Friday, April 21, 2023

मृत्यूचे उन्हाळी सापळे

@#👿👿👿👿👿👿👿👿#@
             *मृत्यूचे उन्हाळी सापळे*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार ओळखला जातो. १९९५ ला भाजप सेना युती सरकारने याची मुहुर्तमेढ रोवली होती. दरवर्षी साहित्य, कला,खेळ, विज्ञान यासोबतच सामाजिक कार्य, पत्रकारिता, लोक प्रशासन आणि स्वास्थ्य सेवा या क्षेत्रात उत्कृष्ट वैयक्तिक उपलब्धीसाठी हा पुरस्कार दिला जातो. १९९६ ला सर्वात प्रथम हा पुरस्कार पु.लं. देशपांडे यांना देण्यात आला होता. यावर्षी हा पुरस्कार सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल श्रीयुत अप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. मात्र यावेळी या पुरस्कार प्रदान सोहळ्यात १४ श्रीसाधकांच्या दुर्दैवी मृत्युने गालबोट लागले असून सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या निष्पाप नागरिकांच्या बळींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

झाले काय तर सध्या सगळीकडे भव्य दिव्यतेची चढाओढ लागली आहे. एखादा कार्यक्रम किती मोठा, किती गर्दीचा यावरुन त्याच्या यशाचे मोजमाप ठरू लागले आहे. प्रत्येक कार्यक्रमाचा जणुकाही इव्हेंट करून टाकला आहे. मग ते मंत्र्यासंत्र्यांचे शपथविधी असो की सरकार स्थापन करणे असो अथवा एखादा पुरस्कार सोहळा असो. खरेतर भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न हा पुरस्कार राष्ट्रपती भवनात मोजक्या निमंत्रीत पाहुण्यांत पार पाडला जातो तर मग महाराष्ट्र भूषण सोहळा राजभवनात आयोजित केला असता तर काय बिघडले असते? सोबतच या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करून सर्वांना घरबसल्या पाहता आले असते. मात्र एवढ्या गर्दीचा अट्टाहास कशासाठी केला गेला हा चिंतेचा विषय आहे. या गर्दीने नक्की कोणावर इंप्रेशन मारायचे होते? अशी गर्दी जमवून नेमके काय साधायचे होते हा प्रश्नच आहे.

एकतर हा सोहळा ऐन एप्रिल महिन्यात आयोजित केला गेला आणि तो सुद्धा दुपारच्या वेळी. खरी गफलत इथेच झाली. जर सोहळा दुपारी करायचा होता तर त्यादृष्टीने इनडोअर स्टेडियम किंवा बंदीस्त सभागृह हा पर्याय योग्य ठरला असता. अथवा मोकळ्या मैदानातच जर घ्यायचा होता तर त्यादृष्टीने आयोजकांनी सोहळ्याची वेळ सकाळी अथवा सायंकाळची ठेवली असती तर पुढील अनर्थ टळला असता. शिवाय जर सोहळा दुपारी उशीरापर्यंत चालण्याची शक्यता होती तर मंडप, कनाती, कमानी, संरक्षक शेड,पंखे, कुलर आणि यासारख्या उन्हापासून संरक्षण देणाऱ्या इतरही बाबींची उपाययोजना करायला हवी होती.

अर्थातच आयोजकांनी त्यांच्यातर्फे येणाऱ्या लोकांसाठी ताक पाणी सरबत आणि खाद्यपदार्थांची सोय केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मृतांपैकी बारा जणांच्या पोटात सात तासांपासून अन्नाचा कण नसल्याचे, तसेच त्यांना पूर्वीचे काही गंभीर आजार असल्याचे वृत्त समोर येत आहे. खाण्यापिण्याचे सोडले तरीपण एप्रिलच्या उन्हाचे काय? सोहळ्याच्या परिसरातील एकंदर वातावरण म्हणजे 'जास्त तापमान, दमट हवामान' असल्याने ते किलर फॅक्टर ठरले. सतत तीन चार तास कडक उन्हात बसल्याने उष्माघाताने जी हानी झाली तिच पुढे चौदा बळी आणि जवळपास पन्नास व्यक्तींना रुग्णालयात भरती होण्यासाठी कारणीभूत ठरली. शिवाय त्यादिवशी अचानक तापमान वाढले ही सबब सुद्धा लंगडी ठरते. कारण एप्रिल म्हटले की कडक ऊन आलेच. नैसर्गिक कारणांना दोष देण्यापेक्षा, त्यापासून बचाव कसा करता येईल ही भुमिका घेतली असती तर निश्चितच हानी टळू शकली असती.

उष्माघाता बाबत सांगायचे झाले तर आपल्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअस असते. याच तापमानावर आपल्या शरीरातील विविध क्रिया पार पाडल्या जातात. बाहेरील तापमान वाढले तरी शरीराचे तापमान घामाद्वारे उष्णता विसर्जित करून कायम राखले जाते. मात्र या करीता सतत पाणी अथवा द्रवपदार्थ पिणे आवश्यक असते. पण तापमान सातत्याने वाढत गेले तर शरीरातील तापमान नियंत्रण प्रणालीत बिघाड होऊन त्याचे शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. त्वचा कोरडी, लालसर पडणे, रक्तदाब कमी होणे, मांसपेशी कडक होऊ लागणे, घाम येणे बंद होणे, महत्वाच्या अंगांना रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, विशेषतः मस्तिष्काला रक्तपुरवठा कमी होऊन व्यक्ती बेशुद्ध पडतो, महत्वाचे अंग निकामी होऊन मृत्यू ओढवतो.

निश्चितच ही घटना दुर्दैवी आहे मात्र थोडं ससंमजपणे या सोहळ्याचे नियोजन केले असते तर ही प्राणहानी नक्कीच टाळता आली असती. हा कार्यक्रम शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केल्याची बातमी आहे. खरेतर आता या घटनेची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्नच आहे.  मृत आणि जखमींना आर्थिक मदत केली म्हणजे आपले दायित्व संपले अशातला हा भाग नाही. समजा हीच घटना एखाद्या खाजगी समारंभात झाली असती तर किती गजहब उडाला असता? आतापर्यंत धरपकड होऊन संबंधित आयोजक गजाआड झाले असते, न्यायालयीन चौकशीचे आदेश निघाले असते. मात्र सध्या सर्वत्र शुकशुकाट आहे. सरकार दरबारी ही घटना म्हणजे जणुकाही न टाळता येणारी नैसर्गिक आपत्ती होती की काय अशी शंका येते. ना कुठे कोणी नैतिकतेसाठी राजीनामा देणार ना कोणी या कृत्यासाठी तुरूंगात जाणार. 

सध्यातरी एक सदस्यीय चौकशी आयोगाची नेमणूक केल्याची कळते. मात्र यातून काय निष्कर्ष येईल आणि त्यावर किती तत्परतेने कारवाई केली जाईल हे एक गौडबंगालच आहे. न्यायप्रक्रियेत वर्षानुवर्षे तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात ही गंभीर घटना रेंगाळत राहील आणि सगळे कालापरत्वे विसरूनही जातील. मात्र पीडितांच्या वेदनांचे काय? कोण त्यांना न्याय मिळवून देईल? कोण त्यांच्या जखमांवर फुंकर घालेल? प्राणांचे मोल लाखलाखांच्या आकड्यात अडकवून खरोखरच पिडीतांचे अश्रू पुसल्या जाईल काय? अर्थातच अशा प्रश्नांची उत्तरे मिळतील ही आपली भाबडी आशा आहे. लाखांच्या पुरस्कारासाठी कोट्यावधीची उधळण करून लाखमोलांचे निष्पाप प्राण गमावणे यापेक्षा दुर्दैव ते कोणते? शासनाने या दुर्दैवी घटनेतून धडा घेत  यापुढे अशा जंगी कार्यक्रमाबाबत काही स्पष्ट नियमावली आखणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत.

सरकार, आयोजक यापलीकडे जाऊन अशा घटनांचा अभ्यास केला तर अशा प्रचंड सोहळ्यात प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांनीही थोडे तारतम्य बाळगायला हवे. कोणाच्याही श्रद्धा, भक्तिभाव अथवा विश्वासाला तडा न देता काळवेळ पाहून आपण अशा भव्यदिव्य समारंभात सहभागी व्हायचे की नाही याचे आपण सर्वांनी भान ठेवायला हवे. विशेषत: लहान मुलं, स्त्रिया आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यायला हवी. त्यातही जर कोणाला ह्रदयरोग, मधुमेह अथवा इतर कोणतेही गंभीर आजार असल्यास अशा कार्यक्रमांना जाऊच नये. 

शेवटी काय तर आपले कुटुंब आपली जबाबदारी याचा विसर पडू देऊ नये. मृत्यू अटळ आहे परंतु अपघाती मृत्यू आणि मानवी चुकांमुळे, बेपर्वाईने, हलगर्जीपणाने, सुरक्षेकडे केलेल्या दुर्लक्षामुळे होणारे मृत्यू यात जमीन अस्मानचे अंतर आहे. योग्य खबरदारी आणि व्यवस्थित नियोजन करून हा सोहळा पार पाडला असता तर चौदा निष्पाप जीव प्राणास मुकले नसते. सर्वसामान्यांचे कल्याण आणि त्यांच्या जीवितांच्या रक्षणाचा वसा घेतलेल्या सरकार कडून हे अजिबात अपेक्षित नव्हते. आपल्याकडील उन्हाची तीव्रता पाहता असल्या जंगी सार्वजनिक कार्यक्रमांना सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत बंदी आणावी. जेणेकरून हे तप्त ऊन जनसामान्यांसाठी मृत्यूचे उन्हाळी सापळे ठरू नयेत.
*********************************
दि. २१ एप्रिल २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Friday, April 14, 2023

राधा क्यों गोरी, है क्यों काला


         राधा क्यों गोरी, मै क्युं काला
***********************************
भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर, २७ वर्षीय अभिनव मुकुंदने सध्या एक ट्विट करून आपल्या मनातली खदखद सर्वांसमोर मांडली आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने त्याच्यावर होणाऱ्या रंगभेदी टिप्पणी वरून समाजात, देशविदेशात होणाऱ्या या अन्यायाला वाचा फोडली आहे. सध्या जग झपाट्याने बदलत आहे, टेक्नॉलॉजीच्या प्रसार प्रचाराने भौगोलिक अंतर जरी कमी झालेले असले तरी मनामनातील वर्णद्वेष, रंगभेद आणि नस्लभेदाच्या भिंती किती मजबूत आहे हे या प्रकरणाने सिद्ध होते.

खरेतर त्वचेचा रंग पाहून कोणत्याही व्यक्तीचे मुल्यमापन करणे चुकीचे आहे. परंतु जगभरात त्वचेच्या वर्णावरुन जागोजागी भेदभाव केल्या जातो.   वास्तविकतः त्वचेचा रंग हा आजुबाजुचे वातावरण,  आनुवंशिकता आणि भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असतो. त्वचेत मेलॅनीन नामक रंगद्रव्याचे प्रमाण जितके जास्त तितकी त्वचा गडद रंगाची असणार. आपल्याकडे सुर्यप्रकाशाची तिव्रता पाहता गडद रंगाची त्वचा असणे सामान्य बाब आहे. गडद त्वचा ही सनबर्नपासून बचाव तर करतेच पण घातक स्किन कॅन्सरपासून सुरक्षा पण देते. मात्र गोऱ्यापान रंगाची भुताकटी आपल्या मानगुटीवर एवढी जबरदस्त बसली असते की ती सहजासहजी उतरायला तयार नसते. लग्न म्हटले की वधू हमखास गोरीच पाहिजे .जणुकाही गोरेपण म्हणजे यशाची हमखास गॅरन्टी... परंतु वास्तव काही वेगळेच असते. काळ्यासावळ्या रंगाला एवढे हिनवले जाते की त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासात प्रचंड कमी आलेली असते. 

चित्रपटसृष्टी अर्थातच बाॅलीवुडचा जनमानसावर चांगला पगडा असतो. दुर्दैवाने तिथेही याबाबतीत फारसे वेगळे चित्र दिसत नाही. बाॅलीवुडची हिरोइन तर गोरी चिट्टीच हवी. मात्र हेमामालिनी, रेखा, काजोल आदी अभिनेत्रींनी नृत्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःचे साम्राज्य उभे केले हे कसेकाय विसरता येईल. हिंदी सिनेगीतात गौरवर्णाचा उदोउदो जागोजागी आढळतो. किशोरकुमारचे गोरे रंगपे ना इतना गुमान कर असो की आत्ताचे जॅकलीन वर चित्रीत केलेले चिट्टीया कलाइया वे असो...  राधा क्यों गोरी मै क्युं काला हा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीरच होत आहे. बर ही मानसिकता आजची आहे असे नाही तर जुन्या काळीसुद्धा बाळाचा रंग पाहून हा कृष्णपक्षात जन्मला,,हा शुक्लपक्षात जन्मला असे टोमणे हमखास ऐकायला मिळायचे. 

काळ्या रंगाला, वर्णाला एवढे व्हिलन बनविल्या गेले आहे की एखादे वाईट काम, कृत्य अथवा घटनेला काळा रंग जोडा,,,जनमानस आपोआप त्या बाबीला अप्रिय समजणार. उदाहरणार्थ तोंड काळे करणे, काळे झेंडे दाखविणे,काळा दिवस पाळणे,अपशकुन टाळण्यासाठी काळया बाहुल्या दारात बांधणे, दृष्ट लागू नये म्हणून बाळाला काळा टिका लावणे इ. चिटपटांतील व्हिलन,डाकू किंवा असामाजिक तत्वांचा रंग कोणता असतो हे वेगळे सांगायची गरजच उरत नाही एवढे ते आपल्या मनात पक्के ठरलेले आहे. 

अर्थातच समाजाच्या या मानसिकतेचा व्यापारी कंपन्यांनी अचूक फायदा घेतला नसता तर नवलच असते. पी हळद नी हो गोरी च्या जमान्यात लोभसवाण्या आणि फसव्या जाहिरातींचे एवढे पिक आले की विचारु नका. सौंदर्यप्रसाधनांचा व्यापार कोटीच्या कोटींची उड्डाणे घेत आहे. एक महिन्यात गोरा करणाऱ्या फेअर अँन्ड लव्हली सारख्या फेअरनेस क्रिम तर ड्रेसिंग टेबलच्या अविभाज्य अंग झालेल्या आहे. स्त्रियांएवढे पुरुषांनाही गोरेपणाचे वेड काही कमी नाही म्हणूणच तर फेअरनेस क्रिम फाँर मेन लगेचच विकल्या जातात. ह्या फेअरनेस क्रिमने नक्की किती जणांना गोरेपण आले हा तर संशोधनाचा विषय ठरतो. मर्क्युरी सारखे घातक रासायनिक पदार्थ आणि स्टिरॉइड्स टाकून फेअरनेस क्रिम सर्रास विकल्या जातात. तात्पुरता चेहरा उजळला की ग्राहक आनंदून जातात आणि त्याच्या आहारी जातात भलेही मग अशा फेअरनेस क्रिमचे कितीही साईड इफेक्ट असो. 

जनसामान्यांच्या सोबतच क्रिडाक्षेत्रालाही या वर्णभेदाचा फटका बसला आहे. द. अफ्रिकेत महात्मा गांधींना वर्णभेदाचा वाईट अनुभव आला त्याला कित्येक वर्षे लोटली परंतु या ना त्या रुपात ही वाळवी समाजात आजही जिवंत आहे. क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झलेच तर अँन्ड्र्यू सायमंड हरभजन विवाद ताजा आहे. भारताच्या हरभजनसिंग वर अँन्ड्र्यू सायमंडला बिग मंकी म्हटल्याचा आरोप आहे. इंग्लंडच्या माँटी पनेसरला ऑस्ट्रेलियात वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाज काॅलीन क्राफ्टला वर्णद्वेषातून द. आफ्रिकेत रेल्वेतून हाकलण्यात आले. ऑसी डिन जोन्सने समालोचन करतांना द.आफ्रिकेच्या हाशीम आमलाला त्याच्या लांब दाढीवरून आतंकवादी संबोधले होते.

 इंग्लंडच्या टोनी ग्रेगचा भारत आणि पाक क्रिकेट खेळाडूंविषयी वर्णद्वेष जगजाहीर होता. गोल्फचा जगप्रसिद्ध खेळाडू टायगर वुडला 'काळा गधा' म्हणून अपमानीत करण्यात आले. आपल्याकडील सिनेकलाकारांनाही परदेशात याचा बरेचदा आला आहे. प्रियंका चोप्राला ब्राऊनी म्हणून हिणवण्यात आले तर सलमान, शाहरूखला अमेरिकेत विमानतळावर वारंवार झाडाझडतीला सामोरे जावे लागलेले आहे. वर्णद्वेष, रंगभेद, नस्लभेद ही एकाप्रकारची मानसिक विक्रुतीच म्हणावे लागेल. नेल्सन मंडेला यांनी तर आयुष्याची सत्ताविस वर्षे याच भेदाविरूद्ध लढण्यात  तुरुंगात घातली. मार्टिन ल्युथर किंग यांनी उभारलेल्या मानवतेच्या लढ्यापोटी त्यांना काळा गांधी अशी उपमा दिली गेली.

