#@😈😈😈😈😈😈😈😈@#
*ताश्कंद फाईल्स, अंतिम भाग*
*डॅा अनिल पावशेकर*
—————————————————
ताश्कंद म्हटले की आपल्या मनात चटकन विचार येतो भारताचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांचा. याच शहरात शास्त्रीजींचा दुर्दैवी, गुढ म्रुत्यू झाला होता. सध्या सेंट्रल पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, ताश्कंद इथे शास्त्रीजींचा अर्धाक्रुती पुतळा असून याद्वारे त्यांच्या स्म्रुती जतन केल्या गेल्या आहेत, त्यांना आदरांजली दिली गेली आहे. या घटनेची पार्श्वभूमी सांगायची झाली तर अॅागस्ट, सप्टेंबर १९६५ ला भारत पाक युद्धाला तोंड फुटले होते आणि यांत आपली सरशी होत असतांना पाकिस्तानने इतर देशांच्या मध्यस्थीने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता.
तत्कालीन सोवीयत प्रमुख अॅलेक्सी कोसिजीन यांनी पुढाकार घेत भारताचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी आणि पाक राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांच्यात ताश्कंद करार घडवून आणला. ४ ते १० जानेवारी १९६६ दरम्यान झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि सोवीयतचे वरिष्ठ प्रतिनिधी सामील झाले होते. १० जानेवारीला या कराराला मुर्तरूप प्राप्त झाले. ९ कलमी या करारावर शास्त्रीजी आणि अयूब खान यांनी स्वाक्षरी केल्या. यानुसार युद्धबंदी स्थापीत होऊन दोन्ही देशांनी एकमेकांचे बळकावलेल्या प्रदेशावर हक्क सोडून देणे, १९४९ साली नक्की केलेल्या युद्धबंदी रेषेपर्यंत माघार घेणे, आर्थिक संबंध, वाणिज्य व्यापार वाढविणे यासह अनेक मुद्यांवर सहमती करण्यात आली. मात्र दुर्दैवी बाब म्हणजे या कराराच्या दुसर्याच दिवशी शास्त्रीजींचा ह्रदयविकाराच्या झटक्याने म्रुत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
ताश्कंद शहरातील एक पाहण्याजोगे स्थळ म्हणजे टिव्ही टॅावर. जगातील बाराव्या क्रमांकाचे ऊंच असलेल्या या टॅावरची ऊंची ३७५ मीटर एवढी आहे. १९८७ ला निर्मित आणि व्हर्टीकल कॅंटीलिवर स्ट्रक्चर असलेला हा टॅावर टिव्ही, रेडिओ सिग्नल प्रक्षेपणासाठी उभारण्यात आला होता. सोबतच कॅाम्प्लेक्स हाइड्रो मिटीओरॅालॅाजीकल स्टेशन म्हणून आणि सरकारी विभाग, इतर संस्थांच्या संवादासाठी याचा उपयोग केला जातो. सहाव्या मजल्यावर प्रेक्षक गॅलरी आहे, ज्यातून ताश्कंद शहराचे दर्शन होते. तर आठव्या मजल्यावर रिव्हॅाल्हींग रेस्टॅारंट आहे. या टॅावरवर चढण्या उतरण्यासाठी तीन लिफ्ट, एलिव्हेटर्स आहेत. या टॅावरच्या प्रांगणात अनेक देशांच्या टिव्ही टॅावरच्या प्रतिक्रुती ठेवलेल्या आहेत.
याशिवाय इथे फिरण्यासाठी युद्ध संग्रहालय आणि मॅजीक सिटी पार्क पण आहे. दुसर्या विश्व युद्धावर आधारीत हे संग्रहालय १५ हेक्टर जागेवर बांधले गेले आहे. यांत इनडोअर, आऊटडोअर असे दोन विभाग असून इनडोअरला युद्धासंबंधी माहिती, शस्त्रे, तत्कालीन युद्धसामुग्री, युद्धात कामी आलेल्या सैनिकांची नावे, नाझींकडून जप्त केलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन मांडले आहे. तर आऊटडोअरला सैनिकांची विजयी मुद्रेतील पुतळे आहेत. भिंतींवर युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत. मात्र याला व्हियतनामच्या वॅार मेमेरीयलची सर येत नाही. मॅजीक सिटी पार्क म्हणजे जणुकाही मिनी डिसनेलॅंड. रंगबिरंगी फाऊंटेन आणि लाईटींगने हा परिसर झळाळून निघतो. बच्चेकंपनी साठी फूल टू धमाल असलेला हा पार्क संध्याकाळी प्रेक्षक, पर्यटकांनी गजबजून जातो.
