Wednesday, March 24, 2021

बॅडमिंटनचे प्रकाशपर्व, प्रकाश पदुकोण

*बॅडमिंटनचे प्रकाशपर्व 'प्रकाश पदुकोण'*
*************************************
जगातील सर्वात जास्त लोकप्रिय खेळांत फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, हॉकी आणि टेनिस या खेळांचा समावेश होतो. मात्र असे असले तरी मुख्यतः आशिया खंडात बॅटमिंटनचा खेळ प्रचंड लोकप्रिय आहे आणि जगाभरातील २२ करोड जनता या खेळाची दिवानी असून नियमितपणे बॅडमिंटनचे सामने खेळले जातात. खरेतर कोणत्याही खेळाला एक मसिहा लागतोच, ज्याच्यामुळे जगात किंबहुना त्याच्या स्वत:च्या देशात त्या खेळाडूला त्या खेळाचा पर्यायवाची शब्द अथवा त्या खेळात अभुतपूर्व क्रांती आणण्याचे श्रेय मिळते. जसे भारतीय क्रिकेट म्हटले की १९८३ चा विश्र्वचषक भारतीय क्रिकेटसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे तसेच बॅडमिंटनसाठी प्रकाश पदुकोण यांचे १९८० ला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे विजेतेपद भारतीय बॅडमिंटनसाठी एक परिवर्तन म्हणून पाहिले जाते.

 खरेतर १९६० च्या दशकांत तुरळक अपवाद वगळता बॅडमिंटन कोणाच्याही खिजगणतीतही नव्हते परंतु प्रकाश पदुकोण यांनी एकहाती बॅडमिंटनचा गोवर्धन पर्वत उचलण्याची किमया करताच पुलेला गोपीचंद, साईना नेहवाल, पी सिंधू, ज्वाला गुट्टा आणि यासारख्या कित्येक गुणी खेळाडूंच्या रूपात आपण भारतीय बॅडमिंटनचा वेलू गगणावरी चढलेला बघू शकतो.

'सायलेंट टायगर' व 'अनडिसप्युटेड लिडर' या टोपणनावाने प्रसिद्ध प्रकाश पदुकोण यांचा जन्म १० जुन १९५५ ला पदुकोण, कुंदापुरा, जिल्हा उडीपी, म्हैसूर इथे झाला होता. त्यांचे वडील रमेश पदुकोण यांनी म्हैसूर बॅडमिंटन असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्याचे ते सचिव असल्याने सहाजिकच प्रकाश पदुकोण या‌ंचा ओढा‌ लहानपणापासून बॅडमिंटनकडे लागला होता. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी त्यांनी रॅकेट हातात घेत बॅडमिंटनला सुरुवात केली आणि १९६४ ला राष्ट्रीय ज्युनिअर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. याशिवाय १९७१ ते १९७९ पर्यंत लागोपाठ ९ वर्षे राष्ट्रीय सिनियर चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकण्याची करामत दाखवली होती. 

६ फुट १ इंच उंची असलेल्या या खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कोरले ते १९७८ ला कॅनडात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून. यानंतर १९७९ ला रॉयल अल्बर्ट हॉल, लंडनला झालेल्या इव्हनिंग ऑफ चॅम्पियन्स चे जेतेपद पटकावत जगाला आपली चुणूक दाखवून दिली होती मात्र अजुनही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाश पदुकोण यांची फारशी कुणी दखल घेतलेली नव्हती. १९८० ला डॅनिश, स्विडीश सोबतच ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकताच बॅडमिंटन जगताने प्रकाश पदुकोणला सलाम ठोकला आणि इथेच भारतातील बॅडमिंटनचे प्रकाशपर्व सुरू झाले होते. लगेचच १९८१ ला क्वाललंपूर, मलेशियात झालेल्या जागतिक स्पर्धेचे विजेतेपद मिळवत प्रकाश पदुकोणने जगावर आपली छाप सोडली होती.

अर्थातच प्रकाश पदुकोण यांची दैदिप्यमान कामगिरी आणि त्यामागची कहानी खुपच रंजक आहे. ६० च्या दशकांत उत्तर, पुर्व आणि पश्र्चिम भारत वगळता दक्षिणेकत बॅडमिंटन ऐवजी बॉल बॅडमिंटन खेळले जायचे. यामुळेच तिकडे बॅडमिंटनची ना कुणाला ओळख होती ना कुणाला बॅडमिंटन खेळाडूंचे नाव तोंडपाठ होते. तसेच उमलत्या खेळाडूंसाठी ना सोयीसुविधा उपलब्ध होत्या, ना आर्थिक सहाय्य, ना आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख. प्रकाश पदुकोण यांना त्यांच्या वडीलांनी प्रशिक्षण दिले ते सुद्धा एका मंगल कार्यालयात, जे कमीतकमी सहा महिने लग्नसमारंभासाठी व्यस्त असायचे‌. मात्र वडीलांनी त्याला एक गुरूमंत्र दिला होता आणि याचेच पालन करत प्रकाश पदुकोण यांनी सुवर्णकामगिरी केली‌ आणि तो गुरुमंत्र म्हणजे फोकस ऑन थिंग्ज व्हिच आर अंडर युवर कंट्रोल.

क्रिकेटमध्ये विश्र्वचषकाचे, फुटबॉल मध्ये फिफा विश्वचषकाचे आणि टेनिस मध्ये विम्बल्डनचे जे महत्त्व आहे, तेच महत्त्व बॅडमिंटन मध्ये ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे आहे किंबहुना प्रत्येक बॅडमिंटनपटू ही स्पर्धा जिंकण्याची मनिषा उराशी बाळगून असतो. प्रकाश पदुकोण सुद्धा याला अपवाद नव्हते आणि तब्बल चार वेळा अपयशी ठरल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही कारण अपयशासारखा दुसरा कोणता गुरु नाही यावर त्यांचा ठाम विश्वास होता. अखेर कसेही करून ही स्पर्धा जिंकण्याची दुर्दम्य इच्छा बाळगत त्यांनी बॅडमिंटनचे पॉवर हाऊस असलेल्या डेन्मार्कची वाट धरली आणि तिथेच त्यांच्ये सोनेरी स्वप्न आकारण्यास सुरूवात झाली होती.

 १९८० साल उजाडले आणि त्यांचा झंझावाताने डॅनिश आणि स्विडीश स्पर्धा आरामात जिंकल्या होत्या. मुख्य म्हणजे पदुकोण यांचे आयकॉन असलेल्या रुडी हर्टोनो (ज्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप ८ वेळा जिंकली होती) यांना त्यांनी गुरुची विद्या गुरूला देत पराभूत केले होते. निश्चितच या दोन विजयाचे टॉनिक मिळताच पदुकोण यांचा आत्मविश्वास दुणावला आणि आता त्यांच्यासमोर अर्जुनासारखे एकमेव लक्ष होते ते म्हणजे ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचे.

आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा लिलया धुव्वा उडवत पदुकोण यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि तिथे त्यांची गाठ पडली ती गत दोन वेळच्या चॅम्पियन इंडोनेशियाच्या लिम स्वि किंग याच्याशी आणि हा खेळाडू खरोखरच बॅडमिंटनचा किंग होता. आपल्या ताकदवान, चपळ हालचालींनी आणि दमदार वेगवान स्मॅशने तो विरोधकांचा सहज फडशा पाडत होता, शिवाय या स्पर्धेसाठी त्याने इतर मोठ्या स्पर्धांना तिलांजली दिली होती. याउलट पदुकोण आपल्या सहजसुंदर टच प्ले साठी नावाजलेले होते तसेच ड्रिफ्टवर त्यांचे उत्तम नियंत्रण होते. खरेतर ही ससा आणि कासवाची शर्यत होती आणि पदुकोण यांनी चतुरपणे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरवत किंग याच्याशी निर्णायक लढतीला सज्ज झाले होते.

पदुकोण यांनी किंगच्या मानसिकतेचा चांगला अभ्यास केला होता आणि जाणुनबुजून खेळ कसा संथ होईल याकडे लक्ष केंद्रित केले होते. आपली चाल चालतांना चाणाक्षपणे किंग टॉस साठी तयार असला तर ड्रॉप आणि ड्रॉपसाठी तयार असला तर टॉस करत किंगला चांगलेच दमवून सोडलेले होते. तसेच हाफ स्मॅश आणि शटलला बेसलाईनजवळ ठेवत किंगला अक्षरशः बेजार करुन सोडले होते आणि अवघ्या ८ मिनिटात १५/८ अशा गुणांनी पहिला सेट जिंकला होता. 

किंग पदुकोण यांच्यापेक्षा दोन वर्षे लहान असला तरी यापूर्वी या दोघांत झालेल्या ४ लढतीत किंगनेच बाजी मारलेली होती. यामुळेच किंग पहिला सेट हरताच चांगलाच खवळला आणि इथेच तो सामना गमावून बसला. दुसऱ्या सेटमध्ये संतापलेल्या किंगने जोरदार स्मॅश करत पदुकोण वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु नेटजवळ ड्रिबल, हाय सर्व्ह आणि मनगटाच्या हळुवार फटक्यांनी किंगला बॅडमिंटन कोर्टच्या चारही कोपऱ्यात पळवून त्याची चांगलीच दमछाक करून टाकली. अखेर ताकद, वेग, स्टॅमीना आणि शांत डोक्याने किंगची शिकार करत आपले सायलेंट टायगर हे नामाभिधान कसे योग्य आहे ते जगताला दाखवून दिले.

जग नेहमीच उगवत्या सुर्याला नमस्कार घालते आणि याचीच प्रचिती पदुकोण यांना ही स्पर्धा जिंकल्यानंतर झाली. एरवी लंडनला वायएमसीए ते बॅटमिंटन कोर्टपर्यंतचा २५ मिनिटांचा प्रवास मेट्रोने करणाऱ्या पदुकोण यांना ही स्पर्धा जिंकताच कारने भारतीय राजदुतावासापर्यंत नेण्यात आले होते. या विजयामुळे पदुकोण जागतिक क्रमवारीत अव्वल ठरले आणि अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय खेळाडू ठरले. या दिग्विजयाने जगासोबतच आपल्या देशातही त्यांची चांगली दखल घेतली गेली आणि सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. 

या कामगिरीमुळे त्यांनी स्वर्णपदकासोबतच १००० पौंड बक्षिसादाखल मिळाले होते. पदुकोण यांच्या ऐतिहासिक विजयाने भारतीय बॅटमिंटनचे ८० पुर्व आणि ८० नंतर अशी विभागणी होऊन भारतीय बॅटमिंटनने कात टाकून नवी उभारी घेतली होती. पदुकोण यांच्यानंतर केवळ पुलेला गोपीचंद यांनी २००१ ला ही स्पर्धा जिंकत भारतीयांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. तसेच इतरही खेळाडूंनी जागतिक विजेतेपदासह दोन आॉलिम्पिक पदके आणि कित्येक स्पर्धात बाजी मारली असली तरीही पदुकोण यांची नेत्रदिपक कामगिरी आजही सर्वोच्च स्थानी मानली जाते. 

पदुकोण यांच्या विजयानंतर भारतीय बॅटमिंटन भरभराटीला आले आणि इथल्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंनी बॅडमिंटन जगतात आपला दबदबा निर्माण केला.पदुकोण यांनी आपल्या धडाकेबाज खेळाने १९८० ते ८५ पर्यंत आणखी १५ टायटल्स पदरात पाडत आपला धडाडा कायम ठेवला होता. मात्र १९९१ ला त्यांनी निवृत्ती घेत बॅडमिंटन साठी आपले आयुष्य वाहून घेतले. 

काही काळ त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडीयाचा चेअरमन म्हणून पदभार सांभाळला तर १९९३ ते १९९६ पर्यंत भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक होते. १९९४ ला त्यांनी प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकॅडमी स्थापन केली होती तसेच २००१ ला भारतात ऑलिम्पिक खेळ रूजविण्यासाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संघटनेची उभारणी केली होती. अर्थातच बॅटमिंटन मध्ये इतकी भरगच्च कामगिरी केल्याने त्यांना १९७२ ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर १९८२ ला भारताच्या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने गौरविण्यात आले होते. २०१४ ला आऊटस्टॅंडींग पुरस्कार तर २०१८ ला बॅटमिंटन असोसिएशन ऑफ इंडीयाचा लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळालेला आहे.

खरेतर आजच्या पिढीला प्रकाश पदुकोण यांची ओळख असण्याची शक्यता कमीच आहे फारतर बॉलीवूडची अग्रणी नटी दिपीका पदुकोणचे वडील एवढी ओळख असू शकते. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही, फारसे पाठबळ नसतांना, पुरेसा मिडीया कव्हरेज अथवा पैशांची खैरात नसतांना प्रकाश पदुकोण यांनी बॅडमिंटन मध्ये जी हिमालयाची उंची गाठली त्याला तोड नाही. सोबतच निवृत्ती नंतरही खेळाशी आपली नाळ तुटू दिली नाही. एकांड्या शिलेदाराप्रमाणे त्यांनी बॅडमिंटनला प्रसिद्धीच्या झोतात आणून भारतात खऱ्या अर्थाने बॅटमिंटनचे प्रकाशपर्व सुरू केले. एवढेच नव्हे तर दिपस्तंभाप्रमाणे हा प्रकाशस्तंभ कधी चेअरमन, कधी प्रशिक्षक तर कधी विविध संघटनांच्या माध्यमातून नवनवीन खेळाडूंची मशागत करत राहीले.

 पदुकोण यांच्या मते एखाद्या देशात कोणताही खेळ लोकप्रिय होण्यासाठी त्या देशातल्या एखाद्या खेळाडूला त्या खेळात शिखरावर पोहचणे गरजेचे असते. पदुकोण यांनी बॅडमिंटन बाबत हेच वाक्य खऱ्यात उतरून दाखवत भारतात बॅटमिंटनला लोकप्रियता मिळवून दिली. नवोदित खेळाडूंसाठी प्रकाश पदुकोण हे रोल मॉडेल असून देव एस कुमार यांनी त्यांच्या जिवनावर आधारित टच प्ले नावाची बायोग्राफी लिहिलेली आहे.