काहीही असो अभिनव मुकुंदने या विकृती आवाज उठवून समाजाला जागे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मुकुंदच्या या अभिनव कल्पनेचे आपण सर्वांनी स्वागत करायराच हवे. वर्णद्वेषी, रंगभेदी, नस्लभेदी समस्येला, संकल्पनेला मुठमाती दिलीच पाहिजे. पी.टी.उषा, पी. सिंधु, ब्रायन लारा, बाॅक्सिंग किंग मोहम्मद अली, सर व्हिव्हियन रिचर्डस, थंडरबोल्ट,,, उसेन बोल्ट,मुथैय्या मुरलीधरन अब्राहम लिंकन, बराक ओबामा असे एक ना अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी रंग, वर्ण आणि देशाच्या सिमा ओलांडून जग जिंकले आहे. गोर्या काळ्याच्या खुळचट कल्पना आता कालबाह्य झाल्या असून आता तुम्ही स्वकर्तृत्वाने जग जिंकू शकता. बरे झाले अभिनव मुकुंदच्या लढ्याला कर्णधार विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या, कंगणा रनौत, ज्वाला गुट्टा आणि समाजातून चांगले समर्थन मिळत आहे. या समस्येवर फार पुर्वीची  एक उक्ती अगदी तंतोतंत जुळते आहे.
काय भुललासी वरलीया रंगा
उस डोंगा परी रस नोहे डोंगा
*************************************
दि. १२ ऑगस्ट २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

पुरोगामी मधुमेहाचे मधुर भंडार


      पुरोगामी मधुमेहाचे "मधुर भंडार"
************************************
प्रसिद्ध सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते मधुर भांडारकर यांचा इंदू सरकार हा चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून काँग्रेसने या चित्रपटावर बंदीची मागणी केलेली आहे. चित्रपट आणि विवाद आपल्याकडे नित्याचेच आहे तरीपण आणिबाणी सारख्या वादग्रस्त विषयावर आधारित या चित्रपटाला होणारा प्रखर विरोध पाहता राजकीय वातावरण परत एकदा ढवळून निघण्याची चिन्हे दिसत आहे. अर्थातच श्रीमती इंदीराजी आणि आणिबाणी सारखे संवेदनशील विषय असल्याने काँग्रेसचा या चित्रपटाला होणारा विरोध स्वाभाविक आहे. स्वतः मधुर भांडारकरांनी हा चित्रपट ७०℅ काल्पनिक तर केवळ ३०℅ सत्यघटनेवर आधारित असल्याचे म्हटले आहे तरीपण यामुळे विरोधकांचे समाधान झाले नसून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

४८ वर्षीय मधुर भांडारकर हे सिनेजगतात एक चर्चित नाव असून त्यांचे चित्रपट बऱ्यापैकी गाजलेले आहेत. चांदणी बार (२००१), पेज थ्री (२००५), ट्राफिक सिग्नल (२००७), फॅशन (२००८) इ. यापैकी ट्राफिक सिग्नल या चित्रपटाला सर्वश्रेष्ठ निर्देशकाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  राजकीय, सामाजिक आणि ज्वलंत विषय चित्रपटातून योग्यप्रकारे हाताळण्यात मधुर भांडारकर पटाईत आहेत. यामुळेच या चित्रपटाचे रसिकांना आकर्षण आहे.

आणिबाणी बद्दल बोलायचेच झाले तर निश्चितच हा काळ भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने सर्वात काळाकुट्ट भाग ठरतो.राजकारणात सत्ता सांभाळतांना काही अप्रिय निर्णय घ्यावेच लागतात,, अर्थातच तत्कालीन परिस्थितीवर सुद्धा बरेच काही अवलंबून असते. श्री राजनारायन यांनी १९७१ ला रायबरेली इथून श्रीमती इंदीराजींविरूद्ध पराभूत होताच अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. या केसमध्ये मतदारांना आमिष देणे, सरकारी मशीनरीचा दुरुपयोग करणे, सरकारी संस्थानांचा गैरवापर करणे यासहीत तब्बल १४ आरोप श्रीमती इंदीराजींवर ठेवण्यात आले.अखेर १२जून १९७५ ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री जगमोहन सिन्हा यांनी श्रीमती इंदीराजींना दोषी ठरवत त्यांना सहा वर्षांकरीता पदापासून बेदखल केले. 

२५ जून १९७५ ला सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त निकाल कायम ठेवला परंतु श्रीमती इंदीराजींना पंतप्रधान पदी राहण्याची परवानगी दिली. अर्थातच यामुळे श्री जयप्रकाश नारायण यांनी विरोध दर्शवत २५ जून १९७५ ला श्रीमती इंदीराजींच्या राजिनाम्याची मागणी करत देशव्यापी प्रदर्शनाची हाक दिली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी अखेर श्रीमती इंदीराजींनी तत्कालीन राष्ट्रपती मा.फक्रुद्दीन अली अहमद यांच्याद्वारे संविधान कलम ३५२ अंतर्गत आणिबाणी जाहीर केली. यामुळे देशभरात एकच गदारोळ उडाला. निवडणूका रद्द करण्यात आल्या, विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले, नागरिकांना मौलीक अधिकारापासून वंचित व्हावे लागले तर प्रेसवर अमर्याद बंधने आली. याचकाळात श्री संजय गांधी यांनी नसबंदी अभियान केल्याने एकच हल्लाकल्लोळ माजला. अखेर २१ महिन्याचा कालावधी घेऊन हा काळा अध्याय बंद झाला.

खरेतर श्रीमती इंदीराजींचे भारतीय राजकारणात अमुल्य योगदान आहे. देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाला तोड नाही. कणखर बाणा, प्रचंड आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती आणि आपल्या पोलादी नेतृत्वाने त्यांनी विरोधकांना सहज नमवले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची चांगली ओळख होती. विकसनशील राष्ट्रांच्या अलिप्त चळवळीत त्या अग्रेसर होत्या. त्यांचा दरारा एवढा होता की त्याकाळी इंदीरा इज इंडीया असे हमखास म्हटले जायचे. संपूर्ण भारतात त्या तुफान लोकप्रिय होत्या. अशाप्रकारे या वादळी व्यक्तिरेखेवर चित्रपट म्हणजे येड्यागबाळ्याचे काम नव्हे. परंतु मधुर भांडारकर यांनी हे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. 

आता प्रश्न असा आहे की कला,अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषणस्वतंत्रतेच्या मर्यादा कोण आणि कशा ठरवणार? याबाबतीत आपले नेहमीचे पुरोगामी दुटप्पी भूमिका घेत आहेत. माय नेम इज खान या चित्रपटाला शिवसेनेने विरोध करताच तमाम पुरोगामी मंडळी शाहरुख खानच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. बॉलीवुडमधले झाडून पुसून सगळे शिवसेनेचा विरोध झुगारून आंगठे आणि चिमटे दाखवत चित्रपट पहायला गर्दी करू लागली होती. एवढेच काय तर पुरोगामीत्वाच्या बाबतीत हम भी कुछ कम नही  हे दाखविण्यासाठी तत्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री मा. श्री आर आर पाटील म्हणजेच लाडके आबा आपल्या पोलिसांच्या प्रचंड फौजफाटेसह चित्रपटाला हजर होतेच. मिडीयात तर शाहरूख खानचा अखंड जप यानिमित्ताने बघायला मिळाला. मग प्रश्न असा पडतो की हाच न्याय इंदू सरकारला का नाही? 

ढोंगी पुरोगाम्यांच्या  अशाच दुटप्पी वागण्याचा फटका शिक्षणाच्या आयचा घो, गुलाम ए मुस्तफा बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटांना बसला. याऊलट कोणीच बंदीची मागणीसुद्धा केली नसतांना व्हॉटीकन नाराज होऊ नये म्हणून तत्कालीन काँग्रेस सरकारने दा विंची कोड नावाच्या परदेशी चित्रपटाला भारतात प्रदर्शनाची परवानगी दिली नव्हती. राणी पद्मावती चे शुटींग करनी सेनेने उधळताच तमाम ढोंगी पुरोगाम्यांना असहिष्णुतेच्या भयंकर उलट्या व्हायला लागल्या होत्या. 

पुरस्कार वापसीचे नाट्यप्रयोग याच काळात केले गेले.गुलाम अलीच्या कार्यक्रमाला विरोध करणारे कलेचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मारेकरी ठरतात तर आता विरोध करणार्यांना काय म्हणावे हा प्रश्नच आहे. गुलाम अलीच्या मैफिलीत बेधुंद होणारे,,हाच गुलाम अली पाकिस्तानात गेल्यावर आपले खरे रुप दाखवतो तेव्हा आपले ढोंगी पुरोगामी अचानक बेपत्ता होतात. पाकिस्तानी गायक, कलाकारांना विरोध करणारे मानवतेचे दुश्मन ठरतात परंतु हीच मंडळी पाकिस्तानमध्ये जाऊन भारताविरुद्ध विषवमन करतात तेंव्हा सगळे मुग गिळून गप्प बसतात.

अर्थातच कोणत्याही व्यक्ती, घटना किंवा परिस्थितीचे विकृत सादरीकरण निंदनीय आहेच. कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगार किंवा अपराध्यांचे उदात्तीकरण नकोच. आमिर खानच्या पी के या चित्रपटात हिंदूंची आणि देवीदेवतांची येथेच्छ निंदानालस्ती करण्यात आली परंतु ही कला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निर्मिती होती. एम एफ हुसेन हिंदू देवीदेवतांची नग्न छायाचित्रे काढतो तो कलेचा अविष्कार असतो. तर सलमान रश्दीच्या सॅटॅनिक व्हर्सेसवर बंदी घालून आणि बांग्लादेशी लेखिका तस्लीमा नसरीन जीव मुठीत घेऊन जगतांना आपण आपली धर्मनिरपेक्ष परंपरा जपतो.  आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो पण याच ढोंगी पुरोगामी आणि त्यांच्या वामपंथीय कंपूने भगवा दहशतवाद, हिंदू आतंकवादी, हिंदू जासूस सारखे शब्द प्रयोग चलनात आणले आहेत.

 अर्थातच जनतेला यातला फोलपणा लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणूनच पुरोगामीत्वाचा मधुमेह झालेल्यांना भांडारकरचा हा मधुर डोज कितपत सहन होते हे पाहणे रंजक ठरेल.  माय नेम इज खानला एक न्याय आणि इंदू सरकारला वेगळा न्याय हा कायद्याच्या कोणत्या कसोटीत बसतो हे ढोंगी पुरोगाम्यांनी स्पष्ट करणे गरजेचं आहे. 
*************************************
दि. १९ जुलै २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

मेरे रश्के कमर, तुने पहिली नजर,,


     "मेरे रश्क ऐ कमर तुने पहली नझर"
      "जो नझरसे मिलाई मजा आ गया"
***********************************
सध्या सोशल मिडीयावर उपरोक्त गीत धुमाकूळ घालत असुन कान देऊन ऐकल्यास खरोखरच त्याचा मतितार्थ समजून येईल. मानवी भावविश्वात प्रेमाचे अमूल्य योगदान आहे. प्रेमाची अनुभूती येणे हा सुखद अनुभव आहे. प्रत्येक जण यातून मार्गक्रमण करत असतो. अशा या प्रेमविश्वात  प्रवेश करतांना नजर, दृष्टी, कटाक्ष  अर्थातच नयनबाणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

'लव्ह ॲट फर्स्ट साईट' असो की 'पहिल्या नजरेत प्रेम' असो...नयनबाणांनी घायाळ होणाऱ्यांची संख्या अमाप आहे. प्रेमासाठी 'पासपोर्ट म्हणा की व्हिसा' डोळे प्रमुख भुमिका निभावतांना दिसतात. 'डोळे हे जुल्मी गडे' किंवा 'ती पाहताच बाला ,,कालीजा खल्लास झाला' म्हणतात ते याचसाठी. 
खरेतर या नाजूक विषयावर संशोधकांना यामागे 'हार्मोन्स चा केमिकल लोच्या' असल्याचा अंदाज आहे. तरीपण प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे आणि योग्यवेळी ती प्रकट होतेच. आता ही वेळ व्यक्तीसापेक्ष असल्याने याचे टाईमटेबल असणे शक्य नाही. कोणाच्या प्रेमाशी कोणाचीही तुलनासुद्धा करता येत नाही.

कारण 'प्रेम हे प्रेम असत,,,तुमच आमच सेम असत' तरीपण 'जाने कब कहा किसीको,,किसीसे प्यार हो जाए' याची गॅरन्टी देता येत नाही. फ्रान्स चे सध्याचे राष्ट्रपती हे तर चक्क त्यांच्यापेक्षा कितीतरी वयस्कर वर्गशिक्षीकेच्या प्रेमात पडले आणि लग्नसुद्धा करून मोकळे झाले. डोनाल्ड ट्रम्प आणि  मेलॅनीयाचेही उदाहरण फार बोलके आहे. आपल्याकडे 'प्रोफेसर मटुकनाथचे आपल्या वयापेक्षा अर्धे वय असलेल्या शिष्येसोबतचे प्रेमप्रकरण असो की डिआयजींचे ओढणी घेऊन केलेले राधाप्रेम'. भारतीय समाज मात्र अशा प्रेमप्रकरणांना फॅमीलीअर नसल्याने नावबोट ठेवण्यात धन्यता मानतो. 

बाॅलीवुड आणि क्रिकेटतरी या विषयापासून दुर कसे राहणार. 'प्रेम आणि नजरे' च्या महती सांगणारी कित्येक गीते चांगलीच गाजली आहे. अगदी 'निगाहे मिलानेको जी चाहता है' पासून 'नयनोमे सपना,,सपनोमे सजना' पर्यंत लांबलचक यादी आहे. कधी धीरगंभीर प्रकारात 'झुकी झुकी ये नजर' असते तर कधी 'आखोंमे हमने आपके सपने सजाऐ है...बस आप आपही दिलमे समाऐ है' म्हणत  प्रेमवेदना व्यक्त होतात. 'गुलाबी आंखे जो तेरी देखी,,,शराबी ये दिल हो गया' म्हणत नायक पिंगा घालतांना दिसतो. तर कधी 'नजरोसे कहदो प्यारमे मिलनेका मौसम ,,,,मिलनेका मौसम आ गया' म्हणत मिलनाची सुचना दिली जाते. 'दो नयना ईक कहानी,,,' कधीकधी मन व्याकूळ करते. 'नयना बरसे रिमझिम रिमझिम' म्हणत मनाला समजावले जाते.  

क्रिकेटपटूंना आपल्याकडे "हिरो" चा दर्जा असल्याने ते तरी कसे मागे राहतील? अगदी 'व्हिव्हियन रिचर्डस, नैना' पासून सुरु झालेली परंपरा आजतागायत कायम आहे आणि पुढेही राहील. कारकीर्द ऐन भरात असतांना संदिप पाटील 'कभी अजनबी थे' ला विसरू शकला नाही. मास्टर ब्लास्टरला अंजलीने कधी क्लिन बोल्ड केले हे कळले नाही तर भल्याभल्यांना हातोहात यष्टीचीत करणाऱ्या माही ला साक्षीने अलगद जाळ्यात ओढले. तर या सर्वांचे अपडेटेड व्हर्जन विराटच्या रुपात पहायला मिळते. 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो' म्हणत चिकू मैदान आणि मैदानाबाहेरही गाजत आहे. 'निर्लज्जम सदा सुखी' प्रमाणे  शेनवाॅर्न जागोजागी आपल्या प्रेमाचे चेंडू वळवत होता. तर प्रेमासाठी सानिया शोएब देशाच्या सिमा ओलांडतात. 

प्रेमाचे भाग्य सर्वांनाच लाभते असेही नाही. 'हेड या टेल प्यार मोहब्बत दिलका खेल',,,इस खेलमे कोई है पास तो कोई है फेल' असा प्रकार असतो. पुर्वी भारत पाक क्रिकेट सामन्यात इम्रान झिनत भाई भाई असा नारा हमखास लागायचा तर अमिताभ रेखाचा सिलसिला कित्येकांच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी असते. ड्रिमगर्ल साठी जितेंद्र, संजीवकुमार आणि धर्मेंद्रने घातलेले खेटे कोण विसरू शकतो? शिशा हो या दिल हो आखिर टुट जाता है म्हणणारी रिना राॅय तमाम प्रेमपिडीतांची कहाणी आहे. तडप तडपके इस दिलसे आह निकलती रही म्हणणारा सलमान कोण विसरेल. तू प्यार है किसी औरका तुझे चाहता कोई और है  म्हणत कित्येक युवा स्वतःला समजावणी घालतांना दिसतात. 

