून त्यांना लगेच उचलून घ्यावे किंवा मनसोक्त बिलगावे आणि म्हणावे वाटते,, लव्ह यू डियर!
*********************************
दि. ०७ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Sunday, June 4, 2023

पालकांनो ऊतू नका मातू नका!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
     *पालकांनो, ऊतू नका मातू नका!*
             *डॉ अनिल पावशेकर*
********************************
नुकतेच दहावी बारावीचे निकाल लागले असून रात्री कायमचुर्ण घेतल्यानंतर सकाळी जी मोकळं झाल्याची फिलींग येते, ती समस्त पालक वर्गात येत आहे. जणुकाही फिटे कोचिंग क्लासचे जाळे, झाले मोकळे आकाश अशी सगळीकडे स्थिती आहे. सोबतच हरहर टेन्शन घरघर टेन्शन समाप्त झाले असून आता सर्वांचे लक्ष्य मिशन ॲडमिशन कडे लागले आहे. बोर्डाच्या घर घर से मेरिट निकलेगा आणि मागेल त्याला प्रथमश्रेणी (संदर्भ बेस्ट ऑफ फाईव्ह) योजनेमुळे लाभार्थ्यांना अच्छे दिन आले आहे. कार्पेट ने पिकवलेले मेरिट आणि अतिरिक्त,अवांतर गुणांनी सुजलेल्या गुणपत्रिका पाहून कोचिंगच्या बाजारपेठेला प्रचंड प्रमाणात कच्चा माल उपलब्ध झाला आहे असे वाटते‌.

अर्थातच इथे गुणवंतांचा उपमर्द करण्याचा उद्देश नसून आधोब्या, अतिउत्साही, जश्ने रिझल्ट (बोर्ड परिक्षा) करणाऱ्या नवपालकांचे कान टोचण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे. खरेतर पाल्यांसाठी दहावी बारावीचा उंबरठा पुढील वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे यात वादच नाही ‌ मात्र ही तर चढाई आहे, असली लढाई पुढे आहे हे विसरून चालणार नाही. त्यातही दे दान सुटे गिराण प्रमाणे विद्यार्थ्यांवर गुणांची उधळण होते ती बरेचदा फसवी असू शकते. शरीर कमावणे आणि शरीराला सूज येणे यात फरक असतो. म्हणूनच पूर्वी कुंथून कुंथून काठावर पास होणाऱ्यांना आजच्या नव्वद टक्क्यांचे विलक्षण कौतुक आणि आकर्षण वाटते. मात्र दोन्ही वेळेची परिस्थिती, परीक्षांचे संदर्भ वेगवेगळे आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

मुख्य म्हणजे पालकांनी प्रत्येक बाळ आपली विशिष्ट ओळख आणि बुद्धी घेऊन जन्माला येत असतं हे विसरायला नको. शिवाय ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. पालकांनी आपल्या सुप्त आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पाल्यांना डाऊनलोड केलं नसतं तर ते नैसर्गिक, शारिरीक धर्माला जागून वंशसातत्य, वंशवृद्धीचं फळ असतं. यामुळे त्याला केवळ वाढवणं हे उद्देश नसून त्याचं निकोप संगोपन करणं तेवढंच गरजेचं असतं. बाळांचे पाय पाळण्यात दिसत असले तरी त्यांचे मार्क्स दहावी बारावीत दिसतात. मार्क्स कमी मिळाले म्हणून वाळीत टाकणे किंवा मेरिट मध्ये आला म्हणून व्हीआयपी बनवने ही दोन्ही टोकं अत्यंत चुकीचे आहे. मुलांवर प्रेम करा, त्यांच्या मार्कांवर नव्हे हे इथे लक्षात घ्या. कमीजास्त मार्कांमुळे मुलांवरचे प्रेम कमीजास्त होऊ देऊ नका. 