Tuesday, March 23, 2021

भारताची पहिली विश्वसुंदरी, रिता फारिया

@#😈😈😈😈😈😈😈😈😈#@
                     *अगंबाई अरेच्चा*
*भारताची पहिली विश्वसुंदरी, रिता फारिया*
**************************************
विश्वसुंदरी हे शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम नाव येते ते म्हणजे निळ्याशार डोळ्यांची आणि मुर्तीमंत सौंदर्याचा पुतळा असलेल्या ऐश्र्वर्या रायचे. मात्र केवळ ऐश्र्वर्याच नाही तर आणखी पाच भारतीय सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्य आणि बुद्धीमत्तेच्या जोरावर विश्वसुंदरीचा बहुमान पटकावलेला आहे. तसेच सर्वात जास्त वेळा (म्हणजेच सहा वेळा) विश्वसुंदरी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम आपल्या देशाच्या नावे आहे. मात्र या दैदिप्यमान यशाची मुहुर्तमेढ खऱ्या अर्थाने ५४ वर्षांपूर्वी १९६६ ला लंडनला रोवली ती भारताची पहिली विश्वसुंदरी असलेल्या रिता फारिया या सौंदर्यवतीने.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात हे जरी खरे असले तरी बाळ पाळण्यातून उतरताच किती आई-वडील किंवा पालक बाळाच्या आशा आकांक्षा आणि स्वप्नांच्या पुर्ततेसाठी बाळाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात हे सांगणं कठीणच आहे. शिवाय आपल्याकडे डॉक्टर, इंजिनिअर होण्याच्या नादात किंवा निट, जेईईच्या अनावश्यक ओझ्याखाली किती बालकांचे बालपण, आयुष्य करपले गेले आहे हा विषयसुद्धा तेवढाच गंभीर आणि चिंतनीय आहे. या दोन क्षेत्राशिवाय इतरत्रही कर्तृत्व गाजवता येते हे कित्येकांच्या गावीही नसते‌. रिता फारिया मात्र हे दुष्टचक्र भेदण्यात कमालीची यशस्वी ठरली. 
अत्यंत 'सामान्य' कुटुंबात जन्मलेल्या रिता फारियाने "असामान्य" कामगिरी करत सर्वांना आश्र्चर्याने तोंडांत बोटे घालायला लावली.

 बालपणापासूनच काहीतरी विशेष करून दाखवायचे वेड असलेल्या रिता फारियाने आपल्या स्वप्नांना कोमेजू दिले नाही. मुंबईच्या ग्रॅंट मेडीकल कॉलेजमध्ये आपले वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच सहज गंमत म्हणून तिने मिस मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकली सुद्धा. याप्रसंगी तिला बक्षिसादाखल पाच हजार रुपयांची कमाई झाली होती. लगेचच तिने आपले नशिब आजमावत ईव्हज विकली मिस इंडिया स्पर्धेत अवतरली होती आणि ही स्पर्धा आपल्या नावे करत तिने देशपातळीवर आपल्या सौंदर्याचा डंका वाजवला होता.

खरेतर मिस मुंबई आणि मिस इंडिया सारख्या स्पर्धा सहज जिंकणाऱ्या रिता फारियाची खरी कसोटी यानंतरच होती. कारण तिला यानंतर टक्कर द्यायची होती ती जगभरातील सुंदरींशी. १९६६ विश्वसुंदरी स्पर्धेकरीता स्थान होते लंडन. इकडे तिला विश्वसुंदरीचा चकचकीत, लखलखणारा मुकुट खुणावत होता तर दुसरीकडे तिच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एक जळजळीत सत्याची आठवण करून देत होती. अखेर आकांक्षापुढे गगण ठेंगणे पडले. रिताच्या पालकांनी खंबिरपणे तिच्या पाठीशी उभे राहत तिच्या स्वप्नपूर्तीसाठी कंबर कसली होती.

१९६६ ला विश्वसुंदरी स्पर्धेसाठी जेव्हा रिता फारिया लंडनला निघाली तेव्हा तिच्या गाठीशी अवघे तिन पौंड इतकी रक्कम होती. ना तिच्याजवळ स्पर्धेकरीता योग्य कपडे होते, ना स्विमींग सुट, ना हाय हिल शुज. जे काही खरेदी करायचे होते ते अवघ्या तिन पौंडात करायचे होते. अखेर तिने कसेबसे स्पर्धेकरीता स्वत:ला तयार केले आणि १७ नोव्हेंबर १९६६ ची संध्याकाळ तिच्यासाठी सोनेरी पहाट घेऊन उगवली.
पाच फुट आठ इंच दिमाखदार उंचीची, कमालीची ड्रेस सेंस असलेली, पेशाने वैद्यकीय विद्यार्थीनी असलेली रिया फारिया स्टेजवर अवतरताच ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले अशी स्थिती निर्माण झाली होती. आपल्या ५१ प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत रिता फारियाने सौंदर्य इतिहास रचला. फॅशन डिझायनर, मॉडेल सारख्या प्रोफेशनल सुंदरींना मात देत वैद्यकिय विद्यार्थीनी असलेल्या रिता फारियाने विश्वसुंदरीच्या मुकुटावर कब्जा केला होता.

या स्पर्धेत रिताने बेस्ट इन स्विम सुट टायटल जिंकतांनाच बेस्ट इन इव्हिनींग विअर हा टायटल चक्क भारतीय साडी परिधान करुन जिंकला होता. पर्सनॅलीटी राऊंडमध्ये तिला विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना साचेबद्ध उत्तर न देता मला स्त्रीरोग तज्ज्ञ व्हायचे आहे कारण भारतात स्त्रीरोग तज्ञांची कमतरता आहे असे तिने स्पष्टपणे नमूद केले होते.
रिता फारिया आपल्या शब्दाला जागली आणि बक्षिसादाखल मिळालेल्या २५०० पौंडाच्या साहय्याने तिने किंग्ज कॉलेज हॉस्पिटल लंडन इथे स्त्रीरोग तज्ञाचे शिक्षण पुर्ण केले. विश्वसुंदरी स्पर्धा जिंकूनही चित्रपटसृष्टी आणि मॉडेलींगच्या मोहपाशात न अडकता रिता फारियाने आपल्या कारकीर्दी साठी वैद्यकीय क्षेत्राला पसंती दिली होती. विश्वसुंदरी स्पर्धा जिंकणारी ती पहिली आशियाई युवती ठरली होती. सोबतच वैद्यकीय क्षेत्राच्या पार्श्र्वभूमीतून विश्वसुंदरी स्पर्धा गाजवणारी सुद्धा ती पहिलीच युवती ठरली होती.

*१९९४ ऐश्र्वर्य युग*
आपल्या प्रभावी उंचीने,स्मितहास्य, हळुवार चालीसोबत कमालीच्या बुद्धीचातुर्याने विश्वसुंदरी ठरलेल्या रिता फारिया नंतर मात्र तब्बल २८ वर्षे आपल्याला नव्या विश्वसुंदरीसाठी प्रतिक्षा करावी लागली होती. अखेर १९९४ साली हा दुष्काळ संपवत ऐश्र्वर्यवती ऐश्र्वर्या रायने तब्बल ८६ प्रतिस्पर्धी सुंदरींना मागे टाकत ही स्पर्धा जिंकली होती. ऐश्वर्याच्या नितळ सौंदर्याला उत्तम बुद्धीमत्तेची जोड लाभताच अवघ्या २१ वर्षांची ही सम्राज्ञी विश्र्व सुंदरीचा मुकुट धारण करणार हे निश्चित झाले होते. 

*१९९७ 'वेल डन' "डायना हेडन"*
ऐश्वर्याचे कोडकौतुक संपते न संपते तोच १९९७ ला हैदराबादच्या डायना हेडनने विश्वसुंदरी पदावर दावा ठोकला‌ होता. मुळत: मॉडेल असलेल्या डायनाला ही स्पर्धा जिंकायला फारसे श्रम घ्यावे लागले नाही. आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवत डायनाने या स्पर्धेत लिलया बाजी मारली. डायना हेडनच्या फिगरपुढे उर्वरीत सौंदर्यवती फिक्या पडल्या आणि मिस बिचविअर, मिस फोटोजेनिक, मिस वर्ल्ड असा ट्रिपल धमाका करत डायना हेडनने प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारली. डायनाच्या या अचाट कामगिरीची बरोबरी आजपर्यंत कोणतीही सौंदर्यवती करू शकलेली नाही.

*१९९९ सौंदर्य'युक्त' "युक्ता मुखी"*
ऐश्वर्या आणि डायना हेडन पाठोपाठ भारतीय सुंदरींनी या स्पर्धेत आपली घोडदौड सुरू ठेवली आणि १९९९ ला युक्ता मुखीने हा बहुमान पटकावला होता. कॉम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त ही सुंदरी खरेतर ब्युटी विथ ब्रेन म्हणून ओळखली जाते. आकर्षक सौंदर्याला रेखीव चेहऱ्याची साथ मिळताच या सुहास्यवदनी सुंदरीला विजेता घोषित करण्यास परिक्षकांना फारसे डोके खाजवावे लागले नाही.

*२००० सौंदर्य धमाका, प्रियंका चोप्रा* 
युक्ता मुखीच्या पाऊलांवर पाऊल ठेवत २००० साली प्रियंका चोप्राने भारतीय सौंदर्याची जादू पुन्हा एकदा जगाला दाखवून दिली. पर्सनॅलीटी राऊंडमध्ये आपल्या हजरजबाबीपणाने तिने परिक्षकांना मोहीत करून टाकले. मदर टेरेसांना आदर्श आणि प्रेरणास्थान मानणाऱ्या प्रियंकाने लोकांच्या विचारशक्तीला प्रेरित करण्याचा मानस बोलून दाखवला होता.

*२०१७ मनमोहक मानुषी छिल्लर* 
ती पाहताच बाला, कलिजा खल्लास झाला अशी वदंती असलेल्या रोहतक, हरियाणाच्या मानुषी छिल्लरने प्रियंका चोप्रा नंतर १७ वर्षांनी म्हणजेच २०१७ ला विश्वसुंदरी स्पर्धा जिंकली. वैद्यकीय विद्यार्थीनी असलेल्या मनस्वी सुंदर मानुषी छिल्लरने आपल्या नाजूक, निखळ सौंदर्याने परिक्षकांना घायाळ करत विश्वसुंदरीचा मुकुट हस्तगत केला. सौंदर्य आणि वाक् चातुर्याचा सुंदर मिलाफ घडवून आणत मानुषी छिल्लर सर्वांच्या पसंतीस उतरली होती. विशेषतः याप्रसंगी तिने आईचे महत्त्व, योगदान याबाबत सुंदर निरुपण करत परिक्षकांची वाहवा मिळविली होती. मानुषीचे वर्णन एका वाक्यात करायचे झाले तर तुझमे रब दिखता है, यारा मैं क्या करू एवढे हमखास म्हणता येईल.

 जागतिक पातळीवर होणाऱ्या या स्पर्धांकरीता सौंदर्याचे काही मापदंड निश्र्चितच असतात. मात्र यासोबतच स्पर्धकांचा आत्मविश्वास, बुद्धीमत्ता, वाक् चातुर्य, हजरजबाबीपणा, निटनिटकेपणा, स्टेजवरील एकंदरीत वावर आणि त्यांच्या विचारांचा स्पर्धा जिंकण्यात मोलाचा वाटा असतो. या स्पर्धेला सेलिब्रिटींचे वलय प्राप्त असल्याने यात कमालीची चुरस निर्माण होत असते. भारतीय सुंदरींनी हे आव्हान पेलत सहावेळा या सोनेरी मुकुटावर आपली मोहोर उमटवलेली आहे. १९६६, रिता फारिया पासून सुरू झालेली ही सौंदर्ययात्रा भारतीय सुंदरी आणखी जोमाने पुढे नेईल यात वाद नाही. मात्र याचे श्रेय या सोनेरी पाऊलवाटेवर पहिले पाऊल ठेवणाऱ्या रिता फारियाला नक्कीच जाते. 
**********************************

डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

Sunday, March 21, 2021

अंतिम सामन्यात टीम इंडीयाची रनपंचमी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
 *अंतिम सामन्यात टीम इंडीयाची रनपंचमी*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
खऱ्याखुऱ्या रंगपंचमीला जरी वेळ असला तरी टीम इंडियाने अंतिम सामन्यात रनपंचमी साजरी करत टी ट्वेंटी मालिका जिंकली आहे. निर्णायक लढतीत इंग्लिश गोलंदाजीची अक्षरशः धुळवड करत टीम इंडियाने इंग्लंडला ३६ धावांनी नमविले आहे. इंग्लंड कर्णधाराने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी जरुर स्वीकारली मात्र टीम इंडियाने हा डाव त्यांच्यावरच उलटवून बाजी आपल्या नावे केली आहे. खरेतर यासाठी टॉस हारकर बाजी जितनेवालेको विराट कहते हैं असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

कसोटी मालिका जिंकल्यावरही टी ट्वेंटी मालिका रंगतदार होणार यात शंका नव्हती. शिवाय इंग्लंडच्या कसोटी संघापेक्षा त्यांचा टी ट्वेंटीचा संघ निश्चितच आपल्यापेक्षा वरचढ होता. सोबतच बुमराह नावाचे ब्रह्मास्त्र हनिमूनमध्ये व्यस्त असल्याने गोलंदाजी साशंक होतीच. तरीपण अनुभवी भुवनेश्वरच्या नेतृत्वात टीम इंडियाने शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या सारख्या गोलंदाजांच्या कामगिरीने या मालिकेवर दबदबा राखला.

वास्तविकत: मालिकेत २/१ अशा पिछाडीवर असताना मालिका वाचवणे हे एक दिव्यच होते. मात्र आपली खरी डोकेदुखी होती ती सलामीची जोडी. कितीही झंडू बाम लावला असता तरी ही डोकेदुखी अजिबात जाणार नव्हती. अखेर टीम इंडियाला उपरती झाली आणि केएल राहुलला नारळ देताच संघाचे नशिब फळफळून आले. निर्मल बाबांच्या भाषेत सांगायचे झाले तर किरपा वहीं लटकी थी आणि माझी सलामी माझी जबाबदारी हा विडा विराटने उचलताच संघाचा कायाकल्प झाला.

कधी उचक्या देत, कधी ठेचाळत तर कधी धापा टाकत कशीबशी पन्नाशी गाठणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात दे दणादण नव्वदीची सलामी ठोकली. घाव मुळावर घातल्यास फांद्या आपोआप खाली येतात हे तत्व स्वीकारुन रोहीत, विराट अर्थातच या जय विरुच्या जोडीने इंग्लंडच्या बसंतीची चांगलीच छेडखानी केली. जोफ्रा आर्चर व मार्क वुडचा खरपूस समाचार घेत जवळपास दहाच्या सरासरीने इंग्लंडची लुट करत या दोघांनी छत्रपतींच्या सुरत लुटीची आठवण करून दिली.