योग्य वयात योग्य व्यक्तीशी प्रेम होणे म्हणजे 'दुग्धशर्करा योग' होय. पण बरेचदा 'Love is blind' ची प्रचिती येते आणि मग पश्चाताप करण्याशिवाय  काही उरत नाही. म्हणूनच प्रेमाची वाट आल्हाददायक असली तरी निसरडी नक्कीच आहे. वनवे असल्याने परतणे कठीण असते. यामुळेच या मार्गावर at your own risk चे सल्ले सगळे देतात. 

वयापरत्वे कर्तव्याची, जबाबदारीची जाण म्हणा की मॅच्युरीटी म्हणा 'नैनमटक्का' हळूहळू काचबिंदू, मोतीयाबिंदूत परिवर्तीत होण्याला सुरवात होते. सामाजिक भानाची लेन्स त्याला प्रेमाच्या आठवणी धुसर करायला लावते. मनाला समजावण्याचे कितीही प्रयत्न केला तरी जुने काँटॅक्ट,,,, कितीही महागडे काँटॅक्ट लेन्स लावून लपवता येत नाही.ह्रुदयस्थ प्रेमाला कधीही बायपास  करता येत नाही. पहिले प्रेम कधी विसरता येत नाही असे म्हणतात ते बहुदा याचसाठी असावे.पहिल्या नजरेतून दृष्टीपटलावर  आलेल प्रेम मात्र मनाच्या पटलावरून कधीही पुसता येत नाही. असा हा नजरेचा प्रवास,,, एकदातरी नजरेखालून घालायला काय हरकत आहे...तोपर्यंत
बर्कसी गिर गई,,कामही कर गई
आग ऐसी लगाई मजा आ गया
जाममे घोलकर हुस्नकी मस्तिया
चांदणी मुस्कराई मजा आ गया
मेरे रस्क ऐ कमर तूने पहली नझर
जो नझरसे मिलाई मजा आ गया
***********************************
दि. ०८ जून २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

भैय्यालाल भोतमांगे, दी अनटोल्ड स्टोरी


               श्री भैय्यालाल भोतमांगे
          The untold story 2006/17
*************************************
जवळपास दहाएक वर्षापूर्वी घडलेल्या भिषण हत्याकांडाच्या स्मृती  भैय्यालाल यांच्या अकाली जाण्याने परत जाग्या झाल्या आहेत. झाले काय तर घरी अठराविश्व दारिद्र असलेल्या भोतमांगे कुटुंबियांवर त्यादिवशी आभाळ कोसळले होते. कुणाच्याही ध्यानीमनी नसतांना गावाखेड्यातल्या रानटी पशूंनी मानवजातीला लाजवणारे कृत्य केले. कारण,भांडण तंटा, कोण चुक, कोण बरोबर याचा कितीही उहापोह केला तरी या हत्याकांडाला माफी शक्यच नाही.

अशा प्रकारच्या दुर्घटना महाराष्ट्रात नवीन नाही. नामांतर आंदोलन असो, घाटकोपर ची घटना असो, पोचीराम कांबळे की मनोरमा कांबळे असो की खैरलांजी असो उभ्या मानवजातीची मान शरमेने नक्कीच खाली झाली आहे. नेहमीप्रमाणे केवळ आंबेडकरी समाजाशिवाय याची कुणीही दखल घेतली नाही. पण यामुळे संघर्ष थोडीच थांबणार होता. उभ्या महाराष्ट्राने भूतो न भविष्यती असा संघर्ष लढा अनुभवला आणि तोसुद्धा कोणत्याही नेत्याविना. 

उलट याकाळात नेतागीरी करणाऱ्या भल्याभल्या नेत्यांची येथेच्छ धुलाई करण्यात आली होती. आबालवृद्ध या लढ्यात सामील झाले होते. प्रत्येक व्यक्ती सैनिकाचे रुप धारण करून आपापल्यापरीने हा मोर्चा सांभाळत होते. 

उभा महाराष्ट्र पेटल्यावर तत्कालीन सरकारची कुंभकर्णी झोप उघडून जाग आली आणि नेहमीप्रमाणे अटक,निलंबन,बदल्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. एकदाचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले अन सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

खरेतर ही लढाई जातपात, धर्माची कुस ओलांडून प्रस्थापित आणि विस्थापित, पोषीत आणि शोषीत वर्गात होती. अपेक्षेप्रमाने शोषीतांना न्याय मिळणे दुरापास्त होतेच. विविध कोर्टकचेर्यातून खेळखंडोबा होत ही केस काहींना जन्ठेमपेवर पोहोचवून थंडावली. 

प्रश्न असा आहे की किती फासावर गेले किती अटकले आणि किती सुटले यापेक्षा पिडीत कुटुंबाला खरेच न्याय मिळाला का? 
जलिकट्टूच्या नावावर गळे काढणार्यांना खैरलांजी कांडात प्रेते वाहणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना अटक झाली होती आणि ते केव्हाचेच अटकेतच मरण पावले हे कित्येकांना माहीतच नसावे. 

डॉ. च्या म्हणण्यानुसार भोतमांगेचा मृत्यू ह्रुदयविकाराच्या झटक्याने झाला. पण प्रचलित व्यवस्थेने त्यांचे ह्रुदय केव्हाच फाडले होते, मेंदुचा भुगा केला होता तर उर्वरित शरीराला पंगु केले होते. तरीही न्यायाच्या अपेक्षेत ही व्यक्ती जीवंतपणी नरकयातना भोगत होती. सरकारने कायतर आर्थिक मदत आणि नोकरी देऊन बोळवण केली. ही एक प्रकारची प्रतारणाच होती.
शेवटी तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात अडकून जीवंतपणी न्याय मिळण्याची अधुरी अपेक्षा ह्रुदयी ठेऊन भैय्यालालने जगाचा निरोप घेतला.

यानिमित्ताने काही बाबी अधोरेखित करता येईल. गरीबांना,शोषीतांना न्याय मिळणे मुश्किल ही नहीं नामुमकीन पण आहे. न्यायव्यवस्था सलमान, संजूबाबा सारख्यांची पाठराखन करते.
भैय्यालालजी ,,,,,या व्यवस्थेला माफ करा,,,तुम्हाला निर्णय मिळाला,,, न्याय नाही,,,, पण तुम्ही पेटवलेले हे अग्निकुंड विझणार नाही याची काळजी समाजधुरीणांनी घेणे गरजेच आहे.
+++++++++++++++++++++++++++++
दि.२२/०१/२०१७
◆◆ अनिल पावशेकर ◆◆◆◆◆◆

आदमी हूं आदमी से प्यार करता हूं


      "आदमी" हुँ "आदमीसे" प्यार करता हुँ
*************************************
सध्या आपल्याकडील न्यायालये तुफान फॉर्मात असुन कित्येक संवेदनशील, नाजूक आणि हळुवार विषयांवर बिनधास्त, सडेतोड निकाल देत आहेत. मग ते महामार्ग मद्यविक्री असो की ट्रिपल तलाक किंवा आत्ताचे समलैंगिक प्रकरण. अनेक वर्षापासून रेंगाळत पडलेल्या समलैंगिक सारख्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने डॅशींग निर्णय देताच भारतासारख्या परंपरा आणि रुढीवादी देशात प्रचंड खळबळ माजलेली आहे.  सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वोच्च असल्याने सर्वांना तो आवडेलच अशातला भाग नाही मात्र कोर्टाचे निर्णय हे आवडीनिवडीनुसार नसुन सर्वांना न्याय आणि समानतेच्या धर्तीवर असल्याने तो स्विकारणे अपरिहार्य आहे. अर्थातच या निर्णयाचे संमिश्र स्वागत झाले असून समलैंगिक गट तर गे गे रे गे गे , गे रे सायबा प्यार मे सौदा नही म्हणत आनंदात न्हाऊन निघाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या निर्णयाने मिडीयात आनंदाला उधाण आले असुन सर्वात जास्त फायदा मिडीया वर्गाचा तर झाला नाहीना अशी शंका येते.

खरेतर लैंगिकता हा विषय इतका जटिल आणि अगम्य आहे की प्रत्येक व्यक्तीपरत्वे त्याला विभिन्न कंगोरे आहेत. मात्र जगात सध्यातरी हेट्रोसेक्स्युअल बिरादरीचा दबदबा असल्याने समलैंगिक मंडळींची प्रचंड कुचंबणा होत होती. किंबहुना समलैंगिकता हा विषयच कुत्सितपणे, विनोदाने किंवा टिंगलटवाळी करण्यापलीकडे कोणी बघतच नव्हते. अखेर कित्येक वर्षाच्या न्यायालयीन लढाईला यश आले आणि खुद्द न्यायालयानेच आता समलैंगिकतेचे ३७७ कलम अंशतः रद्दबातल ठरवले आहे. पुरुषांसाठी गे तर महिलांसाठी लेस्बियन अशी हेटाळणी यापुढे जिकरीचे ठरले असुन सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात समलैंगिकता हा गुन्हा नसून जुनी विचारधारा बदलणे गरजेचे असल्याचे नमूद केलेले आहे. सोबतच प्रत्येकाला समानतेचा अधिकार असून आपल्या मर्जीने जगता आले पाहिजे तसेच अशा व्यक्तींवर बहिष्कार घालणे चुकीचे असल्याचे सांगितले आहे. शिवाय  प्रत्येक गोष्ट बहुमताने ठरवता येत नसून कोर्ट कोणासोबतही भेदभाव होऊ देणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

सध्यातरी या निर्णयाने भविष्यात काय फायदेतोटे होतील हे सांगणे कठीण असले तरी आपल्याकडे अशा संबंधांना मान, सम्मान आणि किती स्थान आहे हे ठरवणे धाडसाचे ठरेल. विदेशात मात्र अशा चळवळी केंव्हाच्याच सुरू झाल्या असून समलैंगिक व्यक्तींना आपले हक्क, न्याय आणि कायद्याबाबत जागरुकता बऱ्याच प्रमाणात आढळून येते. मात्र सौदी अरेबिया, इराण, येमेन, सोमालिया, नाईजेरीया आणि सुदान आदी देशात समलैंगिकतेसाठी मृत्यु दंडाची शिक्षा आहे. 

आपल्याकडे स्त्री पुरुष संबंध किंवा विवाह हे नैसर्गिकरित्या संतानोत्पत्तीसाठी मानले जात असल्याने समलैंगिक संबंध प्रचलित समाजरचनेला अडचणीचे ठरू शकतात. शिवाय पुढे चालून वंशवृद्धी, दैवऋण, पित्रुऋण सारख्या भावनिक बाबींचा गुंता वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. भविष्यात समलैंगिकांचे विवाह व्हायला लागल्यास संतानोत्पत्ती, दत्तकविधान, टेस्टट्युब बेबी, सरोगसी किंवा क्लोनिंग सारखे विषय हाताबाहेर जाऊ शकतात.  समलैंगिकांना मान्यता देणारा भारत हा १२७ वा देश ठरला असून ०६ सप्टेंबर हा दिवस  समलैंगिकांसाठी "लैंगिक स्वतंत्रता दिन" नक्कीच ठरू शकतो.

शेवटी सुप्रीम कोर्टाने जरी समलैंगिकतेला मान्यता दिली असली तरी आपला समाज खरोखरच अशा संबंधांना कितपत स्विकारेल ही शंकाच आहे. शिवाय अशा संबंधांमुळे सामाजिक तानाबाना विस्कळीत होण्याची शक्यता आहे. आता कुणी कोणाला लंगोटी यार किंवा जीवलग मित्र म्हटले तर लगेच संशयकल्लोळ निर्माण होणार. मुख्य म्हणजे यापुढे लग्नाच्या वेळी सुन म्हणून एखादा मुलगा अथवा जावई म्हणून एखादी मुलगी पण येण्याची शक्यता राहू शकते. 

संशोधकांनी समलैंगिकतेसाठी जेनेटिक, हार्मोनल, आणि आजुबाजूच्या वातावरणाला जरी जबाबदार धरले असले तरी यात स्वीकृती किती आणि विकृती किती हा प्रश्न उरतोच. हिंदू धर्मात कुठेच समलैंगिकतेला खतपाणी, समर्थन किंवा उत्तेजना दिलेली नाही तर इस्लाममध्ये असे संबंध हराम असुन त्याकरिता दंडाची तरतूद आहे. यापुढे कोणी मित्र किंवा मैत्रिणी गळ्यात गळा टाकून दिसताच कही यें वो तो नही? म्हणून भुवया उंचावल्या जातील. किंवा एखाद्याने आदमी हुँ आदमीसे प्यार करता हुँ म्हटल्यावर संशय व्यक्त करता येणार नाही. काहीही असो जवळपास दोन कोटी लोकसंख्या असलेल्या समलैंगिकांत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने अच्छे दिन आले असून इतरांसाठी मात्र कही खुशी कही गम सारखी स्थिती निर्माण झालेली आहे. 
**************************************
दि. ०७ सप्टेंबर २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

तामीया प्रवास वर्णन, अंतिम भाग


        तामीया प्रवासवर्णन, अंतिम भाग
   पातालकोट, तामीया "दि अनटोल्ड स्टोरी"
***************************************
पाताळकोट बाबत अशीही माहिती समोर येते की नागपुरच्या राजांनी आपला खजिना सुरक्षीत ठेवण्यासाठी इथल्या गुहेचा वापर केला होता. तसेच काही काळ सैन्यासोबत आश्रय पण घेतला होता‌. राजाच्या खजिन्याचा ज्यांनी भारवहन केला त्या आदिवासींना भारीया असे म्हणतात. भारीया सोबतच इथे गोंड आदिवासी सुद्धा राहतात. असे म्हटल्या जाते की राजाच्या खजिन्याचे रक्षण व्हावे म्हणून इथे कोणाला पाय ठेऊ दिले जात नाही किंवा त्यांच्यावर हल्ले केले जातात. मात्र यात कितपत तथ्य आहे ते सांगणे कठीण आहे.
राजांचा गुहांशी संबंध आल्याने याला राजाकोह गुहा पण म्हणतात. इथल्या गुफांमध्ये नक्षीकाम आढळते ते फार प्राचिन काळाचे मानले जाते. मात्र भुकंप, भुस्खलन आदी कारणांमुळे या गुफा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पाताळकोट व्ह्यु प्वाईंटपासून खाली ३००० फुट खोलीत या गुफांचे साम्राज्य असल्याचे कळते. जवळपास अडीच तासांत तिथे खडकाळ पायवाटेने पोहोचता येते‌. मात्र तिथे सध्या शंकराचे मंदिर, पर्वतातून झरणारे जलप्रपात याशिवाय आणखी काही असल्याचे ऐकले नाही. याबाबत एक रामायणकालीन  आख्यायिका मात्र प्रसिद्ध आहे. 

रावण सितामातेला पळवून नेत असताना त्याचे जटायू सोबत घनघोर युद्ध झाले. जटायुचे पंख जिथे छाटले गेले  ते कटुतीया गांव खाली उतरताना आपल्याला लागते. अशी चार पाच गावे ओलांडल्यावर आपण या पाताळकोटच्या तळाशी पोहचू शकतो. रामायणातील युद्धात कुंभकर्ण आणि मेघनादचा बळी जातात रावणाने युद्धात जिंकण्यासाठी अहिरावण आणि महिरावण यांची मदत घेतली. अहिरावणने आपल्या मायावी शक्तीने श्रीराम व लक्ष्मणाचे अपहरण करून त्यांना याच पाताळकोटात लपवून ठेवले होते आणि कामाक्षी देवीला बळी देण्याचा त्याचा मानस होता. परंतु अगस्ती ऋषींनी आपल्या दिवदृष्टीने त्याचा हा कट जाणून घेतला आणि महाबली हनुमानाला त्यांच्या सुटकेसाठी पाठवले. महाबली हनुमानाने पंचमुखी रूप धारण करत अहिरावणाचा वध केला आणि प्रभू रामचंद्र व लक्ष्मणाची सुटका केली अशी आख्यायिका आहे.

तामीयाचे जंगल ३,५०० चौरस एकरवर विस्तारले असून यांत पशु,पक्षी, वनस्पती, वेली, वृक्षांची विविधता आढळते. हरड, लायकेन, दगडफुल, आंब्याच्या विशेष प्रजाती, साल वृक्ष ज्यातून उन्हाळ्यात राळ प्राप्त होते ते इथे आढळून येते. मुख्य म्हणजे इथल्या जंगलात औषधी वनस्पतींचा खजिना असून चित्रक, अश्वगंधा, ज्योतिष्मती, भृंगराज, सर्पगंधा, नागबला इत्यादी सोबतच शिवलिंगी सारख्या औषधी विपुल प्रमाणात आढळतात. विशेषतः पिवळे फळ असलेल्या शिवलिंगीत औषधीय गुणधर्म जास्त असल्याचे मानले जाते, या वनस्पतीच्या बियांचा आकार शिवलिंगासारखा असतो आणि व्यंधत्वावर बहुगुणी असतात. पक्षांमध्ये प्रवासी पक्षांसोबतच मलबार व्हिसलींग बर्ड, वल्चर्स, हॉक ईगल, किंगफिशर इत्यादी आणि रसेल वायपर, रॅट स्नेक, कोब्रा, स्पॉटेड डिअर, जंगल कॅट सारखे प्राणी आढळतात.

