Sunday, October 31, 2021

क्रूझायण भाग ०४

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *'क्रूझायण' भाग ०४*
                *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
क्रूझवर पहिला दिवस धावपळीत गेल्याने रात्री गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी क्रूझ दुपारी बारा वाजता गोव्याला पोहचणार होते. त्यामुळे जागे होण्याची फार घाई न करता सकाळी नऊ पर्यंत अंथरुणात पडून राहणे आम्ही सोयिस्कर समजलो. मात्र रुममध्ये पाण्याशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असल्याने अखेर ब्रेकफास्ट साठी रुमच्या बाहेर पडावेच लागले. टॉप डेकला पोहचलो तर निसर्गाचे एक मनोहारी रुप आमची वाट बघत होते. हलक्याÀaa brother सरींनी क्रूझला ओलेचिंब केले होते. सोबतच सोसाट्याचा वारा अंगात गारवा निर्माण करत होता. वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की टॉप डोम ला गेलो तर आपला तोल सांभाळणे कठीण होऊन गेले होते. अखेर भुकेची आणखी जास्त अग्निपरिक्षा न घेता आम्ही फुडकोर्टला शरण गेलो.

ब्रेकफास्ट करीता शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मात्र शाकाहारी पदार्थांची विविधता आणि सुंदर सजावट पाहून आम्ही मन तृप्त होईपर्यंत एकेक पदार्थांचा समाचार घेतला. दरम्यान थिएटरला एक सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने लवकरच तिकडे निघालो. "इंडिया थ्रू मुव्हीज" याअंतर्गत आसेतुहिमाचल भारतीय संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडवले गेले. अर्थातच मराठी पर्यटकांची संख्या लक्षणीय असल्याने या कार्यक्रमाची सांगता "गणपती बाप्पा मोरया" ने झाली. एव्हाना साडेअकरा वाजले होते आणि गोव्यासाठी डिसेंबार्कमेंट (क्रूझ खाली उतरणे) च्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या होत्या. ज्यांना १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत गोव्यात उतरायचे होते त्यांना आपले कार्ड पेमेंट करणे आवश्यक होते. तसेही क्रूझवर दुपारी विशेष कार्यक्रम नसल्याने आम्ही गोवा फिरण्याचा निर्णय घेतला.

खरेतर पाच तासांत गोवा फिरणे म्हणजे एकप्रकारची चेष्टाच आहे. सोबतच दक्षिण गोव्यात फिरण्यासारखे फारसे नसल्याचे कळले. अखेर टाईमपास म्हणून आम्ही बागमालो बीच आणि उल्टापुल्टा म्युझियम बघण्याचा निर्णय घेतला. सिमा शुल्क भवन, सीआयएसएफ गेट, मुरगांव इथे उतरून आम्ही टॅक्सीने बागमालो बीच कडे निघालो. क्षणभर तर आपण पश्चिम बंगालला तर उतरलो नाही ना असा भास झाला. कारण जागोजागी ममता दिदींचे "गोएंची नवीन सकाळ" स्लोगन सहित तृणमूलचे चिन्ह असलेल्या फलकांनी मार्गाच्या दोन्ही बाजू व्यापून टाकल्या होत्या. ममतांनी इतक्या दुर कसा काय निशाणा लावला कळत नव्हते. मात्र नुकतेच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी गोवा काबिज करण्याचे सुतोवाच केल्याने ममतांची निती स्पष्ट झाली.

गोव्याला तशी आमची ही चौथी भेट परंतु यावेळी इथले वातावरण एकदम निरस आणि भकास वाटत होते. जागोजागी उदासी पसरल्यासारखी वाटत होती. गोवा चैतन्य आणि सळसळत्या उत्साहासाठी प्रसिद्ध आहे. मात्र इथले सुतकी वातावरण पाहता कधी एकदाचे इथून निघतो असे झाले होते. बागमालो बीच वर पंधरा मिनिटे फेरफटका मारून लगेच उल्टापुल्टा म्युझियमला निघालो. इथे पाच सहा रुममध्ये किचन, डायनिंग हॉल, बेडरूम, कार आदी रचना उलट्या टांगलेल्या आहेत. आपण व्यवस्थित पोझ दिली तर हेच फोटो उलटे करुन पाहण्याची अलग मजा आहे. जणूकाही आपण हवेत तरंगत असल्याचा भास होतो. याव्यतिरिक्त मुख्य बाजारपेठेत आलो तर सर्वत्र शांतता आढळते. कोरोनाच्या तडाख्याने पर्यटन क्षेत्रासोबत इतरही व्यवसायीकांना कसे डबघाईस आणले याचे ते उत्तम उदाहरण होते.

आणखी फार वेळ न दवडता आम्ही क्रूझवर परतणे पसंत केले. रविवारी मुख्य आकर्षण होते भारत विरुद्ध पाक सामना.याकरीता जय्यत तयारी झाली होती.टॉप डेकला मेगा स्क्रीन सहित मल्टीपल बार मध्येही सामना बघण्याची सोय होती. टॉप डेकला बघ्यांची तुफान गर्दी झाली होती. पुलबार ओसंडून वाहत होता. बीअर, कोल्ड्रिंक्सची ट्रॉली लगेच खाली होत होती. अर्थातच भारतीय संघाची फलंदाजी पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर "सागरा प्राण तळमळला" चे भाव होते. मात्र सर्वांचा नाईलाज होता.तरीपण मध्यंतरापर्यंत सगळेच आपली जागा पकडून होते. कारण भारतीय संघाची धावसंख्या अगदीच दारिद्र्य रेषेखालील नव्हती. शिवाय भुवी, मोहम्मद शामी आणि बुम बुम बुमराहवर ब्लाईंडमध्ये कोणीही पैसे लावायला तयार होते.

मात्र तो दिवस टीम इंडियाचा नव्हताच. पाक संघाची गोलंदाजी,क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अफलातून होती.अधाश्यासारखे त्यांनी टीम इंडियाचा फडशा पाडला. मात्र खेळ म्हटले की हारजीत होणारच. मात्र अगदी लिंबुटिंबू संघाकडून हरलो तरी चालेल परंतु पाकविरूद्ध जिंकलोच पाहिजे ही भावना आपल्याला सर्वकाही विसरायला लावते. मग अचानक आपले खेळाडू पैशामुळे मस्तावले, आयपीएल मुळे बिघडले सारखे युक्तिवाद सुरू होतात. शिवाय प्रत्येक भारतीय जन्मजात क्रिकेट तज्ञ म्हणून जन्माला येत असल्याने वादविवाद तरी कोणाशी आणि किती करणार. त्यातच देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशप्रेमाविषयी शंका उपस्थित करण्याचे महापातक सुद्धा आपल्याच हातून होते.

सामन्याचा दुसरा डाव सुरू झाला आणि भारतीय पाठीराख्यांचा संयम सुटू लागला. हळूहळू टॉप डेक वरील गर्दी पांगू लागली. सामन्याचा आस्वाद घेत चरणारी मंडळी जणुकाही तेरवीचे जेवण असल्यासारखे अन्न घशाखाली ढकलत होते. कोल्ड्रिंक्स, बीअरच्या ट्रॉलीला कोणी गिर्हाईक उरले नव्हते. सुतकी वातावरणात कोणाचीही कोणाशी बोलण्याची इच्छा उरली नव्हती. उच्च कोटीचा संयम बाळगत बहुतेक क्रिकेट प्रेमी आपापल्या रुमची वाट धरत होते. समाधानाची बाब म्हणजे कोणीही भारतीय संघ आणि खेळाडूंचा उद्धार करत नव्हते. हिच एक समाधानाची बाब याठिकाणी प्रकर्षाने जाणवली. 