ताश्कंद प्रवासा निमित्त काही व्यक्तींची ओळखपाळख झाली, मानवी स्वभावाचे विविध रंग अनुभवास आले, त्यापैकी काही निवडक व्यक्ती आणि वल्लींचा थोडक्यात परिचय. टूर गाईड आयना, तिशीतली ही वल्ली टुरीझमचा कोर्स केलेली, शरिराने, दिसण्यात एकदम भारीभक्कम. त्यामानाने स्वभावाने हलकीफुलकी, इंग्रजीची उत्तम जाण असलेली, सदैव हिंदी गाणी गुणगुणायची, हसतमुख जणुकाही सदाफुली. बरेचदा तिला हिंदी, मराठी कळायचे नाही परंतु मथितार्थ लगेच जाणून तिची प्रतिक्रिया द्यायची. खाण्यात, फिरण्यात नंबर एक असलेली एक दोनदा भारत भ्रमणावर आली होती. मुंबई, दिल्ली हे तिचे आवडते शहर.
दुसर्या दिवसाचा गाईड, युवा नईम पंचविशीतला. नोकरी नसल्याने गाईड चे काम करणारा मात्र कामात एकदम चोख आणि प्रामाणिक तसेच कुटुंबवत्सल. तर समरकंदचा गाईड कमील अत्यंत उत्साही, कर्तव्यतत्पर, समरकंदची खडा न खडा माहिती असलेला. भाषा शास्त्रात प्राविण्य मिळवलेल्या कमीलला उज्बेक, रशियन, इंग्रजी आणि स्पॅनिश भाषा अवगत होत्या. आमचा ड्रायव्हर फय्याज म्हणजे अबोल प्राणी, बहुदा फक्त जेवणासाठी तोंड उघडणारा. जेवढं विचारलं तेवढंच बोलणार, कामाशी काम ठेवणारा. गाडीतला एसी बंद पडला की तो एसी पॅनलवर बुक्की मारून चालू करायचा, नाहीच जमले तर चाकूने पॅनल उघडून रोटेटर फिरवायचा. अर्थातच तो हे काम रोज करायचा मात्र पठ्याने शेवटपर्यंत एसी सुधरवला नव्हता. एसी बंद पडला की आम्ही चाकू चाकू म्हटलं की तो समजून जायचा की एसी बंद पडला म्हणून आणि चाकू घेऊन कामाला लागायचा.
ताश्कंद प्रवासाची आखणी आणि नियोजन करण्यात ग्लोबल ट्रॅव्हल्स पुणे चे अल्ताफ सर आणि आमचे सहकारी निलेश नेमाडे आघाडीवर होते. मग ते विमानाचे तिकीट बुकिंग असो की व्हिसा असो अथवा मनी एक्सचेंज. तर कधी हॅाटेल बदलवणे असो. या दोघांनीही अहर्निश सेवामहेचे व्रत घेतले होते. निलेश नेमाडे ही वल्ली २५ च्या वर देशाला गवसणी घातलेली, त्यामुळे विदेशी प्रवासाचा भक्कम अनुभव, चतूर, त्यातही प्रचंड उत्साही. नाही हा शब्द त्याच्या डिक्शनरीत नाहीच. कधीही विचारावे हाऊझ दी जोश? तर उत्तर असायचे, व्हेरी हाय सर. एखादा कठीण प्रसंग असो की अडीअडचण अल्ताफ सर आणि निलेशची जोडी संकटमोचक म्हणून हजर झालीच समजा.
थोडक्यात काय तर उज्बेकिस्तानला कोणी जावे तर ज्याला पर्यटनाची आवड आहे, इतिहास, युद्ध यांत विशेष रूची आहे. पर्यटनाने नवनवीन देश, लोक, संस्क्रुतीची ओळख होते. अनुभवाने मन प्रगल्भ होते, विचार करण्याच्या कक्षा रूंदावतात. परदेशातील वाहतूक व्यवस्था, सोशल सेन्स काय असते याचे दर्शन घडते. सामान्य ज्ञानात वाढ होते. मात्र याकरिता थोडा खिसा जरूर हलका करावा लागतो. सहा दिवस पाच रात्रीच्या या प्रवासाला आम्हाला अंदाजे प्रत्येकी सव्वा लाख रू इतका खर्च आला. मात्र कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, हे ओघाने आलेच. जाता जाता एवढेच म्हणता येईल,,
सैर कर दुनिया की गालिब, फिर ये जिंदगानी कहां!
जिंदगी भी रही, तो ये नौजवानी कहां!
ताश्कंद प्रवास वर्णन समाप्त. धन्यवाद!
—————————————————
दिनांक ३० मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++