खरेतर मुलं म्हणजे 'सिर्फ एहसास है ये रुह से महसूस करो, प्यार को (बच्चोंको) प्यार ही रहने दो कोई नाम ना दो' असे आहे. थोडक्यात काय तर मार्कांमुळे मेरा बेटा राजकुमार अथवा माय डॉटर माय प्रिन्सेस असे फाजिल लाडवून ठेऊ नका. कारण राजेशाही केंव्हाचीच नष्ट झाली आहे तर संस्थानं पण खालसा झाली आहेत‌. उरल्या सुरल्या राजपुत्रांचे हाल कुत्राही खात नाही. कमीजास्त मार्कांच्या गोंधळात 'मार्क इज टेंपररी बट मुलांच नातं इज पर्मनंट ' याचा विसर पडू देऊ नका. मुलांच्या कमी मार्कांमुळे गळपटून, संतापून जाऊ नका तर फुगलेल्या मार्कांनी भारावून ओथंबून जाऊ नका. मुलांचे कौतुक जरूर करा, मात्र ते शेफारून जाणार नाही, डोक्यावर बसणार नाही याची काळजी घ्या.

सध्या विद्यार्थ्यांकरिता एका पेक्षा एक सरस करिअर क्षेत्र उपलब्ध आहेत. इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रासोबतच इतर विषयांचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. याकरिता कल चाचणी, गुण योग्यता चाचणी सायकोमेट्रीक चाचणी, ॲप्टिट्यूड टेस्टची मदत घेता येईल. वास्तविकत: आवडते क्षेत्र निवडले तर हर दिन दिवाली, दिन दुगुना रात चौगुणा होण्याची शक्यता असते. केवळ हम जमानेके साथ है हे दाखवण्यासाठी मुलांना जबरदस्तीने एखाद्या क्षेत्रात टाकले तर पुढे जाऊन तो सांग पाटला काय करू, उपड पर्हाटी पेर गहू करणार. अथवा अनिच्छेने गेलेल्या क्षेत्रात त्याची अवस्था आंधळ पादलं, बहीऱ्यानं रामराम केला अशी होईल.

खरेतर दहावी बारावी म्हटले की पालकांना अन्नपाणी गोड लागत नाही. घरीदारी अघोषित कलम १४४ लागू असते. मात्र सोळा, अठरा वर्षांच्या कलमांना कोमेजू न देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. या प्रसुतीपिडेतून कोणाचीही सुटका नाही. पाल्यांची दहावी बारावी म्हणजे पालकांचा पुनर्जन्म असतो. निश्चितच पाल्यांचा कल, क्षमता योग्यता पाहून पालकांनी त्याच्यासाठी क्षेत्र निवडणे योग्य असते. याकामी करिअर कौंसिलींग तज्ज्ञांची मदत घेणे उत्तम असते. बॅट हातात घेतली म्हणजे सर्वच सचिन तेंडुलकर होत नाहीत. कुणी धोनी तर कुणी विराट सुद्धा होऊ शकतो. तर कधी फलंदाजीत फारसा उजेड न पाडलेला आकाश चोप्रा उत्तम समालोचक होऊ शकतो. 

सर्वच काशीला गेले तर इथे कोण राहील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यामुळे पाल्यांना अनावश्यक ओझ्याखाली दाबू नका. प्रत्येक मुल डोक्यात काहीतरी घेऊन आलेलं आहे, त्याच्या क्षमतांना न्याय द्या. तुमचं मुल क्रिकेट सामन्यांसारखं कोणाचं तरी सबस्टीट्यूट, रिप्लेसमेंट अथवा राखीव खेळाडू म्हणून जन्माला आलेलं नाही. त्याला पाठबळ द्या,त्याच्या स्वप्नांना भरारी घ्यायचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य द्या. मात्र आपल्या अती महत्त्वाकांक्षा त्यांच्यावर लादू नका. थोडक्यात काय तर ऊतू नका मातू नका, पालकत्वाचा वसा सोडू नका. संयमित राहून पाल्यांच्या यशापयशात त्याच्या तलवारीची घट्ट मुठ बनून रहा. 
**********************************
दि. ०४ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