पाक संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत भारतीय संघाला कुठेही अजिबात तोंड वर काढू दिले नव्हते. अगदी नाणेफेक जिंकणे सुध्दा आपल्या वाट्याला आले नव्हते. पांडवांचा जेवढा अपमान द्युतयुद्धात झाला नसेल तेवढा मानभंग भारतीय संघाचा या सामन्यात झाला. रिषभ पंत, विराटने वस्त्रहरण रोखण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र तो तोकडा पडला. श्रीकृष्णाची भूमिका पार पाडायला कोणीही उपलब्ध नव्हते. तर उत्तरार्धात  भारतीय गोलंदाज भिष्माचार्याप्रमाणे निर्विकार राहिले. भारतीय संघाचे टायटॅनिक हळूहळू आपल्या गंतव्याकडे निघताच आम्ही खिन्न मनाने टॉप डेक चा निरोप घेतला. मात्र प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी रुपेरी किनार असते हे विसरून कसे चालणार होते आणि झालेही तसेच. रातराणी सभोवताली वातावरणाला आपल्या बाहुपाशात घेत असतांनाच एक गुलाबी घोषणा झाली. ती ऐकताच आमची अवस्था "आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे" सारखी झाली. ती घोषणा होती,,,,,,!
क्रमशः,,,
************************************
दि. ३१ ऑक्टोबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Friday, October 29, 2021

क्रूझायण भाग ०३

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
              *"क्रूझायण" भाग ०३*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
मुंबई गोवा प्रवासाची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता होणार होती. मात्र जवळपास पंधराशे प्रवासी आणि त्यांचा व्याप सांभाळून क्रूझला मार्गस्थ व्हायला थोडा वेळ लागला. तोपर्यंत हाय टी ची वेळ झाली होती आणि फुडकोर्ट पुन्हा एकदा भोजनभाऊंनी गजबजून गेले होते. खरेतर दुपारचे जेवण आटोपून फार तर दिड दोन तास झाले असतील. तरीपण लोकांचे पोट इतक्या लवकर कसे काय खाली होते मला याचे आश्चर्यच वाटते. खाद्यपदार्थांनी गच्च भरलेली थाळी पाहता "पोट भरले पण मन नाही भरले" असे म्हणावेसे वाटते. कदाचित भुके पेक्षा पैसा वसूल करण्याचा यामागे उद्देश असावा असे माझे मत आहे. पुन्हा एकदा प्रवाशांची खाण्यासाठी तिच लगबग, तोच अधाशीपणा पाहून चिड येते. मात्र कोणी किती खावे, कितीदा खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असल्याने याबाबतीत जास्त नाक न खुपसता आम्ही सरळ टॉप डेकचा मार्ग पकडला.

इथे बहामाध्वज आणि भारतीय तिरंगा डौलाने फडकत होता. एव्हाना क्रूझने आपली वेस ओलांडून गोव्याच्या दिशेने प्रयाण करणे सुरू केले होते. एकतर संध्याकाळची रम्य वेळ, संगतीला बेभान वारा, हवेत गारवा असल्याने वातावरण गुलाबी झाले होते. मला तर थेट टायटॅनिक ची पोझ घेऊन फोटो काढायची इच्छा झाली. मात्र आपली केट विन्सलेट (टायटॅनिक ची नायिका) आपल्या सोबत नाही हे लक्षात येताच विचार बदलला. तरीपण विमानतळावर सेक्युरीटी चेकइन च्या नावाखाली बरेचदा ही पोझ दिली असल्याने मनाची समजूत घातली. तब्बल दहाव्या मजल्यावरून जेव्हा आपण खाली समुद्राकडे पाहतो तेव्हा गरगरल्या सारखे होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत आणि पुरेशा उंचीचे कठडे असल्याने धीर येतो. एखाद्या छोटेखानी शहरासारखे हे अजस्त्र क्रूझ वेगाने पाणी कापत पुढे जाते हे पाहून विज्ञान,यंत्रसामर्थ्य आणि मानवी मेंदूचे कौतुक वाटते.

टॉप डेकला मागच्या बाजुला रॉकवॉल क्लाइंबिंग ची सोय आहे. मात्र या वयात हाडे खिळखिळी करणे योग्य नसते. खरेतर पर्यटन म्हणजे केवळ मौजमजा,विमान आणि क्रूझप्रवास नव्हे तर तिथल्या विविध उपक्रमांचा उपभोग घेणे होय. मात्र त्याकरिता फिजीकल फिटनेस महत्वाचा ठरतो. नाही तर "दात आहे तर चणे नाही, चणे आहे तर दात नाही" अशी स्थिती होते. उतरणे,चढणे, धावणे अशा शारीरिक मुलभूत हालचालींना दम लागत असेल तर घरीच जपमाळ घेऊन बसणे सार्थकी ठरते. आयुष्यभर काबाडकष्ट करून संपत्ती जमवणे आणि आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर अखेरचे दिवस मोजण्यात काय फायदा. म्हणूनच हातपाय साथ देईपर्यंत, मन तरुण असेपर्यंत पर्यटनाचा आस्वाद घेतला तर उत्तम. आपल्याकडे केवळ बॅंक बॅलन्सला अवाजवी महत्त्व दिले जाते. मात्र यासोबतच फिजीकल,मेंटल आणि सोशल बॅलन्सचा योग्य मेळ घातला तर पर्यटन सुसह्य होते.

रॉकवॉल क्लाइंबिंगला दुरूनच हात जोडून आम्ही पुल डेक ला आलो तर सेलवे पुल पार्टी रंगात आली होती. डिजे च्या तालावर आबालवृद्ध फेर धरून नाचत होते. विशेषतः जोडप्यांचा, जुगाडांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आम्ही मात्र "जाने कहां गये वो दिन" म्हणत दिनवाने होऊन एवढ्या गर्दीतही पाहण्यासारखे काय आहे हे शोधत होतो. शिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय तरी कोणता होता. आमचे दुरदर्शन चालू असतांनाच मित्रमंडळी व्याकूळ झाली होती. विशेषतः अशा निराधारांसाठी पुलबार सज्ज होता. क्रूझवर मल्टीपल बार आहेत आणि या जागी तुम्हाला खुपच दक्ष असावे लागते. एकतर डॉलर्स मध्ये व्यवहार, सोबतच तुम्ही कोणता ब्रॅण्ड मागीतला, किती मागीतला यात लक्ष नाही दिले तर दोन्ही जागी "मापात पाप" होण्याची शक्यता असते. मात्र आमच्या दर्दी मित्रांना ही हातचलाखी ओळखायला फारसा वेळ लागत नाही आणि प्रकरण तिथेच निपटवले गेले.

यानंतर आमची स्वारी वळली ती पाचव्या मजल्यावरील थिएटर कडे. हे थिएटर कमी आणि पंचतारांकित दालन वाटत होते. तळमजला आणि बाल्कनी धरून जवळपास सातशे ते आठशे लोकं सहजपणे इथे बसू शकतात. सिट व्यवस्था आकर्षक आणि वेगळ्या धाटणीची होती. पंजाबी वेडींग थीम असलेले नाट्य तिथे सादर केले जात होते. प्रेमविवाह आणि अरेंज मॅरेजची गुंतागुंत यात दाखवली जात होती. खरेतर लग्न म्हणजे धरलं तर चावते सोडलं तर पळते अशी अवस्था असते. तुम्ही प्रेमविवाह करा की अरेंज मॅरेज करा, तुमची अवस्था "ना तू जमीं के लिये ना है आसमां के लिये, तेरा वजूद है सिर्फ दास्तां के लिये" असल्याने फारसा फरक पडत नाही. शिवाय बायको चांगली भेटली तर जिवन सुखी, अन्यथा तुम्ही एक चांगले मार्गदर्शक,तत्वज्ञानी म्हणून नाव जरूर कमावू शकता. याबाबतीत नवीन पिढी मात्र दोन्ही तबल्यावर हात ठेवून आहे. पहिले लफडी करायचे,नंतर ब्रेकअप करून अरेंज मॅरेज करायचे आणि दोन्ही घरांची धुळधाण करायची. बरे झाले बुवा आमच्या वेळेस अरेंज मॅरेज पद्धतीचा दबदबा होता, अन्यथा आम्हाला जन्मभर मारूतीरायांचे उपासक राहावे लागले असते.