इथले आदिवासी जंगलातून वनौषधी गोळा करून पाताळकोट व्ह्यु प्वाईंटला त्याची विक्री करतात. विशेषतः लकवा, चर्मरोग, दौर्बल्य, मानसिक रोग, हड्डी, वातरोग यावर हमखास इलाजाचे वर्णन केले जाते. मात्र खरी गर्दी असते ती "भैसाताड" या औषधीजवळ. भय, भुक आणि लैंगिकता ही सजीव असण्याची लक्षणे असल्याने या विषयाबाबत कुतुहल, जिव्हाळा, औत्सुक्य कायमच राहिलेले आहे. पुरूषत्ववर्धक मानली गेलेली ही औषधी हातोहात विकल्या जात होती. अंदाजे १० ग्रॅमची पुड ५०/- रुपयाला विकत घेतांना त्याची शुद्धता, प्रामाणिकता, असली नकली किंवा कितपत उपयोगी आहे या भानगडीत न पडता गिर्हाईक लगेच विकत घेत होते.
 
खरोखरच झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिए म्हणतात ते याचकरिता. बन सिंगाडा (ताकद, फुर्ती ), गुडमार पत्ती (मधुमेह), केबन्द हातपान (हड्डी वातरोग) आदी  औषधींसोबत विविध कंद, शेंगा, बिया औषधी म्हणून विकल्या जात होत्या.

खरोखरच दोन दिवसीय सहलीकरीता तामीया,पाताळकोट हे उत्तम स्थान असून विद्यार्थी, पर्यावरण, निसर्गप्रेमींसाठी नंदनवन आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत दडलेली ही पर्यटनस्थळे वन्यप्रेमींसाठी आनंदाची पर्वणी आहे. इथल्या उंच डोंगरदऱ्या, रांगडे पहाड रांगा तुमच्यात दडलेल्या साहसी वृत्तीला आव्हान करण्यास सक्षम आहेत. त्यातच सिरेंडीपिटी सारखे अत्याधुनिक, सुसज्ज रिसोर्ट म्हणजे निसर्ग आणि नव्याकाळाचा सुंदर मिलाफ आहे. जिथे हिलटॉपचे सौंदर्य तुम्हाला खुणावत असते तर छोटा महादेवची दरी तुमची शारिरिक क्षमता जाणून घेते. इथली वनराई तुम्हाला मोहित करते तर स्वच्छंद बागडणारे पशुपक्षी तुमच्यातले बालपण जागृत करते. बालपणी आईच्या कुशीत जातांना जो विश्र्वास, जी माया, जे आपलेपण आपल्याला जाणवत अगदी तिच अनुभुती या धरतीमातेच्या, निसर्गाच्या सानिध्यात येताच तुम्हाला जाणवू शकते. पाताळकोटची रहस्यमयी दुनिया तुमचे पाऊले आपोआप इथल्या सखोल दऱ्याखोऱ्यांकडे वळवते. अर्थातच या सर्वांकरिता गरज असते ती आपल्याला नेहमीच्या रहाटगाड्यातून बाहेर पडायची आणि निसर्गाच्या कवेत जाऊन पुन्हा एकदा ताजेतवाने व्हायची.
***************************************
दिनांक २९ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

तामीया प्रवास वर्णन, भाग ०४


            तामीया प्रवासवर्णन, भाग ०४
थंडी गुलाबी, हवा ही शराबी, छेडीत जाऊ,,,
***************************************
दिवसभराचा प्रवास, सोबतीला बेधुंद नाचगाणे, मस्ती आणि परिसरातील गारठ्याने रात्री निद्रादेवीच्या कधी अधिन झालो ते कळलेच नाही. घोडे बेचके सोना काय असते हे त्यारात्री प्रत्यक्ष अनुभवले. सकाळी थोड्या गजबजाटाने डोळे उघडले आणि बाहेर जाऊन पाहतो तर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सकाळचे सात वाजले होते आणि सभोवतालच्या वातावरणाचा धुक्याने ताबा घेतला होता. इतके दाट धुके होते की पाच फुटांच्या वर काही दिसतच नव्हते. खरेतर उत्तर भारतात नियमितपणे किंवा कधीकधी आपल्याकडे सुद्धा धुके पडते परंतु इतक्या दाट धुक्याचा अनुभव पहिल्यांदाच आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा हिलटॉप ब्रेकफास्टचा बेत होता परंतु दाट धुक्याने आमचे हे स्वप्न धुक्यातच विरले. अखेर रिसोर्टच्या प्रशस्त रेस्टॉरंटचा आम्ही ताबा घेतला. खमंग पोहे, चवदार सॅन्डविच, गावरानी दह्यासोबत लुसलुशीत आलुपराठे यावर तुटून पडत आम्ही आमची क्षुधा शांत केली आणि जाडजूड पोट आवरत बाजूलाच असलेल्या धाब्याच्या खाटांवर आडवे झालो. एखाद्या अस्सल पंजाबी धाब्यासारखे सजलेल्या याठिकाणी ट्रक, कार, ऑटो सारख्या वाहनांच्या प्रतिकृती सोबतच टायरचे डिझाईन असल्याने इथले वातावरण धाबामय होते. जवळपास अर्धा तासाने सुर्यदेव प्रसन्न झाले आणि धुक्याचे प्रमाण कमी झाल्याने हिलटॉपला जायचा आमचा मार्ग मोकळा झाला.

रिसोर्ट पासून जवळच छोटा महादेव हे धार्मिक तर हिलटॉप हे नैसर्गिक प्रेक्षणीय स्थळ आहे. या स्थळांचा थेट संबंध रामायनकालीन आहे. असे म्हटल्या जाते की रावणपुत्र मेघनादने इथच्या पहाडावर श्रीशंकराची कठोर तपश्चर्या केली होती आणि शंकराने प्रसन्न होऊन त्याला लढण्यासाठी शस्त्रास्त्रे अर्पण केली होती. याच शस्त्रास्त्रांच्या सामर्थ्याने इंद्राला पराजीत केले होते, मुख्य म्हणजे तेंव्हापासून मेघनादला इंद्रजीत या नावाने ओळखले जाऊ लागले होते. आपली तपश्चर्या आटोपताच मेघनाद पातालकोटच्या मार्गाने लंकेला गेला तर भगवान श्रीशंकराने या पहाडाच्या पायथ्याशी म्हणजेच पातालकोट खोऱ्यात पुन्हा ध्यानस्थ झाले, त्या स्थानाला छोटा महादेव असे म्हटले जाते.

अर्थातच एवढी माहिती आमचे रक्त सळसळावयाला पुरेसी होती आणि हरहर महादेव ची गर्जना करत आमची पाऊले मेघनादने तपश्चर्या केलेल्या हिलटॉप या स्थानाकडे आपोआप वळली. हेल्थ इज वेल्थ अर्थातच आरोग्यं धनसंपदा असे का म्हणतात याचा प्रत्यय या ठिकाणी नक्कीच येतो. कारण सातपुडा पर्वतरांगांची उभी चढाई, सोबतच खडकाळ पायवाट, एका बाजुला काळजात धस्स होईल इतकी अथांग खोल दरी तर दुसरीकडे ठिसुळ दगडांवरून तोल सांभाळत जाणे. इथे इग्निअस व सेडीमेंटरी दगडांचे मिश्रण आढळते.  जवळपास पाऊन तासांची दमछाक होणारी चढाई संपताच आम्ही नियोजीत स्थळी म्हणजेच हिलटॉपला पोहोचलो, अर्थातच इथेही धुक्याने आमची पाठ सोडली नव्हती.

इथे थोडाफार सपाट भाग आहे आणि इथुन आपल्याला पाताळकोट खोऱ्याचे विहंगम दर्शन घडते. गर्द हिरव्या मखमली शालूने नटलेले पाताळकोट खोरे, सोबतच सरळसोट उभ्या पर्वतरांगा, सपाट, उभ्या कडा आणि तिथे स्वच्छंदणे विहार करणारे पक्षी पाहताच मन स्तब्ध होऊन जाते. एव्हाना सुर्यदेवाने आपले अस्सल रुप दाखवताच धुके संपुर्णपणे नाहीसे झाले आणि सभोवताल नजर टाकताच चौरा पहाडाचेसुद्धा दर्शन घडले. आमच्यासोबत रिसोर्टचे व्यवस्थापक आणि निसर्गप्रेमी श्री पराग देशपांडे होते आणि त्यांनी इथली इत्यंभूत माहिती आम्हाला दिली.
शिंद्री न्युक्युब हा जापानी टाऊ संस्कृतीतला प्रकार असून निसर्गाशी सलोखा, संगोपण याद्वारे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसे प्राप्त करता येईल याचा उल्लेख यात आढळतो. जंगल बाथ अर्थातच इथे इतकी शुद्ध हवा असते की इतकी चढाई करूनसुद्धा थोडावेळ विश्रांती केली की लगेच आपण ताजेतवाने होऊन जातो. या संकल्पनेत निसर्गाशी नाळ जोडणे यात पर्वत, वनराई, वृक्षवेली, पशुपक्षी, प्राणी एवढेच नव्हे तर निर्जिव दगडधोंडे सुद्धा समाविष्ट होतात.

 निसर्गाला समजून घ्या, निसर्गाला जाणून घ्या, निसर्गाशी एकरुप व्हा या तत्त्वावर आपण चाललो तर शारीरिक असो वा मानसिक व्याधी नक्कीच आपल्या पासून चार हात दुर राहतील. मुख्य म्हणजे इथल्या दगड,वृक्षांवर लिचेनची वस्ती आढळते. वातावरणात सल्फर, नायट्रोजन, शिसे आणि मर्क्युरी सारख्या घातक विषारी उत्सर्जनामुळे फंगस आणि अल्गी चे मिश्रण असलेले लायकेन जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत परंतु जिथे वायुप्रदूषण नसते किंवा हवा ८५% पेक्षा जास्त शुद्ध असते तिथेच हे वृक्षांवर पांढऱ्या ठिपक्यांच्या रूपात आढळतात.
क्रमशः,,,,
***************************************
दि. २७ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

Thursday, April 13, 2023

तामीया प्रवास वर्णन भाग ०३

        किती खुबसुरत ये 'तसविर' है 
        मौसम' 'बेमिसाल' "बेनझीर" है
*************************************
दुपारी बारा वाजता सुरु झालेली आमची तामीया यात्रा अखेर मजल दर मजल करत गर्द हिरव्या वनराईच्या कवेत असलेल्या सिरेंडीपिटी या आलिशान रिसोर्टला संध्याकाळी येऊन पोहोचली. खरेतर पाच-सहा तासांच्या प्रवासानंतर कुणीही थोडावेळ विश्रांती घेणे पसंत केले असते परंतु इथले वातावरण इतके आल्हाददायक आणि निरव शांततेने नटलेले आहे की लगेच कधी एकदा फेरफटका मारतो कसे वाटत होते. मुख्य म्हणजे सर्वांच्या हातात स्मार्टफोन असल्याने चेकइन असो की भुक लागली असो, आधी फोटोबा मग विठोबा करत  सर्वांनी मनसोक्त फोटोसेशन करून घेतले. लाकडी डिझाइनचे भव्य स्वागतकक्ष, प्रवेशद्वारावर उभे दोन सेनापतीने पुतळे पाहून आपण एखाद्या राजवाड्यात तर प्रवेश करत नाही ना असे सहजच वाटून जाते.

वास्तविकत: सिमेंटच्या जंगलातून जेव्हा आपण नैसर्गिक वनसंपदेत पाऊल टाकतो तेंव्हा स्वत:च्या वागण्यात,मानसिकतेत किती बदल होतो हे इथे पाऊल टाकताच लगेच कळून येते, मनावरचा ताणतणाव झटक्यात दुर पळतो. मुख्य म्हणजे इथल्या वास्तूची रचनाच या प्रकारची केलेली आहे की तुम्हाला पदोपदी निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळेल. स्वागत कक्षाला लाकडी कलाकुसरीचे कोंदण लाभलेले आहे आणि या पार्श्वभूमीवर मध्यभागी श्रीगणेशाची कलाकृती मन वेधून घेते. उजव्या हाताला एक करड्या तांबड्या रंगात तगड्या अश्वाची हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे, ती पाहताच लगेच आपण बालपणात हरवून जातो आणि लकडीकी काठी काठीपे घोडा हे गित आपोआप ओठांवर येते.

टाईम इज मनी अर्थातच वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मनाला मुरड घालत आम्ही चेकइनची औपचारिकता पार पाडली आणि आपापल्या राहुटीकडे मार्गस्थ झालो. या भव्य रिसोर्टला ९ डिलक्स रूम, १३ कॉटेजेस तर ८ झोपडीवजा घरकुल आहेत. जवळपास १२ एकरवर डिसेंबर २०१९ ला आकारास आलेल्या या रिसोर्ट मध्ये २५० व्यक्ती सामावून शकेल असा कॉन्फरन्स हॉल,प्रशस्त रेस्टॉरंट, धाबा, सुसज्ज लॉंज आणि या सर्वांना वेढा घातलेला छोटेखानी तलाव परिसरात जीवंतपणा आणतो. या तलावात स्वच्छंदपणे बागडणारी बदके आणि त्यांचे मुक्तपणे क्वॅक क्वॅक ओरडणे जरी शांततेचा जरी भंग करत असले तरी ते कर्णप्रिय असते.

सर्वांनी आपापल्या खोल्यांचा ताबा घेतला आणि अल्पावधीतच पुढील कार्यक्रमासाठी तयार झालो.   गरमागरम पकोडे, चहा, कॉफी यांचा आस्वाद घेत आम्ही कॉन्फरन्स हॉल गाठले. जवळपास एक तास चाललेल्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत चांगलेच ज्ञानरंजन झाले. सोबतच धार्मिक,ऐतिहासिक, भौगोलिक परिस्थिती आणि पार्श्र्वभूमी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यानंतर वेळ होती ती मखमली थंडीत मनोरंजनाची. आधुनिकतेचा पुरेपूर ठसा असलेले लॉंज, विशाल स्क्रिन, दणादण डीजे संगीत आणि बेधुंद मित्रमंडळींची साथ,,, नाचू किती नाचू किती कंबर लचकली अशी अवस्था होईपर्यंत कोणीही थांबायला तयार नव्हते. अखेर काळवेळेचे बंधन पाळत आमची पाऊले रेस्टॉरंटकडे वळली.

भरपेट जेवण आटोपताच सर्वांनी निद्रेला शरण जाणे सोयीस्कर समजले. शरीर थकले असले तरी मनाला तामीयाची ओळख खुणावत होती. पचमढीच्या तुल्यबळ असलेली परंतु तुलनेत बाह्य जगाशी काहीशी अनोळखी असलेली मंतरलेली ही जागा व्यक्त होण्यास आतुर होती. पुर्वीच्या सी.पी. ॲंड बेरार या प्रशासकीय क्षेत्रात सामावलेले हे क्षेत्र ब्रिटीशांनी शोधून काढले. इंग्रज राजवटीत सी.पी. ॲंड बेरारची नागपुर ही हिवाळी राजधानी तर उन्हाळ्यात छिंदवाड्याला असायची. मात्र यापेक्षाही उन्हाळ्यात सोयीकरीता इंग्रजांना एक थंड हवेचे ठिकाण हवे होते. याकरिता त्यांनी नागपुरहून एक घोडदळ स्थानिकांसोबत रवाना केले. मात्र बहुतांशी पचमढीला पोहचले आणि अवघ्या दोघांनी तामीयाला गाठले. अखेर पचमढी नावारूपाला आली आणि दुर्दैवाने तामीयाला दुय्यम स्थान अथवा विस्मृतीचा सामना करावा लागला.
क्रमशः,,,,,
**************************************
दि. २६ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

तामीया प्रवास वर्णन भाग ०२


इक रास्ता है जिंदगी जो थम गये तो कुछ नहीं
***************************************
तामीया सहलीची पुर्वतयारी म्हणून आम्ही ३५ आसनी बस बुक केली होती. नागपूर ते तामीया (जिल्हा छिंदवाडा, मध्यप्रदेश) हे अंतर जवळपास १८० कि.मी असुन प्रवासाला साधारणतः चार तास लागतात. खरेतर नागपूर ते सावनेर पर्यंत चौपदरी महामार्ग आहे परंतु नंतर दुपदरी मार्ग असल्याने प्रवासाचा वेग मंदावतो. तसे पाहता नागपूर असो अथवा कोणतेही शहर, गजबजलेले रस्ते, मार्गावरील फुटकळ दुकाने, फेरीवाले, मोकाट जनावरे, वाहनचालकांचे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणे, चाकरमाण्यांची कार्यालयात जाण्याची धडपड तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची धुम स्टाईल,,, अशा एक ना अनेक कारणांनी वाहतुकीचा बोजवारा उडतो. या सर्व गोंधळात कोणताही अपशब्द न वापरता चारचाकी वाहन चालवणे खरोखरच दिव्य म्हणावे लागेल.