मुख्य म्हणजे रोहीतच्या मुक्त फलंदाजीला विराटच्या मास्टरक्लास फलंदाजीची जोड म्हणजे सोनेपे सुहागा होते. तर सुर्यकुमार यादवची मदमस्त फलंदाजी व पांड्याची मस्तीखोर फलंदाजी यंगिस्तानची आगळीवेगळी ओळख दाखवून गेली. रोहीत नंतर सुर्यकुमार आणि सुर्यकुमार नंतर पांड्याची धुलाई म्हणजे इंग्लंडला आगीतून निघून फोफाट्यात जाण्यासारखे होते. या चौघांनी इंग्लिश गोलंदाजांना येथेच्छ बदडत त्यांचा चोथा करून टाकला.

अखेर अठरा चौकार आणि अकरा षटकारांच्या आतिषबाजीने टीम इंडियाने इंग्लंड समोर सव्वा दोनशेचे महाकाय लक्ष्य ठेवले. तसे पाहता इंग्लंड आयसीसी रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी आहे. शिवाय त्यांची दमदार फलंदाजी पाहता ते सहजासहजी सामना आपल्याला आंदण देणार नाही हे तितकेच खरे होते. मात्र सत्य हे किती अगम्य, अकल्पित, भयावह असते हे बटलर, मालन जोडीने दाखवून दिले. जेसन रॉय दुसऱ्याच चेंडूत निपटला तरी या दोघांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळविले होते.

शेवटी टीम इंडियाचे बारा वाजणार की काय अशी धाकधूक असतांनाच तेराव्या षटकांत एक शुभ बातमी आली‌‌. संघाला बोहणी करुन देणाऱ्या भुवीने हाती चेंडू पकडताच सामना इंग्लंडच्या हातून सुटू लागला होता. खतरनाक बटलरला भुवीने रिटर्न टिकिट देताच शार्दुल ठाकुरचा विकेटजीवी बाणा जागा झाला. मागील सामन्याप्रमाणेच त्याने एकवर एक फ्री योजना राबवत एकाच षटकांत जॉनी बेअरस्टो, डेव्हीड मलानला टपकवत टीम इंडियाला पुनर्जिवित केले.

या सर्व धामधुमीत धावगतीने आपले काम चोखपणे बजावले होते. मग मॉर्गन असो वा अष्टपैलू बेन स्ट्रोक्स, त्यांना हाणामारीशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. यातच पांड्याने मॉर्गनला चकवले तर नटराजनने बेन स्ट्रोक्सला बोनलेस करुन इंग्लंडच्या आशाआकांक्षांना मुठमाती देऊन टाकली. बटलर व डेव्हिड मलान वगळता इतर फलंदाज आवश्यक ती धावगती राखू शकले नाही तर भुवनेश्वर कुमारने आपल्या चार षटकांत केवळ पंधरा धावा देत इंग्लंडची नाकाबंदी करून टाकली होती.

विजयाची औपचारिकता पूर्ण करतांना शार्दुलने ख्रीस जॉर्डनला बाद करत मालिकेत सर्वाधिक बळी घेण्याचा बहुमान पटकावला. तर विराटने संपूर्ण विस षटके फलंदाजी करत महत्वपूर्ण सामन्यात कॅप्टन्स इनिंग खेळली. केवळ वेगावर मदार ठेऊन सामने जिंकता येत नाही हे एव्हाना इंग्लंडच्या ध्यानात आले असेलच. शिवाय क्रिकेटचा कोणताही प्रकार असो,सामना जिंकायचा असेल तर उपयुक्त भागिदारी करण्याशिवाय पर्याय नसतो. केवळ नाणेफेक जिंकणे किंवा दवबिंदूच्या कुबड्यांवर अवलंबून राहणे किती धोकादायक असते हेच या मालिकेने दाखवून दिले आहे.
************************************
दि. २१ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, March 19, 2021

भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी ट्वेंटी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   *चौथ्या टी ट्वेंटीत सुर्यकुमार तळपला*
                *डॉ अनिल पावशेकर*
***********************************
खरेतर पौष महिन्यातच सूर्याने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आपले उत्तरायन सुरू केले होते. मात्र क्रिकेटविश्वात आयपीएल राशीतून टी ट्वेंटीत प्रवेश करायला नवीन क्रिकेटसूर्य म्हणजेच सूर्यकूमार यादवला चौथ्या टी ट्वेंटीच्या सायंकाळची वाट बघावी लागली. अर्थातच दुसऱ्या टी ट्वेंटीत त्याला बोहल्यावर जरूर चढविण्यात आले होते मात्र इशान किशनने स्वयंवर जिंकताच पुढील सर्व शक्यतांना विराम मिळाला होता. एवढेच नव्हे तर तिसऱ्या टी ट्वेंटीत त्याला चक्क डच्चू नावाचे खंडग्रास ग्रहण सुद्धा लागले गेले होते.

अखेर गुरुवारी म्हणजेच १८ मार्चला त्याची प्रतिक्षा संपली आणि सायंकाळ होताच त्याने आंतरराष्ट्रीय पटलावर आपली आभा उमटवली. अर्थातच रणांगणातील परिस्थिती प्रतिकूल होती. पहिलेच टीम इंडिया मालिकेत पिछाडीवर होती तर मालिका वाचवायची असल्याने ही लढत करो अथवा मरो अशी होती. शिवाय भरवश्याचा रोहीत तंबूत परतला होता तर अजिबात फॉर्ममध्ये नसलेला केएल राहुल दिमतीला होता. उष:काल होता होता पुन्हा एकदा काळरात्रीचे भयाण स्वप्न समोर उभे ठाकले होते.

अशा बिकट प्रसंगी सूर्यकुमारने संघाची धुरा हाती घेतली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. जोफ्रा आर्चरला उडवलेला हा सेमीनटराज शॉट क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडून गेला. इंग्लंडचे वेगवान आक्रमण या सूर्यतेजापूढे फिके पडले. मैदानात चौफेर फटकेबाजी करत त्याने टीम इंडियाच्या झुकझुकगाडीला राजधानी एक्सप्रेसचे स्वरूप दिले. आपल्या धडाकेबाज खेळीत सहा चौकार आणि तिन षटकार खेचून त्याने सामन्याचा लोलक टीम इंडियाकडे वळवला.

दृष्ट लागावी अशी खेळी साकारत असतांनाच मैदानात दगाफटका झाला. खरेतर यावर्षीचे सूर्यग्रहण दहा जूनला आहे. मात्र पंचानी थोडा वादग्रस्त निर्णय देत यादवच्या सूर्याला खग्रास ग्रहण लावून त्याची झुंजार खेळी संपुष्टात आणली. तोपर्यंत त्याने इंग्लिश तोफखान्याची मारकता जरुर कमी केली होती. याचाच फायदा रिषभ पंत, आणि श्रेयस अय्यरने घेतला. या दोघांनी मिळून ६७ धावांचे बहुमूल्य योगदान देताच टीम इंडियाने या मालिकेतील आपल्या सर्वोच्च धावसंख्येची उभारणी केली.

इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेवर कब्जा करायची नामी संधी होती. शिवाय त्यांची फलंदाजी पाहता १८६ चे लक्ष्य त्यांच्या आवाक्यात सुद्धा होते. सोबतच भारतीय संघ केवळ पाच गोलंदाजानिशी खेळत असल्याने हे काम आणखी सोपे झाले होते. मात्र नवव्या षटकांत पांड्याने जेसन रॉयची सुट्टी करताच आपण कुठेतरी हा सामना जिंकू शकतो हा आत्मविश्वास टीम इंडियात दिसू लागला होता. मुख्य म्हणजे इंग्लिश फलंदाज वेगवान गोलंदाजीला हुंगत नाही हे लक्षात येताच पांड्या आणि शार्दुलने कधी आखूड टप्प्याचे तर कधी स्लोअरवन टाकून इंग्लिश फलंदाजांना बेजार केले होते.

पंधराव्या षटकांत चहरने बेअरस्टोचा बेरंग करताच सामना पुन्हा एकदा जीवंत झाला. भरीस भर म्हणून सतराव्या षटकांत शार्दुलने खतरनाक बेन स्ट्रोक्स आणि मुरब्बी मॉर्गनला अक्षरशः मामा बनवत मैदानाबाहेर काढले. भारतीय डगआऊटमध्ये अश्रूंची फुले व्हायला लागली होती. त्यातच कुंगफू पांड्याने सॅम करनच्या चिपळ्या वाजवत टीम इंडियाला विजयासमीप नेले होते. एकोणिसाव्या महत्वाच्या षटकांत भुवनेश्वर कुमारने टीच्चून गोलंदाजी करून सामना जवळजवळ भारताच्या पुढ्यात आणून ठेवला होता.

मात्र कहाणीत अजूनही ट्वीस्ट बाकी होते. ख्रीस जॉर्डन आणि जोफ्रा आर्चर नावाचे दोन त्रस्त समंध खेळपट्टीवर ठाण मांडून बसले होते. शिवाय सामना संघाकडे खेचून आणणाऱ्या शार्दुलवरच सामना जिंकवण्याची जबाबदारी येऊन पडली होती. माझे षटक माझी जबाबदारी अशा भयाण स्थितीत शार्दुलने अखेरचे षटक हाती घेताच तमाम भारतीय क्रिकेटवेड्यांचे प्राण कंठाशी आले होते. कारण सामन्याच्या या निर्णायक स्थितीत चुकीला माफी नव्हती. शेवटी ज्याची भिती होती तेच घडले. आर्चरने आपल्या बॅटरुपी बाणातून चौकार, षटकार बाहेर काढताच शार्दुलचे चेंडूवरचे नियंत्रण सुटले गेले. 

दोन वाईड बॉलने सगळ्यांच्या ह्रदयाची धडधड वाढवली होती. मुख्य म्हणजे सेनापती विराट मैदानात नसल्याने गोलंदाज पोरके झाले होते. बरे झाले आयपीएलच्या सर्वात यशस्वी कर्णधाराने म्हणजेच रोहीतने सामन्याची सर्व सुत्रे हाती घेत शार्दुलला कानमंत्र दिला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ख्रीस जॉर्डन बाद होताच हा अत्यंत महत्वपूर्ण सामना भारताच्या झोळीत पडला आणि टीम इंडिया जल्लोषात न्हाऊन निघाली. या विजयाने भारतीय संघाने मालिकेतले आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. अंतिम सामना जिंकून मालिका आपल्या नावे करायला दोन्ही संघ एकमेकांवर तुटुन पडतील यात शंका नाही. 

नाणेफेक जिंकूनही इंग्लंडला या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. तर सूर्यकूमार यादवला आवळण्यात इंग्लिश गोलंदाज कमी पडले. वास्तविकत: विराट स्वस्तात बाद होऊनही सूर्यकूमार, पंत, अय्यरने संघाला चांगली धावसंख्या रचून दिली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला पन्नाशी ओलांडता आली नाही. मुख्य म्हणजे मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना फलंदाजांच्या भागिदारीचे अत्यंत  महत्व असते. जेसन रॉय, बेअरस्टो ऐन मोक्याच्या वेळी बाद झाले तर शार्दुलचे सतरावे षटक इंग्लंडचे बारा वाजवून गेले.  भारताने सामना जरी जिंकला असला तरी केएल राहुलचे अपयश कसे काय विसरता येईल. ही एक बाब या विजयातही संघाची चिंता वाढवणारी नक्कीच असेल.
*************************************
दि. १९ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Wednesday, March 17, 2021

तिसऱ्या टी ट्वेंटीत इंग्लंडची सरशी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*तिसऱ्या टी ट्वेंटीत इंग्लंडने ईप्सित साधले*
              *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
भारत विरुद्ध इंग्लंड टी ट्वेंटी मालिका आता रंगतदार स्थितीत आली असून तिसरा सामना जिंकत इंग्लंडने आपले ईप्सित साधले आहे. टीम इंडियाच्या प्रारंभी फलंदाजांनी कुचकामी कामगिरी करताच सामना पूर्वार्धातच इंग्लंडच्या झोळीत गेला. खरेतर आतापर्यंतच्या तिन सामन्यात तिन नवनवीन सलामी जोड्या खेळवून जो खेळखंडोबा करण्यात आला, त्याची फारमोठी किंमत टीम इंडियाला चुकवावी लागली आहे. सोबतच सुरवातीला महत्वाचे मोहरे गळाल्याने नमनालाच घडीभर तेल अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती.

वास्तविकत: मालिकेतल्या तिन्ही सामन्यात सलामीच्या राहुकेतूने संघाला चांगलेच छळले आहे. तसेही केएल राहुल नावाचे क्षेपणास्त्र भलेही इस्रो अथवा नासा लॉंच करू शकेल परंतु नरेंद्र मोदी स्टेडियमवरुन ते कदापीही उडणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शिवाय राहुलने ज्याप्रकारे शुन्याचा प्रण केला आहे ते पाहता येत्या काळात शुन्याचा शोध आर्यभटाने नव्हे तर राहुलनेच लावला अशी जगवंदता होऊ शकते. किंबहुना टाईम ट्रॅव्हल करून साक्षात आर्यभटाने जरी शुन्याचा शोध लावला असे सांगितले तर जग त्याला वेड्यात काढू शकते.

बरे झाले आपण १९५७ ला दशमान पद्धती सुरू केली अन्यथा राहुलची कामगिरी पाहता आपल्याला राहुलमान पद्धती स्वीकारावी लागली असती. सोबतच कोणत्याही संख्येला राहुलने गुणले तर गुणाकार शुन्यच येतो अशी नवी संकल्पना समोर आली असती. लागोपाठ तिन सामन्यात राहुलने सलामीला ज्याप्रकारे जांगडबुत्ता केला ते पाहता खेळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारा कोणीतरी मायबाप नक्कीच त्याच्या पाठीशी आहे असे वाटते. जो न्याय शिखर धवनला लावला तोच न्याय राहुलला का लावला गेला नसावा हे एक कोडेच आहे. किंबहुना सलामीची जागा राहुलला बटईने तर दिली नाही ना अशी शंका येते.