अर्थातच हे नाट्य आमच्या पचनी पडले नाही आणि आम्ही लगेच थिएटर बाहेर निघालो. क्रूझचा पाचवा मजला क्रूझचे ह्रदयस्थान आहे. इथेच रिसेप्शन असल्याने कार्ड लोड करणे, माहिती मिळवणे, तक्रार नोंदवणे आणि इतरही कामांसाठी सतत वर्दळ असते. इथूनच क्रूझचे सर्वांगसुंदर नटलेले दृश्य बघायला मिळते. टायटॅनिक सारख्या पायऱ्या, त्याला मखमली गालीच्याची जोड, आकर्षक रंगबिरंगी लाईटींगच्या पार्श्वभूमीवर क्रूझचे सौंदर्य आणखी बहरून येते. इथे मोर्चा सांभाळून असलेल्या दोन मराठमोळ्या अधिकाऱ्यांशी आमची गट्टी जमली. श्रीयुत राजेश निगडे आणि त्यांचे बंधू हर्षद पडते, दोघेही चोखपणे आपले कर्तव्य बजावत होते. क्रूझवर मोठ्या प्रमाणात मराठी कर्मचाऱ्यांचा राबता होता. अधिकारी आणि कामगारवर्ग कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कार्डेलिया एम्प्रेस क्रूझच्या संपूर्ण टीमचा उल्लेख करावा लागेल. मुख्य म्हणजे सर्वच्या सर्व कर्मचारी एकदम फिट ॲंड फाईन कसे काय दिसतात याचे नवलच वाटले. साधे वेटर सुद्धा कडक कपड्यात, सुटसुटीत आणि तरुण वर्गातले आहेत.

संध्याकाळी क्रूझवर सर्वात जास्त आकर्षण असते ते कसिनो चे. अर्थातच तो एकप्रकारचा जुगार. मात्र षडरिपू पैकी एक असलेला मोह,लोभ (पैशांचा) कोणाला नाही. सहाव्या डेकवरील कसिनो बारमध्ये आम्ही थाटात प्रवेश केला. मात्र प्रेम असो की पत्ते, "हर बार हुआ इश्कमे निलाम अपुनका" असल्याने आम्ही शांतचित्ताने तिथली गंमत न्याहळत बसलो. रूलेट असो की कार्ड, एंट्री पंचविस हजारांची असल्याने तेवढ्या पैशात आपला महिनाभराचा खर्च सहज निघतो हे सरळ साधे गणित मनात आले आणि पाय आपोआप कसिनोच्या बाहेर निघाले. आमची धाव फारतर मित्रमंडळीत तिनपत्ती मध्ये शंभर ते दोनशे रुपयां पर्यंत असते. त्यातही ब्लाइंड खेळणारे आम्हाला सहज लुटतात. त्यामुळे अशा भानगडीत आम्ही फार पडत नाही.
क्रमशः
************************************
दि. ३० ऑक्टोबर २०२१
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Thursday, October 28, 2021

कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०२

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                  *अगंबाई अरेच्चा*
       *कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०२*
************************************
मुंबई आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल वर सुरक्षा तपासणी करून आत प्रवेश करताच मित्रमंडळींच्या डोळ्यात एक आगळीवेगळी चमक दिसली. एक अनामिक ओढीने सगळे एकामागोमाग आयटीडीसी,फ्लेमींगो दुकानात दाखल झालो. मात्र तिथे सर्वांचाच हिरमोड झाला. कारण ती दुकाने जरी ड्युटी फ्री असली तरी केवळ आंतरराष्ट्रीय प्रवास केलेल्या प्रवाशांसाठीच होती. मात्र हे दुःख लगेच पचवत आम्ही पुढे गेलो तर आश्चर्याने तोंडात बोटे टाकावी असा नजारा समोर होता. अजस्त्र, अवाढव्य, चकचकीत आणि मुंबई गोवा प्रवासाची पट्टराणी असलेली कार्डेलिया एम्प्रेस आमच्या स्वागताला सज्ज होती. "ती पाहताच बाला कलेजा खलास झाला"अशी आमची मनोवस्था झाली होती. डोळे विस्फारून आम्ही तिचे राजेशाही रुप डोळ्यात साठवू लागलो. मग लगेचच तिच्यासमवेत फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही.

पुन्हा एकदा सर्व कागदपत्रांची तपासणी होऊन आत शिरलो. तिथे दोन जलसुंदरींनी (जलवंती,फुलवंती) दोन्ही हात जोडून आमचे स्वागत केले. मात्र इथे त्या मनःपूर्वक आदरतिथ्य करत असल्याची जाणीव झाली. आम्हीसुद्धा बरेच वर्षांनी कोणीतरी भाव दिला म्हणून खुश झालो. खरेतर "शितावरून भाताची परिक्षा" का म्हणतात ते यावेळी कळले. अगदी सुरुवातीलाच जी विनम्रता आणि विनयता क्रूझवर दाखवली गेली ती एखादा अपवाद वगळता सर्वत्र पाळली गेली. अर्थातच आम्ही "शांती मे क्रांती" चे पाईक असलो तरी जिथे कुठे आम्हाला जाणीवपूर्वक अंडरइस्टीमेट करण्याचा प्रयत्न केला गेला तिथे आम्ही हाडाचे दंगेबाज असल्याने हिशोब चुकता करत असतो. यामुळेच आमचे मित्र आम्हाला उपरोधाने "उशिरा जन्मलेला स्वातंत्र्य सैनिक" म्हणत असतात.

खरेतर कार्डेलिया एम्प्रेस क्रूझ ही नावाला जागत तुम्हाला पहिल्या नजरेत इम्प्रेस करते. ही भारताची एकमेव आंतरराष्ट्रीय क्रूझ आहे. १९९० ला जलावतरण केलेल्या या जहाजराणीला पहिले "दी नॉर्डीक एम्प्रेस" नावाने ओळखले जात होते. बहामा, कॅरेबियन समुद्रावर मनसोक्त बागडल्यावर एम्प्रेस ने भारतीय पुर्व पश्चिम किनाऱ्यावर आपले बस्तान मांडले आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्यटनाचे अधिराज्य गाजवत ही जलपर्यटकांच्या गळ्यातील ताईत झाली आहे. आपल्या उदरात, अंगाखांद्यावर प्रवाशांना घेऊन ही मुंबई, दिवू,गोवा, लक्षद्वीप,कोची, चेन्नई,त्रिंकोमाली एवढेच नव्हे तर लंकेतील कोलोंबो, कंकासंतुरीसह गाले इथपर्यंत भ्रमंती करत असते.

प्रवासाकरीता तिन प्रकारचे तिकिट असते. सर्वात कमी तिकिट इंटेरीअर कॅबीनचे असते. यात तुम्हाला बाहेरचे दृश्य न्याहाळता येत नाही. ओशन व्ह्यू मध्ये तुमच्या खोलीतुन समुद्राचा, बाहेरील दृश्यांचा आनंद घेऊ शकता. यापुढील बाल्कनी आणि सुट आणखी जास्त सुविधायुक्त असतात मात्र त्यासाठी आपला खिसा हलका करावा लागतो. आम्ही ओशन व्ह्यू ला पसंती दिली होती. या छोटेखानी रुममध्ये दोन व्यक्तींना पुरेशी सुविधा उपलब्ध होती. प्रत्येक जागी निट नेटकेपणा आणि कलाकुसर क्रूझच्या सौंदर्यात भर घालत होती. इथले इंटेरीअर डिझाईन आणि रंगसंगती अफलातून आहेत. आपण एखाद्या राजमहालात वावरत आहोत असा भास होतो. मध्यभागी समोरासमोर असलेल्या चार लिफ्ट, सोबतच पायऱ्यांची गुंफण तुम्हाला आकर्षित करते. स्वच्छतेच्या बाबतीत तर इथले वातावरण दृष्ट लागण्यासारखे आहे. क्रूझ व्यवस्थापनाने "कचरा दाखवा आणि हजार रुपये मिळवा" ही योजना जरी लागू केली तरी कोणी जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती तिथे आहे.

मुख्य म्हणजे इथे जेव्हा कोणत्याही प्रकारची घोषणा होते तेव्हा तुम्हाला गेस्ट म्हणून आदरार्थी संबोधन केले जाते. चेक इन ते रुम पर्यंतच्या प्रवासाला जवळपास दिड तास लागला होता. एव्हाना दुपारचे दोन वाजले होते आणि पोटात कावळे ओरडू लागल्याने आम्ही टॉप डेक ला असलेल्या फुडकोर्टकडे धाव घेतली. अर्थातच आम्ही "जगण्यासाठी खाण्यापेक्षा, खाण्यासाठी जगत असतो" या नियमाचे नेहमीच पालन करत असतो. यामुळेच आमच्या पुढ्यात अन्नपदार्थ दिसताच आम्ही पोटाचे गुलाम झालो. मुख्य म्हणजे इथे शाकाहारी,मांसाहारी पदार्थांसोबतच सी फुड, जैन फुड आणि गोड पदार्थांची रास लागली असल्याने काय खाऊ, किती खाऊ हे समजतच नव्हते. मात्र "डू नॉट वेस्ट फुड" चे जागोजागी लागलेले फलक पाहताच आम्ही हात आटोपते घेतले. घरचे अन्न सोडले तर इथल्या अन्नपदार्थांची चव, गुणवत्ता आणि दर्जा मी आजपर्यंत कुठेही अनुभवला नाही इतके ते रूचकर आणि स्वादिष्ट होते. साधे पापड सुद्धा एवढे चवदार होते की दोन्ही हातांनी खायचा मोह मला आवरला नाही.