ठरल्याप्रमाणे बस अगदी तंतोतंत वेळी म्हणजेच सकाळी ११ वाजता त्रिमूर्ती नगरला पोहोचली परंतु बरेचश्या मित्रांचे अजुनही गुड मॉर्निंग झाले नसल्याने त्यांना थोडे कानपिचक्या देत आणावे लागले. दुसरा पिकअप प्वाईंट सिताबर्डीला होता आणि तिथून उर्वरित मित्र सोबत येताच बोर्डींग कंप्लीटेड ची घोषणा झाली आणि खऱ्या अर्थाने सहलीचा श्रीगणेशा झाला. 

एखादा कैदी तुरुंगातून सुटल्यावर त्याला जो आनंद होतो, अगदी तसाच आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता आणि त्याला कारणही तसेच होते. रोजच्या त्याच त्याच दैनंदिनीला रामराम ठोकत आज सर्व मोकळा श्र्वास घेत होते‌. प्रवासात विरंगुळा म्हणून पोर्टेबल डिजे, माईक सोबत घेतला असल्याने मनोरंजनाच्या बाबतीत आम्ही निश्चिंत होतो.बसने नागपुरची वेस ओलांडताच मित्रांच्या उत्साहाला उधाण आले. बसमध्ये कवी, गायक, शायर, गझलगायक आणि मिमिक्री करणाऱ्यांचे वारेमाप पिक आले. प्रत्येकजण व्यक्त होऊ पाहत होता. वय, व्यवसाय, डिग्रीची कृत्रिम लक्तरे आपोआप गळून पडू लागली. त्यातच आमची यंग ब्रिगेड संपूर्ण जोशात असल्याने बाकींनी आवरते घेत डीजे संगीताला प्राधान्य दिले. डीजेचा आवाज बसमध्ये घुमू लागताच बहुतेकांना जाग्यावर बसणे मुश्किल झाले आणि कुणी मधल्या मोकळ्या जागेत तर कुणी जागा मिळेल तिथे डीजेच्या तालावर थिरकू लागले. नाच संगीताच्या या धुंदीत एक सव्वा तास कसा निघून गेला ते कळलेच नाही आणि आमचा पहिला पाडाव असलेल्या सावनेरला आमच्या जेष्ठ मित्राकडे चहापाण्यासाठी थांबलो, जे साक्षात दानशूर कर्णाचे अवतार आहेत.

वास्तविकत: काळ बदलला, वेळ बदलली परंतू कृष्णसुदाम्याची मैत्री आजही कायमच आहे. अर्थातच सुदाम्याचे पेटेंट आमच्याकडे असल्याने कुठे आणि कधीही खिशात हात टाकायची फारशी गरजच भासत नाही. त्यातल्या त्यात सावनेर म्हटले की इथे विश्रांती आणि पोटपुजेची व्यवस्था हमखास होत असल्याने आम्ही सर्व निश्चिंत होतो. इथे सुदाम्याच्या पोह्याची जागी नागपुरी तर्री पोह्याने घेतली एवढाच काय तो बदल झाला असावा. अन्न हे जरी पुर्णब्रह्म असले तरी नागपुरकरांसाठी सावजी तर्री पोहे हेच पुर्णब्रह्म मानले जाते. एव्हाना पोटात कावळे ओरडत होते आणि आमच्यासमोर पंचपक्वानाच्या रूपात निरनिराळे खाद्यपदार्थ वाट बघत होते. फारसे आढेवेढे न घेता आम्ही सर्वांनी बटाटेवडे, चिवडा, समोसा, कचोरी, लाडू, जिलेबी यांच्यावर येथेच्छ ताव मारत तृप्ततेची ढेकर देत पुढच्या प्रवासाला निघालो.

महाराष्ट्राची सिमा ओलांडताच आमची बस मध्यप्रदेशातील नाक्यावर परमीटसाठी अडवण्यात आली. खरेतर सात दिवस आधीच प्रवासाचा मार्ग आणि दिवस ठरवुनही बसचे परमिट काढलेच गेले नव्हते. बस आॅपरेटरच्या दिरंगाईचा फटका आम्हाला बसला आणि जवळपास दिड तास तिथे आम्हाला खोळंबून रहावे लागले. अखेर दंडाची रक्कम भरताच बसने पुन्हा धावने सुरू केले. गांधीजी नेहमी म्हणायचे भारताचे खरे रूप बघायचे असेल तर खेड्याकडे बघा. मात्र सध्या वाहतुकीच्या सोयीसाठी गाव, खेडे आणि शहरांना टाळून बायपास मार्ग तयार होत असल्याने प्रवासात दिसणारे गावखेडे रुपी भारताचे दर्शन कमी होत चालले आहे. तरीपण सावनेर नंतर सौंसर, परासीया सारखी महत्त्वाची गावे न्याहाळत आमचा प्रवास सुरु होता. संध्याकाळ होताच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि हवेत आणखी गारठा जाणवायला लागला. जवळपास सातच्या सुमारास आम्ही आमच्या नियोजीत स्थळी म्हणजेच भव्यदिव्य अशा सिरेंडीपिटी लेक ॲंड रिसोर्ट ला पोहोचलो.
क्रमश:,,,,,
***************************************
दि. २५ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

तामीया प्रवास वर्णन भाग ०१


        'यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी'
***************************************
खरेतर नागपुरात दोनच प्रकारचे ऋतू आहेत, एक म्हणजे उन्हाळा आणि दुसरा म्हणजे कडक उन्हाळा. मात्र यावर्षी बदबद पडलेल्या पावसामुळे म्हणा की आणखी कोणत्या कारणाने म्हणा पाऊस आणि थंडी यात कमालीची स्पर्धा लागली असल्याने दोघेही हार मानायला तयार नाही. मात्र या दोघांंच्या जिवघेण्या स्पर्धेने वातावरणात गुलाबी थंडीची लाट उसळली असून भटकंती करण्यासाठी आणखी सुवर्णयोग तो कोणता असणार. नुकतेच उत्तरायणाला जरी सुरवात झाली असली तरी आम्हा मित्रांचे भटकायन वर्षभर सुरू असल्याने आयत्या मिळालेल्या संधीचे सोने करायचे ठरवत यावेळी आमचा मोर्चा वळला पचमढीच्या कुशीत वसलेल्या तामीया या निसर्गरम्य स्थळी. निसर्गाची मुक्तहस्ते उधळण असलेली ही धरती कुठे घनदाट अरण्य तर कुठे आकाशी नजर भिडवणाऱ्या पर्वतश्रृंखला तर कुठे काळजाचा ठाव चुकवणाऱ्या अथांग दऱ्याखोऱ्यांनी नटलेली आहे. सोबतच ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक पार्श्र्वभूमी लाभलेली ही जागा आपल्या अनोख्या वैशिष्ट्याने अचंबित आणि रोमांचकारी आहे.

अर्थातच इथली 'वनसंपदा' कितीही दाट असली तर आमची 'मित्रसंपदा' त्यापेक्षा कैकपट घनदाट असल्याने अशा रम्य वातावरणात भटकने म्हणजे दुग्धशर्करा योगच म्हणावे लागेल. यावेळी सहलीकरीता ३४ मित्रमंडळी साथीला असल्याने  जंगलमे मंगल म्हणत दोन दिवस धमाल मस्ती करत गाजवले. मात्र यासाठी सर्वात महत्त्वाचे होते एवढ्या मित्रमंडळीची एकत्र मोट बांधणे. कारण एकतर सर्व आपापल्या व्यवसाय, संसारप्रपंचात आकंठ बुडालेले, शिवाय बुधवार गुरूवार सारख्या नियमित दिवशी दांडी मारून फिरायला नेणे म्हणजे रेड्याच्या तोंडी वेद पठवण्यासारखे महाकठीण कार्य होत. परंतु जादुची कांडी फिरवावी तशी किमया झाली आणि सहलीचा फतवा निघताच मित्रमंडळींची कळी खुलली.
 व्यक्ती तितक्या प्रकृती असतात‌. यावेळी मित्रसमूह बराच मोठा असल्याने आणि नैसर्गिकरीत्या मतमतांतरे असल्याने यावेळी मैत्रीच्या सप्तरंगी, इंद्रधन्युषी छटा चांगल्या अनुभवायला मिळाल्या. 

१) फिरनेवालेको फिरनेका बहाना चाहिए,,,
या प्रकारात मोडणारे मित्र नेहमीच फ्लाईट मोडमध्ये असतात. फक्त त्यांना एकदा कल्पना दिली की आपले काम झालेच म्हणून समजा. कुठे जायचे आहे, किती दिवसांसाठी जायचे आहे याची यत्किंचितही पर्वा न करता भटकायला सदासर्वदा एका पायावर तयार असतात‌. पंछी बनू उडती फिरू मस्त गगणमे या तालात ते प्रत्येक सहल, प्रवासाचा आनंद लुटतात.

२) अगं अगं म्हशी,मला कुठं नेशी 
या प्रकारातले मित्र थोडे हट्टी, थोडे भावखाऊ, मनातून तयार परंतु व्यवसायात अत्यंत व्यस्त असल्याचा आव आणणारे असतात. यांना सहलीचे विचारले तर उगाचच भाव खाणार, नाही विचारले तर आमच्या नावाने गावभर खडे फोडणार.

३) चले यार धक्का मार,,,
अर्थातच ही मित्रमंडळी म्हणजे डिझलचे इंजीन असतात. जोपर्यंत यांचे कान पकडून रेडीएटर गरम करणार नाही तोपर्यंत यांच्या तोंडून कबुल है, कबुल है हे ऐकायला मिळत नाही. मात्र एकदा हे नगिने तयार झाले की मग यांच्या उत्साहाला उधाण येते आणि यांना सांभाळताना नाकी नऊ येते.

४) ओल्ड इज गोल्ड,,
निश्र्चितच अशा मित्रांचे जितके कौतुक करावे तितके कमीच असते. वयाला, आजारांना आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने लिलया ओव्हरटेक करणारी ही मित्रमंडळी खरेतर कोणत्याही प्रवासासाठी प्रेरणादायी असतात. सोबतच बिग बझार किंवा कोणत्याही फाईव्ह स्टार मॉलमध्ये विकत न मिळणारा अनुभव यांच्या गाठीशी असल्याने मार्गदर्शन आणि जबाबदारी यांचे अतुल्य योगदान ही मित्रमंडळी देत असतात.

५) अम्मा देख तेरा मुंडा बिगडा जाऐ,,
सळसळते तारूण्य, कमालीचा आवेश, बेफिकिरी वृत्ती, होश पेक्षा जोशवर जास्त भरवसा असणारी ही "गॅंग्ज ऑफ नागपूर" म्हणजे कुठल्याही सहल, प्रवासातली लाईव्ह वायर असते. मात्र यांच्यावर कायमच एक डोळा ठेवावा लागतो.

६) तू इस तरह से मेरी जिंदगीमे शामील है,,
गमतीने असे म्हटले जाते की,, ज्यांचे चेहरे जुळतात ते भाऊ बहिण असतात, ज्यांचे विचार अजिबात पटत नाही ते पतिपत्नी असतात तर चेहरामोहरा, साधनसंपत्ती किंबहुना कशाचाच कशाला पत्ता नसून ज्यांचे  सर्वच बाबींवर एकमत असतात,,,ते जिवलग मित्र असतात. खरोखरच अशा मित्रांशिवाय कोणत्याही सहल, प्रवासाची कल्पनाही करवत नाही. अशा मित्रांचा सहवास म्हणजेच,,,
"जहां भी जाओ, लगता है तेरी महफिल है,,,," 

७) होऊ आम्ही नितीमंत कलागुणी बुद्धिवंत
वास्तविकत: प्रत्येक प्रवासात आपल्याला अनेक बाबी शिकायला मिळतात‌, बाह्यजगाची तोंडओळख होते आणि अशावेळी ज्ञानवंत, बुद्धिवंत मित्र हमखास भाव खाऊन जातात‌. मग ते कोणत्याही विषयातले तज्ज्ञ असो एखादी घटना, एखादा विषय अथवा एखाद्या पैलूवर यांनी प्रकाश टाकला की संबंधित विषयाचा गुंता सोडवायला, समजायला खुप मदत होते. खरेतर प्रवासातली ही सर्वात सज्जन, गुणवंत मंडळी असते आणि हेच मित्र सर्वात शांत, संयमी,नम्र सुद्धा असतात. याला कारणही तसेच असते,,,, ज्ञानाच्या फळांनी लदलेली ही मानवी वृक्ष सदैव झुकलेलीच असतात.
क्रमश:,,,,,,
***************************************
दि. २४ जानेवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

चिखलदरा प्रवास वर्णन, अंतिम भाग


  चिखलदरा, "अश्रुंची झाली फुले ", अंतिम भाग
***************************************
रविवार, अर्थातच सहलीचा दुसरा दिवस चिखलदरा करीता राखीव असल्याने सर्वांनी सकाळी लवकर तयारी करून निघायचा बेत होता. मात्र पहाटेला जाग आली आणि पाहतो तर काय,,,रात्रभर क्षणाचीही उसंत न घेता पाऊस आणखी दमदारपणे दारात दत्त म्हणून हजर होता. समोरच सिपना नदी विहीणबाई सारख्या आपल्याच तोऱ्यात चांगलीच फुगून वाहत होती. सतत कोसळणाऱ्या जलधारांनी वातावरणातला गारठा चांगलाच वाढवला होता. खरेतर इथल्या गैरसोयींमुळे अडखळल्यासारखे जरूर वाटत होते परंतु निसर्गाची मुक्तहस्ताने केलेली उधळण आणि आल्हाददायक वातावरण पाहता बाकी सर्व गोष्टींचा विसर पडतो. कॉटेजेसच्या  बाहेर पडतो म्हटलो तर खबरदार जर टाच मारून जाल पुढे,,,, च्या आविर्भावात पावसाने नाकेबंदी केलेली होती. आंघोळ करतो म्हटले तर एक बादली गरम पाण्यासाठी मोजावे ५०/- रू. मोजावे लागणार होते आणि ते केंव्हा मिळेल याची शाश्वती नसल्याने बहुतेकांनी ठंडे ठंडे पानीसे नहाना चाहिए चा अनुभव घेतला.

सर्वांनी सकाळी ९ च्या सुमारास काळा चहा आणि नास्ता आटोपुन चिखलदऱ्याकडे प्रयान केले. सततच्या पावसाने वनराई ओलीचिंब झाल्याचे दृश्य दिसत होते तर घाट आणि कठीण चढाईमुळे प्रवास रोमांचक झाला होता. अर्थातच चिखलदरा हे सातपुडा पर्वतरांगात वसले असल्याने हिरवळीने नटलेल्या उंचच उंच पर्वत रांगा, धुक्यात हरवलेल्या वाटा, मधातच खोल दऱ्यांचे मोहक दर्शन,पावसाळी धबधबे मनाला हुरुप आणत होते. चिखलदरा अवघे सात कि‌मी अंतरावर असतांना काही कारणास्तव बस थांबली आणि आम्ही खाली उतरलो तर आनंदाला पारावर उरला नाही कारण सगळ्यांच्या गळ्यातील ताईत असलेल्या मोबाईलने नेटवर्क दाखवल्याने सर्वांनी आप्तस्वकियांशी पटापट संपर्क साधला. सोबतच हिरव्याकंच बॅकग्राऊंडवर मनसोक्त फोटोसेशन करून घेतले.

चिखलदरा हे जगाच्या पटलावर आणण्याचे श्रेय जाते ते १८२३ ला हैद्राबाद रेजीमेंटचे कॅप्टन रॉबिन्सन यांना. जवळपास ३८९८ फुट उंचीवर असलेले हे स्थान इंग्रजांनी कॉफी लागवडीसाठी विकसित केले होते. बहुदा कॉफी लागवडीसाठी चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव स्थान असावे. वास्तविकत: संपूर्ण चिखलदरा आणि आजुबाजुची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. मात्र सतत कोसळणारा पाऊस, धुक्यांनी हरवलेले रस्ते आणि काही मित्रांना नागपुरला लवकर परतायचे असल्याने आम्ही मोजक्याच स्थळांची भेट घेतली.