राहुलचे घरजावयासारखे लाड करतांनाच आपण धवन, रोहीत, सूर्यकूमार यादव यांचे लोणचे घालत आहोत याचा संबंधीतांना विसर पडलेला दिसतोय. एवढेच कशाला गोलंदाजीतही कुलदिप यादव, मो. सिराज, मो. सामी सारख्यांना कुजवून त्यांचे कंपोस्ट खत तयार करण्याची बीसीसीआयची एखादी योजना असावी असे वाटते. शिवाय सलामीचा समतोल बिघडताच फलंदाजीच्या क्रमवारीची अक्षरशः संगीत खुर्ची होऊन बसली आहे. दुसऱ्या सामन्यात मुसळधार बरसणाऱ्या इशानला तिसऱ्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर ढकलून त्याचा तेजोभंग करण्यात आला तर पहिल्या सामन्यात सर्वाधिक धावा काढण्याचे श्रेय घेणाऱ्या अय्यरला तिसऱ्या सामन्यात खाली ढकलून त्याच्यावर अंगबाई अरेच्चा म्हणण्याची पाळी आणली गेली.

खरेतर पॉवर प्ले फलंदाजांसाठी दोन्ही हाताने सोने लुटण्याची नामी संधी असते. मात्र पहिल्या व तिसऱ्या सामन्यात आपला संघ पॉवरलेस झाला होता. टी ट्वेंटीच्या रणांगणात पॉवर प्लेच्या चिखलात टीम इंडियाचा धावारथ फसताच तिथेच आपला पराभव निश्चित झाला होता. भलेही आपल्याकडे विराट, रिषभ नावाची कवचकुंडले होती. पॉवर प्ले मध्येच पॉवर कट झाल्याने आपल्याला धावांचे लोडशेडींग सहन करावे लागले. शिवाय एकदा सुरवातीची धावगतीची लाट ओसरली की दुसरी लाट यशस्वीरीत्या आणणे सध्यातरी कोरोना शिवाय दुसऱ्या कोणालाही शक्य नाही.

सध्यातरी टीम इंडियाची सुरुवात पाहता विराट भिष्म पितामह सारखा हतबल दिसतोय. एकटा कमावणार आणि इतर सर्व बसून खाणार अशीच स्थिती राहिली तर टीम इंडिया कशी काय जिंकणार. कमीतकमी इतर फलंदाजांनी एकदातरी विराटची जर्सी घालून खेळणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांच्यात शिस्त आणि जबाबदारी येणार नाही असे वाटते. मात्र या सर्व धबडग्यात विराटची फलंदाजी म्हणजे बाहोंमे तेरे मस्तीके फेरे, सासोंमे तेरी खुशबूके डेरे सारखी आहे. एकदा विराट लयात आला की सर्व कामधाम सोडून केवळ त्याची देखणी फलंदाजी पापणी न लवता बघतच राहावे असे वाटते.

मग त्याचे स्ट्रेट ड्राईव्ह असो अथवा ऑफला जाऊन ऑनला चेंडू टोलवणे असो. शिवाय तो आपल्या रंगात आला की प्रतिस्पर्धी गोलंदाज त्याच्यासमोर किती खुजे आहेत याची लगेच प्रचिती येते. संघासाठी विराट म्हणजे हिरा है सदा के लिये असेच आहे. शिवाय लाखों है  मगर तुमसा यहाँ कौन हसीं है, तुम जान हो टीम इंडियाकी तुम्हे मालूम नहीं है असेच म्हणावेसे वाटते. मात्र क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि जोपर्यंत त्याचे संघसहकारी ही बाब मनावर बिंबवून घेत नाही तोपर्यंत विजय टीम इंडियापासून सोशल डिस्टंसिंग राखेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

अखेरच्या पाच षटकांत कोहली पांड्या जोडीने प्रयत्नांची शर्थ करत धावसंख्या दिडशेवर पोहचवली. इंग्लिश संघाला डिनरमध्ये दिडशेच्या धावा म्हणजे खरेतर ऊंटके मुंहमे जीरा असेच होते. त्यांनीही त्या धावा चकना म्हणून लगेच गळ्याखाली उतरवल्या. कारण त्यांच्या उरात धडकी भरवणारा कोणताही गोलंदाज आपल्याकडे नव्हता. शिवाय आठव्या नंबरपर्यंत फलंदाजीची क्षमता असलेल्या संघाला जुजबी धावा पाहून कपाळावर आठ्या पडणे शक्यच नव्हते. सोबतच गोलंदाजीत वॉशिंग्टनचा सुंदर उपयोग झालाच नाही. भारतीय डावाच्या सुरवातीलाच चालू झालेलं रडगाणं अखेर पराजयाच्या कटू स्मृतीत परिवर्तीत झालं. मालिका वाचवायची असेल तर उपयुक्त संघबदल, फलंदाजीचा योग्यक्रम अपेक्षित आहे. अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आहे याची दक्षता बाळगणे टीम इंडियासाठी जरूरी आहे.
************************************
दि. १७ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Monday, March 15, 2021

दुसऱ्या टी ट्वेंटीत 'इशान'चे धुमशान

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
  *दुसऱ्या टी ट्वेंटीत 'इशान'चे "धुमशान"*
               *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
अहमदाबादला झालेल्या दुसऱ्या टी ट्वेंटीत भारताने इंग्लंडचा पाडाव करत मालिकेत बरोबरी साधली आहे. इंग्लंडच्या जुजबी आव्हानाला टीम इंडियाने सहज सर करत पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहे. मुख्य म्हणजे पदार्पणातच धडाकेबाज अर्धशतकाचे धुमशान घालत इशान किशनने मिशन मोटेरा फत्ते केले आहे. जोफ्रा आर्चर ॲंड कंपनीला भीक न घालत विराट, इशान आणि रिषभने सहजसुंदर विजय साकारला आहे.

खरेतर या मालिकेतले आतापर्यंतचे दोन्ही सामने पहिले गोलंदाजी करणाऱ्या संघांनी जिंकले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लिश गोलंदाजांनी भन्नाट वेगासोबतच अचूक टप्प्याने भारतीय फलंदाजांना चांगलेच जखडून टाकले होते. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी स्लोअरवनला फिरकीचा तडका दिला. वेगवान गोलंदाजांना खेळण्यात वाकबगार असलेले इंग्लिश फलंदाज अशा आक्रमणापुढे पुरते हतबल झाले आणि खेळपट्टीवर चक्क झिम्माफुगडी खेळू लागले होते.

मग तो जेसन रॉय असो इऑन मॉर्गन असो अथवा बेन स्ट्रोक्स असो,,,चेंडू आणि बॅट इमानेइतबारे सोशल डिस्टंसिंग पाळत असल्याने इंग्लिश संघ कसाबसा दिडशेपार पोहोचला. ऐन हाणामारीच्या षटकांत शार्दुलने फसव्या चेंडूची ठाकूरकी करताच इंग्लिश धावाबाजार कोसळला. यातच त्यांचे मोठ्या धावसंख्येचे स्वप्न धुळीस मिळाले. जेसन रॉय वगळता चार प्रमुख फलंदाजांनी विशी ओलांडली होती परंतु टीम इंडियाच्या कडक लॉकडाऊनपुढे त्यांची डाळ शिजली नाही.

वास्तविकत: नरेंद्र मोदी आणि राहुल या दोन नावात विळ्या भोपळ्याचे सौख्य आहे. शिवाय सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर असल्याने केएल राहुलने भोपळाही न फोडता या समजाला एकप्रकारे पुष्टीच दिली आहे. राहुल बाद होताच मैदानात शांतता पसरली. मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. कारण यानंतर मोटेरावर इशान नावाचे वादळ घोंगावले. एखाद्या कसलेल्या फलंदाजासारखा बेधडक खेळ करत त्याने सर्वांना चकित केले. पाच चौकार आणि चार षटकारांची आतिषबाजी करत इशानने इंग्लिश गोलंदाजी निष्प्रभ करून टाकली.

मात्र अर्धशतक होताच त्याचा संयम सुटला आणि उलट्या बॅटचा फटका हाणताना तो बाद झाला. खरेतर रिव्हर्स स्विप, स्विच हिट, हेलिकॉप्टर शॉट अथवा दिलस्कूप असो,, याकरिता जबरदस्त हॅंड आय कॉर्डीनेशन सोबतच वाघाचे काळीज लागते. शिवाय दरवेळी नशिब साथ देईलच याची शाश्वती नसते. याबाबतीत सध्यातरी रिषभ पंत चांगलाच नशिबाचा धनी दिसतोय. कसोटीत जिमी ॲंडरसनला आणि टी ट्वेंटीत जोफ्रा आर्चरच्या नाकावर टिच्चून त्याने जे दोन रिव्हर्स स्विप हाणले ते वर्षानुवर्षे क्रिकेट रसिकांच्या स्मरणात राहील.

इशान किशनने भलेही अर्धशतकानंतर बाद झाला परंतु तोपर्यंत टीम इंडिया सुस्थितीत पोहोचली होती. तसेही इशांत नंतर रौनक ऐ महफिल रिषभ मैदानात येताच त्याने चौफेर पंतशाही चालू करून इंग्लंडला बेजार करून सोडले. भलेही पंतची खेळी अल्पजीवी होती मात्र त्याने इंग्लंडच्या विजयाच्या आशा जीवंत राहणार नाही याची काळजी घेतली. इशान रिषभच्या खेळीने सामन्यात रंग भरला असला तरी यात खरा कलाकार विराटच्या रुपाने उपस्थित होता.

आजच्या घडीला तरी विराटच्या फलंदाजीला तोड नाही. केवळ चौकार षटकारच नव्हे तर एकेरी धाव घेतांना त्याची चपळता पाहण्याजोगी असते. एवढेच कशाला दुसऱ्या फलंदाजासाठी धावतांना सुद्धा तो त्याच जोश, त्याच जोमाने धावतो. इशानची कडक फटकेबाजी असो रिषभची बेदरकार फलंदाजी असो या दोघांसमोर विराटची खेळी सुंदर सुस्वरूप आणि निटनेटकी वाटते.  सध्यातरी दोन्ही संघांनी एक एक लढत जिंकत आपण तुल्यबळ असल्याने दाखवून दिले आहे. निश्चितच इशान, सूर्यकूमार यादवच्या समावेशाने टीम इंडियात नवीन ऊर्जा निर्माण झाली असून याचेच प्रतिबिंब उर्वरित सामन्यात बघायला मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
*************************************
दि. १५ मार्च २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Thursday, March 11, 2021

गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला

@#😈😈😈😈😈😈😈😈😈#@
                     *अगंबाई अरेच्चा*
     *गालावरची खळी तुझ्या लावी वेड मला*
*************************************
१८ ऑक्टोबर २०२० या तारखेला ड्रिम इलेव्हन आयपीएलमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण याच दिवशी सुपर संडेला दोन सामन्यात भुतो न भविष्यती अशी करामत होऊन चक्क तिन सुपर ओव्हर्सने सामन्याचे निकाल लागलेले आहेत. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान माऱ्यापुढे सनराईझर्स हैदराबाद लॉकडाऊन झाले. तर दुसऱ्या लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सला मातीमोल करत आपला खळबळजनक विजय नोंदविला.

खरेतर मुंबई विरूद्ध पंजाब सामन्यात मुंबईचे पारडे नेहमीच थोडेफार जड राहते. मात्र यावेळी *कॅलीप्सो किंग ख्रिस गेल आणि लाईमफ्रेश सौंदर्यवती प्रिती झिंटा* चा परिसस्पर्श झाल्याने पंजाबचे किंग झळाळून निघाले. कर्णधार केएल राहुल आणि मयंक वर मदार असलेल्या पंजाब संघाला ख्रिस गेलचा खंदा आधार मिळताच मुंबई सारख्या तगडा संघाला त्यांनी पाणी पाजले. अर्थातच खेळाडूंच्या या भरगच्च कामगीरी सोबतच लक्ष्य वेधून घेतले ते लिरिल गर्ल प्रितीच्या उपस्थितीने.

शिमल्याच्या कुशीत उमललेल्या या सौंदर्यफुलाने सर्वांना आकर्षित केले ते १९९७ च्या लिरिल साबणाच्या जाहिरातीत. धबधब्याखाली मनसोक्तपणे चिंबणाऱ्या, बागडणाऱ्या या अप्सरेला पाहून टिव्हीसमोर बसलेले प्रेक्षक मनामनातून सुखावून जात असत. एव्हाना इतर जाहिरातींना कंटाळलेला प्रेक्षकवर्ग ही जाहिरात नक्कीच डोळ्यात तेल घालून बघत असणार. तिच्या पहाडी रूपाला नाजुकतेचे वलय लाभल्याने ती आणखीनच लोभसवाणी दिसते. त्यातच स्मित करताना तिच्या गालावरची खळी म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट करायला पुरेसे असते.

क्रिकेडवेडी असलेली प्रिती आणखी पाच वर्षांनी वयाची हाफ सेंच्युरी गाठेल. मात्र आजही तिचा जलवा कायम आहे. अगदी टी ट्वेंटी सारखी चपळ, अवखळ, खट्याळ असणारी ती सध्या मात्र कसोटी क्रिकेट सारखी परिपक्व, परिपुर्ण अवस्थेत दिसते. एरवी शांतचित्ताने सामने न्याहळणारी प्रिती पंजाब संघ यशाकडे झेप घेताच उसळून उठते आणि तिचे मोहक रुप बघून मुंबई इंडियन्सचे खंदे समर्थकही पक्षांतर करायला बाध्य होत असतील असे वाटते. 

मुख्य म्हणजे काल सुपर ओव्हर बघतांना तिचे शुभ्र वस्त्रातले मनोहारी, सुहास्य दर्शन ते सुद्धा हाती घेतलेल्या गडद लाल रंगी झेंड्याच्या पार्श्र्वभूमीवर वेडावून टाकणारं होतं आणि आपोआप ओठांवर,,,
जरूरत क्या तुम्हे तलवारकी तीरों की खंजर की
नजर भरके जिसे तुम देख लो  वो खुदही मर जाऐ ह्या ओळी आपोआप यायला लागल्या होत्या.