Friday, June 2, 2023

जडेजाचा मौके पे चौका!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
         *सर जडेजाचा मौके पे चौका*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
साल १९९१ ला प्रदर्शित झालेल्या सौदागर पिक्चर मध्ये राजकुमारचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. हम खैरात नहीं लेते वीरसिंग, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होंगी, गोली भी हमारी होंगी और वक्त भी हमारा होंगा. अगदी डीक्टो अशीच काहीशी स्थिती आयपीएल अंतिम लढतीत धोनी विरुद्ध पांड्या दरम्यान होती. टायटन्स संघ एकतर गतविजेता, त्यातच शुभमन, सहा, साई, मिलर, पांड्या सारखे खंदे शिलेदार आणि दिमतीला शामी, राशिद खान, मोहितचा सुसज्ज तोफखाना. भरीस भर म्हणजे टायटन्सना सोयिस्कर असे होम ग्राऊंड. तरीपण आयपीएलचा दादा संघ असलेल्या माहीच्या सेनेने गुजरात टायटन्सला त्यांच्याच भुमीत धोबीपछाड देत पाचव्यांदा आयपीएल चषक जिंकला. सोबतच अब की बार माही सरकार हे दाखवून दिले.

झाले काय तर दुनिया गोल आहे असे म्हणतात आणि झालेही तसेच. आयपीएल स्पर्धेचा प्रांरंभीचा आणि अंतिम सामना चेन्नई विरूद्ध गुजरात असा रंगला. त्यातही वरुणराजाने सुपर संडेला वाईल्ड कार्ड एन्ट्री घेत सामना कुठेही असो, आपणच बॉस आहे हे दाखवून दिले होते. त्यामुळे फायनलचा फिव्हर शिगेला पोहोचला होता. अगदी राखीव दिवसाला सुद्धा वरुणराजाने आपली वक्रदृष्टी या लढतीवर ठेवल्याने उत्सुकता आणखीनच ताणली गेली होती. अखेर आकाश काहीसं निरभ्र झालं आणि अंतिम लढतीला हिरवी झेंडी मिळाली. अर्थातच सामन्यावर पावसाचे सावट असल्याने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला डकवर्थ लुईस या राहुकेतूच्या जोडीची कृपा असल्याने चांगला फायदा होतो. खरेतर हा लकी ड्रॉ असतो जो कोणत्याही संघाला, कधीही, कुठेही लागू शकतो.

प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गुजरात संघावर यावेळी चेन्नई संघ फिदा दिसत होता. त्यांनी जबरदस्त फॉर्मात असलेल्या शुभमनला तीन धावांवर तर वृद्धीमान सहाला एकवीस धावांवर जीवदान दिले. भरीस भर म्हणून शुभमनला धावचीत करण्याची संधी दवडली गेली होती आणि आऊटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षणात आनंदी आनंद होता. सोबतच माहीचे गोलंदाजी आक्रमण शुद्ध शाकाहारी असल्याने सहा,गील जोडीने सात षटकांपर्यंत फटकेबाजी करत साठी ओलांडली होती. मात्र ही दुक्कल डोईजड ठरताच धोनीने आपले जुने अस्त्र काढले आणि जडेजाने जादू दाखवली. ज्याप्रकारे धोनीने निमिषार्धात शुभमनला यष्टीचीत केले ते पाहता चीते की चाल, बाज की नजर, बाजीराव की तलवार और धोनी के स्टंपींग पे शक नहीं करते हे सिद्ध झाले. खरेतर शुभमनला धोनीने क्रिझमध्ये येऊ देण्यासाठी पुरेसा वेळ न दिल्याबद्दल शुभमनने मानवाधिकार आयोगाकडे धोनीची तक्रार करायला हरकत नाही.

शुभमन बाद होताच धोनीने सामान्याचे गिअर आपल्या हातात घेतले आणि सहा, साई जोडीला लगाम लावला. भलेही सहा, साईने विकेट पडू दिली नाही परंतु पूर्वीच्या तुलनेत रनरेट घसरला. वास्तविकत: टायटन्सला एवढी चांगली सुरुवात मिळाल्यावर पांड्या किंवा मिलरला वन डाऊन पाठवले असते तर आणखी चांगले झाले असते. मात्र याची भरपाई साई सुदर्शनने तडाखेबंद ९६ धावांची तुफानी खेळी करत पुर्ण केली. तरीपण वृद्धीमान सहा पन्नाशी गाठतांना थोडा मंदावला आणि तिथेच टायटन्सच्या कमीतकमी विस पंचवीस धावा कमी काढल्या गेल्या. अखेर हाणामारीचा परमोच्च बिंदू गाठत टायटन्सने वीस षटकांत दोनशे चौदा धावा केल्या ज्या कोणत्याही संघासाठी निश्चितच आव्हानात्मक होत्या.