पंचबोल प्वाईंट
कोणतेही हिल स्टेशन म्हटले की तिथे एखादा इको प्वाईंट जरूर असतो. पंचबोल प्वाईंटवर एका बाजुला कॉफीचे मळे तर दुसरीकडे  पाच महाकाय पर्वत एकमेकांना खेटून असल्याने नैसर्गिक इको प्वाईंट तयार झालेला आहे. यामुळे एकदा जोराने आवाज दिला की आपल्याला पाचदा प्रतिध्वनी ऐकू येतो. मात्र आम्ही या प्वाईंटवर पोहोचताच तुफानी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने आमचे ओलेचिंब स्वागत केल्याने आम्ही बसच्या खाली न उतरणेच पसंत केले. 

हरिकेन प्वाईंट
पावसापुढे नमते घेत आम्ही पंचबोल प्वाईंटवरून हरिकेन प्वाईंटला आलो. चिखलदऱ्याच्या दक्षिणेस असलेल्या या जागी पावसाने आपली तिव्रता कमी केल्याने आम्हाला थोडेसे हायसे वाटले. इथे पर्यटकांना सुरक्षेसाठी लोखंडी कठडे आणि गॅलरीत तयार केले असल्याने सभोवतालच्या उंच पर्वत आणि खोल दऱ्यांचे दर्शन घेता येते. या स्थळावर छोटी दुकाने आणि हातठेल्यांची रेलचेल असल्याने बरबटीचे गरमागरम भजे, स्विटकॉर्न, उकडलेली बोरे, चहा यावर पर्यटक तुटून पडत होते.

देवी प्वाईंट
हरिकेन प्वाईंटवरून निघताच आम्ही जवळच असलेल्या बगिच्याजवळ थांबलो. मात्र पुन्हा एकदा पावसाच्या जोरामुळे आम्हाला माघारी परतावे लागले. तरीपण हा बगिचा खुप पाहण्यासारखा आहे असे वाटत नाही परंतु इथली झुकझुक गाडी म्हणजेच मिनीट्रेन बच्चेकंपनीला जरूर आकृष्ट करते. इथून लवकरच आम्ही देवी प्वाईंटला पोहोचलो. इथे पायऱ्याने खाली उतरून देवी मंदीरात जाता येते. हे मंदिर प्रचंड मोठ्या आणि काळ्या दगडात कोरलेले आहे. मंदिराची उंची जास्त नसल्याने थोडे खाली वाकुनच प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या वरच्या भागात शक्कर तलाव आहे आणि हा तलाव ओव्हरफ्लो झाला की मंदिराच्या डाव्या बाजुला एका धबधबा पहायला मिळतो. मंदिरात मात्र छतातून नेहमीच पाण्याचा वर्षाव सुरू असतो. या स्थानावरूनच चंद्रभागा नदीचा उगम झालेला आहे. मंदिराच्या वरच्या भागात छोटी दुकाने, हॉटेल्स आहेत तिथे गरमागरम मिसळ, तळलेले वडे, चहा इ. खाद्यपदार्थ मिळतात.

एव्हाना दुपारचे दोन वाजत आले होते आणि पोटात कावळे ओरडत होते परंतु आम्ही दुपारच्या जेवणासाठी अगोदरच हॉटेल हर्षवर्धन इथे बुकिंग केले असल्याने तिथे जेवणाची चांगली सोय झाली. दालफ्राय, वांग्याचे भरीत, कढी, पोळी आणि जिलेबी समोर पाहून सगळे अधाशासारखे अन्नावर तुटून पडले. अखेर क्षुधाशांती होताच तृप्तीची ढेकर देत आम्ही चिखलदरा सोडण्याचा निर्णय घेतला.

संपुर्ण दोन दिवस जिवलग मित्रासारखी साथ देणाऱ्या वरूणराजाने अखेर निरोपाच्या वेळी विश्रांती घेतली आणि वातावरण प्रसन्न, आल्हाददायक झाले. परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा गप्पागोष्टी आणि  हास्यकल्लोळात सर्व सामील झाले. इतक्या वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा आपापल्या वाटेने निघून जाणार यामुळे काहींच्या भावना अनावर झाल्या, काहींनी मनमोकळेपणाने अश्रुंना वाट मोकळी करून दिली तर काहींनी कळत नकळत डोळ्यांच्या कडा पुसल्या. खरेतर हे आनंदाश्रू होते, काहींची मने गलबलून गेल्याने ते नि:शब्द झालेले होते. अखेर यातून सावरतो न सावरतो तोच अमरावती आले आणि दोन मित्रांचा निरोप घ्यायची वेळ आली. टाटा, गुडबाय करत उर्वरीत आम्ही नागपुरच्या दिशेने निघालो. 

जवळपास दहाच्या सुमारास आम्ही नागपूर गाठले आणि एकमेकांना निरोप देत सहलीचे वर्तुळ पूर्ण केले. जो मित्रवान तो भाग्यवान असे उगाचंच म्हटले जात नाही. दोन दिवस जगापासून अलिप्त राहुन मित्रमैत्रिणीच्या गराड्यात राहुन आयुष्य पुन्हा एकदा रिचार्ज झाल्यासारखे वाटले. वर्षानुवर्षांच्या ऋणानुबंधाला आणखी नवी पालवी फुटली, मन ताजेतवाने झाले. आयुष्यात मैत्रीचे किती महत्त्व आहे, काय आयाम आहे याची परत एकदा सर्वांना जाणीव झाली. पुन्हा एकदा भेटण्याची, एकत्र येण्याची मनिषा ठेवून जड अंत:करणाने एकमेकांना निरोप देण्यात आला.
***************************************
दि. ३१ जुलै २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++++++++

चिखलदरा प्रवास वर्णन भाग ०४

@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
                     *अगबाई अरेच्च्या*
   *सेमाडोह, रात बाकी, बात बाकी,,,,, भाग ४
***************************************
दिवसभर कोसळणाऱ्या पर्जन्यधारा संध्याकाळी विश्रांती घेतील अशी अपेक्षा होती मात्र झाले उलटेच. जसजसा अंधार वाढत गेला तसतसे सरींची तिव्रता वाढत गेली आणि विज नसल्याने आमची बेचैनी वाढत गेली. शिवाय कॉटेजेसला रूम सर्व्हिस नसल्याने गोंधळात आणखी भर पडली. मुख्य म्हणजे सेमाडोहला प्रवेश करतानाच कॉटेजेसच्या कार्यालयात जी उदासीनता बघायला मिळते ते पाहता पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना येते.
 मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निमित्ताने पर्यटक मोठ्या विश्र्वासाने निवासासाठी इथे येतात परंतु इथल्या प्रशासनाचा गलाथान कारभार पाहता पुन्हा इथे येण्याचे धाडस कोणी करतील असे वाटत नाही. खरेतर अगोदरच बुकिंग केले असल्याने इथे चांगली सुविधा मिळणे अपेक्षित आणि रास्तच होते. मात्र आपल्याला पर्यटकांच्या सुखसुविधेशी काहीही घेणेदेणे नसल्याचे इथली व्यवस्था पाहून वाटते. आम्ही दुपारनंतर कोलकासला फिरायला गेल्याने इथल्या गैरसोयीची फारशी कल्पना नव्हती तरीपण दुपारी विज नसल्याने विचारणा केली असता इथे पाच दिवसांपासून विज नसल्याचे सांगितले गेले. जनरेटरची विचारणा केली तर डिझेल नसल्याचे सांगितले. खरी समस्या तेव्हा निर्माण झाली जेंव्हा बाथरूम, टॉयलेटमध्ये पाणी संपले होते. अखेर नशिब समजा थोड्या वेळेकरीता विजपुरवठा सुरळीतपणे सुरू झाला आणि आमच्या *जिवात जिव आला*.
एवढे असले तरी बाकी सोयींबाबत सर्वत्र आनंदीआनंद होता. बऱ्याच कॉटेजेसमध्ये नॅपकीन, टॉवेल, आंघोळीची साबण, पिण्याचे पाणी यासारख्या वस्तू उपलब्ध नव्हत्या. बाथरूममध्ये गिझर फक्त शोभेसाठी होते. इथे जवळपास कुठेही दुसरे हॉटेल किंवा इतरत्र जेवणाची सोय नसल्याने सर्वस्वी तुम्हाला इथल्या कॅंटीनवर अवलंबून रहावे लागते. इथले जेवन मग ते व्हेज असो की नॉनव्हेज दर्जेदार अजिबात नव्हते किंबहुना तुम्ही किचनमध्ये डोकावल्यास तुमची जेवणाची इच्छाच मरून जाईल. शिवाय कॅन्टीनच्या आवारात भटक्या कुत्र्यांचा मनसोक्त आणि बिनधास्त वावर तुमच्या उरात धडकी भरायला पुरेसे आहेत. कुत्रेसुद्धा इतके निगरगट्ट की तुम्ही कितीही हाकला, जोपर्यंत त्यांची मर्जी होणार नाही तोपर्यंत ते जागा सोडायला तयार नसतात. काही कुत्रे तर चक्क खुर्चीवर बसून आराम करतात. खेदाची बाब म्हणजे उष्ट्या प्लेट्स कॅन्टीनमध्ये चाटुन चाटुन  साफ करायला हेच कुत्रे कामी पडतात. इथले कॅन्टीन म्हटले की अंगावर काटाच येतो. साध्या चहाची जरी आॉर्डर दिली तर तुम्हाला बिनदुधाचा म्हणजेच काळा चहा मिळतो, कमितकमी दुध पावडर वापरण्याचे सौजन्य सुद्धा दाखवल्या जात नाही. 
निश्र्चितच सेमाडोहचे नैसर्गिक सौंदर्य वादातीत आहे, इथली शांतता मनोरम्य आहे, इथला सभोवताल आणि परिसर अतुलनीय आहे मात्र या सर्वांना सर्व्हिसची जोड मिळत नाही तोपर्यंत काही खरे नाही. कमीतकमी इथे दर्जेदार कॅन्टीन, जनरेटर, लॅंडलाईन, एखादे डेली निड्स शॉप, रुम सर्व्हिस, पिण्याच्या पाण्याची सोय यासारख्या जरूरी बाबींकडे संबंधित विभागाने लक्ष दिल्यास इथे येणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होईल. अर्थातच इथे झालेल्या गैरसोयींबाबत मी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार जरूर केली आहे मात्र त्याची योग्य ती दखल घेऊन कितपत सुधारणा होतील हे सांगणे सध्यातरी कठीणच आहे. विशेषत: एकटादुकटा परिवार किंवा महिलावर्ग सोबत असल्यास सेमाडोहपेक्षा चिखलदरा इथे मुक्काम करुन दुसऱ्या दिवशी कोलकास, सेमाडोह पाहणे शहाणपणाचे ठरेल.
*आलीया भोगावी असावे सादर* प्रमाणे आम्ही या परिस्थितीत सुद्धा  मनोरंजनात कमी पडलो नाही. रात्रीचे जेवण आटोपताच कॅंटीन समोरच्या हॉलमध्ये आम्ही सर्व एकत्र झालो आणि मग सुरू झाली ब्युटीफुल,गाणी, शेरोशायरी, किस्से यांची जुगलबंदी. मात्र आमचा हा आनंद फार काळ टिकला नाही. पुन्हा एकदा विजेने खेळखंडोबा करताच आमचा हिरमोड झाला आणि मग मोबाईलच्या उजेडातच नाचगाणे, गप्पागोष्टी सुरू झाल्या. या सर्व गोंधळात एक जमेची बाजू म्हणजे सर्वत्र काळाकुट्ट अंधार असल्याने दुर्लभ काजव्यांचे मनसोक्त दर्शन झाले. अखेर विज येण्याची सुतराम शक्यता नसल्याने आणि रात्र बरीच झाल्याने आम्ही आमचा कार्यक्रम आटोपता घेतला आणि आपापल्या कॉटेजेसकडे परतलो.
क्रमश:,,,,,

चिखलदरा प्रवास वर्णन भाग ०३


      सेमाडोह, "पल पल दिलके पास",, भाग ३
***************************************
साऱ्या आसमंतात जलधारा बरसत आहेत, वातावरणात गुलाबी थंडी आहे, टोलेजंग सागवानी वृक्षांनी तुम्हाला चोहोबाजूंनी घेरलेले आहे, हिरव्याकंच वनराईत तुम्ही गोड मित्रमैत्रिणी सोबत हरवलेले आहात, सोबत नवतरूणीसारखी खळखळून वाहणारी सिपना नदी तुमच्या वाटेने सोबत देत आहे,,, अशा रोमॅंटिक वातावरणात मन पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन यौवनात पोहचते आणि नकळत ओठांवर गित येते,,, पल पल दिलके साथ तुम रहती हो. अगदी अशीच भावना, असाच रोमांचक अनुभव सेमाडोह व्याघ्र प्रकल्पात दाखल होताक्षणी अनुभवाला येतो.

सेमाडोह कॉटेजेसला आम्ही आधीच ऑनलाईन बुकिंग केले असल्याने दहा कॉटेजेसमध्ये आमची रहायची सोय झाली. इथे जंगल सफारीची व्यवस्था आहे मात्र सतत कोसळणाऱ्या पावसाने आम्हाला सफारीचा बेत रद्द करावा लागला. परंतु आम्ही एवढ्या सहजासहजी हार थोडेच मानणार होतो. लगेच आम्ही दुपारचे जेवण आटोपले आणि उंचावर असलेल्या कोलकास या प्रेक्षणीय स्थळाकडे रवाना झालो. मुख्य म्हणजे सेमाडोहला लॅंडलाईन किंवा मोबाईलची रेंज नसल्याने खुपचं पंचाईत होते. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच विज आणि मोबाईल आपल्या मुलभूत गरजांत समाविष्ट झाल्याने वारंवार अडखळल्या सारखे वाटते.

पुन्हा एकदा सेमाडोह कोलकास प्रवासाला सुरुवात झाली आणि वरूणराजा अगदी जिवलग मित्रासारखा साथ देत होता. जवळपास एक तासाच्या अंतराने आम्ही कोलकासला पोहोचलो. कोलकासलासुद्धा कॉटेजेस आहेत आणि राहण्याची पण  सोय आहे. इथला रिव्हर व्ह्यू पॉइंट पाहण्यासारखा आहे. अर्धचंद्राकार वळण घेत खळखळ वाहणारी सिपना नदी मन मोहून घेते. जणुकाही निसर्गाच्या कुशीतुन वेगाने सरपटणाऱ्या नागीनीसारखी तिची चाल पाहुन मन अचंबित होते. सोबतच आधी फोटोबा मग विठोबा असणाऱ्या मित्रांनी मनसोक्त फोटो काढून आपली हौस भागवून घेतली. इथे जवळच एक टी स्टाॅल आहे तिथे चहापाण्याची सोय आहे. 

कोलकासला एक तास घालवल्यावर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. मात्र परततांना संध्याकाळ झाली आणि पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. वाटेत एकट दुक्कट बंदराशिवाय कोणतेही प्राणी नजरेस पडले नाही. मात्र इतर जगाशी संवाद साधण्यासाठी कोणतीच सोय नसल्याने सर्वच चिंतातुर झाले होते. अखेर बस चालकाने जवळच एका खेड्यात बस थांबवली आणि तिथे लॅंडलाईन ची व्यवस्था असल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दहा रुपये प्रती कॉल या दराने आम्ही आवश्यक तिथे संपर्क केला आणि परत एकदा सेमाडोहच्या कॉटेजेसमध्ये डेरेदाखल झालो. 
क्रमश:,,,,,

चिखलदरा प्रवास वर्णन भाग ०२


 चिखलदरा, श्रावणात घन निळा बरसतो, भाग ०२
***************************************
सकाळी आठच्या सुमारास आम्ही नागपूर सोडले आणि सेमाडोहच्या दिशेने निघालो. नागपूर ते अमरावती हा प्रवास आता चौपदरी महामार्ग झाल्याने अत्यंत सुखकर झालेला आहे. वाटेत तिन टोलनाके जरूर लागतात परंतु तुम्हाला सुखसुविधा हव्या असतिल तर एवढी किंमत मोजने क्रमप्राप्तच आहे. आता बसमध्ये दर्दी मित्रांची गर्दी होती तर आभाळात आमच्या मैत्रीचा हेवा वाटल्याने ढगांची गर्दी वाढली होती. श्रावणात घन निळा बरसतो म्हणजे काय असते ते आम्ही सर्वांनी त्या दिवशी याची देही याची डोळी अनुभवले.