इकडे प्रितीचे सोज्वळ, सालस रुप प्रेक्षकांना मोहीनी घालत होतं तर मैदानात फलंदाज आणि गोलंदाजांत रणकंदन माजलेलं होतं. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये जसप्रित बुमराहच्या यॉर्करने पंजाबला खिळवून ठेवले होते तर प्रत्युत्तरात  शेरास सव्वाशेर ठरत शेरखान मोहम्मद सामी ने पंजाबला तारले होते. अखेर दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये मुंबईने ११ धावा काढल्या परंतु युनिव्हर्सल बॉस म्हणजेच गेलच्या तडाख्यात मुंबईचे बारा वाजवले गेले. एकंदरीत काय तर प्रितीची गालावरची खळी असो की मैदानातली राहुल,गेलची खेळी असो,,,या सामन्यात क्रिकेट, रोमांच आणि सौंदर्याचा अफलातून मिलाफ क्रिकेटरसिकांनी अनुभवला आहे.
*************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

Wednesday, March 10, 2021

हाऊझ दी जोश,, व्हेरी हाय सर

"हाऊज द जोश, व्हेरी हाय सर"
*************************************
सर सायरील रेडक्लीफ यांनी ऑगस्ट १९४७ ला आखलेल्या रेडक्लीफ रेषेने ४,५०,००० कि.मी. चौरस भूभागाचे आणि ८८ लाख जनसंख्येचे ब्रिटिश जोखडातून मुक्ती होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशात विभाजन झाले. फाळणीच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर जरी दोन देश वेगवेगळे झाले असले तरी दोन्ही देशांची नाळ अटारी वाघा या सिमेने अजूनही शाबूत आहे. दळणवळण, व्यापार आणि इतर बाबींसाठी रस्तेमार्गाने संपर्क करण्याची दोन्ही देशादरम्यान ही सिमा एकमेव जागा असल्याने अटारी वाघा सिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 याचप्रकारे फिरोझपूर जवळ गंडासिंगवाला, हुसैनीवाला सिमा आणि फाझिल्का जवळ महाविर, सद्की सिमा दोन्ही देशाच्या दरम्यान आहे. अमृतसरपासून ३२ कि.मी. तर लाहोरपासून २२ कि.मी. अंतरावर असलेली अटारी वाघा सिमा दोन्ही देशांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून दोन्ही देशातील नागरिक सुर्यास्ताच्या दोन तास पुर्वी होणाऱ्या बिटींग दी रिट्रीट समारंभाला एकच गर्दी करतात. अटारी सिमेजवळ ऑगस्ट २०१७ला उभारण्यात आलेला ३६० फुट (११० मिटर) उंच गगणचुंबी ध्वजावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत असतो तर यालाच समांतर वाघा सिमेकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो.

या सिमेवर १९५९ पासून या निरोप समारंभाला सुरवात झाली असली तरी भारताकडून सिमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) स्थापना व्हायच्या पहिले पंजाब पोलीस दलातर्फे या समारंभात संचालन केले जात असे मात्र सिमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १९६५ पासून बीएसएफ तर पाकतर्फे पाकिस्तानी रेंजर्स यात सहभागी होतात. आतंकवाद्यांच्या हल्ल्यातून ही जागासुद्धा सुटली नाही आणि २ नोव्हेंबर २०११ ला वाघा सिमेकडे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जणांचा मृत्यु तर ११० लोक जायबंदी झाले होते. 

या सिमेवर नेहमीच तणाव असला तरी बकरी ईद, दिवाळी, दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाला दोन्ही बाजूंनी शुभेच्छा आणि मिठाईचे आदानप्रदान होते. अर्थातच वारंवार होणाऱ्या अप्रिय घटनांमुळे यात बरेचदा खंडसुद्धा पडतो. पुलावामा इथे झालेला भ्याड आतंकी हल्ला, प्रत्युत्तरादाखल भारताचा एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या अटारी वाघा बॉर्डरला भेट द्यावे असे मनोमन वाटत होते आणि किसी चिजको शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलानेकी कोशिश करती है याचा अनोखा अनुभव आला.

अमृतसर सोडताच कधी एकदाचे अटारी वाघा सिमेवर पोहचतो असे झाले होते. शिस्तबद्ध वाहतूक, मार्गावर दिसणारी लष्करी ठाणी, युद्धस्मारके, मधातच दृष्टीस पडणारी लष्कराची वाहने, कडक, करारी बाण्याचे आणि देशाच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणारे गणवेषातील सैनिक पाहुन मन देशप्रेमाने उचंबळून येत होते. संपूर्ण देशातील विविध जातपात आणि धर्माचे नागरिक हातात तिरंगा, गालावर तिरंग्याचे चिन्ह आणि ओसंडून वाहणाऱ्या अलोट उत्साहाने सिमेकडे कूच करत होते. अखेर आकाशी डौलाने झळाळणारा तिरंगा दिसताच भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद आणि वंदे मातरमच्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक तपासणी करून ओळखपत्र असेल तरच स्टेडियमवर प्रवेश दिला जातो. प्रवेशाकरीता व्हीआयपी पासेससुद्धा असतात मात्र त्याकरिता एक दिवसआधी बुकिंग करावे लागते. आत पोहचताच आपले स्वागत होते ये शान तिरंगा है, ये जान तिरंगा है,भगवान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, बलिदान तिरंगा है या गिताने. बस एवढेसे गित तुमच्या धमन्यात रक्त सळसळवायला पुरेसे असते आणि पुढील दोन तास तुमची वैयक्तिक ओळख गळून पडते आणि तुम्ही उरता ते ते केवळ अस्सल भारतीय. आपल्या बाजूने सिमा सुरक्षा दलातर्फे उद्घोषक कार्यक्रमाचे सुरळीतपणे संचालन करत प्रेक्षकांचा उत्साह वाढवत असतो आणि समयोचित मार्गदर्शन पण सुरू असते. 

पाकिस्तानी बाजूने मात्र मदारीचा खेळ चालू असल्यासारखे प्रेक्षकांकरीता ढोल वाजवले जातात परंतु त्याला आपल्याकडील ओसंडून वाहणाऱ्या झंझावताची सर नसते. सतत गुंजणारे देशभक्तीपर गिते, बीएसएफच्या जवानांचा जोशपूर्ण राबता, उद्घोषकाची आवेशपूर्ण ललकारी आपल्याला बेभान करते. 
दरम्यान स्टेडियमच्या परेडभागात आपल्याकडे नारी सम्मानार्थ प्रेक्षकातील बालिका, स्त्रीयांना मर्यादित रेषेपर्यंत हातात तिरंगा घेऊन फेरी मारण्याची मुभा दिली जाते. आमच्या सहकारी डॉ गिता आणि डॉ पल्लवी यांना हा सम्मान मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी बाजुने नागरिकांना ही सुविधा नव्हती, केवळ कागदी झेंडे हालवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

 खरोखरच इथले सळसळते वातावरण पाहता आपण या देशात जन्म घेतला याचा सार्थ अभिमान आणि परम आनंद होतो. दरम्यान ये देश है विर जवानोंका...हे गित सुरू होताच आबालवृद्ध हर्षोलात्साने नाचू लागतात आणि एड्रीनॅलीन रश काय असते याची स्वानुभुती होते. या सर्व धावपळीत वाघा बाजूने पाकिस्तानी रेंजर्सची जमवाजमव सुरु होते मात्र आपल्याकडील सोहळा आनंदात सुरू असतो.

सिमा सुरक्षा दलाचे जवान कडक शिस्तीने, कणखरपणे लष्करी पोषाखात वावरत असतात तर पाक रेंजर्स दरबान, चौकीदारा सारखे परिधान करून असतात. पाक बाजुने सिमेवर पाकिस्तान चे जनक मोहम्मद अली जिना यांची तसबीर लागलेली असते. पाक ध्वजासोबतच भगवे, निळे, हिरवे, अनेकरंगी ध्वज सोबत फडकत असतात. 
ये देश है विर जवानोंका, अलबेलोंका,,, हे गित कानावर पडताच एक श्वास, एक ध्यास घेतलेल्या देशप्रेमी जनतेच्या उत्साहाला आणखी उधाण येते.

 विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा या गितावर जवळजवळ १५ मिनीटे स्टेडियमच्या परेडभागात बालिका,स्त्रीया या राष्ट्रसंगीत उत्सवात न्हाऊन निघतात. एक मोठ्या एलईडी पडद्यावर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणसुरू असते. या सोहळ्यात खरा रंग भरला जातो तो सुनो गौरसे दुनियावालो, बुरी नझरना हमपे डालो, सबके आगे होंगे हिंदुस्थानी या गिताने. उद्घोषकांतर्फे खड्या आवाजात भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम चा जयघोष होताच उपस्थित जनसागरात राष्ट्रचैतन्याची त्सुनामी उसळते. 

बरोबर ४.४५ वाजता सिमा सुरक्षा दलातर्फे त्यांची स्थापना, दैदिप्यमान इतिहास, गौरवगाथा याची संक्षिप्त माहिती दिली जाते.  याची सुरवात बीएसएफच्या हम सिमा के पहरी है या गिताने होते. राजस्थानचे वाळवंट असो की काश्मीरचे बर्फाळ वातावरण असो, दलदल असो की उंच शिखरे, देशाची सुरक्षा आपले रक्त शिंपडत अहर्निशपणे सिमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून करत असतात.

जवळपास साठ वर्षे झालेल्या या निरोप समारंभाच्या सुरवातीला स्वर्णजयंती द्वाराच्या गॅलरीतून सुरुवात होते. १३ जवानांच्या या तुकडीतून समारंभाचे संचालन होते. रणदंदुभीचा स्वर कानी पडताच प्रत्यक्ष युद्धाचा आभास होतो. आरंभी दोन ब्लॅक कमांडो यंत्रवत संचालन करत थेट सिमेवर जातात. पाठोपाठ जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडॉर जातीचे दोन श्वान जवानांसोबत ऐटीत गस्त घालतात. 

यानंतर दोन महिला सैनिकांच्या नेतृत्वात जवानांची तुकडी गॅलरीतून खाली उतरते. यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीसैनिक दिमाखात संचालन करत पोस्टपर्यंत येतात. पाठोपाठ आठ सैनिक शिस्तबद्ध संचालन करत येतात आणि एकमेकांना सामोरे आल्यावर जोर आजमवतात. बाहुंचा दम, आवळलेल्या मुठी, गर्वाने छाती ताठ करून, करारी मुद्रा, भेदक डोळे, नजरेत अंगार वातावरण आणखी तापवतात. 

फाटक उघडताच दोन्ही बाजुंनी हस्तालोंदन होताच पुन्हा एकदा मनगटाची ताकद दाखवली जाते. भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मारतम च्या घणाघाती घोषणांनी वातावरण ढवळून निघते. जवानांचे मिशांवर ताव मारणे, भक्कम खांदे उंचावत समोरासमोर आव्हान देणे यामुळे आपण प्रत्यक्षात युद्धभूमीवर असल्याची भावना मनात येते. यानंतर दोन्ही देशांचे ध्वज उतरवणे सुरू होते. अत्यंत लगबगीने परंतु काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडली जाते. एकवेळ अशी येते की हे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एकमेकांची गळाभेट घेत असल्याचे दृश्य दिसते, मात्र हा आभास असतो. नियतीला जागून हे दोन्ही ध्वज सम्मानाने खाली येताच व्यवस्थित घडी करून जवानांच्या खड्या पहाऱ्यात परत आणले जातात. दोन्ही बाजूने एकमेकांना निरोप दिल्या जातो आणि हा कार्यक्रम विसर्जित झाल्याची घोषणा केली जाते.

अत्यंत भावनिक आंदोलन घेत जवळपास दोन तास चाललेला हा समारंभ डोळ्याचे पारणे फेडून जातो. समारंभाची सांगता झाली तरीही पाय जागेवरून हलायला तयार नसतात, नजर हटत नाही, खालीवर झालेला श्वास लवकर सामान्य होत नाही. याची देही याची डोळी हा समारंभ पाहतांना ध्यान हरपून जाते. स्टेडियम सोडून जातांना जिवलगाची ताटातूट झाल्याची तरंगे मनात उठतात, उर अभिमानाने भरून येतो. अत्यंत हळव्या मनाने देश, जवानांना सलाम करत जड पावलाने अखेर निरोप घेतल्या जातो. अत्यंत भारावलेल्या या समारंभाची सांगता झाली असली तरी कोणीही विचारले की हाउझ द जोश तर उत्तर एकच मिळते "व्हेरी हाय सर"... 
*************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

हाऊझ दी जोश, व्हेरी हाय सर,,

"हाऊज द जोश, व्हेरी हाय सर"
*************************************
सर सायरील रेडक्लीफ यांनी ऑगस्ट १९४७ ला आखलेल्या रेडक्लीफ रेषेने ४,५०,००० कि.मी. चौरस भूभागाचे आणि ८८ लाख जनसंख्येचे ब्रिटिश जोखडातून मुक्ती होऊन भारत आणि पाकिस्तान या दोन देशात विभाजन झाले. फाळणीच्या रक्तरंजित पार्श्वभूमीवर जरी दोन देश वेगवेगळे झाले असले तरी दोन्ही देशांची नाळ अटारी वाघा या सिमेने अजूनही शाबूत आहे. दळणवळण, व्यापार आणि इतर बाबींसाठी रस्तेमार्गाने संपर्क करण्याची दोन्ही देशादरम्यान ही सिमा एकमेव जागा असल्याने अटारी वाघा सिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

 याचप्रकारे फिरोझपूर जवळ गंडासिंगवाला, हुसैनीवाला सिमा आणि फाझिल्का जवळ महाविर, सद्की सिमा दोन्ही देशाच्या दरम्यान आहे. अमृतसरपासून ३२ कि.मी. तर लाहोरपासून २२ कि.मी. अंतरावर असलेली अटारी वाघा सिमा दोन्ही देशांसाठी जिव्हाळ्याचा विषय असून दोन्ही देशातील नागरिक सुर्यास्ताच्या दोन तास पुर्वी होणाऱ्या बिटींग दी रिट्रीट समारंभाला एकच गर्दी करतात. अटारी सिमेजवळ ऑगस्ट २०१७ला उभारण्यात आलेला ३६० फुट (११० मिटर) उंच गगणचुंबी ध्वजावर भारताचा तिरंगा डौलाने फडकत असतो तर यालाच समांतर वाघा सिमेकडे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो.

या सिमेवर १९५९ पासून या निरोप समारंभाला सुरवात झाली असली तरी भारताकडून सिमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) स्थापना व्हायच्या पहिले पंजाब पोलीस दलातर्फे या समारंभात संचालन केले जात असे मात्र सिमा सुरक्षा दलाच्या स्थापनेनंतर म्हणजेच १९६५ पासून बीएसएफ तर पाकतर्फे पाकिस्तानी रेंजर्स यात सहभागी होतात. आतंकवाद्यांच्या हल्ल्यातून ही जागासुद्धा सुटली नाही आणि २ नोव्हेंबर २०११ ला वाघा सिमेकडे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात ६० जणांचा मृत्यु तर ११० लोक जायबंदी झाले होते. 