इथले एक आणखी वैशिष्ट्य म्हणजे एकदा तुम्ही थाळी घेतली की ती थाली तुम्हाला परत वापरता येत नाही. प्रत्येक वेळी अन्नपदार्थ घेण्यासाठी नवीन थाळी घ्यावी लागते. कारण जोपर्यंत थाळीतील अन्नपदार्थ बाहेर लटकत नाही तोपर्यंत आपण ती भरून घेत असतो, पुन्हा अन्न मिळेल की नाही याची अनामिक भिती सर्वांनाच असते. शिवाय आजूबाजूच्या लोकांना आपल्या थाळीने त्यांच्या कपड्यांवर डाग उमटवणे यात काही लोकांना मोठेपणा वाटतो.  बहुदा याच कारणाने "प्रत्येक वेळी नवीन थाळी" ची संकल्पना जन्माला आली असावी असे वाटते. इतके असूनही आपले बकासूर अन्ननासाडीचे काम इमानेइतबारे करतांना पाहून आपण ओशाळून जातो. फुडकोर्ट  सुंदर सजवले आहे आणि सेवा देण्यासाठी "वेटर नेहमीच तत्पर" असतात. कुठेही घाई, त्रागा नाही की कटकट नाही. डोक्यावर बर्फ ठेऊन ही मंडळी "वर्क इज वर्शिप" चे पालन करत असतात. 

जेवनाचा मनसोक्त आनंद घेतल्यावर आम्ही वामकुक्षी साठी रुममध्ये दाखल झालो. मात्र व्यवस्थापनाद्वारे वारंवार दिल्या जाणाऱ्या घोषणांनी झोपेचा रसभंग होत होता. आंतरराष्ट्रीय सागरी नियमानुसार तुम्हाला क्रूझवर चढल्यावर सुरक्षा ड्रिलला उपस्थित राहणे बंधनकारक असते. मात्र आम्ही रूममध्येच पेंगुळत सुरक्षा नियमांना समजून घेतले.सात छोट्या आणि एक मोठी अलार्म वाजली की मस्टर स्टेशनकडे धाव घ्यायची एवढेच आम्ही ध्यानात ठेवले. शिवाय कपबोर्ड मध्ये लाईफ जॅकेट असतात याची खात्री करून घेतली आणि यानंतर डुलकी लागल्याने पुढील घोषणा आम्ही ऐकू शकलो नाही. जवळपास एक तासाने खाण्याची गुंगी उतरल्यावर आम्ही क्रूझ दर्शनाचा विचार केला आणि तयारीला लागलो.
क्रमशः
************************************
दि. २८ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Wednesday, October 27, 2021

कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०१

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
     *कार्डेलियाचा क्रूझनामा भाग ०१*
***********************************
डिसेंबर २०१९, भुतो न भविष्यती अशा कोरोनाने पृथ्वीतलावर अवतार घेतला आणि अवघ्या जगाला लुळे पांगळे करून टाकले. याचा सर्वात पहिला आणि सर्वात जास्त फटका बसला तो पर्यटन क्षेत्राला. अर्थातच या कोरोनाच्या दणक्याने पर्यटन प्रेमींची चांगलीच मुस्कटदाबी झाली. तब्बल दोन वर्षे, दोन लाटेनंतर कोरोनाचा विळखा हळूहळू कमी होत आहे आणि याचीच प्रतिक्रिया म्हणून रिव्हेंज टुरीझम उदयास येत आहे. खरेतर अजूनही कोरोना महाशय या भुतलावरील आपला वारसाहक्क सोडायला राजी नसला तरी "डर के जीत है" याची प्रचिती सध्या येत आहे.

अर्थातच दोन वर्षानंतर पर्यटनाचा योग आल्याने आम्ही मित्रमंडळी जाम खुश असलो तरी एखाद्या स्थळाबद्दल नाव निश्चिती होत नव्हती. मात्र आमचे काम आर्यन शाहरुख खानने सोपे करून टाकले. एरवी फारशी चर्चेत नसलेली कार्डेलिया क्रूझ अचानक प्रकाशझोतात आली आणि भटकण्यासाठी टपून बसलेले आम्ही मित्र कार्डेलियाच्या नावावर सहमत झालो. खरेतर आर्यनच्या ड्रग्स केसमुळे "मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये" अशी कार्डेलियाची गत झाली. मात्र  आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या क्रूझच्या दिनचर्येत काडीमात्रेचाही फरक पडला नाही.

कार्डेलिया मोहिमेची सुरुवात २३ ऑक्टोबरला नागपूर पासून विमानप्रवासाने झाली. अर्थातच तुम्ही कितीही वेळा विमान प्रवास केला असला तरी प्रत्येक वेळची मजा काही औरच असते. कधी उत्सुकता नवलाई, कधी भितीयुक्त आनंद तर कधी याच देही याच जन्मी पक्षांसारखे उडण्याची अनुभुती घेतल्यासारखे वाटते. मात्र कोणत्या वस्तू चेक इन मध्ये आणि कोणत्या वस्तू कॅबिन बॅग (हॅंडबॅग) मध्ये घ्यायच्या याबाबत गोंधळाची स्थिती असते.ऐनवेळी भरलेल्या बॅग उलटापालट करण्याची नामुष्की आमच्यावर बरेचदा आली आहे. इतरांना सोडून सेक्युरीटी टीमची वक्रनजर आमच्यावरच का असते हे मला कधीच कळले नाही. कधीकधी तर विमानात प्रवेश केल्याबरोबर हवाई सुंदरी आमच्याकडे पाहून एक औपचारिकता म्हणून कृत्रिम स्मित देतात की आमच्यावर हसतात याबाबत आम्ही साशंक असतो.  

यावर तोडगा म्हणून आम्ही कधीच त्यांच्याशी नजरानजर करत नसतो. "पतली गली से निकल" प्रमाणे हळूच अंग चोरत आम्ही आमची बॅग सांभाळत प्रामाणिकपणे आपले आसन गाठतो. मात्र तिथेही कुणीतरी वरच्या कॅबिनमध्ये सामान ठास्सून भरले असल्याने आम्ही केविलवाणे होत इतरत्र सामानाची सोय करत असतो. मात्र आपल्याला बसायला नक्की कोणती सिट असावी यावर आमचे एकमत कधीच होत नाही. खिडकीजवळ बसावे तर सतत बाहेर डोकावण्याने दुसऱ्या दिवशी मान अकडून जाते. शिवाय आपण कोपऱ्यात बसलो असल्याने हवाई सुंदरी आपल्याकडे वंचित आघाडी सारखे दुर्लक्ष करतात. मधल्या सिटवरचे दुःख तर आणखी वेगळे असते. दोन्ही बाजुचे प्रवासी आपल्याकडे कशाला हे बुजगावणे प्रवासाला आले अशा नजरेने बघतात. सोबतच दोन्ही हात कुठे ठेवायचे हा यक्षप्रश्न असतोच. शिवाय आजूबाजूला महिला प्रवासी असल्या तर परिस्थिती आणखी गंभीर होते. शेवटी माझी व्यथा सांगू कुणाला म्हणत डोळे मिटून घ्यावे लागतात.

आयलच्या सिटची वेगळीच कहानी असते. सतत तुम्हाला कोणतरी धक्के मारून जात असतात. विमानप्रवासात आपण विकत घेऊन काही न खायची शपथ घेतली असल्याने सहसा आम्ही माहिती पुस्तिका दोन तिनदा तरी वाचून काढतो. मात्र सहप्रवाश्यांची ऑर्डर नाकातोंडासमोरून जातांना आमचा चांगलाच जळफळाट होतो. अर्थातच सहप्रवाश्यांचे बरेवाईट अनुभव मुकाटपणे सहन करण्यातच आपले सौख्य सामावले आहे हे मानून आम्ही शांत बसतो. एरवी कोणाकडेही ढुंकूनही न पाहणारे विमानप्रवासी सुरक्षा निर्देशांचे पालन करण्याची घोषणा होताच एअर होस्टेसकडे कान टवकारून, मान उंचावून, डोळे फाडून एकजात बघत असतात. मात्र यात सुरक्षा दृष्टी किती आणि सौंदर्य दृष्टी किती असते हे वेगळे सांगण्याची गरज वाटत नाही.

