@#👿👿👿👿👿👿👿👿#@
*पराभवाचे पोस्टमॉर्टेम!*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
कुरुक्षेत्रावर कौरव पांडव युद्धात अर्जुनाला अभिमन्यूच्या मृत्यूचा बदला घ्यायचा होता. मात्र जयद्रथ लपून बसला होता. अखेर श्रीकृष्णाने हा सूर्य हा जयद्रथ हे सांगताच अर्जुनाने आपला पण पूर्ण केला. जयद्रथ मृत्यूला टाळू शकला नाही. सांगायचं तात्पर्य इतकंच की अंतिम एकदिवसीय सामन्यात भारताचा सूर्या यादव स्टार्क पासून लपला, तब्बल सातव्या क्रमांकावर खेळायला आला परंतु आपली विकेट तो वाचवू शकला नाही. मृत्यू अटळ आहे, फलंदाज कधी ना कधी बाद होणारच मात्र सूर्याप्रमाणे नाचक्की होऊन बाद होणे खरोखरच शरमेची बाब आहे. डर के आगे जीत है असे म्हणतात, इथेतर सतत तीन सामन्यात तिनदा गोल्डन डक, म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद होत सूर्यकुमारने भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो हे दाखवून दिले आहे.
झाले काय तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली होती. अर्थातच शेवटचा सामना हा निर्णायक ठरला होता. दुसऱ्या सामन्यातल्या चुका टाळून भारतीय संघ हा सामना जिंकेल अशी क्रिकेट रसिकांना आशा होती आणि मैदानावर परिस्थिती सुद्धा आपल्या संघाला अनुकूल होती. भारतीय संघ २७० धावांचा पाठलाग करतांना २८ व्या षटकांत दोन बाद १४६ धावा इतक्या सुस्थितीत होता. खरेतर खुद्द ऑसी संघाला आपण हा सामना जिंकू असे वाटले नसेल. मात्र मैदानात विपरीत घडले. हाती आलेला सामना भारतीय संघाच्या मुर्दाड फलंदाजीने कांगारूंना बहाल करण्यात आला. रोहीत, गील, विराट, राहुल, पांड्या इत्यादी फलंदाजांना चांगली सुरुवात मिळूनही ते संघाला वाचवू शकले नाही.
फलंदाजीची चिरफाड करायची झाल्यास रोहितची फलंदाजी वानप्रस्थाश्रमाला लागली आहे. व्हाईट बॉल क्रिकेटचा बेताज बादशहा असलेला रोहीत तिशी गाठताच तंबूची वाट धरतो. त्याला बाद करण्यासाठी फारशी व्युहरचना करावी लागत नाही. स्क्वेअरलेग ते फाईन लेग ला त्याचे फटके म्हणजे दोन्ही संघासाठी पर्वणी असते. गेला तर षटकार नाही तर बाद. थोडक्यात काय तर उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक. सलामीवीर शुभमन गील या सामन्यात बऱ्यापैकी खेळला. त्याच्या छोटेखानी खेळीत त्याने कडक शॉट मारले. गिल बाद झाला आणि सूर्याला झाकून ठेवण्यासाठी राहुल मैदानात उतरला. त्याने विराटसोबत जवळपास सत्तर धावांची भागीदारी पण केली. सर्व काही सुरळीत चालू असताना त्याला ॲडम झाम्पाने त्याला झुकवले.
षटकात सहापेक्षा कमी धावांच्या सरासरीचे गणित असताना राहुलने वेडे साहस करून संघाला बॅकफूटवर ढकलले. एकतर राहुलची खेळी सहामाही असते. एक चांगली खेळी करून तो बेडकासारखा हायबरनेशन (शितनिद्रा) मध्ये जातो. पहिल्या सामन्याच्या अमृत महोत्सवी खेळीच्या व्याजावर तो आणखी किती दिवस संघाला वेठीस धरून ठेवेल हे सांगता येत नाही. राहुलला बाद करत ॲडम झाम्पाने भारतीय फलंदाजीला फिरकीची झप्पी देत एकूण चार महत्त्वाचे बळी घेतले. राहुल बाद झाला तरी विराट मैदानात असल्याने सामना आपल्याच ताब्यात होता. दुर्दैवाने अक्षर पटेल स्मिथ कडून धावबाद झाला आणि भारतीय संघाला ओहोटी लागली.