या सिमेवर नेहमीच तणाव असला तरी बकरी ईद, दिवाळी, दोन्ही देशांच्या स्वातंत्र्यदिनाला दोन्ही बाजूंनी शुभेच्छा आणि मिठाईचे आदानप्रदान होते. अर्थातच वारंवार होणाऱ्या अप्रिय घटनांमुळे यात बरेचदा खंडसुद्धा पडतो. पुलावामा इथे झालेला भ्याड आतंकी हल्ला, प्रत्युत्तरादाखल भारताचा एअर स्ट्राईक आणि विंग कमांडर अभिनंदन यांच्या धाडसी कामगिरीमुळे प्रकाशझोतात आलेल्या अटारी वाघा बॉर्डरला भेट द्यावे असे मनोमन वाटत होते आणि किसी चिजको शिद्दतसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलानेकी कोशिश करती है याचा अनोखा अनुभव आला.

अमृतसर सोडताच कधी एकदाचे अटारी वाघा सिमेवर पोहचतो असे झाले होते. शिस्तबद्ध वाहतूक, मार्गावर दिसणारी लष्करी ठाणी, युद्धस्मारके, मधातच दृष्टीस पडणारी लष्कराची वाहने, कडक, करारी बाण्याचे आणि देशाच्या संरक्षणार्थ अहोरात्र झटणारे गणवेषातील सैनिक पाहुन मन देशप्रेमाने उचंबळून येत होते. संपूर्ण देशातील विविध जातपात आणि धर्माचे नागरिक हातात तिरंगा, गालावर तिरंग्याचे चिन्ह आणि ओसंडून वाहणाऱ्या अलोट उत्साहाने सिमेकडे कूच करत होते. अखेर आकाशी डौलाने झळाळणारा तिरंगा दिसताच भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद आणि वंदे मातरमच्या गगणभेदी घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत कडक तपासणी करून ओळखपत्र असेल तरच स्टेडियमवर प्रवेश दिला जातो. प्रवेशाकरीता व्हीआयपी पासेससुद्धा असतात मात्र त्याकरिता एक दिवसआधी बुकिंग करावे लागते. आत पोहचताच आपले स्वागत होते ये शान तिरंगा है, ये जान तिरंगा है,भगवान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, बलिदान तिरंगा है या गिताने. बस एवढेसे गित तुमच्या धमन्यात रक्त सळसळवायला पुरेसे असते आणि पुढील दोन तास तुमची वैयक्तिक ओळख गळून पडते आणि तुम्ही उरता ते ते केवळ अस्सल भारतीय. आपल्या बाजूने सिमा सुरक्षा दलातर्फे उद्घोषक कार्यक्रमाचे सुरळीतपणे संचालन करत प्रेक्षकांचा उत्साह वाढवत असतो आणि समयोचित मार्गदर्शन पण सुरू असते. 

पाकिस्तानी बाजूने मात्र मदारीचा खेळ चालू असल्यासारखे प्रेक्षकांकरीता ढोल वाजवले जातात परंतु त्याला आपल्याकडील ओसंडून वाहणाऱ्या झंझावताची सर नसते. सतत गुंजणारे देशभक्तीपर गिते, बीएसएफच्या जवानांचा जोशपूर्ण राबता, उद्घोषकाची आवेशपूर्ण ललकारी आपल्याला बेभान करते. 
दरम्यान स्टेडियमच्या परेडभागात आपल्याकडे नारी सम्मानार्थ प्रेक्षकातील बालिका, स्त्रीयांना मर्यादित रेषेपर्यंत हातात तिरंगा घेऊन फेरी मारण्याची मुभा दिली जाते. आमच्या सहकारी डॉ गिता आणि डॉ पल्लवी यांना हा सम्मान मिळाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे पाकिस्तानी बाजुने नागरिकांना ही सुविधा नव्हती, केवळ कागदी झेंडे हालवण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता.

 खरोखरच इथले सळसळते वातावरण पाहता आपण या देशात जन्म घेतला याचा सार्थ अभिमान आणि परम आनंद होतो. दरम्यान ये देश है विर जवानोंका...हे गित सुरू होताच आबालवृद्ध हर्षोलात्साने नाचू लागतात आणि एड्रीनॅलीन रश काय असते याची स्वानुभुती होते. या सर्व धावपळीत वाघा बाजूने पाकिस्तानी रेंजर्सची जमवाजमव सुरु होते मात्र आपल्याकडील सोहळा आनंदात सुरू असतो.

सिमा सुरक्षा दलाचे जवान कडक शिस्तीने, कणखरपणे लष्करी पोषाखात वावरत असतात तर पाक रेंजर्स दरबान, चौकीदारा सारखे परिधान करून असतात. पाक बाजुने सिमेवर पाकिस्तान चे जनक मोहम्मद अली जिना यांची तसबीर लागलेली असते. पाक ध्वजासोबतच भगवे, निळे, हिरवे, अनेकरंगी ध्वज सोबत फडकत असतात. 
ये देश है विर जवानोंका, अलबेलोंका,,, हे गित कानावर पडताच एक श्वास, एक ध्यास घेतलेल्या देशप्रेमी जनतेच्या उत्साहाला आणखी उधाण येते.

 विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊँचा रहे हमारा या गितावर जवळजवळ १५ मिनीटे स्टेडियमच्या परेडभागात बालिका,स्त्रीया या राष्ट्रसंगीत उत्सवात न्हाऊन निघतात. एक मोठ्या एलईडी पडद्यावर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपणसुरू असते. या सोहळ्यात खरा रंग भरला जातो तो सुनो गौरसे दुनियावालो, बुरी नझरना हमपे डालो, सबके आगे होंगे हिंदुस्थानी या गिताने. उद्घोषकांतर्फे खड्या आवाजात भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मातरम चा जयघोष होताच उपस्थित जनसागरात राष्ट्रचैतन्याची त्सुनामी उसळते. 

बरोबर ४.४५ वाजता सिमा सुरक्षा दलातर्फे त्यांची स्थापना, दैदिप्यमान इतिहास, गौरवगाथा याची संक्षिप्त माहिती दिली जाते.  याची सुरवात बीएसएफच्या हम सिमा के पहरी है या गिताने होते. राजस्थानचे वाळवंट असो की काश्मीरचे बर्फाळ वातावरण असो, दलदल असो की उंच शिखरे, देशाची सुरक्षा आपले रक्त शिंपडत अहर्निशपणे सिमा सुरक्षा दलाचे जवान डोळ्यात तेल घालून करत असतात.

जवळपास साठ वर्षे झालेल्या या निरोप समारंभाच्या सुरवातीला स्वर्णजयंती द्वाराच्या गॅलरीतून सुरुवात होते. १३ जवानांच्या या तुकडीतून समारंभाचे संचालन होते. रणदंदुभीचा स्वर कानी पडताच प्रत्यक्ष युद्धाचा आभास होतो. आरंभी दोन ब्लॅक कमांडो यंत्रवत संचालन करत थेट सिमेवर जातात. पाठोपाठ जर्मन शेफर्ड आणि लॅब्राडॉर जातीचे दोन श्वान जवानांसोबत ऐटीत गस्त घालतात. 

यानंतर दोन महिला सैनिकांच्या नेतृत्वात जवानांची तुकडी गॅलरीतून खाली उतरते. यावेळी भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी दोन स्त्रीसैनिक दिमाखात संचालन करत पोस्टपर्यंत येतात. पाठोपाठ आठ सैनिक शिस्तबद्ध संचालन करत येतात आणि एकमेकांना सामोरे आल्यावर जोर आजमवतात. बाहुंचा दम, आवळलेल्या मुठी, गर्वाने छाती ताठ करून, करारी मुद्रा, भेदक डोळे, नजरेत अंगार वातावरण आणखी तापवतात. 

फाटक उघडताच दोन्ही बाजुंनी हस्तालोंदन होताच पुन्हा एकदा मनगटाची ताकद दाखवली जाते. भारत माता की जय, हिंदुस्थान जिंदाबाद, वंदे मारतम च्या घणाघाती घोषणांनी वातावरण ढवळून निघते. जवानांचे मिशांवर ताव मारणे, भक्कम खांदे उंचावत समोरासमोर आव्हान देणे यामुळे आपण प्रत्यक्षात युद्धभूमीवर असल्याची भावना मनात येते. यानंतर दोन्ही देशांचे ध्वज उतरवणे सुरू होते. अत्यंत लगबगीने परंतु काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडली जाते. एकवेळ अशी येते की हे दोन्ही राष्ट्रांचे ध्वज एकमेकांची गळाभेट घेत असल्याचे दृश्य दिसते, मात्र हा आभास असतो. नियतीला जागून हे दोन्ही ध्वज सम्मानाने खाली येताच व्यवस्थित घडी करून जवानांच्या खड्या पहाऱ्यात परत आणले जातात. दोन्ही बाजूने एकमेकांना निरोप दिल्या जातो आणि हा कार्यक्रम विसर्जित झाल्याची घोषणा केली जाते.

अत्यंत भावनिक आंदोलन घेत जवळपास दोन तास चाललेला हा समारंभ डोळ्याचे पारणे फेडून जातो. समारंभाची सांगता झाली तरीही पाय जागेवरून हलायला तयार नसतात, नजर हटत नाही, खालीवर झालेला श्वास लवकर सामान्य होत नाही. याची देही याची डोळी हा समारंभ पाहतांना ध्यान हरपून जाते. स्टेडियम सोडून जातांना जिवलगाची ताटातूट झाल्याची तरंगे मनात उठतात, उर अभिमानाने भरून येतो. अत्यंत हळव्या मनाने देश, जवानांना सलाम करत जड पावलाने अखेर निरोप घेतल्या जातो. अत्यंत भारावलेल्या या समारंभाची सांगता झाली असली तरी कोणीही विचारले की हाउझ द जोश तर उत्तर एकच मिळते "व्हेरी हाय सर"... 
*************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++