खरेतर नागपूर ते मुंबई विमानप्रवासाला साधारणपणे एक सव्वा तास वेळ लागतो. मात्र  सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मंदावली असल्याने आम्ही सकाळी एक तासाच्या आतच मुंबईला पोहोचलो. मुख्य म्हणजे प्रवासाच्या दरम्यान "आझादी का अमृत महोत्सव" साजरा करण्याबाबत माहिती देण्यात आली. यात आझाद हिंद फौजेची रणरागिणी कॅप्टन लक्ष्मी यांची २४ ऑक्टोबरला जयंती असल्याने त्यांना गो फर्स्ट एअरलाईन तर्फे मानवंदना देण्यात आली. सोबतच जयहिंदची घोषणा ऐकून ऊर भरून आला. आपल्या देशासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्यांना, खस्ता खाणाऱ्यांना उशीराने का होईना मानसन्मान देण्यात येऊ लागला ही समाधानाची बाब होती.

अखेर विमानाने मुंबई गाठताच आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा पार पडला होता. शनिवारचा दिवस असल्याने विमानतळ ते आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल पर्यंत जायला आम्हाला फार वेळ लागला नाही. क्रूझ बोर्डींगची वेळ  दुपारी बारा पासून असल्याने आम्ही लगेच रांगेत लागलो. कारण या क्रूझची प्रवासी क्षमता १५०० असल्याने बोर्डींगला वेळ लागणारच होता. सोबतच प्रत्येक प्रवाशाला ओळखपत्र, कोरोना व्हॅक्सिनची दोन मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र, ४८ तासाच्या आतील आरटीपिसीआर निगेटिव्ह रिपोर्ट असणे बंधनकारक होते.

आत जातांना एका हातात आपली बॅग तर दुसऱ्या हातात कागदपत्रे सांभाळून एकदाचे टर्मिनल गाठले. इथली सुरक्षा व्यवस्था सीआयएसएफच्या ताब्यात आहे. विमानतळाप्रमाणेच सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात. क्रूझ वर कोणतेही पेय, खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असल्याने थोडीफार कुचंबणा होते. मात्र आपल्या प्रवाश्यांतील बेशिस्तीमुळे आणि त्यांच्या जनावरांनाही लाजवेल अशा सर्वत्र चरण्याच्या सवयी पाहता क्रूझचे नियम संयुक्तिक वाटतात.  क्रूझवर सगळे आर्थिक व्यवहार अमेरिकन डॉलर्स मध्ये होत असल्याने पहिलेच आपले कार्ड इथे लोड करून घ्यावे लागते किंवा क्रूझवर सुद्धा लोड करू शकता. मात्र रुपया आणि डॉलर्सचा दुरावा पाहता चौकसपणे व्यवहार करावा लागतो. शिवाय क्रूझवरून उतरतांना कार्डमध्ये शिल्लक असलेली रक्कम एकतर खर्च करावी लागते अन्यथा क्रूझला दान करावी लागते यामुळे गरजेनुसार कार्ड लोड करणे आवश्यक असते.
क्रमशः,,,,
***********************************
दि. २७ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Tuesday, October 19, 2021

वो इस काबील थे ही नहीं

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
          *वो इस काबील थे ही नहीं*
************************************
दि. १७ ऑक्टोबर २०२१, रविवार, स्थळ होते अल अमीरात क्रिकेट मैदान,ओमान आणि निमित्त होते स्कॉटलंड विरूद्ध बांगलादेश टी ट्वेंटी लढतीचे. सुपर फेरीत पोहचण्याकरीता बांगलादेशला हा सामना जिंकून स्पर्धेत पुढील प्रवास सुखकर करता आला असता. मात्र नवख्या स्कॉटीश संघाने बांगलादेशच्या नाकी नऊ आणत जोरका धक्का धिरे से दिला आहे. "स्कॉटीश सुरी ने ढाक्याची मलमल" अवघ्या सहा धावांनी कापत या विश्वचषकातला मोठा उलटफेर घडवून आणला आहे. मायदेशी आखाडा खेळपट्टीवर कांगारू, किवी संघाला लोळवत जे पुण्य बांगलादेश संघाने कमावले होते, ते अचानकपणे या सामन्यात गमावले आहे.

खरेतर कोणताही खेळ म्हटले की हारजीत तर आलीच. मात्र विजयी होताच बांगलादेश संघात, त्यांच्या पाठीराख्यांत उन्माद आणि कुरापतखोरपणा उफाळून येतो. यामुळेच हा संघ कुठेही पराभूत झाला तर भारतीय क्रिकेटरसिकांचे मन उचंबळून येते. विशेषतः टीम इंडियाला बांगलादेशी संघाच्या गैरवर्तनाचा अनेकदा फटका बसला आहे. या वादाची सुरूवात २००७ ला विंडीजच्या विश्वचषकात झाली होती. टीम इंडियाला साखळी सामन्यात बांगलादेशने पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र यानंतर त्यांचा तत्कालीन कर्णधार हबीबूल बशरने टीम इंडियाबाबत जे मुजोर वक्तव्य केले होते, ते भारतीयांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.

टीम इंडियाच्या पराभवाबाबत हबीबूल बशरने म्हटले होते की "वो इस काबील थे ही नहीं". एका विजयाने बांगलादेशचे विमान हवेत उडले होते. मात्र यानंतर भारतीय संघानेही बांगलादेश संघाला "उठता लाथ बसता बुक्की" दिलेली आहे. मात्र या संघाचे नेहमीप्रमाणेच "गिरे भी तो टांग उपर" राहीली आहे. २०१५ ला ऑस्ट्रेलियातील विश्वचषकात रोहीतला नाबाद देताच बांगलादेश संघाने बरीच आदळआपट केली होती. एवढेच नव्हे तर यानंतर बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंचे अपमानास्पद होर्डींग्ज पण जागोजागी लावले होते. धोनीचे शीर हातात घेऊन असलेला वेगवान गोलंदाज टस्कीन अहमदचे होर्डींग्ज हे तर त्यांच्या निचपणाचा कळस होता. शिवाय भारतीय पाठीराख्यांना मारहाण पण करण्यात आली होती.

२०१८, श्रीलंका इथल्या निडहास चषकात बांगलादेश संघाचा हिडीसपणा अवघ्या जगाच्या नजरेखालून गेला होता. लंकेविरूद्ध भर सामन्यात पंचांविरुद्ध राडा करणे असो की नागीन डान्स करणे असो. बरे झाले अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने धुंवाधार फलंदाजी करत या नागीनला ठेचून काढले होते. जय पराजयाच्या आडून आपला उर्मटपणा आणि बेशिस्तीमुळे हा संघ नेहमीच खेळभावनेचा अनादर करत राहीला आहे. मग ते मुस्तफिजूर रहमानने धोनी आणि भारतीय संघाची खिल्ली उडवणे असो की ज्युनिअर विश्वचषकात भारतीय खेळाडूंच्या अंगावर धावून जाणे असो. नुकत्याच झालेल्या ढाका प्रिमीअम लिगमध्ये आयसीसी टॉप रॅंकींगच्या शाकीब अल हसनने मनाविरुद्ध निकाल मिळताच स्टंपला लात मारणे, पंचांना शिविगाळ करण्याचा अधमपणा केला होता.

वास्तविकत: तुम्ही किती गुणवंत आहात, किती डिग्र्यांचे भेंडोळे तुमच्याकडे आहे, मैदानावर किती कौशल्य दाखविता, जोपर्यंत तुमच्या कामगिरीला विनयाची जोड नाही तोपर्यंत सगळे मातीमोल आहे. "विद्या विनयेन शोभते" म्हणतात ते याचकरीता. याबाबतीत सचिन, द्रविड आणि लक्ष्मण हे आदर्शाचे मुर्तिमंत उदाहरण आहेत. २०१८ ला रशियातल्या फिफा फुटबॉल विश्वचषकात जेतेपद जरी फ्रांस संघाने जिंकले असले तरी जपान संघाने सर्वांची मने जिंकली होती. जपानचा संघ असो की त्यांचे पाठीराखे असो, आपली सभ्य वर्तनुक,आपले वास्तव्याचे ठिकाण आणि सामन्यानंतर मैदानात त्यांनी स्वच्छता मोहीम राबवून इतरांना सामाजिक आदर्श वर्तनुकीचा परिपाठ दिला होता.