प्रवासात प्रशस्त रस्ते, सभोवताल निसर्गाच्या हिरव्याकंच शालूचे मनमोहक दर्शन, आभाळातून होणारी तुषारवृष्टी सोबतच बसमधला हास्यकल्लोळ यामुळे हा प्रवास कधी संपुच नये असे वाटत होते. अमरावती पर्यंतचे दिडशे कि.मी. चे अंतर चुटकीसरशी पार केले असे वाटत होते. अमरावतीला आणखी दोन मित्रांची भर पडली आणि पुन्हा एकदा दंगामस्तीला उधान आले. सोबतच फराळाकरीता अमरावतीवरून मित्रांनी गरमागरम समोसे आणल्याने आनंदात आणखी भर पडली. अर्थातच आधी पोटोबा मग विठोबा चे धोरण आम्ही मित्र कुठेही गेलो तरी कटाक्षाने पाळतच असतो. क्षणार्धात समोस्यांचा फडशा पाडून पुन्हा एकदा गोंगाटात हरवून गेलो. इतके वर्ष दडपलेल्या भावनांना आउटगोइंग फ्री झाल्याने सर्वांची जाम शाब्दिक धुलाई झाली. टिका, टोमणे आणि शाब्दीक चिमट्यांनी सर्वांना समपातळीत आणल्याने कधी एकमेकांकडे ढुंकूनही न पाहणारे अगदी जिवलग मित्र असल्यासारखे गप्पागोष्टीत रमून गेले होते. जो तो काहीतरी अव्यक्त भावनांना मुर्तरूप देण्याचा प्रयत्न करत होता, सर्वांना खुपकाही बोलायचे असल्याने ऐकण्यापेक्षा बोलणाऱ्यांचीच संख्या जास्त झाली होती. कॉलेजच्या गमतीजमती, दोस्तीचे किस्से, एकमेकांची केलेली थट्टामस्करी यात परतवाडा कधी आले ते कळलेच नाही.

परवाड्याला एका मित्राकडे आम्ही चहाकरीता थांबलो आणि लगेचच मग सेमाडोहकडे निघालो. आतापर्यंत सुतासारखा सरळ असणाऱ्या  मार्गाने नागमोडी रूप धारण केल्याने बसचा वेग मंदावला परंतु सोबतच आपण निसर्गाच्या कुशीत आल्याचे जाणवले. कधी चढाई तर कधी उतार, बस सतत उजवीकडे किंवा डावीकडे वळणे घेत असल्याने अशा प्रसंगी कोणालाही मळमळ, उलटीचा त्रास होऊ शकतो. याकरीता पोट हलकेच ठेवणे किंवा पहिलेच औषधी घेतल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. अर्थातच घाटाचा रस्ता म्हटलें की अशा गोष्टी ठरलेल्या असतात. मात्र ज्यांना निसर्ग अनुभवायचा आहे त्यांच्यासाठी असा प्रवास म्हणजे आनंदाची पर्वणी असते.  भरभरून वाहणारे पावसाळी ओहोळ, नदी नाले, खोल दऱ्या, कुठे धबधबे तर कुठे धोकादायक वळण पाहुन प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. जवळपास दिड तासाच्या अंतराने आम्ही आमचा पहिला पाडाव असलेल्या सेमाडोहला पोहोचलो आणि प्रवासाचा पहिला टप्पा पार पडला.
क्रमश,,,,,,

चिखलदरा प्रवास वर्णन भाग ०१


चिखलदरा टुर, "दिल ढुंढता है फिर वही", भाग ०१
***************************************
सध्या देशभरात वरूणराजाची तुफानी बॅटींग सुरू आहे आणि पावसाळी पर्यटनाला उधान आलेले आहे. कुठे रिमझीम तर कुठे संततधार बरसत पावसाने यहाके हम सिकंदर हे सर्वांना दाखवून दिलेले आहे. सध्या विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने विदर्भाचे काश्मिर असलेल्या चिखलदराकडे आम्हा मित्रांची पावले कळत नकळत ओढली गेली. अर्थातच हवाहवासा वाटणारा पाऊस, जवळपास ३३ वर्षांपासून असलेले चिरतरुण मित्र-मैत्रिणी आणि जोडीला विकेंड म्हणजेच दुग्धशर्करा योग. 

खरेतर प्रत्येक मित्र स्वत:च्या संसारात रमलेले आहेत, व्यवसायात आकंठ बुडालेले आहेत, जबाबदाऱ्या आणि आव्हाने पेलता पेलता २४×७ व्यस्त आहेत, मात्र मैत्री हा समान धागा या सर्वांना जगाच्या गुंतागुंतीतून अलगद सोडवण्यासाठी रामबाण उपाय ठरला.  भलेही या सहलीची तयारी एक महिन्यापासून सुरू आहे मात्र शेवटपर्यंत किती येतील हे कोडेच होते. अखेर हो, नाही करता करता २५ जण तयार झाले आणि  एकदाचे गंगेत घोडे न्हाले.

सेमाडोह करीता सकाळी सहाला सर्वांनी निघायचे ठरले होते आणि याकरिता उगाच वेळेवर धावपळ नको म्हणून काही मित्र जयपूर, भोपाळ, कल्याण तसेच नांदेड वरून एकदिवस अगोदरच आलेले होते. शनिवारला सकाळी पावसाची रिपरिप सुरू झाली आणि इकडे आमची धावपळ शिगेला पोहोचली. जसजसे एकेक मित्र गोळा होत होते तसतसे प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि यात नवल ते काय ,, कारण बऱ्याच कालावधीनंतर तारे जमी़पर एकत्र होत होते.  शुभारंभासाठी नारळ फोडताच सहलीची सुरुवात झाली आणि दिलखुलास, रोमांचक, भावनिक वादळाचे थैमान सुरू झाले.,,,
क्रमश,,,,,

व्हिएतनाम प्रवास वर्णन, अंतिम भाग


   प्रेसिडेंट पॅलेस, पगोडा,टेंपल ऑफ लिटरेचर
***************************************
दिनांक २८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहाला हनोई ते कोलकाताचे परतीचे विमान होते त्यामुळे आम्हासर्वांना परतीचे वेध लागले होते. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिन तास पहिले पोहचायचा नियम असल्याने सकाळी हो ची मिन्ह मॉसेलिअम पाहिल्यानंतर इतर प्रेक्षणीय स्थळांना थोडे लगबगीने भेट द्यावी लागली. सुदैवाने प्रेसीडेंट पॅलेस, वन पिल्लर पगोडा आणि लिटरेचर टेंपल जवळच असल्याने आणखी धावपळ झाली नाही.

१) प्रेसिडेंट पॅलेस,,,,
हो ची मिन्ह मॉसेलिअम च्या जवळच तुमचे लक्ष वेधून घेणारी एक देखणी पिवळी धमक इमारत उभी आहे, ती प्रेसिडेंट पॅलेस म्हणून ओळखली जाते. फ्रेंच असो वा इंग्रज,,आपले साम्राज्य पसरवतांना त्यांनी कारभार सुरळीत होण्यासाठी काही प्रशासकीय इमारती बांधल्या ज्या आजही दिमाखात उभ्या आहेत. गव्हर्नर जनरल ऑफ इंडोचायनासाठी ही इमारत १९९० ते  १९०६ दरम्यान उभारली गेली. आजुबाजुला आंब्यांच्या झाडांनी वेढलेली ही वास्तू  इटालियन वास्तुकलेचा उत्तम नमुना असून आपल्या विशिष्ट रंगामुळे यलो पॅलेस म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. सामान्य जनते करिता या इमारतीत प्रवेश नसून फक्त सरकारी अधिकारी किंवा परदेशी शिष्टमंडळ यांच्या बैठकीसाठी या ठिकाणाचा उपयोग होतो. अमेरिकचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची फेब्रुवारीला झालेली दुसरी शिखर परिषद इथेच प्रस्तावीत होती परंतु काही कारणास्तव ती सोफीटेल लिजेंड मेट्रोपोल या हनोईच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय हॉटेलमध्ये घेण्यात आली.

२) वन पिल्लर पगोडा,,,,,
इ.स. १०२८ ते १०५४ पर्यंत राज्य करणाऱ्या ली थाई टॉंग या बादशहाने १०४९ मध्ये वन पिल्लर पगोडाची रचना केली. याच्या निर्मीतीची एक वेगळीच कहाणी आहे. या राजाच्या स्वप्नात येऊन बोधीसत्व अवलोकितेश्वराने कमलपुष्पात बसून राजाला एक पुत्र दिला. याच्याच स्मरणार्थ राजाने या पगोडाची रचना केली. इथे बादशहाच्या काळात बौद्ध धर्माशी संबंधित वसक सारखे समारंभ पार पाडले जायचे. लाकडी बांधकाम असलेला हा पगोडा एका दगडी खांबावर उभा आहे. सव्वा मिटर व्यासाच्या आणि चार मिटर उंचीच्या खांबावर उभ्या या पगोडाची रचना उमलत्या कमलपुष्पासारखी आहे. अर्थातच एवढे सुंदर धार्मिक स्थळ आक्रमकांच्या नजरेत नसते आले तर नवलच असते. १९५४ ला फ्रेंच युनियन सैन्याने पहिल्या इंडोचायना युद्धात हे स्थळ उध्वस्त केले होते. मात्र याला पुन्हा एकदा मुळ स्वरूपात उभे करण्यात आले आहे.

३) लिटरेचर टेंपल,,,
खरेतर हे धार्मिक ऐवजी एक पुरातन शैक्षणिक स्थळ आहे. कन्फ्युसिएनिझम अर्थातच याला स्कुल ऑफ थॉट म्हटले गेले आहे. १०७० ला ली थॉंग टॉंग नामक बादशहाने याची स्थापना केली होती. ५०,००० चौ.मिटरवर उभी असलेल्या या वास्तुच्या सुरवातीलाच एक मोठी घंटा ठेवली आहे, जी एखादी महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या आगमणप्रसंगी वाजविली जायची. चार प्रांगणानंतर आपण पाचव्या आणि मुख्य दोन मजली इमारतीजवळ येतो. इथे उजव्या बाजूला २.१ मिटर उंच आणि ०.९९ मिटर रुंद विशाल घंटा आहे तर डाव्या बाजूला २.१ मिटर रूंद, २.६५उंच ड्रम आहे. तळमजल्यावर प्राचिन गुरूचे मंदिर असून पहिल्या मजल्यावर  तिन राजांचे मंदिर आहे. पहिल्या राजा  ली थॉनने १०७० ला या शिक्षणमंदीराची स्थापना केली तर ली नाह याने ११२७ पर्यंत याचे शाही विद्यालयात रुपांतर केले. ली टॉंगने १४४२ ते १४९७ दरम्यान इथली शिक्षणपद्धती, विविध विद्वान, परिक्षापद्धती याबाबत ११६ शिलालेख तयार केले. १९४५ ते १९५४ पर्यंतच्या इंडोचायना युद्धात फ्रेंचांनी या इमारतीची प्रचंड नासधूस करून तिथे रुग्णालय उभारले होते.एव्हाना दुपारचे बारा वाजले होते आणि आता वेळ होती हनोईचा निरोप घ्यायची. 

सात दिवस स्वप्नवत घालवल्यानंतर आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. मात्र या सात दिवसांत युद्धाची थरारकता, फ्रेंच, अमेरिकन आक्रमकांची क्रुरता, व्हियतनामी जनतेची मातृभुमीप्रती असलेली श्रद्धा, समर्पन आणि अनन्वित छळ सोसूनही हार न मानण्याची झुंजार वृत्ती, हो ची मिन्ह यांचे असामान्य नेतृत्व मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेले. सोबतच परकिय भुमीवर कब्जा करण्यासाठी युद्धात रासायनिक आणि विध्वंसक हत्यारे वापरणाऱ्या अमेरिकेविषयी चिड निर्माण होते. दक्षिण व्हिएतनामच्या कामचलाऊ आणि अमेरिका धार्जिण्या नेतृत्वापुढे उत्तर व्हिएतनामी कॉंगने स्वातंत्र्यलढ्याला धार देत न केवळ दक्षिण व्हिएतनामला अमेरिकन जोखडातून मुक्त केले परंतु उत्तर दक्षिण व्हिएतनामला एकत्र करून एका भक्कम राष्ट्राची निर्मिती केली. 

महाराष्ट्राच्या तुलनेत अर्धा असलेल्या व्हिएतनामने भारताच्या तिप्पट असलेल्या आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्य अमेरिकेला धुळ चारत आक्रमकांना एक चांगला धडा शिकवला आहे. १९४५ ते १९७५ असे  ३० वर्षे युद्धात भरडल्यानंतरही व्हिएतनामने घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. इतिहास दर्दी आणि  निसर्गप्रेमींना भटकंतीसाठी  व्हिएतनाम एक आदर्श ठिकाण आहे. 
"प्रवासवर्णन समाप्त."
***************************************
दि. ०६ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०९


           व्हियतनाम प्रवासवर्णन भाग ०९
       व्हियतनामचे राष्ट्रनायक "हो ची मिन्ह"
***************************************
२२ नोव्हेंबरला सुरू झालेला आमचा व्हियतनाम प्रवास अखेरच्या टप्प्यात आला होता आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच २८ नोव्हेंबरला सकाळी आम्ही पोहचलो हो ची मिन्ह मॉसेलिअम अर्थातच हो ची मिन्ह यांचे पार्थिव संरक्षीत, सुरक्षीत आणि जतन करून ठेवलेल्या जागी. खरेतर मृत्युनंतर आपला दाह संस्कार करून ती राख उत्तर,मध्य आणि दक्षिण व्हियतनामच्या भुमीत अर्पण करावी अशी या जननायकाची इच्छा होती परंतु हो ची मिन्ह यांचे कर्तृत्व, देशभक्ती आणि जनमानसावर असलेली छाप पाहता त्यांच्या पार्थिवावर प्रक्रिया करून ते जतन करून हनोईच्या मॉसेलिअम मध्ये ठेवण्यात आले आहे.

हा संपूर्ण परिसर सैन्याच्या ताब्यात असून कडक सुरक्षा तपासणी केल्यानंतर आत प्रवेश मिळतो. जवळपास २०० मिटर पैदल चालल्यानंतर आपण मुख्य इमारतीजवळ पोहचतो. ही इमारत १९७२ ते १९७५ च्या दरम्यान बांधल्या गेली असून वर्षातून ३ महिने म्हणजेच जुलै ते सप्टेंबर पर्यंत बंद असते. २१.६ मिटर उंच आणि ४१.२ मिटर रूंदीच्या या इमारतीच्या दर्शनी भागात हो ची मिन्ह असे ठळक अक्षरात लिहिलेले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूला सात पायऱ्यांचे  दोन मोठे प्लॅटफॉर्म असून सैन्याची परेड बघण्यासाठी याचा उपयोग होतो. मुख्य द्वाराच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे पुष्पचक्र ठेवलेले असतात. या इमारतीच्या सभोवताल सुंदर बगीचा असून तिथे व्हियतनामच्या विविध भागातील २५० प्रकारच्या वनस्पती आणि फुलझाडांची लागवड केलेली आहे.

संपुर्ण परिसरात पांढऱ्या शुभ्र गणवेशातील सैनिकांचा राबता असून मुख्य इमारतीच्या आत जायच्या पहिले पुन्हा एकदा सुरक्षा तपासणी केली जाते. विशेषतः गळ्यातील दुपट्टे, गॉगल्स, डोक्यावरील हॅट, म्युझिक सिस्टिम, इअरफोन काढून सरळ हाताने आत प्रवेश दिला जातो. मॉस्को, रशियातील लेनिनच्या मॉसेलिअमच्या धर्तीवर ही इमारत बांधली गेली असून बाह्यभाग ग्रे ग्रॅनाईटने तर अंतर्भाग ग्रे,ब्लॅक, रेड पॉलीशच्या दगडांपासून निर्मित केला आहे. इमारतीच्या सेंट्रल हॉलमध्ये सशस्त्र  सैनिकांच्या खड्या पहाऱ्यात, काचेच्या पेटीत हो ची मिन्ह चिरनिद्रा घेत आहेत. अतिशय शांत, थंड वातावरणात आणि अंधुक प्रकाशात समाधीस्त,,, व्हियतनामचा हा भाग्यविधाता संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे. जिथे त्यांचे पार्थिव संरक्षीत आहे, त्या मागच्या भिंतीवर उजव्या बाजूला कॉम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह विळा हातोडा तर डाव्या बाजूला व्हियतनामच्या राष्ट्रध्वजावर असलेला तारा अंकीत केलेला आहे.

खरेतर हो ची मिन्ह यांचा एकुण सक्रिय कार्यकाळ १९४१ ते १९६५ पर्यंत राहिलेला आहे. या दरम्यान त्यांनी स्वत:ला स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वी झोकून दिले. ते जनमानसावर पकड असलेले बुद्धीमान नेते होते. साधी राहणी, देशासाठी वाट्टेल तो त्याग करायची भावना, सोबतच *माझे जीवन फक्त आणि फक्त मातृभुमीसाठी व जनतेच्या भल्यासाठी आहे* याच तत्वावर त्यांनी व्हियतनामकरीता आपले आयुष्य वेचले. ते एक उत्तम लेखक, कवी आणि पत्रकार होते. फ्रेंच, इंग्लिश, रशियन, कॅंटोनीज, मॅंडारीन आणि व्हियतनामी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. १९६५ पर्यंत त्यांनी सरकारमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती अशी विविध पदे भुषवली. १९६५ नंतर प्रकृती ढासळल्याने त्यांचा राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग कमी झाला.
मॉसेलियमच्या जवळच ते राहत असलेले छोटेखानी घर आहे. दोन खोल्या, एक बिछाना, रेडीओ, एक चप्पलची जोडी आणि त्यांचा खाकी गणवेष ,,,,हीच त्या महात्म्याची साधनसंपत्ती होती.