Tuesday, March 9, 2021

टेनिससम्राज्ञी, स्टेफी ग्राफ


टेनिससम्राज्ञी,,,'स्टेफी' "ग्राफ"
**************************************
१९८५ च्या काळात महिला टेनिसचे नाव घेतले की मार्टीना नव्रातिलोव्हा आणि ख्रिस एव्हर्ट लॉईड यांचे नाव हमखास पुढे यायचे. मार्टीनाचा जन्म तर जणुकाही ग्रॅंड स्लॅम जिंकण्यासाठीच झाला आहे असे एकंदरीत तिच्या खेळावरून वाटत असायचे. मात्र असे असले तरी वेळ काढून मार्टीनाचा खेळ बघावा असे कधीच वाटत नव्हते. दरम्यान दुरदर्शनने जनमानसात आपले जाळे चांगले पसरवले होते आणि याचदरम्यान मार्टीना व ख्रिस एव्हर्टच्या साम्राज्याला धक्का द्यायला जर्मनीची एक नवोदित टेनिस सुंदरी अवतरण घेत होती. या टेनिस सुंदरीने जर्मनीत टेनिसची लोकप्रियता वाढवली असे म्हणतात परंतू हे अर्धसत्य असून या सम्राज्ञीने न केवळ जगात टेनिसची लोकप्रियता वाढवली तर आपल्या सुंदर खेळाने जगभरातील प्रेक्षकांना टिव्हीसमोर खिळवून ठेवले होते.
या टेनिस सम्राज्ञीचे नाव होते स्टेफनी मरिया ग्राफ, परंतू ही स्टेफी नावानेच प्रसिद्ध होती‌. १४ जुन १९६९ ला मॅनहेम, पश्चिम जर्मनीत जन्मलेल्या या टेनिस ललनेने आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना तर टेनिस कलेने विरोधकांना पुरते घायाळ केलेले होते. ५ फुट ९ इंच उंची, गौरवर्ण, हलके निळे डोळे, सोनेरी केसांची ही सोनपरी टेनिस कोर्टवर अवतरली की "तुम हुस्नपरी, तुम जाने जहाँ, तुम सबसे हसी, तुम सबसे जवाॅं" ह्या ओळी आपोआप ओठांवर यायच्या. मुख्य म्हणजे स्टेफीचा कोर्टवर सहजसुंदर सभ्य वावर, त्यातच तिच्या पांढराशुभ्र पोषाखात ती एकदम डिसेंट दिसायची, क्वचित प्रसंगी रंगीत कपड्यात तर अजून मोहक दिसायची आणि तिचे भारतीय साडी मधले रुप कित्ती कित्ती विलोभनीय असणार याची तर कल्पनाच करवत नसे. बस आपल्या हातात "बेचैन नजर बेताब जिगर, ये दिल है किसी का दिवाणा" एवढेच म्हणायचे बाकी असायचे.
अर्थातच "काबिले तारिफ होने के लिये, वाकिफ ऐ तकलीफ होना पडता है" हे विसरून कसे चालणार. स्टेफीचा जन्मच टेनिस प्रशिक्षकाच्या घरी झाल्याने आणि मातापिता दोघांच्याही नसानसांत टेनिस खळखळून वाहत असल्याने स्टेफीने टेनिसचे बाळकडू चिमुरड्या वयातच घेतलेले होते‌. अवघ्या तिन वर्षांची असतांना तिने घरबसल्या टेनिसची रॅकेट कशी फिरवायची याचे धडे घेतले तर चौथ्या वर्षी तिची चिमुकली पाऊले टेनिस कोर्टवर अवतरली. पाचव्या वर्षापासून तिने टेनिस स्पर्धेचा श्रीगणेशा केला तर सहाव्या वर्षी तिने आयुष्यातील पहिलीवहिली टेनिस स्पर्धा जिंकली. "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" असे म्हणतात मात्र स्टेफीचे पाय थेट टेनिस कोर्टवरच दिसू लागल्याने तिला आपले घर आणि प्रशिक्षक मातापित्यासोबत उज्वल भविष्यासाठी आपले घरदार सोडणे अपरिहार्य झाले होते.
अखेर मजल दरमजल स्टेफी एक्स्प्रेस १९८७ च्या फ्रेंच ओपनच्या फायनलला पोहोचली आणि तिने मार्टीना नव्रातिलोव्हाला धुळ चारत आपले पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावले. इथून तिच्या टेनिस करिअरची गाडी सुसाट सुटली ती थेट १९९९ च्या फ्रेंच ओपनचे विजेतेपद सहाव्यांदा जिंकेपर्यंत. आपल्या स्वर्णीम कारकिर्दीत तिने ऑस्ट्रेलियन ओपन ४ वेळा, अमेरिकन ओपन ५ वेळा, फ्रेंच ओपन ६ वेळा, विम्बल्डन ७ वेळा जिंकली. १९८८ ला स्टेफीने ४ ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासोबतच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकत "गोल्डन स्लॅमची" कामगिरी करून दाखवली आणि अशी कामगिरी करणारी ती एकमेव खेळाडू ठरली. तसेच प्रत्येक ग्रॅंड स्लॅम स्पर्धा कमीतकमी ४ वेळा जिंकण्याचा मान तिलाच जातो. डब्ल्युटीए च्या मानांकनात सर्वोच्च स्थानी सर्वात जास्त वेळ आरूढ राहण्याचा भिमपराक्रम (तब्बल ३७७ आठवडे) स्टेफीच्याच नावावर आहे. महिला टेनिसमध्ये पदकतालिकेत ती मार्टीना (१६७), ख्रिस एव्हर्ट‌‌‌ (१५७) नंतर १०७ टायटलसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 
स्टेफीच्या या भव्यदिव्य यशामागे तिची अथक मेहनत, खेळाप्रती समर्पण आणि प्रचंड आत्मविश्वास दडलेला आहे. ग्रास कोर्ट हे तिचे आवडते मैदान असले तरी क्ले कोर्ट, हार्ड,फास्ट कोर्ट यावरही तिचा झंझावात बघायला मिळायचा‌. तिचे जबरदस्त फुटवर्क आणि ताकदवर फोरहॅंड फटके तिच्या विरोधकांना खेळताना चांगलेच घाम फोडायचे. इनसाईड आऊट फोरहॅंड पॉवरफुल ड्राईव्ह हे तिचे रामबाण अस्त्र होते. तिच्या रॅकेटची गती आणि स्विंग कमालीचा होता. तिची १७४ कि.मी‌. प्रती तासाची अचूक आणि ताकदवर सर्व्हिस महिला टेनिसमध्ये वेगवान सर्व्हिस मानली जायची.
एवढे सर्व यश पदरात पडल्यावरही तिला अहंकार कधी शिवला नाही. काहीशी लाजाळू आणि विनम्र असलेली स्टेफी *विद्या विनयेन शोभते* ची जिवंत उदाहरण होती. कोर्टवर कधीच आदळआपट नाही की पंचाचे निर्णय विरोधात गेले तर उगाचाच त्रागा नाही. अनावश्यक वादविवाद नाही की एवढी मोठी स्टार खेळाडू असून कुठलाच बडेजाव नाही. असे असले तरी तिच्या आयुष्यात काही अप्रिय आणि कटू प्रसंग आलेले होते. असेच एकदा स्टेफी सामना खेळत असतांना एका चाहत्याने "स्टेफी,विल यु मॅरी मी" असा खोचक प्रश्न विचारला होता. क्षणभर तर स्टेफी या अचानक प्रश्र्नाने स्तब्ध झाली, नंतर लगेचच स्त्रीसुलभ सहजतेने लाजली, मुरडली मात्र लगेचच हजरजबाबीपणाने "हाऊ मच मनी यु हॅव" असे बाणेदार उत्तर देत सर्वांची मने जिंकली. १९९३ ला स्टेफीची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली मोनिका सेलेस कोर्टवर खेळत असतांना स्टेफीच्या एका जर्मन चाहत्याने मोनिका सेलेसच्या खांद्यावर चाकुने सपासप वार केले होते. स्टेफीला नंबर वन होता यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे कबूल केले होते. मात्र झालेल्या या हिंसक घटनेने मोनिका सेलेस दोन वर्षांच्या वर काळासाठी टेनिस पासून दुर राहिली होती. १९९५ ला काल्फ मसल दुखापतीने ती चांगली हैराण झाली होती तर तिचे प्रशिक्षक आणि वडिलांना कर विवाद प्रकरणात ४५ महिन्यांची कैदेची शिक्षा झाली होती, जी नंतर २५ महिने करण्यात आली होती. १९९७ ते १९९९ दरम्यान टोंगळे आणि कंबरेच्या दुखापतीने तिला ग्रासले होते आणि हळूहळू तिला "हेल्थ इज वेल्थ" चे महत्व पटायला लागले होते. शिवाय आयुष्याच्या या टप्प्यावर कोणत्याही ग्रॅंड स्लॅम विजेतेपदापेक्षा "आरोग्यं धनसंपदा" किती महत्त्वाची आहे हे कळून चुकले होते. तसेच अमांडा कोईत्झर, याना नोवोत्ना, लिंड्से डेव्हनपोर्ट, मार्टीना हिंगिस आणि विलियम्स भगिनींद्वारे तिला कडवट झुंज देण्यात येऊ लागली होती. यामुळे "स्टेफी ग्राफच्या यशाचा ग्राफ" खाली डोकावूं लागला होता. अखेर या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून तिने १९९९ चे फ्रेंच ओपन जिंकूनही निवृत्तीचा निर्णय घेतला.
स्टेफीच्या निवृत्तीने तिच्या चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली. ज्यांना टेनिसची एबीसीडी कळत नव्हती त्यांना फोरहॅंड, बॅकहॅन्ड, टेनिस कोर्ट, ग्रॅंड स्लॅम सारख्या शब्दांना स्टेफीने मुखोदगत करून दिले होते. स्टेफी जिंकली की चाहत्यांना स्वत: बाजी मारल्याची फिलींग येत होती तर स्टेफीला हरवणारी खेळाडू चाहत्यांसाठी व्हिलन ठरत असायची. "टेनिस करिता स्टेफी आणि स्टेफी करिता चाहते" असा अलिखित नियमच तयार झाला होता. एक मात्र खरे स्टेफीला जे चाहत्यांचे प्रेम, पसंती मिळाली, त्याची बरोबरी आणखी कोणत्या टेनिस खेळाडूला मिळाली असेल असे वाटत नाही. 
स्टेफीने जरी १९९९ ला अधिकृतपणे टेनिस मधून निवृत्ती स्विकारली असली तरी टेनिस रसिकांच्या हृदयातून ती कधीच निवृत्त होऊ शकणार नाही. तिचे टेनिस कोर्टवरचे आकर्षक पददालित्य, प्वाईंट जिंकली अथवा हरल्यावर निमुटपणे मान खाली घालत आपल्या जागी परतणे, सर्व्हिसची वाट बघतांना तिचे धारदार नाक आणि तिक्ष्ण नजर, सतत हलणारी केसा़च्या वेणीची शेपटी, खेळताना कानाच्या मागून मानेपर्यंत घामाचा ओघळ पहिल्या बोटाने पुसने ,,,,सर्वकाही लोभस आणि निव्वळ मन वेडावून टाकणारे होते. मात्र २००१ ला या टेनिस सम्राज्ञीने अमेरिकेचा नंबर एक खेळाडू आंद्रे अगासी याच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या जगभरातील चाहत्यांची "इक दिले टुकडे हजार हुऐ, कोई यहाँ गिरा कोई वहा गिरा" अशी स्थिती झाली. लवकरच तिच्या संसारवेलीवर जेडेन आणि जाझ अशी दोन गोंडस फुले अवतरली होती. आपल्या टेनिस कारकिर्दीत प्रचंड व्यस्त असुनही तिला चांगले सामाजिक भान होते. १९९८ ला तिने युद्ध अथवा इतर कारणांनी जखमी, विकलांग बालकांसाठी "चिल्ड्रेन फॉर टुमारो" या सेवाभावी संस्थेची स्थापना केली होती. टेनिसला ग्लॅमरस करणारी, सुस्वभावी आणि एक आदर्श खेळाडू म्हणून स्टेफीचे नाव निश्र्चितच सर्वोच्च स्थानी मानले जाते.
**************************************

Sunday, March 7, 2021

मोटेरावर रिषभचे तांडव नृत्य

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
        *मोटेरावर रिषभचे तांडव नृत्य*
************************************
अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचे तिसऱ्याच दिवशी तिसऱ्या सत्रात तिनतेरा वाजविले आहे. लागोपाठ तिन कसोटीत इंग्लंडला बुकलून काढत भारतीय संघाने जागतिक कसोटी स्पर्धेकरीता आपली दावेदारी मजबूत केली आहे. फिरकीसमोर सपशेल शरणागती पत्करलेल्या इंग्लिश संघाची अश्विन आणि अक्षर पटेलने अक्षरशः धुळधाण केली तर आक्रमक रिषभ पंतने आपल्या बॅटचे पाणी पाजत इंग्लिश संघाला नामोहरम करण्यात प्रमुख भुमिका बजावली आहे.

खरेतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासूनच रिषभ पंतने गोलंदाजांना बदडण्याचे व्रत हाती घेतले होते. त्याच्या याच सवयीने त्याच्यावर प्रचंड टीकासुद्धा होत होती. मात्र ऐकावे जनाचे करावे मनाचे हे त्याला पक्के ठाऊक होते. शिवाय गोलंदाज कांगारू असो अथवा इंग्लिश, लाथोंके बुत बॅटसे नहीं मानते हे जगजाहीर असल्याने पंतसमोर दुसरा पर्यायच नव्हता. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर कांगारुंच्या ॲडम गिलख्रिस्टने रिषभ पंतच्या रुपात पुनर्जन्म घेतला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

नाही म्हणायला भारतीय संघात रोहीत शर्मा आणि शुभमन गिलसारखी आश्वासक सलामी जोडी आहे. मध्यफळीत संघाचा कणा असलेला कोहलीसारखा विराट कर्णधार लाभला आहे. तर पुजारा आणि राहाणे भारतीय संघाच्या अजिंक्यपदाला साजेशी खेळी करणात तरबेज आहे. मात्र या सर्वांवर भारी पडलीय ती म्हणजे रिषभची बेदरकार फलंदाजी. चौथ्या कसोटीत इंग्लंडला दोनशेत गुंडाळुनही भारतीय फलंदाजी चाचपडतच ०होती. शिवाय रथी महारथी तंबूत परतल्याने भारतीय संघ दोनशेची वेस ओलांडतो की नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकत होती.

भारताचे सहा गडी बाद झाले होते आणि चार बच गए फिरभी पार्टी अभी बाकी है चे दृश्य खेळपट्टीवर उभे होते. समोर आंतरराष्ट्रीय सामन्यात हजारांवर बळी घेणारा जिमी ॲंडरसन फलंदाजांचा यमदूत म्हणून उभा ठाकला होता. खेळपट्टी नेहमीप्रमाणे फिरकीपटूंच्या प्रेमात आकंठ बुडाली होती तर चेंडूच्या वळवळी नजरेत भरण्याइतपत वाढल्या होत्या. रिषभच्या दिमतीला वॉशिंग्टन सुंदर वगळता नाव घेण्यासारखा फलंदाज उरला नव्हता. शिवाय समोर जागतिक कसोटी स्पर्धेकरीता सामना जिंकणे महत्वाचे होते.

अशा प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. मात्र रिषभने या संकटात संधी शोधली आणि इथेच भारतीय संघाला लॉर्डसवर स्वारी करण्याचा पासवर्ड रिषभने शोधून दिला. खेळपट्टीची वळवळ, फिरकीपटूंची चळवळ, स्वींगची सटवाई आणि ॲंडरसनच्या अनुभवाला एकत्रितपणे कुटून रिषभने त्याचे भस्म केले आणि ते अंगाला लावुन त्याने तांडवनृत्याला सुरुवात केली. पहिल्या पन्नास धावा रमतगमत काढणाऱ्या रिषभने पुढच्या खेळीसाठी त्याची फलंदाजी टॉप गिअरमध्ये टाकली आणि त्यात इंग्लिश गोलंदाजी पालापाचोळ्यासारखी उडून गेली.

संपूर्ण मालिकेत पीचच्या नावाने बोंबा ठोकणाऱ्यांना रिषभच्या खेळीने सडेतोड उत्तर दिले. विशेषतः ॲंडरसनला फटकावलेल्या रिव्हर्स स्वीपने भारतीय संघाला लॉर्डस मोहिमेचा ओटीपी मिळाला. उभ्या आयुष्यात ॲंडरसनला एवढे अंडरइस्टीमेट कोणत्याही फलंदाजाने केले नसेल. ॲंडरसनची दुर्दशा पाहताच इंग्लिश संघाचे खांदे पडले आणि इथेच भारतीय विजयाचा पाया रचला गेला होता. रिषभच्या तांडव नृत्याने विजयाची पार्वती भारतीय संघावर भाळली होती.

 सध्याच्या घडीला तरी रिषभ हा पैसा वसूल फलंदाज वाटतो. त्याच्या धडक बेधडक फलंदाजीने कित्येकांना वेडावून टाकले आहे. निश्चितच त्याने फलंदाजी सोबतच यष्टीरक्षणातही चुणूक दाखवली असून संघातला फलंदाजीचा समतोल साधण्यास हातभार लावला आहे. त्याच्या शतकाने केवळ भारताला विजयीच नाही केले तर इंग्लिश संघाचे चांगलेच मानसिक खच्चीकरण सुद्धा केले आहे. समकालीन रिद्धीमान सहा असो की संजू सॅमसन असो, रिषभ या दोघांच्याही बराच पुढे निघून गेला असून यापुढे विरोधी संघांना रोहीत विराट सोबतच रिषभचा दरारा सहन करावा लागेल यात शंका नाही.
***********************************
दि‌ ७ मार्च २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Saturday, March 6, 2021

अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण?

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
*अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण कशाला?*
               *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
सध्या गल्ली आणि दिल्ली, गुलाबी थंडीत न्हाऊन निघाली आहे आणि प्रत्येकाला उबदार वातावरण हवेहवेसे आहे. कुणाला मायेची तर कोणाला प्रेमाची ऊब हवी आहे. मात्र काही नतद्रष्ट मंडळींना दुसऱ्याचे भले, भरभराट कधी पाहवल्याच जात नाही. स्वतः कधी भिजला पापड मोडण्याचे धारिष्ट्य नसलेली मंडळीसुद्धा इतरांच्या भीमपराक्रमाला तुच्छ लेखत आपल्या कोत्या मनोवृत्तीचे प्रदर्शन करण्यात गुंग असतात. खरेतर भुक, भय आणि लैंगिकता ही सजिव असण्याची लक्षणे आहेत. मात्र याच विषयात "लक्षणीय" कामगिरी करणाऱ्यांना जग कसे धारेवर धरते हे नुकत्याच गौप्यस्फोट झालेल्या एका गुलाबी प्रकरणात सिद्ध झाले आहे.