अक्षरला बाद करतांना स्मिथ आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरी ने जी चपळता आणि सूर मारले ते पाहता हे दोघेही खेळाडू जलतरण स्पर्धेत नक्कीच नाव कमावू शकतात. या दोघांची कामगिरी पाहता वन रनआऊट कॅन चेंज दी गेम असे म्हणावेसे वाटते. कारण इथूनच भारतीय फलंदाजीचा टेम्पो हरवला. विराटने अर्धशतक झळकावून सामन्यात जीव ओतला होता परंतु तो एकटा तरी किती पुरणार? तो बाद होताच सूर्यकूमार यादव आला आणि सामन्याचा पचका करून गेला. गेल्या दोन सामन्यांत स्टार्कने त्याला मामा बनवले होते.या सामन्यात तर स्टार्क आपल्या मुळ रुपात नव्हता. जणुकाही त्याची झेरॉक्स कॉपी वाटत होता. तरीपण घाबरलेल्या सूर्य कुमारला ॲस्टन एगरने उडवले.
भारतीय फलंदाजीच्या सूर्याला ग्रहण जरी लागले आणि सामना ऑसींकडे झुकू लागला तरी तो आपल्या हातातून पूर्णपणे निसटला नव्हता. ९० चेंडूत ८५ धावा आणि पांड्या जडेजा ही जोडी खेळत असताना चेन्नई दूर नव्हते. फक्त गरज होती टिकून जबाबदारीने खेळण्याची. मात्र फिरकीसोबतच मिशेल स्टार्कने फास आवळणे सुरू केले आणि भारतीय फलंदाजी धापा टाकू लागली होती. पांड्या, जडेजा सारखे कसलेले अष्टपैलू खेळाडू ॲडम झाम्पाच्या मगरमिठीतून सुटू शकले नाही. या दोघांनाही झाम्पाने बाद करत भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. तळाशी फलंदाजी करताना जो चिवटपणा, झुंज, प्रतिकार करावा लागतो, तो या सामन्यात दिसला नाही. तसेच आपल्या फलंदाजीत ताळमेळही दिसला नाही. जणुकाही सर्वांना आयपीएलचा होम सिकनेस झाल्यासारखे वाटत होते. शेवटी आपल्या असंघटित फलंदाजीचा कांगारूंच्या संघटीत गोलंदाजीने पराभव केला.
ऑसींतर्फे या मालिकेत मिशेल मार्श आणि मिशेल स्टार्क या दुक्कलीने टीम इंडियाची दाणादाण उडविली. स्टार्कचे विशेष कौतुक करावे लागेल. आयपीएल सारख्या बाजारबसवींच्या नादी न लागता त्याने आपल्या संघाला प्राधान्य दिले. आपल्या देशासाठी खेळताना संघाशी एकनिष्ठ, प्रामाणिक राहून त्याने संघाला आपले सर्वोच्च योगदान दिले. भारतीय खेळाडूंनी मिशेल स्टार्ककडून हे शिकायला हवे. तर स्टीव्ह स्मिथ कर्णधार पदावरून अपडाऊन होत असला आणि फलंदाजीत फारसा प्रभाव पाडता आला नसला तरी मैदानात आपल्या झुंजार व्यक्तीमत्वाने तो संघाचा खेळ उंचावतो. अक्षरला धावबाद करताना त्याची एक झलक दिसून आली होती. रुक जाना नहीं तू कहीं हार के हा कांगारूंचा मुलमंत्र आहे. विपरित परिस्थितीत सुद्धा कमबॅक करत ते चॅम्पियन सारखे खेळतात आणि सामने जिंकतात. भारतीय गोलंदाजांनी नक्कीच फलंदाजांपेक्षा उजवी कामगिरी केली. मात्र मुर्दाड फलंदाजीने गोलंदाजांच्या मेहनतीवर पाणी फेरले आणि हातातोंडाशी आलेल्या मालिका विजयाला आपण मुकलो.
**********************************
दि. २३ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com