बांगलादेश समोर स्कॉटलंड हा लिंबुटींबू संघ होता. स्कॉटलंड संघाची केवळ जर्सी सुंदर आहे म्हणून त्या संघाला हसण्यावरती नेण्यात आले होते. मात्र स्कॉटिश संघ आपल्या ध्येयाप्रती समर्पित होता. प्रथम फलंदाजी करतांना उण्यापुऱ्या पन्नास धावांत अर्धा संघ गारद झाला होता. तरीपण ख्रीस ग्रीव ने हार न मानता ४५ धावांची तडाखेबंद खेळी करत संघाला सम्मानजनक स्थितीत पोहचवले होते. बांगलादेशची फलंदाजी पाहता दिडशेच्या आतील आव्हान त्यांच्यासाठी अशक्य असे नव्हतेच. मात्र स्कॉटिश संघाचा जबरदस्त फिटनेस, धारदार गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापुढे बांगलादेश संघ ढेपाळला. "युं गए और युं आए" करत त्यांच्या फलंदाजांनी केवळ सहा धावांसाठी स्कॉटलंड समोर शरणागती पत्करली. "शिकारी खुद यहाँ शिकार" झाला होता. स्कॉटीश युनीकॉर्नसमोर बांगलादेशी वाघ गळपटला होता.

सामना संपताच दुनिया गोल आहे, इथल्या कर्माची फळं इथेच भोगावी लागतात याचा प्रत्यय आला. बांगलादेश कर्णधार महमदुल्लाह पत्रपरिषदेत बोलत असतांनाच स्कॉटिश संघ आनंदाने बेभान झाला होता. त्यांच्या जल्लोषात महमदुल्लाहला आपले बोलणे चक्क २० सेकंदांसाठी थांबवावे लागले. समाधानाची बाब म्हणजे बांगलादेश कर्णधाराने यावेळी कमालीचा संयम दाखवला. मात्र "खट्याळ स्कॉटलंड संघाने नाठाळ बांगलादेश संघाला" चांगलाच कडू डोझ पाजला होता. झालेल्या प्रकरणी क्रिकेट स्कॉटलंड ने पुढच्यावेळी आवाज, जल्लोष कमी राहील याची प्रांजळपणे कबूली दिली आहे.

एक मात्र खरे एखाद्या विजयाने स्कॉटिश संघ काबील होत नाही किंवा अनपेक्षित पराभवाने बांगलादेश संघ ना काबील होतो असेही नाही. जवळपास चौदा वर्षापुर्वी भारतीय संघाची काबीलीयत काढणाऱ्या हबीबुल बशरला ताज्या स्कॉटिश तडक्याने नक्कीच ठसका लागला असणार. हिच बाब नेमकी बांगलादेशी संघ आणि त्यांच्या उतावळ्या पाठीराख्यांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. प्रतिस्पर्धी संघाचा,खेळाचा सन्मान करणे बांगलादेशी संघाला शिकावे लागेल. अन्यथा स्कॉटिश संघासारखे नवोदित कधी त्यांचा बॅंड वाजवून चालले जातील हे त्यांना कळणार सुद्धा नाही. काबील, ना काबील च्या भानगडीत न पडता जो संघ चांगले प्रदर्शन करील तोच संघ विजयी होईल यावर विश्वास ठेवाला लागेल. मैदानावर खेळाडू आणि मैदानाबाहेर त्यांच्या चाहत्यांनी संयम दाखवणे त्यांच्या प्रतिमेसाठी अत्यंत जरुरी आहे.
************************************
दि. १९ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Tuesday, October 12, 2021

आर्यन बन गया जंटलमॅन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *अगंबाई अरेच्चा*
          *आर्यन बन गया जंटलमॅन*
*************************************
०२ ऑक्टोबर, खरेतर हा दिवस ड्राय डे असतो मात्र यावर्षी हा दिवस ड्रग्जच्या एका अप्रिय घटनेचा साक्षीदार ठरला. झाले काय तर बॉलिवूडचा बादशाह असलेल्या शाहरुखचा पुत्र अमली पदार्थांच्या जाळ्यात फसला आणि देशभरात एकदम हायतौबाचे वातावरण तयार झाले. मुख्य म्हणजे यात मौका मौका करणारी बॉलिवूडची खानावळ आणि त्यांची पिलावळ यांची अवस्था पाहण्यासारखी होती. शाहरुख म्हणजे जणुकाही नैतिकता, आध्यात्म, आदर्शाचा अमर्त्य पुतळा असून जर तो चुकू शकत नाही तर त्याच्या राजपुत्राला भारतीय कायदेकानून कसे काय लागू होतात यासाठी काहींनी जिवाचा आटापिटा सुरू केला. मग तो बिईंग ह्युमन असलेला सलमान असो की खलनायक संजय दत्त असो अथवा ३७० छाप मेहबूबा मुफ्ती असो.

खरेतर यात केवळ आर्यन खान नव्हे तर डझनभर नशेबाज पकडले गेले. मात्र कानून के लंबे हात गुन्हेगारांपर्यंत पोहोचताच नेहमीप्रमाणे जातपातधर्माची भुताटकी कबरीतून बाहेर आली. काय म्हणे तर आर्यन निर्दोष असून त्याला त्याच्या धर्मामुळे गुंतवण्यात आले. काय म्हणावे या अधम पणाला. आर्यनच्या धर्मासाठी टाहो फोडणाऱ्यांनी अटकेत असलेले इतर दोषी धर्म पाहून अडकले की गुन्ह्यामुळे अडकले यावर विचार करायला पाहिजे. पापं करतांना, मस्तीत हुंदडतांना कानूनकायदे पायदळी तुडवायचे आणि बेड्या पडताच धर्माची आठवण कशी काय होते? आर्यनचे पाय पाळण्यात असतांनाच शाहरुखने एका मुलाखतीत माझ्या मुलाने उलाला उलाला करावे, बिनधास्त जगावे सारखी मुक्ताफळे उधळली होती. मात्र हिच अधर्माची उधळी स्वतःचे घर पोखरायला लागली तर मिरची का झोंबली असावी ?

अर्थातच आपण बॉलिवूडचे बादशाह आहोत, आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही या गुर्मीत किंग खान होता. मात्र कायद्याच्या दृष्टीने बडे मियां असो की छोटे मियां असो, गुन्हेगार तो गुन्हेगारच असणार आणि झालेही तसेच. वास्तविकत: धर्माचा बागुलबुवा उभा करून नामानिराळे राहण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मुलं पालकांचं अनुकरण करतात. पालक काय सांगतात यापेक्षा पालक कसं वागतात याचा प्रभाव मुलांवर जास्त पडत असतो. ज्या वयात आपल्या मुलांवर योग्य संस्कार करावे, त्या वयात शाहरुखने आपली मध्ययुगीन जनानखानी मानसिकता आर्यनबाबत बोलून दाखवली होती. मग जे पेराल तेच उगवले तर इतकी आदळआपट करण्यात काय फायदा?

चिड या गोष्टीची येते की एका अपराध्याला सावरण्यासाठी बॉलिवूड आणि इतरही फुटकळ नेते आपली ताकद का खर्च करत आहे? नवाब मलिकांसारखे नेते तर चक्क एनसिबीच्या कारवाई वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र भक्कम पुरावे असल्याशिवाय एवढी धडक कारवाई शक्य नाही. आता तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. निश्चितच एक पिता म्हणून शाहरुखचे दुःख शाहरुखलाच माहीत असणार. मात्र आपल्या लाडक्यासाठी मन्नत ते जन्नत चा जो मार्ग त्याने निवडला तो व्हाया एनसिबी कोठडीतून जातो हे एव्हाना त्याला कळून चुकले असेल. शिवाय यापुढे धर्माची ढाल घेऊन कायद्याला वाकुल्या दाखवता येणार नाही हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. एवढेच कशाला धर्माचा फाजिल उदोउदो केला तर अमेरिकेत विमानतळावर उबडे करून घुबडे ठेचण्यात येतात हे शाहरुखशिवाय आणखी कोणी चांगल्या प्रकारे सांगू शकणार नाही.