झाले काय तर सरकार म्हणजे जनतेचे खऱ्या अर्थाने मायबाप असतात. किंबहुना याचेच अपडेटेड व्हर्जन किंवा सुधारीत आवृत्ती आपल्याला दादा,भाई,नवरोजी या स्वरुपात बघायला मिळते. शिवाय "आपले सरकार आपल्या दारी" येऊन कार्यसिद्धी करत असल्याने काहींच्या घरी रिद्धी सिद्धी नक्कीच पाणी भरत आहे. त्यामुळे कधी उत्साहात नियमांना डावलून कामे केल्या जातात. मात्र याकरीता काम,क्रोध, मत्सर आदी मानवी भावनांना कसोशीने सांभाळावे लागते. परंतु राजकारण, मग ते आत्ताचे असो अथवा जुनेपुराणे असो, कितीही निसरडे असले तरी त्याला गुलाबी किनार असतेच. मग यातून भले भले सुटले नाही.

व्हाईट हाऊस असो की हैद्राबाद हाऊस असो परस्पर संमतीची ही लैंगिक एक्स्प्रेस सुसाट निघाली असुन याला कोणताही राजकीय पक्ष, एखादे राज्य अथवा एखादा देश अपवाद असेल असे वाटत नाही. मात्र सापडला तो चोर, बाकी शिरजोर अशी परिस्थिती असते. शिवाय हे हिमनगाचे एक टोक असल्याने जितके खोलात जाल, तितके हात आणखी घाणीने बरबटण्याचीच शक्यता आहे. यामुळेच की काय तेरी भी चूप मेरी भी चूप करत प्रकरण निस्तारण्यात येते. तसेही आजकाल निवडून येणे ही उमेदवाराची एकमात्र योग्यता असल्याने आणि कोण केंव्हा पक्षाची दावणी सोडून स्वार्थासाठी कोणाच्या कळपात शिरेल याचा नेम नसल्याने एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ असे सर्वत्र बघायला मिळते.

एखादे सरकार कितीही निष्कलंक असले, पक्षप्रमुख कितीही भोळे,सोवळे असले तरी त्यांचे अनुयायी कितपत काबूत राहतील हे सांगणे खरोखरच अवघड आहे. युती काळात मागेल त्याला शेततळे चा नारा जोमात होता. सध्याचे वातावरण, हालचाली पाहता वाट्टेल त्याला रान मोकळे असल्याची भावना जनमानसात आहे. मग ते एखाद्याची मंत्र्यांच्या बंगल्यावर चामडी लोळवणे असो की इडीची पिडा असो. मध्यंतरी बघतोय रिक्षावालाच्या धर्तीवर लपतोय रिक्षावालाचे नाट्य जनतेच्या आठवणीत असेलच.

कोरोना महामारीला तोंड देतांना माझे कुटुंब माझी जबाबदारी असली तरी इकडे तिकडे तोंड मारणाऱ्यांसाठी तुमचे लफडे तुमची जबाबदारी हे नवीन सुत्र विद्यमान सरकार नक्कीच अवलंबेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तसेही मा.न्यायालयाने २०१८ साली ३७७, ४९७ कलमांबाबत क्रांतीकारक निर्णय दिल्याने कोणाला पटो अथवा ना पटो, पटवापटवीच्या गृहउद्योगाला भरभराटी आलेली आहे. याच नियमांचा, निर्णयाचा आधार घेत कधी लिव्ह इन रिलेशनशीप असो की परस्पर सहमतीचे नाट्य असो नैतिकतेचा गळा आवळला जात आहे. असे असले तरी उपरोक्त दोन्ही कलमांद्वारे अनैतिकतेला नैतिकतेचे कोंदण लाभल्याने लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

राजकारणी किंवा खेळाडू असोत, जनमानसात नेहमीच त्यांची एक आदर्श प्रतिमा असते. अर्थातच प्रत्येकाला खाजगी आयुष्य असले तरी सार्वजनिक प्रतिमेला तडा जाईल असे कृत्य त्यांच्याकडून अजिबात अपेक्षित नसते. मग ते करून दाखवलं असो की हार्दिक पांड्याचे करून आलो असो. शिवाय अशा बाबतीत टाळी एका हाताने वाजत नसली तरी, एका हाताने चुटकी जरूर वाजवली जाऊ शकते. सोबतच चुटकीत पटवणाऱ्यांचे कसब प्रत्येकातच असते असेही नाही. मग याच कसबात सब कुछ गमावणाऱ्यानी वेळीच भानावर येणे गरजेचे असते. कारण एकदा साप निघून गेल्यावर लाठी आपटण्यात काही फायदा नसतो.

आता बोभाटा झाल्यावर सावरासावर करून काही फायदा नाही. बुंदसे गयी वो हौद से नहीं आती हेच खरे ठरते. याप्रकरणी नक्की कोण दोषी आहे हे सांगणे कठीण असले तरी अनैतिकतेच्या बाबतीत समाजाचे उर्ध्वपतन, अधःपतन असो की तिर्यकपतन असो,,, नैतिकतेचे शिघ्रपतन झाले आहे असे हमखासपणे म्हणू शकतो. शिवाय दहीहांडीचे थर ठरवणाऱ्या धुरीणांनी राजकारण्यांच्या नैतिकतेचे थर निश्चित करायला काय हरकत आहे? किंबहुना अशा प्रवृत्तींकरीता आमदारकीचा एक विशेष कोटा ठेवायला हरकत नाही. म्हणजे उद्या चालून कोणत्याही थराला जाऊन अशी प्रकरणे उघडकीस आली तरी त्यांना माफ करायला सरकार संकोचणार नाही.

वास्तविकत: स्त्री अत्याचारांच्या बाबतीत कळस गाठला असल्याने अशा घटना निकोप समाजासाठी निश्चितच भुषणावह नाही. पर स्त्रीला  मातेसमान मानणारी संस्कृती इतकी लयास का गेली? पर स्त्री मध्ये सितामातेला शोधणारा समाज सितेमातेतही स्त्री शोधायला लागला ही अधोगती नव्हे काय? पाप हे क्षणभर हसवते, जिवनभर रडवते हे माहित असूनही धुरंधर या मोहपाशात का अडकतात याचे नवल आणि खेद वाटतो. आमची कुठेही शाखा नसल्याचे निवडणूक आयोगासमोर शपथपत्र घेणाऱ्यांनी इतरत्र आउटलेट का उघडावेत?

खरेतर अशा प्रश्नांची उत्तरे कोण देईल हा आणखी एक प्रश्न आहे. शिवाय घडलेल्या घटनांची जी पाठराखण होत आहे ती फारच दुर्देवी आहे. कायदे सर्वांसाठी सारखे असले तरी कारवाई सर्वांसाठी सारखीच राहील या भ्रमात कोणी राहू नये. किंबहुना न्यायाचा तराजू आपले वजन वापरून पाहिजे त्या दिशेला वाकवता येत असल्यानेच अशा प्रवृत्तींचे फावते. मग दोन्हीकडे झेंडे फडकवून कितीही न्यायाच्या गप्पा हाकल्या तरी ही वरवरची मलमपट्टीच असणार. याबाबतीत आणखी बोलणार तरी किती? शेवटी आपण एवढेच म्हणू शकतो,,,,
*ओ पता नहीं जी कौनसा नशा करता है*
*यार मेरा हर इक से वफा करता है*
*छुप छुपके बेवफाईवाले दिन चले गये*
*आंखोमे आंखे डालके दगा करता हैं*
*************************************
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, March 5, 2021

विमानतळावरील माणुसकी

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                *अगंबाई अरेच्चा*
            *रेहान, रेहान,, रेहान,,,*
***********************************
स्थळ चंदिगढचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, वेळ दुपारी १२ वाजताची. माझा मित्र फ्रेश होण्यासाठी आत गेल्याने त्याच्या लगेज बॅगसह मी पुरुष प्रसाधन गृहाबाहेर उभा होतो. हाती मोबाईल असल्याने सोशल मिडिया वर भटकंती चालू होती. अचानक एक साठीतली आजीबाई रेहान, रेहान चा धावा करत माझ्या दिशेने येताना दिसली. मी लगेच मोबाईल मधून डोके काढत त्या आजीबाईला थांबवले आणि नक्की काय झाले ते विचारले असता तिचा नातू रेहान दिसत नसल्याचे तिने सांगितले. मी लगेच तिला तिथेच थांबविले आणि प्रसाधन गृहात रेहान नावाच्या मुलाचा शोध घेतला आणि बाहेर येत तिला रेहान आत नसल्याची कल्पना दिली.

माझे उत्तर ऐकताच तिचे अवसान गळाले आणि तिने आणखी जोराने रेहानच्या नावाने टाहो फोडायला सुरुवात केली. प्रसंग बाका होता, तात्काळ मित्राला सगळं सामान सोपवून मी त्या आजीबाईकडून जुजबी माहिती घेत रेहान शोध मोहीम हाती घेतली. अर्थातच विमानतळ म्हटले की कडक सुरक्षा आणि चोख बंदोबस्त हे ठरलेलं असतं. शिवाय जागोजागी सिसिटिव्ही लागले असल्याने त्या चिमुकल्याला नक्कीच शोधून काढता आलं असत. मात्र क्षणाक्षणाला त्या आजीबाईची वाढत जाणारी चिंता, धडपड पाहता लगेच तिला धिर दिला आणि मी रेहानला शोधून देतो असा विश्वास व्यक्त केला. यानंतर तिचा आक्रोश जरी कमी झाला तरी डोळ्यातून गंगाजुमुनेचा धारा वहायला लागल्या होत्या.

खरेतर रेहान हे पाच सहा वर्षाचे बाळ, खेळण्या बागडण्याचं त्याच वय, विमानप्रवास, चेक इन सारख्या क्लिष्ट गोष्टी त्याच्या खिजगणतीतही नव्हत्या. त्याचे आई-वडील काऊंटर वर बोर्डींग पास काढण्यात गुंग आणि या बाळस्वारीने आजीला हुलकावणी देत धुम ठोकली होती.  रेहानला शोधून काढायचे काम थोडे जिकरीचे होते. कारण मी त्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय त्या दिवशी बाळगोपाळांनी विमानतळ गजबजून गेल्याने परिस्थिती आणखी बिकट होती. अशावेळी रेहानला शोधण्यापेक्षा तो कुठे असू शकतो याचा क्षणभर विचार केला आणि लगेच त्याचे उत्तर सापडले.

अगदी समोरच लहान मुलांच्या खेळण्याचे दुकान होते आणि तिथे काही बालके खेळणी न्याहाळत होती. मी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि रेहान रेहान म्हणून आवाज दिला असता एका बाळाने मान वळवून माझ्याकडे ओझरता कटाक्ष टाकला आणि परत ती स्वारी खेळण्यांकडे रमून गेली. कदाचित मी अनोळखी व्यक्ती आणि चेहऱ्यावर मास्क असल्याने त्याची ही प्रतिक्रिया नैसर्गिक होती. मात्र माझ्या मागेच असलेल्या आजीने तिच्या मौल्यवान खजिन्याला लगेच ओळखले, उचलून धरले आणि मायेने कवटाळून टाकले. बाळराजे मात्र आजीने लगबगीने ओढून जवळ घेतल्याने किंचित भांबावलेले होते. किंबहुना त्याच्या दृष्टीने जीव्हाळ्याचा विषय असलेल्या खेळण्यापासून तुटातुट केल्याने थोडेफार नाराज होते.

मात्र आजीबाईला तिचा मायेचा गोळा सापडल्याने सुखावून गेल्या होत्या. डबडबलेल्या डोळ्यांनी ती कृतज्ञतेने माझ्याकडे पाहत नि:शब्द झाली होती. एवढ्यात बाळाचे पालकसुद्धा घामाघूम होत तिथे पोहचले. मात्र बाळाला सुखरूप पाहताच त्यांचाही जीव भांड्यात पडला. वास्तविकत: लहान मुलांना सांभाळणे अत्यंत जिकरीचे काम असते. सार्वजनिक ठिकाणे असो अथवा धार्मिक स्थळे किंवा गर्दीची कुठलीही जागा असो, लहान मुलांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. थोडीशी चुकामूक झाली तरी अनर्थ होऊ शकतो.

या सर्व रणधुमाळीत एक गोष्ट प्रामुख्याने दृष्टीस येते ती म्हणजे विमानतळावर हमखास आढळणाऱ्या मानवी निर्जीव भावनेची. ती आजीबाई सुरवातीपासून बाळाच्या नावाने धावपळ करत असतांना कुणीही तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. किंबहुना ती व्यक्ती संकटात आहे याचे कोणालाही सोयरसुतक नव्हते. जो तो आपापल्या बोर्डींग पास आणि आयडेंटीटी सांभाळण्यात मशगुल होता. एवढ्या श्रीमंत गर्दीत गरीब, दुर्मिळ असलेली माणुसकी हरवली होती. ना कोणी विचारपूस करण्याचे थोडे सौजन्य दाखवले ना कोणी तिला आधार देण्याचे धाडस दाखविले.

एक मात्र खरे, भलेही आपण एखाद्या संकटात प्रत्येक वेळी, प्रत्येकाची मदत करु जरी शकलो नाही तरी कमीतकमी विचारपूस करून त्या व्यक्तीला दिलासा जरूर देऊ शकतो. देव जरी होता आले नाही तर शंकरासमोरचा निमुटपणे सर्व ऐकणारा नंदी जरुर होऊ शकतो. माणुसकी हरवलेल्या गर्दीत आपातग्रस्तांना मार्गदर्शन करण्याचे काम करायला काय हरकत आहे? एरवी विमानतळावर "तोऱ्यात" मिरवणाऱ्यांनी "तोळ्यामासाएवढी" जरी मानवतेची जपवणूक केली तरी तिथे नंदनवन होणे अशक्य नाही. मात्र एवढी भावनिक गुंतवणूक आणि उलाढाल आज दुरापास्त झाली आहे. स्वार्थ आणि आपल्याच कोषात मग्न असणाऱ्यांच्या जगतात माणुसकी नावाचा शब्द शोधूनही सापडेल की नाही याची शंकाच वाटते. हवेत उडण्याची मनिषा बाळगणाऱ्यांनी मानवी मूल्यांची जपवणूक करत पाय जमिनीवर ठेवावे असे याठिकाणी जरूर नमूद करावेसे वाटते.
************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...