चेन्नई संघ आयपीएल विजयाच्या पंजावर टपून होता तर टायटन्स सलग दुसऱ्या जेतेपदासाठी आतूर होते. मात्र डकवर्थ लुईसने चेन्नईचे काम तुलनेत सोपे केले होते. टायटन्सची संपूर्ण भिस्त गोलंदाजीवर होती. त्यातही शामीचा पॉवर प्ले मध्ये हमखास बळी टिपणारा गोलंदाज म्हणून लौकीक होता. तर राशिद खानच्या फिरकीला बहुतेक फलंदाज टरकून होते. मोहित शर्माची गोलंदाजीतील मोहिनी फलंदाजांना चकित करणारी होती तर नूर अहमदची फिरकी सामन्याचा नूर पालटण्यास तेवढीच सक्षम होती‌. पांड्या आणि जॉश लिटिल गर्दीतल्या खिसेकापू प्रमाणे कधीही विकेटवर हात की सफाई दाखवू शकत होते. दुसरीकडे चेन्नई संघ हिरव्या मैदानावर यलो फिवरचे जबरदस्त प्रदर्शनासाठी उत्सुक होता.

पॉवरप्ले हा दोन्ही संघांसाठी जीवन मरणाचा प्रसंग होता. मात्र इथे चेन्नई संघाने बाजी मारली. डेव्ह कॉनवे आणि रुतूराजने अवघ्या सात षटकांत जवळपास पाऊनशे धावा चोपताच चेन्नई एक्सप्रेस रूळावर आली होती. मात्र सातव्या षटकात टायटन्सच्या जीवात जीव आला. नूर मोहम्मद ने एकाच षटकात डबल धमाका करत दोन्ही सलामीवीरांना उडवले. चेन्नई संघाचे पाऊने दोनशेचा टप्पा गाठतांना एवढे रक्त तर सांडणारच होते. तिसऱ्या क्रमांकावर शिवम दुबे आला आणि खरेतर हाच खेळाडू चेन्नई संघासाठी एक्स फॅक्टर ठरला. कारण त्याने जरी नाबाद बत्तीस धावा केल्या असल्या तरी फलंदाजीचे एक टोक मजबूतपणे पकडून ठेवल्याने इतर सहकाऱ्यांना बेछूट गोळीबाराची संधी मिळाली. चेन्नई संघाने एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ करत सामन्यात रंग भरला. शिवम दुबे ने रहाणे, रायडू आणि जडेजा सोबत महत्वाच्या तीन भागिदाऱ्या करत चेन्नई संघाला तारले.

मात्र या लढतीत खरा भाव खाऊन गेला तो म्हणजे जडेजा. मोहित शर्माचे शेवटचे षटक अक्षरशः जीवघेणे होते. सलग चार चेंडू यॉर्कर लेंथवर टाकून त्याने चेन्नई संघाच्या छातीत धडधड वाढवली होती. तरीपण स्ट्राईक जडेजाकडे असल्याने चेन्नई समर्थकांना आशा होती. दोन चेंडूत दहा धावांसाठी माही सेना देवाचा धावा करत होती. शेवटी सर जडेजाने आपला अनुभव पणाला लावला. त्याने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकताच मोहित शर्मा गोलंदाजीची लय घालवून बसला. दबावाखाली मोहितने अखेरचा चेंडू लेगवर टाकताच चेन्नई एक्सप्रेसने टायटन्सला उडवून लावले. जडेजाचा मौके पे चौका धोनीसाठी आईसींग ऑन दी केक होता. थोडक्यात काय तर गुजरात टायटन्स जिंकता जिंकता हरले. तर चेन्नई सुपर किंग्ज हरता हरता जिंकले. याचे एकमेव कारण देता येईल आणि ते म्हणजे सर जडेजा आले धावून, टायटन्स गेले वाहून. सोबतच टायटन्सच्या शामी आणि राशिद खानचे गोलंदाजीतील अपयश गुजरातच्या टायटॅनिकला बुडण्यापासून वाचवू शकले नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.
*********************************
दि. ०१ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...