शाहरुखने आर्यनला जी शिकवणी दिली ते पाहता "बापू सेहतके लिये तू तो हानिकारक है" असे आर्यन नक्कीच म्हणत असणार. आर्यन बेटा तुला भाटमंडळी जरी जंटलमॅन ठरविण्याचा प्रयत्न करत असतील तरी तुझे निर्दोष असणे एक 'चमत्कार' ठरेल. 'किंग अंकल'चा तू 'रईस' बेटा असल्याने बहुदा 'चलते चलते' या कटकटीतून बाहेर पडशील. मात्र बाजीगरचा जमाना दिवाना आहे, तुला स्वदेश असो की परदेश, आपल्या कृत्याबद्दल कभी खुशी कभी गम वाटणारच. यापुढे ड्रग्जचे नाव काढले तरी जोश मध्ये येऊ नको. कॉर्डेलिया असो की चेन्नई एक्सप्रेस, तू दिल से ड्रग्जला नकार दे. भलेही तुझे मन कभी हां कभी ना म्हणेल, मात्र आजची तुझी अवस्था दिल तो पागल है सारखी झाली आहे.

कदाचित तुला अटक होताच कित्येकांनी मै हूं ना म्हणून धीर दिला असेल परंतु हे डुप्लीकेट लोक प्रकरण अंगावर येताच वन टू का फोर झाले असणार. अर्थातच या दैन्यावस्थेत तू आणि तुझे कुटुंबीय कितीही ओम शांती ओम म्हणत असतील तरी जब तक है जान पर्यंत हे ड्रग्जचे लचांड तुझी पाठ सोडणार नाही. भलेही शाहरुखचे दिलवाले फॅन त्याच्यावर कितीही मोहोब्बते करत असतील तरी दिलवाले ड्रग्ज ले जायेंगे हे ना डॉन ला पसंत आहे ना बिल्लू बार्बरला. राम जाने तुझे हे नष्टचर्य केंव्हा संपेल परंतु कल हो ना हो तू यातून जरूर बाहेर पडशील. खरोखरच तुझ्या पालकांनी तुला योग्य वळण लावले असते तर आज तुरुंगात पालक भात खायची वेळ तुझ्यावर आली नसती. तुला अटक झाली आणि ड्रग्जची भयानकता जनतेसमोर आली अन्यथा या विषवल्ली ने घर घरसे आर्यन निकलेगा अशी स्थिती निर्माण झाली असती.

शेवटी काय तर तुझ्या कृत्याचा काय अंजाम होईल हे कळण्याइतपत तुझं वय नक्कीच होतं. मात्र माय नेम इज खान ने त्यावर पांघरूण घातले होते. तरी पण तुझ्या साठी डिअर जिंदगी आजही हात पसरून उभी आहे. तुझ्या सारखे कित्येक करण अर्जून यात लिप्त आहेत. मात्र आयुष्याचा कोयला करण्यापेक्षा आलेल्या संकटाला यस बॉस म्हणून तू सामोरे जा. झालेल्या चुका टाळून तुझ्या आयुष्यात हॅपी न्यू इयर नक्कीच येईल. तोवर रिल लाईफ आणि रिअल लाईफ यातला फरक तू समजून घे. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, मात्र यातून सावरत, सुधरत तू फिर भी दिल है हिंदुस्तानी जरूर दाखवू शकतो. शाहरुखच्या राजूप्रमाणे, आर्यन तू सुद्धा जंटलमॅन बनू शकतो.
*************************************
दि. १२ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

Saturday, October 9, 2021

मुंबई इंडियन्स चे वरातीमागून घोडे

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                *अगंबाई अरेच्चा*
    *मुंबई इंडियन्स चे वरातीमागून घोडे*
***********************************
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्रीयुत शरद पवार यांनी महिनाभरापूर्वी कांग्रेस बाबत एक सुचक आणि खोचक विधान केले होते. त्यांच्यानूसार इंडीयन नॅशनल काँग्रेसची अवस्था म्हणजे रया गेलेल्या हवेलीच्या जमिनदारासारखी आहे. अगदी अशीच स्थिती मुंबई इंडियन्स संघाची झाली आहे. कधीकाळी आयपीएल मध्ये दबदबा आणि ग्लॅमरस असलेला हा संघ यावेळी प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झालेला आहे. तब्बल पाचवेळा आयपीएल चषक आपल्या नावे करणाऱ्या या संघाला या मौसमात लिंबूटिंबू संघांनी पाणी पाजत स्पर्धेबाहेर केले आहे. अर्थातच साखळी स्पर्धेच्या अंतिम लढतीत मुंबई संघाला प्लेऑफ साठी शेवटची संधी होती. मात्र तिथे पण नेट रन रेट ने त्यांची "अटकली खुटी तर जाशील कुठी" अशी अवस्था केल्याने चारमिनार एक्स्प्रेसने मुंबईची गाडी रुळावरून घसरवून टाकली.

खरेतर मुंबईचा संघ पोलार्ड सारखा मस्कूलर, पांड्या बंधूंसारखा पॉप्युलर, रोहीत प्रमाणे स्पेक्टॅक्युलर आहे. सोबतच ईशान सारखा बॅचलर असून क्रिकेट फॅन्समध्ये मुंबई इंडियन्सची प्रचंड क्रेझ आहे. दिमतीला बोल्ट, बुमराहची तेज गाडी पण आहे.  मात्र एवढे असूनही मुंबई इंडियन्सची "पप्पू कान्ट डांस साला" अशीच परिस्थिती झाली आहे. वास्तविकत: टी ट्वेंटी विश्वचषकात मुंबई इंडियन्सच्या जवळपास सहा खेळाडूंची निवड झाली आहे. यात गुणवत्ता,फॉर्म, फिजीकल फिटनेस हे निषक निवडीकरता वापरले गेले म्हणणे धाडसाचे ठरेल. इतर गुणी खेळाडूंना वगळून निवड समितीने मुंबई संघावर जी मेहेर नजर दाखवली ते पाहता "घोडे खांऐ घांस, गधे खांऐ च्यवनप्राश" असे म्हणावेसे वाटते.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विश्वचषकात निवड होताच मुंबई संघात शैथिल्यता उत्पन्न झाली. मग आयपीएल चषकाचे कितीही शिलाजीत वापरले तरी खेळाडूंच्या डोक्यात भरलेले वारे काही केल्या कमी झाले नाही. सोबतच आयपीएलच्या काजव्यांची वर्ल्ड क्लास क्रिकेट सूर्यांशी तुलना केली गेल्याने होत्याचे नव्हते झाले. पांड्या बंधू, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव मध्यंतरी आपली लय गमावून बसले. त्यामुळे वर फलंदाजीत रोहीत आणि खाली गोलंदाजीत बुमराह असुनही मुंबई संघ "उपरसे टामटूम अंदरसे रामजाने" झाला. क्लिंटन डिकॉक  आणि पोलार्डची कामगिरी कभी खुशी कभी गम सारखी होती. एकंदरीत काय तर आयपीएलच्या उत्तरार्धात मुंबई संघाची खिचडी शिजलीच नाही.

जशी प्लेऑफची शर्यत रंगात आली आणि मुंबईच्या नाकातोंडाशी पाणी आले, रोहीत चे झोपी गेलेले शिलेदार खडबडून जागे झाले. अंतिम साखळी लढतीत ईशान किशन, सूर्यकूमारचे अश्व चौखूर उधळले, मात्र ते वरातीमागून घोडे ठरले. सर्वात जास्त निराशा पांड्या बंधूंनी केली. "आज करून आलो" यापेक्षा आज खेळून आलो यावर या दोघांनी जास्त लक्ष दिले असते तर मुंबई संघावर ही नामुष्की आली नसती. हे दोघेही खेळण्यासाठी मैदानावर येतात की दिसण्यासाठी मैदानावर येतात हेच कळायला मार्ग नाही. हे दोघेही खेळाडू मुंबई संघासाठी खायला काळ आणि भुई ला भार ठरले आहे.