 ते अध्यक्ष असतांना त्यांना रशिया आणि इतर देशांकडून तिन आलिशान कार सप्रेम भेट मिळाल्या होत्या मात्र त्याचा फारसा उपयोग ते करत नव्हते. घराशेजारीच शत्रुंच्या बॉंम्बहल्लापासून बचावासाठी एक मोठे बंकरसुद्धा केलेले होते. आयुष्यभर कधी फ्रेंच तर कधी अमेरिकेशी निधड्या छातीने लढलेल्या या योद्ध्यावर मार्क्स आणि लेनिनचा प्रचंड प्रभाव होता. हो ची मिन्हच्या राहत्या घरात आजसुद्धा मार्क्स आणि लेनिनचा फोटो बघायला मिळतो. तसेच महाराष्ट्र अथवा भारतातील कोणतेही आराध्य दैवत, महापुरुष, साधुसंत अथवा राजनेत्याचा त्यांच्या राहत्या घरात अथवा मॉसेलिअममध्ये उल्लेख नाही. एवढेच नव्हे तर त्यांचे घर अथवा मॉसेलिअममध्ये भारतातील कोणतेही आराध्य दैवत, महापुरुष, साधुसंत, राजनेता यांची वचने, काव्यपंक्ती, श्र्लोक अथवा टिप्पणी यांची नोंद केलेली नाही. वास्तविकत: व्हियतनाममध्ये जननायक, राष्ट्रनायक, उद्धारकर्ता, तारणहार, राष्ट्रीय हिरो म्हणून एकमेव नाव समोर येते आणि ते म्हणजे हो ची मिन्ह यांचे. 

०२ सप्टेंबर १९६९ ला म्हणजेच वयाच्या ७९ वर्षी हो ची मिन्ह यांनी इहलोकाची यात्रा संपवली. व्हियतनाम अजूनही अमेरिकेच्या लादलेल्या युद्धात भरडले जात होते. त्यांच्या मृत्यूसमयी २,५०,००० लाख लोक, ५००० सरकारी अधिकाऱ्यांसह तब्बल  ४० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हो ची मिन्ह यांच्या स्मरणार्थ, गौरवार्थ ०२ सप्टेंबर हा दिन राष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जात़ो तर १९७५ ला व्हियतनाम स्वतंत्र झाल्यानंतर सेगॉन शहराचे नाव बदलून त्याला "हो ची मिन्ह सिटी" असे नामकरण करण्यात आले.
क्रमशः,,,,,,
***************************************
दि. ०६ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०८


            व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०८
***************************************
हो ची मिन्ह शहरात तिन दिवस मनसोक्त फिरल्यानंतर आता वेळ होती या ऐतिहासिक आणि सामरिक शहराचा निरोप घ्यायची. अर्थातच स्पॅनिश, फ्रेंच आणि अमेरिकन संस्कृतीत रूळलेले हे आधुनिक शहर व्हिएतनामची सध्याची राजधानी असलेल्या हनोई शहरांपेक्षा आधुनिकतेच्या बाबतीत कितीतरी पुढे आहे. एखाद्या शहरातील लोकांच्या वेशभुषेवरून त्या शहराची संस्कृती आणि परंपरा याची पुसटशी कल्पना जरूर येते. इथल्या टोलेजंग इमारती, हॉटेल्सची वर्दळ, गजबजलेली बाजारपेठ आणि अविरत धावणाऱ्या प्रवासी टॅक्सीज पाहून एखाद्या मेट्रोपॉलिटन शहराची आठवण येते. विशेष म्हणजे इथली मुख्य भाषा व्हियतनामी जरी असली तरी मोडक्या तोडक्या इंग्रजीत आपले काम सहज निभावते.

शेवटचे तिन दिवस आमचा मुक्काम हनोई शहरात होता, जे हो ची मिन्हपासून १७७२ कि.मी. अंतरावर होते. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आम्ही याकरीता विमानप्रवासाला प्राधान्य दिले आणि हे अंतर तिन तासात कापत आम्ही हनोईच्या नोई बे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. हनोई हे शहर व्हिएतनामच्या उत्तर टोकाला आहे आणि इथे सोव्हिएत रशिया तसेच चीनचा बराच काळ दबदबा राहिल्याने हो ची मिन्हच्या तुलनेत पारंपरिक पद्धतीचे शहर भासते. लाल नदीच्या कुशीत वसलेले हे शहर आयलॅंड इन दी रिव्हर*म्हणून प्रसिद्ध आहे.

जवळपास ८० लाख लोकसंख्या असलेलं हे शहर प्रशासकीय भवन, शैक्षणिक संस्था, संग्रहालय, महाल, संसद भवन, राष्ट्रपती भवन याकरिता ओळखले जाते. कॉम्युनिस्टांचा बालेकिल्ला असलेल्या या शहरात सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी घुसखोरी केली होती. तर १९ व्या शतकात फ्रेंचांनी इथे आपले वर्चस्व गाजवत बऱ्याच चर्चेसची उभारणी केली. सध्या इथे बौद्ध धर्माचे बाहुल्य असले तरी कॉम्युनिस्ट साम्यवादी सरकारच्या नो रिलीजन पॉलिसीचे कटाक्षाने पालन केले जाते. अतिशय वर्दळ असलेल्या या शहरात सार्वजनिक वाहतुकीची चांगली व्यवस्था नसल्याने दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे.

हनोई शहरापासून १०० कि.मी. अंतरावर व्हियतनामची प्राचिन राजधानी हो ल्यू हे स्थान आहे. नवव्या शतकात आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक राजधानीचे हे स्थळ आता ओसाड झालेले आहे. इथे सातव्या शतकात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याने इथल्या राजवटीत पगोडाला अनन्यसाधारण महत्त्व होते. १२ व्या शतकापर्यंत एकुण लोकसंख्येच्या जवळपास अर्धी लोकसंख्या बौद्ध भिक्षुंनी व्यापली होती. ही राजधानी लाईमस्टोन पर्वतरांगांमध्ये सामावली असल्याने बाह्य आक्रमणाचा फारसा धोका नव्हता परंतु चीनकडून आक्रमण होताच या पहाडांमध्ये सुरक्षेसाठी माती आणि लाकुड मिश्रीत दहा भिंती बांधण्यात आल्या होत्या. सर्वात मोठी भिंत ५०० मिटर लांब तर छोटी ६५ मिटर लांब होती. प्रत्येक भिंतीची उंची १० मिटर तर रूंदी १५ मिटर एवढी होती. मात्र काळाच्या ओघात, ऊन पाऊस आणि वातावरणाचा मारा झेलत या भिंतींचे आता काही अवशेषच बाकी आहेत. शिवाय पुरातत्त्व खात्याने केलेल्या खोदकामाने उरलेसुरले अवशेषही नामशेष होत आहेत.

हो ल्यु या राजधानीत ली राजवंशाने ९ व्या आणि १० व्या शतकापर्यंत राज्य केले. १०१० मध्ये मात्र हे स्थान सोडून हनोईला ही राजवट स्थानांतरीत झाली. या भुमीवर जस जसे परकिय आक्रमण होत गेले तस तसे इथले धर्म, संस्कृती आणि परंपरेची अतोनात हानी झाली. परकिय आक्रमकांनी पगोडा आणि इतरही धार्मिक स्थळांना लक्ष्य करत आपली बाहृय संस्कृती इथे रूजवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातच सोव्हिएत रशिया आणि चीनच्या कॉम्युनिस्ट साम्यवादी विचारसरणीचा इथे प्रचंड पगडा असल्याने फक्त पौर्णिमा अथवा चायनीज नवीन वर्षाच्या वेळी स्थानिक पगोडा मध्ये जातात.
सध्या हो लु मध्ये दोन राजांचे मंदिरे असून हा परिसर अतिशय स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. दोन्ही राजांच्या मंदिरात फुले, फळे, अन्नपदार्थ यासोबत बिअरच्या कॅन ठेऊन पुजा केलीली असते. हिरवीकंच पार्श्वभुमी आणि सभोवताल लाईमस्टोनचे हिरवेगार, गगणभेदी पहाड पाहून आपण स्वर्गात आल्याची अनुभुती येते. इथले वातावरण इतके निसर्गरम्य आणि आल्हाददायक असते की कोणालाही इथे फोटोसेशन केल्याशिवाय राहवले जात नाही.

इथुनच एक तासाच्या अंतरावर टॅम कॉक हे प्रेक्षणीयस्थळ आहे. १९९४ ला युनोस्कोने याला जागतिक वारसा स्थळात स्थान दिलेले आहे.लाईमस्टोन पहाडांची महाकाय श्रृंखला आणि त्यात नागमोडी वळणे घेत शांतपणे वाहणारी नदी, सभोवताल हिरवा शालू नेसलेला रम्य परिसर तुमची नजर खिळवून ठेवते. डिसेंडींग ड्रॅगन अर्थातच हॅलाॅंग बे नावाने हे स्थान प्रसिद्ध असून छोट्या होड्यांद्वारे यात भटकता येते. या प्रवासात पहाडात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या तिन गुफेतुन आपला प्रवास पार पाडल्या जातो. स्थानिक स्त्रीयांद्वारे या होड्यांचे संचालन केले जाते.

जवळपास १२२५२ हेक्टरवर पसरलेला हा परिसर लाईमस्टोन माऊंटेन इकोसिस्टीम आणि एक्वॅटीक इकोसिस्टीम अशा दोन भागात विभागला जातो. पहिल्या इकोसिस्टीम मध्ये वनस्पतींच्या ६०० प्रजाती प्राण्यांच्या २०० प्रजाती आढळतात. तर एक्वॅटीक इकोसिस्टीम मध्ये जलचरांच्या ३० तरंगणाऱ्या आणि ४० पाण्याखालील प्रजाती आढळतात. दुर्मिळ प्रजातीत गणला गेलेला स्ट्रिप नेक टर्टल इथे आढळतो. अंदाजे एक दिड तासांचा हा प्रवास संपुच नये असे वाटतो. मधातच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी आणि थंडी हवा या प्रवासाचा रोमांच आणखी वाढवून जातो. खरोखरच निसर्गाच्या सान्निध्यातला हा रम्य प्रवास खऱ्या अर्थाने पैसा वसूल करून देतो. प्रवासाच्या एका टोकाला चहा, काॅफी, कोल्ड्रींक्स आणि बिअरची तरंगती दुकाने असल्याने काही काळ तिथे विश्रांती घेता येते.
क्रमशः,,,,,,
***************************************
दि. ०५ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
***************************************

व्हिएतनाम प्रवास वर्णन भाग ०७


                  "मिकाॅंग" "डेल्टा" टुर
             व्हिएतनाम प्रवासवर्णन भाग ०७
***************************************
पहिल्या दोन दिवसांच्या रणधुमाळी नंतर तिसरा दिवस होता मिकॉंग डेल्टा प्रवासाचा. तिबेट पर्वतरांगांतून उगम पावलेली मिकॉंग ही नदी जवळपास ४३५० कि.मी. लांब असून जगातली १२ व्या क्रमांकाची तर आशियातील ७ व्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. आपल्या उगमापासून चीन, म्यानमार,लाओस, थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनाम अशा सहा देशांचा प्रवास करत दक्षिण चीन समुद्राला मिळते. 

ही नदी पश्र्चिम चीन ते दक्षिणपूर्व आशियातील देशातील जलवाहतुकीचा उत्तम पर्याय आहे. आपल्या ९ शाखांसह मिकॉंग नदी ड्रॅगन, युनिकॉर्न, फिनिक्स आणि टॉरटाईज अशा चार सुंदर बेटांची रचना करते. या बेटांवर प्राण्यांच्या अंदाजे १००० प्रजाती आढळतात. सोबतच वनस्पती, मासे, सरपटणारे प्राणी, सस्तन प्राण्यांच्या नवीन प्रजातीसुद्धा आढळतात. मुख्य म्हणजे दुर्मिळ आणि नामशेष होत असलेला लाओटिन रॉक रॅट हा खारूताई, उंदीरासारखा प्राणी इथे आढळतो.

हो ची मिन्ह शहरापासून मिकॉंग डेल्टा जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे. डेल्टा सेंटर पासून बोटीने आपल्या प्रवासाची सुरुवात होते. मिकॉंग नदीचे पात्र एवढे विशाल आणि अथांग आहे की आपण एखाद्या समुद्रातच सफर करतोय असा भास होतो. जवळपास अर्धा तासानंतर आम्ही युनिकॉर्न या बेटावर उतरलो. बेटावर उतरताच पाहुण्यांचे इथे पारंपरिक गित संगीताने स्वागत केले जाते. सोबतच टरबुज, पपई, अॅपल, चिकू, ड्रॅगनफ्रुट, आंबा इ. फळे आणि ग्रिन टी दिली जाते. मात्र याबदल्यात तुम्हाला टीप द्यावी लागते.

याच बेटावर फळझाडांची लागवड केली असुन छोट्या कालव्यांद्वारे जलपुरवठा केला जातो. मुख्य म्हणजे इथे कुठेही सहजासहजी न आढळणारे वॉटर कोकोनट हे फळ पहायला मिळते. आणखी थोडे समोर गेल्यावर कोको पासुन चॉकलेट, बिस्कीट, पावडर, चिक्की करण्याचे स्थान आहे. बाजुलाच बी फार्मिंग म्हणजेच मधमाशी संगोपन केंद्र आहे. इथे मधमाशांपासून मध संकलन करून त्याची विक्री केली जाते. या दोन्ही जागी भेट दिल्यानंतर घोडागाडीने २ कि.मी‌ अंतरावर असलेल्या थोई सॉन या कालव्यापर्यंत सोडले जाते.

इथुन छोट्याशा होडीतून आपला १ कि.मी.अंतराचा प्रवास सुरू होतो. मुख्य म्हणजे सर्वच होड्या स्त्रीयांद्वारे वल्हवल्या जातात. आजुबाजुला असलेली नारळाची झाडे आणि अतिशय शांत वातावरणातला हा प्रवास मनस्वी आनंद देऊन जातो. तुम्ही सुद्धा या होड्या वल्हवू शकता मात्र आपल्याला सवय नसल्याने लवकरच थकवा येतो. हा प्रवास संपताच पुन्हा एकदा आपण बोटीवर येतो. अर्थातच इथेसुद्धा आपल्याला टीप द्यावी लागते.

बोटीवर येताच नारळपाणी देऊन स्वागत करण्यात येते. गोड, चवदार पाणी पितात फिरल्याने आलेला थकवा, आळस क्षणार्धात दूर होतो. आणखी अर्धा तासाच्या प्रवासानंतर मुख्य बेटाशी आपली बोट येऊन थांबते. इथे सुरवातीलाच कोकोनट कॅंडी वर्कशॉप आहे. इथे नारळाच्या झाडापासून तयार केलेल्या विविध वस्तूंचे, कॅंडी, चॉकलेट, चिक्कीचे प्रदर्शन व विक्री केली जाते. सोबतच कॅंडी, चॉकलेट ची संपूर्ण निर्माण प्रक्रिया दाखविली जाते. इथचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्नेक वाईन, बनाना वाईन आणि कोकोनट वाईन होय. विशेषतः मद्यप्रेमींसाठी भल्यामोठ्या जारमध्ये कोब्रा वाईन, बनाना ठेवलेली असते. साक्षात कोब्रा डुंबलेल्या जारमधले मद्य पाहुण्यांना चाखण्यासाठी मोफत दिले जाते आणि विक्री साठी सुद्धा ते उपलब्ध असते.

एव्हाना दुपार झाली असते आणि पोटात कावळे ओरडत असतात. जवळच असलेल्या भलेमोठ्या  रेस्टाॅरंटमध्ये दुपारच्या जेवणाची सोय केलेली असते. इथले वैशिष्ट्य म्हणजे एलीफंट इअर फिश. अख्खी एलिफंट फिश समोर आणुन ठेवताच हिला खायचे की पाहत रहायचे हा प्रश्नच पडतो. सोबतच रंगबिरंगी झिंग्यांनी सजवलेली प्लेट पाहून मन भरून येते. यासोबतच चिकन, आमलेटची भरमार होताच न जेवतासुद्धा एवढे अन्नपदार्थ पाहून पोट भरून येते.दुपारचे जेवण आटोपताच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. एक तासांनी पुन्हा एकदा डेल्टा सेंटरला परत येताच या आनंददायी प्रवासाचा शेवट झाला.
क्रमशः,,,,,,,
***************************************
दि. ०४ डिसेंबर २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...