दरम्यान टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या वादाचे पडसाद रोहितच्या खेळावर दिसून आले. आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला रोहित या मौसमात भुले बिसरे गीत सारखा वावरत होता. निश्चितच याचा फटका संघप्रदर्शनाला बसला. शाहरूखचा आर्यन बाळ असो की रोहितचे सुस्तावलेले खेळाडू असो, फाजिल लाडाने दोन्ही कडे प्रचंड नुकसान झाले. पांड्या बंधू तर क्रिकेट ऐवजी दांडीया किंवा फॅशन शो मध्ये चांगले प्रदर्शन करू शकले असते. एक से बढकर एक खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ चिकाटी, लय, सातत्य राखण्यात कमी पडला. या संघातील बहुतेक खेळाडूंचा "तोरा विराट सारखा होता मात्र कामगिरीत ते वाजले की बारा" ठरले.

प्लेऑफच्या चार संघांनी मात्र वाखाणण्याजोगी कामगिरी केली. कच्चा निंबू म्हणून हिनवल्या गेलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अक्षरशः डोळे दिपवून टाकणारी कामगिरी केली. सोबतच "हर छोटा एकदिन बडा होता है" हे आपल्या खेळाने दाखवून दिले. माहीचा चेन्नई संघ अजुनी यौवनात मी प्रमाणे वागत आहे. वयाला चकवा देत धोनीचे यष्टीरक्षण आणि नेतृत्व दिवसेंदिवस बहरत आहे. धोनी भले ही फलंदाजीत कोणत्याही संघाच्या अकराव्या खेळाडू सारखा फलंदाजी करतो मात्र त्याचे क्रिकेटींग ब्रेन कोणत्याही सामन्याला कलाटणी जरुर देऊ शकते.

कोलकाता संघ आपल्या वैविध्यपूर्ण फलंदाजी आणि गोलंदाजीने नटला आहे. त्यातच आंद्रे रसेल नावाचा सुप्त ज्वालामुखी जागृत झाल्याने तो इतर संघाना भाजण्यास उत्सुक असेल. "नाव मोठं लक्षण खोटं" म्हणून नावाजलेल्या विराटच्या संघाने यावेळी प्रचंड मुसंडी मारत प्लेऑफला तिसरे स्थान पटकावले आहे. आरसीबी चा संघ "लांडगा आला रे आला" म्हणून ख्याती प्राप्त आहे. मात्र कोहलीच्या संघात यावेळी ग्लेन मॅक्सवेल नावाचा विराट योद्धा सामिल झाल्याने आरसीबी संघाला हलक्यात घेण्याची चूक कोणताही संघ करणार नाही.

यंदाच्या आयपीएल हंगामात काही गुणवंत खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने चाहत्यांना मोहित केले आहे. विशेषतः चेन्नईचा ऋतूराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, वरूण चक्रवर्ती, आवेश खान, अर्शदिपसिंग, व्यंकटेश अय्यर आणि तुफानी गोलंदाज उमरान मलिकने मैदानावर आपला ठसा उमटवला आहे. अर्थातच या गुणवंतांनी मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या कामगिरीत सातत्य राखले तर टीम इंडियाचे दरवाजे त्यांच्यासाठी नक्कीच उघडू शकतात. मात्र याकरीता त्यांना "आयपीएल ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट यात असणारी दरी" समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
************************************
दि. ०९ ऑक्टोबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Thursday, October 7, 2021

स्वादिष्ट प्रेते, संधीसाधू नेते

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
          *स्वादिष्ट प्रेते, संधीसाधू नेते*
              *डॉ अनिल पावशेकर*
************************************
सध्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हे स्थळ प्रेत पर्यटकांनी गजबजून गेले आहे. झाडून पुसून अडगळीत गेलेले नेते आणि त्यांची पिलावळ लखीमपूर खीरीला प्रेताच्या खीरीसाठी जीवाचा आटापिटा करत आहेत. अर्थातच यात या संधीसाधूंना मृतांविषयी किती आत्मीयता आहे किंवा किती कळवळा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मात्र यानिमित्ताने का होईना उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा तसेच २०२४ च्या लोकसभा प्रेत मार्गाने सर करण्याचा विरोधकांनी चंग बांधला आहे.

झाले काय तर गेल्या रविवारी म्हणजेच चार ऑक्टोबरला शेतकरी आंदोलनादरम्यान भाजप नेत्याच्या कार ने चार शेतकऱ्यांना चिरडल्याचे दृश्य आहे. यातून उफाळलेल्या हिंसाचारात एका पत्रकारासह ड्रायव्हर आणि दोन भाजप कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना चिरडल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे तर आंदोलकांनी भाजप नेत्यांच्या कारवर हल्ला केल्याने परिस्थिती चिघळली असा दावा भाजप नेते करत आहे. अर्थातच पोलिस तपासात यात काय खरे काय खोटे याचा उलगडा नक्कीच होईल मात्र या दुर्घटनेत आठ बळी गेले हे विसरता येणार नाही.

या दुर्दैवी घटनेनंतर लगेचच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी उच्चस्तरीय चौकशी,कारवाईचे आदेश दिले. मात्र कित्येक दिवसांनी हातातोंडाशी आलेला हा मुद्दा विरोधक कसे काय सोडतील? मग लगेचच विरोधकांनी कंबर कसली आणि कबरीतील प्रेतांचे राजकारण सुरू केले. जगबुडी झाल्यासारखे संधीसाधू नेते लखीमपूरला धावू लागले. मग ते पंजाबचे, छत्तीसगड चे मुख्यमंत्री असो की नेहमीची प्रेतजीवी टोळी असो. तिकडे पंजाब छत्तीसगढचा तमाशा सोडून हे दोन्ही मुख्यमंत्री ज्याप्रकारे उत्तर प्रदेशात नाक खुपसून राहिले ते पाहता आपले ठेवावे झाकून दुसऱ्याचे पाहावे वाकून असे म्हणावेसे वाटते.

उत्तर प्रदेशातील वातावरण गरम होताच महाराष्ट्रातील कोमट सरकारला आश्चर्यकारक पणे अचानक उकळ्या फुटू लागल्या आहेत. ज्यांचे हात ११३ गोवारी हत्याकांडात गुंतलेले आहेत, मावळ गोळीबारात जे सामिल आहेत त्यांना चक्क जालीयनवाला बाग ची आठवण यावी यापेक्षा विनोद कोणता असणार. एवढेच कशाला महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधुसंतांचा पोलिसांदेखत मुडदा पाडला गेला. मात्र तिथे हे प्रेतपर्यटक दिसले नाहीत. दुर्देवाने पालघर उत्तर प्रदेशात नाही अन्यथा त्या साधुसंतांना प्रेत पर्यटकांचा सहारा मिळाला असता. महाराष्ट्रात महिला अत्याचार असो अथवा नैसर्गिक आपत्तीचा ओला दुष्काळ असो, राज्यकर्त्यांना आपल्या राज्यातील समस्येपेक्षा उत्तर प्रदेशातील घटनेने स्वप्नदोष का होत आहे ही चिंतेची बाब आहे. सोबतच बंगालमधील सरकार प्रायोजित हिंसाचार निमुटपणे बघणारी उपरोक्त तिन्ही सरकारे लखीमपूर प्रसंगी एवढी उतावीळ का झाली आहे हे न कळण्याइतपत जनता दुधखुळी नक्कीच नाही आहे. 

दुर्देवाने भाजप राज्यातील प्रेते मग ते कोरोना काळातील असो वा अन्य अप्रिय घटनांतील असो,, प्रेत पर्यटकांना ते इतके स्वादिष्ट का लागतात हा संशोधनाचा विषय आहे.निश्चितच अशा दुटप्पी वागण्याने या संधीसाधू नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. या राजकीय पर्यटकांना दुर्घटनेतून सत्तेकडे जाण्याचा प्रेतमार्ग शोधायचा आहे. या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना सजा व्हायलाच हवी यात दुमत नाही. मात्र आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी सध्या उत्तर प्रदेशात जी संधीसाधू नेत्यांची भाऊगर्दी झाली आहे ते योग्य नव्हे. बरे झाले योगींनी या टाईमपास नेत्यांच्या वेळीच मुसक्या आवळल्या अन्यथा यांनी आणखी पेटवापेटवी करत आपल्या राजकीय स्वार्थासाठी उत्तर प्रदेशात धुमाकूळ घातला असता.
************************************
दि. ०७ ऑक्टोबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...